Friday, 4 March 2022

बाजाराचा अंत:प्रवाह

#बाजाराचा_अंतःप्रवाह बाजाराचा अंतःप्रवाह (Market Sentiment) हा शब्द कानावरून गेलाय? बाजारात तेजीमंदीसारखे मोठे बदल होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. याचा थेट संबध कंपन्यांच्या कामगिरीशी आहे. तर क्षणाक्षणाला भावात पडणारा फरक हा प्रामुख्याने व्यक्तींच्या मानसिकतेशी आहे. अनेक व्यक्ती मिळून समूह बनत असल्याने तो समूहाच्या मानसिकतेशी आहे. एकाद्या समभागाची खरेदी करावी की विक्री? हे जेव्हा अधिकाधिक लोकांना वाटेल त्यामुळे त्या समभागांचा बाजारभाव वाढण्याची किंवा कमी होण्याची हमखास शक्यता असते. व्यक्तीची मानसिकता बदलत राहण्याशीही अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गोष्टींचा संबध आहे. अनेक गोष्टींची भीती तर काही गोष्टींचा हव्यास यावर परिणाम करीत असतात. यावरून बाजाराची सर्वसाधारण मनस्थिती आपल्याला समजते. बाजाराचा हा कल आपल्याला ओळखता आला तर? आपण आपले संभाव्य नुकसान टाळू शकतो. यासाठी बाजार मनस्थिती निर्देशांकाचा (market mood index) आपल्याला नक्की उपयोग होईल. बाजाराच्या संदर्भात हा भीती आणि लोभ या मानवी भावनांचा निर्देशांक आहे असे आपण यास म्हणू शकतो. भाव वाढत असताना झटपट नफा मिळवण्यासाठी आपणही खरेदी करावी असे वाटू शकते परंतू तेथे किंवा त्याहून थोडाच भाव वाढून तेथून भाव खाली येण्यास सुरुवात होते. त्यानंतर पुन्हा आपला खरेदी भाव येऊन त्याहून अधिक भाव येण्यास मोठा कालावधी लागू शकतो किंवा भाव खाली आला म्हणून तोटा कमी करण्यासाठी केलेली विक्री त्याहून थोडाच भाव खाली जाऊन तेथे स्थिरता येऊन वाढू शकतो. अशा दोन्ही स्थितीत आपली मानसिकता बाजूला ठेवून योग्य निर्णय घेणे हे कौशल्याचे काम आहे. हा निर्णय योग्य होता की नाही हे येणारा काळच ठरवतो. योग्य वेळी खरेदी आणि योग्य वेळी विक्री करणे हे, नफा मिळवण्याच्या किंवा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. समजा राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक खाली येत असल्यास आपण शेअर्स विकावेत का? सर्वजण विक्री करतात म्हणून आपणही विक्री करावी का? असे प्रश्न पडू शकतात? यामध्ये काही खरेदीच्या संधी उपलब्ध असू शकतात. त्याचप्रमाणे अशा परिस्थितीत आपण काहीच हालचाल न करणे हे कदाचित नुकसानीचे होऊ शकते तर असा कल आधी समजला तर योग्य वेळी विक्री करून बाहेर पडण्याची संधी आपल्याला मिळू शकते. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूकदार या निर्देशांकाचा वापर करून अधिक चांगल्या तऱ्हेने आपल्या गुंतवणूक संचाचे व्यवस्थापन करू शकतात. हा निर्देशांक 0 ते 100 या अंकात व्यक्त केला जातो. त्याचा भाव भावनांशी संबंध असा- क्र भावभावना आकडेवारी 1 आत्यंतिक भीती 30 हून कमी 2 भीती 30 ते 50 3 लोभ 50 ते 70 4 आत्यंतिक लोभ 70 हून अधिक 1.आत्यंतिक भीती: अशी सर्वसाधारण भावना असणे याचा अर्थ या बाजारात नव्याने गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याचाच अर्थ असा की अतिरिक्त विक्रीचा मारा झाल्याने भाव खूप खाली आले असून येथून किंवा लवकरच ते वाढण्यास सुरुवात होईल. 2. भीती: बाजार प्रवाह या स्थितीत असल्यास तो वरती किंवा खाली कोणतीही दिशा पकडू शकतो. त्यामुळे अधिक सजग राहून लक्ष ठेवावे लागते त्याचा नेमका कल समजला तर निश्चित निर्णय घेता येतो. बाजाराची वाटचाल लोभाकडून भीतीकडे असल्यास त्याचे परिवर्तन आत्यंतिक भीतीत होऊ शकते. जर अंतप्रवाह भीतीकडून लोभाकडे जात असेल तर ही खरेदीसाठी योग्य वेळ असू शकते. 3.लोभ: बाजारप्रवाह लोभाकडे जात असेल तर तो एकसमान गतीने जात आहे की झटपट जात आहे जर हळू हळू वाढत असेल तर एकंदर चांगले संकेत मिळून अधिकाधिक खरेदी होऊ शकते आणि बाजार आत्यंतिक लोभाकडे जाऊन जाऊ शकतो. फायदा करून घेण्याची ही चांगली संधी असून यात किरकोळ कामगिरी असलेल्या समभागांचे भाव वाढल्याने उचित नफा घेऊन गुंतवणुकदार बाहेर पडू शकतो. 4.आत्यंतिक लोभ: बाजारात अशी स्थिती निर्माण झाल्यास सर्वच शेअर्सची मागणी वाढते भाव सातत्याने वाढत रहातात. बाजार पडू शकेल अश्या कोणत्याही बातमीचा परिणाम न होता भाव वाढतच रहातात ही स्थिती अनेक दिवस तशीच रहात नसल्याने कमी कालावधीसाठी विक्रीची चांगली संधी उपलब्ध होते काही दिवसांनी बाजार प्रवाह भीती किंवा आत्यंतिक भीतीकडे वळल्यावर पुन्हा खरेदीची संधी प्राप्त होते. बाजार अंतःप्रवाहावर प्रभाव पाडणारे घटक ★विदेशी गुंतवणूक: विदेशी वित्तसंस्था प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे भारतीय भांडवल बाजारात गुंतवणूक करीत असतात ही गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि परतावा यांचा विचार केला जातो. नोटबंदी जीएसटी यासारखे बदल पचवून गेले 30 वर्ष परकीय गुंतवणूक सातत्याने वाढत राहणे यामुळे त्याचा येथील बाजारावर असणारा विश्वास व्यक्त होतो. ★बाजारातील निरनिराळे निर्देशांक: बाजारात सेन्सेक्स निफ्टी बँकेक्स याशिवाय अजूनही बरेच निर्देशांक कार्यरत असून ते त्यात उल्लेखलेल्या मालमत्तेचे प्रतिनिधित्व करतात. बाजार कल निश्चित होण्यास त्यामुळे मदत होते. ★अस्थिरता आणि घोका शक्यता : जेव्हा बाजार सातत्याने एका टप्यामध्ये वरखाली होत असतो, तेव्हा तो अस्थिर समजला जातो. यात नेमका धोका किती आहे भविष्यात त्याची काय चाल असेल हे वेगवेगळ्या निर्देशांकाच्या साहाय्याने ओळखता येते. ★बाजाराची गती सुचकता: विशिष्ट काळात बाजार भावात पडणाऱ्या भावातील फरकाची गती किती असेल याचाही बाजार प्रवाहावर फरक पडत असतो. ★भाव फरकाची ताकद: भावात पडणारा फरक किती वर अथवा खाली जाऊ शकेल त्यास भावाची ताकद असे म्हणता येईल बाजार प्रवाहावर याचा प्रभाव पडतो. ★सोन्याची मागणी: सोन्याच्या भावावर मागणीनुसार फरक पडत असतो बाजार प्रवाहाशी त्याचा थेट संबंध असल्याचे आढळून आले आहे जेव्हा शेअरबाजारावरील विश्वास डळमळीत होतो तेव्हा सोन्याचे भाव कमी कालावधीत पटकन वाढतात. हा निर्देशांक कसा जाहीर करावा याची निश्चित मार्गदर्शक तत्वे आहेत अजून तरी एक्सचेंजकडून अधिकृतपणे हा निर्देशांक जाहीर केला जात नाही. स्टॉकच्या तुलनेत तो मिळवता येणे शक्य असले तरी सध्यातरी तो निर्देशांकाच्या तुलनेत उपलब्ध उपलब्ध आहे. अभ्यासक आणि गुंतवणूकदार यांना चालू बाजाराचा कल कळण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग करून घेता येईल. टिकरटेप.इन या संकेतस्थळानुसार 2 मार्च 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर निफ्टीशी तुलना करता MMI 35.36 होता. जो भीतीचा निर्देशक असून आत्यंतिक भीतीकडे झुकणारा आहे, तर 4 मार्च 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर तो 19.81 म्हणजेच आत्यंतिक भीतीदायक होता. युद्धजन्य परिस्थिती हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 4 मार्च 2022 रोजी पूर्वप्रकाशीत. हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी- माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक, https://udaypingales.blogspot.com/?m=1 'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक, https://www.facebook.com/pingaleuday/

No comments:

Post a Comment