Friday, 6 September 2024
यूपीआय_साथमें_तो_दुनिया_मेरी_हाथोमें.....
#यूपीआय_साथमें_तो_दुनिया_मेरी_हाथोमें….……
आजकाल अगदी रस्त्याच्या कडेला फुलांची विक्री करणाऱ्या हातगाडीवरील विक्रेत्याकडे मोबाईल आणि यूपीआय पेमेंटची सोय असते. भारतात अतिशय अल्प दरात उपलब्ध मोबाइलसेवा आणि इंटरनेट यामुळे संपर्कक्षेत्रात जशी क्रांती झाली अगदी तशीच खळबळ माजवून यूनिफाईड पेमेंट इंटरफेसने (UPI) आर्थिक क्षेत्रांत क्रांती घडवून आणली आहे. यामुळे एकाधिक बँक खात्यांना एकाच मोबाईल अँपलिकेशनमध्ये आणून पैशांच्या देवाण घेवाणीचे व्यवहार करता येतात. व्यापारी पेमेंट करता येते संकलन विनंती करता येते, ही विनंती शेड्युल करून आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार करता येते. 11 एप्रिल 2016 रोजी नॅशनल पेमेंट क्लिअरिंग कॉर्पोरेशनने रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर डॉ रघुराम राजन यांच्या हस्ते या सेवेचे प्रायोगिक तत्वावर उद्घाटन करून 21 सदस्य बँकांच्या साहाय्याने ही प्रणाली सुरू केली. बँकांनी 25 ऑगस्ट 2016 पासून प्ले स्टोर, अँप स्टोअर्सवर अँड्रॉईड आणि आयओएसवर चालणारी यूपीआय सक्षम अँप्स उपलब्ध करून दिली.
या प्रणालीची वैशिष्ट्ये-
●तात्काळ देवाणघेवाण
●वेगवेगळ्या बँकांसाठी एकच अँपची गरज
●कोणत्याही वैयक्तिक माहितीशिवाय आभासी पत्याद्वारे व्यवहार शक्य उदा. abc@*****
●इन अँप पेमेंटसह व्यापारी पेमेंट
●वीज, गॅस, लाईट, मोबाईल रिचार्ज, गुंतवणूक, डीटीएच केबल बिल, फास्टट्रॅक रिचार्ज, क्रेडिट कार्ड यासारख्या सेवांची बिले अथवा त्यांचा वापर करण्यासाठीचे पेमेंट गुंतवणूक करता येणे शक्य.
●बँकेने दिलेली क्रेडिट लाईन सुविधा तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड याद्वारे व्यवहार करता येणे शक्य
●बँक खात्याची शिल्लख पाहणे
●ओटीसी काउंटर पेमेंट, क्यू आर कोड म्हणजे स्कॅन अँड पे सारखे व्यवहार करता येणे शक्य
उदा हॉटेलमध्ये जेवल्यावर काउंटरवर कॅशियरकडे किंवा पेट्रोल भरल्यावर पेट्रोलचे पैसे देणं
●देणगी, संकलन म्हणजे पेमेंट घेणं तर वितरण म्हणजे पेमेंट करता येणे शक्य
यूपीआय मधील सहभागी घटक-
●पैसे देणारा आणि घेणारा
●पैसे पाठवणारी आणि लाभार्थी बँक
●एनपीसीआय (पैसे समायोजन करणारी संस्था)
●व्यापारी
कोविड महामारीमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने ही पद्धत उपयोगी ठरली आणि त्यातील सोई पाहून बहुतेक लोकांनी ही पद्धत स्वीकारली असून आता सर्वाधिक व्यवहार हे यूपीआय द्वारे होतात. जुलै 2024 रोजी 206 लाख कोटीहून अधिक रकमेचे 144 लाख कोटींहून अधिक व्यवहार यूपीआय द्वारे केले गेले असून ते एकूण व्यवहाराच्या 60% हून अधिक आहेत. पारंपरिक रोख व्यवहारापासून दूर जाण्याचा ग्राहकांचा कल, अँपमधील मूल्यवर्धित सोई, तृतीय पक्षी अँपची वाढती संख्या लक्षात घेता येत्या पाच वर्षात हे प्रमाण 90% हून अधिक असण्याची शक्यता आहे.
भविष्यात रोज 100 कोटींहून अधिक व्यवहार यूपीआयद्वारे होतील.
यूपीआयवर आधारित लोकप्रिय अँप्स आणि त्यांची वैशिष्ट्ये-
★फोन पे : सन 2015 रोजी सुरू झालेले हे अँप पूर्वी डिजिटल वॉलेट होते. आता यूपीआय अँप चे सर्व कार्य करीत आहे.
*सर्वाधिक लोकप्रिय अँप
*बाजार सहभाग 50%
*अकरा भाषांत उपलब्ध
★भीम : कागद विरहित अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून सरकारद्वारा उपलब्ध करून देण्यात आलेले NCPI द्वारे विकसित करण्यात आलेले अँप.
*20 भाषांत उपलब्ध
★पेटीएम : छोट्या व्यापाऱ्यांत लोकप्रिय अँप अलीकडे याचा बाजार हिस्सा कमी झाला आहे.
*जलद व्यवहार
★गुगल पे : गुगलद्वारे समर्थीत दुसरे सर्वाधिक लोकप्रिय विश्वसनीय आणि विश्वासार्ह अँप
*झटपट व्यवहार
*आकर्षक बक्षिसे
*विशेष ऑफर्सची रेलचेल
★अक्ष पे आणि फ्री चार्ज : ही दोन्ही ऍप्स अँक्सिस बॅंकेकडून उपलब्ध यासाठी सदर बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही.
★क्रेड : या अँपमध्ये बिलाची विभागणी करून बिल भरता येते.
*100% कॅशबॅक मिळण्याची विविध बक्षिसे जिंकण्याची शक्यता.
★आय मोबाईल : आयसीआयसीआय बॅंकेकडून सादर,
*आयसीआयसीआय बँकेत खाते नसले चालते
*400 हून अधिक सुविधा अँपद्वारे उपलब्ध
★पे झ्याप : एचडीएफसी बँकेकडून उपलब्ध
*व्हर्चुअल व्हिसा डेबिट कार्डासह उपलब्ध
★पॉकेट :आयसीआयसीआय बँकेद्वारे उपलब्ध
*डिजिटल वॉलेट म्हणून वापरता येते.
*फिजिकल कार्डासह व्हर्चुअल डेबिट कार्डासह वापरता येते.
*फिजिकल कार्ड पाहिजे असल्यास मिळवता येते.
*ऑडीओद्वारे संपर्करहित वापर करता येतो.
यूपीआयवर आधारित अँप्स ही ग्राहकस्नेही असून ती डाउनलोड करणे कार्यान्वित करणे अगदीच सोपे आहे. त्यास सरकारी पाठबळ ही आहे. ती सुरक्षित आहेत, यात काही समस्या असल्यास त्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून सोडवता येतील. यात काही किरकोळ गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत त्यावर मात करण्याचे उपायही आहेत. याप्रमाणे त्यांचा वापर केल्यास आपल्याला त्यांचा उपयोगच होतो. यासाठी आपल्याकडून कोणतेही शुल्क सध्यातरी घेतले जात नाही. हे शुल्क मुळातच खुप नगण्य असून ते व्यावसायिकांकडून घेतले जाते. त्यांचा व्यवसाय वाढत असल्याने सर्वच व्यावसायिकांनी या सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार यातून मिळणाऱ्या सेवांमध्ये सातत्याने वाढ होत असते. काही अँप्सवर आपण तोंडी सूचना देऊ शकतो. आज खरेदी करा उद्या पैसे द्या किंवा हप्त्याने पैसे द्या, कर्ज मिळणे, नवे खाते उघडणे, आपल्या घरातील अतिवृद्ध व्यक्ती बँक खात्याशी संलग्न न होता मर्यादित रक्कम खर्च करू शकतील अशी सुविधा पुरवणे, मुलांच्या पॉकेटमनीसाठी याचा वापर करता येईल, अन्य स्मार्ट उपकरणात ही सेवा वापरता येईल अशा सुधारणा यात होत आहेत किंवा अपेक्षित आहेत. तेव्हा त्यांचा वापर करणे आपण टाळू शकणार नाही. “यूपीआय साथमे, तो दुनिया मेरी हाथोमें”…. .ही टॅगलाईन त्यांना लागू पडते.
यूपीआय पेमेंट अँप्स विषयीचे सर्वसामान्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे-
प्रश्न- सर्वोत्तम यूपीआय अँप कोणते?
उत्तर: फोन पे, गुगल पे, भीम, पेटीएम हे विश्वासार्ह असल्याने त्यांचा सर्वाधिक वापर केला जातो.
प्रश्न- यूपीआयसाठी सर्वोत्तम बँक कोणती?
उत्तर: एचडीएफसी बँक ही त्याच्या डेबिट रिव्हर्सल दरातील यशामुळे लोकप्रिय आहे.
प्रश्न- आपण एकाहून अधिक यूपीआय अँप वापरू शकतो का?
उत्तर: हो प्रत्येक अँपचे कमी अधिक वैशिष्ट्य असल्याने आपण सोईनुसार एकाहून अधिक अँप वापरू शकतो.
प्रश्न: RuPay ची मालकी कोणाकडे आहे.
उत्तर:-ही NPCI ची निर्मिती असून पूर्णपणे स्वदेशी आहे.
प्रश्न-यूपीआय व्यवहार मर्यादा किती आहे?
उत्तर:रोज एक लाख अलीकडे काही सेवा जसे की हॉस्पिटल, कर भरणा, शैक्षणिक संस्थाना पेमेंट करण्यासाठी ही मर्यादा अलीकडेच पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
प्रश्न- विशिष्ट यूपीआय अँपची मक्तेदारी भविष्यात होऊ शकते का?
उत्तर: सध्या फोनपे, गुगलपे आणि काही प्रमाणात पेटीएम यांनी मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. अनेक ग्राहकांना उपयुक्त अशी अँप बाजारात येत असून कोणत्याही एका अँपने 30% हुन अधिक बाजारपेठ काबीज करू नये असे NCPI चे धोरण असून त्याची टप्याटप्याने अंबलबजावणी करण्यात येत आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखातील मते वैयक्तिक असून तो कोणत्याही यूपीआय अँपची शिफारस करीत नाही.)
6 सप्टेंबर 2024 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment