Friday, 9 November 2018

जीवनविमा योजना विविध प्रकार

#जीवनविमा_योजना_विविध_प्रकार

   भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमा व्यवसाय हा खाजगी क्षेत्राकडे होता त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात येऊन तो भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे एकवटला. नंतर खाजगी क्षेत्राला परवानगी देण्यात येऊन एक वर्तुळ पूर्ण झाले. यापूर्वी 'आयुर्विम्याला पर्याय नाही' असे भारतीय आयुर्विमा महामंडाळाचे घोषवाक्य होते. अधिकाधिक लोकांनी स्वतःहून जीवनविमा घेऊन आपल्या आयुष्याच्या अशाश्वततेवर मात मिळवल्याचे समाधान मिळवावे असा त्यामागील हेतू होता. लोकांची क्रयशक्ती एवढी कमी होती की आपल्या आयुष्याचा जोखमीकरिता काही रक्कम खर्च करावी हे त्यांच्या गळी उतरवणे खूप कठीण होते. अनेक योजनांना बचतीची जोड देऊन विमा देण्यात एल आय सी ला यश मिळाले. जेव्हा महागाई नियंत्रणात होती तेव्हा या योजनेत भाग घेणाऱ्याना बऱ्यापैकी फायदा झाला एल आय सी चा व्यवसाय वाढला. त्याचा सर्वात महत्वाचा तोटा असा की आपल्याला किती पट विमाछत्र असावे याकडे दुर्लक्ष होऊन अशा योजना मागे पडल्या. कमीत कमी खर्चात, दीर्घकाळ आणि पुरेसे विमाछत्र असावे यासाठी या व्यवसायात सुरू झालेल्या स्पर्धेमुळे जागृती होऊन काही लोक पुरेसे विमासंरक्षण घेऊ लागले आहेत. असे असले तरी परारंपरागत उत्पादनांना मागणी असल्याने आणि ती सातत्याने वाढत असल्याने तसेच नातेवाईक मित्र एजंट यांच्याकडून सतत आग्रह धरला जात असल्याने अनेक गोंडस नावाची उत्पादने सर्वांकडून विकली जात आहेत. या योजना हा ग्राहक व विमाकंपनी यांच्यातील करार आहे असून या आणि अशा सर्वच प्रमुख योजनांची तोंडओळख आपण करून घेवूयात.
१.मुदतीचा विमा (Turm Insurance) : सर्वात स्वस्त आणि मस्त अशी ही विमा योजना असून यात व्यक्तीचे काही बरेवाईट झाले तरच मान्य केलेली रक्कम त्याच्या वारसास मिळते आणि धोक्यापासून संरक्षण होते. लवकरात लवकर यात भाग घेणे जरुरीचे आहे. जास्तीत जास्त रकमेचा, अधिकाधिक कालावधीचा विमा काढून घेतल्यास तो अतिशय स्वस्त पडतो. तसेच ऑनलाईन घेतला तर अधिक स्वस्त पडतो. ज्या हेतूने आयुर्विमा काढला पाहिजे त्या सर्व गरजा यातून पूर्ण होतात. विमा कालावधीत काही वाईट घटना न घडल्यास यात भरलेले पैसे परत मिळत नाहीत. हे पैसे असेच फुकट जाणे म्हणजे आपण जिवंत राहणे. तेव्हा अशा प्रकारे नुकसान होणे हेच सर्वात फायदेशीर आहे. आपल्या वार्षिक उत्पन्नच्या 20 पट रकमेचा विमा घेऊन वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन त्यात बदल करावेत.
२. युनिट संलग्न विमा योजना ( Unit Link Insurance Plan) : आयुर्विमा आणि बचत यांची सरमिसळ करून ही योजना बनवली असून यात नमूद केलेल्या करार कालावधीचा हप्ता भरावा लागतो. यातील काही भाग विमाछत्र घेण्यास वापरला जाऊन उरलेल्या भागाची समभाग, कर्जरोखे ,सरकारी रोख्यात विविध पर्यायात केली जाते. या योजनेतून पुरेसे विमाछत्र मिळू शकत नाही.
३.सावधी विमा योजना (Endroment Plan) : हा विमा आणि बचत यांचे एकत्रीकरण असलेला एक लोकप्रिय प्रकार आहे यातील बचतीची गुंतवणूक ही विमा कंपनीच्या मर्जीनुसार करण्यात येऊन त्यासाठी आलेला खर्च वजा करून बोनस दरवर्षी जाहीर करण्यात येतो. हा बोनस आणि मान्य केलेली रक्कम योजना चालू असताना धारकाचा मृत्यू झाल्यास वारसास किंवा मुदत पूर्ण झाल्यावर धारकास दिला जातो. ULIP च्या तुलनेत यातील गुंतवणूक कमी घोकादायक आहे.
४. बिलंबीत काळात काही प्रमाणात पैसे परत करणाऱ्या योजना ( Money Back Plan) : या वैशिष्ठपूर्ण अशा योजना असून यातील अंशतः रक्कम करारात नमूद केलेल्या कालावधीत परत मिळते. आणि जास्तीत जास्त रक्कम अधिक बोनस हा मुदतपूर्तीच्या वेळेस मिळतो. नमूद रकमेचे विमाछत्र मिळते.
५.आजीवन विमा योजना (Whole Life Plan) : हा नावाप्रमाणेच पूर्ण आयुष्यभराचा विमा करार असून त्यात नमूद केल्याप्रमाणे आजीवन अथवा 100 वर्ष पूर्ण होईपर्यंत विमा संरक्षण मिळते. नमूद कालावधीत पैसे भरावे लागत असून हा काळ पूर्ण झाल्यावर काही प्रमाणात यातील पैसे काढता येतात. ह्या योजनेचा कालावधी अधिक असल्याने त्यासाठी तुलनेने अधिक रक्कम हप्ता म्हणून भरावी लागते.
६. मुलांसाठीच्या विमा योजना ( Child Plans) : या योजना मुलांचा भविष्यात वाढणारा खर्च लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या असून यात नमूद केल्याप्रमाणे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर दरवर्षी अथवा एकरकमी परतावा देतात या कालावधीत विमा काढणाऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास पुढील हप्ते माफ होऊन नमूद पैसे मिळत रहातात.
७. निवृत्तीवेतन देणाऱ्या योजना (Pension Plan) : या निवृत्तीवेतन देणाऱ्या योजना असून यातील करारात नमूद केल्याप्रमाणे लगेच अथवा काही कालावधीनंतर निवृत्तीवेतन मिळत राहाते. यातून कोणत्याही प्रकारचे विमाछत्र मिळत नाही.
या ठळक योजनांच्या शिवाय यात किरकोळ बदल किंवा दोन तीन योजनांचे एकत्रीकरण करून अजून वेगळ्या अशा अनेक योजना बनलेल्या आहेत. यातील प्रत्येक योजना हा करार असून त्यात नमूद केलेल्या अटींचे पालन करणे उभय पक्षांवर बंधनकारक आहे अन्यथा तो रद्द होतो. सर्व व्यक्तींना आयुष्याच्या धोक्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी मुदत विमा सर्वात योग्य आहे. विमा कंपनीने दिलेल्या इतर पर्यायाहून अधिक चांगला परतावा देणाऱ्या अन्य योजना असून मुदत विम्याबरोबर त्या घेऊन अधिकाधिक फायदा मिळवावा.

©उदय पिंगळे

मनाचेTalks येथे 9 नोव्हेंबर 2018 रोजी पूर्वप्रकाशीत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:

Post a Comment