Friday, 29 August 2025

चला पैशांचे महत्व समजून घेऊया भाग 2

#चला_पैशांचे_महत्व_समजून_घेऊया_भाग_2 6. आर्थिक उद्दिष्टे आणि अंदाजपत्रक तुमचे निर्धारित आर्थिक लक्ष विशिष्ट काळात पूर्ण करण्याचे धेय्य म्हणजे आर्थिक उद्दिष्ट. ते पूर्ण करण्यासाठी आधी ते नेमकं ठरवायला हवं आणि त्यादृष्टीने वाटचाल करायला हवी. आर्थिक भवितव्य सुकर करण्यासाठी खर्च नियंत्रणात असावेत त्याचं निश्चित नियोजन करायला हवं. आपलं आर्थिक उद्दिष्ट SMART असावं म्हणजे- S = Specific म्हणजे निश्चित तुम्हाला नक्की काय हवंय ते निश्चित करा मला पुढील वर्षी नातीच्या वाढदिवसासाठी पैसे बाजूला ठेवायला हवेत असा विचार न करता मला माझ्या नातीच्या 10 महिन्यानंतर येणाऱ्या वाढदिवसासाठी ₹1000/- वेगळे ठेवायला हवेत, असा निश्चित विचार करायला हवा. M = Mesurable म्हणजे मोजता येणारे ठरवलेले ध्येय मोजता आले पाहिजे. मी क्रेडिट कार्डची थकबाकी लवकरच फेडन याऐवजी मी येत्या सहा महिन्यात क्रेडिट कार्डची थकबाकी पूर्णपणे भरेन असा मोजता येणाऱ्या कालावधीचा विचार करायला हवा. A = Achievable म्हणजे शक्य असलेले ध्येय पूर्ण करता येईल असे असावे. मी बचत करेन ऐवजी येत्या 6 महिन्यात मला शक्य असलेले दरमहा ₹4000/- बचत करून ₹24000/- जमविन. R = Realistic म्हणजे वास्तविक, खरेखुरे आपले धेय्य उपलब्ध गोष्टींचा विचार करून निश्चित कालावधीत पूर्ण झाले पाहिजे. मी नियमित बचत करून कोट्याधीश होईन. या ऐवजी मी नियमित बचत करून येत्या जानेवारीपर्यंत सर्व कर्ज फेडीन. यानंतर पुढील डिसेंबर पर्यंत आवश्यक असा 6 महिन्यांचा निश्चित खर्च भागवला जाईल एवढा राखीव निधी निर्माण करीन. असा नेमका वास्तविक विचार करणारे असावे. T = Time bound म्हणजे विशिष्ट काळात पुरे होणारे असे असावे. मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे जमविन याऐवजी मी दरवर्षी पन्नास हजार असे पुढील दहा वर्षे वाचविन असा कालावधीचा दृष्टिकोन असायला हवा. अंदाजपत्रक आपण खर्च कसा आणि कुठे करणार याची योजना तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे अंदाजपत्रक बनवणे. त्यामुळे आपल्याला मिळणारी रक्कम अपेक्षित खर्च, बचत, कर्जफेड, धेय्यपूर्ती कडील वाटचाल या सर्वांचा मागोवा घेता येतो. 7. तुमची निवृत्ती योजना बनवा निवृत्ती योजना बनवण्याची सुरुवात आत्तापासूनच करा. त्यामुळे जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमचे अस्तित्वात असलेले राहणीमान कायम ठेवू शकाल. वाढते खर्च आणि महागाई यांची चिंता तुम्हाला करावी लागणार नाही. निवृत्ती नियोजन योजनाच तुमची निवृत्तीनंतरची स्वप्ने पूर्ण करेल आणि भविष्य सुरक्षित बनवेल. निवृत्ती योजना तयार करण्यास उपयुक्त युक्त्या- ●आधीपासूनच ठेवलेली शिल्लक निवृत्तीपर्यत चक्रवाढ गतीने वाढते त्यामुळे निवृत्तीच्या वेळी अपेक्षित असणारी मोठी रक्कम जमा होण्यास मदत होते. ●तुम्ही बाजूला जमा करत असणारी रक्कम एवढी मोठी असावी ज्यातून आपण अनपेक्षित खर्च आणि अन्य तातडीच्या गरजा पूर्ण करू शकाल. याशिवाय तुमचा आणि तुमच्या प्रियजनांची आर्थिक गरज भागवू शकेल एवढा जीवन विमा आणि वैद्यकीय विमा असल्यास जोखीम कमी होण्यास मोठी मदत होईल. ●जमा केलेली रक्कम एकाच मालमत्ता प्रकारात न ठेवता विविध मालमत्ता प्रकारात विभागली असता त्यातील एखादा प्रकार परतावा देऊ शकला नाही तर त्याची भरपाई दुसरीकडून झाल्याने जोखीम कमी होण्यास मदत होईल. सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत असे म्हणतात ते यासाठीच. ●तुमचे निवृत्तीचे उद्दिष्ट आणि राहणीमान याचा विचार करून योजनेची निवड करावी. यासाठी मदत करणारे गणक सर्वत्र उपलब्ध आहेत. आपली निवृत्ती नियोजन योजना बनवण्यासाठी तुम्ही नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. असे सल्लागार तुम्हाला तुमच्या वैयक्तीक गरजेनुसार उपयुक्त असणारी निवृत्ती नियोजन योजना बनवून देऊ शकतील. 8. कर्ज घेण्यापूर्वी विचार करा काही अत्यावश्यक गरजा, अनावश्यक इच्छाची पूर्तता करण्यासाठी तसेच आजारपण अपघात यासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी, पुरेशी बचत नसल्याने कर्ज घेण्याची जरूरी पडते. जिथे जिथे शक्य असेल तेथे कर्ज घेणे शक्यतो टाळावे. कर्जाऊ रक्कम घेतल्याने फेडण्याची जोखीम वाढत असल्याने आर्थिक जबाबदारी वाढते. बरेचदा बँका वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज देतात, ती तारणासह अथवा तारण विरहितही असू शकतात. तारणासह घेतलेल्या कर्जासाठी मालमत्ता गहाण ठेवावी लागते. कर्ज फेडू शकलो नाही तर त्या मालमत्तेची विक्री केली जाते. उदा वाहन कर्ज, गृह कर्ज. या उलट काही कर्जे विनातारण दिली जातात जसे वैयक्तिक कर्ज. कर्ज घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या ●कर्ज नेहमीच मान्यताप्राप्त, नोंदणीकृत धनकोकडून (बँक, बिगर बँकिंग अर्थसंस्था, पतपेढी) घ्यावं. अनोंदणीकृत व्यक्ती संस्था, खाजगी सावकार यांच्याकडून घेऊ नये. ●कर्जावरील व्याजाचा दर तपासून पाहावा. कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्याकडून ते घ्यावे. ●धनकोकडून व्याजाची आकारणी कशी केली जाणार ते समजून घ्यावे. ती दोन पद्धतीने केली जाते. सरळव्याज - यात मूळ कर्ज रकमेवर पूर्ण व्याज आकारले जाते तर दुसऱ्या पद्धतीत जसजशी मुद्दल कमी होईल त्याप्रमाणे कमी व्याज घेतले जाते. ●तुमच्या नियमित खर्चावर परिमाण न करता परतफेडीची क्षमतेनुसार कर्जफेडीचा हप्ता आणि कालावधी ठरवून घ्यावा. हा कालावधी जितका कमी तेवढे कमी व्याज द्यावे लागते तर कालावधी अधिक असेल तर व्याज अधिक द्यावे लागते. ●कर्ज घेण्यापूर्वी काही छुपे खर्च असतील तर ते किती आणि कोणते यांची माहिती करून घ्यावी उदा प्रक्रिया फी, हप्ता भरल्यास उशीर झाल्यास पडणारा दंड, मुदतपूर्व कर्ज फेडल्यास द्यावी लागणारी अधिकची रक्कम इ. कर्ज घेतल्यावर हे लक्षात ठेवा ●अधिकचे व्याज आणि दंड टाळण्यासाठी कर्जाचे हप्ते नियमित भरा. ●जास्त पैसे उपलब्ध असल्यास कर्ज मुद्दल अंशतः अथवा पूर्णपणे मुदतीपूर्वी फेडल्यास पडणारा दंड लक्षात ठेवून ते लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करावा. ●तुमच्या कर्ज खात्याचा नियमित आढावा घ्या. ●वेगवेगळी कर्जे घेण्यापूर्वी त्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा आपल्यावर पडू नये म्हणून आपल्या परतफेडीच्या क्षमतेचा विचार करा. 9. विमा - अनपेक्षित संकटांपासून संरक्षण आपण आणि आपल्या कुटुंबावर काही संकटे येऊ शकतात जसे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू, अपघात, प्रदीर्घ आजारपण, चोरी, आग. याचा मोठा आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो विम्यामुळे त्याची आर्थिक भरपाई होत असल्याने तीव्रता थोडी कमी होते. विविध विमा प्रकार ●जीवन विमा - या विम्यामुळे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा कुटूंबियांना एकरकमी भरपाई मिळत असल्याने आर्थिक आधार मिळतो. ●अपघात विमा- या विम्यामुळे कमावत्या व्यक्तीस अपघात झाला असता आर्थिक स्वरूपात एकरकमी अथवा टप्याटप्याने मदत मिळते ●आरोग्य विमा- यामुळे अपघात झाल्यास अथवा आजारी पडल्यास होणाऱ्या खर्चाची पूर्तता होते ●सर्वसाधारण विमा - जसे की वाहन विमा, प्रवास विमा, निवृत्ती विमा, मालमत्ता विमा या विम्यामुळे त्याच्याशी संबंधीत मालमत्तेतील आर्थिक जोखमीची तीव्रता कमी होते. आपली नेमकी गरज ओळखून यापैकी जीवन विमा, अपघात विमा, आरोग्य विमा अथवा सर्वसाधारण विम्याची निवड करावी. यासाठी आपल्याला वर्गणी द्यावी लागते ती मासिक, त्रैमासिक, वार्षिक पद्धतीने भरता येते यातील काही विमा प्रकार विशिष्ट कालावधीसाठी एकरकमी वर्गणी भरूनही उपलब्ध आहेत.. विश्वासार्ह एजंट कडून याविषयी अधिकृत सविस्तर माहिती मिळवता येईल. तुमच्या गरजेनुसार ध्येय निश्चितीची मोजणी करणारे विमा योजनांची गणना करणारे गणक उपलब्ध आहेत. 10 मालमत्ता नियोजन मालमत्तेमध्ये तुमचे घर, बचत, विमा, गुंतवणूक, ताबेकबजात असलेल्या गोष्टींचा समावेश होतो. मालमत्ता नियोजन म्हणजे तुमच्या पश्चात मालमत्ता किती आणि कशी विभागणी जावी यासंबंधीची निश्चित रचना. मालमत्ता नियोजनाची गरज- ●मालमत्ता सुलभतेने वारसांकडे हस्तांतरित व्हावी म्हणजे त्यांना खरीखुरी गरज असताना त्याचा उपयोग होईल. ●मालमत्तेची वाटणी तुमच्या इच्छेनुसार आणि विनातंटा विभागली जाईल. मालमत्ता नियोजनात तुमची मालमत्ता प्रियजन, कुटूंबीय यांच्यामध्ये विवाद न होता कशी वाटली जावी याचा विचार केला जातो. मालमत्ता नियोजन करण्यासाठी उपयुक्त गोष्टी खालीलप्रमाणे- ●इच्छापत्र- तुमच्या पश्चात मालमत्तेची वाटणी कशी व्हावी याची नोंद असते. जर मुले लहान असतील तर त्यांचा सांभाळ कोणी करावा याचा त्यात उल्लेख केलेला असतो. काही वेळेस इच्छापत्राची सत्यता सिध्द करण्यासाठी न्यायालयाकडून प्रमाणपत्र मिळवावे लागते त्यास प्रोबेट म्हणतात. ●अधिकारपत्र- यात मालमत्तेची देखभाल तुमच्या अनुपस्थितीत कुणी करावी, यासाठी विश्वासू व्यक्तीची नेमणूक करून त्यास कायदेशीर अधिकार दिले जातात. ●आढावा आणि पुनर्विचार- बदलती परिस्थिती आणि कायद्यातील बदल यांचा विचार करून इच्छापत्र आणि अधिकारपत्र यांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. यासाठी निष्णात विधिज्ञाची मदत घेता येईल.( संपूर्ण) ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 29 ऑगस्ट 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 22 August 2025

चला पैशाचे महत्व समजून घेऊया भाग 1

चला पैशांचे महत्व समजून घेऊया भाग 1 1. बचत भविष्यातील आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पन्नातील काही भाग बाजूला ठेवणे म्हणजे बचत होय. आपल्या उत्पन्नातून खर्च वजा करता राहिलेली शिल्लख म्हणजे बचत असे म्हणता येईल. तीची मांडणी खालील सूत्रात करता येईल. बचत= उत्पन्न-खर्च आपले आर्थिक भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी, दीर्घकालीन इच्छांची पूर्तता करण्यासाठी, आर्थिक स्थेर्यता मिळण्यासाठी तिचा उपयोग होतो. त्यामुळे आपल्याला आंतरिक समाधान मिळत असते. म्हणूनच, उत्पन्नातून खर्चकरून झाल्यावर राहिलेली रक्कम शिल्लख ठेवून बचत करण्याऐवजी सुरुवातीपासून प्रथम बचत करून राहिलेल्या रकमेतून खर्च करण्याची सवय लावून घ्यावी. बचत का करावी? बचतीची सुरुवात नेमकी कधी करावी ते सांगता येणं कठीण असलं तरीही आपण ती जितक्या लवकरात लवकर करू ते अधिक चांगलं. बचतीचे महत्व अधोरेखित करणारे काही मुद्दे असे- ●बचतीमुळे आपल्याकडे राखीव निधी (गंगाजळी) तयार होतो. त्यातून काही आकस्मित खर्च जसेकी आजारावरील उपचार, व्यवसायातील तोटा यांची भरपाई करू शकतो. ●आपली आर्थिक उद्दिष्टे जसे की घर, मुलांचे उच्च शिक्षण आपल्या निवृत्तीचे आर्थिक नियोजन करू शकतो. म्हणूनच, आज आत्तापासूनच बचतीची सवय लावून घेऊन आर्थिक स्वावलंबन आणि आत्मसमाधानाच्या दिशेने पहिले पाऊल पुढे टाकूया. 2. गरजा, इच्छा आणि आकांक्षा यामधील फरक आपल्या खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवून अधिकाधिक बचत करण्यासाठी गरजा, इच्छा आणि आकांक्षा यातील फरक जाणून घेणं गरजेचं आहे. ★गरजा- आपल्याला सर्वसाधारण जीवनमान जगण्यासाठी किमान आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे गरजा, उदा अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा यावरील खर्च. ★इच्छा- या जगण्यासाठी आवश्यक नसल्या तरी त्यामुळे आपले जीवन समृद्ध होते. राहणीमान उंचावते उदा. मनोरंजन, हॉटेलिंग, पर्यटन. ★आकांक्षा- ज्यामुळे आपल्याला आपली स्वप्नपूर्ती झाली असे वाटते अशा तीव्र इच्छा म्हणजे आकांक्षा. महागडी गाडी, बाजारात येणाऱ्या नवनव्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, महागडे मोबाईल इत्यादी. ज्या मिळायला हव्यात म्हणून तुम्हाला कदाचित कर्ज घेण्याचा मोह होतो. (या गोष्टींसाठी कर्ज घेण्यापूर्वी आपल्याला तिची आवश्यकता आहे का? याचा सर्वप्रथम विचार करा.) आपल्या प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करून इच्छा आकांक्षाची पूर्तता कराल तर बचत करणे अशक्य आहे म्हणूनच बचतीकडे दुर्लक्ष न करता आधी प्राथमिक गरजा नंतर इच्छा आणि त्यानंतर आकांक्षा असा खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवावा. यातील क्रमात कोणताही अदलाबदल झाल्यास आर्थिक स्थैर्य निर्माण होणार नाही. 3. उत्पन्न आणि खर्चाचे व्यवस्थापन प्रत्येकाने आपल्या खर्चाचा मागोवा घेऊन त्याचा आढावा घेण्यासाठी आपले उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे जरुरीचे आहे. उत्पन्न आणि खर्च यांचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग, ●अंदाजपत्रक तयार करणे: अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आपल्याला मिळणारे सर्व उत्पन्न जसे पगार, बोनस, घरभाडे, व्यवसायाचे उत्पन्न, अन्य उत्पन्न आणि अपेक्षित खर्च जसे वाणसामान, वीज बिल, अन्य बिले, मनोरंजन यांच्यावरील अपेक्षित खर्च लिहून काढा. हे खर्च करत असताना उत्पन्नातील काही भाग हा बचत आणि गुंतवणूक यासाठी राखून ठेवा आणि त्यानंतर या अंदाजपत्रकाचे तंतोतंत पालन करा. ●खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवा: खर्च करताना गरजेच्या गोष्टी सर्वप्रथम त्यानंतर इच्छा आणि आकांक्षा असा क्रम असुद्या. तरीही काही शिल्लख रहात असेल तर आणि तरच अनावश्यक खर्चाचा विचार करा. ●राखीव निधी (गंगाजळी) निर्माण करा: उत्पन्नातील काही रक्कम सक्तीने बाजूला ठेवून गंगाजळी निर्माण करा. अकस्मात येणारे संकट आणि त्यामुळे उद्भवणारे खर्च यांच्याशी सामना करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. ●गुंतवणूक करा: आपल्या इच्छा, आकांक्षा लवकरात लवकर आपल्या उत्पन्नातील काही भागाची गुंतवणूक करा. 4. महागाई: वस्तू आणि सेवांच्या किंमतीत होणारी वाढ. वस्तू आणि सेवा यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असते. त्यामुळे पैशांचे मूल्य कमी होते म्हणजे आज जी वस्तू ₹100/- मध्ये येईल त्यापेक्षा कमी प्रमाणात भविष्यात वस्तू उपलब्ध होते. महागाई दरवर्षी 6% दराने वाढत असेल तर आज शंभर रुपयात उपलब्ध असलेल्या वस्तू अथवा सेवेसाठी आपल्याला पुढील वर्षी ₹106/- मोजावे लागतील. महागाईचा दर 6% असल्यास सध्याचे ₹ 1 लाखचे मूल्य 5 वर्षांनी ₹74700/-, 10 वर्षांनी ₹55800/-, 15 वर्षांनी 41700/- ,तर 20 वर्षांनी ₹31200/- असे कमी कमी होईल. महागाई नियंत्रणात आणणे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यातील नाही. त्याचे आपल्या वैयक्तिक अर्थकारणावर होणारे विपरीत परिणाम कमी करता येतात. त्यासाठी, ●खर्चांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि अनावश्यक खर्च टाळा. ●आपली गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात अशी विभागा की त्यातून मिळणारा सरासरी परतावा हा महागाईवर मात करणारा असेल. ●दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या. शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने यातील गुंतवणुकीवर यांनी दिलेल्या परताव्याचा इतिहास पाहिला असता त्यातून दीर्घकाळात महागाईवर निश्चितच मात करता येते. 5. चक्रवाढ गतीने होणारी तुमच्या पैशांची वाढ जसजसा अधिक काळ जाईल तसतशी चक्रवाढ व्याजाने तुमच्या बचतीतील केवळ मुद्दल नव्हे तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावरील व्याजाने मोठ्या प्रमाणात वाढ होते. अल्बर्ट आईस्टाईन म्हणतात, चक्रवाढ व्याज हे जगातील आठवं आश्चर्य आहे. हे ज्याला समजतं तो कमावतो आणि ज्याला ते समजत नाही तो त्याची किंमत मोजतो. ●चक्रवाढ व्याजाची जादू: जर 1 लाख रुपये 10% सरळ व्याजाने 20 वर्षासाठी ठेवले तर त्याचे तीन लाख रुपये होतात पण हीच रक्कम 10% चक्रवाढ व्याजाने ठेवली असता 20 वर्षांनी 6 लाख 72 हजार होतात. तुम्ही हे पडताळून पाहू शकता. चक्रवाढ व्याजाची झटपट गणना करून देणारे गणक उपलब्ध आहेत. ●चक्रवाढ व्याजाचे ठोकताळे: झटपट चक्रवाढ व्याजाची मोजणी करण्याचे नियम ★72 चा नियम- गुंतवणूकीचे मूल्य दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज येतो. व्याजदराने 72 या संख्येस भागले असता गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी समजेल. उदा. चक्रवाढ व्याजदर 9% असेल तर गुंतवणूक दुप्पट होण्यास 72÷9= 8 म्हणून 8 वर्ष लागतील. ★114 चा नियम- यामुळे मुद्दल तिप्पट होण्याचा कालावधी समजतो. ★144 चा नियम- यामुळे मुद्दल चौपट होण्याचा कालावधी समजतो. (अपूर्ण) (सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध माहितीचा भावानुवाद) ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत)

Friday, 15 August 2025

एक देश एक प्रमाणवेळ

#एक_देश_एक_प्रमाणवेळेकडे स्थानिकवेळ आणि प्रमाणवेळ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. स्थानिक वेळ म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या रेखांशावर आधारित वेळ, जी सूर्याच्या स्थितीनुसार बदलत जाते. तर, प्रमाण वेळ म्हणजे एखाद्या मोठ्या प्रदेशासाठी निश्चित केलेली एक समान वेळ, ज्यामुळे त्या प्रदेशातील वेळेची एकरूपता टिकून राहते. स्थानिक वेळ ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. प्रत्येक रेखांशासाठी स्थानिक वेळ वेगळी असू शकते, कारण सूर्य पूर्वेकडील भागांमध्ये लवकर उगवतो आणि पश्चिमेकडील भागात उशिरा. पूर्वी, जेव्हा दळणवळणाची साधने कमी होती, तेव्हा स्थानिक वेळच वापरली जात होती. प्रमाण वेळ म्हणजे एखाद्या मोठ्या प्रदेशासाठी निश्चित केलेली एक समान वेळ. हे वेळ क्षेत्र (time zone) निश्चित करण्यासाठी वापरले जाते. भारताची प्रमाण वेळ 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जी प्रयागराज जवळून जाते, आणि ती युटीसी +05:30 Hrs (यूनिव्हर्सल टाइम कोऑर्डिनेटेड) आहे, प्रमाण वेळामुळे जगभरातील लोकांना वेळेचे नियोजन करणे सोपे होते. थोडक्यात, स्थानिक वेळ ही सूर्याच्या आकाशातील स्थितीवर आधारित असून ती प्रत्येक ठिकाणी वेगळी असू शकते, तर प्रमाण वेळ ही एखाद्या मोठ्या प्रदेशासाठी निश्चित केलेली एक समान वेळ आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर वेळेचे व्यवस्थापन करणे सोपे होते. आपल्याकडील अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम वेळेत सुरू होत नसले तरी सध्याच्या गतिमान जीवनात आपण वेळेवर फारच अवलंबून आहोत. आपण नोकरी करत असाल तेथून येण्याची वेळ निश्चित नसली तरी वेळेवर कामावर जावं लागतं, व्यवसाय करीत असाल त्यातील स्पर्धेत टिकून राहायचे तर वेळेचे पूर्ण पालन करावं लागतं. गुंतवणूक करत असाल तर त्याचीही निश्चित वेळ असते. अनेक गुंतवणूकदार, ट्रेडर्स त्याच्या बाजारातील फायनल ऑर्डर डॉट 03:29 ला पंच करतात. अलार्म, डेडलाईन, घाई हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. हे हास्यास्पद वाटत असलं तरी त्यात तथ्य आहे. एकदा का समाज वेळेवर अवलंबून राहू लागला की वेळेबद्धल एकमत असणं गरजेचं असतं. आपण घड्याळ बनवली मग अचुकतेसाठी अणूघड्याळ मग त्यांचं संपूर्ण नेटवर्क - जे उपग्रहांपासून, सर्व्हर, पॉवरग्रीड आणि फायटर जेट एकमेकांशी जोडले गेले. प्रत्येक देशाने आपापल्या वेळा ठरवल्या. अमेरिकेकडे सहा फ्रान्सकडे बारा प्रमाणवेळा आहेत. नेपाळची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेच्या 15 मिनिटे पुढे आहे. ही सर्व यंत्रणा वेळेच्या अदृश्य एकमतावर चालते मिलिसेकंद चुकलं, की संपूर्ण यंत्रणा कोसळू शकतं. इतकं असूनही, भारताचे बहुतेक डिजिटल सिस्टीम्स अजूनही दुसऱ्याच्या वेळेवर चालतात. भारत सरकार बदलू इच्छित आहे, एका नव्या धोरणाद्वारे, ‘एक देश, एक प्रमाणवेळ’ – एक असा प्रस्ताव भारतातील सर्व डिजिटल आणि कायदेशीर पायाभूत व्यवस्था एका अचूक, भारत-केंद्रित वेळेच्या मानकावर आधारित असतील. विदेशी वेळा, जीपीएस आणि गुगलचे सर्व्हर याऐवजी, भारताचे स्वतःचे अणुघड्याळ आणि उपग्रह प्रणाली वापरायची (जसे की NavIC – Navigation with Indian Constellation) आणि देशभरातल्या सर्व यंत्रणा — रेल्वेपासून उपग्रहांपर्यंत — एकाच नॅनोसेकंद अचूक वेळेवर चालवायच्या. सध्या भारतातील बहुतांश मोबाईल, बँकिंग, टेलिकॉम आणि शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स अमेरिका नियंत्रणाखालील जीपीएस किंवा क्लाउड बेस्ड वेळेवर चालतात तर इसरो, डीआरडीओ आणि शेअर बाजार यांच्यासारख्या मोजक्या संस्था मात्र भारतीय NavIC प्रणालीशी जोडलेल्या आहेत. सन 2016 मध्ये एक जीपीएस बग फक्त तेरा मायक्रोसेकंदाची चूक घेऊन आला. (0.013 सेकंद) त्यामुळे अमेरिकेतील पोलीस रेडिओ, टेलिकॉम नेटवर्क, ग्लोबल डेटा स्टॅम्पिंग विस्कळीत झाले. हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडर्सना मोठा फटका बसला. युरोपमध्ये सन 2020 मध्ये अशीच एक वेळेशी संबंधित गडबड संपूर्ण टेलिव्हिजन आणि टेलिकॉम सेवा ठप्प करू शकली, म्हणूनच आपल्या प्रमाणवेळेवर आपला स्वायत्त अधिकार असणे आवश्यक आहे. भारताजवळ त्यांची प्रमाणवेळ IST (Indian Standard Time) आधीपासूनच अस्तित्वात आहे. ही वेळ UTC +5:30 आहे – ती सन 1906 मध्ये निश्चित करण्यात आली. आज ही वेळ राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (NPL), दिल्ली येथे अणुघड्याळांद्वारे सांभाळली जाते. ही घड्याळं सीझियम-133 अणूंमध्ये होणाऱ्या कंपनांवर आधारित असतात. एक सेकंद = 9,192,631,770 कंपने. यांची अचूकता इतकी जबरदस्त असते की 30 दशलक्ष वर्षांनंतर त्यात फक्त एक सेकंद फरक पडू शकतो. सध्या ‘एक देश, एक प्रमाणवेळ’ यासाठी सरकार काय करतंय? ●देशभर पाच प्रादेशिक वेळ प्रयोगशाळा उभारल्या आहेत: अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, फरीदाबाद आणि गुवाहाटी ●प्रत्येक ठिकाणी सुपर-अचूक अणुघड्याळ बसवले आहेत. ●हे NTP (Network Time Protocol) आणि PTP (Precision Time Protocol) द्वारे 0.1 मिलिसेकंदात संपूर्ण देशभर वेळ पोहोचवतील. ●लवकरच Legal Metrology (IST) Rules, 2025 ही नवीन कायदाशीर चौकट येणार आहे. ●यानुसार सर्वच संस्थांना फक्त भारतीय वेळा वापरणे बंधनकारक होईल — जीपीएस, गुगल वेळ यांचा वापर बंद होईल. ●सरकारने याबाबत शेअरबाजार, सेबी आणि बँकांना याबाबत आधीच सूचना दिल्या आहेत. हा मुद्दा आत्ताच का? याचे कारण, ●आता वेळ ही ‘पायाभूत सुविधा ’आहे. ●डिजिटल व्यवहार, AI, रिअल टाइम डेटा — सगळं वेळेवर अवलंबून आहे. जर यंत्रणा एका वेळेवर सहमत नसतील, तर त्या वास्तवावरही सहमत होऊ शकत नाहीत आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ●आजही जगातील चार अब्जांहून अधिक लोक जीपीएस नियंत्रित वेळेवर चालतात. जर जीपीएस स्पूफ किंवा जॅम केलं गेलं (यूक्रेन, मिडल ईस्टमध्ये असं घडलंय), तर भारतातली एटीएम, एअर ट्रॅफिक कंट्रोल, रडार प्रणाली बंद पडू शकतात. इतर देश सध्या काय करीत आहेत? ●अमेरिका, चीनने स्वतःची वेळ प्रणाली आणि बॅकअप सिस्टीम्स तयार केल्या आहेत. ●युरोपचे गॅलिलिओ उपग्रह नेटवर्कसुद्धा चालू आहे. ●भारत मात्र अजूनही जगातल्या वेळेवर अवलंबून आहे. ●एका अमेरिकन अहवालानुसार, चुकीच्या वेळेमुळे होणारे नुकसान $1 बिलियन प्रति दिवस असू शकते. आपण अजून ते मोजत देखील नाही. यातील अडचणी- ●खर्च — अणुघड्याळं, उपग्रह, NTP/PTP प्रणाली उभारणं महाग आहे. ●एकसंधता — बँकिंग, टेलिकॉम, पावर कंपन्यांनी ही नवी वेळ स्वीकारावी लागेल. ●प्रशासन — प्रत्येक संस्था वेळेवर अपग्रेड आणि कम्प्लायंट राहील का? ●मोठा विरोधाभास: पूर्व भारत — आसाम, अरुणाचल प्रदेश इ. राज्ये अनेक वर्षांपासून वेगळ्या प्रणामवेळेची मागणी करत आहेत. पूर्व आणि पश्चिम टोकाकडील स्थानिक वेळेत दोन तासाचा फरक आहे. पूर्वेकडील भागात सूर्य हिवाळ्यात 4:30 ला उगवतो आणि सायंकाळी 5 पूर्वीच मावळतो. तरीही तिथले सर्व व्यवहार, ऑफिसेस आणि शाळा देशाच्या प्रमाणवेळेनुसार चालतात. एक अभ्यास सांगतो की एकाच प्रमाणवेळेमुळे आपली 2.7 अब्ज युनिट वीज वाया जाते, हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. यासाठी सध्या असलेले प्रमाणवेळेचे ठिकाण बदलून ते थोडे पूर्वेकडे सरकवावे अशी एक शिफारस होती. यावर अधिक चांगला उपाय काय असू शकतो? हेच अणुघड्याळ नेटवर्क वापरून दुहेरी वेळा देणं — पूर्व भारतासाठी एक आणि उर्वरीत भागासाठी एक. यामुळे देशाला अचूकता मिळेल आणि मानवी भांडवलात ₹29000 कोटी (₹4.1 बिलियन) ची भर पडेल ‘एक देश, एक प्रमाणवेळ’ ही कल्पना यंत्रणेला अचूक बनवून काही प्रश्न निर्माण करते: ●जर वेळ एका संस्थेकडे केंद्रीकृत असेल, तर तिचं ऑडिट कोण करेल? ●बॅकअप कोणता? ●आजचं उपलब्ध मिश्र-जागतिक कालचक्र त्यापेक्षा अधिक विश्वासार्ह आहे का? या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन, ही योजना आपल्या देशाला ‘आपल्या प्रमाणवेळेच्या स्वातंत्र्याचा’ अधिकार देत आहे. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

Friday, 8 August 2025

क्वांटची बाजी

#क्वांटची_बाजी_देशातील_पहिल्या_विशेषीकृत_गुंतवणूक_योजनेची_लवकरच_सुरुवात भांडवल बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाचे तीन पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड योजना, गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा आणि पर्यायी गुंतवणूक निधी. यातील म्युच्युअल फंड हा पर्याय सर्वच गुंतवणूकदारांना उपयुक्त आहे तरीही अधिक परतावा मिळावा या हेतूने गुंतवणूकदार डमी गुंतवणूक व्यवस्थापन योजनांत गुंतवणूक करतात. गुंतवणूक करण्यासाठी अनेक अधिकृत पर्याय उपलब्ध असले तरी लोभ आणि हव्यास यामुळे अनेक गुंतवणूकदार अधिक आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या बेकायदेशीर योजनांना बळी पडतात. पीएमएस आणि एआयएफ मधील किमान गुंतवणूक ही अनुक्रमे पन्नास लाख ते एक कोटी रुपये असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यातील नाही. तेव्हा अशा गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि पीएमएस यांच्यातील अंतर भरून काढू शकेल असा अधिकचा, वेगळा परंतु अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळण्याची शक्यता असलेला गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल असे सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केले होते. या सर्वयोजनांची माहिती आपण यापूर्वी करून घेतली होती. त्यातील विशेषीकृत गुंतवणूक योजना या योजनेची मार्गदर्शक तत्वे सेबीने यापूर्वीच जाहीर केली होती. सर्व म्युच्युअल फंडांची स्वशासित संघटना अँफी यांनी यासंबंधीची गुंतवणूक नियमावली सेबीशी चर्चा करून जाहीर करावी असे सुचवले होते. या मार्गदर्शक तत्वाचा आधार घेऊन निश्चित नियम असलेल्या योजना नव्या आर्थिक वर्षात सर्वाना उपलब्ध होतील असा अंदाज होता. त्यांनी सुचवलेली नियमावली आपण पुन्हा एकदा थोडक्यात समजून घेऊयात. योजनेची मुख्य वैशिष्ठ्ये- ■मालमत्ता व्यवस्थापन कंपनीसाठीचे पात्रता निकष- ●किमान 3 वर्षांचा कार्यकाळ आणि ₹10,000 कोटींचा गुंतवणूक निधी त्यांच्याकडे (गेल्या 3 वर्षांचा सरासरी AUM) असणे आवश्यक. अथवा किमान 10 वर्षांचा निधी व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) ची नियुक्ती करून ₹5,000 कोटींचा सरासरी गुंतवणूक निधी व्यवस्थापन करण्याचा अनुभव असावा. ●अतिरिक्त फंड मॅनेजर कडे ₹ 500 कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा. ●सेबी कायद्याच्या सेक्शन 11, 11B आणि 24 नुसार फंड हाऊस विरुद्ध अलीकडच्या तीन वर्षात कोणतीही कारवाई झालेली नसावी. ●या निधींची जाहिरात करून म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांना त्याचे ब्रॅण्डिंग करता येईल. ● या निधींसाठी स्वतंत्र गुंतवणूकस्नेही संकेतस्थळ किंवा स्वतंत्र पेज बनवावे लागेल. ■ किमान गुंतवणूक रक्कम: ●किमान ₹10 लाख गुंतवणूक आवश्यक (SIP, SWP, STP परवानगी आहे, परंतु एकूण गुंतवणूक ₹10 लाखांपेक्षा कमी असता कामा नये). ●जर बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणूक ₹10 लाखांखाली गेली तर चालेल परंतु ती अयोग्य व्यवस्थापनामुळे अथवा वारंवार गुंतवणूक धोरण बदलल्याने खाली जात आहे असे गुंतवणूकदारास वाटल्यास संपूर्ण रक्कम त्यास बाजारभावाने मागे घेता येईल. ●गुंतवणूक कोणत्या मालमत्ता प्रकारात किती टक्यांपर्यत करावी याच्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. ●मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांसाठी (हा एक वेगळा अधिक जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा प्रकार आहे) हा नियम लागू नाही. ■गुंतवणूकीस उपलब्ध फंड प्रकार : गुंतवणूकदारांना सध्या इक्विटी आधारित तीन कर्जरोख्यांवर आधारित दोन आणि एकत्रित असे दोन प्रकारचे फंड असे एकूण सात प्रकार उपलब्ध होणार असून यातील कोणत्याही फंडाचे गुंतवणूक धोरण ठरवताना त्यातील मान्य प्रचलीत निर्देशांक हे मानद निर्देशांक म्हणून स्वीकारता येतील. ■डेरिव्हेटिव्ह्स धोरण: ◆SIF फंडांना 25% पर्यंत डेरिव्हेटिव मधील व्यवहार करण्याची परवानगी आहे. हेजिंगसाठी (जोखीम व्यवस्थापन हेतूने) व्यवहार करण्याशिवाय असलेली ही अतिरिक्त मर्यादा आहे. उदाहरणार्थ, इक्विटी लॉंग शॉर्ट फंडाकडे ₹100 कोटी निधी असेल तर त्यातील 25 कोटींची डिरिव्हेटिव मर्यादा हेजिंग आणि गुंतवणूक संच पुनर्स्थापना करण्याच्या मर्यादेशिवाय आहे. वेगवेगळ्या चौदा शक्यतांसाहित दोन वेगवेगळ्या पोझिशन ऑफसेट होतील की नाही आणि त्यावरून नेट एक्सपोजर काय असेल? ते समजावून सांगणारा तक्ता सेबीने प्रकाशित केला होता. ■वर्गणी आणि परतफेड (Subscription & Redemption) विषयक धोरण: ◆SIF ओपन-एंडेड, क्लोज-एंडेड किंवा इंटरवल फंड स्वरूपात असू शकतो. ●परतफेडीचा कालावधी दररोज, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक असू शकतो. ●15 कार्यदिवसांपर्यंत परतफेडीसाठी नोटीस कालावधी लागू शकतो. ■सूचीबद्धता (Listing) निकष: ◆सर्व क्लोज-एंडेड आणि इंटरवल फंडांना स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक बाजारभावावर गरजेनुसार काढून घेण्याचा पर्याय उपलब्ध राहील ■जोखीम व्यवस्थापन आणि त्यांचे प्रकटीकरण: ◆जोखीम मूल्यांकन दर महिन्याला जाहीर करावे लागेल (AMC च्या वेबसाइट आणि AMFI वेबसाइटवर). ◆‘Risk-Band’ पद्धतीने जोखीम पाच विविध स्तरांमध्ये विभागली जाईल. लेव्हल 1 सर्वात कमी जोखीम ते लेव्हल 5 सर्वाधिक जोखीम असा चढता क्रम असेल. ◆फंड मॅनेजरना त्यांचे पुढील निधी गुंतवणूक धोरण आणि त्याचा जोखीम स्तर दरवर्षी 31 मार्च पूर्वी जाहीर करावे लागेल. याशिवाय ◆वर्षभरात त्यात काही बदल