Friday, 25 May 2018

विविध मार्गानी मिळू शकणारे करमुक्त उत्पन्न

#विविध_मार्गाने_मिळू_शकणारे_करमुक्त_उत्पन्न
    आयकर कायद्यानुसार वर्षभरात सर्व मार्गांनी मिळालेल्या पैशांची आपल्या उत्पन्नात गणना होते. विविध वजावटी आणि शून्यकर असलेले उत्पन्न वगळून वरील उत्पन्नावर कर भरावा लागतो हे आपल्याला माहीत आहेच. असे असले तरी आयकर कायद्यातील कलम 10 नुसार अनेक उत्पन्न काही मर्यादेत किंवा पूर्णतः करमुक्त आहेत. त्यांची माहिती करून घेवूयात.
१.ग्रेजुटी : सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार ग्रेजुटीची रक्कम मिळते. ही रक्कम शेवटी मिळणाऱ्या मासिक पगारास ( मूळ पगार + महागाई भत्ता) 15 /26 ने गुणुन त्यास झालेल्या सेवाकालाच्या वर्षाने गुणले असता येणाऱ्या रकमेचे एवढी तरी किमान असतेच. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी पूर्ण रक्कम आणि खाजगी कर्मचाऱ्यांना मिळणारी 10 लाख रुपये (ही मर्यादा नजीकच्या काळात 20 लाख रूपये होईल) एवढी रक्कम कलम 10(10) नुसार करमुक्त आहे.
२. स्वेच्छानिवृत्तीची रक्कम : आयकर कलम 10(10/C) नुसार स्वेच्छानिवृत्तीची भरपाई म्हणून मिळणारी रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे तर इतरांना 5 लाख रुपयांच्या मर्यादेत करमुक्त आहे. मांत्र ही सवलत पूर्ण आयुष्यात एकदाच घेता येते.
३.भारतीय नागरिकांना परदेशात काम करण्याबद्धल मिळणारे भत्ते : आयकर कलम 10(7) नुसार जे भारतीय नागरिक परदेशी काम करतात त्याबद्दल त्यांना मिळणारे भत्ते हे पूर्णपणे करमुक्त आहेत.
४.शेअर आणि इक्विटी म्यूचुयल फंडावरील डिव्हिडंड : शेअरबाजारात नोंदणीकृत कंपन्यांवर मिळणारा 10 लाख रुपयांपर्यंत डीवीडेंड आणि 1एप्रिल 2018 नंतर इक्विटी म्यूचुयल फंडावर मिळणारा डीवीडेंड हा 10% डीवीडेंड डिस्ट्रीब्यूशन टेक्स कापून घेवून मिळत असल्याने कलम 10(34) नुसार लाभार्थींना पूर्णपणे करमुक्त आहे.
५.शेतीपासून मिळालेले उत्पन्न : आयकर कलम 10(1) नुसार शेतीपासून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. परंतू हे उत्पन्न 5 हजारांहून अधिक असले तर एकूण करपात्रता निश्चित करण्यासाठी एकूण उत्पन्नात मिळवण्यात येते. ग्रामीण भागातील शेतजमीन विक्री केल्याने झालेला दीर्घ मुदतीचा फायदा कलम 2(14) नुसार आणि विकास कामासाठी सक्तीने संपादित जमिनीचा मोबदला कलम 10(37) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे.
६.सन्मान वेतनधारक : वीरचक्र , महावीरचक्र आणि परमवीरचक्र विजेते किंवा सरकारी मान्यताप्राप्त शौर्य पदक विजेते किंवा त्यांचे वारस यांना मिळणारे रोख पुरस्कार , सन्मानवेतन आणि निवृत्तीवेतन कलम 10(18) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे .
७.पार्टनरशिप मधून मिळालेले उत्पन्न :पार्टनरशिप फर्मने व्यक्तीप्रमाणेच स्वतंत्रपणे टेक्स भरला असेल तर कलम 10(2/A) नुसार भागीदाराना मिळालेल्या लाभावर कर भरावा लागत नाही.
८.हिंदू अविभाज्य कुटुंबाचे उत्पन्न : हिंदू अविभाज्य कुटुंबाचा घटक म्हणून मिळालेल्या रकमेवर कलम 10(2)नुसार कोणताही कर भरावा लागणार नाही.
९.करमुक्त व्याजदराचे रोखे : सरकारने मान्यता दिलेल्या या विशेष रोख्यावरील व्याज कोणत्याही मर्यादेशिवाय कलम 10(15) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे.
१०.विमा पॉलिसी मुदतपूर्तीची रक्कम : काही अटींसह विमापॉलिसीच्या मुदतपूर्तीची रक्कम 10(10/D) पूर्णपणे तर 1 एप्रिल 2012 नंतर विमोचन होणाऱ्या पॉलिसीची देय रक्कम एक लाख असेल तर त्या रकमेवर 1% कर कापून उरलेली रक्कम करमुक्त आहे.
   ' म्रुत्यु आणि कर आपण टाळू शकत नाही ' अशा आशयाचे एक वचन आहे. असे असले तरी आयकर अधिनियम 10 नुसार वरील दहा गोष्टी त्याला अपवाद आहेत.

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 18 May 2018

डे ट्रेडिंग

डे ट्रेडिंग (Day Trading)

  मागील एका लेखात आपण गुंतवणूकदारांचे विविध प्रकार पाहिले होते. प्रामुख्याने तांत्रिक गोष्टींचा (चार्ट , वॉल्यूम , दरातील चढ उतार ) विचार करून एखादा शेअर वाढेल की कमी होईल याचा अंदाज बांधून , त्याच दिवशी कमीत कमी भांडवलावर जास्तीत जास्त नफा मिळवण्याची अपेक्षा बाळगणाऱ्यास डे ट्रेडर असे आपण म्हणतो.  हे लोक विविध आलेख  आणि त्यातून बनणाऱ्या विविध रचना यांचा आधार अंदाज बांधण्यासाठी घेत असल्याने त्याना चार्टिस्ट असेही म्हणतात.
  बहुतेक सर्वच गुंतवणूक सल्लागार कोणालाही डे ट्रेडिंग करण्याचा सल्ला देत नाहीत. असे व्यवहार करणे ते दुय्यम दर्जाचे समजतात. असे असले तरी सध्या खूप मोठ्या प्रमाणावर असे व्यवहार होत आहेत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बाजार चालू झाल्यापासून सर्वव्यवहार अतिशय सोपे आणि अधिक पारदर्शक झाले आणि त्यातून फायदा मिळवण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या. त्यामुळे उलाढाल प्रचंड प्रमाणात वाढली असून मोठया प्रमाणात सट्टेबाजही त्यास हातभार लावीत आहेत. खूप मोठया प्रमाणातील व्यवहार विहित काळात पूर्ण होत आहेत. व्यवसाय मिळवण्यासाठी , तो टिकवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली असून ब्रोकरेज कमी करणे , अधिक ऐक्पोजर देणे यातून अनेक नवीन गुंतवणूकदार बाजारकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  खाजगीकरण , उदारीकरण आणि जागतिकीकरण यातील अनेक घटकांचा बाजारावर परिणाम होवू लागला आहे. सध्या ऎकून उलाढालीच्या 70% हून अधिक व्यवहार डे ट्रेडिंगचे होतात. कोण आहेत हे ट्रेडर ? यात देशी /विदेशी वित्तसंस्था आहेत त्याचप्रमाणे मोठे गुंतवणूकदार आणि सर्वसाधारण लोकही आहेत. किमान भांडवलावर अधिकाधिक फायदा मिळवणे हा त्यांचा महत्वाचा उद्देश आहे. डे ट्रेडिंग करणाऱ्या अनेकांशी चर्चा केल्यावर माझ्या असे लक्षात आले की वैयक्तिक गुंतवणुकीदारांपैकी फारच थोडे लोक डे ट्रेडिंग हे व्यवसायिक पद्धतीने करतात आणि फारच थोड्या लोकांची त्यांची त्यांची स्वतःची अशी एक पद्धत आहे. अन्य लोक यात येतात काही व्यवहारात फायदा झाला की आपल्याला खूप काही समजायला लागले असे समजून अधिक मोठे व्यवहार करायला जातात आणि नुकसान करून घेतात. मोठे नुकसान झाले की आपोआप बाहेर पडतात. तोपर्यंत नवीन लोक बाजारकडे आकर्षित झालेले असतात ते आपले व्यवहार करणे चालू करतात. एकंदर हे चक्र असेच चालू राहिल्यानंतर यामध्ये सर्वसाधारण गुंतवणूकदार आपले बरेच