Friday, 9 February 2018

नियोजित दीर्घ कालीन नफा मोजणी आकारणी

#प्रस्तावित_दीर्घकालीन_नफा_मोजण्याची_पद्धती_करआकारणी ......

    येणार येणार म्हणून गेले 4 अर्थसंकल्प सर्वांना हुलकावणी देणारा बहुचर्चित LTCG म्हणजेच शेअरवरील  दीर्घकालीन नफा आता काही अटीसह करपात्र ठरला आहे .याआधी तो आयकर कलम 10(38) नुसार करमुक्त होता .यावरील सर्वसाधारण टोकाची प्रतिक्रिया म्हणून बाजारात मोठी पडझड झाली . याबाबतीतील प्रस्तावित तरतुदी आणि त्याचे गुंतवणूकदारांवर होणारे परिणाम जाणून घेवू या .
या नविन करआकारणीमुळे मोठ्या प्रमाणात विक्री होवू नये म्हणून 31 जानेवारी 2018 पर्यत असलेला दीर्घकालीन नफ्यास संरक्षण देण्यात आले आहे . यासाठी अर्थमंत्र्यानी ' Grandfathered ' ही संज्ञा वापरली आहे या कराचे संदर्भात अनेक उलट सुलट बातम्या येत असल्याने बरेच प्रश्न पडू शकतात . त्यासंबंधी अधिक तपशीलवारपणे जाणून घेवू या .
प्रश्न १ : नविन तरतुदीनुसार LTCG म्हणजे काय ?
उत्तर :भांडवल बाजाराशी संबधी खालीलपैकी कोणतीही मालमत्ता एक वर्षांनंतर हस्तांतरीत केली तर त्यावर 2018 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 10% कर द्यावा लागेल .
१.मान्यताप्राप्त शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांचे समभाग ( equity shares).
२.65% किंवा त्याहून जास्त समभाग टक्केवारी असलेल्या म्यूचुअल फंडांच्या सर्व योजना .
३. मान्यताप्राप्त व्यावसायिक न्यासांचे शेअर /यूनिट . जसे इव्हिट ट्रस्टचे शेअर , हौसिंग ट्रस्टचे यूनिट .
या सर्व मालमत्ता खालील अटी पूर्ण करतील .
१.ही मालमत्ता संपादीत करून एक वर्ष झाले असेल .
२.जाहीर केलेले काही अपवाद वगळून ही मालमत्ता 1/10/2004 नंतर संपादित केली असेल तर खरेदीवर STT भरलेला असावा . विक्रीवर STT भरलेला असला पाहिजे .
प्रश्न २.STT ची सूट असलेले अपवाद कोणते ?
उत्तर : या संबंधी 5 जुन 2017 रोजी सविस्तर खुलासा करणारे 43/2017 चे परिपत्रकात सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे .जसे STT अस्तित्वात येण्यापूर्वीच संपादित मालमत्ता , प्रारंभिक भागविक्री ,बोनस , राईट ई .
प्रश्न ३. हा टेक्स कधीपासून लागू होणार ?
उत्तर : वर उल्लेख केलेल्या मालमत्ता 1 एप्रिल 2018 नंतर हस्तांतरित केल्या आणि त्या संपादित करून एक वर्ष किँवा जास्त काळ झाला असल्यास तरच हा कर लागू होईल .
प्रश्न ४. LTCG कसा मोजणार ?
उत्तर : वरील संदर्भात मालमत्ता विक्री करून येणाऱ्या रकमेतून मालमत्ता संपादित करायला लागलेली किंमत वजा करून येणारी हा दीर्घकालीन नफा समजण्यात येईल .
प्रश्न ५.जी मालमत्ता 1 फेब्रुवारी 2018 पूर्वी घेतली आहे त्यावरील दीर्घकालीन नफा कसा मोजला जाईल ?
उत्तर : 31 जानेवारी 2018 रोजी किंवा त्यापूर्वी संपादित मालमत्तेची खरेदी किंमत किंवा 31 जानेवारी 2018 ची सर्वोच्च किंमत ही सुयोग्य किंमत (fair market value) यातील जी किमंत सर्वात जास्त असेल ती विक्री किंमतीतून वजा करून येणारी किंमत दीर्घकालीन नफा समजण्यात येईल .
प्रश्न ६. सुयोग्य किंमत (fare market value) कशी ठरवणार ?
उत्तर :समभाग , म्यूचुअल फंड युनिट यांची खरेदी किंमत किंवा 31 जानेवारी 2018 ची सर्वाधिक किंमत ही सुयोग्य किंमत ठरवली जाईल .जर एकाद्या समभागाची खरेदी विक्री या दिवशी झाली नसेल त्या पूर्वी ज्या दिवशी व्यवहार झाला असेल त्यादिवशीची किंमत ही आधार म्हणून घेतली जाईल .नोंदणी न केलेल्य म्यूचुअल फंडांची 31 जानेवारी 2018 चे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) हे  आधार मूल्य धरण्यात येईल .
प्रश्न ७.विविध उदाहरणे देवून प्रश्न ६ आणि ७ मधील दीर्घकालीन नफा शोधणे अधिक स्पष्ट करता येईल का ?
उत्तर : नक्कीच ,
उदा .१.1 जानेवारी 2017 रोजी एका कंपनीचे शेअर ₹100/- ने खरेदी केले .31 जानेवारी 2018 रोजी या शेअरची सर्वोच्च किंमत ₹200/-जर सदर कंपनीचे शेअर 1 एप्रिल 2018 रोजी ₹250/- ने विकले या ठिकाणी मूळ खरेदी किंमत 31 जानेवारी 2018 च्या बाजारभावापेक्षा कमी आहे .या ठिकाणी दीर्घकालीन नफा मोजतात 31 जानेवारीची किंमत ही आधारभूत किंमत धरून ₹250-200=₹50 हा दीर्घकालीन नफा समजण्यात येईल .
उदा .२.वरील उदाहरणात विक्री किंमत ₹150/- असेल ही सर्वोच्च किंमतीपेक्षा कमी आहे म्हणून fare market value ही ₹200/-ऐवजी ₹150/-  पकडून विक्री किंमत ₹150-150=₹0 म्हणून दीर्घकालीन भांडवली नफा काही नाही .
उदा .३.वरील उदाहरणात 31 जानेवारी 2018 रोजीची किंमत ₹50/- असेल आणि विक्री किंमत ₹150/- असेल तर दिर्घ मुदतीचा नफा मोजताना 31 जानेवारी 2018 ची किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी असल्याने विक्री किंमतीपासून खरेदी किंमत वजा करून ₹150-100=₹50/- भांडवली नफा धरला जाईल .
उदा .४.याच उदाहरणात 31 जानेवारी 2018 ची किंमत ₹200/- आणि विक्री किंमत ₹50/- असेल तर दीर्घ मुदतीचा तोटा मोजताना विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली जाईल .₹50-100=-(₹50)
 तोटा होईल .
विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा असल्यास तोटा मोजताना 31 जानेवारीची किंमत न लक्षात घेता मूळ किंमत धरली जाईल .
प्रश्न .८. खरेदी किंमतीस माहगाईच्या प्रमाणात (with indexation )फायदा घेता येईल का ?
उत्तर : नाही. दीर्घ मुदतीच्या नफा /तोट्यास कोणताही महागाई निगडीत फायदा मिळनार नाही .( without indexation)
प्रश्न .९. नविन नियम कधीपासून अंमलात येतील ?
उत्तर : हे नियम अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर 1 एप्रिल 2018 पासून अंमलात येतील .
प्रश्न .१०. 31जानेवारी 2018 च्या सर्वोच्च भावामूळे होवू शकणारा भांडवली नफ्याचा  फायदा किती काळ घेता येईल ?
उत्तर : हा फायदा उत्तर ७ मधील एखादा अपवाद सोडला तर ह्या फायद्याचा लाभ यापुढेही घेता येईल .
प्रश्न .११.1 फेब्रुवारी 2018 ते 31 मार्च 2018 यामधील दीर्घकालीन नफ्याचे काय ?
उत्तर :आधीच प्रश्न ९  च्या उत्तराप्रमाणे नवीन नियम 1 एप्रिल 2018 पासून अंमलात येणार असल्याने प्रचलित नियमानुसार मिळणारे सर्व फायदे 31 मार्च 2018 पर्यत मिळत राहून दीर्घकालीन नफ्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही .
प्रश्न .१२. 1 एप्रिल 2018 पासून भांडवली नफ्यावर कर आकारणी कशी होईल ?
उत्तर :1 एप्रिल 2018 पासून केलेल्या हस्तांतरणावर निव्वळ भांडवली नफ्याची मोजणी होवून एक लाख रुपयांपेक्षा अधिक दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10% कर अधिक सरचार्ज द्यावा लागेल .
प्रश्न .१३.भांडवली नफ्याची मोजणी करताना ती मोजण्याची तारीख कोणती धरली जाईल ?
उत्तर : ज्या दिवशी सदर मालमत्ता घेतली गेली ती तारीख हीच मोजणी करण्याची तारीख समजली जाईल .
प्रश्न .१४. मुळातून करकपात होईल का ?
उत्तर : मुळातून करकपात होणार नाही .
प्रश्न .१५.अनिवासी भारतीय (NRI) करदात्यांवर याचा काय परिणाम होईल ?
उत्तर :विदेशी वित्तसंस्था (FIl) सोडून सर्व NRI करदात्यांचा कर सध्याच्या प्रथेप्रमाणे मुळातून कापला जाईल
प्रश्न .१६.FII वर मुळातून करकपात होईल का ?
उत्तर : नाही .
प्रश्न .१७.FII चा दीर्घकालीन नफा कसा मोजला जाईल .
उत्तर :त्यांच्या नफ्याची मोजणी देशी करदात्यांचा मोजणीप्रमाणेच होईल .
प्रश्न .१८.FII ना नफ्याची मोजणी करताना 31 जानेवारी 2018 च्या सर्वोच्च भाव विचारात घेवू शकतील का ?
उत्तर :होय .
प्रश्न .१९.1 फेब्रुवारी 2018 ते 31 मार्च 2018 पर्यत विकलेले शेअर्स आणि यूनिटवर FII ना भांडवली नफ्यावर कर द्यावा लागेल का ?
उत्तर :नाही .
प्रश्न .२०.FII साठी 1 एप्रिल 2018 पासून LTCG ची आकारणी कशी होईल ?
उत्तर :निवासी करदात्यांप्रमाणेच त्याना एक लाख रुपयांच्या दीर्घकालीन नफ्यातवर कर द्यावा लागणार नाही .त्यावरील नफ्यावर 10% कर लागेल .31 जानेवारी 18 पर्यंतचा होवू शकणारा दीर्घकालीन नफा करआकारणीच्या बाहेर असेल .
प्रश्न .२१. 1 एप्रिल 2018 नंतर FII चा दीर्घ मुदतीचा कर कसा मोजला जाईल ?
उत्तर :प्रश्न १२ च्या उत्तराप्रमाणे FII चा दीर्घ मुदतीचा नफा मोजून त्यावर करआकारणी केली जाईल .
प्रश्न .२२.1 फेब्रुवारी 2018 पूर्वी घेतलेले प्राधान्य भाग (rights share) ची किंमत कशी ठरवणार ?
उत्तर :सदर प्राधान्य भाग खरेदी करण्याची किंमत त्यातील दीर्घ मुदतीचा 31 जानेवारी 2018 पर्यंतचा नफा सुरक्षित राहून त्यापासून होणारा दीर्घ मुदतीच्या नफ्याची मोजणी प्रश्न ७ च्या उत्तराप्रमाणे होईल .
प्रश्न .२३.1 फेब्रुवारी 2018 ते 31 मार्च 2018 मधील दीर्घ मुदतीच्या तोट्याचे काय होणार ?
उत्तर : या कालावधीत दीर्घ मुदतीच्या नफ्यावर कोणताही कर द्यावा लागणार नसल्याने या कालावधीतील दीर्घ मुदतीच्या तोट्यास कोणतीही सवलत मिळणार नाही .
प्रश्न .२४.1एप्रिल 2018 नंतर होणाऱ्या दीर्घकालीन तोट्याचे काय करायचे ?
उत्तर : 1 एप्रिल 2018 नंतर होणाऱ्या दीर्घकालीन नफ्यातून होणारा तोटा वजा करून राहिलेल्या एक लाखावरील रकमेवर 10% कर पडेल .जर एखाद्या वर्षी झालेला तोटा शिल्लक रहात असेल तर तो पुढील आठ वर्षात होणाऱ्या दीर्घकालीन नफ्यातून वजा करता येईल .

©उदय पिंगळे

संदर्भ : F.No. 370149/18/-TPL , GOI , Ministry of Finance CBDT यानी केलेल्या खुलाशाप्रमाणे वरील संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचा भावानुवाद केला आहे .अर्थसंकल्प मंजूर होताना काही बदल झाले नाहीत तर 1 एप्रिल 2018 पासून नविन नियम अंमलात येतील . अजून काही शंका असल्यास मूळ परिपत्रक पाहून त्यातील खुलासा ग्राह्य धरण्यात यावा .

No comments:

Post a Comment