Friday, 27 April 2018

फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे उपयोग

#फ्यूचर्स_आणि_ऑप्शन्सचे_उपयोग

    फ्यूचर्स आणि ऑप्शन्स या विषयीची प्राथमिक माहिती आपण मागील काही लेखातून करून घेतली होती .बाजारातील घटक विविध कारणांसाठी त्यांचा वापर सातत्याने करीत असतात .भांडवलबाजाराचा प्रसार आणि प्रभाव यामुळे होत असतो आणि अधिकाधीक गुंतवणूकदार येथे आकर्षित होतात . रोज कोट्यावधी रूपयांचे व्यवहार येथे होतात .यावर सरकार अत्यल्प कर आकारते .त्यातून कोट्यावधी रुपये सरकारला मिळत असतात . मोठ्या प्रमाणावर फ्यूचर्स ऑप्शन्सचे व्यवहार वित्तसंस्था ( त्यांना असलेल्या विहित मर्यादेतच), मोठें गुंतवणूकदार , सट्टेबाज यांच्याकडून केली जाते . किमान रकमेत uजास्तीत जास्त फायदा मिळवणे हे गुंतवणूकदारांचे उद्दिष्ट असते . याशिवाय तोटा कमी करणे , फायद्याच्या संधी शोधणे हे हेतूही असू शकतात .एक वा अधिक तंत्रे स्वतंत्र अथवा एकत्रित वापरून या मधे काय केले की काय  होवू शकते  किंवा जोखीम व्यवस्थापन कसे होवू शकते , हे आपण पाहूयात .
   यांच्याकडे फंड मेनेजर असून त्याना मदत करण्यासाठी तज्ञ लोकांचीच टीम असते .हे लोक बाजारातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून असतात .
बाजारातील परिस्थिती पाहून , वेगवेगळे निकष वापरून ते अंदाज बांधत असतात .यासाठी फंडामेंटल / टेक्निकल एनालिसिसचा उपयोग त्यांना होतो .विविध सॉफ्टवेअर वापरून ते निष्कर्ष काढू शकतात .मालमत्तेची भविष्यातील किंमत ठरवण्यासाठी फ्युचर्सची निश्चित किंमत ठरण्याकरता ' कॉस्ट टू केरी ' हे मॉडेल वापरले जाते .यात मालमत्तेची विद्यमान किंमत , ती संपादन करण्यास येणारा खर्च आणि यातून मिळू शकणारे उत्पन्न याचा विचार केला जातो . ऑप्शन्सची किंमत निश्चित करण्यासाठी ब्लेक शॉल फॉर्मुला वापरला जातो त्यात ऑप्शन्स प्रिमियम , कालावधी , मालमत्तेचा सध्याचा भाव , स्ट्राईक प्राईज ,सामान्य  व्याजदर , मिळू शकणारे उत्पन्न ई अनेक गोष्टींचा उपयोग करतात .शक्यतो आर्बिट्रेशनची संधी मिळूच नये हा त्यांचा हेतू असतो .ही गुंतागुंतीची गणिती प्रक्रिया आहे .पण बाजार फक्त गणिती प्रक्रियेवर चालत नसल्याने  विपरीत परिणामाने मोठे नुकसान होवू शकते . त्यामुळे काही लोक तंत्रज्ञानाच्या जोडीला व्यवहारज्ञानाचा वापर करतात  .वॉल्युम आणि ओपन इंटरेस्ट , बिटा व्हेल्यु याही लक्षात घ्याव्या लागतात . सर्वसाधारणपणे हे लोक फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांचा कसा वापर करतात ते पाहूयात .
   वित्तसंस्था , सट्टेबाज , मोठे गुंतवणूकदार यांचा बाजार वर जाईल असा अंदाज असल्यास - ते स्टॉक फ्युचर्स , इंडेक्स फ्यूचर्स , कॉल ऑप्शन्स ची खरेदी आणि पुट ऑप्शन्सची विक्री करतात . याउलट बाजार खाली जाण्याची शक्यता असल्यास फ्युचर्स , कॉल ऑप्शन्सची विक्री आणि पुट ऑप्शन्सची खरेदी करण्यात येते .
   यांचे स्वतंत्र आर्बिट्रेजर असतात त्यांचे काम भावात असलेल्या फरकाचा फायदा करून घेणे एवढेच असते .संधी साधणे अशा अर्थाने संधीसाधू असतात .मोठे गुंतवणूकदार आर्बिट्रेशनसाठी फ्युचर्स ओव्हरप्राईज असल्यास स्पॉट मार्केटमधे खरेदी फ्युचर्सची विक्री करतात अथवा फ्यूचर्सचा भाव कमी असल्यास स्पॉट मार्केटमध्ये विक्री आणि फ्युचर्सची खरेदी करतात .फ्यूचर्स आणि ऑप्शन्स यांचा वापर करून भावातील चढ उताराचा धोका कमी करता येवू शकतो .यास हेजिंग असे म्हणतात यामुळे फायदा होत नसेल तरी नुकसान कमी होते .फायदेशीर नसलेली मालमत्ता विकता येते .यासाठी हेजर्स भावात मोठी चढ उतार होण्याची शक्यता असलेल्या मालमत्तेच्या फ्यूचर्सची विक्री करून किंवा पुट ऑप्शन्सची खरेदी करून यातील जोखीम  बऱ्याच प्रमाणात कमी होवू शकते .बाजाराच्या एकंदर स्थिरतेसाठी गुंतवणूकदारांएवढीच सट्टेबाजांची गरज आहे .त्यामूळे गुंतवणूकदाराना जोखीम पत्करून फायदा मिळवण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे .
   फ्यूचर्स आणि ऑप्शन्स हे व्यवहार गुंतागुंतीचे असून समजण्यास कठीण आहेत .यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल आणि धाडस लागते मागील काही लेखातून याविषयी सोप्या भाषेत माहिती करून देण्याचा प्रयत्न मी केला तो कितपत यशस्वी झाला हे आपणच ठरवावे यातून प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असावी .यातील पहिला  लेख वाचून त्यातील संकल्पना स्पष्ट झाल्या तरच पुढील लेख समजणे सोपे जाईल .यातील एखादे वाक्य किंवा परीच्छेद समजला नसेल तर तो माझा दोष आहे .लक्षात आणून दिल्यास तो अधिक सोपा करून दुरुस्त करता येईल .यानिमित्ताने गुंतवणुकीच्या वेगळ्या पर्यायांची तोंडओळख आपणास करून देता आली . यासाठी केलेल्या पूरक वाचनाने मला अधिक माहिती मिळाली .माझ्या दृष्टीने ही मोठी जमेची आणि आनंददायी बाजू आहे .

©उदय पिंगळे


ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 20 April 2018

ऑप्शन संबंधित व्यवहारांची शब्दावली


#ऑप्शन्स_संबंधीत_व्यवहारातील_शब्दावली
  ऑप्शन्स हा मालमत्तेचा भावी करार असून तो खरेदीदारास कराराच्या कालावधीत नमूद केलेली मालमत्ता खरेदी / विक्री करण्याचा हक्क देत असून विक्रेत्यावर हा करार पूर्ण करण्याचे बंधन टाकतो .हे व्यवहार कसे होतात ते आपण यापूर्वीच्या लेखात समजून घेतले .या व्यवहारासंबंधी काही परिचित , अपरिचित शब्दसमूहांची माहिती करुन घेवूयात .
1.ऑप्शन रायटर : ऑप्शन्सची विक्री करणाऱ्या विक्रेत्यास ऑप्शन्स रायटर असे म्हणतात .
2.कॉल ऑप्शन्स : या कराराच्या खरेदीदारास त्यात नमूद केलेल्या मालमत्तेच्या खरेदीचा अधिकार मिळतो .
3.पुट ऑप्शन्स :या कराराच्या खरेदीदारास त्यात नमूद केलेल्या मालमत्तेच्या विक्रीचा अधिकार मिळतो .
4.ऑप्शन्सची किंमत /प्रिमियम : ऑप्शन्स खरेदी करणाऱ्याकडून विक्रेत्यास जी रक्कम दिली जाते त्यास ऑप्शन प्राईज किंवा प्रिमियम असे म्हणतात .
5.एक्सपायरेशन डेट : करारात नमूद केलेली ऑप्शन्स बंद होण्याच्या तारखेस ऑप्शन्स एक्सपायरेशन डेट असे म्हनतात .
6.स्ट्राईक प्राईज : जी किंमत आधार धरून ऑप्शन्सचा करार केला जातो त्यास स्ट्राईक प्राईज किंवा एक्जसाईज प्राईज असे म्हणतात .
7.इज इन द मनी /ऍट द मनी /आऊट ऑफ द मनी : स्ट्राईक प्राईजहून मालमत्तेची बाजारातील किंमत जास्त असल्यास त्या कॉल ऑप्शन्सला इन द मनी कॉल ऑप्शन्स असे म्हणतात .जर या दोन्ही किंमतीत समपातळीत असतील तर त्या कॉल ऑप्शन्सला ऍट द मनी कॉल ऑप्शन्स आणि बाजारातील किंमत स्ट्राईक प्राईजपेक्षा कमी असेल तर त्या कॉल ऑप्शन्सला आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन्स असे म्हणतात याउलट स्ट्राईक प्राईजहून मालमत्तेची बाजारतील किंमत अधीक असेल तर पुट ऑन आउट ऑफ़ द मनी पुटऑप्शन्स असे म्हटले जाते .
8.ऑप्शन्सचे आंतरिक मूल्य (Intrinsic value): जेव्हा कॉल ऑप्शन्स इन द मनी असतो तेव्हा त्याच्या बाजारभाव व  स्ट्राईक प्राईज यातील फरकाला त्याची इन्ट्रिस्टिक व्हेल्यु असे म्हनतात .
9.ऑप्शन्स टाईम व्हेल्यू :ऑप्शन्स प्रिमियम आणि त्याची इन्ट्रिस्टिक व्हेल्यु मधील फरकाला ऑप्शन्सची टाईम व्हेल्यु  असे म्हणतात .
10.कव्हर्ड आणि अनकव्हर्ड ऑप्शन्स : जेव्हा ऑप्शन्सचा विक्रेता हा मालमत्तेचा मालक असतो तेंव्हा तो कव्हर्ड आहे जर ही मालमत्ता उधार घेवून विकत असेल तर तो अनकव्हर्ड ऑप्शन्स आहे असे म्हटले जाते .
  फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे थोडे गुंतागुंतीचे ,  एक्सचेंजच्या माध्यमातून केले जाणारे , वायद्यांचे करार असून यातील संकल्पना आपल्या फार परिचयाच्या नसल्याने त्या किंचित अवघड वाटतात . हे करार करण्यास म्यूचुयल फंड , विदेशी वित्त संस्था (FII) आणि स्वदेशी वित्त संस्था (DII)यांना बंदी आहे .फक्त नुकसान कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेचे प्रमाणात हेजिंग करण्यासाठी ( तोटा कमी करण्यासाठी) यांचा वापर  करता येतो .सट्यासाठी (Speculation) यांचा वापर त्यांना करता येत नाही .या संस्था , इतर मोठें गुंतवणूकदार ,गुंतवणूक संधी शोधणारे (Arbitrager) आणि सट्टेबाज यांचा कसा वापर करतात ते पुढील भागांत पाहूया .
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 13 April 2018

पर्याय व्यवहार (Options Trading)


      #पर्याय_व्यवहार (Options trading)
  
पर्याय करार (Options contract ) हा एक भावी कराराचा प्रकार असून तो खरेदीदार / विक्रेता यांना विशिष्ठ मालमत्ता ठराविक तारखेस अथवा त्यापूर्वी विशिष्ठ किंमतीस खरेदी /विक्री करण्याचा हक्क देतो .या करारामूळे खरेदीदारास हक्क (Rights) प्राप्त होतो तर विक्रेत्याची ती जबाबदारी (Obligations) ठरते .यासाठी खरेदीदाराकडून विक्रेत्यांना प्रिमियम म्हणून काही रक्कम देण्यांत येते . खरेदीदार  हा हक्क घेईल अथवा घेणार नाही पण जर एकदा का खरेदीदाराने हा पर्याय स्विकारला तर विक्रेत्यास तो मान्य करावाच लागतो . खरेदीदाराचा तोटा मर्यादीत रहावा या हेतूनेच या करारांची निर्मिती झाली आहे .
फ्यूचर्स व ऑप्शन्स मधील ठळक फरक :
1.फ्यूचर्समध्ये दोन्ही पक्ष करार पूर्ण करण्यास बांधील असतात .ऑप्शन्समध्ये विक्रेता ज्यास ऑप्शन्स रायटर असे म्हणतात करारपूर्ण करण्यास बांधील असतो .
2. फ्यूचर्समध्ये कोणासही प्रिमियम द्यावा लागत नाही ऑप्शन्समध्ये खरेदीदाराकडून विक्रेत्यास प्रिमियम देण्यात येतो .
3.फ्युचर्समध्ये दोघानाही मार्जिन द्यावे लागते त्यामुळे मोठी रक्कम अडकून रहाते. ऑप्शन्समध्ये मार्जिन ऐवजी खरेदीदारास प्रिमियम  आणि विक्रेत्यास त्याच्या पात्रतेनुसार जोखीम कमी करण्याएवढे अपफ्रन्ट पेमेंट करावे लागते .जे जास्तीत जास्त त्या मालमत्तेच्या फ्यूचर्स करीता लागणाऱ्या मार्जिन एवढे असते .
4.फ्युचर्समध्ये अमर्याद नफा / नुकसान होवू शकते .ऑप्शन्समधे खरेदीदारास अमर्यादा नफा आणि जास्तीत जास्त प्रिमियम एवढे मर्यादीत नुकसान होवू शकते तर विक्रेत्यास अमर्याद नुकसान आणि मर्यादित नफा होवू शकतो .
5.फ्यूचर्सचा करार निश्चित केलेल्या तारखेस अथवा उलट व्यवहार करून बंद होतो तर ऑप्शन्स करार तो चालू असण्याच्या कालावधीत कधीही बंद करता येतो .
    ऑप्शन्स खरेदी केल्यानेच खरेदी / विक्री करण्याचे अधिकार प्राप्त होत असल्याने  त्याचे कॉल ऑप्शन्स व पुट ऑप्शन्स असे दोन प्रकार पडतात . कॉल ऑप्शन्समध्ये विशीष्ठ किमतीत मालमत्ता खरेदीचे अधिकार मिळत असल्याने जेव्हा तेजी अपेक्षित असेल तेंव्हा कॉल ऑप्शन्स खरेदी करून आणि मंदी अपेक्षित असताना पुट खरेदी करणे म्हणजेच आधी निश्चित केलेल्या किंमतीस मालमत्ता विकण्याचा हक्क विकत घेवून फायदा करून घेता येवू शकतो .
ऑप्शन्समधील तंत्र समजून घेण्यासाठी Yes Bank Ltd च्या कॉल ऑप्शन्सचा विचार करुयात .बँकेच्या शेअरचा सध्याचा भाव ₹314.50 आहे .26 एप्रिल 2018 रोजी बंद होणाऱ्या ऑप्शन्सचे  ₹270 ते 330 रुपयांचे प्रत्येकी 10 रुपयांच्या फरकाने कॉल उपलब्ध आहेत त्यांचा प्रिमियम ₹4.60 ते 50च्या आसपास आहे .बाजारभावाच्या सर्वात जवळ असणाऱ्या स्ट्राइक प्राईज ₹310 च्या कॉलचा प्रिमियम ₹12.85 आहे .या किंमतीचा एक लॉट घेण्यास 1750 शेअर्सचा एक लॉट असल्याने 1750*12.85=₹22400/- एवढा ऑप्शन्स प्रिमियम द्यावा लागेल .ऑप्शन्सची मुदत संपण्याच्या अगोदर बाजारभाव मूळ किंमत ₹310+प्रिमियम ₹12.85= ₹322.85 चे जेवढा वर जाईल तेथून नफा चालू होईल आणि तो कधीही काढून घेता येईल या भावावर एक रुपया वाढ खरेदीदारास =₹1750 रुपये नफा मिळवून देईल .जर भाव याखाली राहिला तर खरेदीदारास काहीच नफा होणार नाही आणि विक्रेत्यास प्रिमियम मिळाल्याने त्याचा फायदा होईल .तर खरेदीदाराचे ₹22400/- एवढे जास्तीत जास्त नुकसान होईल .याउलट याच स्ट्राईक प्राईजच्या  पुटचा प्रिमियम ₹8.10 आहे भाव ₹310-प्रिमियम ₹8.10=₹301.90 च्या खाली आला तर पुट खरेदी करणाऱ्याचा फायदा होईल .वेगवेगळ्या  स्ट्राईक प्राइजला त्यांच्या प्रिमियमनुसार हे गणित बदलू शकते .हे थोडे समजण्यास कठीण असल्याने यामागील तत्व एकदा समजले की सारे सोपे होते . स्टॉक आणि इंडेक्स यांचे फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे व्यवहार करार बंद होताना कोणतीही मालमत्ता हस्तांतरीत न होता , पैशांच्या स्वरूपात देवाण धेवाण होवून पूर्ण केले जातात .
©उदय पिंगळे
#महत्वाचे : वरील लेखन हे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची सर्वसाधारण माहिती करून देण्याच्या हेतूने केले असुन ती अत्यंत धोकादायक प्रकारात मोडते .याविषयी आपल्या गुंतवणूक सल्लगाराकडून माहिती करून घ्यावी .
        ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .


Friday, 6 April 2018

फ्युचर्स संबंधित व्यवहारातील शब्दावली

#फ्यूचर्स_संबधित_व्यवहारातील_शब्दावली

   फ्यूचर्स हा मालमत्तेच्या देवाणघेवाण विषयीचा ,  आज केलेला भविष्यातील करार असून यासंबंधीची प्राथमिक  माहिती आपण मागील लेखात करून घेतली .असे व्यवहार करीत असताना अनेक परिचित आणि अपरिचित शब्द वारंवार वापरले जातात . यातील काही शब्दांची ओळख आज येथे करून घेवूया .
1.स्पॉट प्राईज : फ्यूचर मध्ये ट्रेड होणाऱ्या मालमत्तेचा नियमित बाजारात (cash market) चालू असलेला भाव म्हणजे स्पॉट प्राईज होय .
2.ट्रेडिंग सायकल : ज्या काळात एखाद्या विशिष्ठ मालमत्तेच्या फ्युचरचे सौदे होवू शकतात तो कालावधी .
3.एक्पायरी डेट : ज्या दिवशी फ्यूचरचा करार संपणार आहे ती त्या कराराची मुदत संपण्याची तारीख .
4.कॉन्ट्राक्ट साईज : फ्यूचरच्या करारात नमूद केलेल्या मालमत्तेची एकूण संख्या .
5.बेसीस : फ्यूचरचे चालू भावातून स्पॉट प्राईज वजा केली असता येणारी किंमत . ही किंमत साधारणतः स्पॉट प्राईजहून अधिक असते , एक्पायरी डेटच्या दिवशी ती जवळपास येते .
6.कॅश टू कॅरी : फ्यूचर खरेदी करण्याकरिता आलेला खर्च .
7.मार्जिन : फ्यूचरचा लॉट खरेदी / विक्री करण्यासाठी जी रक्कम एक्सचेंजकडे जमा करायला लागते त्याला मार्जिन असे म्हणतात .ही रक्कम किती असावी ते एक्सचेंज ठरवते .जी रक्कम प्रथम जमा केली जाते तीस इनिशियल मार्जिन असे म्हणतात . तर रोज होणाऱ्या भावातील फरकामुळे जी रक्कम कमी अधिक करण्यात येते त्यास मार्किंग टू मार्जिन म्हणतात तर अधिक रक्कम जमा करावी लागल्यास  त्यास मेंटेनन्स मार्जिन असे म्हणतात .
8.प्रिमियम / डिस्काउंट ऑफ फ्यूचर  : स्पॉट किंमतीपेक्षा फ्युचरची किंमत जास्त असेल तर तो फ्यूचर प्रिमियम मध्ये आहे आणि कमी असेल तर डिस्काउंटमध्ये आहे असे म्हणतात .
9.बीटा : ही एक अशी संख्या आहे जी फ्यूचरच्या भावात होणारी चढ / उताराची सर्वसाधारण बाजारात होणाऱ्या चढ / उतार यांचा एकमेकांशी संबंध दर्शवते . दोन बदलणाऱ्या भावांचा एकमेकांशी असलेला संख्याशास्त्रीय संबंध समजतो ही किंमत एकहून कमी असल्यास बाजारातील किंमत बदलांचा फ्यूचरचे किंमतीवर कमी परिणाम होतो तर एक किंवा त्याहून अधिक असेल तर जास्त फरक पडतो .
10.ओपन इंटरेस्ट : आजारात अस्तित्वात असलेल्या फ्यूचरच्या करारांची एकूण संख्या .
11.पी सी आर : हे एक गुणोत्तर असून एकूण विक्रेत्यांचे खरेदिदारांशी असलेले प्रमाण दाखवते . यावरून बाजार कोणत्या दिशेला जाईल याचा अंदाज बांधता येण्यास मदत होते .
  सर्वसाधारण माहिती होण्यासाठी Reliance Industries Ltd या कंपनीचे maneycontrol वरील futures चे दोन स्क्रीनशॉट दिले आहेत . यातील पहिले चित्र हे सध्या अस्तित्वात असलेल्या 26एप्रिल 2018,31 मे 2018,28 जून 2018 रोजी संपणाऱ्या फ्युचर्सचे 5 एप्रिलचे बंद भाव आहेत . तर दुसऱ्या चित्रात 26 एप्रिल 2018 रोजी बंद होणाऱ्या फ्यूचर्स चे तपशील आहेत .₹908.20 हा स्पॉट मार्केटमधील  रिलायन्सचे शेअरचा बंद भाव असून त्याहून अधिक चढत्या क्रमाने फ्यूचर्सचे भाव आहेत .26 एप्रिल रोजी बंद होणाऱ्या फ्यूचर्सचे डिटेल्स जसे बीड प्राईज , ऑफर प्राईज ओपन इंटरेस्ट , कालच्या तुलनेतील ओपन इंटरेस्टमधील फरक , एव्हेरेज प्राईज , ओपन /हाय / लो प्राईज , कालचा बंदभाव , मार्केट लॉट , टर्नओव्हर , सौद्यांची संख्या , आजचा आणि कालचा ओपन इंटरेस्ट पी सी आर दाखवला आहे .

©उदय पिंगळे