Friday, 27 October 2017

समभाग संलग्न बचत योजना (ELSS)

समभाग संलग्न बचत योजना (Equity Link Savings Scheme)

  समभाग संलग्न बचत योजना (ELSS) या विशेष प्रकारच्या गुंतवणूक योजना असून त्या म्यूचुअल फंडाच्या पुरस्कार्त्यांकडून राबवण्यात येतात .या योजना निरंतर (Open Ended) किंवा बंदिस्त (Closed Ended) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत .यामधे एकरकमी किंवा जमेल तशी गुंतवणूक करता येते .त्याचप्रमाणे त्यात किमान ₹500/-आणि कमाल कितीही रकमेची नियोजनपूर्वक गुंतवणूकही (SIP) करता येते .यामधे केलेल्या गुंतवणुकीवर 80/C च्या विहित मर्यादेत सूट मिळते. लाभांश (Dividend) आणि मूल्यवृद्धी (Growth) हे दोन्ही पर्याय उपलब्ध असून या योजनेस लाभांश पुर्नगुंतवणूक (Dividend Reinvestment) हा पर्याय  उपलब्ध नाही .या योजनेतीली 80% रक्कम ते अनुकरण करीत असलेल्या इंडेक्स मधील वैविद्यपूर्ण (Diversified) अशा समभागात जसे S&P nifty किंवा S& P nifty 500  या इंडेक्समधील समभाग आणि 20% रक्कम डेट , मनी मार्केटमधे गुंतवली जाते .(अधिक तपशिलासाठी योजनेचे मागणीपत्र पहावे)
    सध्या मान्यताप्राप्त निवृत्तीयोजनेची वर्गणी (PF, VPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) , विमा हप्ते , गृहकर्ज परतफेड ,शैक्षणिक फी , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) ,  करबचत मुदत ठेवी (Tax Saving FDR) , सुकन्या समृद्धी योजना (SSY) , वरीष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) साधनातील गुंतवणुकीला दीड ते दोन लाख या मर्यादेत आयकर कलम 80/सी खाली आयकर सवलत मिळते .
    यातील काही योजनांचा परतावा (Return) मिळतो तो योजनेच्या प्रकारानूसार करमुक्त असतो किंवा नसतो .त्याचप्रमाणे यातील बहूतेक योजनांचा गुंतवणूककाळ हा किमान पाच वर्षे तरी असतोच .पी एफ , व्ही पी एफ यांना सध्या 8.65%करमुक्त उतारा मिळत असून त्यांचा गुंतवणूक कालावधी प्रदीर्घ आहे . पी पी एफ व  एन एस सी मधून मिळणारा उतारा (Return) वार्षिक  7.8% आहे यातील एन एस सी मधील पहिल्या 4वर्षात मिळालेले व्याज हे उत्पन्न करपात्र समजले जाते आणि त्याला पुनर्गुतवणूक केल्याचा फायदा मिळतो तर अंतिम वर्षात ती होत नसल्याने करपात्र उत्पन्नात मिळवले जाते  .पी पी एफ मधील उत्पन्न करमुक्त परंतू यातील रक्कम पाच वर्षाहून अधिक काळ अडकून राहते  . टॅक्स सेविंग एफ डी मधून पाच वर्षात मिळणारा उतारा 7ते 7.5% असून तो करपात्र आहे .एन पी एस मधून मिळणारा उतारा हा योजनेनुसार आणि दीर्घ काळ असून त्याची निश्चित अशी हमी नसल्याने ज्यांची दीड लाख गुंतवणूक पूर्ण झाली आहे आणि ज्यांच्याकडे जास्तीचे पैसे आहेत अशा लोकांना पन्नास हजारांची अधिकची करसवलत घेण्यास योग्य आहे .