नुकसान करून घेतात. अनेक लोक वर्षानुवर्ष डे ट्रेडिंग करतात पण ते आपण कसे ट्रेडिंग करतो ? हे निश्चित सांगू शकत नाहीत. काही जण त्यांच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे आणि तसे व्यवहार करतात. काहीजण निव्वळ टाईमपास म्हणून ट्रेडिंग करतात. काहीजण विविध आर्थिक वाहिन्यांवरील चर्चा ऎकून ट्रेडिंग करतात. तर काहीजण केवळ टिप्सवर व्यवहार करतात. काही जण फक्त एक किंवा दोनच शेअर्स मध्ये व्यवहार करायचा असे ठरवून सौदे करतात. आपण केलेल्या व्यवहारांचे ते तटस्थपणे मूल्यमापन करू शकत नाहीत. आपण कोठे चुकलो आणि काय करायला हवे होते याचा शोधबोध न घेतल्याने वारंवार त्याच चूका पुन्हापुन्हा करीत रहातात. फायदा करून घेणे सर्वांनाच आवडते मांत्र तोटा करून घेण्याची मानसिकता त्यांच्याकडे नसते. याउलट मोठे गुंतवणूकदार , देशी / विदेशी वित्तसंस्था या तंत्रज्ञानाच्या आणि तज्ञांच्या मदतीने कोणती पद्धत वापरली तर डे ट्रेडिंग फायदेशीर ठरेल याचा अभ्यास करून निर्णय घेवून मोठ्या प्रमाणात फायदा मिळवू शकतात. काही व्यवहारात तोटा झाला तरी सहन करू शकतात तसेच त्यावर कशी मात करायची त्याची उपाययोजना करू शकतात. असे असले कोणीही कोणत्याही पद्धतीने व्यवहार केले तरी फक्त फायदाच होईल असे नाही. यशस्वी ट्रेडरना तोटा होत नाही असे नाही.
  काही वर्षापूर्वी मी ही अगदीच बाळबोध पद्धतीने ट्रेडिंग करीत होतो म्हणजे मी 95% व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करीत होतो म्हणून त्याला डे ट्रेडिंग म्हणायचे एवढेच. यात मला फायदा झाला असला तरी तुलनेने अधिक रक्कम गुंतवावी लागत होती. यातूलनेत माझ्याशी अलीकडेच मैत्री झालेले नितीन पोताडे यांनी अधिक शास्त्रशुद्ध पद्धत शोधून काढली आहे असे मला वाटते. ते स्वतः आर्थिक विषयात उच्च शिक्षण घेतलेले असून याच क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव घेवून नंतर नोकरी सोडून गेले आठ वर्ष केवळ व्यवसाय म्हणून डे ट्रेडिंग करीत आहेत. तेव्हा अशा अनुभवी व्यक्तीच्या ज्ञानाचा फायदा आपण सर्वांनी करून घेतला पाहिजे. त्यांनी एक ट्रेंडिंग आणि गुंतवणुकीसाठी उपयुक्त अशी फाईल बनवली आहे त्यामध्ये निफ्टी २०० इंडेक्स मध्ये असलेल्या २०० स्टॉक्सच्या ट्रेडिंगचा दिवस धरून १८ दिवसाच्या डेटाचा वापर करून कोणते स्टॉक्सच खरेदी साठी योग्य आहेत आणि कोणते  स्टॉक्स विक्री साठी योग्य आहेत यावर निर्णय घेण्यासाठी मदत करतील. ट्रेडिंगच्या दिवशी असलेला भाव हा मागील १८/१५/१२/९/६/३ दिवसाचा उच्चतम किंवा न्यूनतम भाव आहे का हे चालू मार्केट मध्ये पाहता येईल. दाऊ (Dow) थियरी हा याचा आधार असून त्यावरील नियमाला अनुरूप स्टॉकची फक्त लिस्ट दिसेल त्यामुळे पुढील काम लवकर सुरु करता येईल. ही फाईल निशुल्क आणि फुल्ली ऑटोमॅटिक असून गूगल फिनान्स कडून मिळणाऱ्या डेटावर आधारित आहे. ही फाईल पाहण्याची लिंक पुढीलप्रमाणे -  https://goo.gl/KkavMT याच थियरीस अनुसरून त्यांची दुसरी फाईल ही ८०० स्टॉक्सच्या  ५० दिवसाच्या डेटाचा वापर करून कोणते स्टॉक्स स्विंग हाय किंवा स्विंग लो जवळ किंवा त्यापलीकडे गेले आहेत त्या स्टॉक्सची लिस्ट दिसेल. ही फाईल सशुल्क आणि सेमी ऑटोमॅटिक आहे. त्याच्या माहितीसाठी थेट त्यांच्याशीच संपर्क साधावा.
    या फाईल्सचा वापर स्टॉक निवडीसाठी आणि खरेदी / विक्री निर्णय घेण्यासाठी होतो. जर तुमचे स्टॉक सिलेक्शन सुयोग्य नसेल तर तुम्ही कितीही हुशार ट्रेडर असाल तरी फारसे काही करू शकणार नाही. यामध्ये  ट्रिगर प्राईज काय असेल ? आणि स्टोपलॉस किती असावा ? हे ट्रेडरने आपल्याकडील पैसे , जोखीम घेण्याची तयारी आणि अनुभव यावरून स्वतः ठरवावे. शिस्त , विश्वास , संयम , गुंतवणूक निधीचा कल्पक वापर आणि ज्ञान ही यशस्वी ट्रेडरची किंवा कोणत्याही गुंतवणूकदाराची पंचसूत्री म्हणता होईल. ट्रेडिंगच्या त्रिकोणात महत्वाचे असे विश्वास (trust) , तंत्र (technich) आणि ताणतणाव (tension) हे तीन टी महत्वाचे असून असून , यातील किमान tension ठेवून,  trust आणि technic वर कमाल विश्वास असावा लागतो. त्याचप्रमाणे आपण आपणास योग्य वाटते त्या पद्धतीने ट्रेडिंग करतो याचा अभिमान असणे जरूरीचे आहे.
    ही पद्धत आपल्याला नक्की समजली असेल तर ती योग्य वाटते का ? हे डे ट्रेडरने स्वतः ठरवावे. प्रथम पेपर ट्रेड , मग छोटे ट्रेड आणि मोठे ट्रेड अशी प्रगती करीत जावे. आपण हे करू शकतो याची खात्री पटल्यावरच ट्रेडिंग करावे. मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे ब्रकेट ऑर्डर टाकावी यामुळे टार्गेट आणि स्टॉपलॉस आधीच निश्चित केल्याने यातील भावनिक गुंतवणूक कमी होईल आणि आपली अन्य कामे आपण मुक्तपणे करू शकू. नितीनजी या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार विविध माध्यमांतून करीत आहेत त्यामुळे ते खूप बिझी असतात ,ही पद्धत अधिक चांगली आणि सोपी कशी होईल याविषयी सूचना असतील किंवा काही शंका असतील तर स्वतः त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधावा. त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. या पद्धतीचे तंत्र समजले आणि अनेकांनी त्याप्रमाणे व्यवहार करण्यास सुरुवात केली तर ओघाने उलाढाल वाढेल आणि त्यातून सर्वांचा आपोआप फायदाच होईल असा विश्वास वाटतो.

©उदय पिंगळे

विशेष सूचना : डे ट्रेडिंगच्या या पद्धतीची प्राथमिक माहिती व्हावी या उद्देशाने ट्रेडरना आणि गुंतवणूकदाराना स्वयंअध्ययनासाठी वरील लेख लिहीला आहे. ही पद्धत विकसित करणारे श्री नितीन पोताडे हे माझे मित्र आहेत, हे माझे भाग्यच ! आमच्यात कोणतेही व्यवसायिक संबंध नसून मी केवळ पूर्णपणे स्वयंस्फूर्तीने त्यांनी शोधलेल्या पद्धतीवरील लेखन केले आहे. मी स्वतः डे ट्रेडिंग करीत नसून भविष्यात केल्यास याचा वापर नक्की करेन. ही गोष्ट अधिकाधिक लोकांपैकी पोहोचून यावर विचारमंथन व्हावे आणि अधिक अर्थपूर्ण ट्रेडिंग केले जावे एवढीच इच्छा.
नितीन पोताडे यांच्याशी संपर्क करायचा असेल तर --
फोन नंबर : 9869239959/8389173798
ई मेल : ndpotade@gmail.com
फेसबुक पेजलिंक : https://www.facebook.com/NPsTradingIdeas/

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 11 May 2018

ब्रकेट ऑर्डर आणि कव्हर ऑर्डर

ब्रकेट ऑर्डर्स आणि कव्हर ऑर्डर्स (Bracket Orders & Cover Orders)

  काही दिवसांपूर्वी गुंतवणूकदारांचे प्रकार , समभाग खरेदी /विक्रीच्या ऑर्डर देण्याच्या पद्धती या विषयावर लेख लिहिले होते. या विषयाची थोडीशी उजळणी करुयात. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने बाजारात अनेक गुंतवणूकदार वेगवेगळ्या हेतूने गुंतवणूक करीत असतात. अधिकाधिक फायदा मिळवणे हा सर्वांचा मुख्य हेतू असला तरी तरी तो मिळवण्याची स्वतःची एक पद्धत असते. काहींना दीर्घकाळात मोठा नफा हवा असतो तर काहींना अल्पकाळात नफा हवा असतो. आयकराच्या दृष्टीने अल्प /दीर्घकाळ म्हणजे काय हे ठरवण्यात आले असले. तरी प्रत्येकाच्या मनातल्या त्यांच्या व्याख्या निरनिराळ्या आहेत.
     समभाग त्याच दिवशी घेवून विकणारे कींवा आधी विकून नंतर खरेदी करणारे यांना डे ट्रेडर असे म्हणतात. हे लोक कोणत्याही प्रकारच्या डिलिव्हरी व्यवहाराचे सौदे करीत नाहीत. त्यादिवशीच्या नफा /तोट्याचा त्याच दिवशी हिशोब होत असल्याने दलाली  (Brokerage) कमी पडते. याशिवाय त्यांना नफा होवूदे अथवा नुकसान एकूण उलाढाल वाढल्याने किमानदराने कमाल कमिशन मिळवण्याची संधी यातून दलालांना मिळत असल्याने त्यांच्याकडे  असलेल्या रकमेच्या काही पट (किती पट ही माहिती ब्रोकर कडून घ्यावी कारण अशी परवानगी देणे न देणे हे फक्त त्यांच्या हातात आहे ) उलाढाल करून देण्याची त्यांना परवानगी दिली जाते. याला मार्केट ऐक्पोजर असे म्हणतात. या मर्यादेतच उलाढाल करता येते. यामध्ये गुंतवणूकदारापेक्षा ब्रोकरकडे जोखिम कमी आहे .
   फायदा मिळवणे आणि अधिक नुकसान टाळणे यासाठी भावातील फरकावर बारकाईने लक्ष ठेवून , नफ्यातोट्याचे गणित करून झटपट निर्णय घ्यावा लागतो. याशिवाय त्याची अंमलबजावणीही त्वरित करावी लागते. हे करतानाच काही तांत्रिक अडचणी येवू शकतात. यातील एक लहानशी चूक मोठे आर्थिक नुकसान करू शकते. या जोखीम व्यवस्थापनासाठी ब्रकेट ऑर्डर्स (Bracket Orders) आणि कव्हर ऑर्डर्स ( Cover Orders) उपयुक्त आहेत.
  ब्रकेट ऑर्डर्स : य़ा प्रकारची ऑर्डर्स खरेदी / विक्रीस टाकली असता मुख्य ऑर्डर एक्जिक्युट झाली की त्याचबरोबर ट्रिगर आणि स्टॉपलॉस या दोन ऑर्डर आपोआप टाकल्या जातात. ट्रिगर ऑर्डरने योग्य
 भाव आल्यावर खरेदी /विक्री करून नफा मिळवला जातो अथवा तोटा होण्याची शक्यता असल्यास स्टॉपलॉस ऑर्डरमूळे मर्यादित केला जातो. यापैकी कोणतीही एक ऑर्डर पूर्ण झाली की दुसरी आपोआपच रद्द होते. ट्रिगर आणि स्टॉपलॉस यांच्या किंमती मुख्य ऑर्डर्स टाकताना टाकाव्या लागतात. यानंतर सदर शेअरच्या भावात होणाऱ्या फरकाकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज नसते. यामुळे आपण ठरवलेला नफा मिळू शकतो अथवा तोटा जोखीम घेण्याच्या मर्यादेत रहातो.
कव्हर ऑर्डर्स : ही वरील प्रमाणेच ऑर्डर्स आहे यात ट्रिगर लावला जात नाही फक्त स्टॉपलॉस लावला जातो यामुळे तोटा मर्यादीत रहातो. फायदा करण्यासाठी अपेक्षित भाव आल्यावर उलट सौदा (Reverse order) करण्यासाठी ऑर्डर नव्याने टाकावी लागते आणि त्यासाठी शेअरचे भावावर सतत लक्ष लागते.
   भाव सतत खालीवर होत असल्याने यातील संधीचा फायदा घेण्यासाठी डे ट्रेडर्सना भावावर लक्ष ठेवावे लागते यामध्ये व्यक्तीकडून चूक होण्याची शक्यता असते. ब्रकेट ऑर्डर व कव्हर ऑर्डरमुळे ऑर्डर आधीच टाकली गेल्यामुळे चूक होण्याची शक्यताच नसते. ऑर्डर पूर्ण होईपर्यत जर काही त्यात बदल करायचा असेल तर तो करता येतो. मात्र एकदा का सौदा झाला की त्यात बदल करता येत नाही.

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 4 May 2018

मागील आर्थिकवर्षांचा अर्थविषयक शोधबोध

मागील आर्थिकवर्षांचा अर्थविषयक शोधबोध

  अलीकडेच 2017/18 हे आर्थिक वर्ष संपले . समभाग , म्यूचुयल फंड गुंतवणूकदारांच्या दृष्टीने त्या आधिच्या तुलनेत भरघोस वाढ झाली .निर्देशांकाने याच वर्षात आपली सर्वोच्च पातळी ओलांडून नवीन विक्रम प्रस्थापित केला तर 11 वर्षांनंतर पुन्हा दीर्घकालीन नफा काही अटींसह लागू करण्याचे  योजल्याने त्यावरील टोकाची प्रतिक्रिया व्यक्त होवून निर्देशांक वाढिला लगाम बसला .यामुळे अनेकांचे नुकसान झाले .यातून पैशांचे व्यवस्थापन करण्याच्या संदर्भात अनेक गोष्टी शिकता येवू शकतील त्यातील काही गोष्टींचा शोध आणि त्यातून झालेला बोध .
1.आभासी चलनाचे मृगजळ  : बीटकॉइन या आभासी चलनात झालेली वाढ .यामुळे अनेक गुंतवणुकदार त्याकडे आकर्षीत झाले .या चलनास सरकारकडून वैधता नसल्याचे वेळोवेळी जाहीर केले गेले .या कालखंडात 1000 अमेरिकन डॉलर्सचे आसपास असलेला बीटकॉइनचा भाव अल्पावधीत 20000 डॉलर्सवर गेला अनेक गुंतवणूकदार सट्टेबाजाप्रमाणे गुंतवणूक वाढवत गेले आणि अचानक त्याचा भाव 8000 वर आला यात लोकांचे प्रचंड नुकसान झाले आणि आपण नुकसान सोसू शकू एवढीच गुंतवणूक केली पाहिजे हा धडा मिळाला ते यातून नक्कीच शिकले असावेत .
2.चिकाटीचा अभाव : एका अंदाजानुसार जीवनविम्याच्या काढलेल्या पॉलीसीपैकी 33% पॉलिसी या बंद केल्या जातात .अनावश्यक पॉलिसीची खरेदी आणि मुदतीच्या पूर्वी वीमोचन यामुळे आपण स्वताबरोबर आपल्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करीत आहोत असे वाटत नाही का ?
3.अनुचित प्रथांना विरोध : नियोजित फर्डिबीलातील अयोग्य तरतूदी आणि वाढीव बँकींग चार्जेस यांना  सर्वांनी तीव्र विरोध केला .यासाठी सोशल मिडीयाचा वापर केला गेला मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याने या गोष्टी स्थगित झाल्या .
4.अल्पबचतीवरील व्याजदराचा नीचांक : दर तिमाहीत बदलत असलेले अल्पबचतीवरील व्याजदर यावर्षात नीचांकी पातळीवर आले .फक्त यावर आपण अवलंबून राहू शकत नाही याची सर्वाना जाणीव झाली असावी .
5.कर्जावरील किमान व्याजदर : या कालखंडांत किमान व्याजदराने कर्ज उपलब्ध झाल्याने कर्जदारांच्या दृष्टीने हा सुवर्णकाळ म्हणता येईल .तर बुडीत कर्जे आणि मोठ्या प्रमाणात कर्ज घेवून पसार झालेले कर्जदार यामुळे यंत्रणेतील दोष उघडकीस आले आणि आंतरराष्टीय पातळीवर आपणास मान खाली घालावी लागली .
6.क्रेडिट स्कोरचे महत्व : कर्ज घेण्यास उत्सुक प्रत्येकाचे मूल्यमापन सीबिल मार्फत केले जाते . आपल्या सर्व व्यवहारांचा मागोवा घेवून त्याप्रमाणे आपले मूल्यांकन 300 ते 900 अंकात केले जाते .ज्यांचे गुण 750 हून अधिक असतात त्यांना बँक सहज कर्ज देतात .इतके दिवस आपले सिबील रेटिंग जाणून घेण्यास पैसे द्यावे लागत होते . यावर्षीपासून ते आपणास विनामूल्य अन्य मार्गाने जाणून घेता येत असल्याने कर्ज घेणार नसाल तरी आपला क्रेडिट स्कोर जाणून घ्यावा .जर आपली त्यावर हरकत असेल तर योग्य ते पुरावे देवून तो दुरुस्त करता येईल आणि भविष्यात सुलभतेने कर्ज मागणी करता येईल .
7.मेडिक्लेमचे महत्व : अलीकडील काळात वैद्यकीय खर्चात झालेली प्रचंड वाढ यामुळे एखादा गंभीर आजार आपले आर्थिक गणित बिघडवू शकतो ,  आरोग्य विमा असेल तर थोडा दिलासा मिळतो . आगामी अर्थसंकल्पात यावर वाढीव सूट देण्यात आली आहे .
8.पोर्टफोलीओच्या जोखीम व्यवस्थापनाची गरज : गेल्या वर्षभरात मिड /स्मॉलकेप शेअर मधे 40 ते 50% वाढ अल्पावधीत झाली त्याबरोबर वर्षअखेरीस त्यात तीव्र घट झाली .अशी स्थिती लार्ज / डिवेर्सिफाइड केपमध्ये दिसली नाही .एक समतोल पोर्टफोलीओच्या जोखीम व्यवस्थापनासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज /डिवेर्सिफाइड केप शेअर्सची आवश्यकता असणे गरजेचे आहे हे या निमीत्ताने अधोरेखित झाले .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .