Friday, 8 October 2021
आम्ही गरीब मध्यमवर्गीय
#आम्ही_गरीब_मध्यमवर्गीय
माझा एक मित्र एका नामवंत कंपनीत नोकरीला आहे. त्याच्या पगारात 3 साधारण कुटुंब सहज पोसली जातील एवढा त्याचा पगार आहे. तो कायम स्वतःला गरीब मध्यमवर्गीय समजत असतो. त्याचा पगार बराच असल्याने दरमहा बऱ्यापैकी रक्कम कर म्हणून कापली जाते. याबाबत तो कायम नाराजी व्यक्त करीत गरीबाकडून कशाला टॅक्स घेतंय सरकार म्हणून सरकारवर उखडत असतो. आपल्या तथाकथित गरिबीचे गाऱ्हाणे तो गात असतो. त्याला कायमच खर्चाचा कुठेना कुठे पडलेला खड्डा दिसत असतो. गरीब शब्दाचा स्वभावाशी अर्थ जोडलेला आहे अशी गरिबी आपण समजू शकतो. आर्थिकदृष्ट्या गरिबीही ठरवता येते. याचे प्रत्येक देशाचे निकष वेगवेगळे असतात. जागतिक बँकेने किंवा आपल्या देशाने याचे ठरवलेले निकष खूप हास्यास्पद आहेत. या निकषानुसार जगात फक्त 6% च्या आसपास गरीब लोक आहेत.
सर्व जगभर संपत्तीचे असमान वितरण झाले आहे असून 10% अतिश्रीमंत लोकांकडे 90% संपत्ती तर 90% बाकी लोकांकडे 10% संपत्ती असा तीव्र विरोधाभास आहे. जगातील सर्व संपत्तीचे प्रत्येकास समान वाटप केले असता पुढील 10 वर्षात 10% लोकांकडे 90% पुन्हा एकवटेल असा अंदाज आहे त्यामुळे यापुढे आर्थिक समानता जवळपास अशक्य आहे. यात आपण ज्याला मध्यमवर्ग असे समजतो आहोत, त्याची सर्वाधिक गोची आहे, त्याला गरिबांसाठी असलेल्या सवलती मिळत नाहीत आणि इच्छा असूनही अतिश्रीमंतासारखा खर्च हे लोक करू शकत नाही. याच्या राहणीमानात काही थोडा फरक पडला तरी अनेकजणांच्या मनोवृत्तीत फरक पडलेला नाही म्हणजे सरकारी शाळा दवाखाने यांचा ते वापर करणार नाहीत पण यात सुधारणा व्हायला पाहिजे म्हणून बोलत राहणार. ऐपत असून लस प्रायव्हेट मध्ये न घेता सरकारी केंद्रातून घेणार. यांना व्यवसायात कमीपणा वाटणार, नोकरी मात्र सरकारी हवी. अतिश्रीमंतासारखं वागता येत नाही आणि एकदमच गरिबीची कुठेतरी लाज, अश्या द्विधा मनस्थितीतील हा वर्ग आहे. सरकारी निकषांवर जे गरीब आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत तर अतिश्रीमंताना यातील कोणत्याच गोष्टीचे सोयरसुतक नाही. देशावर कोणतेही संकट आलं तर सर्वाधिक फटका याच लोकांना बसणार. तरीही आहे त्या परिस्थितीत त्यास अनुरूप बदल करून हा वर्ग टिकून आहे. या गोष्टींची वेळोवेळी तो किंमत मोजत असतो. यातही 2 प्रकार आहेत. एक किमान आवश्यक गरजा भागवू शकणारा वर्ग असून दुसरा अतिश्रीमंतांच्या जवळ आहे. हे दोन्ही काहीसा फरक पडला की त्याच्या खालील किंवा वरील वर्गात दाखल होऊ शकतील अशा सीमारेषेवर आहेत. मग नेमके मध्यवर्गीय कुणाला म्हणायचे ?
मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिक्षण विभागाकडून विभागीय अध्यक्ष तुमच्या भेटीला या कार्यक्रम मालिकेअंतर्गत सुप्रसिद्ध अर्थतज्ञ गिरीश जाखोटीया यांचे अर्थसंकल्पावर फार पूर्वी एक व्याख्यान पूर्वी झाले त्यात त्यांनी मध्यमवर्गीय या मुद्द्यावर प्रकाश टाकला. कुटुंब या संज्ञेतर्गत त्यांनी नवरा बायको त्यांची दोन मुले आणि मुलांचे आजी आजोबा असलेले म्हणजे एक कुटुंब असे धरले हे कुटुंब तालुक्याच्या ठिकाणाच्या जवळपास रहात आहे किंवा मोठ्या शहरात असेल तर त्याची राहायची सोय आहे हे गृहीत धरले आहे. या कुटूंबाच्या सर्वसाधारण आवश्यक गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, करमणूक , मुदतीचा विमा, आरोग्यविमा, पर्यटन आणि गुंतवणूक या गरजा भागविण्यासाठी त्याचे उत्पन्न मासिक उत्पन्न किमान ₹30000/-असायला हवे अशा व्यक्तीस आपण मध्यमवर्गीय असे म्हणू शकतो असे त्यांनी सांगितले. करोना नंतर सर्वच क्षेत्रात झालेली महागाईचा आणि ठेवींवरील मिळणाऱ्या व्याजदारातील घट यांचा विचार करता ही रक्कम थोडी वाढेल. तेव्हा सध्याच्या काळात आपण दरमहा ₹ 40000/-कमावणारे कुटुंब हे मध्यम वर्गीय कुटुंब म्हणता येईल. याहून अधिक उत्पन्न असलेली कुटूंबे उच्च तर त्याहून कमी उत्पन्न असलेली कुटुंबे निम्न वर्गात मोडतील, हेच सर्व मध्यमवर्गीय म्हणवणाऱ्यानी लक्षात ठेवावे.
आपले पोट भरलेले असताना पैसा माया आहे म्हणणे सोपे आहे. इथे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात हेच सत्य असल्याने अंथरूण पाहून पाय पसरावे ऐवजी आपले अंथरूण वाढवता कसे येईल याकडे लक्ष द्यावे. आपला जन्म कुठे होईल हे जरी आपल्या हातात नसले तरी योग्य मार्गाने आपल्याकडे असलेल्या पैशाचे नियोजन आपल्याला करता येणे शक्य आहे. असलेली संपत्ती जतन करणे त्यात वाढ करता येणे आणि नसल्यास ती निर्माण करणे आवश्यक आहे. इथे एवढा विरोधाभास आहे की वरील रकमेच्या चारपट मिळवणाऱ्या कुटुंबाची जीवनपद्धती इतकी बदलली आहे की त्याच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही तर परिस्थितीवर मात करणारी मासिक ₹20000/- मिळवणारी व्यक्ती निग्रहाने ₹2000/- बाजूला ठेवू शकते. यासाठी ज्ञान आणि व्यासंग याची आवड असणे जरुरीचे असून लाभ आणि लोभ यातील फरक ओळखता येणे आवश्यक आहे. योग्य तेथे भीती तर आवश्यक तेथे धाडस बाळगावे लागेल. यात कुठेही थोडीशी चूक म्हणजे आर्थिक नुकसानच म्हणूनच-
*अवास्तव परतावा देणाऱ्या योजनांवर विश्वास ठेवू नका.
*तोंडी अथवा लिखित आश्वासनांवर विसंबून शेअर, डिरिव्हेटिव सारखे धोकादायक व्यवहार करू नका. अशा आश्वासनांना काहीच अर्थ नाही. यातील धोका समजून घ्या.
*आपली गुंतवणूक अश्याच गोष्टीमध्ये असू द्या ज्यांची आपणास पूर्ण माहिती आहे. हे थोडं कठीण असलं तरी अशक्य नाही.
*तुमच्या बँकेतील गुंतवणूक सल्लागारावर अजिबात विश्वास ठेवू नका त्याच्या दृष्टीने तुम्ही त्यांचे बकरे असता. ते जरी तुम्हाला तुमची खूप काळजी असल्याचे दाखवत असले तरी सर्वसाधारणपणे त्यांना तुमच्या गुंतवणुकीमुळे, त्यांचा काय फायदा होईल ? याचाच विचार ते करत असतात.
*तुमचा मित्र किंवा नातेवाईक अधिक आस्थेने तुमची चौकशी करीत असेल तर अधिक सावध रहा कारण कदाचित तो तुम्हाला एखाद्या योजनेत अडकवू शकतो.
*सेबीकडे नोंदणी न केलेल्या मध्यस्थामार्फत कोणतेही गुंतवणूक व्यवहार करू नका.
*रोख रक्कम देऊन कोणतेही गुंतवणूक व्यवहार करू नका.
*डिरिव्हेटिव व्यवहार हे सर्वसाधारण व्यवहारापेक्षा अत्यंत धोकादायक असून यामुळे आपले भांडवल पूर्ण नाहीसे होऊन थकबाकी निघू शकते. जी देण्याचे कायदेशीर बंधन गुंतवणूकदारावर आहे.
*स्वतःकडे कोणत्याही योजनांची एजन्सी नसलेले आणि स्वतंत्रपणे फी आकारून गुंतवणूक सल्ला देणाऱ्या व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या.
*पी एम एस, स्मॉल केस योजना यांचा गुंतवणूक योजना म्हणून विचार करता येईल.
*म्युच्युअल फंडांकडे तुमच्या गरजेनुसार विविध योजना आहेत.
*स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करताना ही गुंतवणूक भविष्यात पांढरा हत्तीतर ठरणार नाही ना? याचा विचार करा. सन 2007- 2008 नंतर अशी गुंतवणूक ही लाभदायक ठरण्याऐवजी खर्चिक ठरत आहे.
*माझे मित्र नितीन पोताडे यांनी डेटा एनालेसिसचा वापर करून डे ट्रेडिंग कसे करावी याची पद्धत शोधली असून ती प्रामुख्याने तांत्रीक विश्लेषणावर आधारित आहे पण त्याचा उपयोग मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास होऊ शकतो त्याचा स्वतःचा Nitin Potade या नावाचा यु ट्यूब चॅनल आहे. तर दुसरे एक मित्र पंकज कोटालवार यांनी प्रामुख्याने प्राथमिक विश्लेषणाचा वापर करून स्विंग ट्रेड आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची स्वतःची पद्धती विकसित केली आहे. त्याचे संपत्तीचा पंकोमार्ग, उद्योगगाथा, ग गुंतवणुकीचा यासारखी पुस्तके ई साहीत्य प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. स्विंग ट्रेडर्स ग्रुपला मार्गदर्शन करण्यासाठी 8 व्हिडीओ व 35 च्या आसपास लेख त्यांनी लिहले असून विविध समाजमाध्यमातून पारदर्शकतेने यावर विस्तृतपणे माहिती देऊन या दोघांनी मराठी माणसांना उपकृत केले आहे. त्यांची पद्धत समजून घेऊन त्याचा वापर आपणास करता येईल का? त्याच्या पद्धतीत काही त्रुटी वाटतात का? याबाबत त्याच्याशी चर्चा करा. याहून वेगळी आणि स्वतःची पद्धत आपल्याला विकसित करता येईल का? याचा विचार करा.
*खरंतर शेअरबाजार हे एकच असे क्षेत्र आहे जेथे स्पर्धा नाही. समूहाची मानसिकता हा याचा पाया असून अधिक लोक एका दिशेने एकवटून एकाच प्रकारचे काम केल्यास आपणास अपेक्षित निष्कर्ष मिळून सर्वाचा फायदा होऊ शकतो. अन्य व्यवसायात एकाच पद्धतीने अनेकांनी व्यवसाय केल्यास नफ्याची विभागणी होऊन त्यात घट होईल.
*शेरबाजारातून काही न करता भरपूर पैसे मिळतील किंवा यापासून दूरच राहायला हवं असे टोकाचे विचार सोडून हा एक गुंतवणूक करण्याचा मार्ग आहे हे लक्षात असू द्या.
*क्रेप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी यातील भावात होणारे तीव्र उतारचढाव, त्याला सध्यातरी कायदेशीररीत्या नसलेले पाठबळ हे मुद्दे लक्षात घ्या.
*तुमच्या गुंतवणुकीतून अवास्तव (म्हणजे काय हे ही तुम्हीच ठरवा) परतावा मिळत असल्यास त्याचा अवश्य लाभ करून घ्या. आभासी फायदा तोट्याला फारसा काही अर्थ नाही.
*या जगात फुकट काही मिळेल या भ्रमात राहू नका आपली मानसिकता बदला आणि योग्य तेथे पैसे मोजण्याची तयारी ठेवा. जगात फार थोडे लोक मोफत प्रामाणिक सल्ला देतात ज्यांची आठवण आपल्याला कुठेतरी अडकल्यावरच होते. त्यांच्याशी मागाहून चर्चा करण्यापेक्षा गुंतवणूक करण्यापूर्वी चर्चा करा.
भक्ष आणि भक्षकांनी भरलेल्या या जगात स्वतःहून कुणाला फसवू नका आणि कुणाकडून फसू नका.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 8 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment