Friday, 13 April 2018

पर्याय व्यवहार (Options Trading)


      #पर्याय_व्यवहार (Options trading)
  
पर्याय करार (Options contract ) हा एक भावी कराराचा प्रकार असून तो खरेदीदार / विक्रेता यांना विशिष्ठ मालमत्ता ठराविक तारखेस अथवा त्यापूर्वी विशिष्ठ किंमतीस खरेदी /विक्री करण्याचा हक्क देतो .या करारामूळे खरेदीदारास हक्क (Rights) प्राप्त होतो तर विक्रेत्याची ती जबाबदारी (Obligations) ठरते .यासाठी खरेदीदाराकडून विक्रेत्यांना प्रिमियम म्हणून काही रक्कम देण्यांत येते . खरेदीदार  हा हक्क घेईल अथवा घेणार नाही पण जर एकदा का खरेदीदाराने हा पर्याय स्विकारला तर विक्रेत्यास तो मान्य करावाच लागतो . खरेदीदाराचा तोटा मर्यादीत रहावा या हेतूनेच या करारांची निर्मिती झाली आहे .
फ्यूचर्स व ऑप्शन्स मधील ठळक फरक :
1.फ्यूचर्समध्ये दोन्ही पक्ष करार पूर्ण करण्यास बांधील असतात .ऑप्शन्समध्ये विक्रेता ज्यास ऑप्शन्स रायटर असे म्हणतात करारपूर्ण करण्यास बांधील असतो .
2. फ्यूचर्समध्ये कोणासही प्रिमियम द्यावा लागत नाही ऑप्शन्समध्ये खरेदीदाराकडून विक्रेत्यास प्रिमियम देण्यात येतो .
3.फ्युचर्समध्ये दोघानाही मार्जिन द्यावे लागते त्यामुळे मोठी रक्कम अडकून रहाते. ऑप्शन्समध्ये मार्जिन ऐवजी खरेदीदारास प्रिमियम  आणि विक्रेत्यास त्याच्या पात्रतेनुसार जोखीम कमी करण्याएवढे अपफ्रन्ट पेमेंट करावे लागते .जे जास्तीत जास्त त्या मालमत्तेच्या फ्यूचर्स करीता लागणाऱ्या मार्जिन एवढे असते .
4.फ्युचर्समध्ये अमर्याद नफा / नुकसान होवू शकते .ऑप्शन्समधे खरेदीदारास अमर्यादा नफा आणि जास्तीत जास्त प्रिमियम एवढे मर्यादीत नुकसान होवू शकते तर विक्रेत्यास अमर्याद नुकसान आणि मर्यादित नफा होवू शकतो .
5.फ्यूचर्सचा करार निश्चित केलेल्या तारखेस अथवा उलट व्यवहार करून बंद होतो तर ऑप्शन्स करार तो चालू असण्याच्या कालावधीत कधीही बंद करता येतो .
    ऑप्शन्स खरेदी केल्यानेच खरेदी / विक्री करण्याचे अधिकार प्राप्त होत असल्याने  त्याचे कॉल ऑप्शन्स व पुट ऑप्शन्स असे दोन प्रकार पडतात . कॉल ऑप्शन्समध्ये विशीष्ठ किमतीत मालमत्ता खरेदीचे अधिकार मिळत असल्याने जेव्हा तेजी अपेक्षित असेल तेंव्हा कॉल ऑप्शन्स खरेदी करून आणि मंदी अपेक्षित असताना पुट खरेदी करणे म्हणजेच आधी निश्चित केलेल्या किंमतीस मालमत्ता विकण्याचा हक्क विकत घेवून फायदा करून घेता येवू शकतो .
ऑप्शन्समधील तंत्र समजून घेण्यासाठी Yes Bank Ltd च्या कॉल ऑप्शन्सचा विचार करुयात .बँकेच्या शेअरचा सध्याचा भाव ₹314.50 आहे .26 एप्रिल 2018 रोजी बंद होणाऱ्या ऑप्शन्सचे  ₹270 ते 330 रुपयांचे प्रत्येकी 10 रुपयांच्या फरकाने कॉल उपलब्ध आहेत त्यांचा प्रिमियम ₹4.60 ते 50च्या आसपास आहे .बाजारभावाच्या सर्वात जवळ असणाऱ्या स्ट्राइक प्राईज ₹310 च्या कॉलचा प्रिमियम ₹12.85 आहे .या किंमतीचा एक लॉट घेण्यास 1750 शेअर्सचा एक लॉट असल्याने 1750*12.85=₹22400/- एवढा ऑप्शन्स प्रिमियम द्यावा लागेल .ऑप्शन्सची मुदत संपण्याच्या अगोदर बाजारभाव मूळ किंमत ₹310+प्रिमियम ₹12.85= ₹322.85 चे जेवढा वर जाईल तेथून नफा चालू होईल आणि तो कधीही काढून घेता येईल या भावावर एक रुपया वाढ खरेदीदारास =₹1750 रुपये नफा मिळवून देईल .जर भाव याखाली राहिला तर खरेदीदारास काहीच नफा होणार नाही आणि विक्रेत्यास प्रिमियम मिळाल्याने त्याचा फायदा होईल .तर खरेदीदाराचे ₹22400/- एवढे जास्तीत जास्त नुकसान होईल .याउलट याच स्ट्राईक प्राईजच्या  पुटचा प्रिमियम ₹8.10 आहे भाव ₹310-प्रिमियम ₹8.10=₹301.90 च्या खाली आला तर पुट खरेदी करणाऱ्याचा फायदा होईल .वेगवेगळ्या  स्ट्राईक प्राइजला त्यांच्या प्रिमियमनुसार हे गणित बदलू शकते .हे थोडे समजण्यास कठीण असल्याने यामागील तत्व एकदा समजले की सारे सोपे होते . स्टॉक आणि इंडेक्स यांचे फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे व्यवहार करार बंद होताना कोणतीही मालमत्ता हस्तांतरीत न होता , पैशांच्या स्वरूपात देवाण धेवाण होवून पूर्ण केले जातात .
©उदय पिंगळे
#महत्वाचे : वरील लेखन हे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची सर्वसाधारण माहिती करून देण्याच्या हेतूने केले असुन ती अत्यंत धोकादायक प्रकारात मोडते .याविषयी आपल्या गुंतवणूक सल्लगाराकडून माहिती करून घ्यावी .
        ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .


No comments:

Post a Comment