   एस एस वाई (सुकन्या समृद्धी) ही योजना मुलींनी स्वावलंबी व्हावे यासाठी असून त्यातील गुंतवणूक मुलीच्या वयानुसार 14 ते 21वर्षपर्यंत अडकून राहते आणि ती संबधित मुलीलाच मिळते .सध्या यातून मिळणारा परतावा 8.3% असून तो करमुक्त आहे . तर एस सी एस एसही योजना सेवानिवृत्त झालेल्या लोकांसाठी असून यातून दर तीमाहीस मिळणारे 8.3% व्याज करपात्र आहे .ही गुंतवणुक पाच वर्ष कालावधीसाठी आहे .
  या सर्व योजनांच्या तुलनेत ई एल एस एस ही कोणतीही निश्चित हमी न देणारी योजना आहे . भविष्यात भांडवल उभारणी करण्यासाठी जोखिम स्वीकारण्याची तयारी असलेल्या प्रत्येकास उपयुक्त आहे .या योजनेचा किमान गुंतवणूक कालावधी तीन वर्ष असून हा कालावधी संपला तरी गुंतवणूक काढून घेण्याचे बंधन नसते .यावर मिळणारा डीवीडेंड त्याचप्रमाणे भांडवली नफा हा पूर्णपणे करमूक्त आहे . moneycontrol चे संकेतस्थळावर 26 ऑक्टो 2017 रोजी उपलब्ध असलेल्या माहीती प्रमाणे मूल्यांकनानूसार (Top Ranking   Scheme) एल अॅड टी टेक्स अँडव्हाटेंज ही योजना प्रथम स्थानावर असून त्याचा मागील वर्षाचा परतावा 25% तर मागील तीन वर्षाचा सरासरी परतावा 17.8% आहे .येथेच उपलब्ध  योजनांचे  कामगिरीनुसार (Top Performing Scheme) एस बी आई टॅक्स अँडव्हांटेज स्कीम 2 ,रिलायंस टॅक्स सेवर फंड , आई सी आई सी आई प्रू राइट फंड , अॅक्सीस लॉग टर्म ईक्विटी फंड , प्रिन्सिपल टॅक्स सेविंग यातून मिळालेला गेल्या पाच वर्षाचा सरासरी परतावा 22% हून आधिक आहे .
    या योजनांत गुंतवणूक करतांना निश्चितच धोका आहे परंतू यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखिम (Calculated Risk) पत्करली तर अल्पमुदतीत  अधिक आकर्षक उतारा भांडवलवृधी होण्याची खात्री आहे आणि त्यासाठी अनेक फंड हाउस कडील आकर्षक योजनांचा पर्याय उपलब्ध आहे .याशिवाय थोडे थांबण्याची तयारी असेल तर नुकसान होण्याची अजिबात  शक्यता नाही .हा दृष्टीकोन ठेवून अशा योजनांचा विचार धाडसी गुंतवणुकदारांनी करावा .
  (यात उल्लेख केलेल्या योजना संदर्भासाठी  www.moneycontrol.com या संकेतस्थळावरून घेतल्या असून त्या  केवळ अभ्यासासाठी आहेत , त्यांची शिफारस केलेली नाही. आपण आपली गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून योजना समजून घेवून स्वतःचे जोखमीवर करावी)

