Friday, 16 February 2018

अर्थसंकल्पीय तरतुदी आणि जेष्ठ नागरिक



#अर्थसंकल्पीय_तरतुदी_आणि_जेष्ठ_नागरिक
   जेष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय 60 पूर्ण झाले आहे अशी कोणतीही व्यक्ती .त्यांना आणि ज्यांचे वय 80 पूर्ण झाले आहे अशा अतीजेष्ठ नागरिकांना आयकर कायद्यानुसार काही विशेष सवलती मिळतात . प्रस्तावित अर्थसंकल्पात जेष्ठ नागरिकांना काही सवलती देण्यात आल्या असून त्या कोणत्या आहेत यांची माहिती करून घेवूया .1एप्रिल 2018 ते 31मार्च 2019 या कालावधीत ज्यांची वयाची 60 वर्षे पूर्ण होणार आहेत त्या सर्वाना आणि यापूर्वी ही पात्रता पूर्ण करणाऱ्या सर्वाना आयकर कायद्यात असलेल्या आणि चालू अर्थसंकल्पात मंजुरीच्या अधीन सुचवलेल्या सर्व तरतुदींचा लाभ घेता येईल . येथे फक्त प्रस्तावित सवलतींचा विचार करण्यात आला आहे .
१.आत्तापर्यंत सर्व व्यक्तींना ₹10000/- पर्यंतच्या बचत खात्यावरील व्याजास 80/TTA नुसार सूट मिळत होती .यापुढे जेष्ठ नागरिकांना केवळ बचत खातेच नाही तर मुदत ठेव (fixed deposit) आवर्ती ठेव (recuring deposit) यावर मिळणारे ₹50000/- पर्यंतच्या व्याजावर 80/TTB नुसार कोणताही कर द्यावा लागणार नाही .या वाढीव कर सवलतीमुळे त्याना यापुढे 80/TTA ची सवलत मिळणार नाही .
२. 194/A नुसार  ₹ 10000/- पर्यंत व्याजास लागू असलेल्या मुळातील करकपातीतून (tax deducted at source) जेष्ठ नागरिकांस वगळण्यात आले आहे .जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत अशी मुळातून करकपात जर व्याज ₹50000/- किंवा त्याहून अधिक होत असेल तरच केली जाईल . याहून जास्त व्याजाचे उत्पन्न असलेल्या पात्र व्यक्तीनी 15/ H फॉर्म भरून दिला असेल तर त्यांचा कर मुळातून कापला जाणार नाही .
३. आरोग्य विम्याची वर्गणी (mediclaim premium) म्हणून जेष्ठ नागरिकांना ₹30000/- ची सवलत (80/D) मिळत होती .येत्या वर्षापासून यात वाढ करून ती ₹50000/- करण्यात आली आहे .
४.जेष्ठ नागरिक व अतीजेष्ठ यांना काही असाध्य  आजारांवरील उपचारांसाठी अनुक्रमे ₹60000/- आणि ₹80000/- पर्यंतच्या खर्चाची वजावट(80/DDB) मिळत होती .या वर्षीपासून ही मर्यादा सरसकट ₹100000/- करण्यात आली आहे .
५.जेष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर मिळावा म्हणून दहा वर्ष निश्चित मुदतीच्या LIC मार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा व्याज देणारी (8%वार्षिक) प्रधानमंत्री वय वंदन योजना या योजनेस 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून यातील अधिकतम जमाराशी साडेसात लाखाहून पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे .त्यामुळे यापुढील दहा वर्ष जास्तीत जास्त दरमाह रुपये दहा हजार व्याज मिळू शकेल याची हमी आहे .
६.₹40000/- प्रमाणित वजावटीचा सामावेश केल्याने ज्याना पगार किंवा निवृत्तीवेतन मिळते अशा जेष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होवून कर कमी भरावा लागेल .
   याशिवाय यात उल्लेख न केलेल्या सर्व सोई सवलती चालूच रहाणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही .बजेटमध्ये प्रस्तावित काही नवीन तरतुदींचा जेष्ठ नागरिकांच्या उत्पन्नावर फरक पडू शकतो .त्या अशा --
   १. ईक्विटी म्यूचुयल फंडांच्या डीवीडेंड मिळत असलेल्या सर्व योजनांच्या लाभार्थींना सरसकट 10% लाभांश वितरण कर (DDT) प्रस्तावित आहे , यावर कोणतीही सवलत दिलेली नाही .
    २.त्याचप्रमाणे शेअर्स आणि 65% शेअर्सचे सामावेश असलेल्या म्यूचुयल फंड योजना विक्रीतून होवू शकणाऱ्या दीर्घ मुदतीच्या एक लाखाहून नफ्यावर काही सवलतीसह 10% कर सुचवला आहे .
   ३.पूर्वीचा करावरील अधिभार (tax on tax) 3% वरून नाव बदलुन 4% करण्यात आला आहे .त्यामुळे एकूण करावर 1% कर अधिक द्यावा लागेल .
   जेष्ठ नागरिकांपैकी किती जण अजून नोकरी करून पैसे मिळवत आहेत ? किती जणाना पेन्शन मिळत आहे ? किती जण व्याजावर अवलंबून आहेत ? किती जण डीवीडेंडवर अवलंबून आहेत ? यापैकी लागू एक अथवा अधिक , याप्रमाणे एकूण करदेयता कमी अधिक होवू शकते .
©उदय पिंगळे

No comments:

Post a Comment