Friday, 10 June 2022
भांडवली नफा तोटा 3
#भांडवली नफा तोटा 3
या पूर्वीच्या भागात आपण शेअर आणि कर्जरोखे त्यावर आधारीत म्युच्युअल फंडाच्या योजनांचे युनिट यावरील कर आकारणी कशी केली जाते ते पाहिले. आज घर आणि सोने यावरील भांडवली कर आकारणीचा विचार करूयात.
घरासंबंधी ते बांधणे, भाड्याने देणे, कर्ज घेणे, दुरुस्ती करणे यासाठी आयकर कायद्यात बऱ्याच सवलती आहेत, त्याचा वापर करून आपली करदेयता खूप कमी करता येईल.
घर विकल्यामुळे होणारा नफा हा भांडवली नफा होईल. यामध्ये ते दोन वर्षांच्या आत विकल्यास होणारा नफा हा अल्पकालीन भांडवली नफा समजून करदात्याच्या उत्पन्नात मिळवला जाईल आणि त्यानुसार त्याची करदेयता ठरेल. मात्र दोन वर्षांनंतर त्याची विक्री केल्यास होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा होईल. तो वाचवण्यासाठी अन्य घर घेणे किंवा मान्यताप्राप्त इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्डमध्ये ₹ 50 लाख मर्यादेत गुंतवणूक करण्याचे पर्याय आहेत.
यावरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा काढताना घराच्या दुरुस्ती साठी काही खर्च केला असल्यास त्याची किंमत खरेदी किमतीत मिळवता येते त्याचप्रमाणे या खर्चासही इंडेक्ससेशनचा फायदा मिळतो. हा निर्देशांक आयकर विभागाकडून साधारण जून महिन्यात जाहीर केला जातो तो अंकात असतो सन 2000-2001 साठी तो 100 होता. तर सन 2020-2021 या सालासाठी 317 होता. सन 2021-2022 साठीचा निर्दिशांक लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे.
सन 2001पूर्वी बांधलेल्या घराचे त्यावेळी असलेले बाजारमूल्य ही घराची खरेदी किंमत धरता येते. दोन निर्देशांकात असलेल्या फरकाने खरेदी किमतीस गुणून शंभराने भागले असता त्याची निर्देशांकानुसार येणारी किंमत मिळेल ही किंमत विक्री किमतीतून वजा केली आणि त्या घरास विक्री करताना दोन वर्षाहून अधिक काळ झाला असेल तर मिळणारा नफा हा दिर्घमुदतीचा भांडवली नफा होईल.
करदाता निवासी भारतीय असेल तर त्याने नफा अल्प मुदतीचा आहे की दीर्घ मुदतीचा याचा विचार न करता ₹50 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार असल्यास 1% मुळातून करकपात करावी लागेते हा कर खरेदीदारांने भरून त्याचे प्रमाणपत्र विक्रेत्यास द्यायचे आहे आणि हा कर वगळून राहिलेली रक्कम द्यायची आहे. अनिवासी भारतीय करदात्यांच्या बावतीत व्यवहार करताना व्यवहार तो कितीही रुपयांचा असो 20% कर आणि सरचार्ज मुळातून कापून घ्यायचा आहे.
धातुरुपात सोने घेणे एवढा एकाच पर्याय पूर्वी उपलब्ध होता आता याशिवाय अनेक पर्याय आहेत उदा डिजिटल गोल्ड, पेपर गोल्ड, गोल्ड डिरिव्हेटिव्हीव इ. यातील सर्वांवर तीन वर्षांच्या आतील होणारा फायदा अल्पकालीन भांडवली नफा समजला जाईल आणि त्यावर नियमानुसार कर द्यावा लागेल. तीन वर्षाहून अधिक काळानंतर मिळालेला नफा दीर्घकालीन भांडवली नफा समजून त्यावर 20% या विशेष दराने करआकारणी केली जाईल. यास महागाई निर्देशांकवृद्धीचा फायदा घेता येईल म्हणजेच सोन्याचे दागिने, वळे, नाणी, बिस्कीट यासारख्या मूर्त वस्तू, पेटीएम गोल्ड, इटी गोल्ड यासारखे डिजिटल गोल्ड, गोल्ड इटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड यासारखे कागदी स्वरूपातील सोने आणि विमोचन न झालेले सुवर्ण सार्वभौम रोखे या सर्वांना वरील नियम लागू होईल. सुवर्ण सार्वभौम रोख्यावर मिळणारे व्याज हे करदात्यास अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न समजण्यात येऊन त्याच्या उत्पन्नात मिळवून त्याची करदेयता ठरते. मुदत पूर्ण झालेल्या बॉण्डमधून मिळणारा नफा हा पूर्णपणे करमुक्त आहे. डिरिव्हेटिव्हीव व्यवहारातून 6%नफा झाला असे गृहीत धरले जाते. त्यानुसार हे उत्पन्न हे व्यावसायिक उत्पन्न समजण्यात येते आणि त्यानुसार कर आकारणी होते. याहून कमी नफा असेल तर त्याचे ऑडिट करून घावे लागते.