केल्यास त्याची माहिती एएमसी आणि अँफी यांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत करावी लागेल. ◆योजनेतील गुंतवणूक दर दोन महिन्यांनी जानेवारी, मार्च, मे, जुलै, सप्टेंबर, आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी म्युच्युअल फंड योजनांच्या पद्धतीने जाहीर करण्यात येईल. ◆योजनेच्या परीचालनासाठी केलेले व्यवहार हे वैयक्तिक गुंतवणूकदारांचे व्यवहार समजले जाणार नाहीत जेव्हा गुंतवणूक काढून घेतली जाईल तेव्हाच अल्प/ दीर्घ मुदतीचा भांडवली लाभानूसार कर आकारला जाईल. ही यातील जमेची बाजू असून कर मुळातून कापला जाणार नाही. ■वितरकांची पात्रता: ◆SEBI ने NISM Series-XIII: Common Derivatives Certification परीक्षा उत्तीर्ण असलेल्या वितरकानाच विशेषीकृत गुंतवणूक निधीवर आधारित उत्पादने वितरित करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामुळे संभाव्य गुंतवणूकदार हा गुंतवणूक प्रकार त्यातील जोखीम बक्षीस संकल्पना समजून घेऊ शकेल. आतापर्यंत एडलवाईस म्युच्युअल फंड, मिरे अ‍ॅसेट म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, आयटीआय म्युच्युअल फंड, डीएसपी म्युच्युअल फंड, क्वांट म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल यासारख्या काही इतर फंड हाऊसेसनी त्यांचे एसआयएफ गुंतवणूक प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत परंतु त्त्यांची उत्पादने जाहीर केलेली नाहीत. यातील क्वांट म्युच्युअल फंडाला भारतातील पहिली विशेषीकृत गुंतवणूक योजना (SIF) चालू करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे, बाजार नियामक सेबीची मान्यता मिळवणारी ती भारतातील पहिली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) बनली आहे. एसआयएफ फ्रेमवर्क अंतर्गत फंड हाऊसची पहिली योजना - ' क्यूएसआयएफ इक्विटी लाँग-शॉर्ट फंड ' - ऑगस्ट 2025 मध्ये सुरू होईल आणि येत्या काही महिन्यांत दुसरी वेगळी इक्विटी आणि हायब्रिड एसआयएफ योजना सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर समांतरपणे गुंतवणूकदारांना या उत्पादनांबद्दल शिक्षित करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील, असे क्वांट म्युच्युअल फंडाने जाहीर केले आहे. योजनेबद्दल अधिक सांगताना, फंड हाऊसने म्हटले आहे की ही उत्पादन श्रेणी जे गुंतवणूकदार अधिक विकसित गुंतवणूक धोरणे शोधत आहेत. वाढत्या आणि घसरणाऱ्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी एसआयएफ दीर्घ आणि अल्पकालीन पोझिशन्स घेऊ शकतात आणि वाढीव जोखीम कमी करण्याच्या साधनांसह मुख्य गुंतवणूक धोरणाचा भाग म्हणून डेरिव्हेटिव्ह साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकतात. ज्यांना वित्तीय बाजारपेठांची चांगली माहिती आहे आणि तुलनेने उच्च जोखीम घेण्याची क्षमता आहे आणि अधिक विकसित गुंतवणूक धोरणे शोधत आहेत त्यांच्यासाठी पुढे जाऊन, हे फंड हाऊस एसआयएफसाठी एक वेगळी ब्रँड ओळख, वेगळी वेबसाइट आणि कम्युनिकेशन पोर्टल तयार करणार असून येत्या काही दिवसात संभाव्य गुंतवणूकदारांना या उत्पादनांबद्दल शिक्षित करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील. फंड हाऊसला काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये निवडक खरेदीच्या संधी आढळतात जसे की सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधा, हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी, फार्मास्युटिकल्स, उपभोग आणि दूरसंचार. मौल्यवान धातूंबद्दल भाष्य करताना, क्वांट म्युच्युअल फंडने म्हटले आहे की ऑगस्ट महिना सोन्यासाठी हंगामीदृष्ट्या अधिक तेजीचा असतो आणि फंड हाऊसच्या विश्लेषणाने असे मान्य केले आहे की सोने $3,500/Oz च्या आसपास पोहोचले आहे पुढील दोन महिन्यांत कच्चे तेल आणि इतर वस्तू सुधारू शकतात कारण डॉलर निर्देशांक आधीच तळाशी पोहोचला आहे, ऑगस्ट महिना थोडा मंदीचा असून अमेरिकन बाजारपेठ आता आत्मसंतुष्टतेची चिन्हे दर्शवत आहे आणि क्वांटचे असुरक्षितता निर्देशक वाढत आहेत. जेव्हा आपण ते अस्थिरता विश्लेषणासह एकत्रित करतो, तेव्हा भू-राजकीय वातावरण रचनात्मक राहिल्यानंतरही पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन आणि पुनर्बांधणी करण्यात अधिक बचावात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. क्वांट म्युच्युअल फंडचा असा विश्वास आहे की अमेरिकेच्या वाढत्या कर्ज संकटाला तोंड देण्यासाठी अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन हा एकमेव व्यावहारिक मार्ग आहे. जागतिक मध्यवर्ती बँकेचे महत्व कमी होत आहे कारण ती महागाई नियंत्रित करू शकत नाही आणि आर्थिक परिस्थितीत प्रभावी पुनरुज्जीवन आणू शकत नाही. ट्रम्प यांनी अलिकडेच लादलेल्या शुल्कानंतर भारतीय जीडीपीवर दरवर्षी सुमारे 0.5% इतका लक्षणीय परिणाम दर्शवितो. शिवाय त्यांनी रशियासोबतच्या कच्या तेलाच्या व्यापारासाठी भारतावर अतिरिक्त दंड लावल्याने बाजारपेठेसाठी बरीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. क्वांट म्युच्युअल फंडावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कौतुकास्पद असून आणि हे फंड हाऊस बदलत्या परिस्थितीत बाजारपेठांमध्ये मार्गक्रमण करत असताना शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन मूल्यावर आपले लक्ष केंद्रित करीत आहे. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते ही पूर्णपणे वैयक्तिक आहेत. डिरिव्हेटिव किंवा त्यासंबंधित गुंतवणूक ही अत्यंत धोकादायक गुंतवणूक समजली जात असल्याने परस्पर गुंतवणूक करू नये यासंदर्भात आपल्या वित्तीय सल्लागाराची मदत घेता येईल) पूर्वप्रकाशीत लेख

Friday, 1 August 2025

डार्क पॅटर्नच्या विळख्यात

#डार्क_पॅटर्नच्या_विळख्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अलीकडेच सर्व इ कॉमर्स मंचना त्यांच्या मंचाची सखोल तपासणी करून ते डार्क पॅटर्न मुक्त असल्याची खात्री करून घेण्यासाठी 6 जून 2025 तीन महिन्याची मुदत दिली आहे. हा सल्ला ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 मधील कलम 18(1) नुसार देण्यात आला असून, अनुचित व्यापार पद्धती प्रतिबंधित करण्याचे अधिकार सीसीपीएला दिलेले आहेत. सल्ला केवळ ग्राहक संरक्षण कायद्यापुरते मर्यादित नाही. तो डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण अधिनियम 2023 (DPDP Act) शीही संबंधित आहे. या कायद्यांतर्गत, संमती ही मुक्त, विशिष्ट, माहितीपूर्ण आणि अस्पष्टतेपासून मुक्त असणे अत्यावश्यक आहे. डिझाईनच्या माध्यमातून संमती मिळवताना जर वापरकर्त्याच्या निवडी अस्पष्ट किंवा दिशाभूल करणाऱ्या असतील, तर ती संमती अवैध ठरू शकते. त्यामुळे डिसगाइज्ड कन्सेंट, फेक अर्जन्सी, आणि डेटा राईट्समध्ये अडथळा आणणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जगभरातही याच दिशेने धोरणात्मक बदल घडत आहेत. युरोपियन युनियनचा GDPR, तसेच EU डेटा संरक्षण मंडळ (EDPB) यांनी असे डार्क पॅटर्न्स वैध संमतीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशन (FTC) नेही सबस्क्रिप्शन आणि जाहिरात प्रक्रियेत अशा पॅटर्न्स वापरणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारले आहेत. त्यामुळे भारताची धोरणे जागतिक स्तरावर सुसंगत असल्याचे दिसून येते – विशेषतः प्लॅटफॉर्म जबाबदारी आणि वापरकर्ता हक्कांचे संरक्षण या दृष्टिकोनातून. कायदेशीर आणि व्यवसायाच्या दृष्टीने, हा सल्ला स्पष्ट संदेश देतो की यूजर इंटरफेस हे फक्त उत्पादनाचे कार्य नसून, आता ते नियमनाधीन क्षेत्र बनले आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म्सनी यातील डिझाईन, संमती प्रक्रिया, सदस्यता रद्दीकरण, जाहिराती, आणि माहिती संकलनाच्या प्रक्रियेचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. डिझाईन, कायदेशीर सल्लागार आणि अनुपालन टीम यांच्यात सुसंवाद साधणे व अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा निर्माण करणे उपयुक्त ठरेल. सध्या इंटरनेटवरून व्यवहार करताना ग्राहकांना अनेकदा अवचित धक्के बसतात. नको असलेले पर्याय पदरात पडतात. जास्तीचे बिल लागते. भलतीच विंडो समोर उघडली जाते आणि आपण तिथून व्यवहार करू लागतो. असे अनुभव अनेकांना आले आहेत अगदी इमेलचा वापर करत असताना ‘विशेष ऑफर’च्या नावाखाली तुम्हाला काही मिनिटांत कृती करण्यास भाग पाडणारे संदेश सहज मिळतात – आणि आश्चर्य म्हणजे, तीच ऑफर काही आठवड्यांनीसुद्धा उपलब्ध असते! किंवा एखादी ऑनलाइन सदस्यता रद्द करणे हा एक अडथळ्यांचा खेळ वाटतो – "कॅन्सल" बटण सापडायलाच तयार नाही. हे सर्व म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाणाऱ्या डार्क पॅटर्न्सचे सामान्य उदाहरण आहे – अशा फसव्या डिझाईन युक्त्या ज्या वापरकर्त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात. ग्राहकाच्या स्पष्ट आणि सकारात्मक कृतीशिवाय (उदा. प्री-टिक बॉक्स किंवा गृहीत धरलेली संमती) काहीही मान्य असल्याचे समजले जाणार नाही, हेही पुनरुच्चारित करण्यात आले आहे. थोडक्यात ग्राहकांच्या निवडीवर ऑनलाइन प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिझाइन तंत्रासाठी हा शब्द वापरला जात आहे. त्यामुळे आपली दिशाभूल होऊ शकते. इ कोमर्सचा वापर करताना जो व्यवहार मंच वापरला जाईल त्याविषयी ग्राहकांना पूर्ण माहिती सहज समजावी, असे अपेक्षित आहे. झटपट मिळणारी माहिती आणि ग्राहकाभिमुख रचना असे मंचाचे वैशिष्ठ असावे. मात्र आता हा वापर तितकासा सोपा राहिलेला नाही. गुगल, मेटा, एमेझॉन, लिंकडीन यासारख्या अनेक फर्म त्याच्या वापरकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध युक्त्या योजत आहेत. लोकांनी कंपनीस अपेक्षित लिंकवर क्लिक करावं, त्यांना अपेक्षित असाच मजकूर पहावा यासाठी इंटरनेट तज्ञांनी वापरकर्त्यांना दिसणारे दृश्य आणि त्यानुसार त्यांचा संभाव्य प्रतिसाद यांचे विविध पॅटर्न शोधले आहेत. त्याद्वारे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी संबंधित संकेतस्थळाची रचना जरा किचकट केली जाते. यालाच 'डार्क पॅटर्न' म्हणतात. अशा प्रकारे ग्राहकांना बेसावध ठेवून फसवणूक करून व्यवसाय वाढवला जातो. डिजिटल माध्यमातून होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी जाहिरातदारांची स्वयंनियंत्रण संस्था 'आस्की' यांनी एक पाऊल पुढे टाकून अलीकडेच या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आणि सर्व जाहिरातदारांनी एक सप्टेंबर 2023 पासून त्याचे पालन करण्याचे आवाहन 'आस्की' ने केले होते. यात 'डार्क पॅटर्न' म्हणजे काय हे विशद करण्यात आले आहे. असे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रणकक्ष निर्माण करण्यात आला त्यासाठी ग्राहक कल्याण मंत्रालयाची मदत घेण्यात आली. त्यातून डार्क पॅटर्न्स प्रतिबंध आणि नियमन मार्गदर्शक तत्वे 2023 नुसार 13 प्रकारचे डार्क पॅटर्न्स निषिद्ध ठरवले गेले आहेत. त्यामुळे आता सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना स्वतःचा आढावा घ्यावा लागेल आणि त्यात डार्क पॅटर्न्स असल्यास त्यास दुरुस्त करावे लागेल. त्याचप्रमाणे, स्वयं-घोषणा करून अशा पद्धतींचा अभाव असल्याचे घोषित करण्याचेही प्रोत्साहन दिले आहे. हा सल्ला एक स्पष्ट संकेत देतो की सीसीपीए आता डिजिटल प्लॅटफॉर्म डिझाईन आणि ग्राहक संमती याबाबतीत अधिक सतर्क राहणार आहे. डार्क पॅटर्न्सचा वापर अनेकदा अनुचित व्यापारी प्रथा समजला जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की सर्वच डिझाईन सोल्यूशन्स बेकायदेशीर आहेत त्यामुळे प्रत्येक प्रकरणाचे बारकाईने मूल्यमापन आवश्यक आहे. जर एखाद्या प्लॅटफॉर्मने नियमांचे पालन केले असेल, तर स्वयंघोषणा करून आपली जबाबदारी व पारदर्शकता दाखवणे हे ग्राहकांचा व नियामकांचा विश्वास जिंकण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या कंपन्यांनीही प्रायव्हसी-बाय-डिझाईन आणि फेअरनेस-बाय-डिझाईन या मूल्यांशी सुसंगतपणे कार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक डिझाईन पॅटर्न बेकायदेशीर असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक घटकाचे बारकाईने विश्लेषण, आणि कायद्याच्या चौकटीत वापरकर्ता हक्कांची पूर्तता होते की नाही याचा विचार करणे आवश्यक आहे. सीसीपीएचा सल्ला हा अजूनपर्यंत दंडात्मक स्वरूपाचा नाही, पण तो एक नियमित अपेक्षा दर्शवतो की डिजिटल ग्राहक इंटरफेस हे पारदर्शक, न्याय्य आणि वापरकर्त्याच्या स्वायत्ततेचा आदर करणारे असावे. हे धोरण लवकर अंगीकारल्यास कंपन्या भविष्यातील नियामक जोखमीपासून सुरक्षित राहू शकतील, तसेच त्यांच्या विश्वासार्हतेत वृद्धी होईल. सध्या खालील रचनांना डार्क पॅटर्न्स असे वर्गीकृत केले आहे- ●खोटी तातडी (False Urgency)- "फक्त 2 मिनिटं बाकी!" असा संदेश दाखवून ग्राहकाला गोंधळात खरेदी करायला लावणे. ●खरेदीत अधिक वस्तू (Basket Sneaking)- खरेदी करताना नकळत अतिरिक्त वस्तू टालणे.चेक आउट दरम्यान न मागता सोबत इन्शुरन्स देणे. ●लज्जास्पद टीका (Confirm Shaming)- नकार देणाऱ्याला लाजवणारी भाषा वापरणे "माझं आयुष्य सुधारायचं नाही" असं बटन नकारासाठी ठेवणे ●अनावश्यक कृतीची सक्ती (Forced Action)- अनावश्यक कृती करण्यास भाग पाडणे. काही सेवा वापरण्याआधी मित्रांना आमंत्रण पाठवणे बंधनकारक करणे ●नोंदणी रद्द अवघड करणे (Subscription Trap)- सदस्यता रद्द करणे अवघड बनवणे. अनसबस्क्राईब करायला अनेक स्टेप्स किंवा असा पर्याय लपवून ठेवणे. ●पर्याय लपवणे (Interface Interference) वापरकर्त्याच्या लक्षात न येईल अशा प्रकारे पर्याय लपवणे रद्द किंवा नकार पर्याय छोटा किंवा फिका दाखवणे ●एक गोष्ट सांगून दुसरीच देणे (Bait and Switch)- एका गोष्टीचं आश्वासन देऊन दुसरं काही देणे. मोफत वापर सांगून नंतर कार्डवर शुल्क आकारणे ●किंमत लपवून अधिक आकार घेणे (Drip Pricing)- अंतिम किंमत लपवून ठेवणे आणि टप्प्याटप्प्याने उघड करणे. सुरुवातीला ₹499 दाखवणे पण नंतर ₹699 भरावे लागणे. (टॅक्स, डिलिव्हरी) ●छुपी जाहिरात (Disguised Advertisement)- जाहिरात ही माहिती वाटावी अशी सादर करणे,ब्लॉग लेखात प्रायोजित उत्पादनाचा छुपा प्रचार करणे. ●वारंवार विनंतीचा त्रास (Nagging)- नोटिफिकेशन परवानगी साठी सतत पॉपअप येणे ●गोंधळात टाकणारी भाषा (Trick Wording)- "Don't uncheck if you don’t want to opt out" अशा गुंतागुंतीच्या शब्दांची वापर ●माहिती लपवून कृती (Sneaking)- डिफॉल्ट चेक बॉक्स ठेवून ग्राहकाची नोंदणी करणे ●नोंदणी सोपी आणि रद्द अवघड (Roach Motel) -सोपी नोंदणी पण रद्द करणे अवघड, उदा. एक क्लिकने साइन अप पण अनसबस्क्राईब करणे गुंतागुंतीचे. असे प्रकार इ कॉमर्स मंचावर वस्तू आणि सेवा खरेदी करण्याच्या निमित्ताने होत असल्याने यात ग्राहकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी सावध राहावे. या संबंधातील आपल्या तक्रारी आस्की, सीसीपीए यांच्याकडे कराव्यात. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

Friday, 25 July 2025

दीपस्तंभ भाग दोन

#दीपस्तंभ_भाग_दोन यापूर्वीच्या भागात गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजारातील विचारवंत यांची थोडक्यात ओळख आणि विचार जाणून घेतले या भागात अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विचार करणारे काही विचारवंत यांची ओळख आणि विचार जाणून घेऊयात. ■अर्थशास्त्रज्ञ व वित्तविषयक विचारवंत 7. रिचर्ड थेलर (Richard Thaler) नोबेल पुरस्कार विजेते. ‘Behavioral Economics’ चे संस्थापक सदस्य. ‘Nudge’ या पुस्तकात त्यांनी मानवी मानसशास्त्र हे त्यांच्या गुंतवणुकीवर कसा प्रभाव टाकते ते स्पष्ट केले आहे. थेलर यांचे विचार- ●वर्तणूक अर्थशास्त्राचे गृहितक असे आहे की लोक पारंपरिक अर्थशास्त्र मानते त्यापेक्षा खूप कमी शहाणे असतात. ●कोणाला काही करायला प्रवृत्त करायचं असेल, तर ते आधी सोपं करा. ●आपण विचार करणाऱ्या भावना नाही तर भावना असलेले विचार करणारे यंत्र आहोत. ●लोक अल्पकालीन तोट्यांना अधिक महत्त्व देतात आणि दीर्घकालीन नफ्यांकडे दुर्लक्ष करतात. ●शेअरबाजार हा गोष्टी सांगणारे मशीन आहे. त्यातील कथा या भावनांपेक्षा जास्त किंमत ठरवतात. ●तोटा सहन करता येणे ही भावना, नफ्याच्या आनंदापेक्षा दुप्पट तीव्र असते. ●बचत ही कठीण असते कारण आपण फक्त आत्तावर लक्ष केंद्रित करतो, पुढचं विसरतो. ●एक चांगला हलका धक्का अथवा प्रोत्साहन म्हणजे असा पर्याय जो लोकांना त्यांचे निर्णय स्वातंत्र्य राखून चांगला निर्णय घेण्यास मदत करतो. ●फक्त अधिक माहिती देऊन लोकांचे अज्ञान दूर करता येत नाही. ●बाजार कितीही काळ असह्य वाटेल इतका गैरवर्तन करत राहू शकतो. 8. रॉन चर्नो (Ron Chernow) प्रसिद्ध इतिहासकार व चरित्रलेखक. J.P. Morgan, Rockefeller आणि Alexander Hamilton यांच्यावर चरित्रे लिहिली. भांडवलशाहीचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचे योगदान. चेर्नो यांचे विचार: ●वॉल स्ट्रीटचा इतिहास म्हणजे सट्टा आणि भ्रम यांची एक साखळी आहे. ●बाजार अनेकदा तर्काने नव्हे तर केवळ भावनांनी चालवले जातात. ●आर्थिक इतिहास हा अमेरिकन शिक्षणातील सर्वात दुर्लक्षित विषय आहे पण भांडवलशाही समजून घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ●प्रत्येक आर्थिक फुगवटा आनंदात सुरू होतो आणि नैराश्यात संपतो. ●वॉल स्ट्रीट हा केवळ आर्थिक आकड्यांचा नाही तर मानवी मानसिकतेचाही खेळ आहे. ●भांडवलशाही ही एकाच वेळी सर्जनशील आणि विध्वंसक असते. ●शेअरबाजार नेहमी अती आशावाद आणि अती निराशावाद यामध्ये वरखाली होत असतो. ●सर्वात वाईट आर्थिक संकटे तेव्हाच उद्भवतात, जेव्हा लोक म्हणतात यावेळी वेगळं आहे. ●महान संपत्ती केवळ मार्केटचे वेळेवर भाकीत करून नव्हे, तर जग बदलणाऱ्या कंपन्या उभ्या करून मिळवली जाते. ●सुज्ञ निर्णय घेणे आणि संयम बाळगणे वॉल स्ट्रीटवर धाडसापेक्षा दुर्मिळ आहे. 9. पॉल क्रुगमन (Paul Krugman) नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ आणि न्यूयॉर्क टाईम्सचे स्तंभलेखक. आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक भौगोलिक रचना आणि समाजवादी अर्थधोरणांचा समर्थक. त्यांचे विचार- ●बाजार व्यवस्था ही कायद्याच्या चौकटीत चालणारी सामाजिक सहकार्य आणि परस्पर फायद्यांची प्रणाली आहे. ●आर्थिक व्यवस्थेमध्ये आत्मविश्वास सर्व काही आहे. ●शेअरच्या किंमती वास्तवापेक्षा मानसिकतेने जास्त ठरवल्या जातात. ●अर्थशास्त्र म्हणजे नैतिकतेचा पाठ नाही. ते परिणाम आणि कारणांबद्दल आहे. ●आर्थिक बाजारात सुरक्षिततेचा आभास होणं सर्वात धोकादायक असतो. ●लोक सध्याची स्थिती भविष्यातही तशीच राहील असे गृहित धरतात त्यामुळेच बबल तयार होतात. ●अदृश्य हाताला अनेकदा भटकू नये म्हणून दृश्यमान हाताची गरज असते. ●तेजी आणि मंदी हे भांडवलशाहीचे भाग आहेत पण चुकीची धोरणं त्यांना अधिक वाईट बनवतात. ●जर गुंतवणूक इतकीच सोपी असती, तर सगळेच श्रीमंत झाले असते. ●अर्थशास्त्रज्ञांना खूप काही कळत नाही, पण ते इतरांना काहीच कसं कळत नाही असं वाटायला लावतात. ■विकास व समाजाभिमुख अर्थव्यवस्थेचे तज्ञ 10. चार्ली मंगर (Charles Munger) बर्कशायर हाथवेचे उपाध्यक्ष आणि वॉरेन बफे यांचे दीर्घकालीन भागीदार होते Mental Models आणि व्यवहारिक तर्कशास्त्र यांचा पुरस्कार करणारे गुंतवणूकदार. संयम, सुलभता आणि उलट सुलट तपासणी या तत्त्वांचा पुरस्कार. त्यांचे विचार- ●मोठा पैसा केवळ खरेदी किंवा विक्रीत नसतो तर तो थांबण्यात असतो. ●प्रत्येक दिवस आपण कालपेक्षा थोडं अधिक शहाणं व्हावं, हे प्रयत्न करत रहा. ●प्रत्येक समस्या उलट करून पहा. उलटा विचार करा. ●फार मोठा फायदा आपण फक्त एक गोष्ट करून मिळवतो तो म्हणजे मूर्खपणा. ●योग्य किमतीला चांगली कंपनी घेणं, उत्तम किमतीत साधारण कंपनी घेण्यापेक्षा केव्हाही चांगलं. ●शहाणा माणूस नेहमी अदृश्य गोष्टी शोधतो, स्पष्ट दिसणाऱ्या नव्हे. ●जे तुम्हाला माहीत नाही, ते स्वीकारणं ही खऱ्या शहाणपणाची सुरुवात आहे. ●आज जगात जे काही चाललं आहे ते जर तुम्हाला गोंधळात टाकत नसेल याचा अर्थ तुम्ही त्याला समजून घेत नाही. ●झुंडीचा पाठपुरावा केला, तर तुम्ही नेहमीच सरासरीकडे परतता. ●एक साधी कल्पना घ्या आणि ती गंभीरतेने अमलात आणा. 11. अभिजीत बॅनर्जी (Abhijit Banerjee) MIT मधील प्राध्यापक आणि नोबेल पुरस्कार विजेते. ‘Poor Economics’ या पुस्तकाचे सहलेखक. विकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी ‘Randomized Control Trials’ वापरणारे पहिले अर्थशास्त्रज्ञ. त्यांचे विचार- ●विकास म्हणजे मोठे आराखडे नव्हेत, तर एकावेळी एक समस्या सोडवणं. ●बाजार अनेक वेळा अपयशी ठरतो. म्हणूनच सरकारांनी हस्तक्षेप करावा लागतो. ●गरीब असहाय नसतात. ते अत्यंत काटेकोर निर्णय घेतात. ●सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही कल्पना नक्कीच चाचपून पाहण्यासारखी आहे. ●अर्थशास्त्रीय मॉडेल्स नेहमी माणसांच्या वर्तनाचं अचूक चित्रण करत नाहीत. ●दारिद्र्याशी लढण्यासाठी मतप्रवाह नव्हे, प्रयोग आणि पुरावे लागतात. ●छोट्या बदलांमुळे मोठी परिणामकारकता येऊ शकते. ●आपल्याला दारिद्र्याचं गौरवीकरण थांबवून, गरीब लोकांचे म्हणणे ऐकायला हवे. ●प्रेरणा (incentives) महत्त्वाच्या आहेत, पण संदर्भ (context) त्याहून महत्त्वाचा आहे. ●फक्त आर्थिक वाढीने विषमता नाहीशी होत नाही. 12. मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते. मायक्रोफायनान्स व "Social Business" या संकल्पनांचा प्रचार केला. गरीबांना आर्थिक सशक्तता देण्याचे कार्य केले. सध्या बंगला देशाचे हंगामी अध्यक्ष. त्यांचे विचार- ●गरीब माणसं म्हणजे बोन्साय वृक्षासारखी आहेत. बीज चांगलं असतं, पण समाजाने त्यांना वाढण्यासाठी जागा दिली नाही. ●कर्ज (क्रेडिट) मिळणं हा मानवी हक्क आहे. ●जर प्रत्यक्षात आणण्याची इच्छा असेल तर जगात गरिबी नसलेली व्यवस्था आपण सहज तयार करू शकतो. ●दान हे गरिबीचे उत्तर नाही. दान केवळ गरिबी टिकवून ठेवतं. ●पैसे कमवणं म्हणजे आनंद तर इतरांना आनंद देणं म्हणजे त्याहून श्रेष्ठ आनंद. ●आपल्यापैकी प्रत्येकात अपार क्षमता आहे. मायक्रोक्रेडिट त्या क्षमतेला मोकळं करतं. ●सामाजिक व्यवसाय म्हणजे नफ्याचा विचार न करता समस्या सोडवणं. ●गरिबी लोकांनी निर्माण केली नाही तर ती आपण बनवलेल्या व्यवस्थेमुळे निर्माण झाली आहे. ●अर्थव्यवस्था ही लोकांसाठी असावी, लोकं अर्थव्यवस्थेसाठी नाहीत. ●तुम्ही जर वेगळी कल्पना करू शकत असाल तर ती शक्य देखील करू शकता. (समाप्त) ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायतीचे या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

Friday, 18 July 2025

दीपस्तंभ भाग एक

दीपस्तंभ_भाग_एक अर्थशास्त्रात गुंतवणुकीचा अभ्यास करताना गुंतवणूक तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विकास व्यवस्थेचा विचार करणारे म्हणून अनेक मार्गदर्शकांची नावे पुढे येतात. त्यातील निवडक व्यक्तींचा आणि त्या प्रत्येकाचा त्यांच्या विषयावरील मौलिक विचारांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा हा प्रयत्न. त्यांचे विचार आपल्याला नक्कीच दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतील आणि प्रेरणा देतील. ■गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजार विचारवंत 1. वॉरेन बफे (Warren Buffett) बर्कशायर हाथवे या अमेरिकन गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष (या वर्षअखेर या पदावरून ते निवृत्त होत आहेत), गुंतवणुकीचे चालते बोलते विद्यापीठ आणि ‘ओरेकल ऑफ ओमाहा’ या टोपणनावाने प्रसिद्ध. दीर्घकालीन मूल्याधारित गुंतवणुकीचे समर्थक आहेत. मजबूत पायाभूत तत्त्वांवर चालणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक करण्यावर त्यांचा भर असतो. बफे यांचे विचार- ●इतर लोक अधिक फायदा होईल या लोभाने शेअर्स खरेदी करत असतील तेव्हा घाबरून विक्री करा आणि जेव्हा सगळे घाबरून विक्री करीत असतील, तेव्हा खरेदी करा. ●शेअर बाजाराची रचना ही सक्रिय गुंतवणूकदारांकडून संयमी गुंतवणूकदारांकडे पैसा हस्तांतरित करण्यासाठी केली आहे. ● तुम्ही खरेदीसाठी देता ती किंमत आणि विक्री करून मिळवता ते मूल्य. ●शेअर कायमस्वरूपी ठेवायला आवडतात. ●ज्या कंपनीत गुंतवणूक केल्यावर पुढची दहा वर्षे बाजार बंद राहिला तरी चालेल, अशाच कंपनीत पैसे गुंतवा. ●जेव्हा तुम्हाला तुम्ही काय करत आहात हे समजत नाही तेव्हा सर्वाधिक धोका उद्भवतो. ●शेअरबाजातील चालू भाव बाजारातील लोकांचे कंपनी विषयी मत दाखवत असले तरी ते कंपनीचे दीर्घकालीन मार्केट मूल्य मोजण्याचे यंत्र आहे. ●संधी क्वचित येतात. जेव्हा सुवर्णधारा वाहते, तेव्हा त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ●जेव्हा बाजारभाव खाली येतात, तेव्हाच भांडवल वापरण्याची सर्वोत्तम संधी असते. ●योग्य किमतीत चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं, स्वस्तात वाईट कंपनीचे शेअर्स घेण्यापेक्षा नेहमीच चांगलं. 2. पीटर लिंच (Peter Lynch) फिडेलिटी मॅजेलन फंडचे माजी व्यवस्थापक. त्यांनी शेअर बाजारात सातत्याने सर्वोत्कृष्ट परतावा मिळवलेला आहे. लिंच “तुम्हाला जे समजते त्यातच गुंतवणूक करा” या तत्त्वाचा पुरस्कार करतात. त्यांचे विचार- ●तुमच्याकडे जे आहे त्याबद्दलची माहिती ठेवा त्याचबरोबर ते का आहे, हेही समजून घ्या. ●प्रत्येक शेअरमागे एक कंपनी म्हणजे व्यवसाय असतो. ती कंपनी नेमका काय व्यवसाय करते ते शोधा. ●शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याची खरी गुरुकिल्ली म्हणजे घाबरून सर्व शेअर्स विकून टाकू नका. ●ज्याने सर्वात जास्त दगड पलटले, तोच जिंकतो. ●ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्यामध्येच गुंतवणूक करा. ●मंदी येणारच त्यामुळे शेअर बाजार कोसळणार. हे मान्य नसेल, तर त्याचा अर्थ गुंतवणुकीसाठी तुम्ही तयार नाही असा होतो. ●बाजारभाव खाली येण्याची वाट बघून किंवा त्या संबंधी अंदाज बांधून जेवढं नुकसान होतं ते प्रत्यक्षात खाली आलेल्या भावामुळे झालेल्या नुकसानीपेक्षा अधिक असतं. ●बाजारभाव वाढल्याने चांगले शेअर्स विकून वाईट शेअर्स ठेवणं म्हणजे बहरलेली फुलझाडं कापून टाकून आणि गवतावर पाणी वाया घालवणं. ●जेव्हा तुमच्याकडे भक्कम कंपन्यांचे शेअर्स असतात, तेव्हा काळ तुमच्या बाजूने असतो. ●अधिक गुंतागुंत नको, जितकं साध आणि सरळ तितकं चांगलं. 3. बेंजामिन ग्रॅहम (Benjamin Graham) मूल्याधारीत गुंतवणूक (व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग) या संकल्पनेचे जनक. ‘The Intelligent Investor’ या पुस्तकाचे लेखक आणि वॉरेन बफे यांचे गुरू. त्यांनी ‘Margin of Safety’ या संकल्पनेचा पुरस्कार केला. ग्रॅहम यांचे विचार- ●वैयक्तिक गुंतवणूकदाराने कायमच गुंतवणूकदारासारखेच वागावे, सट्टेबाजासारखे नाही. ●थोडक्यात शेअरबाजार हा मतदान मशीनसारखा असतो, पण दीर्घकालात तो वजन मोजणारे यंत्र बनतो. ●गुंतवणुक व्यवस्थापन म्हणजे त्यातील परताव्याचे नाही तर जोखमीचे व्यवस्थापन. ●बुद्धिमान गुंतवणूकदार हा वास्तववादी असतो. तो आशावाद्यांना शेअर्स विकतो आणि निराश व्यक्तीकडून शेअर्स खरेदी करीत असतो.. ●गुंतवणूकदाराचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तो स्वतःच. ●सर्वोत्तम गुंतवणूक ही केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातूनच केली जाते. ●समाधानकारक गुंतवणूक परतावा मिळवणे खूप सोपे आहे परंतु उत्कृष्ट परतावा मिळवणे सर्वात कठीण गोष्ट आहे. ●तुम्ही जेव्हा सट्टा खेळत असता तेव्हा ती गुंतवणूक आहे असे समजून स्वतःला फसवू नका. ●आशावादावर नव्हे, आकड्यांवर आधारित खरेदी करा. ●बुद्धिमान गुंतवणूकदार संशयी असतो तो केवळ आणि केवळ वाजवी किमतीतच खरेदी करतो. 4. फिलिप फिशर (Philip Fisher) वाढीवर आधारित गुंतवणुकीचे प्रवर्तक. ‘Common Stocks and Uncommon Profits’ या पुस्तकाचे लेखक. नाविन्यपूर्ण संशोधन आणि दीर्घकालीन दृष्टी असलेल्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचे समर्थक. फिशर यांचे विचार- ●शेअरबाजार अशा लोकांनी भरलेला आहे जिथे सर्वाना मूल्य नाही तर किंमत माहित असते म्हणूनच गुंतवणूक करताना किंमतीवर नाही, तर मूल्यावर लक्ष केंद्रित करा. ●संयमी गुंतवणूकदार गाढ झोपतो. सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूकीतून मनःशांती मिळते. ●जो गुंतवणूकदार स्वतंत्रपणे विचार करू शकतो, तो नफा मिळवू शकतो. ●जर शेअर खरेदी करताना व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर तो विकण्याची वेळ कधीच येत नाही. उत्तम कंपन्या या नेहमी दीर्घकाळासाठी ठेवायच्या असतात. ●यशस्वी गुंतवणूकदार हा तोच असतो ज्याला व्यवसायातील समस्यामध्ये स्वाभाविक रस असतो. शेअरमागे असलेल्या व्यवसायास नीट समजून घ्या. ●युद्धाच्या भीतीमुळे खरेदी करण्यास घाबरू नका. संकटकाळातच सर्वोत्तम संधी उपलब्ध असू शकतात. ●ज्याचं संशोधन सर्वात उत्तम आहे, ती कंपनीच शेवटी आघाडीवर राहते. नाविन्यपूर्ण कंपन्यांमध्ये गुंतवा. ● जास्त पैसे मोजून खरेदी केल्याने एक उत्कृष्ट कंपनीत केलेली गुंतवणूक देखील सर्वात वाईट गुंतवणूक ठरते म्हणून मोजलेली किंमतही तितकीच महत्त्वाची आहे. ●मोठे गुंतवणूकदार कंपनीच्या भूतकाळाकडे नव्हे, भविष्यातील क्षमतेकडे पहातात. ●कालावधी हा व्यवसायाचा जिवलग मित्र असतो. चांगल्या कंपन्यांना वेळ द्या, त्याचा नफा वाढत जातो. 5. जॉन सी. बोगल (John C. Bogle) व्हॅनगार्ड ग्रुपचे संस्थापक. त्यांनी पहिला लो-कॉस्ट इंडेक्स फंड सुरू केला. अप्रत्यक्ष (Passive investing) आणि कमी खर्च असलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर. बोगल यांचे विचार- ●गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्याचा प्रयत्न करू नका, संपूर्ण ढिगाराच खरेदी करा. एकेका कंपनीऐवजी संपूर्ण बाजारात एकत्रित गुंतवणूक (इंडेक्स फंड) करा. ●शेअर बाजार हे गुंतवणुकीपासून तुमचे लक्ष विचलित करणारे मोठे साधन आहे. रोजच्या हालचालींकडे न पाहता, दीर्घकालीन दृष्टी ठेवा. ●वेळ हा तुमचा मित्र आहे आणि तीव्र भावना (इम्पल्स) तुमचा शत्रू. त्यामुळे संयम बाळगा, भावनांवर नियंत्रण ठेवा. ●व्यवस्थापक जितका जास्त मोबदला घेतात, गुंतवणूकदार तितकं कमी कमावतो. जास्त खर्च म्हणजे गुंतवणूकीवरील कमी परतावा. ●जे काही होईल ते होईलच म्हणून आपला गुंतवणुकीचा मार्ग बदलू नका. नेहमी शिस्तीत राहणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. ●तुम्हाला शेअर बाजारात २०% तोटा होण्याची शक्यता सहन होत नसेल, तर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका बाजारातील तीव्र चढ उतार सहन करण्याची मनाची तयारी ठेवा. ●शेअरबाजारातील एक सखोल नियम म्हणजे सरासरीकडे परतणं त्यामुळे बेफाम वाढ झाल्यावर शेअर पुन्हा स्थिर मूल्यावर येतोच येतो. ●इक्विटी फंड गुंतवणूकदाराचे दोन मोठे शत्रू म्हणजे खर्च आणि भावना त्यांना नियंत्रणात ठेवा. ●इंडेक्स फंड तुम्हाला वैयक्तिक शेअर्सची निवड, योग्य वेळ पकडण्याची आणि व्यवस्थापक निवडीची जोखीम टाळतात त्यातील साधेपणातच यश आहे. ●गुंतवणुकीत तुम्हाला जे मिळतं ते सहसा त्या गोष्टींपासून मिळतं, ज्या तुम्ही पैसे न देता घेता, कमी खर्च म्हणजे जास्त परतावा. 6. रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) ‘Rich Dad Poor Dad’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक. त्यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रचार केला आणि लोकांनी पैशासाठी काम न करता पैसे आपल्यासाठी कसे काम करतात ही संकल्पना समजावून देण्यावर त्यांचा भर आहे. कियोसाकी यांचे विचार- ●श्रीमंत लोक पैसे मिळवण्यासाठी काम करत नाहीत. ते पैशांना आपल्यासाठी काम करायला लावतात. ●तुम्ही किती पैसे कमावता ते महत्त्वाचे नाही तुम्ही ते किती आणि कसे टिकवता हे महत्त्वाचे आहे. ●आर्थिक स्वातंत्र्य केवळ त्या लोकांसाठी उपलब्ध आहे जे त्याचा अभ्यास करतात आणि त्यासाठी प्रचंड मेहनत करतात. ●यशस्वी गुंतवणूकदार सगळं जाणणारे नाही तर शिकत राहणारे असतात. ●ज्या गोष्टी समजत नाहीत त्यात गुंतवणूक करू नका, आधी शिकून घ्या. ●शेअर बाजार हा संयमी व्यक्तीकडे पैसा हस्तांतरित करणारे यंत्र आहे. ●आजच्या बदलत्या जगात, तुम्हाला काय येतं यापेक्षा तुम्ही ते किती लवकर शिकता,हे अधिक महत्त्वाचं आहे. ●अपयश आल्यावर हार मानणारे हरतात तर वारंवार अपयशावर अपयश येऊनही न हार मानणारेच जिंकतात. ●आपल्याकडे असलेली सर्वात शक्तिशाली मालमत्ता म्हणजे आपला मेंदू. ●तुम्ही फक्त तेव्हाच गरीब होता, जेव्हा तुम्ही हार मानता म्हणूनच शिकणं कधीही थांबवू नका. (अपूर्ण) ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)