Friday, 25 March 2022
विदेशी शेअर्स खरेदी विक्री नवी संधी
#विदेशी_शेअर्स_खरेदी_विक्रीची_नवी_संधी
गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT-City) हा गुजरात सरकारने एका उपकंपनीच्या सहकार्याने निर्मिती केलेला एक व्यापारी जिल्हा आहे. अशा प्रकारे अस्तित्वात आलेले आणि अद्यायावत शहर (Smart City) योजनेअंतर्गत 886 एकर जमिनीवर विकसित करण्यात आलेले एकमेव आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र आहे.
येथे कार्यालये, निवासी क्षेत्र, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल्स, करमणूक केंद्रे आहेत. घरातून कामाच्या ठिकाणी सहज चालत जाता येईल अशी येथे व्यवस्था आहे, ज्यांना सायकलने यायचे आहे त्यांच्यासाठी विशेष मार्गिकेची योजना आहे. याशिवाय बाहेरुन सहज येता येईल अशी वाहतूक व्यवस्था आहे. याची रचना आर्थिकआणि माहिती तंत्रज्ञान यावरील उद्योगांना केंद्रस्थानी धरून करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापारी केंद्र आणि विशेष निर्यात उद्योग तेथे स्थापन करता येतील. या शहराचे दोन विभाग पाडण्यात आले असून एका भागात देशांतर्गत उद्योग तर दुसऱ्या भागात निर्यात उद्योग असतील. देशांतर्गत उद्योग रुपया या चलनात तर निर्यात उद्योग परकीय चलनात चालतील. उपलब्ध जागेचा पुरेपूर उपयोग केला जाईल असे येथील बांधकाम आहे. येथील सर्व उद्योगांना पहिली 10 वर्ष आयकर द्यावा लागणार नाही.
येथे उभारण्यात आलेल्या गगनचुंबी इमारती या गुजराथमधील सर्वात उंच इमारती असून त्या स्वयंपूर्ण आहेत.टाटा कम्युनिकेशने येथे डेटा सेंटर स्थापन केले आहे. तयार होणाऱ्या घन कचऱ्याची विल्हेवाट लावायची वेगळी स्वयंचलित यंत्रणा असून त्यामुळे शहर स्वच्छ सुंदर राहते या यंत्रणा पर्यावरण पूरक आहेत.
पाण्याचा एकही थेंब येथून फुकट जाणार नाही तर येथे असलेल्या कोणत्याही नळास येणारे पाणी हे पिण्यायोग्य असेल. पर्यायी व्यवस्थेसह 24 तास सातत्याने वीज येथे मिळत राहील.
विनाव्यत्यय जगभरात कुठेही संपर्क करता येण्याच्या दृष्टीने उच्य तंत्रज्ञानावर आधारित ऑप्टिकल केबलचे जाळे येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पूर्ण जिल्यासाठी एकच कुलिंग यंत्रणा असून अशा प्रकारे संपुर्ण जिल्यासाठी एकच कुलिंग यंत्रणा असलेला हा एकमेव जिल्हा आहे.
गॅस पुरवठा आणि कचरा विल्हेवाट एवढेच प्रत्येक इमारतीस बाहेरून होईल बाकी सर्व दृष्टीने रहिवासी आणि व्यापारी इमारत स्वयंपूर्ण असेल. दोन्ही विभागात 28 मजले असलेली प्रत्येकी एक तयार इमारत बांधून पूर्ण झाली असून दुसऱ्या GIFT 2 इमारतीची उंची 122 मीटर असून ती अहमदाबादमधील दुसरी सर्वात उंच इमारत आहे.
हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतातील पाहिले आणि जागतिक क्रमवारीत तिसरे मोठे जागतिक आर्थिक व्यापारी केंद्र येथे उद्योग सुरू करण्यास एक खिडकी योजना असून सर्व परवानग्या अर्ज केल्यापासून 45 दिवसात मिळतात. विकसित व्यापार केंद्रात कमी दराने भाडेपट्टयावर जागा उपलब्ध केली जाऊन उद्योगांना नोंदणी फी, मुद्रांक शुल्क माफी असून असून अनेक करसवलतींचा त्यांच्यावर वर्षाव करण्यात आला आहे.
मुंबई शेअरबाजार व राष्ट्रीय शेअरबाजार यांनी स्थापन केलेले India INE व NSE International Exchange हे आंतराष्ट्रीय शेअरबाजार येथे कार्यरत असून जगभरातून कोठूनही अनिवासी भारतीय व परकीय गुंतवणूकदार तेथे व्यवहार करू शकतात. हे व्यवहार जलद गतीने म्हणजेच 1 मिनिटात 1 लाख 60 हजाराहून अधिक सौदे या वेगाने होतात. येथील दलालांना को लोकेशनची सुविधा देण्यात आली असून त्या योगे झटपट निष्कर्ष काढून आपोआप ऑर्डर देता येतील. यातील India INE हा बाजार 22 तास (सकाळी 4 ते रात्री 2) तर NSE International Exchange हा बाजार 15 तास (पाहिले सत्र सकाळी 8 ते सायंकाळी 5, दुसरे सत्र संध्याकाळी 5:30 ते रात्री 11:30) चालू असतो. येथे भारतातील व भारताबाहेरील कंपन्याचे समभाग, डिपॉसीटरी रिसीट, कर्जरोखे, परकीय चलन, व्याजदर, भारतीय निर्देशांक, वस्तुबाजारातील वस्तू, एक्सचेंज ट्रेडेड फंड यांच्यावर आधारित डेरिव्हेटिव्हच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील. या व्यवहारांना STT, CTT, Stamp Duty, Service Tax, दिर्घमुदतीच्या फायद्यावरील कर (LTCG), लाभांश वितरण कर (DDT), यातून वगळण्यात आले आहे.
