Friday, 3 June 2022
भांडवली नफा तोटा 2
#भांडवली_नफा_तोटा_2
यापूर्वी आधीच्या भागात वाचल्याप्रमाणे विविध मालमत्ता भांडवली मालमत्ता आहेत की नाहीत? कोणत्या मालमत्ता किती काळ, कशासाठी आणि कोण धारण करीत आहे? त्याप्रमाणे त्यावर कर आकारणी केली जाते. आता वेगवेगळ्या मालमत्तांच्या अल्प/ दीर्घ मुदतीच्या भांडवली मालमत्तेची काही उदाहरणे पाहू, म्हणजे ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल.
★शेअर्स /शेअर्सवर आधारित युनिट योजना - ज्यात शेअर्सचा वाटा 65% आहे. याबाबत-
*शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांच्या संदर्भात 12 महिन्याच्या आतील नफा हा अल्पकालीन तर त्याहून अधिक कालावधीनंतर मिळालेला नफा दीर्घकालीन समजला जातो. अल्पकालीन नफ्यावर 15% या विशेष दराने तर 1 लाख रुपयांहून अधिक असलेल्या दीर्घकालीन नफ्यावर 10% या विशेष दराने कर आकारणी केली जाते. याशिवाय अन्य कोणतीही सवलत यावर मिळत नाहीत.
*अन्य उत्पन्नात हा नफा मिळवून उत्पन्न करपात्र मर्यादेहून कमी असल्यास कोणताही कर देण्याची आवश्यकता नसते.
*अल्पकालीन नफा मोजताना शेअर खरेदी केलेल्या खर्चातील दलाली त्यात मिळवली जाते तर विक्री करता दिलेली दलाली यातून वजा होते. यासाठी 1जानेवारी 2004 नंतर काही अपवाद - जसे आयपीओ, राईट, बोनस वगळून इतर व्यवहारावर रोखे व्यवहारकर (STT) भरलेला असावा अशी अट होती. अलीकडेच ही अट रद्द करण्यात आली आहे, कारण आता सर्व भारतीय नागरिक गिफ्ट सिटीमध्ये असलेल्या शेअरबाजारातून डॉलर्सच्या माध्यमातून खरेदी विक्री करू शकतात. येथील व्यवहारांवर रोखे व्यवहारकर आकाराला जात नाही.
*त्याचप्रमाणें 1 फेब्रुवारी 2018 पूर्वी दीर्घकालीन भांडवली नफा करमुक्त होता त्याची भरपाई करण्यासाठी यापूर्वी घेतलेल्या शेअर्सची खरेदी किंमत अथवा 31 जानेवारी 2018 चा सर्वाधिक भाव यातील जो जास्तीतजास्त भाव असेल तीच त्या शेअर्सची खरेदी किंमत घराण्याची मुभा देण्यात आली आहे. 31 जानेवारी 2018 ची किंमत घरून कर आकारणी मोजल्यास त्याला ग्रँडफादरिंग करणे असे नाव देण्यात आले आहे.
*राईट शेअर्सची खरेदी करण्यासाठी जी किंमत दिली तीच धरली जाईल.
*बोनस शेअर्ससाठी पैसे द्यावे लागत नसल्याने त्याची किंमत शून्य धरली जाईल.
*एक्सचेंजच्या माध्यमातून भागधारकांना टेंडर ऑफर देऊन शेअर्स कंपनीने पुनर्खरेदी केल्यास त्यातून मिळालेल्या भांडवली नफ्यावर कोणतीही कर आकारणी होत नाही.
*इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेअर्स/ युनिट यांची विक्री करताना त्या डी मॅट खात्यात जे शेअर प्रथम आले तेच शेअर प्रथम विकले असे समजण्यात येईल. (First in first out)
*कर आकारणी करताना अन्य उत्पन्नात हे उत्पन्न मिळवून निव्वळ करपात्र मर्यादेहून अधिक असेल तरच कर द्यावा लागतो.
*निव्वळ नफ्याची मोजणी करताना एकाच प्रकारचा तोटा समायोजित केला जाईल तरीही तोटा शिल्लख राहिल्यास दीर्घ मुदतीचा तोटा पुढील सात वर्ष भविष्यातील दीर्घ मुदतीच्या नफ्यात समायोजित केला जाईल तर अल्प मुदतीचा तोटा अल्प आणि दीर्घ मुदतीच्या नफ्यात समायोजित होईल तरीही शिल्लख राहिलेला तोटा पुढील सात वर्षात समयोचित करता येईल. यासाठी करदात्यांने त्याचे विवरणपत्र योग्य मुदतीत भरणे आवश्यक आहे.
काही उदाहरणे विचारात घेऊ
*अजयने एका नोंदणीकृत कंपनीचे शेअर आठ महिन्यांनी विकले. यातून मिळालेला नफा हा हे शेअर्स एक वर्षाच्या आत विकल्याने हा अल्प मुदतीचा भांडवली नफा समजला जाईल व त्यावर 15% दराने कर आकारणी होईल.
*विजयाने एका नोंदणी नसलेल्या कंपनीचे शेअर खरेदी करून 20 महिन्यांनी विकले या व्यवहार झाल्याला वर्ष होऊन गेला आहे परंतू हे शेअर नोदणी केलेले नसल्याने हा नफा अल्पमुदतीचा भांडवली नफा समजला जाऊन त्यावर 15% या विशेष दराने करआकारणी केली जाईल.
*विशालने एक वर्षानंतर नोंदणीकृत कंपनीचे शेअर्स विकून त्याला एक लाख दहा हजार नफा झाला. हा दिर्घमुदतीचा भांडवली नफा आहे यातील 1 लाख नफ्यावर कोणताही कर नाही त्यावर झालेल्या दहा हजारवर 10% विशेष दराने कर आकारणी होईल.
*राजेशने 2 महिन्यांपूर्वी एका कंपनीचे शेअर खरेदी केले होते त्याच कंपनीचे दोन वर्षांपूर्वी राकेशने घेतलेले शेअर्स या दोघांचे शेअर कंपनीने स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून खरेदी केले. राजेशला झालेला भांडवली नफा अल्प मुदतीचा तर राकेशचा दीर्घ मुदतीचा असला तरी ही खरेदी कंपनीने एक्सचेंजच्या माध्यमातून करून त्यावर 20% दराने कर भरलेला असल्याने राजेश आणि राकेश या दोघांचा भांडवली नफ्यावर कोणताही कर लागणार नाही. आपल्या आयकर विवरणपत्रात दोघेही सदर नफा करमुक्त उत्पन्न म्हणून दाखवू शकतील.
*केदारने त्याच्या ब्रोकरमार्फत डॉलर्सच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातून काही शेअर घेतले यातील काही शेअर्स एक वर्षाच्या आत विकले तर काही एक वर्षानंतर विकले. यातून झालेल्या अल्प आणि दीर्घकालीन नफ्याची मोजणी रुपयांत करून अल्पकालीन नफ्यावर 15% विशेष दराने आणि दीर्घकालीन नफ्यावर एक लाखापर्यंत कर नाही त्याहून अधिक नफ्यावर 10% विशेष दराने कर आकाराला जाईल.
★कर्जरोखे किंवा त्यावर आधारित म्युच्युअल फंडाच्या योजना- यातील
तीन वर्षांच्या आतील नफा हा अल्पमुदतीचा भांडवली नफा समजला जाऊन त्यावर नियमित दराने कर आकारणी होईल तर तीन वर्षावरील नफ्यावर 20% दराने कर आकारणी होईल. हे करत असताना इंडेक्ससेशनचा फायदा मिळत असल्याने जे लोक मुदत ठेवीत पैसे ठेवतात ते अशा फंडात गुंतवणूक करून आपली करदेयता कमी करू शकतील.
घर सोनेनाणे यांची विक्री करून मिळणारा भांडवली नफ्याचा आपण पुढील भागात विचार करू अन्य मालमत्ता प्रकारात तीन वर्षांच्या आतील नफा अल्पमुदतीचा समजून नियमितदराने तर त्याहून अधिक कालावधीचा नफा दीर्घकालीन समजण्यात येऊन त्यावर 20% दराने कर आकारणी होते. यास इंडेक्ससेशनचा फायदा घेता येत नाही. हा फायदा फक्त घर आणि कर्जरोखे यावरील दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर मिळतो (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 3 जून 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment