Friday, 18 February 2022
तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांचे मूल्यमापन
#तंत्रज्ञानावर_आधारित_कंपन्यांचे_मूल्यमापन
सेन्सेक्स आणि निफ्टी या लोकप्रिय निर्देशांकात बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांच्या खालोखाल तंत्रज्ञानावर आधारित (Technology) कंपन्या प्रभावी आहेत. याचे निर्दिशांकावरील भारांकन 21 ते 25 % एवढे आहे. मागील लेखात आपण बँकिंग फायनान्स कंपन्यात गुंतवणूक करणे ठेवी ठेवणे या दृष्टीने कंपन्यांची स्थिती उपलब्ध माहितीवरून जाणून घेण्यासाठी, कोणती गुणोत्तरे वापरावीत त्याची माहिती करून घेतली. यात आपली ठेव हे त्या संस्थेला आपण दिलेले कर्ज असते जर त्यांच्या शेअर्समध्ये आपली गुंतवणूक असेल तर त्या कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे हे जाणून घेऊन गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी या गुणोत्तरांचा वापर करता येतो. तसंच कोणतीही कंपनी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने जाणून घ्यायची असेल तर मूलभूत विश्लेषणाचा नक्कीच उपयोग होतो. कंपनीची कामगिरी मुळातच चांगली असेल तर त्याच्या शेअरचा बाजारभाव हा चांगला राहतो आणि भविष्यात वाढत जातो.
तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांनी गेल्या 25 वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा दिला. नासकॉमच्या ताज्या अहवालानुसार चालू वर्षात (सन 2021-2022) या कंपन्यांनी डिसेंबर 2021 अखेरपर्यंत 230 बिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक व्यवसाय केला. 450000 हून अधिक नवीन रोजगार निर्माण केले आहेत. या उद्योगात 36% महिला कार्यरत असून इतर कोणत्याही उद्योगांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. सन 2011 पासून सातत्याने 15.5% चक्रवाढ गतीने या उद्योगांची वाढ झाली. सन 2021 मध्ये 2500 हून अधिक स्टार्टअप या उद्योगात सुरू झाले. 21 नवीन आयपीओ बाजारात आले. आधार, यूपीआय, कोविन या माध्यमातून निर्माण झालेल्या सुविधांचा आपण सहज वापर करीत आहोत. अन्य कंपन्यांच्या तुलनेत या कंपन्यानी चांगली कामगिरी केली असल्याने त्यांचे भाव तुलनात्मक दृष्टया सतत अधिक राहिले आहेत. त्यांचे किंमत बाजारभाव गुणोत्तर (P/E Ratio) नेहमीच अधिक असल्याने त्यांचे भाव कायमच न परवडणारे वाटतात. त्यामुळे या कंपन्यांचे भविष्यातील मूल्य शोधण्यासाठी आणि त्यावरून अंदाज बांधण्यासाठी अनेक किचकट गणिती प्रक्रिया कराव्या लागतात. यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतवणूक मॉडेल बनवता येते. त्याची गुणवत्ता पारखून परिणाम किती सकारात्मक आहेत त्यावर त्याची उपयुक्तता ठरवली जाते. यासाठी उपयुक्त निकष-
★किंमत विक्री गुणोत्तर (P/S Ratio): तंत्रज्ञान आधारित कंपन्यांचे मूल्यमापन करताना त्याचा संबंध हा किंमत विक्री गुणोत्तराशी आहे त्याच्या वापर करून आपण सदर कंपनीच्या भविष्यातील भावाचा अंदाज बांधू शकतो. असे गुणोत्तर जास्त असलेली कंपनी म्हणजे अधिक महाग भाव असलेली कंपनी असा निष्कर्ष आपण मूलभूत निष्कर्षांच्या आधारे काढत असलो तर तो चुकीचा आहे. तंत्रज्ञान संबधित कंपन्यांचे भाव हे आधी सांगितल्याप्रमाणे मुळातच जास्त असतात याहूनही जास्त गुणोत्तर असलेली कंपनी अधिक चांगली कामगिरी करून दाखवून तिचे हे गुणोत्तर कमी येण्याची शक्यता असते. साहजिकच चाणाक्ष गुंतवणूकदार असे शेअर्स खरेदी करीत असल्याने त्यांचे भाव अधिक वाढण्याची शक्यता असते. हा विचार करताना सारख्याच प्रकारच्या दोन कंपन्यांची तुलना करताना याच गुणोत्तराबरोबर -
*या कंपन्यांचे नफा प्रमाण पहावे
*किंमत/ नफा गुणोत्तरातील सातत्य तपासावे
*करातील बदलांचा किंमत नफा गुणोत्तरावर होणारा परिणाम पहावा.
★कंपनीची बीटा किंमत( Beta) : याचा संबंध बाजाराचा सर्वसाधारण कल आणि त्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावात पडणारा फरक याच्याशी आहे ज्या प्रमाणे निर्देशांक वाढेल अथवा कमी होईल त्याच प्रमाणात बाजारभावात फरक पडत असल्यास ही बीटा किंमत एक समजली जाते याहून किमतीत कमी फरक असलेले शेअर्स कमी अस्थिर तर अधिक फरक असलेले शेअर्स अधिक अस्थिर समजले जातात. ज्यांचा बीटा अधिक आहे असे शेअर्स धोकादायक समजण्यात येतात मात्रं तंत्रज्ञान कंपन्याच्या बाबतीत अशा शेअर्समधून भविष्यात अधिक फायदा मिळण्याची शक्यता असते.
★निव्वळ नफ्यातील वाढ (Net income growth) : सातत्याने वाढणारा नफा हा कंपनीचे भवितव्य उज्वल असल्याचा संकेत आहे त्यामुळेच इतर कोणत्याही कंपनीच्या निव्वळ नफ्यात सातत्याने होणारी वाढ ही कंपनी चांगली असल्याचे निदर्शक असल्याचा निकष तंत्रज्ञान कंपन्यांनाही लागू पडतो.
★कंपनीचा शिल्लख रोख प्रवाह (Free cash flow): कंपनीकडे जमा झालेल्या रकमेतून व्यावसायिक खर्च आणि भांडवली खर्च करून झाल्यावर शिल्लक राहिलेल्या रकमेस शिल्लख रोख प्रवाह असे म्हणतात. तंत्रज्ञान कंपन्याच्या बाबतीत ज्या कंपनीचा शिल्लख रोख प्रवाह अधिक त्या कंपनीचे भवितव्य उज्वल असण्याची शक्यता अधिक आहे.
★अधिक बाजारमूल्य (Higher market cap) : ज्या तंत्रज्ञान कंपन्यांचे बाजारमूल्य अधिक असते त्यांची इतर अशाच कंपन्याच्या तुलनेत नफा मिळवण्याची क्षमता अधिक असते असा इतिहास आहे.
★संशोधनावरील खर्चातील वाढ ( R&D expense growth) : तंत्रज्ञानात झपाट्याने वाढ होत असल्याने अद्ययावत राहून नवीन तंत्रज्ञान विकसित करावे लागते त्यावरील संशोधनावर खर्च करावा लागतो. जी कंपनी अशा खर्चात सातत्याने वाढ करू शकते तीच कंपनी दीर्घकाळ अग्रभागी राहू शकते तेव्हा संशोधन खर्चातील वाढीचे प्रमाण विचारात घ्यावे.
★विक्री, सर्वसाधारण खर्च आणि प्रशासकीय खर्च (SG&A) : या खर्चाचा वस्तू सेवा याच्या खर्चाशी थेट संबंध नसतो काही व्यवसायांचा हा खर्च अधिक असतो तर काहींचा कमी. तंत्रज्ञान संबधित कंपन्यांचा खर्च हा अशाच प्रकाराच्या इतर कंपन्याच्या खर्चाशी मिळताजुळता असावा. या खर्चाचा कंपनीच्या नफाक्षमतेवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो.
तेव्हा गुंतवणुकीसाठी तंत्रज्ञान आधारित कंपन्यांची निवड करताना- किंमत विक्री गुणोत्तर, बीटा, नफ्यातील वाढ, शिल्लख रोख प्रवाह, बाजारमूल्य, संशोधन खर्च , सर्वसाधारण प्रशासकीय खर्च या माहितीची आघाडीच्या कंपन्यांशी तुलना करूनच गुंतवणूक विषयक निर्णय घ्यावा.
सध्या TCS, Infosys, wipro, HCL tech, Tech mahindra या कंपन्या सध्या आघाडीच्या पाच तंत्रज्ञान आधारित कंपन्या असून या कंपन्यांचे शेअर्स आपण कोणत्याही भावाने कधीही घेतले असलेत तरी त्यापुढील पाच वर्षांत त्यातून सर्वसाधारणपणे गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा मिळाल्याने कधीच निराश व्हावे लागले नाही.
©उदय पिंगळे
(यात उल्लेख केलेल्या कंपन्या या केवळ माहितीसाठी असून ही गुंतवणूक शिफारस नाही.)
अर्थसाक्षर.कॉम येथे 18 फेब्रुवारी2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment