Friday, 29 October 2021
मॉक ट्रेडिंग आणि स्टॉक सिम्युलेटर्स
#मॉक_ट्रेडिंग_आणि_स्टॉक_सिम्युलेटर
एखाद्या शनिवारी तुम्ही सहज बिझनेस चॅनल लावता किंवा आपले ब्रोकरकडील अँप उघडून पाहता तेव्हा तुम्हाला बाजार चालू असल्यासारखे दिसते, काय बर आहे आज? आज तर लक्ष्मीपूजन नाही मग आज मार्केट चालू कसे? म्हणून तुम्ही आश्चर्यचकित होता. अधिक माहिती मिळवल्यावर तुम्हाला समजते की आज मॉक ट्रेडींग आहे. मॉक हा शब्द Multipal Option Checking याचे संक्षिप्त रूप आहे. दर महिन्याच्या कोणत्याही एका शनिवारी सर्व एक्सचेंजेस कडून असे विशेष ट्रेडिंग सेशन घेण्यात येते याद्वारे दलालांना आपली ट्रेडिंग यंत्रणा व्यवस्थित काम करीत आहे याची तपासणी करता येते. याच सेशनमध्ये यंत्रणेतील बदल, नवीन प्रोडक्ट, पूर्वीच्या यंत्रणेतील सुधारणा, संकटमोचक यंत्रणा यांची तपासणी करण्यात येते. सर्वच प्रकारात म्हणजे इक्विटी, इक्विटी डेरीव्हेटिव्ह, कमोडिटी डिरिव्हेटिव्ह,करन्सी डिरिव्हेटिव्ह या सर्वप्रकारात ते घेतले जाते येत्या वर्षभरात ते नेमके कोणत्या तारखेस घेतले जाईल ते एक्सचेंजकडून आधी जाहीर केले जाते व त्याच वेळात घेतले जाते बहुदा ही चाचणी पहिल्या किंवा दुसऱ्या शनिवारी घेतली जाते.
स्क्रीनवरील भावात पडणाऱ्या फरकानुसार आपल्या पोर्टफोलिओच्या मूल्यात कमी अधिक फरक पडतो. गेल्या चार वर्षांत चालू बाजारात एक्सचेंज बंद पडण्याची एक मोठी घटना आणि चौदा किरकोळ घटना घडल्या यामुळे गुंतवणूकदार विशेषतः ट्रेडर्स लोकांचे नुकसान झाले. अशा घटना वारंवार घडल्यास लोकांचा या यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो. सर्वांना योग्य प्लँटफॉर्म उपलब्ध व्हावा यासाठी उपलब्ध यंत्रणा दोषराहित व्हावी त्याच्याकडून त्वरित प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा असते. ही चाचणी ठरवलेल्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 3;30 यावेळात घेतली जाते. नियमित व्यवहाराप्रमाणेच हे चाचणी व्यवहार नोंदवून पुढील कामकाज दिवसापूर्वी उलट करून ते व्यवहार होण्यापूर्वीच्या स्थितीत पुन्हा आणले जातात.
ज्याप्रमाणे आपण व्यवहार करण्यास सक्षम आहोत की नाही याची एक्सचेंज नियमित तपासणी करते, त्याचप्रमाणे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकज्ञानाची त्याला माहिती असलेल्या तंत्रांची तपासणी पेपर ट्रेड करून करत असतात. यातील भाव अधिक अचूक नसल्याने ते जवळपास अंदाजे गृहीत धरावे लागतात. गुंतवणूकदारांना असे ट्रेड करण्याचा सराव होण्यासाठी अनेकांनी काही आभासी रक्कम देऊन खराखुरा बाजारभाव (Real time market rate) दर्शवून ती रक्कम गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याला स्टॉक सिम्युलेटर असे म्हणतात, याचा वापर करून गुंतवणूकदार विविध प्रयोग करून पाहू शकतात नवीन पद्धतीची तपासणी करू शकतात. पेपर ट्रेडिंगचीच ही सुधारित आवृत्ती आहे, खोटे खोटे पैसे आणि भाव खरे त्यामुळेच तुमचे नियम गृहीतके बरोबर आहेत ना? हे पारखून घेता येते. अशी सेवा देणाऱ्या यात मोबदला घेऊन अथवा विनामूल्य दोन्ही प्रकारचे पर्याय असून ग्राहकाने नोंदणी केल्यावर 1 लाख ते 1 करोड आभासी पैसा दिला जातो ते पैसे आणि उपलब्ध करण्यात येणारी खरी माहिती याचा वापर करून आपण गुंतवणूक करू शकता तुमचा आत्मविश्वास वाढला की खऱ्या पैशांचा वापर करून खरीखुरी गुंतवणूक करू शकता.
स्टॉक सिम्युलेटरचे फायदे-
*डी मॅट, ट्रेडिंग खाते उघडायची जरूरी नाही, कोणत्याही ओळख निवासी पुराव्याची जरूरी नाही.
*पैशांची जरूरी नाही अनेक विनामूल्य प्लँटफॉर्म उपलब्ध आहेत.
*खराखुरा बाजारभाव उपलब्ध झाल्याने वेगवेगळ्या शक्यता आजमाऊन पहाता येतात.
*पैसे न गमावता ट्रेडिंग प्रॅक्टिस करता येते.
*चूका करण्याची धोका बिनधोक आजमावून पहायची संधी.
स्टॉक सिम्युलेटरचे तोटे-
*वापरलेले पैसे खोटे असल्याने व्यवहारातील खऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता.
*व्यवहार त्यातील नफातोटा लवकर निरस वाटण्याची शक्यता.
असे असले तरी सराव करण्याच्या दृष्टीने हे प्लॅटफॉर्म उपयुक्त आहेत. जे बाजारात नवीन आहेत त्यांना आपल्या संकल्पना बिनभांडवली पडताळता येतील. ते अधिक आकर्षित करण्यासाठी यातील दैनिक, साप्ताहिक, मासिक विजेते, विविध विभागातील अधिक नफा मिळवणाऱ्या विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे मिळवण्याची संधी सर्वांना उपलब्ध आहे. यातील महत्वाचे प्लँटफॉर्म असे-
*ट्रेकइनवेस्ट- नवोदित गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म, विविध ऑर्डर्स टाकणे, चार्ट बनवणे मुळातून शिकण्याची सोय. याशिवाय तज्ञांचे मार्गदर्शन, सल्ला आणि अभ्यासासाठी विविध व्हिडीओ याशिवाय गुंतवणूक विषयक अधिक सखोल मार्गदर्शन.
*मनीभाई- moneycontrol यांच्याकडून गुंतवणूकदारांना उपलब्ध लोकप्रिय सिम्युलेटर. मोबाईल नंबर, फेसबुक, गूगल किंवा ई मेल वरून येथे खाते काढता येणे शक्य. शेअर कमोडिटी डिरिव्हेटिव्ह व्यवहार शक्य, आभासी ब्रोकरेज घेतले जाते. याशिवाय अन्य आभासी गुंतवणूक पर्याय उपलब्ध. सर्व प्रकारचे व्यवहार करता येणे शक्य. कधीही बाहेर पडून पुन्हा सुरुवात करता येणे शक्य.
*दलाल स्ट्रीट इनवेस्टमेंट जर्नल- मुंबई शेअर बाजाराच्या सहकार्याने रियल टाइम व्यवहार करता येणारा मंच, विविध स्पर्धा, रोज आकर्षक बक्षिसे, समविचारी मंडळींचा गट बनवण्याची सोय.
*मनीपॉट- नवोदित, अनुभवी व्यक्ती, कॉर्पोरेट यांना शेअरबाजार व्यवहार शिकण्यास उपयुक्त. अनेक कॉर्पोरेट गुंतवणूकदार त्याच्या स्टाफला ट्रेनींग देण्यासाठी याचा वापर करतात. स्टॉप लॉस लावण्याची सवलत येथून मिळत नाही.
*चार्टमंत्रा- हा एक स्टॉक सिम्युलेटर गेम असून तो खऱ्याखुऱ्या बाजारासारखा आहे तुमच्या खऱ्या खात्याशी जोडलेल्या सर्व सोई सवलती यावर मिळतात. आभासी पैसे 1 लाख रुपयेच खातेदारास दिले जातात.
यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत काही प्लॅटफॉर्मवर परदेशी बाजारातील, क्रेप्टो करन्सीमधील गुंतवणूक संधी आजमावण्याची सोय आहेत. शिकण्याची इच्छा असलेल्यानी ते पहावे, समजून घ्यावे आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्यांचा फायदा करून घ्यावा.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 29 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Friday, 22 October 2021
गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण
#गुंतवणूकदार_शिक्षण_आणि_संरक्षणनिधी_प्राधिकरण
सरकारने गुंतवणूकदारांच्या हिताच्या दृष्टीने गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाची (Investor Education and Protection Fund Authority संक्षेपाने IEPF) स्थापना केली आहे. कंपनी कायदा (Companies Act 2013) च्या परिशिष्ठ (Section) 124(5) अनुसार काही विविध कारणांमुळे न दिलेला किंवा भागधारकांने मागणी न केल्याने कंपनीकडे शिल्लख असलेला लाभांश IEPF कडे 7 वर्षांनी वर्ग करावा लागतो. याच कायद्याच्या परिशिष्ठ 124(6) नुसार जर कंपनीकडे समभाग पडून असतील तर ते याच प्राधिकरणाकडे वर्ग होतील. यापूर्वी असाच एक फंड होता त्यात वर्ग झालेले पैसे मिळवणे जवळपास अशक्य होते परंतू यातील विवाद आणि वारस निश्चितीच्या कायदेशीर तक्रारी पूर्ण होण्यास लागणारा विलंब याचा विचार करून या प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन कंपनी कायद्याच्या परिशिष्ठ123(3)(A) नुसार गुंतवणूकदार त्याच्या फंडांकडे वर्ग झालेले समभाग, कर्जरोखे, लाभांश, डिव्हिडंड यांची मागणी गुंतवणूकदार अथवा त्याचे कायदेशीर वारस प्राधिकरणाकडे केव्हाही करू शकतात.
या फंडाच्या नियम 7(1) नुसार या प्राधिकरणाचे अधिकारी अशा रीतीने कंपनीकडून त्याच्याकडे वर्ग करण्यात आलेल्या खालील गोष्टींची तपासणी करून त्याच्या तपशील ठेवतील-
*मागणी न केलेला लाभांश (Dividend)
*समभाग (Shares)
*मुदत पूर्ण झालेले कर्जरोखे( Corporate Bonds)
*मुदत पूर्ण झालेल्या ठेवी (Fixed Deposits)
*शेअर रोखे यांची मागणी करण्यासाठी भरलेली रक्कम (Application Money) (अलीकडे हा प्रश्न निकालात निघाला आहे)
*अपूर्ण शेअर्सची (Fractional shares) एकत्रित विक्री केल्यावर मिळालेले पैसे.
*मागणी न केलेले पण मुदत संपलेले प्राधान्य समभाग (Prefrance shares) आणि त्यावरील व्याज (Intrest).
या सर्वाचा प्राधिकरण तपशील ठेवून भविष्यात त्याची मागणी गुंतवणूकदार अथवा वारसाने केली तर त्यांची खात्री करून घेऊन मूळ व्यक्ती अथवा वारसदार यास परत करतील. या गोष्टी परत मिळवण्यासाठी सदर फंडांकडे आपली मागणी IEFP - 5 या ऑनलाईन सादर करून लागेल. त्यासाठी कोणतीही फी भरावी लागत नाही. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हा फॉर्म गुंतवणूकदार अथवा त्याचे कायदेशीर वारस यांनाच भरता येईल. हा फॉर्म भरण्याची पद्धत खालीलप्रमाणे-
*प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाऊन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील मिळेल.
*कंपनी कायदा मंत्रालया (MCA) च्या पोर्टलवर जाऊन IEPF-5 हा e फॉर्म घ्यावा.
*तो योग्य पद्धतीने भरून पोर्टलवर अपलोड करावा त्याची एक प्रत आपल्याकडे साठवून ठेवावी.
*याची पावती आपल्याला मिळेल त्यास SRN असे म्हणतात.
*हा फॉर्म आणि त्याची पावती आणि काही आवश्यक कागदपत्रे कंपनीकडे रजिस्टर पोस्टाने 30 दिवसाच्या आत पाठवावीत त्यावर Claim for a refund from IEPF Authority असे ठळक अक्षरात लिहावे म्हणजे तो नेमक्या व्यक्तीकडे जाईल.
*संबधित कंपनी फॉर्म तपासून पुढील 30 दिवसात मालमत्ता आपली शिफारस IEPF कडे करेल.
*IEPF सर्व तपशील आणि शिफारस याचा विचार करून मागणीस पुढील 30 दिवसात मंजुरी देईल.
*यामध्ये मागणी केलेली रक्कम असेल तर ती मागणीधारकाच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात तर शेअर्स डी मॅट खात्यात वर्ग करेल.
*योग्य रीतीने अर्ज भरल्यापासून लवकरात लवकर 60 दिवसात त्याची मागणी पूर्ण होईल.
*अधिक तपशील हवा असल्यास त्यासाठी अर्जदारास एक संधी मिळेल.
*एका आर्थिक वर्षात सर्व मागणीसाठी अर्जदारास एकच संधी मिळेल. तेव्हा फॉर्म अपलोड करण्यापूर्वी तो बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी
IEPF फॉर्म योग्य रीतीने भरण्यासाठी आवश्यक गोष्टी-
*ऑनलाईन पद्धतीने पूर्ण भरलेल्या फॉर्मची प्रत त्याप्रमाणे तो फॉर्म पोहोचल्याच्या पावतीची प्रत.
*मागणी धारकाच्या सहीसह मूळ सत्यप्रतिज्ञा पत्र.
*मागणी केलेले प्रमाणपत्र आणि पैसे यांची पोहोच मिळाल्याची आगाऊ पावती.(Advance Reciept)
*मुदत संपलेली ठेव, कर्जरोखे, प्राधान्य भाग कागदी स्वरूपात (Physical) असेल तर त्याचे मूळ प्रमाणपत्र.
*जर डी मॅट स्वरूपात असल्यास ते वजा झाल्याचे व्यवहार पत्र.(Transaction statement)
*आधार कार्डाची स्वप्रमाणित प्रत
*समभाग किंवा रोखे यांचा क्रमांक (Folio No), लाभांश, व्याज याच्या वॉरंटचा तपशील.(हा आपल्याकडील जुन्या डिव्हिडंड वॉरंटवरून अथवा संबधित कंपनीतून मिळवता येईल.
*रद्द केलेल्या चेकची प्रत.
*आवश्यक तेथे वारसा प्रमाणपत्र.
*परदेशी नागरिक अथवा अनिवासी भारतीय
असल्यास पासपोर्ट किंवा नागरिक प्रमाणपत्र.
अशा रीतीने पैसे अथवा प्रमाणपत्र परत मिळवणे थोडे जिकरीचे काम आहे ही माहिती चिकाटीने कंपनीकडून मिळवून फॉर्म ऑनलाईन भरणे अनेकांना त्रासदायक वाटते त्यामुळे ज्या उत्साहाने सुरुवात होते तो थोडे दिवसात मावळतो.खरंतर आवश्यक माहिती हाताशी ठेवून हा फॉर्म कोणालाही भरता येणे सहज शक्य आहे. काही ठिकाणी रक्कम परत मिळवण्यासाठी त्याहून अधिक खर्च प्रतिज्ञापत्र करणे, पोस्टज यावर करावा लागत असल्याने त्याचा त्याग केला जातो. अनेकदा मूळ गुंतवणूकदाराच्या वारसामध्ये वाद असतो तर काही वारसांना यात आजिबात रस नसतो त्यामुळेच कोट्यवधी रुपयांची रक्कम फंडात बेवारस पडून असून दरवर्षी त्यात सातत्याने वाढ होत आहे. तेव्हा या सर्व गोष्टी टाळण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी अधिक जागरूक राहणे गरजेचे असून आपण जमा केलेली रक्कम या फंडात न जाता आपल्याकडे कशी राहील याबाबत सावधानता बाळगावी. गुंतवणूक तपशील न ठेवणे,पत्ता बदलणे आणि बँक खाते बंद करणे त्याची सर्वत्र नोंद न करणे ही यामागील महत्वाची कारणे आहेत.यातील बहुतेक रक्कम ही पुरेशा अर्थसाक्षर नसलेल्या लोकांची स्वकष्टार्जीत पुंजी आहे. या फंडांकडे कोट्यावधी रुपयांची रक्कम मागणीअभावी पडून आहे. अजूनपर्यंत तरी अशी रक्कम कायद्याने कायमची सरकारजमा होईल अशी तरतूद नाही तरीही महसूल वाढीसाठी भविष्यात यावर मर्यादा येऊ शकतात कारण आपल्या उत्पन्नात कुणाला फारसे न दुखावता वाढ कशी होईल यासाठी प्रत्येक सरकार प्रयत्नशील असते. आपली गुंतवणूक त्यापासून मिळालेले उत्पन्न वेळोवेळी प्रत्येकाने तपासावे तसेच चालू आर्थिक वर्षात व्याज, मुद्दल या स्वरूपात मिळणारा परतावा नोंदवून ठेवून तो मिळाला की नाही हे तपासावे म्हणजे असा द्रविडी प्राणायाम करावा लागणार नाही.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 8 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Saturday, 16 October 2021
निओ बँक
#निओ_बँका
असं समजुयात की या जगाचे दोन भाग आहेत एक तुम्ही आम्ही राहतो ज्याला आपण आपलं खरं जग समजतो. तिथे माणसांची गर्दी, विविध ऋतू, काळ-वेळ, मनातल्या भाव भावना असं सगळं आहे आणि दुसरं म्हणजे आभासी जग जिथे इंटरनेटचं मायाजाल आहे, विविध किरणांचा गोतावळा आहे. अचानक जर आपल्याला समजलं, की आपलं हे राहतं जग, हे खरं नसून प्रचंड गुंतागुंतींचं जाळं आहे आणि त्याच्यावर यंत्रांचे नियंत्रण आहे तर...
तर काय मंडळी चक्रावलात ना? सन 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या दि मॅट्रिक्स हा चित्रपट व त्यानंतर काही काळाने प्रकाशित झालेले त्याचे पुढील भाग याच संकल्पनेवर आधारित आहेत. निओ शब्दावरून मला पाहिली आठवण झाली ती वरील चित्रपटाची. या चित्रपटातली सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या आणि निओ या टोपणनावाने हॅकिंग करणाऱ्या नायकाला या जगात काहीतरी अनाकलनीय असल्याचे भास होत असतात त्याची त्रिणीटी नावाची हॅकर मैत्रीण त्याला याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मार्फीयस मदत करू शकेल असे सांगते त्याची व निओची भेट झाल्यावर निओला आपण सर्वजण आभासी जगात रहात असून येथे यंत्रांनी मानवांवर नियंत्रण मिळवले असून त्यांना लागणाऱ्या ऊर्जेसाठी ते मानवी शरीराचा वापर करीत आहेत. खऱ्याखुऱ्या जगातील आता फक्त एकच शहर अस्तित्वात असून ते वाचवण्यासाठी एजंट स्मिथशी लढावे लागेल. या लढ्यात निओ सहभागी होऊन खडतर प्रशिक्षण घेऊन आपल्यासह सर्वांची सुटका करून आभासी जगातून खऱ्या जगाकडे येण्यास निघतात. त्याचा आणि निओ बँकेचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही केवळ निओ नावावरून या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या.
यापूर्वी आपण फिनटेक उद्योगांची माहिती करून घेतली आहे. यातील फिनटेक हा शब्द Finance व Technology या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. निओ बँका हे वेगळ्या प्रकारचे सेवा देणारे स्टार्टअप असून त्यांनी जगभरात बँकिंग उद्योगात खळबळ माजवली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणारी तरुण पिढी हे त्यांचे ग्राहक आहेत. भारताची लोकसंख्या व त्यातील तरुणांची संख्या यामुळे जगातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे उपलब्ध झाली आहे. सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा जसे- बचत, गुंतवणूक, पैशांचे हस्तांतरण, कर्ज देणे या सुविधा त्यांच्यामार्फत कमी वेळेत आणि तत्परतेने केल्या जातात. तेव्हा या निओ बँका म्हणजे काय? त्यांचे प्रकार त्याच्यापासून ग्राहकांना होणारे फायदे याविषयी अधिक जाणून घेऊयात.
आमची कुठेही शाखा नाही हे ब्रीदवाक्य असलेल्या पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने अँप अथवा डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्याचा सोय देण्याची व्यवस्था म्हणजे निओ बँक. खऱ्या अर्थाने शाखा नसलेली ही डिजिटल बँक आहे. अनेक प्रकारच्या वित्तीय सेवा या त्यांना पारंपरिक बँकेपेक्षा किमान खर्चात आणि त्वरित मिळतात निओ बँक या फिनटेक स्टार्टअप कंपन्या आहेत. सेवाक्षेत्रांत त्यांची गणना करता येईल. जगभरात अशा कंपन्या अस्तीत्वात असून त्याची विभागणी तीन प्रकारात करता येईल.
1)स्वतःचा बँकिंग परवाना नसलेल्या निओ बँका- या फिनटेक कंपन्या मान्यताप्राप्त बँकेबरोवर भागीदारी करार करून त्याच्या आणि आपल्या सेवा सुविधा ग्राहकांना देतात.
2)पारंपारिक बँकांच्या स्वतःच्या निओ बँक- अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे यावेत या हेतूने अनेक बँकांनी स्वतःच उपकंपन्या स्थापन केल्या असून त्याद्वारे निओ बँक सुविधा आपल्या ग्राहकांना देतात.
3)स्वतःकडे बँकिंग परवाना असलेल्या निओ बँक: याच्याकडे बँकिंग परवाना आहे पण शाखा काढण्याऐवजी आपल्या ग्राहकांना निओ बँक सुविधा देतात.
जगभरात स्वताचा परवाना असलेल्या निओ बँक अत्यंत कमी आहेत. बहुतेक सर्व निओ बँक पहिल्या दोन प्रकारातच आहेत.
निओ बँक पारंपरिक बँकांच्या तुलनेत बँकिंग सेवा सुलभ लवचिक पद्धतीने देतात. ग्राहक हा त्यांचा केंद्रबिंदू आहेत त्यांना अनुकूल आणि वैयक्तीक सेवा ग्राहकांना देतात. तंत्रज्ञान हा त्यातील महत्वाचा भाग आहे त्याच्याकडे जमा होत असलेली ग्राहकांच्या माहितीचे वर्गीकरण, पृथक्करण करून ग्राहकांची मानसिकता जाणण्याचा या बँका प्रयत्न करतात. विशिष्ठ प्रसंगात ग्राहक कसा वागेल याचा त्या अंदाज बांधतात. ग्राहकांच्या समाधानपूर्तीबाबत जगभरातील निओ बँक ग्राहक अधिक समाधानी असल्याचे विविध सर्वेक्षणात आढळून आले आहे. पारंपरिक बँकांकडे तंत्रज्ञात बदल करून ते लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत अधिक विकसित तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने वारंवार असे बदल करण्यापेक्षा फिनटेक कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने सेवा घेऊन ग्राहकांना देणे लाभदायक होते. त्यामुळेच नवनवीन कल्पना घेऊन येणाऱ्या फिनटेक कंपन्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. सध्या निओ बँका पारंपरिक बँकांहून जवळपास दुप्पट प्रमाणात वेगवेगळ्या सेवा आपल्या ग्राहकांना देत आहेत. यात खाते उघडून डिपॉझिट बनवणे, देशांतर्गत व परदेशात पैसे पाठवणे, विविध बिले भरणे, कर्ज देणे या नियमित सुविधांसह आभासी डेबिट कार्ड देणे, विनामूल्य क्रेडिट कार्ड देणे, पिन सेट करणे, खर्च मर्यादा निश्चित करणे, गुंतवणुकीसंबंधी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देऊन अशी गुंतवणूक करण्याची सोय अल्प मूल्य आकारून किंवा विनामूल्य देणे, खर्चाबद्दल कॅशबॅक देणे, काही क्रेडिट पॉईंटस देऊन ते वटविण्याची सोय उपलब्ध करणे, डिपॉझिटवर अधिकदराने व्याज देणे या सारख्या मूल्यवर्धित सुविधा देत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढत आहे.
निओ बँक व डिजिटल बँक याच्या व्यवहार पद्धतीत खूप साम्य असल्याने अनेकांना त्या सारख्याच वाटतात. डिजिटल बँकिंग सुविधा ही बँकेने स्वतः यंत्रणा उभारून आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली असून निओ बँक सेवा ही स्वतःच्या उपकंपनी मार्फत अथवा नवीन स्टार्टअप मार्फत उपलब्ध करून दिलेली असते हा यातील महत्वाचा फरक आहे. या सेवा देणाऱ्या फिनटेक कंपन्या थेट रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली नसल्या तरी त्यांच्या संदर्भात कोणतीही तक्रार उद्भवली असता त्याची जवाबदारी ही त्याच्याशी संबंधित बँकेची आहे त्याचप्रमाणे ठेवीदारांना मिळणारे 5 लाख रुपयांपर्यंतचे अधिकतम सुरक्षा कवच ठेव विमा महामंडळाकडून (DICGC) यातील ठेवींना उपलब्ध आहे. या सर्व सेवा वाजवी दरात अथवा विनामूल्य मिळत असल्याने तसेच त्या जलद गतीने होत असल्याने ग्राहकांना उपयुक्त व पर्यावरण पूरक आहेत. याशिवाय बँका अशा कंपन्यांची निवड कठोर निकषांवर करून त्यांच्या सेवेचे मूल्यमापन वेळोवेळी करीत असतात. सध्या देशात निओ बँक सेवा देणाऱ्या 27 कंपन्या असून त्यातील 8 जणांचे वेगळे पेमेंट प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे ग्राहकांना आपल्या व्यवहारास पूरक पर्याय निवडणे शक्य झाले आहे. ठेव आणि कर्ज यावर प्रचलित दाराहून वेगळा स्पर्धात्मक दर मिळू शकतो, जे ग्राहक तंत्रज्ञानस्नेही आहेत त्यांनी निओ बँकेकडून अशा सेवा घेण्यास कोणतीच हरकत वाटत नाही.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 15 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Friday, 8 October 2021
आम्ही गरीब मध्यमवर्गीय
#आम्ही_गरीब_मध्यमवर्गीय
माझा एक मित्र एका नामवंत कंपनीत नोकरीला आहे. त्याच्या पगारात 3 साधारण कुटुंब सहज पोसली जातील एवढा त्याचा पगार आहे. तो कायम स्वतःला गरीब मध्यमवर्गीय समजत असतो. त्याचा पगार बराच असल्याने दरमहा बऱ्यापैकी रक्कम कर म्हणून कापली जाते. याबाबत तो कायम नाराजी व्यक्त करीत गरीबाकडून कशाला टॅक्स घेतंय सरकार म्हणून सरकारवर उखडत असतो. आपल्या तथाकथित गरिबीचे गाऱ्हाणे तो गात असतो. त्याला कायमच खर्चाचा कुठेना कुठे पडलेला खड्डा दिसत असतो. गरीब शब्दाचा स्वभावाशी अर्थ जोडलेला आहे अशी गरिबी आपण समजू शकतो. आर्थिकदृष्ट्या गरिबीही ठरवता येते. याचे प्रत्येक देशाचे निकष वेगवेगळे असतात. जागतिक बँकेने किंवा आपल्या देशाने याचे ठरवलेले निकष खूप हास्यास्पद आहेत. या निकषानुसार जगात फक्त 6% च्या आसपास गरीब लोक आहेत.
सर्व जगभर संपत्तीचे असमान वितरण झाले आहे असून 10% अतिश्रीमंत लोकांकडे 90% संपत्ती तर 90% बाकी लोकांकडे 10% संपत्ती असा तीव्र विरोधाभास आहे. जगातील सर्व संपत्तीचे प्रत्येकास समान वाटप केले असता पुढील 10 वर्षात 10% लोकांकडे 90% पुन्हा एकवटेल असा अंदाज आहे त्यामुळे यापुढे आर्थिक समानता जवळपास अशक्य आहे. यात आपण ज्याला मध्यमवर्ग असे समजतो आहोत, त्याची सर्वाधिक गोची आहे, त्याला गरिबांसाठी असलेल्या सवलती मिळत नाहीत आणि इच्छा असूनही अतिश्रीमंतासारखा खर्च हे लोक करू शकत नाही. याच्या राहणीमानात काही थोडा फरक पडला तरी अनेकजणांच्या मनोवृत्तीत फरक पडलेला नाही म्हणजे सरकारी शाळा दवाखाने यांचा ते वापर करणार नाहीत पण यात सुधारणा व्हायला पाहिजे म्हणून बोलत राहणार. ऐपत असून लस प्रायव्हेट मध्ये न घेता सरकारी केंद्रातून घेणार. यांना व्यवसायात कमीपणा वाटणार, नोकरी मात्र सरकारी हवी. अतिश्रीमंतासारखं वागता येत नाही आणि एकदमच गरिबीची कुठेतरी लाज, अश्या द्विधा मनस्थितीतील हा वर्ग आहे. सरकारी निकषांवर जे गरीब आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत तर अतिश्रीमंताना यातील कोणत्याच गोष्टीचे सोयरसुतक नाही. देशावर कोणतेही संकट आलं तर सर्वाधिक फटका याच लोकांना बसणार. तरीही आहे त्या परिस्थितीत त्यास अनुरूप बदल करून हा वर्ग टिकून आहे. या गोष्टींची वेळोवेळी तो किंमत मोजत असतो. यातही 2 प्रकार आहेत. एक किमान आवश्यक गरजा भागवू शकणारा वर्ग असून दुसरा अतिश्रीमंतांच्या जवळ आहे. हे दोन्ही काहीसा फरक पडला की त्याच्या खालील किंवा वरील वर्गात दाखल होऊ शकतील अशा सीमारेषेवर आहेत. मग नेमके मध्यवर्गीय कुणाला म्हणायचे ?
मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिक्षण विभागाकडून विभागीय अध्यक्ष तुमच्या भेटीला या कार्यक्रम मालिकेअंतर्गत सुप्रसिद्ध अर्थतज्ञ गिरीश जाखोटीया यांचे अर्थसंकल्पावर फार पूर्वी एक व्याख्यान पूर्वी झाले त्यात त्यांनी मध्यमवर्गीय या मुद्द्यावर प्रकाश टाकला. कुटुंब या संज्ञेतर्गत त्यांनी नवरा बायको त्यांची दोन मुले आणि मुलांचे आजी आजोबा असलेले म्हणजे एक कुटुंब असे धरले हे कुटुंब तालुक्याच्या ठिकाणाच्या जवळपास रहात आहे किंवा मोठ्या शहरात असेल तर त्याची राहायची सोय आहे हे गृहीत धरले आहे. या कुटूंबाच्या सर्वसाधारण आवश्यक गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, करमणूक , मुदतीचा विमा, आरोग्यविमा, पर्यटन आणि गुंतवणूक या गरजा भागविण्यासाठी त्याचे उत्पन्न मासिक उत्पन्न किमान ₹30000/-असायला हवे अशा व्यक्तीस आपण मध्यमवर्गीय असे म्हणू शकतो असे त्यांनी सांगितले. करोना नंतर सर्वच क्षेत्रात झालेली महागाईचा आणि ठेवींवरील मिळणाऱ्या व्याजदारातील घट यांचा विचार करता ही रक्कम थोडी वाढेल. तेव्हा सध्याच्या काळात आपण दरमहा ₹ 40000/-कमावणारे कुटुंब हे मध्यम वर्गीय कुटुंब म्हणता येईल. याहून अधिक उत्पन्न असलेली कुटूंबे उच्च तर त्याहून कमी उत्पन्न असलेली कुटुंबे निम्न वर्गात मोडतील, हेच सर्व मध्यमवर्गीय म्हणवणाऱ्यानी लक्षात ठेवावे.
आपले पोट भरलेले असताना पैसा माया आहे म्हणणे सोपे आहे. इथे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात हेच सत्य असल्याने अंथरूण पाहून पाय पसरावे ऐवजी आपले अंथरूण वाढवता कसे येईल याकडे लक्ष द्यावे. आपला जन्म कुठे होईल हे जरी आपल्या हातात नसले तरी योग्य मार्गाने आपल्याकडे असलेल्या पैशाचे नियोजन आपल्याला करता येणे शक्य आहे. असलेली संपत्ती जतन करणे त्यात वाढ करता येणे आणि नसल्यास ती निर्माण करणे आवश्यक आहे. इथे एवढा विरोधाभास आहे की वरील रकमेच्या चारपट मिळवणाऱ्या कुटुंबाची जीवनपद्धती इतकी बदलली आहे की त्याच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही तर परिस्थितीवर मात करणारी मासिक ₹20000/- मिळवणारी व्यक्ती निग्रहाने ₹2000/- बाजूला ठेवू शकते. यासाठी ज्ञान आणि व्यासंग याची आवड असणे जरुरीचे असून लाभ आणि लोभ यातील फरक ओळखता येणे आवश्यक आहे. योग्य तेथे भीती तर आवश्यक तेथे धाडस बाळगावे लागेल. यात कुठेही थोडीशी चूक म्हणजे आर्थिक नुकसानच म्हणूनच-
*अवास्तव परतावा देणाऱ्या योजनांवर विश्वास ठेवू नका.
*तोंडी अथवा लिखित आश्वासनांवर विसंबून शेअर, डिरिव्हेटिव सारखे धोकादायक व्यवहार करू नका. अशा आश्वासनांना काहीच अर्थ नाही. यातील धोका समजून घ्या.
*आपली गुंतवणूक अश्याच गोष्टीमध्ये असू द्या ज्यांची आपणास पूर्ण माहिती आहे. हे थोडं कठीण असलं तरी अशक्य नाही.
*तुमच्या बँकेतील गुंतवणूक सल्लागारावर अजिबात विश्वास ठेवू नका त्याच्या दृष्टीने तुम्ही त्यांचे बकरे असता. ते जरी तुम्हाला तुमची खूप काळजी असल्याचे दाखवत असले तरी सर्वसाधारणपणे त्यांना तुमच्या गुंतवणुकीमुळे, त्यांचा काय फायदा होईल ? याचाच विचार ते करत असतात.
*तुमचा मित्र किंवा नातेवाईक अधिक आस्थेने तुमची चौकशी करीत असेल तर अधिक सावध रहा कारण कदाचित तो तुम्हाला एखाद्या योजनेत अडकवू शकतो.
*सेबीकडे नोंदणी न केलेल्या मध्यस्थामार्फत कोणतेही गुंतवणूक व्यवहार करू नका.
*रोख रक्कम देऊन कोणतेही गुंतवणूक व्यवहार करू नका.
*डिरिव्हेटिव व्यवहार हे सर्वसाधारण व्यवहारापेक्षा अत्यंत धोकादायक असून यामुळे आपले भांडवल पूर्ण नाहीसे होऊन थकबाकी निघू शकते. जी देण्याचे कायदेशीर बंधन गुंतवणूकदारावर आहे.
*स्वतःकडे कोणत्याही योजनांची एजन्सी नसलेले आणि स्वतंत्रपणे फी आकारून गुंतवणूक सल्ला देणाऱ्या व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या.
*पी एम एस, स्मॉल केस योजना यांचा गुंतवणूक योजना म्हणून विचार करता येईल.
*म्युच्युअल फंडांकडे तुमच्या गरजेनुसार विविध योजना आहेत.
*स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करताना ही गुंतवणूक भविष्यात पांढरा हत्तीतर ठरणार नाही ना? याचा विचार करा. सन 2007- 2008 नंतर अशी गुंतवणूक ही लाभदायक ठरण्याऐवजी खर्चिक ठरत आहे.
*माझे मित्र नितीन पोताडे यांनी डेटा एनालेसिसचा वापर करून डे ट्रेडिंग कसे करावी याची पद्धत शोधली असून ती प्रामुख्याने तांत्रीक विश्लेषणावर आधारित आहे पण त्याचा उपयोग मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास होऊ शकतो त्याचा स्वतःचा Nitin Potade या नावाचा यु ट्यूब चॅनल आहे. तर दुसरे एक मित्र पंकज कोटालवार यांनी प्रामुख्याने प्राथमिक विश्लेषणाचा वापर करून स्विंग ट्रेड आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची स्वतःची पद्धती विकसित केली आहे. त्याचे संपत्तीचा पंकोमार्ग, उद्योगगाथा, ग गुंतवणुकीचा यासारखी पुस्तके ई साहीत्य प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. स्विंग ट्रेडर्स ग्रुपला मार्गदर्शन करण्यासाठी 8 व्हिडीओ व 35 च्या आसपास लेख त्यांनी लिहले असून विविध समाजमाध्यमातून पारदर्शकतेने यावर विस्तृतपणे माहिती देऊन या दोघांनी मराठी माणसांना उपकृत केले आहे. त्यांची पद्धत समजून घेऊन त्याचा वापर आपणास करता येईल का? त्याच्या पद्धतीत काही त्रुटी वाटतात का? याबाबत त्याच्याशी चर्चा करा. याहून वेगळी आणि स्वतःची पद्धत आपल्याला विकसित करता येईल का? याचा विचार करा.
*खरंतर शेअरबाजार हे एकच असे क्षेत्र आहे जेथे स्पर्धा नाही. समूहाची मानसिकता हा याचा पाया असून अधिक लोक एका दिशेने एकवटून एकाच प्रकारचे काम केल्यास आपणास अपेक्षित निष्कर्ष मिळून सर्वाचा फायदा होऊ शकतो. अन्य व्यवसायात एकाच पद्धतीने अनेकांनी व्यवसाय केल्यास नफ्याची विभागणी होऊन त्यात घट होईल.
*शेरबाजारातून काही न करता भरपूर पैसे मिळतील किंवा यापासून दूरच राहायला हवं असे टोकाचे विचार सोडून हा एक गुंतवणूक करण्याचा मार्ग आहे हे लक्षात असू द्या.
*क्रेप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी यातील भावात होणारे तीव्र उतारचढाव, त्याला सध्यातरी कायदेशीररीत्या नसलेले पाठबळ हे मुद्दे लक्षात घ्या.
*तुमच्या गुंतवणुकीतून अवास्तव (म्हणजे काय हे ही तुम्हीच ठरवा) परतावा मिळत असल्यास त्याचा अवश्य लाभ करून घ्या. आभासी फायदा तोट्याला फारसा काही अर्थ नाही.
*या जगात फुकट काही मिळेल या भ्रमात राहू नका आपली मानसिकता बदला आणि योग्य तेथे पैसे मोजण्याची तयारी ठेवा. जगात फार थोडे लोक मोफत प्रामाणिक सल्ला देतात ज्यांची आठवण आपल्याला कुठेतरी अडकल्यावरच होते. त्यांच्याशी मागाहून चर्चा करण्यापेक्षा गुंतवणूक करण्यापूर्वी चर्चा करा.
भक्ष आणि भक्षकांनी भरलेल्या या जगात स्वतःहून कुणाला फसवू नका आणि कुणाकडून फसू नका.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 8 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Friday, 1 October 2021
विचित्र व्यापार उडवी हाहाकार
#विचित्र_व्यापार_उडवी_हाहाकार
#Freak_Trade
अर्थव्यवस्थेत काही नवनवीन शब्दाचा उदय होत असतो मग ते शब्द चागलेच रुळतात. त्याचा कसा आणि कधी शिरकाव झाला ते कळत नाही.अलीकडेच एका वाहिनीवरील चर्चेत 'फ्रिक् ट्रेड' हा शब्द ऐकायला मिळाला. त्याबरोबर हे नवीन काय आहे? आपल्याला कसं माहिती नाही असा विचार प्रथम मनात आला. 'ट्रेड' म्हणजे काय? हे सर्वानाच माहिती आहे. तेव्हा 'फ्रिक्' या शब्दाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा उच्चार फ्री सारखाच पण त्यात हलंत क् सारखा असून नाम म्हणून अति रस घेणारा माणूस किंवा विचित्र प्रसंग आणि क्रियापद म्हणून तीव्र प्रतिक्रिया देणे किंवा एखाद्याची बोलती बंद करणे अशा अर्थी वापरला जातो. हो हो घाबरू नका मी काही तुम्हाला व्याकरण सांगण्याच्या, समजवण्याच्या, शिकववण्याचा भानगडीत पडत नाही. तुम्ही एक गुंतवणूकदार असाल तर या विचित्र शब्द असलेल्या व्यापाराने तुमच्या गुंतवणूक धोरणावर काहीही परिणाम होणार नाही. मात्र तुम्ही सट्टेबाज असाल डिरिव्हेटिव सारखे जोखमीचे व्यवहार करीत असाल तर हा शब्द त्याचे नाम आणि क्रियापद या दृष्टीने असलेल्या दोन्ही अर्थांचा प्रत्यय देईल तर इतरांना माहिती म्हणून हे काय प्रकरण आहे ते समजेल.
गेले दीड दोन महिने फ्रिक् ट्रेड (विचित्र व्यापार) हा शब्द चर्चेत आहे. अनेक ट्रेडर्सनी त्याच्या व्यवहारात झालेल्या नुकसानीचे स्क्रीन शॉट समाजमाध्यमांवर जाहीर केले आहेत यातील बहुतांश व्यवहार हे निफ्टी 50, बँक निफ्टी या इंडेक्समधील डिरिव्हेटिव व्यवहारासंबंधातील आहेत. विविध वाहिन्यांवरील चर्चेत त्याचा वारंवार वापर केला जात आहे. हा बेकायदेशीर व्यवहार नाही तर नवीन व्यवस्थेचाच भाग आहे. 16 ऑगस्ट 2021 पासून राष्ट्रीय शेअरबाजाराने स्टॉपलॉस ऑर्डर टाकताना असलेली विशिष्ठ व्यवहार मर्यादा (TER) काढून टाकली. असे करणे जगभरातील बाजार व्यवहार घोरणांशी सुसंगत असून नियमानुसार त्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. (या घडामोडींनंतर स्टॉप लॉस ऑर्डर पुन्हा विशिष्ट मर्यादेत टाकता येईल का? यावर पुन्हा विचार चालू असल्याचे समजते. नियमात बदल सर्व गोष्टींचा विचार करून केला असेल तर आता पुनर्विचार कशासाठी हे मला न समजलेले कोडे आहे) हे व्यवहार कसे घडतात त्यावर उपाय काय असू शकतील याचाही विचार करूया. याची सुरूवात 20 ऑगस्ट 2021 रोजी झाली यादिवशी निफ्टी 16450 CE चा प्रीमयम डोळ्याचे पाते लवते न लवते तोच काही समजण्याच्या आत क्षणार्धात 100 वरून 800 पर्यत वाढला त्यामुळे ज्यांच्या शॉर्ट पोझिशन होत्या अनेकांचा स्टॉप लॉस हिट होऊन मार्केट ऑर्डर टाकली जाऊन उपलब्ध वेगवेगळ्या प्रीमियमने पोझिशन स्क्वेअरअप झाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. हे कसं झाले ते पाहुयात. या ट्रेडरने
16450 CE 100 रू प्रीमयम घेऊन शॉर्ट केला 140 रु प्रीमियामला त्याने मार्केट ऑर्डर देऊन स्टॉपलॉस लावलाय जेव्हा हा प्रीमियम 140 गाठेल तेव्हा टाकलेली ऑर्डर उलट होऊन खरेदीदार शोधण्याचा प्रयत्न करेल. ज्या जवळच्या किमतीस खरेदीदार उपलब्ध त्या किमतीने खरेदी व्यवहार होईल. 140 ला टाकण्यात येणाऱ्या स्टॉप लॉस ऑर्डर्सची सुरुवात, जेव्हा हा प्रीमयम 136 च्या आसपास असतो तेव्हा सुरुवात होऊन उपलब्ध किमतीस खरेदी केली जाते. नियमित बाजारात ही खरेदी 140 रूपयांच्या मागेपुढे होईल. मात्र 20 ऑगस्टच्या दिवशी जेव्हा हा प्रीमियम काही क्षणात 800 हून अधिक झाला तेव्हा 803.50 ₹ प्रीमयम देऊन 6000 लॉटसची खरेदी झाली. विशिष्ट किमतीस खरेदी ऑर्डर सामावून घेणाऱ्या पुरेश्या विक्रेत्यांच्या अभावामुळे हे घडले. जर ही खरेदी ₹800/- प्रीमियम देऊन झाली तर 800-100= 700 म्हणून 700×50=35000 ₹ तोटा एका लॉटमध्ये झाला.
यामधून महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की हे कसे टाळता येऊ शकेल?
*सर्वसाधारणपणे ट्रेडिंग करताना स्टॉप लॉसचा वापर करावा हे धोका व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगितले जाते. आता डिरिव्हेटिवच्या संदर्भात यात बदल करावा लागून असा स्टॉप लॉस लावू नये असे सांगावे लागेल. हे एक नवीन सामान्य (New normal) असेच समजावे. यासाठी एक्सचेंजला दोष देण्यात अर्थ नाही.
*त्याचप्रमाणे असा स्टॉप लॉस न लावल्यामुळे अपेक्षित नुकसान अधिक होण्याची शक्यतेचा धोकाही वाढू शकतो.
*जे लोक हाताने ऑर्डर टाकून असे निर्णय घेतात त्यांना इतक्या चापल्याने निर्णय घेऊन ऑर्डर टाकता येणे जवळपास अशक्य आहे हे व्यवहार इतक्या कमी वेळात घडतात की जे स्क्रीनवर लक्ष ठेवून असणाऱ्यानाही हे व्यवहार झाल्याचे नोटिफिकेशन आल्यावरच समजते. तेव्हा मार्केट ऑर्डर ऐवजी लिमिट ऑर्डर एका विशिष्ट मर्यादेत टाकता आल्यासाच थोडासा दिलासा मिळू शकतो अशी ऑर्डर सध्या टाकता येते पण तरीही एखाद्या खऱ्याखुऱ्या बातमीमुळे प्रीमियम कमी अधिक वाढत राहिल्यास अमर्याद तोटा वाढत राहण्याचा धोका राहतोच.
*तुमच्या ब्रोकरकडून तुमच्या स्टॉपलॉस विषयी पूर्वसूचना मिळेल अशी सोय असल्यास योग्य वेळी तुम्हाला तुमची ऑर्डर टाकता येऊ शकेल.
*फ्रिक् ट्रेड कालावधी अत्यंत कमी सेकंदाचा असतो एखाद्या ट्रेडिंग सॉफ्टवेअरचा वापर करून ट्रेडिंग करतात त्यास फ्रिक ट्रेड समजून स्टॉप लॉस मर्यादा आल्यावर 10 ते 15 सेकंद कोणतीही ऑर्डर न टाकता, बाजारातील प्रीमियमवर गुणवत्तेनुसार विचार करूनच प्रीमियम स्टॉप लॉसच्या आजूबाजूला असेल तरच ऑर्डर टाकली जाईल अशा प्रकारचे बदल करावे लागतील.
याशिवाय को लोकेशन सुविधा ज्यामुळे एक्सचेंजला पैसे देऊन अशी सुविधा घेतलेल्या व्यक्तीच्या ऑर्डर इतरांच्याहून काही अंश सेकंदाने आधी एक्सचेंजवर टाकल्या जातात. याशिवाय तीव्र क्षमतेची कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सुसज्य यंत्रणा, अल्गो ट्रेडिंग मोजक्याच लोकांकडे एकवटली असल्याने होत निर्माण होत असणारी असमानता यामुळे ठराविक वर्गाला होणारा तोटा. यामुळे सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या मनोबलावर होणारा परिणाम यामुळे शेअरबाजारावरील विश्वास उडण्यात होण्याची शक्यता आहे. आज बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची असलेली टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना त्यांनी येथे टिकून राहणे हे आवश्यक आहे. यामुळेच को लोकेशन व अल्गो या संदर्भात निश्चित नियम करण्याची आवश्यकता बाजार नियामक मंडळ आणि सेबी यांनी घेणे आवश्यक आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 1ऑक्टोबर 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Posts (Atom)