आपली गुंतवणूक विविध प्रकारच्या साधनात विभागून असावी असे सर्व गुंतवणूक तज्ञ सांगत असतात. जगात नावाजलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. अनेक ब्रोकर्स, वित्तसंस्था, खाजगी बँका, ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या आणि परदेशात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देणारे स्टार्टअप उद्योग यांच्या माध्यमातून आपल्याला अशी गुंतवणूक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या करता येणे आता सहज शक्य आहे. सन 2019 च्या जागतिक क्रमवारीनुसार मुंबई शेअरबाजार 10 व्या, तर राष्ट्रीय शेअरबाजार 11व्या स्थानावर आहे. भारतीय शेअरबाजारातील गुंतवणुकीत 22% परदेशी गुंतवणूक असताना जागतिक क्रमवारीत अग्रणी असलेल्या बाजारातही आपली काही गुंतवणूक का नसावी? त्यातून किती परतावा मिळेल आणि किती धोका स्वीकारावा लागेल याच्या शक्यताबाबत विचार करून आपली प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष गुंतवणूक विदेशी शेअर, ईटीएफ, युनिट, एडीआर, जीडीआर सारख्या माध्यमातून करण्यासाठी अनेकांनी आपली गुंतवणूक खाती मोठ्या प्रमाणात उघडली आहेत.
कोविड 19 संकटानंतर जगभरात जवळपास प्रत्येक देशाने लॉकडाऊन जाहीर केल्यावर तेथील शेअरबाजारानी नीचांकी पातळी गाठली. यानंतर अर्थव्यवस्थेस गती आणण्यासाठी तेथील सरकारने जे काही उपाय योजले, त्याच्या अनेक बऱ्यावाईट परिणामांपैकी महत्वाचा परिमाण हा तेथील शेअरबाजारावर झाला आणि बहुतेक देशातील बाजार निर्देशांक हे मार्च ते जुलै या चार ते पाच महिन्याच्या काळात आपल्या पूर्वीच्या पातळीजवळ आले. काहींनी नवा उच्चांक नोंदवला तर अनेक बाजार आपल्या सर्वोच्च पातळीखाली रेंगाळले आणि त्या वर्षांअखेरपर्यंत आपली आजवरची सर्वोच्च पातळी तोडून त्यांनी नवीन उच्चांक नोंदवले. अशा तऱ्हेने सन 2020 यावर्षीची नोंद इतिहासात 'बाजाराने वर्षभराचा किंवा मागील काही वर्षांचा गाठलेला नीचांक आणि आतापर्यंत नोंदवण्यात आलेला सर्वोच्च निर्देशांक' अशा अभिनव स्वरूपात झाली आहे. बाजार निर्देशांक कायम वरखाली होत राहण्याचे प्रमाण अन्य देशात आपल्या तुलनेने कमी असल्याने, जगभरातील अन्य प्रमुख यशस्वी कंपन्यांचे शेअर्स आपल्याकडे असावेत त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीत विविधता येईल असे गुंतवणूकदारांना वाटू लागले आहे.
युरोप, अमेरिका त्यातल्या त्यात अमेरिकेत आपली काहीतरी गुंतवणूक असावी. केओ, फेसबुक, गुगल, अँपल, जनरल मोटर्स, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, टेक्सला, कॉलकॉम, झूम, बर्कशियर हॅतवे, विसा इंटरनॅशनल यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांचे भारतीयांना सुप्त आकर्षण आहे. भारतीय रिजर्व बँकेने प्रत्येक भारतीयाला दरवर्षी Liberalised Remittance Scheme (LRS) या योजनेअंतर्गत कोणत्याही परवानगीशिवाय अडीच लाख डॉलर्स भारताबाहेर नेण्याची परवानगी दिली असल्याने विना अडथळा गुंतवणूक रक्कम उपलब्ध असते. ही मर्यादा जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या आसपास असली तरी बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने ती अमर्यादच आहे म्हणायला हरकत नाही.
भारतीय शेअरबाजाराच्या तुलनेत अमेरिकन शेअर बाजाराचे वैशिष्ठये-
★यापूर्वी म्हटल्याप्रमाणे बाजार मोठ्या प्रमाणात वरखाली होण्याची शक्यता कमी.
★नियमकांच्या वर्चस्वामुळे बऱ्यापैकी नियंत्रित, त्यामुळे गैरव्यवहार होण्याची अत्यंत शक्यता कमी.
★डॉलरची रुपयाशी केलेल्या तुलनेत गेल्या 10/12 वर्षात भारतीय बाजारापेक्षा मिळवलेला अधिक आकर्षक परतावा.
★अनेक भविष्यवेधी कंपन्यामध्ये त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करता येणे शक्य.
जगभरातील कोणत्याही बाजारात अशी गुंतवणूक आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने त्यावरील करांचा आपल्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन करता येऊ शकते-
प्रत्यक्ष गुंतवणूक
1.परदेशातील गुंतवणुकीचे खाते आपल्या देशातील ब्रोकरमार्फत उघडणे.
2.परदेशातील ब्रोकरच्या भारतातील फर्म मधून परदेशात गुंतवणूक करण्याचे खाते उघडणे.
अप्रत्यक्ष गुंतवणूक -
1.विदेशी बाजारात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचे युनिट घेणे.
2. ईटीएफ खरेदी करणे.
3.परदेशी उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी स्थापना केलेले स्टार्टअप उद्योग.
गिफ्टसिटीतील आंतरराष्ट्रीय शेअरबाजारास सुरुवात होऊन जवळजवळ तीन वर्षे होतील. निवासी भारतीय गुंतवणूकदारांना येथे गुंतवणूक करण्याची परवानगी नव्हती. अलीकडेच अशी परवानगी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे या बाजारात 3 मार्च 2022 पासून अल्फाबेट, टेक्सला, अमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, अँपल, वॉलमार्ट या 8 प्रमुख अमेरिकन कंपन्यात व्यवहार होण्यास सुरुवात झाली यातील अल्फाबेट ही गुगलची आणि मेटा ही फेसबुकची मूळ कंपनी आहे. नजीकच्या काळात 50 विदेशी कंपन्यांची नोंद होईल. यात बेकशेअर हॅथवे, मास्टरकार्ड, जेपी मार्गेन चेस, मॉर्गन स्टेंली, पेपल, फायझर, नायके, पेप्सीको, इंटेल यांचा समावेश आहे. याचा अर्थ या शेअर्सची बाजारात नोदणी होणार नसून त्याच्या डिपॉजीटरी रिसप्ट नोंदवल्या जातील त्या बाजार पुरस्कर्त्यांनी विदेशी बाजारात शेअर खरेदी केले असतील त्याचे अपुरस्कृत डिपॉजीटरी रिसीटच्या छोट्या छोट्या भागात विभाजन करण्यात येईल या विभाजित भागात त्यांची खरेदीविक्री करता येईल. याशिवाय जगातील इतर बाजारातील शेअर येथे लवकरच खरेदी विक्री करण्यास नोंदवण्यात येतील. आयएफएससी एथोरिटी हे याचे नियामक असून सर्व व्यवहारांवर त्त्यांचे नियंत्रण असेल. डे ट्रेडिंग करता येईल पण शॉर्ट सेलिंग करता येणार नाही. त्याचप्रमाणे ब्रोकरेज आणि भाव वरखाली होण्याची पातळी किती असावी ते आधीच निश्चित केलेले आहे.
गुंतवणूकदारांना वेगळे डी मॅट, ट्रेडिंग आणि गिफ्टसिटी मधील बँकेत खाते उघडावे लागेल हे व्यवहार डॉलर्स या चलनात होतील. वर उल्लेख केलेली रक्कम दरवर्षी प्रत्येक भारतीयांस या खात्यात ट्रान्सफर करून डॉलर्समध्ये कोणतीही अन्य परवानगी न घेता प्रचलित दरात बदलता येईल. अशीच खरेदी विक्रीची सुविधा मुंबई शेअरबाजाराच्या इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंजवर उपलब्ध असेल ज्यात मुंबई शेअरबाजार स्वतः ब्रोकर म्हणून स्वतःचा परिचय करून देईल. या डिपॉजीटरी रिसप्टमध्ये केलेली गुंतवणूक ही परकीय शेअरमध्ये केलेली गुंतवणूक समजण्यात येऊन त्यावरील नफा भांडवली नफा समजण्यात येईल. तो दोन वर्षांच्या आत झाला असल्यास अल्पमुदतीचा भांडवली नफा समजून त्यावर नियमित दराने, तर दोन वर्षाहून अधिक कालावधी झाल्यास दिर्घमुदतीचा समजण्यात येऊन त्यावर इंडेक्सेशनची सवलत घेऊन 20% कर द्यावा लागेल. येथे उद्योगांना असलेली कर सवलत निवासी भारतीय गुंतवणूकदारांना मिळेल की नाही याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून अजून कोणताही अधिकृत खुलासा आलेला नाही. जर अशी सवलत इतर गुंतवणूकदारांना मिळत असेल तर सर्वानाच मिळायला हवी, पण फक्त उद्योगांनाच अशी सवलत असेल असा माझा अंदाज आहे. असे असले तरी यामुळे परकीय कंपन्यांत गुंतवणूक करण्याचे एक नवे दालन सर्व निवासी भारतीयांना या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 25 मार्च 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Friday, 18 March 2022
सुयोग्य संगणकीय वित्तव्यवस्था
#सुयोग्य_संगणकीय_वित्तव्यवस्था
कंझ्युमर इंटरनॅशनल (CI) ही जगभरातील ग्राहक संघटनांना आपले सदस्यत्व देते. सभासद देशातील प्रत्येक ग्राहकास सुरक्षित आणि टिकाऊ उत्पादने व सेवा मिळतील, ग्राहक हिताचे रक्षण होईल, ती पर्यावरणपूरक असतील अशी अपेक्षा आहे. 100 हून अधिक देशांतील 200 हून अधिक ग्राहक संघटनांचे प्रतिनिधित्व ही संस्था करते. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास एक दबाव निर्माण होऊन सुयोग्य बदल घडवून आणता येईल हे यामागील तत्व आहे. ग्राहक, मग तो जगभरात कुठेही असो चुकीची गोष्ट घडत असल्यास त्याची किंमत त्याला मोजावी लागणारच. ही किंमत कधी किरकोळ असते तर कधी त्याचे आरोग्य, न्याय्यहक्क किंवा जीवन मरणाशी संबंधित असते. गेल्या काही वर्षात यात थोडी सुधारणा झाली असली तरी हा लढा अजून संपलेला नाही आजही अनेक ठिकाणी ग्राहकांचे वाजवी हक्क डावलले जात आहेत. उद्योजक एकत्रितपणे सरकारवर दबाव आणत असून सरकारला त्याच्याबद्धल सहानुभूती आहे. जगभरात राजकारण्यांना हाताशी धरून एकजुट नसलेल्या ग्राहकांना एकटे पाडले जात आहे. जागतिकीकरण उद्योग निर्मिती प्रक्रिया आणि संगणकीय सुधारणा याला जेवढे प्राधान्य देते तेवढे ग्राहक हिताला प्राधान्य देत नाही. त्यामुळे निराश होऊन ग्राहकांच्यात असुरक्षेची भावना निर्माण होऊ शकते. यासाठी ग्राहकांच्या विविध गटांना एकत्र आणून दबाव गट निर्माण करणे आंतरराष्ट्रीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी ग्राहक हक्काचे संरक्षण आणि समर्थन करणे असे कार्य या संस्थेकडून केले जाते. विविध देशात धोरणात्मक बदल घडवून याचा उपयोग झाला आहे.
संस्थेच्या वतीने ग्राहक हितासाठी दरवर्षी कोणत्या मुद्द्यावर अधिक भर द्यायचा ते ठरवले जाऊन ते पूर्ण करण्यासाठी एकदा विचार पुढे आणला जातो. जगभरातील प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गेल्यावर्षी विशेष प्रयत्न केले गेले.
करोनाच्या विविध लाटानंतर जीवनमान हळू हळू पूर्णपदावर येत असून याच कालखंडात रोख व्यवहार सोडून तंत्रज्ञानाचा वापर करून, बेबसाईट, मोबाईल अँप, वॉलेट, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, प्रीपेड कार्ड, यूपीआयसारख्या विविध पेमेंट सिस्टीम याद्वारे डिजिटल व्यवहार वाढीस लागले त्यामुळे अचानक अशा व्यवहारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाढत्या व्यवहारांबरोबर त्यातील धोक्याचे प्रमाण वाढले. असे व्यवहार करताना ते अधिक जलद गतीने झाले पाहिजेत, त्यासाठी कमीत कमी खर्च यावा, असे व्यवहार करत असता त्यासंबंधात जमा होणाऱ्या माहितीची सुरक्षितता जपली जावी आणि तक्रार उद्भवलीच तर त्याचे तात्काळ निवारण झाले पाहिजे या अपेक्षा होत्या. यातील व्यवहाराची गती आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत याबाबत आपण नक्कीच यशस्वी झालो परंतू माहितीची सुरक्षितता आणि तक्रार निवारणासाठी लागणारा काळ यात अजून सुधारणा होण्यास वाव आहे. हे लक्षात घेऊन 'सुयोग्य संगणकीय अर्थव्यवस्था' (Fair Digital Finance) या मुद्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे. याबाबत जगभरात काय स्थिती आहे ते जाणून घेऊन यासंबंधात सर्वसामावेशक सूचना करता येतील का? ज्यामुळे विकासाला चालना मिळून नव्या संधी उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल. यासाठी कंझ्युमर इंटरनॅशनलने सदस्य देशातील ग्राहक संघटना मधील सदस्यांचा अभ्यासगट स्थापन करून प्रत्येक देशात काय स्थिती आहे, तेथील ग्राहक संघटना काय काम करीत आहेत याची प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम चालू केले आहे.
आपल्याकडे बँका, वित्तसंस्था, सरकारी कर्जे आणि परकीय चलन यावर रिजर्व बँकेचे नियंत्रणआहे. जीवन विमा सर्वसाधारण विमा यावर आयआरडीएचे, शेअर, बॉण्ड, कर्जरोखे यावर सेबी या नियमकाचे नियंत्रण आहे. यासर्वांकडून मोठ्या प्रमाणात व्यवहार कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले जाते. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याची माहिती वारंवार देण्यात येते. संस्थात्मक पातळीवर या विषयी प्रिंटमीडिया आणि समाज माध्यमे यातून जागृती करण्याचे काम चालू आहे. रिजर्व बँकेकडून 'आरबीआय कहता है!' या शिर्षकाने तर ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून 'जागो ग्राहक जागो!' ही मोहीम विविध भाषांत चालू आहे. माहिती आणि तंत्रज्ञान या संबंधातील नवा कायदा तयार असून लवकरच तो अमलात येईल. सायबर संबंधित तक्रारींचे निवारण लवकरात लवकर होण्यासाठी 155260 हा टोल फ्री क्रमांक सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. विविध पोस्टर्स, पीपीटी, चित्रफिती उपलब्ध करून दिल्या जात आहे.
त्यालाच मदत म्हणून ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी ते अधोरेखित करणारे आणि वरील मोहिमांचाच भाग असणारे काही मुद्दे असे-
★शक्य ते सर्व व्यवहार ऑनलाईन करावेत. पुरेशी काळजी घेऊन असे व्यवहार करणे सोपे असून त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होते.
★संकेतस्थळाची सुरक्षितता तपासून घ्यावी.
★अधिकृत संकेतस्थळावायून किंवा अँपवरून व्यवहार करावेत. थर्ड पार्टी अँप डाउनलोड करू नये. वेगळ्या मेल आयडीचा वापर करावा.
★अनोळखी व्यक्तीने मेल पाठवून त्यात लिंक शेअर केली असेल तर त्यावर क्लिक करू नये.
★बक्षिसांचे मेल डिलीट करावे ओळखीच्या लोकांकडे ते पाठवू नयेत. ऑफर्स काय आहेत आणि कोण देतो ते पाहावे या जगात कोणी कोणालाही फुकट काहीही देत नाही.
★आपली गोपनीय माहिती जसे आधार कार्ड, पॅन, खाते क्रमांक, कार्ड नंबर, सिव्हीव्ही, लॉग इन आयडी, पासवर्ड, ओटीपी कुणालाही शेअर करू नये.
★शक्य असल्यास ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र डिव्हाईस वापरावा. जर असे करणे अशक्य असेल तर आपला फोन, लॅपटॉप पीसी अन्य व्यक्तीस वापरण्यास देऊ नये.
★असे व्यवहार अधिकृत/ नोंदणीकृत मध्यस्थामार्फत केले जावेत. त्याचा मोबदला वाजवी आहे याची खात्री करून घ्यावी.
★क्यू आर कोडची गरज पैसे देण्यासाठी लागते, मिळवण्यासाठी नाही हे कायम लक्षात ठेवावे.
★आपल्या खात्यातील शिल्लक, आलेले एसएमएस, मेल ठराविक कालावधीने तापासावेत. काही त्रुटी आढळल्यास त्वरित निदर्शनास आणावी.
★आपण ज्यांच्याशी व्यवहार करतो त्याच्या तक्रार निवारण पद्धती, टोल फ्री नंबर आपल्या हाताशी असावेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक संस्थेकडे त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा असते त्यांचा लाभ घ्यावा. तरीही समाधान न झाल्यास बँक, वित्तीय संस्था, विमा याचे लोकपालाकडे जावे. शेअर, कर्जरोखे, रिटस, इनविट, म्युच्युअल फंड व कमोडिटीसंबंधित तक्रारी सेबीकडे कराव्यात.
★तक्रार नेमकी कुणाकडे करायची याची माहिती नसल्यास नॅशनल कंझुमर हेल्पलाईनची मदत घेता येईल. सुटीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवसात सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत तक्रार करता येते. आपण केलेली तक्रार योग्य ठिकाणी पाठवून पाठपुरावा करण्यात येतो संदर्भासाठी आपल्याला तक्रार क्रमांक मिळतो. त्यांचा 1800-11-4000 हा त्यांचा टोल फ्री क्रमांक असून तेथे तक्रार करावी आणि 45 दिवसात काही उत्तर न आल्यास त्याचा पाठपुरावा करावा.
★गुंतागुंतीचे व्यवहार करणे टाळावे. मिळणाऱ्या ऑफर्स स्मार्टपणे वापराव्या. ऑफर्ससाठीच व्यवहार वाढवणे टाळावे.
★अवास्तव परतावा देणाऱ्या योजना टाळाव्यात यात आपण अडकण्याची शक्यता अधिक असते.
★टेक्नोसेव्ही व्यक्ती उमंग हे अँप वापरू शकतात त्यात डिजी लॉकर आणि कंझ्युमर हेल्पलाईन उपलब्ध असल्याने त्याचा परिणामकारक उपयोग होऊ शकतो. कागदपत्रे आणि विविध कार्ड यांचा प्रत्यक्ष वापर टाळता येतो जोखीम कमी होते.
★ज्यांना शक्य आहे अशा व्यक्ती यासंबंधात असलेल्या जोखमीचा विमा घेऊ शकतात.
ही यादी अधिक अद्ययावत करता येईल. यापुढील काळ हा डिजिटल व्यवहारांचाच असल्याने या बदलांशी हळू हळू जुळवून घ्यावे. यात तक्रारी उद्भवल्याच तर त्या संबंधितांकडे करून त्यांचा पाठपुरावा करावा. अशा तक्रारी न येणं किंवा त्यांचे प्रमाण अत्यल्प असणं आणि त्याची त्वरित समाधानकारक सोडवणूक होणं हीच सुयोग्य संगणकीय वित्तव्यवस्था असेल.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 18 मार्च 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Friday, 11 March 2022
युक्रेन रशिया युद्ध आणि भारतीय बाजार
#युक्रेन_रशिया_युद्ध_आणि_भारतीय_बाजार
युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाजाराची झालेली धूळधाण अनेकांना अचंबित करीत आहे. हे युद्ध जास्तीत जास्त 3/4 दिवस चालेल असे सांगण्यात येत होते आज जवळपास 15 दिवस होऊन गेल्याल्यानंतरही ते चालू आहे. कोविड 19 कालावधीत बाजारात अनेक गुंतवणूकदार आले त्यांनी बाजारातील तेजी पाहिली अशा रीतीने बाजार खाली येईल अशी त्यांची अपेक्षा नसावी. गेले काही महिने बाजार खाली आला तरी तो एका मर्यादेत खाली येऊन पुन्हा वर जाऊन त्याही वर जात असे आता बरोबर नेमके त्याच्या उलट घडत आहे. त्यामुळे आता काय होईल? मी आता शेअर विकून बाहेर पडू का? बाजार का क्या होगा? सु करवाणू? याचीच चर्चा सर्वत्र चालू आहे. सध्याच्या अनिश्चित आणि अस्थिर काळात याचे कोणतेही अचूक उत्तर नाही तरीही याची पर्वा न करता बाजारात सहभागी लोक त्याच्या क्षमतेनुसार आणि परिस्थितीच्या आकलनानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. रोज क्षणाक्षणाला परिस्थिती जशी बदलेल तसतशी या प्रश्नांची उत्तरे बदलत राहणे अगदी स्वाभाविक आहे.
एक अभ्यासक म्हणून मला या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतील तर तासातासाने येणाऱ्या बातम्यांच्या भडिमाराने प्रभावित न होता म्हणजे त्याचा अमेरिका आणि युरोपियन अर्थव्यवस्था आणि राजनीती यावरील संभाव्य परिणाम यावर मत देण्यास मी असमर्थ आहे तेव्हा फारसा दूरचा दृष्टिकोन विचारात न घेता भारतीय बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करू या. यातील अनेक गोष्टी भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करणाऱ्या असून यासाठी प्रबळ राजकिय इच्छाशक्ती आर्थिक कुशाग्रता आणि नशिबाची साथ लागेल.
एकंदरीतच चित्र चांगले दिसत नाही. माझ्या दृष्टीने रशिया युक्रेन संघर्ष तेवढा महत्वाचा नाही. रशियाचे विघटन झाल्यापासून हा संघर्ष कायम आहे. सन 2014 मध्ये रशियाने युक्रेनियन प्रांतांपैकी एक असलेल्या क्रिमियावर ताबा मिळवला तेव्हा शत्रुत्वात अधिक भर पडली हा संघर्ष यापुढेही चालूच राहील. रशिया आणि नाटो राष्ट्रे वर्षानुवर्ष विरुद्ध गटांना अफगाणिस्तान प्रमाणेच शस्त्रास्त्रे पैसा पुरवतील.
हा प्रश्न इतका चिघळण्याआधीच भारतीय अर्थव्यवस्था त्रासदायक स्थितीत होती या संघर्षाने आपल्यापुढील समस्येत अधिक भर पडली आहे, एवढेच!
आपल्यापुढील महत्वाच्या समस्या-
*सन 2021-2022 च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी मंदावलेला दिसत असून तो असाच किंवा कमी राहील असा रिजर्व बँकेचा अहवाल आहे.
*भारताचे कर आणि जीडीपी यांचे गुणोत्तर सन 2007 सारखेच आहे यात 15 वर्षात कोणतीही सुधारणा झाली नाही. तथापि जीडीपी तुलनेत देय व्याज 5% वरून वाढून जीडीपीच्या 6.5% झाले आहे.
*आगामी वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या 20% हून अधिक रक्कम कर्जफेड करण्यात होणार असल्याने साहजिकच विकास, सामाजिक क्षेत्रावरील खर्च, सबसिडी यावरील खर्चास मर्यादा येतील.
*वाढलेली महागाई, बचतीवर मिळणारे नकारात्मक उत्पन्न या सर्वांचा मध्यम आणि कनिष्ट मध्यमवर्गावर भार पडेल यामुळे मागणीत घट होण्याची शक्यता आहे.
*याहून वाईट गोष्ट ही की रशिया आणि युक्रेन हे केवळ तेल आणि नैसर्गिक वायूचे नव्हे तर खाद्यतेलाचे मोठे पुरवठादार देश आहेत. युद्धजन्य निर्बंधांमुळे पुरवठा अनियमित झाल्यामुळे खाद्यतेल अधिक महाग होऊ शकते आत्ताच ते किरकोळ बाजारात किलोमागे ₹20/- ने वाढले आहे त्यामुळे समाजातील मोठ्या घटकास याचा आर्थिक फटका बसेल.
*राजकिय सोय म्हणून इंधन आणि गॅसचे भाव कृत्रिमरित्या स्थिर ठेवण्यात आले नेमक्या याच कालावधीत त्यांच्या भावात वाढ झाली. यात युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारी वाढ चिंताजनक ठरू शकते.
*ही वाढ पूर्णपणे ग्राहकांवर लादली तर महागाई वाढेल आणि उपभोगाची मागणी कमी होईल.
यातील काही भार सरकारने उचलला तर तूट अधिक वाढेल त्यामुळे कर्ज आणि व्याज यांचा बोजा वाढेल. महागाई भत्ता वाढल्यामुळे सरकारी खर्चात वाढ होईल.
*याचा परिमाण आपल्या क्रेडिट रेटिंगवर होईल ते खाली गेल्यास नवे कर्ज मिळवण्यासाठी अधिक व्याज द्यावे लागेल.
*बँकांचा एनपीएमध्ये वाढ होऊन गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमास खीळ बसेल.
*विदेशी वित्तसंस्था मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बाहेर काढतील याचा परिणाम चालू खात्यावर होईल यामुळे डॉलर्सची किंमत अधिक वाढेल.
उच्च चलनवाढ, कमकुवत रुपया, कमी उत्पन्न , महाग भांडवल या सर्वाचे एकत्र येणे निश्चितच तापदायक आहे तर मग करायचे तरी काय?
लक्षात घ्यावे लागेल मंदिसदृश वातावरणामुळे उपयोग कमी होत आहे. निर्यातीस प्रोत्साहन देण्याचे सरकारी धोरण असले तरी दीर्घकालीन युद्ध आपल्याला परवडणारे नाही. रोख रक्कम देणे, उद्योगांना प्रोत्साहन देणे यामुळे मागणी वाढत असेल तरी आर्थिक मर्यादांचाही विचार कोणत्याही सरकारला करावा लागतो.
भांडवल बाजाराच्या स्थिरतेच्या दृष्टीने खालील गोष्टीत प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील.
*संघटित व्यवसायात वाढ त्यामुळे अनावश्यक खर्चात घट.
*आयात कमी निर्यात अधिक असे धोरण. देशांतर्गत निर्यात क्षमतेत वाढ.
*धनकोंच्या मालमत्तेत सुधारणा होईल अशा दिवाळखोरी निष्क्रिय मालमत्ते संबंधित तरतुदी.
*समभाग गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल अशी वातावरण निर्मिती.
