Friday, 16 August 2024

फ्रंट रनिंग आणि इनसायडर ट्रेडिंग

#फ्रंट_रनिंग_आणि_इनसाईडर_ट्रेडिंग क्वांट म्युच्युअल फंड हा मागील तीन वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणारा अलीकडील काही वर्षांपूर्वी उदयास आलेला म्युच्युअल फंड आहे. जानेवारी 2020 मध्ये त्याच्याकडे असलेली मालमत्ता 258 कोटी रुपये होती. सध्या त्याच्याकडून 27 योजना चालवल्या जात असून त्यातील 21 योजना शेअर्सशी संबंधित आहेत. फंडाकडे असलेली एकूण मालमत्ता जून 2024 मध्ये ती 90000 कोटींहून अधिक आहे. त्याच्या मालमत्तेत झालेली वाढ आणि त्यावर मिळवलेला परतावा अचंभीत करणारा आहे. साहजिकच सर्व गुंतवणूकदारांच्या नजरेत हे उत्कृष्ट फंड हाऊस आहे. त्यांच्या मुंबई आणि हैदराबाद येथील कार्यालयावर फ्रंट रनिंगच्या संशयावरून सेबीने धाडी टाकल्या या धाडी सेबीच्या नियमित तपासणीचा भाग नसून न्यायालयाच्या पूर्वपरवानगी मिळवून टाकण्यात आल्या. यापूर्वी अँक्सिस म्युच्युअल फंडावर फ्रंट रनिंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. त्याची चौकशी पूर्ण होऊन अँक्सिस फंडाचे माजी मुख्य डीलर विरेश जोशी आणि अन्य वीस जणांवर भांडवल बाजारात व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली. फंडाकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खरेदी विक्री निर्णयामुळे बाजारभावावर प्रभाव पाडू शकणाऱ्या माहितीचा ब्रोकर्स, डीलर्स या सारख्या मार्केट मध्यस्थाकडून दुरूपयोग करून त्यातून स्वतःनफा मिळवण्याची ही पद्धती आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यास फ्रंट रनिंग असे म्हटले जाते म्हणजे जे शेअर्स खरेदी केले जाणार असतील त्यांची ऑर्डर पडण्यापूर्वी काही सेकंद आधी भरपूर खरेदी करायची त्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने शेअर्सचे भाव वाढतील. या भावाने फंड शेअर खरेदी करणार असेल तेव्हा आपल्याकडील शेअर्स वाढीव भावाने फंड हाऊसला विकायचे किंवा फंड हाऊसने विक्री करायचे ठरवलेले शेअर्सची मोठ्या प्रमाणात आधीच विक्री केल्याने भाव खाली येतील यानंतर फंड हाऊसकडून कमी दरात विक्री झाली की त्या दराने खरेदी करून आपली पोझिशन स्क्वेअर अप करायची. या सर्व व्यवहारात गुंतवणूक केलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खरेदी विक्रीचा म्हणजेच खरेदी जास्त दराने आणि विक्री कमी दराने करावी लागते. त्यांना योग्य दर न मिळाल्याने त्याचे अप्रत्यक्षपणे नुकसान होते. लोकांचा म्युच्युअल फंड योजनांवरील विश्वासास तडा जातो फंड हाऊसचे नुकसान होते. त्यामुळेच असे व्यवहार करण्यास बंदी आहे. फ्रंट रनिंग व्यवहार वाढल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डीलर्स आणि फंड मॅनेजर यांच्यातील संभाषण रेकॉर्ड केले जाते. मोठ्या फंड त्यांची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यास सेबीने आदेश दिले आहेत याशिवाय म्युच्युअल फंडाची स्वनियंत्रण संघटना अँफी यांनीही फंड हाऊसकडून खरेदी विक्रीची ऑर्डर देण्याची विशिष्ट सर्वमान्य पद्धत (SOP) तयार करण्याचे सुचवले आहे. फ्रंट रनिंग कसे काम करते? म्युच्युअल फंडाकडून शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदीविक्री केली जाते ही ऑर्डर्स ठराविकच ब्रोकर्स/ डीलर्सना यांच्याकडे येत असल्याने त्यांना ही बातमी आधी माहिती असते. बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी झाली तर पुरवठा कमी पडल्याने त्या शेअर्सचा भाव वाढतो याउलट विक्री झाल्यास पुरवठा वाढल्याने शेअर्सचे भाव खाली येतात. दरम्यात आलेली ऑर्डर टाकण्यापूर्वी मिनिटभर आधी ते आपल्या ऑर्डर्स टाकून ठेवतात म्हणजे खरेदीची ऑर्डर असेल तर स्वतःची खरेदी ऑर्डर आधी टाकून कन्फर्म करायची आणि नंतर फंड हाऊसची ऑर्डर टाकयची, त्याचा प्रभाव पडून भाव वाढल्यावर आपण खरेदी केलेले शेअर्स विकून पोझिशन रिव्हर्स करायची आणि नफा खिशात टाकायचा. जेव्हा फंड हाऊसकडून विक्रीची ऑर्डर असेल तेव्हा ही ऑर्डर टाकण्यापूर्वी स्वतःची शॉर्टसेल म्हणजेच विक्रीची ऑर्डर टाकून म्युच्युअल फंडची विक्री ऑर्डर टाकायची त्याचा परिणाम म्हणून भाव खाली आल्यावर खरेदी करून आपली पोझिशन स्क्वेअरअप करायची. कोणत्याही अंतर्गत माहितीचा स्वतःच्या फायद्यासाठी असा वापर करणे यास इनसायडर ट्रेडिंग म्हणतात हा शब्दही आपल्या कानावर आला असेल. यामुळे लोकांचा बाजारावरील विश्वास कमी होतो त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांची मागणी कमी होऊ शकते, जे अंतिमतः या व्यवसायासाठी हानिकारक आहे. इनसायडर ट्रेडिंगपेक्षा फ्रंट रनिंग वेगळे कसे? फ्रंट रनिंग करणाऱ्यास फंड हाऊसकडून कोणत्या शेअर्सची खरेदी विक्री केली जाईल एवढीच माहिती असते. त्याला कंपनी संदर्भात अन्य कोणत्याही गोष्टीची माहिती नसते. कंपनीच्या संबंधातील मुख्य निर्णय घेणाऱ्या व्यक्ती, संचालक, कच्या मालाचे पुरवठादार, मुख्य विक्रेते यांना काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी आधीच माहिती असते. या माहितीत शेअर्सच्या बाजारभावावर परिमाण करू शकणाऱ्या अनेक बाबींचा समावेश होईल- ●कंपनीच्या नफ्यामध्ये झालेली वाढ किंवा घट. ●कंपनीचे दुसऱ्या कंपनीत होऊ घातलेले विलीनीकरण. ●कंपनी दुसरी कंपनी ताब्यात घेत असण्याचे प्रयत्न. ●व्यवसाय विस्तारीकरण योजना. ●कंपनी घेत असलेले मोठे कर्ज त्यासाठी उपलब्ध करून दिलेले तारण. ●तारण विरहित कर्जाची उभारणी. ●परकीय भांडवली गुंतवणूक. ●असलेला व्यवसाय बंद करून नवीन व्यवसाय सुरू करण्याचे प्रयत्न. ●बोनस, राईटस, डिव्हिडंड देणे, शेअर्सचे विभाजन करणे यासारखे कॉर्पोरेट इव्हेंट. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या गोष्टी जेव्हा कंपनी जाहीर करेल तेव्हाच माहिती होते. यातील काही गोष्टी ताबडतोब जाहीर करणे कायद्यानुसार आवश्यक आहे त्यास भागधारकांची मान्यता मिळवणे आवश्यक असते. अशी माहिती जाहीर करण्यापूर्वीच्या काळात या माहितीचा बाजारभावावर काय प्रभाव पडेल याचा विचार करून स्वतः, नातेवाईक, मित्रमंडळ किंवा दुसऱ्याच्या नावे गुंतवणूक करून लाभ मिळवणे यास इनसायडर ट्रेडिंग असे म्हटले जाते. फ्रंट रनिंगचा गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम- फ्रंट रनिंग कसे केले जाते आणि मध्यस्थांकडून अल्प मुदतीत अल्प भांडवलात मोठा नफा कसा मिळवला जातो ते आपण पाहिले. हे टाळले असते फंड हाऊसला अधिक योग्य भाव मिळाला असता ही गुंतवणूक सर्वसामान्य गुंतवणूकदारांची असल्याने त्यांना योग्य नफा मिळत नाही त्यामुळे ते गुंतवणूक करीत राहण्याची शक्यता कमी होते गुंतवणूकदारच नसतील तर योग्य भाव बाजार शोधू शकणार नाही. बाजारात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती ते अल्प, मध्यम, दीर्घ गुंतवणूकदार असोत, जुगारी असोत, डे ट्रेडर्स किंवा डिरिव्हेटिवमध्ये व्यवहार करणारे असोत हे सर्वजण व्यवहार करीत असल्याने बाजार सातत्याने हलता राहतो त्यातून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याच्या विविध संधी प्राप्त होतात. फ्रंट रनिंग आणि इनसायडर ट्रेडिंगमुळे त्यास बाधा पोहोचते. इतर देशातील गुंतवणूकदार आणि भारतीय गुंतवणूकदार यातील महत्वाचा फरक म्हणजे येथील प्रत्यक्ष गुंतवणूक ही शेअरबाजारात थेट गुंतवणूक कॅश आणि ऑपशन्स व्यवहारात केली जाते तर अप्रत्यक्ष गुंतवणूक म्युच्युअल फंडामार्फत केली जाते. परदेशात आपल्या तुलनेने थेट गुंतवणूक वैयक्तिकरित्या केली न जाता वेगवेगळ्या माध्यस्थांमार्फत विविध फंड, इटीएफ, रिटस, इनव्हीट यासारख्या आधुनिक प्रकारात केली जाते. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत) अर्थसाक्षर डॉट कॉमवर 16 ऑगस्ट 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.

No comments:

Post a Comment