©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

म्यूचुअल फंडाच्या योजनांचे नविन वर्गीकरण

म्यूचुअल फंडांच्या योजनांचे नविन वर्गीकरण

   म्यूचुअल फंडांच्या विविध योजना , त्याच्या  गुंतवणूक कालावधीवरून ओपन एंडेड आणि क्लोस्ड एंडेड अश्या दोन प्रकारांत आहेत .गुंतवणूक साधनांवरून ईक्विटी , डेट , हायब्रीड आणि मनी मार्केट  फंड या चार प्रकारात आहेत .उत्पन्न विभागणी वरून डीवीडेंड आणि ग्रॉथ या दोन प्रकारात तर ई ल एस एस , पेन्शन या सारख्या योजना इतर विशेष प्रकारच्या योजना अशा प्रकारात विभागल्या आहेत . बाजारात 42 म्यूचुअल  फंड हाउसनी अश्या प्रकारच्या 2000 हून अधिक योजना बाजारात आणल्या असून त्यांना आकर्षक नावेही दिली  आहेत . यामुळे गुंतवणुकदारांना निश्चित अर्थबोध होत नाही त्यामुळे गुंतवणुक निर्णय घेण्यात गोंधळ होवू शकतो .सप्टेंबर 2017 अखेर सर्व योजनांतील एकत्रित गुंतवणूक 20.4 अब्ज एवढी आहे .
   यामुळे बाजारात विविध योजनांची भाऊगर्दी झाली असून एका फंड हाउस कडून एकाच प्रकारच्या अनेक योजना बाजारात आल्याने सामान्य गुंतवणूकदाराच्या मनात गोंधळ उडाला आहे .यावर उपाययोजना म्हणून 6ऑक्टोबर 2017 रोजी सेबीने सर्व फंड हाउसना एक परिपत्रक पाठवून त्यांच्याकडील सर्व निरंतर योजनांची (open ended scheme) विभागणी पाच प्रकारांत करण्यास सूचवले आहे . त्यांचे ठळक उपप्रकारही सूचवले आहेत .
  सेबीनी म्यूचुयल फंडाना त्यांच्या योजनांची त्यांच्या गुंतवणूक साधनावरून :
१.डेट स्कीम :कर्जरोखे , बॉन्ड , कमर्शियल पेपर यातील गुंतवणूकीच्या या योजना असून त्यांचे 1)Overnght 2)Liquid 3)Ultra short duration 4)Low duration 5)Money market 6)Short duration 7)Medium duration 8)Miedium to long duration 9)Long duration 10)Dynamic bond 11)Corporate bond 12)Credit risk fund 13)Banking &PSU 14)Gilt 15)Gilt with 10-year duration 16)Floater हे उपप्रकार सूचवले आहेत .
 २.ईक्विटी स्किम :फक्त समभागाशी संबधित या योजना असून यांचे 1)Multi cap 2)Large cap  3)Large & midcap 4)Midcap 5)Small cap 6)Dividend yield 7)Value 8)Contra 9)Focused 10)Sectoral themes -ELSS असे उपप्रकार सूचवले आहेत .
३. हायब्रीड फंड :यामधे समभाग आणि रोखे या दोन्हीचाही सामावेश असेल .यांचे 1)Conservative 2)Balanced 3)Aggressive 4)Dynamic asset allocation 5)Malti asset allocation 6)Arbitrage
४. सोल्युशन ऑरियेंटेड :यामधे एखादा ऊद्धेश ठेवून गुंतवणूक केली जाईल .जसे 1) Retirement   2)Children benefit
५.इतर प्रकारच्या योजना:वरील निकषात न बसणाऱ्या योजना 1)Index fund / ETF 2)FOF -Funds of funds -overseas/domestic
  अश्या पाच विभागात वर्गीकरण करण्यास सूचवले असून त्याचे 36 उपप्रकार सूचवले आहेत .यामधे इक्विटी योजना ज्यामुळे ही गुंतवणूक कोणत्या ठळक प्रकारांत आहे ते अधिक स्पष्ट होईल . उदाहरणार्थ डीवीडेंड यील्ड ईक्विटी फंड यातील गुंतवणूक ही फक्त जेथे अधिक लाभांश उतारा मिळेल अशाच समभागात (Specific to)केली जाईल तर बँकिंग अँड पी एस यू डेट   फंड ह्या फंडातील गुंतवणूक बँक आणि पी एस यू चे कमर्शीअल पेपरमधे केली जाईल .जरी हे उपप्रकार विविध 36 प्रकारात विभागले असले तरी त्यातून निश्चित अर्थबोध होईल .सोल्युशन ऑरियेंट योजनांचा नेमका  गुंतवणूक कालावधी किती असावा ते ठरवावे लागेल .तसेच कंपनीचे मार्केट कॅपिटलायजेशन वरून पहिल्या 100 म्हणजे लार्ज कॅप , 101ते 250 वरून मिड कॅप आणि 251 पुढील सर्व स्मॉल कॅप असे ठरवावे आणि त्यातच गुंतवणूक करावी लागेल आणि समजा जर योजना स्मोल कॅप असेल तर 80% रक्कम नव्याने तयार केलेल्या स्मॉल कॅपमधे करावी लागेल .एका फंड हाउसची एका उपप्रकाराची एकच योजना असेल .इंडेक्स फंड , ई टी एफ , सेक्टरल फंड यासारखे अपवाद वगळता सध्या अस्तित्वात असलेल्या सारख्या योजना एकमेकात विलीन करणे अथवा बंद करणे या संबंधी फंडाचे मत आणि भविष्यातील योजना यासंबंधीची माहीती,  यातील कोणत्याही प्रकारांत न बसणाऱ्या योजनांची माहीती विहित नमुन्यात सेबीकडे दोन महिन्यात देवून आवश्यक त्या उपाययोजनांना मंजूरी घेवून पुढील तीन महिन्यात त्याची अमलबजावणी करायची आहे .
   म्यूचुअल फंड व्यवसायाच्या दृष्टीने हे आमूलाग्र बदल होईपर्यंत अल्पकाळासाठी ही थोडी कठीण परिस्थिती असेल .काही तज्ञांच्या मते दोन योजनांच्या विलिनीकरणामुळे योजनेच्या मालमत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्याचा कामगीरीवर परिणाम होवू शकेल . नविन वर्गीकरणामुळे अधिक गोंधळ होवून म्यूचुअल फंडापासून गुंतवणूकदार दुरावण्याची शकता आहे .हे नियम निरंतर (open ended ) योजनांना लागू असल्याने अनेक बंदिस्त योजना (closed ended)  यापुढे बाजारात येण्याची शक्यता आहे . तर सेबीचे मतानुसार या बदलामुळे  येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या फंड हाउसची एक प्रकारची योजना आणि एक प्रकाराची गुंतवणूक पद्धत असल्याने त्यांच्या कामगीरीचा आढावा घेवून तुलना करणे सहज कोणालाही शक्य होईल त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांला त्याच्या गरजेनुरुप जोखिम पत्करून फंडाची निवड सहज करता येईल .याचे फलित काय होईल ते नजीकच्या काळात कळेलच .

उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 13 October 2017

सोन्यातील गुंतवणूक

                                                                  सोन्यातील गुंतवणूक
  सोने हा धातू हा भारतीयांच्या (विशेषतः  स्त्रियांच्या) जिव्हाळ्याचा विषय आहे .जरी सोन्याऐवजी इतर अनेक धातू , प्लास्टिक , लाकुड , शिंपले कागद यापासून दागिने बनवता येत असले तरी सर्वांची पसंती ही सर्वप्रथम सोन्यास असते .सोन्याची साठवणूक करताना असलेली जोखिम , दागिने करताना त्यात करावी लागणारी अन्य धातूंची मिसळ करण्याची आवश्यकता , दागिने मोडतांना येणारी घट  आणि बी एस आई या प्रामाणिकरणाची नसलेली सक्ती यामुळे आज अनेक गुंतवणूकतज्ञ सोन्यामधील गुंतवणूक फारशी लाभदायक नाही असे सांगतात. तरीही अनेक सराफांकडील दुकानातील गर्दी पहाता यामधे नजीकच्या काळात यात फार काही फरक पडेल असे वाटत नाही .
   भारतात दरवर्षी चार टन सोने उत्पादित होत असताना आपण आठशे टन सोने आयात करतो .वर्ड गोल्ड कौन्सिलच्या मतानुसार सोने आयातीत आपला देश प्रथम क्रमांकावर आहे .आपल्या चालू खात्यात येणारी तूट म्हणजे आयात आणि निर्यात यातील फरक  (current account deficit ) येण्यास सोन्याची आयात हे महत्वाचे कारण आहे . भारतीयांची मानसिकता , सराफांची एकाधिकारशाही , सरकारची  राजकीय अपरिहार्यता  आणि अधिक कर आकारणीमुळे बेकायदा व्यवहारात होणारी वाढ यामुळे ही तूट कमी करण्यावर अनेक बंधने येतात .भारतीयांकडे आणि येथील अनेक मोठ्या देवस्थानांकडे कित्येक टन सोने साठून राहिल्याने मोठ्या प्रमाणात भांडवल त्यात अडकून पडले आहे .
   अनेक जण परंपरेप्रमाणे सणासुदीला , वाढदिवसाला , लग्नाला  सोने किंवा दागिने खरेदी करतात अडीअडचणीस उपयोगी येईल म्हणून ही खरेदी केली जाते .आपल्या उत्पन्नातील सरासरी तेरा टक्के रक्कम यात अडकवली जात असून  प्रत्यक्षात अगदीच नाईलाज झाला  तरच त्याची विक्री केली जाते .सहसा यातून पैसे मिळवावे हा हेतू नसतो . त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम अडकून रहाते . यातून कोणत्याही प्रकारची भांडवलनिर्मिती होत नाही .
    यामधे बदल व्हावा म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत .यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF), सुवर्ण चलनीकरन योजना (Gold Monitization  Scheme) ,सुवर्ण सार्वभौम योजना (Gold Sovergine Scheme) आणि सोन्याचे वायदे व्यवहार (Gold Futures) यांचा सामवेश आहे .यामुळे धातुस्वरूपात ते न घेता अमूर्त स्वरूपात साठवता येते  आणि गरज पडल्यास विकताही येते .त्यावर अल्प प्रमाणात उत्पन्नही मिळते .याला टक्कर देण्यासाठी  काही मोठ्या काही सराफानी बॉन्ड अथवा ई टी एफ स्वरूपातील सोन्याचे यूनिट खरेदी करून त्याचे दागिने बनवण्याच्या योजनेचा चालू केल्या आहेत . अनेकांच्या सुवर्ण खरेदीच्या योजना असून दरमाह एक ग्राम सोने खरेदी केले असता अंतिम मुदतीला बोनस म्हणून सोने दिले जाते तर अनेक सोनार रिकरिंग योजनेप्रमाणे हप्ता घेत असून व्याज म्हणून शेवटचा देत असतात .यातून जमा रकमेवर व्याज म्हणून एक हप्ता भरला जातो .जमा रकमेचे सोने अथवा दागिने घेतले जातात .व्याज या दृष्टीने सोन्यावर व्याज म्हणून सोने  मिळणाऱ्या योजना अधिक फायद्याचा आहेत .काही जणांनी स्वतच्या खाजगी गोल्ड डिपोसिट योजना चालू केल्या असून यावर अधिक व्याज देवू केले आहे .
   आवश्यकता नसताना धातुस्वरूपात सोने खरेदी करण्याऐवजी ते  ई गोल्ड स्वरूपात खरेदी करणे हे  करसवलतीच्या दृष्टीने अधिक फायद्याचे  आहे . या स्वरूपातील गुंतवणूकीवर दीर्घकालीन भांडवल करावरील लाभ ई टी एफ ला एक वर्षानी तर ई गोल्ड यूनिटला  तीन वर्षाच्या मुदतीने घेता येतो . फंडहाउस कस्टोडीयन अथवा डिपॉझिटरीकडे सदर यूनिट मधील सोने सुरक्षित रहात असून यास नामांकन सुविधाही उपलब्ध  आहे. सोन्यातील भावात होणाऱ्या चढ उताराचा लाभ घेण्यासाठी यातील वायदे व्यवहार उपयुक्त असून यासाठी लागणारे मार्जीन अत्यल्प आहे . याशिवाय  या व्यवहारांना एक्चेंजची हमी आहे आणि आवश्यकता असल्यास त्याची डिलिवरीही घेण्याचा पर्यायही आहे .तेव्हा यापुढे सोने खरेदी करताना या सर्वच गोष्टींचा विचार करावा .

©उदय पिंगळे

Friday, 6 October 2017

चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे भाग -३

चांगले समभाग शोधण्याचे साधन - विविध गुणोत्तरे (Financial Ratios) भाग ३
ऊ .इफिशियन्सि रेशो : कार्यक्षमतेच्या या रेशोमुळे कंपनी आपली मालमत्ता , भागभांडवल , घेतलेली कर्जे यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून किमान खर्चात कमाल उत्पादन करते का ?ते समजण्यासाठी मदत होते .
१.वर्किंग कॅपिटल टर्नओवर रेशो :निव्वळ उलाढालिस वर्किंग कॅपिटल म्हणजेच चालू मालमत्तेमधून चालू देयता (liabilities) वजा करून आलेल्या संख्येने भागले तर हा रेशो मिळतो .हा रेशो जेवढा जास्त तेवढे चांगले .
२.रिसिव्हेबल टर्नओवर :या मध्ये निव्वळ उलाढालिस  येणे बाकी असलेल्या रकमेने भागले जाते .येणे रक्कम जेवढी कमी तितका भागाकार वाढेल .हा रेशो काळजीपूर्वक काढणे जरुरीचे आहे .
३.इनव्हेटरी टर्नओवर रेशो :उत्पादनातील कच्चा माल , अर्धवट प्रक्रिया झालेला माल आणि उत्पादित परंतु शिल्लक माल यास इनव्हेटरी असे म्हणतात त्यांस विक्री झालेल्या उत्पादित मालास आलेल्या खर्चाने हा रेशो मिळतो .हा रेशो खूपच फसवा असून इनव्हेटरी कमीत कमी असणे त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी असणे हे चांगल्या कंपनीचे लक्षण आहे .
४.प्राईज अर्निग रेशो :PE या संक्षिप्त नावाने प्रचलित आहे .चालू बाजारभावास प्रतिशेअर कमाई (EPS) भागले असता हे गुणोत्तर मिळते .हा रेशोच्या अनुरूप शेअरचा भाव असता तर त्याविषयी निर्णय घेणे सोपे झाले असते परंतू प्रत्यक्षात अनेक कारणांनी भाव वाढतात आणि हा रेशोही बदलतो .एकदम नामवंत कंपन्या सोडल्यास हा 15/17 असणे चांगले .परंतू हा नियम नाही अनेक नामवंत कंपन्यांचा पी ई सातत्याने 40/45 आहे .
५.कॅश अर्निग पर शेअर :करपश्चात नफ्यास शेअरचे संख्येने भागले की हा रेशो मिळतो .याची तुलना मागील वर्षाशी करता येते .
६.डिव्हिडेंड पे आउट रेशो :शेअरहोल्डरना वाटलेल्या डिव्हीडेंडला करपश्चात नफ्याने भागले असता हा रेशो मिळतो .चांगल्या कंपन्याचे बाबतीत हा रेशो 40:60 याप्रमाणात असतो .गुंतवणूकदार त्यांना लगेच फायदा दिसत असल्याने जास्त रेशो असलेल्या कंपन्या पसंत करतात .परंतू एका विशिष्ट मर्यादेपेक्षा या कंपन्याची प्रगती थांबते .तेव्हा हा रेशो कमी असणे अधिक चांगले असते .
७.डिव्हिडेंड रेट :कंपनीने एका शेअरवर दिलेल्या डीवीडेंडला शेअरच्या मूळ  किंमतीने भागुन 100ने गुणले असता हा रेशो मिळतो तो नेहमी %मधे दर्शवला जातो
८.डिव्हिडेंड यिल्ड :एका शेअरवर मिळालेला डिव्हिडंडला चालू बाजारभावाने भागून 100ने गुणले असता हा रेशो मिळतो .याने सध्या मिळणारा उतारा कळतो .
९.बुक व्हॅल्यु : भागभांडवल आणि गंगाजळी यांच्या बेरजेस एकूण शेअर्सचे संख्येने भागले असता हा रेशो मिळतो .जेवढी बुक व्हॅल्यु जास्त तेवढा रिझर्व जास्त असल्याने काही कारणाने कंपनी बंद झाल्यास शेअर होल्डरना तेवढी रक्कम मिळण्याची हमी असते . गंगाजळी जास्त असल्याने बोनस शेअर मिळण्याची शक्यता जास्त .
१०.प्राईज अर्निग ग्रोथ : पी ई रेशोला वाढीचा दराने भागले असता हा रेशो मिळतो .
११.मार्केट टू बुक रेशो :बाजारभावास बुकव्हॅल्युने भागले असता हा रेशो मिळतो .यावरून बाजारभावाच्या किती पट संपत्ती निर्माण झाली ते समजते .
अमुक एक रेशो वापरून चांगली कंपनी शोधता येईल असे ठामपणे सांगता येणार नाही .परंतु एकाच  प्रकारच्या आणि सारखीच उलाढाल असलेल्या कंपनीच्या प्रगतीची तुलना करून आंदाज बांधता येतो .एकाच प्रकारचा निकष दुसऱ्या प्रकारच्या कंपनीला लावता येत नाही .त्याचप्रमाणे तुलना करीत असलेली कंपनी नविन आहे की प्रस्थापित आहे तेही पहावे लागते .या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवल्या तर आपले अंदाज बरोबर ठरायला मदत होते .(संपूर्ण)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

SIP नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना

नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना  (SIP म्हणजेच Sistemetic Investment Plan)
   सर्वसाधारणपणे म्यूचुअल फंडाचे संबंधी SIP हा शब्द वारंवार ऐकण्यात येतो .SIP हे कोणत्याही गुंतवणूक योजनेचे नाव नसून म्यूचुअल फंडाच्या   नियोजनपूर्वक गुंतवणूक करण्याची एक  पद्धत आहे . सर्वाना म्यूचुअल फंड म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते याविषयी माहीती असेल असे मी येथे गृहित धरले आहे .ज्यांना ही माहीती नसेल त्यांच्यासाठी म्यूचुअल फंडाची माहीती असलेला यापूर्वीचा  लेख वाचावा आणि नंतर हा लेख वाचावा म्हणजे एस आई पी विषयी चांगले समजेल कोणतीही गुंतवणूक ही आपली अल्प , मध्यम , दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण व्हावित यासाठी केली जात असून  त्यासाठी लागणारी रक्कम आपल्याकडे लवकरात लवकर जमा व्हावी आणि अधिक फायदा व्हावा या हेतूने केली जाते .यातील दीर्घ /प्रदीर्घ कालवधीतील उद्दिष्टे उदा .मुलांचे उच्च शिक्षण ,लग्न , घर घेणे , निवृतीनंतरचे नियोजन पूर्ण करण्याकरीता महागाईचा दर लक्षात घेवुन तजवीज करावी लागते . यासाठी 10/30 वर्षांचा कालावधी असतो तर काही उद्दिष्टे अल्पकालीन असतात कालावधी 6 महीने तर काही मध्यम स्वरूपाची असतात कालावधीत 3 ते 7 वर्ष .एकदा उद्दिष्ट , त्यासाठी लागणारी रक्कम , अपेक्षित परतावा आणि जोखिम घेण्याची क्षमता या गोष्टी ठरल्या की आपल्याकडे असलेली गुंतवणूक योग्य रक्कम , योग्य योजनेची निवड करून त्यात टाकू शकतो . ही ठराविक रक्कम ठराविक मुदतीने ठराविक काळाने  गुंतवणे (रिकरिंग डिपोझिट प्रमाणे) यास नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (sip) असे म्हणतात . बाजारातील चढ उताराप्रमाणे यूनिटचे निव्वळ मालमत्तामूल्य (nav) कमी अधिक होत असते . एक रकमी केलेली गुंतवणूक जर बाजार नीचांकी पातळीवर असेल तरच फायदेशीर होवू शकते  . याचा निश्चित असा अंदाज बांधणे कठीण आहे त्यामुळे अशी संधी शोधण्याऐवजी sip करणे हे अधिक योग्य.या मध्ये nav कमी अथवा जास्त असेल तर मिळणारे यूनिट सरासरी मूल्याने (Rupee  cost averaging) मिळत असल्याने धोका कमी संभवतो .जर nav कमी असेल तर जास्त यूनिट येतील तर nav जास्त असेल तर कमी यूनिट येतील .मोठ्या कालखंडात जमा झालेले यूनिटवर चक्रवाढ व्याजाने वाढत जाणारी रक्कम आणि जमा मूद्दल यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होवून जोखिम तीव्रता कमी होवू शकते .अशा प्रकारची गुंतवणूक पेन्शन योजनेतही करता येवू शकते . म्यूचुयल फंडातील समभाग  संलग्न बचत योजनेत (Equity link savings scheme ) किमान ₹500/- तर इतर योजनात ₹1000/- दरमहा भरून किमान 6 महीने ते कमाल आपल्या इच्छेनुसार करता येते .म्यूचुअल फंडाच्या पुरस्कर्त्यानी गुंतवणूकदारांच्या सोइसाठी दैनिक , साप्ताहिक , पाक्षिक ,मासिक , त्रैमासिक कालावधीत गुंतवणूक करता येवू शकेल किंवा ठराविक काळाने आपली गुंतवणूक रक्कम वाढवता  येवू शकेल अथवा मिळालेल्या डीवीडेंडची रक्कम यूनिट्स मधे परावर्तित करता येईल असे पर्याय देवू केले आहेत .
शेअर असो अथवा म्यूचुअल फंड यूनिट किमान भावात खरेदी आणि कमाल भावात विक्री झाली तरच जास्त फायदा होवू शकतो .यासाठी ठराविक दिवशी ठराविक किंमतीचे शेअर अथवा यूनिट सातत्याने घेतल्यास बाजार वाढला अथवा कमी झाला तरी सरासरी मूल्यांचा फायदा होवू शकतो . सीप पद्धत कोणत्याही प्रकारची फायद्याची हमी देत  नसली तेजी आणि मंदी दोन्हीमधे या पद्धतीपासून प्रदीर्घ कालावधीत तोट्यापासून संरक्षण होत  असल्याने  अंतिमतः गुंतवणूकदाराचा फायदाच होतो .अशाच प्रकारची गुंतवणुक म्यूचुअल फंडातील यूनिट्स शिवाय विशिष्ट समभागात ठराविक दिवशी  करून दीर्घकाळात त्याची खरेदी किंमत कमी करता येणे शक्य आहे .ज्यायोगे भविष्यात बाजारमूल्य अधिक असताना त्याची विक्री करून अधिक फायदा मिळवून आपले ध्येय मुदतीपुर्वी करता येवू शकेल .
©उदय पिंगळे