*रोख रक्कम वितरण, पिकांना वाढीव आधारभूत किंमत.
*पारंपरिक व्यवसायांची कार्यक्षमता वाढवून नवीन तंत्रज्ञान आधारित व्यवसायास प्रोत्साहन.
*पायाभूत सुविधात वाढ.
*अत्यावश्यक खर्चापेक्षा इतर खर्चातील वाढ
*पर्यावरण रक्षण सर्व प्रयत्नास प्रोत्साहन
*करात कपात.
या सर्वाचा समतोल साधण्यात खरी कसोटी असून ते साध्य झाल्यास इतर सर्व घडामोडी दुय्यम ठरतील. अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम येते 3/4 वर्ष तरी राहील आशा परिस्थितीत आपली गुंतवणूक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक सोपा गुंतवणूक मार्ग स्वीकारावा. हा मार्ग दूरचा कंटाळवाणा आणि वरवर पाहता कमी फायद्याचा आहे परंतू तो दीर्घकाळात शाश्वत परतावा देईल. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या व्यवसायात गुंतवणूक करा. नवे तंत्रज्ञान व बाजारकल जुळवून भागधारकांचे मूल्य वाढवणाऱ्या व्यवसायाचा गुंतवणूक करण्यास विचार करा. असा व्यवसाय करणारी कंपनी अग्रणी कंपनी असेल असे नाही पण बेंचमार्क निर्देशांकात स्थान मिळवणारी असेल. या सल्यात नवीन काहीच नाही अनेकांनी अनेकदा हा विचार मांडला असून मी तो पुन्हा आपल्यावर ठसवीत आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअरबाजार यासंबंधी आपले मत याहून वेगळे असल्यास मी त्याच्याशी सहमत नाही हे नम्रपणे सांगू इच्छितो.
(तळटीप: या लेखासाठी मनीकंट्रोल संकेतस्थळावरील विजय कुमार गाभा यांच्या लेखाचा आधार घेतला असून हा मूळ लेखाचा अनुवाद नाही.)
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 11 मार्च 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Friday, 4 March 2022
बाजाराचा अंत:प्रवाह
#बाजाराचा_अंतःप्रवाह
बाजाराचा अंतःप्रवाह (Market Sentiment) हा शब्द कानावरून गेलाय? बाजारात तेजीमंदीसारखे मोठे बदल होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. याचा थेट संबध कंपन्यांच्या कामगिरीशी आहे. तर क्षणाक्षणाला भावात पडणारा फरक हा प्रामुख्याने व्यक्तींच्या मानसिकतेशी आहे. अनेक व्यक्ती मिळून समूह बनत असल्याने तो समूहाच्या मानसिकतेशी आहे. एकाद्या समभागाची खरेदी करावी की विक्री? हे जेव्हा अधिकाधिक लोकांना वाटेल त्यामुळे त्या समभागांचा बाजारभाव वाढण्याची किंवा कमी होण्याची हमखास शक्यता असते. व्यक्तीची मानसिकता बदलत राहण्याशीही अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गोष्टींचा संबध आहे. अनेक गोष्टींची भीती तर काही गोष्टींचा हव्यास यावर परिणाम करीत असतात. यावरून बाजाराची सर्वसाधारण मनस्थिती आपल्याला समजते. बाजाराचा हा कल आपल्याला ओळखता आला तर? आपण आपले संभाव्य नुकसान टाळू शकतो. यासाठी बाजार मनस्थिती निर्देशांकाचा (market mood index) आपल्याला नक्की उपयोग होईल. बाजाराच्या संदर्भात हा भीती आणि लोभ या मानवी भावनांचा निर्देशांक आहे असे आपण यास म्हणू शकतो.
भाव वाढत असताना झटपट नफा मिळवण्यासाठी आपणही खरेदी करावी असे वाटू शकते परंतू तेथे किंवा त्याहून थोडाच भाव वाढून तेथून भाव खाली येण्यास सुरुवात होते. त्यानंतर पुन्हा आपला खरेदी भाव येऊन त्याहून अधिक भाव येण्यास मोठा कालावधी लागू शकतो किंवा भाव खाली आला म्हणून तोटा कमी करण्यासाठी केलेली विक्री त्याहून थोडाच भाव खाली जाऊन तेथे स्थिरता येऊन वाढू शकतो. अशा दोन्ही स्थितीत आपली मानसिकता बाजूला ठेवून योग्य निर्णय घेणे हे कौशल्याचे काम आहे. हा निर्णय योग्य होता की नाही हे येणारा काळच ठरवतो.
योग्य वेळी खरेदी आणि योग्य वेळी विक्री करणे हे, नफा मिळवण्याच्या किंवा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. समजा राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक खाली येत असल्यास आपण शेअर्स विकावेत का? सर्वजण विक्री करतात म्हणून आपणही विक्री करावी का? असे प्रश्न पडू शकतात? यामध्ये काही खरेदीच्या संधी उपलब्ध असू शकतात. त्याचप्रमाणे अशा परिस्थितीत आपण काहीच हालचाल न करणे हे कदाचित नुकसानीचे होऊ शकते तर असा कल आधी समजला तर योग्य वेळी विक्री करून बाहेर पडण्याची संधी आपल्याला मिळू शकते. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूकदार या निर्देशांकाचा वापर करून अधिक चांगल्या तऱ्हेने आपल्या गुंतवणूक संचाचे व्यवस्थापन करू शकतात.
हा निर्देशांक 0 ते 100 या अंकात व्यक्त केला जातो. त्याचा भाव भावनांशी संबंध असा-
क्र भावभावना आकडेवारी
1 आत्यंतिक भीती 30 हून कमी
2 भीती 30 ते 50
3 लोभ 50 ते 70
4 आत्यंतिक लोभ 70 हून अधिक
1.आत्यंतिक भीती: अशी सर्वसाधारण भावना असणे याचा अर्थ या बाजारात नव्याने गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याचाच अर्थ असा की अतिरिक्त विक्रीचा मारा झाल्याने भाव खूप खाली आले असून येथून किंवा लवकरच ते वाढण्यास सुरुवात होईल.
2. भीती: बाजार प्रवाह या स्थितीत असल्यास तो वरती किंवा खाली कोणतीही दिशा पकडू शकतो. त्यामुळे अधिक सजग राहून लक्ष ठेवावे लागते त्याचा नेमका कल समजला तर निश्चित निर्णय घेता येतो. बाजाराची वाटचाल लोभाकडून भीतीकडे असल्यास त्याचे परिवर्तन आत्यंतिक भीतीत होऊ शकते. जर अंतप्रवाह भीतीकडून लोभाकडे जात असेल तर ही खरेदीसाठी योग्य वेळ असू शकते.
3.लोभ: बाजारप्रवाह लोभाकडे जात असेल तर तो एकसमान गतीने जात आहे की झटपट जात आहे जर हळू हळू वाढत असेल तर एकंदर चांगले संकेत मिळून अधिकाधिक खरेदी होऊ शकते आणि बाजार आत्यंतिक लोभाकडे जाऊन जाऊ शकतो. फायदा करून घेण्याची ही चांगली संधी असून यात किरकोळ कामगिरी असलेल्या समभागांचे भाव वाढल्याने उचित नफा घेऊन गुंतवणुकदार बाहेर पडू शकतो.
4.आत्यंतिक लोभ: बाजारात अशी स्थिती निर्माण झाल्यास सर्वच शेअर्सची मागणी वाढते भाव सातत्याने वाढत रहातात. बाजार पडू शकेल अश्या कोणत्याही बातमीचा परिणाम न होता भाव वाढतच रहातात ही स्थिती अनेक दिवस तशीच रहात नसल्याने कमी कालावधीसाठी विक्रीची चांगली संधी उपलब्ध होते काही दिवसांनी बाजार प्रवाह भीती किंवा आत्यंतिक भीतीकडे वळल्यावर पुन्हा खरेदीची संधी प्राप्त होते.
बाजार अंतःप्रवाहावर प्रभाव पाडणारे घटक
★विदेशी गुंतवणूक: विदेशी वित्तसंस्था प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे भारतीय भांडवल बाजारात गुंतवणूक करीत असतात ही गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि परतावा यांचा विचार केला जातो. नोटबंदी जीएसटी यासारखे बदल पचवून गेले 30 वर्ष परकीय गुंतवणूक सातत्याने वाढत राहणे यामुळे त्याचा येथील बाजारावर असणारा विश्वास व्यक्त होतो.
★बाजारातील निरनिराळे निर्देशांक: बाजारात सेन्सेक्स निफ्टी बँकेक्स याशिवाय अजूनही बरेच निर्देशांक कार्यरत असून ते त्यात उल्लेखलेल्या मालमत्तेचे प्रतिनिधित्व करतात. बाजार कल निश्चित होण्यास त्यामुळे मदत होते.
★अस्थिरता आणि घोका शक्यता : जेव्हा बाजार सातत्याने एका टप्यामध्ये वरखाली होत असतो, तेव्हा तो अस्थिर समजला जातो. यात नेमका धोका किती आहे भविष्यात त्याची काय चाल असेल हे वेगवेगळ्या निर्देशांकाच्या साहाय्याने ओळखता येते.
★बाजाराची गती सुचकता: विशिष्ट काळात बाजार भावात पडणाऱ्या भावातील फरकाची गती किती असेल याचाही बाजार प्रवाहावर फरक पडत असतो.
★भाव फरकाची ताकद: भावात पडणारा फरक किती वर अथवा खाली जाऊ शकेल त्यास भावाची ताकद असे म्हणता येईल बाजार प्रवाहावर याचा प्रभाव पडतो.
★सोन्याची मागणी: सोन्याच्या भावावर मागणीनुसार फरक पडत असतो बाजार प्रवाहाशी त्याचा थेट संबंध असल्याचे आढळून आले आहे जेव्हा शेअरबाजारावरील विश्वास डळमळीत होतो तेव्हा सोन्याचे भाव कमी कालावधीत पटकन वाढतात.
हा निर्देशांक कसा जाहीर करावा याची निश्चित मार्गदर्शक तत्वे आहेत अजून तरी एक्सचेंजकडून अधिकृतपणे हा निर्देशांक जाहीर केला जात नाही. स्टॉकच्या तुलनेत तो मिळवता येणे शक्य असले तरी सध्यातरी तो निर्देशांकाच्या तुलनेत उपलब्ध उपलब्ध आहे. अभ्यासक आणि गुंतवणूकदार यांना चालू बाजाराचा कल कळण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग करून घेता येईल. टिकरटेप.इन या संकेतस्थळानुसार 2 मार्च 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर निफ्टीशी तुलना करता MMI 35.36 होता. जो भीतीचा निर्देशक असून आत्यंतिक भीतीकडे झुकणारा आहे, तर 4 मार्च 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर तो 19.81 म्हणजेच आत्यंतिक भीतीदायक होता. युद्धजन्य परिस्थिती हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 4 मार्च 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Posts (Atom)