याशिवाय भेट म्हणून मिळालेल्या सोन्यावरही कर आकारणीसाठी वेगळे नियम आहेत असे सोने आपल्या रक्ताच्या नातेवाईकांकडून भेट मिळाल्यास त्यावर स्वीकारताना कर लागत नाही मात्र असे दागिने विकताना त्याची खरेदी किंमत ही मूळ किंमत मानून चलनवृद्धीचा फायदा घेता येईल, दागिने जुने असल्यास 1 एप्रिल 2001ची सदर दागिन्यांची किंमत ही खरेदी किंमत समजण्यात येईल परंतू अशी भेट मित्र अथवा अन्य व्यक्तीकडून मिळाल्यास आणि त्याची किंमत 50 हजाराहून अधिक असल्यास ते अन्य मार्गानी मिळालेले उत्पन्न या सदराखाली दाखवून मोजावे लागते आणि त्यानुसार त्यावर कर आकारणी होते. त्याचप्रमाणे असे दागिने विकताना त्याची जाहीर केलेली किंमत ही खरेदी किंमत धरण्यात येईल.
हे स्पष्ट करणारी काही उदाहरणे-
★अजयने 15 जानेवारी 2020 रोजी बदलापूर येथे 20 लाख रूपयास घेतलेले घर छोटे पडत असल्याने 18 मे 2021 रोजी 21 लाखाला विकले या घरास 2 वर्ष पूर्ण न झाल्याने झालेला नफा अजयच्या उत्पन्नात मिळवला जाऊन त्यावर नियमित दरानुसार कर द्यावा लागेल.
★त्याच सुमारास त्याचा मित्र विजय याने घेतलेले 20 लाख रुपयांचे घर मे 2022 ला 22 लाख रूपयास विकले 24 महिने होऊन गेल्याने हा नफा दीर्घ मुदतीचा समजून त्यास इंडेक्ससेशन बेनिफिट घेता येईल यामुळे त्यास महागाईचा फायदा घेऊन कमी कर भरणे, 3 वर्षात नवे घर घेणे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड घेणे असे कर वाचवण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
★रमेशचे सांगलीचे घर त्यास वारसा हक्काने मिळाले असून त्याच्या वडिलांनी ते 1980 साली 2 लाख रुपयात बांधले होते. रमेश ते विकणार असून घराचे सन 2000-2001 चे सुयोग्य मूल्य 10 लाख रुपये आहे. जर हे घर रमेशच्या अपेक्षेप्रमाणे यावर्षी 30 लाख रूपयास विकले गेले तर त्यास घराची किंमत 2 लाखाऐवजी 10 लाख धरून त्यावर चलनवाढ निर्देशांकाचा फायदा घेऊन विजयप्रमाणे बहुविध पर्याय राहतील.
★सुनीताने सन 2015 मध्ये आलेले पाहिले सोवरीन गोल्ड बॉण्ड एकूण 10 बॉण्ड ₹ 26840 ला विकत घेतले होते यास 3 वर्ष होऊन गेल्याने विकल्यास इंडेक्ससेशनचा फायदा घेऊन फायद्यावर 20% कर द्यावा लागेल. तर या बॉण्डची मुदतपूर्ती पुढील वर्षी होईल त्यावेळी मिळणारी किंमत कितीही जास्त असली तरी ती करमुक्त असेल.
◆केतकीने सन 2005 साली ₹30हजारात घेतलेले 50 ग्रॅम सोन्याचे नाणे एकलाख ऐशी हजारात मे 2021 रोजी विकले सन 2005-06 चा महागाई निर्देशांक 117 होता तर सन 2021-22 चा निर्देशांक 317 होता म्हणून निर्देशांकातील फरक 200 पॉईंट आहे म्हणून यांची निर्देशांक आधारित किंमत ₹ 60 हजार होईल यावर 1 लाख 20 हजार अधिक मिळाल्यामुळे त्यावर 20% दराने ₹ 24 हजार कर आणि 4% सेस ₹ 960 असा ₹ 24960/- एवढा कर द्यावा लागेल.
अशा प्रकारे घर आणि सोने यावरील करदेयता ठरते. ही सर्वसाधारण माहिती असल्याने असे व्यवहार करण्यापूर्वी तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. (संपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 10 जून 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment