Friday, 26 January 2024
सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन सन 2023-2024
#सरते_आर्थिक_वर्ष_आणि_करनियोजन (सन2023-2024)
चालू आर्थिक वर्ष (सन2023-2024) आता संपत आले. हा हा म्हणता ते कधी संपेल ते कळणारही नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून आज आपण त्यांना यावर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही. या वर्षीही पगारदार व्यक्तींना आयकर मोजणीचे दोन पर्याय आहेत यातील नवीन पर्यायात अनेक सवलती वगळून 5% ते 30% अशी 6 टप्यात कर आकारणी होईल. या पर्यायात ₹ 50 हजार प्रमाणित वजावट आणि व्यवसाय कर अधिकतम रुपये दोन हजार पाचशेची सवलत मिळते. याशिवाय या दोन्ही करमोजणी पद्धतीत एनपीएसमध्ये कर्मचाऱ्यांची मालकाने भरलेल्या वर्गणी, जी पगार आणि महागाई भत्याच्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांना 14% तर खाजगी कर्मचाऱ्याना 10% वर्षभरात जास्तीतजास्त सात लाख पन्नास हजार या मर्यादेत वेगळी वजावट (80/ CCD2) मिळेल. याशिवाय कर्तव्याचा भाग म्हणून मिळणाऱ्या काही भत्त्यांवर सूट आहे. जसे की प्रवास खर्च, टेलिफोन बिल, सवलतीत मिळणारे जेवण इ. याचा लाभ घेऊन या नवीन पर्यायात ज्यांचे करपात्र सात लाख रुपयांच्या आत आहे त्यांना जास्तीतजास्त 25 हजार रुपयांची करसवलत (87/ A) मिळते. त्यामुळे फारशी कोणतीही गुंतवणूक न करता हा पर्याय स्वीकारून फायदा होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण काही प्रमाणात वाढेल. यात निव्वळ पगार हेच ज्यांचे उत्पन्नाचे साधन आहे त्यांना सध्या दोन्ही पद्धतीपैकी कोणतीही पद्धत निवडण्याचा पर्याय आहे पण ज्यांना व्यवसायचेही उत्पन्न आहे अशा व्यक्तीनी नव्या पद्धतीने करमोजणी केल्यास कायम त्याच पद्धतीने करमोजणी करावी लागेल.भविष्यात सर्वांचा कर कायम नवीन पद्धतीने मोजला जाईल असा अंदाज आहे. सध्या अशी सक्ती नसल्याने पगारदारांनी दोन्ही पद्धतीने कर मोजणी करावी आणि कोणती पद्धत किफायतशीर राहील ती स्वीकारावी ते विवरणपत्र भरण्यापूर्वी ठरवावे. यासाठी आवश्यकता असल्यास तज्ञांची मदत घ्यावी.
जुन्या पद्धतीने कर मोजणी करून आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या. करपात्र असो अथवा नसो आपले सर्व मार्गांनी होणारे या कालखंडातील उत्पन्न यासाठी विचारात घ्यावे उदा पगार, घरभाडे, ठेवींवरील व्याज, पी पी एफ वरील व्याज, अल्प दीर्घ मुदतीचा नफा, लाभांश, शेअर पुनर्खरेदीची रक्कम, व्यवसाय असल्यास त्यातून मिळालेले उत्पन्नइ., अन्य कोणत्याही मार्गाने मिळालेले उत्पन्न याची बेरीज करून त्यातून करमुक्त उत्पन्न, कायदेशीर वजावटी इ. वजा करून सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे एकूण करपात्र उत्पन्न ₹ 2 लाख 50 ते 5 लाख रुपयांच्या आत असेल, तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही. जर आपले वय 60 हून अधिक असेल, तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹ 3 लाख ते 5 लाखचे आत व आपण अतिवरिष्ठ नागरिक असाल म्हणजेच आपले वय 80 पेक्षा जास्त असेल, तर ही मर्यादा ₹ 5 लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे खर्चावर नाही (त्यासाठी GST आहे.) हे उत्पन्न ₹ 5 लाख रुपयांच्या आत असेल तर कलम 87 /A नुसार जास्तीत जास्त ₹ 12500/- ची करसवलत मिळते त्यामुळेच 5 लाख रुपयांच्या पर्यंत करपात्र उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही त्याहून अधिक उत्पन्न असेल तर यातील ₹ 2.5 लाख ते 5 लाखापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर 5% त्यावरील ₹10 लाख रुपयापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर ₹ 12500 + 20% आणि त्यावरील करपात्र उत्पन्नावर ₹ 112500+ 30% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर सरचार्ज म्हणून 4% दराने शिक्षण व उच्चशिक्षण कर द्यावा लागतो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹ 50 लाखांच्यावर परंतु 1कोटींच्या आत आहे, त्यांना करावर 10% आणि 1 कोटींहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 15% अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण करदायित्वांवरील कर आहे (Tax on tax) 60 वर्षांखालील करदात्यांना ₹ 5 लाखावर उत्पन्न असेल 2.5 ते 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना ₹ 5 लाखावर उत्पन्न असल्यास 3 लाखावर असलेल्या उत्पन्नावर वरील दराने कर द्यावा लागून त्यांना 87/A नुसार मिळणारी सूट मिळणार नाही. याशिवाय पगारदार लोकांना सेक्शन 4/A नुसार ₹ 50000 ची प्रमाणित वजावट (Standard deduction) मिळेल. तसेच त्यांचा कापलेला अधिकतम व्यवसाय कर (₹2500) एकूण उत्पन्नातून वजा होईल.
आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत, गुंतवणूक आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते.
यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे -
1) विविध बचत गुंतवणूक योजना व खर्चांना मिळणाऱ्या सवलती : यामध्ये विहित मर्यादेत जमा केलेली रक्कम एकत्रित उत्पन्नातून कमी होत असल्याने एकूण करदायित्व कमी होते. आयकर अधिनियम 80/C, 80/CCC, 80/CCD एकत्रित मिळून जास्तीत जास्त दीड लाख रुपये सूट मिळू शकते.
*80/C ची सवलत मिळणाऱ्या अनेक योजना व खर्च आहेत. कंसात योजनेवरील 1 जानेवारी 2024 ला मिळू शकणारे व्याजदर दिले आहेत. ते दर तिमाहीस बदलत असून 31 मार्च 2024 पर्यंत हेच व्याजदर राहतील. यामध्ये पी एफ वर्गणी 8.15 %,वी पी एफ 8.15,%,पी पी एफ (7.1%) मधील जमा केलेली रक्कम,एन एस सी (7.6%), एन एस सी व्याज, ५ वर्ष मुदतीच्या करबचत मुदत ठेवी (जास्तीत जास्त 7.5 ते 9.25%), वरिष्ठ नागरिक बचत योजना (8.2%),सुकन्या समृद्धी योजना (8.2%), विमा हप्ते, राहत्या घराचे गृहकर्ज मूद्दल, रजिस्ट्रेशन खर्च, दोन मुलांचा शैक्षणिक खर्च, करबचतीच्या समभाग संलग्न योजना यांमध्ये जमा/खर्च केलेली रक्कम यांचा समावेश होतो.
*80/CCC मध्ये विमा कंपन्या व म्युच्युअल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.
*80/CCD मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्याच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समावेश होतो. यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली, तरी एकूण सूट दीड लाख एवढीच मिळते.
*सन 2015 पासून 80/*CCD(1B) नुसार एन पी एस मध्ये जमा केलेल्या ₹50000 रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते.
अशाप्रकारे एकूण जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते.
2) आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसन योजनांवर मिळणाऱ्या सवलती : यामध्ये आयकर कलम 80/D, 80/DD, 80/DDE, 80/DU यांचा सामावेश होतो.
*80/D नुसार स्वतःच्या, जोडीदाराच्या आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर ₹25000 जमाकर्ता जेष्ठ नागरिक असेल तर ₹ 50000 पर्यंत सूट मिळते. त्याचप्रमाणे जमाकर्त्यावर अवलंबित पालकांसाठी भरलेल्या हप्त्यावर त्यांच्या वयानुसार अतिरिक्त 25 ते 50 हजार रुपयांची सूट मिळते. ₹ 5000/- पर्यंत वर्षभरात केलेल्या वैद्यकीय तपासण्या या सुद्धा विमा हप्त्यासह त्या मर्यादेत धरल्या जातात. त्याची बिले आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तेव्हा या कलमानुसार किमान ₹ 25 हजार ते कमाल 1 लाख रुपयांची सूट मिळू शकते.
*80/DD नुसार अवलंबित अपंग जोडीदार, मूल, पालक, भाऊ, बहीण यांचे वैद्यकीय उपचार, कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार ₹ 75 हजार ते ₹ 1 लाख 25 हजार पर्यंत आहे असे गृहित धरून सूट घेता येते यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही.
*80/DDB या कलमानुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी, मूल, अवलंबित भाऊ, बहीण, आई, वडील यांच्यावर काही विशिष्ट आजारावर केलेल्या खर्चाबद्द्ल वयानुसार ₹ 40 हजार ते 1 लाख रुपयांची सूट घेता येते.
*80/DU या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातून ₹ 75 हजार ते 1 लाख 25 हजारांची सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे अनेक राज्यात अपंग करदात्यांना आणि त्यांच्या पालकांना व्यवसाय कर (Profesitional Tax) माफ करण्यात आला आहे.
3) विविध कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट : यामध्ये आयकर कलम 80/E, Section 24, 80 EEE यांचा समावेश होतो.
*80/E नुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी अथवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कर्ज घेतल्यापासून ८ वर्षांपर्यंत कोणत्याही मर्यादेशिवाय सूट मिळण्यासाठी पात्र आहे.
*Section 24 नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर 30 हजार रुपयांची सूट मिळते.
4) विविध दान आणि मदतनिधीस मिळणारी सूट : यामध्ये कलम 80/G व 80/GGC यांचा समावेश होतो.
*80/G नुसार मान्यताप्राप्त संस्था, न्यास यांना दिलेल्या एकूण उत्पन्नाच्या 10% मर्यादेत 50 ते 100%सूट मिळते.
*80/GGC नुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत 50% पर्यंत सूट मिळते.
5) इतर काही कलमानुसार मिळणाऱ्या सवलती : यामध्ये 80/GG, 80/TTA यांचा समावेश होतो.
*80/GG मध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा 5 हजार रुपये एवढी घरभाड्याची वजावट मिळू शकते. मोठ्या शहरात घरभाडे अधिक असल्याने त्यासाठी वेगळी नियमावली आहे.
*80/TTA या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले 10 हजार रुपयावरील व्याज 60 वर्षाच्या आतील करदात्यांना करमुक्त आहे एकूण ₹40000 चे आत व्याज असेल तर मुळातून करकपात केली जाणार नाही.
*80/TTB नुसार वरिष्ठ व अतिवरिष्ठ नागरिकांस ₹ 50 हजार पर्यत बचत खाते आणि मुदत ठेव यावरील व्याज करमुक्त आहे. या मर्यादेत एकूण व्याज असल्यास मुळातून करकपात होत नाही. त्यांना 80/TTA ची सवलत मिळणार नाही.
या ठळक तरतुदींशिवाय -
★शेअर खरेदीविक्रीतून काही अटींसह अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर मुळातून एस टी टी कापला असेल सवलतीच्या दराने 15%कर द्यावा लागेल.
★ ₹ 1 लाखांहून अधिक दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर काही अटींसह 10% कर द्यावा लागेल. 31 जानेवारी 2018 पर्यंत शेअरवरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करमुक्त असल्याने हा नफा या दिवसाची सर्वाधिक किंमत किंवा खरेदी किंमत यातील सर्वाधिक, ती सुयोग्य खरेदी किंमत म्हणून गृहीत घराण्याचा पर्याय करदात्यास आहे.
★भांडवल बाजारातील कंपन्यांनी आणि 65% हून अधिक समभाग असणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेला लाभांश आपल्या उत्पन्नात मिळवून त्यावर आपली करपात्रता निश्चित होईल.
★राहते घर अधिक एक घर भाड्याने दिले नसल्यास त्यावर कर काही उत्पन्न गृहीत धरून कर आकारणी होणार नाही याहून अधिक असलेले घर भाड्याने दिलेले असो अथवा नसो त्याचे अंदाजित अथवा वास्तविक भाड्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर वगळून मिळालेल्या भाड्यातून 30% प्रमाणित वजावट मिळेल (सेक्शन 24)
★ पेन्शन योजना चालवणारे म्युच्युअल फंड व विमा कंपन्या यांनी देऊ केलेल्या निवृत्ती वेतनावर अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न समजून प्रमाणित वाजवट मिळणार नाही.
★EPFO कडून मृत सदस्यांच्या जोडीदास मिळणाऱ्या निवृत्ती वेतनातून 33.33% अधिकम ₹15 हजार प्रमाणित वजावट मिळेल.
★वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पुरवणारे करमुक्त कर्जरोख्यावरील (Tax free infrastructure bonds) व्याज करमुक्त आहे.
★कंपनीने पुनर्खरेदी केलेल्या शेअरवरील भांडवली नफा करदात्यांच्या हातात करमुक्त आहे (10/34A)
या तरतुदींशिवाय इतर अनेक तरतुदींमुळे आपली करदेयता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. वर फक्त सर्वसमावेशक तरतुदींचा विचार केला आहे. यातील प्रत्येक तरतुदीवर स्वतंत्रपणे तपशीलवार लेख लिहिता येऊ शकेल.
या सर्व तरतुदी त्यातील अटींसह आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या पहाव्यात अथवा सनदी लेखपालासारख्या (CA) तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.आपल्या करविषयक कोणत्याही शंकांचे निराकरण आपण लोकप्रिय समाज माध्यमातून मिळवू शकाल.
©उदय पिंगळे
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखातील मते वैयक्तीक असल्याची नोंद घ्यावी. कर विषयक कायद्यात सातत्याने सुधारणा होत असून त्यातील बदल लक्षात घेऊन सदर लेख लिहिला असून गुंतवणूकी संबंधात कोणतेही महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्यावी)
26 जानेवारी 2024 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Friday, 19 January 2024
शेअरबाजारातील तेजीतून गुंतवणूकदारांनी घ्यायचे बोध
#शेअरबाजारातील_तेजीतून_गुंतवणूकदारांनी_घ्यायचे_बोध
मागील कॅलेंडर वर्षांशी तुलना करता निफ्टी हा लोकप्रिय निर्देशांक अस्तित्वात आल्यापासून प्रथमच सलग आठ कॅलेंडर वर्षे (सन 2017 ते सन 2023) सकारात्मक परतावा देत आहे. यापूर्वीचा असा विक्रम सलग पाच वर्षांचा होता.
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारतीय भांडवल बाजारासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली होती. चलनवाढ, जागतिक भु राजकिय अस्थिरता त्यामुळे खनिज तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार विक्री यामुळे थोडा दबाव निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांच्या मनात सावध राहण्याची भावना निर्माण झाली होती. पण जसजसे काही दिवस गेले, गुंतवणूकदारांवरील दडपण कमी होत गेले त्यामुळे निफ्टीमध्ये प्रतिकूल परिस्थितीतही वाढ होत गेली. विविध नियामकांनी योजलेले उपाय, सरकारी धोरणे यामुळे स्थिरता आणि सकारात्मकता निर्माण झाली.
यावर्षी जागतिक व्यापारातील अस्थिर स्थिती, चढते व्याजदर, वाढती महागाई आणि येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका अशी आव्हाने समोर असतानाही बाजारात सकारात्मकता असल्याने गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल खात्री वाटत असल्याने कोट्यवधी रुपयांची म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे बाजारात येत आहे. विदेशी गुंतवणूकदार परतून आल्याने बाजार नवनवे विक्रम निर्माण करीत आहे. ही स्थिती अशीच राहील का? कोणीच सांगू शकत नाही पण यातून काही बोध नक्कीच घेता येतील.
★आर्थिक साक्षरता: आर्थिक यशासाठी सातत्य आणि चिकाटी याची आवश्यकता आहे. बाजारातील घडामोडींचा अभ्यास करणे, त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.
★अनपेक्षित घटनांपासून सावधगिरी: जगातील ताणतणाव आणि विकसनशील देशापुढे पुन्हा उभे रहाताना निर्माण होणारी आव्हाने यांचा अंदाज घेणे शहाणपणाचे आहे.
★गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे: तेजीचा फायदा घेऊन अनेक प्रारंभिक भांडवल विक्रीचे इशू येत आहेत आता त्यावर अधिमूल्य किती आकारायचे त्यावर बंधन नसल्याने कंपनीची निवड अधिक काळजीपूर्वक करावी. यातून मिळणारा परतावा हा फक्त नोंदणी होण्याच्या दिवशी मिळणारा नसून तो सातत्याने वाढत जाणारा मिळायला हवा या दृष्टीने कंपन्यांनी आपल्या कोणत्या योजना सेबीकडे सादर केल्या त्यांची माहिती मिळवून बाजारभाव काय आहे यापेक्षा कंपनी आपल्या ध्येयानुसार वाटचाल करीत आहे का ते पाहावे.
★निश्चित दृष्टीकोनाची गरज: काळाच्या कसोटीवर दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करता येते आणि त्यातून जोखीम कमी कमी होत जाते हे सिद्ध झाले आहे. आता बाजारात असलेल्या अस्थिरतेमुळे आणि उपलब्ध नवनवीन अल्पकालीन गुंतवणूक संधी आहेत त्यात जोखीम अधिक असली तरी कमी वेळात होणाऱ्या फायद्याचे सुप्त आकर्षक अनेकांना आहे तरीही गुंतवणूकदारांनी आपण नेमके कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत हे जाणून घेऊन गुंतवणूक करावी.
★दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची गरज: गुंतवणूक ही संथ शिस्तबद्ध आणि संयमाने केल्यास वाढते आपण कोणत्याही प्रकारचे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूक संचातील काही भाग तरी दीर्घकालीन गुंतवणूकीस राखून ठेवावा.
★पद्धतशीरपणे गुंतवणूक करा: आपल्याला खरेदी करायची आहे पण आता तेजी आहे लवकरच करेक्शन येईल किंवा मंदी येईल याची वाट पाहू नका कारण चोरपावलांनी आलेली मंदी नाहीशी होऊन पुन्हा तेजीस सुरुवात होईल आणि हातातील संधी जाईल. बाजाराचा कल कसाही असला तरी प्रत्येक प्रकारच्या बाजारात विविध संधी उपलब्ध आहेत. गुंतवणूक तज्ञ त्यामुळेच पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा सल्ला सर्वाना देत असतात.
★मालमत्ता वाटपाचे महत्व ओळखा: आपली मालमत्ता विविध गुंतवणूक प्रकारात विभागलेली असावी म्हणजे मिळणारा सरासरी परतावा हा सातत्याने चांगला मिळून जोखीम विभागली जाईल. खर तर सन 2023 हा अत्यंत कठीण काळ होता. याकाळात शेअर बाजाराशिवाय बॉण्ड मार्केट आणि सोने यातही चांगली वाढ झाली प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही.
★गुंतवणूकसंचाचा नियमित आढावा घ्या: विविध मालमत्ता प्रकारात विभागलेला आपला गुंतवणूक संच योग्य प्रकारे परतावा देत आहे का याचा वेळोवेळी आढावा घ्या. जर एखादा मालमत्ता प्रकार त्या वेळच्या तुलनेत कमी परतावा देत असेल तर त्याची कारणे शोधा. आवश्यक असल्यास त्यात बदल करा. वर्षातून किमान दोन ते चार वेळा असा आढावा घेऊन आवश्यक असल्यास गुंतवणूक घोरणात बदल करावा लागेल.
★मालमत्ता प्रकार म्हणून भांडवल बाजाराचा विचार करा: अनेकजण अपुऱ्या माहितीमुळे भांडवल बाजाराकडे गुंतवणूक या दृष्टीने पहात नाहीत. गेली अनेक वर्षे या बाजाराने सर्व प्रकारच्या मालमत्ता प्रकारात उत्तम परतावा मिळवला आहे. या बाजारात आपण स्वतः शेअर्स घेऊन थेट किंवा म्युच्युअल फंड योजना घेऊन अप्रत्यक्ष गुंतवणूक करू शकतो.
★सरकारी बँकांतील गुंतवणूक फायदेशीर: गेल्या वर्षी निफ्टी मधील सरकारी बँकांचा निर्देशांकाने 23% परतावा दिला तर खाजगी बँकांनी 9% परतावा दिला अजूनही सरकारी बँका सुयोग्य मूल्यास उपलब्ध आहेत. तेव्हा बाजारभावाऐवजी शेअर्सचे आंतरिक मूल्य ओळखून त्यात गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आहे.
★बाजार विदेशी गुंतवणूकदारांवर अवलंबून नाही- एक काळ असा होता की विदेशी गुंतवणूकदार बाहेर पडल्यावर बाजार डळमळीत होत असे गेल्यावर्षी प्रथमच विदेशी वित्तसंस्था आपली गुंतवणूक काढून घेत असताना बाजारात फारशी खळबळ माजली नाही.
★इंडेक्स फंड आणि इटीएफ मधील गुंतवणूक: इंडेक्स या फंड योजनांतील गुंतवणूक योग्य परतावा देते असे अनेकांना पटले आहे. त्याचा व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी आहे तर इटीएफ हे म्युच्युअल फंड योजनेसारखे असून त्याचे खरेदी विक्री व्यवहार शेअर बाजारात होतात याची अनेकांना जाणीव झाली आहे. या वर्षीही या दोन मालमत्ता प्रकारात मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.
★अस्थिरतेवर मात करण्यासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक :बाजारातील अस्थिरतेवर म्युच्युअल फंड एसआयपी हा पर्याय असल्याचे गुंतवणूक दारांना पटल्याने दरमहा येणाऱ्या एसआयपी मध्ये वाढ होत असून बाजारातील तेजीमुळे त्यात सातत्याने वाढ होत आहे.
★वाईट बातमीनंतर गडबडीत विक्री करू नये: गेल्या वर्षी जेव्हा काही वाईट बातमी आली तेव्हा अनेकांनी आपले शेअर्स विकले पण काही चाणाक्ष गुंतवणूकदारांनी त्याच वेळी खरेदी केली आणि भरपूर नफा कमावला.
★तीव्र प्रतिक्रिया टाळा :जगभरात बाजारावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक घटना घडत असतात त्यावर गुंतवणूकदार लगेच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. असं करण्यात आपलं अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. हे टाळून काही कालावधी लोटल्यावर त्यावर साधकबाधक विचार करणं कधीही चांगलं.
★गुंतवणूक ही मॅरेथॉन आहे लांब उडी नाही : नेहमी हे लक्षात ठेवावं की गुंतवणूक ही मॅरेथॉन आहे ती दीर्घकाळ चालत राहील त्यात तुम्ही लांब उडी मारण्यासाठी प्रयत्न करू शकाल पण त्यात पाय मोडण्याची शक्यता अधिक असते.
★बाजाराचा कल पहा: बाजारावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असल्याने कल पाहून गुंतवणूक करणे अनेकदा योग्य असते. अनेकदा गुंतवणूक सल्लागार या बाजूने अथवा विरोधात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असतात त्यांच्या परिणामाचा अंदाज बांधून स्वतंत्र निर्णय घ्या.
★शोध थांबवू नका: बाजार कसाही असला तरी त्यात तुलनेने कमी भाव असलेले शेअर्स असतात त्याचा शोध घेणे त्यात गुंतवणूक करणे थांबवू नका. वाजवी किमतीला उपलब्ध असलेले, वाढ होण्याची शक्यता असलेल्या शेअर्सचा शोध घ्या.
शेअरबाजारातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्यांची नोंद घेत रहा या अनुभवांचा आपल्याला आयुष्यभर उपयोग होत राहील.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 19 जानेवारी 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 12 January 2024
भांडवल बाजाराच्या दृष्टीने महत्वाच्या घडामोडी
#भांडवल_बाजाराच्या_दृष्टीने_महत्त्वाच्या_घडामोडी
सन 2023 हे भांडवल बाजाराच्या दृष्टीने उत्तम परतावा देणारे वर्ष ठरले. लोकप्रिय बाजार निर्देशांक निफ्टी 50 ने 19% तर सेन्सेक्सने वर्षभरात 18% वाढ नोंदवली. मागील लेखात आपण शेअरबाजारावर प्रभाव पाडणाऱ्या~
★हिंडणबर्ग अहवाल,
★एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण,
★गो फस्ट ची दिवाळखोरी,
★वेदांतचा सेमिकंडक्टर क्षेत्रातील जुना भागीदारी करार मोडून नवा करार, ★आयटीसीच्या हॉटेल व्यवसायाचे विभाजन,
★टीसीएस नोकरभरती घोटाळा,
★टाटा टेक्नॉलॉजीची प्रारंभिक भागविक्री,
★एअर इंडिया इंडिगोकडून मोठ्याप्रमाणात विमानखरेदी,
★डिस्ने हॉटस्टार आणि बायजुस अडचणीत
या महत्वाच्या घटनांचा थोडक्यात आढावा घेतला. या घटना त्या संबंधित कंपन्यांच्या बाजारभावावर परिणाम करणाऱ्या होत्या. याशिवाय अशा आर्थिक क्षेत्रांतील अनेक घडामोडी होत्या ज्या भांडवल बाजाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मानता येतील, त्यातील काही घटनांवर एक दृष्टिक्षेप.
★व्यवहारांची सौदापूर्ती एक दिवसानंतर- भारतीय शेअरबाजार हा जगातील जुना आणि आशियातील पहिला शेअरबाजार आहे. पूर्वी येथील व्यवहारांच्या सौदापूर्तीचे चक्र अनियमित होते. आर्थिक सुधारणा झाल्यावर त्यात नियमितता आली आणि व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होऊ लागले सौदापूर्ती T+5 म्हणजे व्यवहार दिवस सोडून कामाच्या पाचव्या दिवशी होऊ लागली त्यात T+3, T+2 अशी प्रगती होऊन 27 जानेवारी 2023 पासून T+1 या पद्धतीने होऊ लागली. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, जपान यासारख्या अतिप्रगत देशात अजूनही व्यवहारांच्या दुसऱ्या दिवशी सौदापूर्ती होत नाही. आता हे देश सदर पद्धतीने आपण लवकरच सौदापूर्ती करू असे म्हणू लागले असून आपण दोन टप्यात 31 मार्च 2024 पूर्वी T+0 म्हणजे ज्या दिवशी व्यवहार त्याच दिवशी सौदापूर्ती करण्याचा संकल्प केला आहे.
★प्रारंभीग भागविक्री झालेल्या शेअर्सची सुचिबद्धता (listing) T+6 वरून T+3 वर- आयपीओ नंतर विक्री केलेले शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी पूर्वी बराच कालावधी लागत असे आता तंत्रज्ञानाने त्यात प्रगती होऊन इशू बंद झाल्यावर बाजारात कंपनीच्या शेअर्सचे व्यवहार कामकाजाच्या सहाव्या दिवशी होत असत यावर्षी 1 डिसेंबर 2023 पासून ते कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी होऊ लागले.
★बँक निफ्टी आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मधील डिरिव्हेटिव व्यवहार दिवसात सुधारणा- यापूर्वी यातील साप्ताहिक व्यवहारांची आठवड्याची सौदापूर्ती दर गुरुवारी आणि मासिक सौदापूर्ती महिन्यातील शेवटच्या गुरुवारी होत होती. 12 जुलै 2023 पासून यात बदल होऊन आता सौदापूर्ती गुरुवारी होण्याऐवजी बुधवारी होत आहे. जर यादिवशी सुटी असेल तर त्यांची सौदापूर्ती आधल्या दिवशी होईल.
★सेन्सेक्स 30 आणि बँकेक्स करारांचे पुनरुज्जीवन- निफ्टी 50 आणि बँक निफ्टीच्या यशानंतर मुंबई शेअरबाजाराने मे 2023 मध्ये सेन्सेक्स30 आणि बँकेक्स हे डिरिव्हेटिव व्यवहारातील करार पुनरुज्जीवित केले हे करार पूर्वी सेन्सेक्स 15 आणि बँकेक्स 20 च्या लॉटमध्ये केले जात होते त्याची लॉट साईज कमी करून ती आता अनुक्रमे 10 आणि 15 च्या लॉटमध्ये आहे.
★विलीनीकरण अधिग्रहण- अनेक कंपन्यांचे विलीनीकरण आणि अधिग्रहण झाले त्यातील काही महत्वाचे -
*अडाणी एंटरप्राइजेसची उपकंपनी एएमजी मीडिया नेटवर्कने आएएनएस इंडिया प्रा लिमिटेडचे 50% अधिक भागभांडवल खरेदी केले.
*रिलायन्स गृपमधील रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने ऍडए मम्मामधील 51% भांडवल खरेदी केले.
*कारटेकट्रेडने सोबेक्स आटोमधील 100% भागभांडवल खरेदी केले.
*सरेगामाने पॉकेट एसेस पिक्चरमधील 52% हिस्सा खरेदी केला असून येत्या 15 महिन्यात आणखी 41% हिस्सा खरेदी करणार आहेत.
*कोटक महिंद्रा बँकेने सोनाटा फायनान्सचे अधिग्रहण केल्याने ती आता बँकेची उपकंपनी होईल.
*एचडीएफसी बँकेने सॉफ्टसेल टेकमधील आपला पूर्ण हिस्सा विकला आहे.
*लिबर्टी ग्लोबलने व्होडाफोन मधील भांडवल विकत घेतले.
*हिंदुस्थान इन्फरॉलॉगचे हिंदुस्थान पोर्टमध्ये विलीनीकरण.
*पीव्हीआर आणि आयनॉक्स लिजर मर्ज होऊन पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर नावाची नवी कंपनी अस्तीत्वात आली.
*अडाणी समूहाने एसीसी आणि अंबुजा सिमेंटवर ताबा मिळवला.
*एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण झाले.
★सर्वाधिक भागविक्री झालेले वर्ष- एसएमइ (173 इशू)आणि मेनलाईनमधील (52 इशू) यामुळे जगात सर्वाधिक संख्येची प्रारंभिक भागविक्री या वर्षात झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ती 50% अधिक आहे.19 वर्षानंतर प्रथमच टाटा ग्रुपकडून आलेल्या आयपीओचे जंगी स्वागत गुंतवणूकदारांनी केले. सेबीने शेअरवर किती प्रीमयम घ्यावा याविषयी मुक्त धोरण स्वीकारले असल्याने बाजारातील सकारात्मकतेचा फायदा उठवत अधिकाधिक कंपन्यांकडून प्रारंभिक भागविक्री चालू वर्षातही अपेक्षित आहे.
★डेट म्युच्युअल फंड योजनांवरील आयकर सवलत रद्द- 1 एप्रिल 2023 पासून खरेदी केलेल्या म्युच्युअल फंडांच्या डेट योजनांवरील भांडवली नफ्यावरील निर्देशांक फायदा आणि विशेष दराने आयकर सवलती रद्द झाल्या त्यामुळे या योजना आता मुदत ठेवी सारख्याच झाल्या आहेत. यामुळे चलाख गुंतवणूकदार बाजारात नोंदणी केलेल्या बॉण्ड्समध्ये त्यांची गुंतवणूक वळवण्याची शक्यता आहे त्यामुळे डेट मार्केटला चालना मिळून त्यातील तरलता वाढण्याची शक्यता वाटते.
★रिझर्व बँकेकडून व्याजदाराचा आढावा- रिझर्व बॅंकेकडून वर्षातून सहा वेळा पतधोरण आढावा घेण्यात येतो फेब्रुवारी 2023 मध्ये रेपोरेटमध्ये (रिझर्व बँकेचा व्यापारी बँकांना देण्याच्या कर्जावरील व्याजदर) पाव टक्का वाढ करण्यात येऊन तो साडेसहा टक्के करण्यात आला डिसेंबर 2023 पर्यंत त्यात बदल झाला नाही.
★एमएससीआय ग्लोबल इंडेक्समधील भारताचा भारमूल्य वाढले- जगातीक निदेशांक ठरवणाऱ्या विकसनशील देशातील निर्देशांकात आपला भारांक 15.9 वरून 16.3% वर उंचावला.
★जे पी मॉर्गनने आपल्या बॉण्ड निर्देशांकात भारतीय रोखे समाविष्ट- जे पी मॉर्गन इमर्जिंग मार्केट ग्लोबल इंडेक्समध्ये भारतीय कर्जरोख्यांचा समावेश करण्याचे ठरवले असून यावर्षी जून अखेर या निर्देशांकात सरकारी बॉण्डसचा समावेश होईल.
★म्युच्युअल फंड व्यवसायाची वाढ: म्युच्युअल फंडाची एकत्रित मालमत्ता 50 लाख कोटींच्यावर प्रथमच पोहोचली. 17 हजार कोटीहून अधिक रुपये एसआयपीच्या माध्यमातून भांडवल बाजारात येत असून हाही विक्रमच आहे. भांडवल बाजारात वाढणाऱ्या पैशांच्या ओघामुळेच विदेशी वित्तसंस्थानी काही काळ जोरदार विक्री करूनही शेअरबाजारात प्रथमच मोठी घसरण झाली नाही.
★शेअरबाजार निर्देशांकाचा उच्चांक: आता कधीही बाजार पडू शकेल असे वाटत असतानाच नोव्हेंबर अखेर आणि डिसेंबरमध्ये आलेल्या जोरदार तेजीमुळे बाजार निर्देशांक विक्रमी स्थानापर्यंत पोहोचले असून ते सध्या त्याच्या आसपास घुटमळत आहेत विदेशी वित्तसंस्थांकडून गुंतवणूक होत असल्याचे संकेत मिळत असल्याने अधिक वेगवान घडामोडी घडून तेजीचे नवे विक्रम सन 2024 मध्ये पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 12 जानेवारी 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 5 January 2024
शेअरबाजारावर प्रभाव पडणाऱ्या महत्वाच्या घटना
#शेअरबाजारावर_प्रभाव_पाडण्याऱ्या_प्रमुख_घटना
सन 2023 हे वर्ष शेअरबाजारासाठी आनंदाचे गेले. वाढत असलेल्या शेअरबाजारात आता करेक्शन येणार असे वाटत असताना अभूतपूर्व तेजी येऊन डिसेंबरमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या लोकप्रिय शेअरबाजार निर्देशांकांनी नवनवे उच्चांक गाठले. वर्षभरात बाजारात खळबळ माजवणाऱ्या अथवा बाजाराची दिशा बदलवणाऱ्या लक्षवेधी घटना.
★हिंडेनबर्ग अहवाल- जानेवारी 2023 च्या सुरुवातीस जगातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उद्योगपती गौतम अडाणी याचे नाव प्रकर्षाने चर्चिले जात असतानाच हिंडेनबर्ग अहवाल 7 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झाला. त्यात अडाणी गृपने समूहातील निधीचा गैरवापर करून शेअर्सच्या किंमतीत फेरफार घडवून आणले असल्याचा आरोप करण्यात आला. कंपनीने याचा ताबडतोब इन्कार करून असे आरोप हे भारतविरोधी कट करस्थानाचे षडयंत्र आहे असे म्हटले, त्यानंतर लगेचच आणि नंतर काही महिने या समूहातील शेअर्सची जोरदार विक्री होऊन त्यांची किंमत खूप घसरली आता डिसेंबर मध्ये आलेल्या तेजीमुळे समूहातील शेअर्सच्या किमतीत वाढ होऊन त्या पूर्वपदावर येत आहेत. या आरोपाची सेबीकडून चौकशी सुरू झाली झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी सेबीकडून होणार नाही म्हणून ती एसआयटी किंवा सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी करण्यात आली. या याचिकांची सुनावणी पूर्ण झाली असून 24 डिसेंबरला या प्रकरणावरील निकाल राखून ठेवण्यात आला होता. 3 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाला असून न्यायालयाने वृत्तपत्रातील आरोपावरून सेबीकडून चालू चौकशी काढून घेण्यास नकार दिला. याचिकाकर्ते यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा सादर करू शकले नाहीत. अडाणी गृपसंबंधी 24 प्रकारणांपैकी 22 प्रकरणांची सेबीची चौकशी पूर्ण झाली असून उरलेल्या दोन प्रकरणांची चौकशी लवकरच पूर्ण होईल असे सेबीने जाहीर केले आहे. ही चौकशी येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या चौकशीचा निष्कर्ष आणि त्यावरील निर्णय काय होतो ते लवकरच समजेल. बाजाराच्या दृष्टीने सदर निर्णय कदाचित गेम चेंजर ठरू शकतो तूर्तास अडाणी गटाला दिलासा मिळाला असून त्यांचे एकत्रित बाजारमूल्य सर्वोच्य स्थानापासून 80% खाली आले होते ते आता फक्त 20% खाली आहे.
★एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण- एचडीएफसी ही बिगर बँकिंग क्षेत्रातील गृहकर्जाचा व्यवसाय करणारी सर्वात मोठी जागतिक नावलौकिक असलेली कंपनी. एचडीएफसी बँक ही त्यांनीच प्रवर्तित केलेली खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक. या बँकेत तिच्या मातृकंपनीचे 1 जुलै 2023 रोजी रीतसर विलीनीकरण झाले. कॉर्पोरेट क्षेत्रातील हे सर्वात मोठे विलीनीकरण. एचडीएफसीच्या भागधारकांना त्यांच्या दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 25 शेअर्सचे बदल्यात एचडीएफसी बँकेचे एक रुपया दर्शनी मूल्य असलेले 42 शेअर्स देण्यात येऊन एचडीएफसीची स्टॉक एक्सचेंज वरील नोंदणी रद्द करण्यात आली. या नंतर 18 जुलै 2023 रोजी बँकेचे बाजारमूल्य प्रथमच 100 बिलीयन झाले आणि असे बाजारमूल्य असलेली ती जगातील सातवी बँक ठरली. 28 डिसेंबर 2023 रोजी बँकेचे बाजारमूल्य 159 बिलियनहून अधिक झाले असून देशातील दुसऱ्या क्रमांकाची नोंदणीकृत कंपनी झाली आहे. विलीनीकरण जाहीर झाल्यावर एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचा भाव काही काळ झटकन वाढला नंतर तो सर्वोच्च स्थानावर जाऊन तेथून 30% खाली आला आणि बराच काळ खालीच रेंगाळत राहिला अलीकडेच त्याने पुन्हा नवा सर्वोच्च भाव दाखवला आहे.
★गो फर्स्ट विमान कंपनीची दिवाळखोरी- 2 मे 2023 रोजी वाडिया गृपमधील या विमान कंपनीने आपण स्वतःहून दिवाळखोरीत असल्याचे सांगितले आणि मोरेटिरियमची मागणी केली. दिवाळखोरी वरील निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) राखून ठेवला पण मोरेटेरियमची मागणी मान्य केल्याने कंपनी विरुद्ध कोणतीही कारवाई प्रलंबित नसलेली वसुलीची कारवाई ही रखडलेली कारवाई मानली जाईल. आता कंपनीच्या धनकोना आपले पैसे वसूल करण्यासाठी कोणतीही कारवाई करता येणार नाही. यातून काय मार्ग काढता येईल यावर बँकांनी विचारविनिमय केला आणि कोणताच समाधानकारक मार्ग न सापडल्याने कंपनीस यापुढे कर्ज न देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राष्ट्रीय लवादाने कंपनीवर तात्पुरता मार्गदर्शक अधिकारी नेमून एकप्रकारे कंपनी पुनरुज्जीवन प्रक्रिया चालू केली आहे. कंपनीने प्रेट अँड व्हिटनी कंपनीच्या सदोष इंजिनांमुळे दिवाळखोरीत गेल्याचे सांगून त्यांच्याकडून 10000 कोटीच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. प्रवर्तकांनी 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून ही कंपनी अधिग्रहित करण्यास स्पाईस जेट कंपनीने स्वारस्य दाखवले असले तरी आजपर्यंत दिवाळखोरी पूर्णपणे मान्य करणे अथवा अधिग्रहण होणे यातील कोणतीही घटना घडली नसून या विमान कंपनीने आपली सर्व उड्डाणे थांबवली आहेत.
★फॉक्सकॉन वेदांत यांचा सेमिकंडक्टर क्षेत्रातील करार मोडला, मायक्रोन बरोबर नवा करार- भारतात कोविड नंतर सेमिकंडक्टरची टंचाई निर्माण झाल्याने सरकारने या क्षेत्रासाठी उत्पादन निगडित प्रोत्साहन योजना सुरू केली वेदांतने फॉक्सकॉनशी सहकार्य करार करून सेमी कंडक्टर उत्पादन करण्याचे जाहीर केले होते परंतु नंतर या प्रकल्पातून माधार घेतली आणि करार रद्द केला यानंतर वेदांतने मायक्रोन बरोबर नवीन करार केला असून गुजरात मधील साणंद येथे नवा प्रकल्प चालू केला असून येत्या काही महिन्यात त्यातून उत्पादन चालू होईल.
★आयटीसी कंपनीच्या हॉटेल व्यवसायाचे स्वतंत्र कंपनीत विभाजन- 14 ऑगस्ट 2023 रोजी देशातील सर्वात मोठी सिगारेट उत्पादक आणि एफएमसीजी क्षेत्रातील दादा कंपनी आयटीसीने आपल्या हॉटेल व्यवसायाचे वेगळ्या कंपनीत विभाजन करणार असल्याचे जाहीर केले. त्यास भागधारकांची मंजुरी मिळून विद्यमान भागधारकांना या नवीन कंपनीचा एक शेअर त्यांच्या दहा शेअर्सच्या बदल्यात विनामूल्य देण्यात आला. शेअरबाजारात त्याची लवकरच स्वतंत्र नोंदणी करण्यात येणार आहे.
★टीसीएस कंपनीतील नोकर भरतीचा घोटाळा- आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसमध्ये नोकरभरती करण्यासाठी लाच दिली जाते या घटनेचा पर्दाफाश मीडिया रिपोर्ट मधून जून 2023 मध्ये करण्यात आला. हा घोटाळा 100 कोटी रुपयांचा आहे असे आरोप करण्यात आल्यावर कंपनीने त्यावर त्वरित चौकशी सुरू केली त्याचा अहवाल आल्याचार भरती प्रमुखांना रजेवर पाठवून संसाधन व्यवस्थापन विभागातील चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 16 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले असून सहा एचआर कंपन्यांना कंपनीबरोबर व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.
★टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीची प्रारंभिक भागविक्री- सन 2004 ला टीसीएस या टाटा गृपमधील कंपनीच्या भागविक्रीनंतर 19 वर्षांनी या गृपमधील शेअर्सची प्रारंभिक भागविक्री झाली त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला 3042 कोटी रुपयांच्या या इशूला सत्तर पट अधिक मागणी आली. 500 रुपयात दिलेल्या या दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे 30 नोव्हेंबर 2023 ला शेअर्सचे पहिले काही व्यवहार 1200 ते 1400 रुपयांनी झाले. 3 जानेवारी 2024 चा या कंपनीच्या शेअर्सचा बंदभाव ₹ 1170 च्या आसपास आहे.
★एअर इंडिया आणि इंडिगोकडून व्यवसाय विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर विमानखरेदी~
टाटा गृपने सरकारीकरण झालेल्या आपल्या एअर इंडियाचे जून 2023 मध्ये अधिग्रहण केल्यानंतर आपली ग्राहकसेवा सुधारण्यासाठी विस्तार कार्यक्रमाचा भाग म्हणून 250 एअरबस विमाने आणि 220 बॉईग विमाने खरेदी करण्याची 70 अब्ज डॉलर्सची ऑर्डर दिली आहे इंडिगो नेही 500 एअरबस खरेदीची ऑर्डर दिली असून एकाच वेळी व्यावसायिक विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांचा विमान खरेदीतील हा एकत्रित उच्चांक आहे.
★डिस्ने हॉट स्टार - आयपीएलच्या प्रक्षेपणाचे अधिकार गमावल्यावर आपल्या ग्राहकांना 31 मार्च 2023 नंतर एचबीओ चॅनल दाखवणार नसल्याचे सांगितले. याचा परिणाम म्हणून 30 सप्टेंबर 2023 अखेर संपलेल्या अर्ध्या वर्षात आपले 2.8 दशलक्ष सशुल्क ग्राहक सदस्य गमावले.
★युनिकॉर्न दर्जा मिळवणारे पाहिले स्टार्टअप बायजूस अडचणीत- अभिनेता शाहरुख खान, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सारख्या व्यापार दूतांनी लोकप्रिय केलेली बायजूस ही शैक्षणिक क्षेत्रातील आधाडीची आणि युनिकॉर्न दर्जा (एक अब्ज बाजारमूल्य असलेली कंपनी) प्राप्त कंपनी कोविड नंतर अडचणीत सापडली असून त्याच्या कॅश फ्लॉवर परिमाण झाल्याने आपली कर्जदायित्वे पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे धनकोनी तीला कोर्टात खेचले लेखा परीक्षकांसह संचालक मंडळातील अनेक सदस्यांनी राजीनामे दिले. सक्तवसुली संचनालयाने संस्थापकाना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता शैक्षणिक क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर करून श्रेष्ठत्व मिळवण्याचे या कंपनीचे स्वप्न विरले आहे.
वर्ष संपताना बाजाराने उच्चांक करून नवा मापदंड निर्माण केला असून आगामी निवडणूक वर्ष लक्षात घेता तो आणखी नवे विक्रम नोंदवण्याची शक्यता आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर 5 जानेवारी 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 29 December 2023
नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा
#नव्या_कॅलेंडर_वर्षातील_महत्वाच्या_तारखा(सन 2024)
1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या वर्षात कदाचित काही आर्थिक चुका अनवधानाने आपण केल्या असतील. आर्थिक चूक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच. मागे केलेल्या चुका हा इतिहास झाला. त्यांची पुनरावृत्ती आपण या वर्षात करणार नाही असा संकल्प करूया. या वर्षातील काही लक्ष ठेवण्यासारख्या तारखा किंवा कालावधी खालीलप्रमाणे-
आपल्याला सहज हाताशी येईल अशा ठिकाणी ही माहिती जपून ठेवा. यात एखादी अंतिम तारीख दिली असली तरी त्यासंबंधित गोष्टीची पूर्तता मुदतीपूर्वीच करावी म्हणजे गोंधळ उडणार नाही, दंड पडणार नाही, आपले आर्थिक नुकसान होणार नाही.
31 जानेवारी 2024 /15 फेब्रुवारी 2024/29 फेब्रुवारी 2024
★आर्थिक वर्ष 2023-2024 येत्या काही दिवसात संपेल. हीच वेळ आहे आपल्या अंदाजित उत्पन्नचा आढावा घेऊन पुरेशी गुंतवणूक करण्याची. आपण कर मोजण्याची जुनी पद्धत स्वीकारली असेल तर काही गुंतवणूक /खर्च याची वजावट घेतल्याने आपला आयकर कमी होऊ शकतो पगार पत्रकाव्यतिरिक्त आपण काही गुंतवणूक/ खर्च केले असल्यास त्याची विहित नमुन्यात सूचना द्यावी लागते. आपल्या अस्थापनेकडून अशा सूचना देण्यासाठी वरील तीन पैकी कोणतीही अथवा एक वेगळीच अंतिम तारीख असू शकते. ती माहीती करून घेऊन आपली पगाराव्यतिरिक्त वैयक्तिक गुंतवणूक /खर्च केले असल्यास पुराव्यासह सदर तारखेच्या आत केल्यास सादर केल्यास त्याचा विचार करून अंतिम आयकर आकारणी होईल. हा फॉर्म आणि त्याचे पुरावे देण्यापूर्वी जर आपला कर अतिरिक्त कापला असल्यास समायोजित केला जाईल तरीही अतिरिक्त कर कापला असल्यास तो आपणास मालकाकडून परत मिळणार नाही तर विहित मुदतीत विवरणपत्र सादर करून आयकर खात्याकडून परत मिळवावा लागेल.
1 फेब्रुवारी 2024
★खरंतर सन 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस. येत्या वर्षात विद्यमान सरकारची मुदत संपते त्यामुळे कदाचित पूर्ण अर्थसंकल्प सादर न करता तात्पुरत्या खर्चासाठी लेखानुदान घेतले जाऊ शकते. अशा परिस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्याचे, न करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन सरकारवर नसल्याने पूर्ण अर्थसंकल्प सुद्धा सादर केला जाऊ शकतो. त्यात कर संदर्भात काय बदल होतात ते पाहून आपल्या गुंतवणूक धोरणात बदल करावा लागेल.
15 मार्च 2024/ 31 मार्च 2024
★ज्या लोकांना अग्रीम कर (Advance Tax) भरावा लागतो त्यांनी 15 मार्च पर्यंत 100% आणि त्यानंतरच्या व्यवहारांवरील पूर्ण आयकर 31 मार्चपर्यंत भरणे आवश्यक असून याप्रमाणे अग्रीम कर न भरल्यास 1% प्रतिमाह दंड होऊ शकतो. त्यामुळे अग्रीम कर भरणाऱ्या करदात्यांनी या तारखा लक्षात ठेवाव्यात.
31 मार्च 2024
★चालू आर्थिक वर्षात आयकर सूट मिळावी म्हणून गुंतवणूक/खर्च करण्याचा हा शेवटचा दिवस. (80 C, 80 D, 80TTA यानुसार मिळणाऱ्या सवलती) या दिवशी गुंतवणूक किंवा खर्च करून तो आयकर विवरणपत्रात दाखवून कर सवलत मिळवता येईल जुन्या पद्धतीने कर आकारणी मान्य असलेल्या लोकांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.
★अनिवासी भारतीयांना विविध देशाशी असलेल्या करारानुसार ते रहात असलेल्या देशात कर बसत असल्यास त्या देशांशी असलेल्या दुहेरी कर आकारणी धोरणानुसार तेवढ्या कराची सूट भारतात मिळते अशी सूट मिळवण्यासाठी 10 F फॉर्म आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा लागतो, यासाठी पॅन आवश्यक आहे त्याशिवाय ऑनलाइन फॉर्म प्रोसेस होऊ शकत नाही. ज्या अनिवासी भारतीयांकडे पॅन नाही अशा व्यक्ती करात सूट मिळवण्यासाठी फॉर्म ऑफलाईन पद्धतीने या तारखेपूर्वी भरू शकतील.
01 एप्रिल 2024
★नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात (सन 2024- 2025) नवीन वर्षात आपले उत्पन्न किती होईल, आयकर किती भरावा लागेल, आयकर वाचवण्यासाठी काय करता येईल. आयकर मोजणीसाठी कोणती पद्धत स्वीकारावी याबाबत प्राथमिक विचार करू शकता. त्याप्रमाणे आपण मागील वर्षाचे सन 2023-2024 चे आयकर विवरणपत्र भरू शकता त्यासाठी आवश्यक माहितीची जमावजमाव करायला सुरूवात करा म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी दमछाक थांबेल. जिथे जिथे आपली मुळातून कर कपात होऊ नये असे वाटत असल्यास आवश्यक तेथे 15 G/H फॉर्म भरून द्यावेत म्हणजे कर कापला जाणार नाही.
15 जून 2024
★सन 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा अंदाज करून 30% अग्रीम कराचा पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख.
★मालकाकडून कर्मचाऱ्यांना त्यांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि करकपात यांची सविस्तर माहिती देणारे फॉर्म 16 प्रकारातील प्रमाणपत्र देण्याची अंतिम तारीख. या मुदतीत प्रमाणपत्र मिळाल्यास योग्य मुदतीत विवरणपत्र आपणास भरता येईल.
30 जून 2024
★डी मॅट खाते आणि म्युच्युअल फंड योजनांसाठी नामनिर्देशन करण्याची सक्ती भांडवलबाजार नियंत्रक सेबीने केली आहे. ज्यांच्या पूर्वीच्या खात्यांना/ योजनांना नामनिर्देशन केलेले नाही त्यांना ते करण्याची मुदत वारंवार वाढवून दिली, ही वाढलेली मुदत 30 जून 2024 ला संपेल. ज्यांनी नामनिर्देशन केले नसेल त्यांचे खाते गोठवल्याने कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.
31 जुलै 2024
★ज्या करदात्यांना आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करावे लागत नाही त्यांना मागील आर्थिक वर्षाचे म्हणजेच सन 2023- 2024 चे आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची अंतिम तारीख. ही तारीख मागील दोन वर्षांत बदलली नसल्याने योग्य मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.
15 सप्टेंबर 2024
★सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर भरण्याचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख. यात अंदाजित कराच्या पहिल्या हप्त्यासह 45% एकूण आयकर भरला जावा अशी अपेक्षा आहे.
30 सप्टेंबर 2024
★ज्या करदात्यांना आपल्या व्यवहारांचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागते त्याच्यासाठी आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची शेवटची तारीख. ही तारीख अनेकांचे लेखापरीक्षण पूर्ण होत नसल्याने वाढवली जाते पण भविष्यात ती वाढवली जाईलच याची खात्री देता येत नाही तेव्हा अशा सर्वच करदात्यांनी याच मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.
30 नोव्हेंबर 2024
★पेन्शन अँथोरिटीस हयात असल्याचा दाखला देण्याची अंतिम तारीख. आता हा दाखला आपल्या जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिला तरी चालतो. विहित मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास निवृत्तीवेतन स्थगित केले जाते.
15 डिसेंबर 2024
★सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर तिसरा हप्ता भरण्याची अंतिम तारीख. या आर्थिक वर्षाच्या अपेक्षित कराच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यासह एकूण 60% कर भरावा अशी अपेक्षा आहे.
31 डिसेंबर 2024
★आर्थिक वर्ष 2023-2024 चे आयकर विवरणपत्र दंडासाहित भरण्याची शेवटची तारीख.
★31 जुलै 2024 अथवा 30 सप्टेंबर 2924 किंवा आयकर खात्याने दंडाशिवाय विवरणपत्र भरण्याच्या जाहीर केलेल्या तारखेपूर्वी किंवा तारखेनंतर विवरणपत्र दाखल केले असल्यास सुधारीत विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख. या मधील काळात विभागाकडून विवरणपत्र मंजूर झाले असले तरीही सुधारित विवरणपत्र दाखल करता येईल.
वरील तारखांबाबत काही शंका असल्यास जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. याशिवाय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार किंवा आयकर खात्याने घेतलेल्या निर्णयांमुळे किरकोळ बदल होऊ शकतात, त्यांची पूर्वसूचना देण्यात येते.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर 29 डिसेंबर 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 22 December 2023
गुंतवणूकदारांचे प्रकार
#गुंतवणूकदारांचे_प्रकार
इक्विटीवाला डॉट कॉम ही वडोदरा येथे असलेली एक आर्थिक क्षेत्राशी निगडित कंपनी आहे. गुंतवणूकदार आणि गुंतवणूकीतील विविध मध्यस्थ उदाहरणार्थ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, सबब्रोकर, इन्शुरन्स एजंट यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य ही कंपनी करते. हितेश माळी हे त्याचे संचालक असून त्यांचा या क्षेत्रातील 30 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. गुंतवणूकदार, मध्यस्थ आणि वित्तिय संस्था यांची वाढ अबाधित ठेवून धोरणात्मक व्यवसाय दिशा दिग्दर्शनाचे काम त्यांच्यामार्फत केले जाते. त्यांच्या व्यवसाय भागीदारांसाठी वर्षभरात 12 व्यवसाय विकास कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमाचे शीर्षक “दि नेक्स्ट बिग थिंग” हे आहे. मध्यस्थ आणि त्यांच्याशी संबंधित गुंतवणूकदार त्यात सहभागी होऊ शकतात. ही एक अर्थसाक्षरतेची मोहीम आहे. त्यात बाजाराचा कल, गुंतवणूकदारांची मानसिकता, गुंतवणूक धोरण यासंबंधात मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या अनेक ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मला मिळत असते. खुसखुशीत पद्धतीने माळीसर त्या दिवशी निवडलेला विषय अतिशय सोपा करून सांगतात. या कार्यक्रमांचे व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. 19 नोव्हेंबरला माळी सरांनी गुंतवणूकदारांचे विविध प्रकार उलगडून दाखवले. त्यांची मानसिकता त्याचे गुंतवणूकीवर होणारे परिणाम समजावून सांगितले. आपण यातील कोणत्या गुंतवणूकदार प्रकारात मोडतो ते समजून घेतले तर गुंतवणूक निर्णय योग्य प्रकारे घेण्यास त्याची मदत होऊ शकेल. आपली आर्थिक धेय्ये, गुंतवणूकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, प्राधान्यक्रम, जोखीम घेण्याची क्षमता जाणणारा आपला गुंतवणूक सल्लागार असेल तर आपल्याला योग्य होतील अशा गुंतवणूक योजना तो सुचवू शकेल.
19 नोव्हेंबरला वर्ड कप फायनल मॅच होती आणि भारत वर्ड कप जिंकणारच अशी वातावरण निर्मिती झाली होती. माळीसर हाच धागा पकडून म्हणाले आजच्या विषयाच्या अनुषंगाने मी काल चिंतन करीत होतो. या काळात त्यांनी अनेकांना फोन करून उद्या काय होईल? याची चाचपणी केली. भारत जिंकणार यावर सर्वांचं एकमत होतं. त्यांनी लोकांना पुढे प्रश्न विचारला भारत कुणामुळे जिंकेल? याची उत्तरं मात्र वेगवेगळी होती. कोणी म्हणालं कॅप्टनमुळे आपण जिंकू, कुणी म्हणालं शुभम गिलमुळे, कोणी म्हणालं श्रेयस अय्यर काहीतरी करू शकेल, एकटा विराट बास आहे, कुलदीप यादवचे हे नेहमीचं मैदान आहे, जडेजा अष्टपैलू खेळाडू आहे त्यामुळे आपला विजय होईल अशी उत्तर आली. त्यांनी विचारलेल्या 11 पैकी 11 लोकांना भारत जिंकेल असं वाटत होतं पण कुणामुळे जिंकेल याची 11 पैकी 11 वेगवेगळी उत्तरं होती. हे कशामुळे झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असलेल्या खेळाडूंमुळे, आपल्या गुंतवणुकीचे तसंच आहे. येती 10 ते 25 वर्षे आपला देश खुप प्रगती करणार आहे. आपली अर्थव्यवस्था बचत करणाऱ्या पासून खर्च करण्याकडे वाटचाल करीत आहे. पूर्वी आपण बचत करत होतो आता गुंतवणूक करत आहोत. लोक पूर्वी पैसे फक्त मुदत ठेवीत ठेवत असत, आता जोखीम क्षमतेनुसार शेअर्स, म्युच्युअल फंड, पीएमएस, युलीप यात गुंतवणूक केली जात आहे. सन 2023 हे शेअरबाजाराच्या दृष्टीने अतिशय चांगलं वर्ष म्हणता येईल. बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला असून स्मॉलकॅप शेअर्सनी 37% मिडकॅप शेअर्सनी 32% लार्जकॅप शेअर्सनी 7% तर मिडकॅप स्मॉलकॅप यांचा एकत्रित 31% परतावा दिला. ज्यांनी लार्जकॅपमध्ये पैसे गुंतवले ते निराश झाले असतील तर स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करणारे आनंदात असतील ज्यांची गुंतवणूक एनएसइ 500 किंवा बीएसइ 200 मध्ये होती त्यांनाही 14% च्या आसपास परतावा मिळाला. जेव्हा परताव्यात मोठा फरक असतो तेव्हा गुंतवणूकदार गोंधळून जातात, निराश होतात. मग ते काय करतात आपली गुंतवणूक पद्धतीच बदलून टाकतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत. आपल्याला अस वाटतं का जडेजा ज्या पद्धतीने खेळतो त्याच प्रकारे रोहित शर्मा खेळेल, शर्मासारखे यादव खेळेल. प्रत्येकाची स्वतःची खेळण्याची लकब आहे ती सोडून तो दुसरं काही करायला गेला तर लवकर आउट होईल त्याचप्रमाणे गुंतवणूकदार म्हणून आपण कुठे आणि नेमकं काय करणार? हाच आजचं हे सेशन घेण्यामागे महत्त्वाचा उद्देश आहे गेल्या दोन वर्षात निफ्टीने दर्शविलेली वाढ 9% आहे त्या तुलनेत निफ्टी पीएसयु, निफ्टी बँक, निफ्टी एफएमसिजी, ऑटो सेक्टर यांनी खूप मोठ्या प्रमाणात वाढ दाखवली आहे अशा प्रसंगात आपण गुंतवणूक पद्धती बदलली तर खूपच फरक पडतो.
आपल्या संभाषणात हितेशजी असं म्हणाले की माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवातून मी सांगू शकतो की गुंतवणूकदारांचे 5 मुख्य प्रकार आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. बाजार हा चक्राकार आहे, प्रत्येक क्षेत्राचे बरेवाईट दिवस असतात. गुंतवणूकीतील यश हे आपली मनोभूमिका आणि बाजारातील परिस्थिती यावर अवलंबून असतं त्यानुसार आपण प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराला जाणून घेऊया.
★बचत करणारे गुंतवणूकदार (सेव्हर): अनेक गुंतवणूकदारांची मनोभूमिका पैसे वाचवण्याची असते याचा अर्थ असा नाही की त्याचं उत्पन्न मर्यादित असतं म्हणून ते असं वागतात. अनेकदा उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्ती सुध्दा त्यांच्या गुंतवणुकीतून फिक्स डिपॉझिट एवढा किंवा त्याहून थोडासा अधिक परतावा मिळाला तरी चालेल पण आपली गुंतवणूक सुरक्षित राहिली पाहिजे या विचाराचे असतात. माझा एक गुंतवणूकदार ग्राहक ज्याचा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक संच खूप मोठा आहे. आपल्याला माहीत आहे लोक परतावा थोडासा कमी झाला की कासावीस होतात याला त्याच्या गुंतवणूकीवर मिळालेला परतावा बरोबर आहे ना, याची शंका आल्याने खात्री करण्यासाठी त्याने मला फोन केला. त्याला याची भीती वाटते की जास्त परतावा मिळतोय तर कदाचित माझं जास्त नुकसान भविष्यात होऊ शकेल. त्यामुळे म्युच्युअल फंड योजना, पीएमएस यासारखी एकत्रित गुंतवणूक अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. कधीकधी अशा गुंतवणूकदारांनी त्यांचं गुंतवणूक घोरण बदलणं जरुरीचे असतं जर ते तरुण असतील, त्याच्यावर कोणतीही जबाबदारी नसेल, कोणतेही कर्ज घेतलं नसेल आणि तरीही ते बचत करणारे गुंतवणूकदार असतील तर त्यांच्यासाठी ते योग्य नाही. या परीस्थितीत तुम्ही अधिक जोखीम घेऊ शकता तेव्हा याच प्रकारास चिटकून राहायची त्यांना गरज नाही.
★कमी कालावधीत कमी पैशात संपत्ती निर्माण करण्याची इच्छा बाळगणारे गुंतवणूकदार (ट्रेडर): अनेकदा यांना जुगारी प्रवृत्तीचे लोक म्हटले जाते. जगभरात कॅसिनो आहेत अनेक लोक रात्रभर जागून तेथे पैसे लावत असतात. त्यांना आशा असते की एकदा तरी आपलं भाग्य उजळेल. मग जिंकतात कोण? ज्यांना अनुभव असतो, स्वतःची गणितं असतात ते. तेव्हा हे सगळं आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. जेव्हा आपल्यापुढे भांडवलवृद्धीचे वेगवेगळे पर्याय असतात तेव्हा आपल्याला कमी कालावधीत होणारी भांडवलवृद्धीची भुरळ पडते. याचा अर्थ ट्रेडिंग करू नये ते वाईट आहे असा न धरता आपण त्याच्या किती आहारी जाणार ते ठरवायला हवं.
★अंदाजेपंचे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार (प्रेडीक्टर): ही सर्व भारतीयांना जडलेली वाईट सवय आहे आपण प्रत्येक गोष्टीचा अंदाज बांधून आणि सर्वाना सांगून मोकळे होतो. ही सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. एक वेळ जुगारी लोक चांगले कारण आपण किती कोणता धोका स्वीकारतो आहोत याची त्यांना जाण असते. पण माझ्याकडे आतल्या गोटातील माहिती आहे, मला असं सारखं वाटतंय असे अंदाज बांधणारे कदाचित अल्पकाळात फायदा मिळवत असतील पण दिर्घकाळात ते संपत्ती निर्माण करू शकत नाहीत.
★उधळपट्टी करणारे गुंतवणूकदार (स्पेण्डर): असेही गुंतवणूकदार आहेत ते नफा मिळाला की ताबडतोब खर्च करतात. ते संपत्ती निर्माण करू शकत नाही त्यांना मिळालेले पैसे बाजूला ठेवण्याऐवजी खर्च करायला आवडतं. ते ज्या पद्धतीने फुशारक्या मारतात त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आपल्याला मिळालेल्या पैशातून दिर्घकाळात संपत्ती निर्माण करता यायला हवी. तुम्हाला वाटेल काही मौजमजा न करता फक्त गुंतवणूक करायची का तर तसं नसून मौजमजा आणि गुंतवणूक यांचा समतोल साधला गेला पाहिजे. जेव्हा संयमित पद्धतीने आपण गुंतवणूक करू तेव्हा यशाची खात्री असते. जेव्हा गुंतवणूक केल्यावर आपण त्यात अति उल्हासित होऊ लागतो तर ती गुंतवणूक घोकादायक बनू लागते आणि आपलं स्वास्थ्य बिघडतं.
★स्मार्ट गुंतवणूकदार (प्लॅनर): त्यांच्या गुंतवणूकीत नियोजनाला महत्व असतं त्याप्रमाणे निर्णय झाला की विविध मालमत्ता प्रकारात ते गुंतवणूक करतात आणि शांत बसतात. त्याचा दीर्घकालीन गुंतवणूकीवर विश्वास असतो. प्रचलित व्याजदर आणि महागाई यांच्या तुलनेत थोडा अधिक परतावा त्यांना मिळतो त्यावर ते आपल्या गुंतवणूकीकडे समाधानाने नजर टाकू शकतात. हे लोक आपल्या गुंतवणूकीबद्धल फारसे बोलत नाहीत, बाजार कुठे जाणार यावर चर्चा करीत नाहीत, कुणाकडे टीप्सही मागत नाहीत. आपले आयुष्य समाधानात जगत असतात. त्याची गुंतवणूक पिरॅमिडसारखी असते त्याच्याकडे संकटकाळात उपयोग होईल असा फंड असतो, आपत्कालीन योजना असते, मेडिक्लेम असते, टर्म इन्शुरन्स असतो, म्युच्युअल फंड, शेअर्स अशी त्यांची गुंतवणूक असते. निवृत्तीची योजना असते, आपली भविष्यातील नेमकी गरज काय ती पूर्ण करण्यासाठी त्यांची निश्चित योजना असते. त्याचप्रमाणे आपल्या नंतर संपत्तीचे वाटप कसे व्हावे याची निश्चित योजना असते. आपण नेमकं बरोबर त्यांच्या उलट करून प्रथम मालमत्ता निर्माण करण्याच्या नादात इएमआयच्या चक्रात अडकतो. तेव्हा प्रथम संपत्तीची निर्मिती करून त्यातून मालमत्ता निर्माण करता आली पाहिजे. गुंतवणूक करण्याच्या नादात आपल्या मनावर कोणताही तणाव येता कामा नये. सुख समाधानात जगाचा निरोप घेता यायला हवा. गुंतवणूकदारांचे जसे प्रकार आहेत तशा गुंतवणूकीच्या विविध पद्धती आहेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊन आपल्याला कोणती पद्धत सोयीची होईल याचाही गुंतवणूकदाराने विचार करायाला हवा. जी गुंतवणूक आपली झोप उडवेल आपल्याला सतत अस्वस्थ करेल ती गुंतवणूक आपल्यासाठी नाही.
आपण यातील कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहेत ते तपासून पहा. मॅनेजमेंटच्या पुस्तकात आणखी अनेक प्रकारचे गुंतवणूकदार सांगितले असले तरी मला हे पाचच महत्वाचे प्रकार वाटतात तेव्हा आता स्वतःला तपासून पाहून आवश्यकता असेल तर बदल करा नसेल तर त्या त्या प्रकारातील नियमांचे नीट पालन करा. यातील स्मार्ट गुंतवणूकदार होण्याचा प्रयत्न करा. अनेकदा आपल्याला निव्वळ परतावा आकर्षक वाटतो पण तो किती काळाने मिळाला याचे महत्व लक्षात घ्या आणि चक्रवाढवाढीचा वार्षिक दर किती त्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करा जर आपल्याला सातत्याने 12 ते 15% चक्रवाढवाढीने दीर्घकाळ परतावा मिळत असेल तर आपल्या संपत्तीत दिर्घकाळात प्रचंड भर पडेल. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पैसा साध्य नसून साधन आहे ज्या पद्धतीने आपण गुंतवणूक करतोय त्यांनी आपल्याला आनंद मिळतोय ना? अशी पद्धतशीर गुंतवणूक आपण करणार असाल आपल्याला भारताची हारजित महत्वाची न वाटता मॅचमधील आनंद महत्वाचा वाटेल. तेव्हा आपल्या आर्थिक सल्लागाराच्या संपर्कात रहा. तो आपल्या टीमच्या प्रशिक्षकासारखी मदत करेल. शेवटी हा खेळ असल्याने आज हारजितचा विचार न करता तुम्ही या आणि यापुढील प्रत्येक मॅचचा तन्मयतेने आनंद घ्याल, हेच या आपल्या आजच्या विषयाचे सार आहे.
या मानसिकतेने गुंतवणूक कराल तेव्हा आपला गुंतवणुकीवरील विश्वास दृढ होईल त्याने देशाची प्रगती होईल ती नुसतीच प्रगती नसेल तर समाधान देणारी प्रगती असेल. पैसे वाढतील पण ते कोणत्या पद्धतीने वाढतात, गुंतवणूकदाराला समाधान देतात का? तेव्हा आजच्या मॅचमध्ये कोणता खेळाडू काय करतो यापेक्षा रनरेटवर लक्ष ठेवा त्याचप्रमाणे आपल्या गुंतवणूकीचा तुकड्या तुकड्याने विचार न करता त्यातून मिळणाऱ्या चक्रवाढ वाढीकडे पहा आनंदात रहा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक असून इक्विटीवाला डॉट कॉम या कंपनीशी लेखकाचे कोणतेही आर्थिक संबंध नाहीत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 22 डिसेंबर 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 15 December 2023
गृहकर्ज पुनर्रचना करताना
#गृहकर्ज_पुनर्रचना_करताना
मी मुंबई ग्राहक पंचायतीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचा सदस्य आहे. ग्राहक तितुका मेळवावा या मुखपत्राच्या संपादनासाठी सहाय्य करतो. महारेराचा सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहे. हौस म्हणून कथा, कविता, लेख आत्मचरित्र यांचे अभिवाचन करतो. प्रामुख्याने आर्थिक विषयावर लिहितो. वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक, ऑनलाइन पोर्टल आणि समाज माध्यमांवर माझे लेख, मुलाखती, लाइव्ह कार्यक्रम प्रकाशित होत असतात. मुंबई ग्राहक पंचायतीमुळे अनेक जण त्याच्या वेगवेगळ्या समस्यांबद्धल माझ्याशी संपर्क साधतात. या समस्या केवळ ग्राहक म्हणूनच नाही तर खाजगी, कौटुंबिक कोणत्याही प्रकारच्या असतात. माझ्या आकलनशक्तीप्रमाणे मी त्याचा निराकरण करत असतो. ते करत असताना आपला ज्या संस्थांशी संबंध आहे त्यांच्या समाजमानसातील प्रतिमेला चुकूनही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते कारण समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठीचा त्यांचा वाटा मोलाचा आहे.
गेल्या चार महिन्यांपासून दैनिक सामनामध्ये दर गुरुवारी विचारा तर खरं हे आर्थिक विषयावरील प्रश्नोत्तराचे सदर चालू आहे. वाचकांनी विचारलेल्या आर्थिक विषयावरील प्रश्नाचे उत्तर असे त्याचं स्वरूप आहे. आठवड्यात मेलवर येणाऱ्या प्रश्नांपैकी सर्वांना उपयोग होईल अशाच प्रश्नांची उत्तरे मी देतो. गेल्या गुरुवारपर्यत सुमारे 40 प्रश्नांना मी उत्तरं दिली. येणारे प्रश्न विविध आर्थिक विषयांशी संबधित होते. यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे मला सहज देता आली. अनेकदा प्रश्न इतका दीर्घ आणि अनावश्यक तपशील देऊन विचारला जातो की उत्तर देण्यापेक्षा तो कमीतकमी शब्दात नेमकेपणाने कसा विचारावा म्हणजे इतरांना समजेल यासाठी जास्त विचार करावा लागतो. आजपर्यंत आलेल्या प्रश्नांतील दोन प्रश्न मला जास्त आव्हानात्मक वाटले. मला काय माहिती आहे, त्यापेक्षा काय माहिती नाही ते नक्की माहिती असल्याने या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काही संदर्भ मिळवावे लागले यातील एक प्रश्न एलआयसीच्या योजेनेसंबंधी होता तर दुसरा गृहकर्जाबाबत होता. जरी यासंबंधात मला थोडीफार माहिती असली तरी कोणत्याही प्रश्नाचं योग्य आणि नेमकं उत्तर दिलं जावं यावर माझा कटाक्ष असतो त्यासाठी माझ्या संपर्कातील तज्ञ व्यक्तीचं मी मार्गदर्शन घेत असतो. यासंबंधात मला आमचे ग्राहक पंचायत कार्यकर्ते सहकारी अभय दातार रिटायर्ड बँकर आणि तक्रार मार्गदर्शन केंद्रप्रमुख शर्मिला रानडे यांची मोलाची मदत होते. मला आनंद वाटतो की जुजबी संपर्कातील इतर लोकही तत्परतेने मार्गदर्शन करतात. एलआयसी संबधित प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ठाण्यातील विमाव्यवसायिक किरण मराठे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्यामुळे मला प्रश्नकर्त्यास सुयोग्य मार्गदर्शन करण्यास मदत झाली.
यातील दुसरा गृहकर्जाबाबतचा जो प्रश्न होता तो मला जास्त महत्वाचा वाटतो म्हणून या लेखातून सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे सदरहू कर्जदाराने सन 2021 रोजी हे कर्ज घेतले अलीकडे तीन महिन्यांपूर्वी त्याने इएमआय रक्कम वाढवून घेतली आहे सध्या त्याच्या कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर 9.5% आहे. बँक नवीन कर्जदारांना 8.4% ने कर्ज देत असून कर्जदाराच्या पगारात वाढ झाल्याने इएमआय रक्कम वाढवायची असून व्याजदर कमी करून हवा आहे. बँक त्यास दाद देत नाही.
कर्जदाराची मागणी मला रास्त वाटते अनेक बँका काही किरकोळ शुल्क आकारून ही सवलत आपल्या कर्जदारांना देत आहेत. त्यामुळे मी बॅंकेकडे तक्रार करून पाठपुरावा करावा अथवा अन्य ठिकाणी कर्जाचे हस्तांतरण करावे असा सल्ला दिला आहे. खरं तर हा स्मार्ट पर्याय बँकेने कर्जदारांस द्यायला हवा पण बँका ते करत नाहीत.
जेव्हा एखादी व्यक्ती कोणतेही कर्ज घेते ते कर्ज काही कागदपत्रांची पूर्तता केल्यावर मिळते यात एक करारही असतो अनेक सह्या करताना कोणीही कर्जदार आपण कशावर सह्या करतो ते विचारातही नाहीत यातील कराराची प्रत कर्जदाराने मागणी केली तरच बँक देते अनेक कर्जदारांना असा काही करार असतो हेही माहितही नाही फक्त कर्ज मंजुरीचे पत्रच कर्जदारास दिले जाते. जर आपण कर्ज घेतले असेल तर कराराची प्रत ज्यात नियम अटी समाविष्ट असतात तो अवश्य मागून घ्या. त्यात-
*कर्जरक्कम, व्याजदर, इएमआय कालावधी, व्याज आकारणीची पद्धत याची माहिती असेल.
*कर्ज स्थिर व्याजदराने (फिक्स) आहे की बदलत्या व्याजदराने(फ्लोटिंग)
*व्याजदरात बदल कधी होईल तो ममध्ये करायचा असेल तर त्यासाठी किती प्रक्रिया शुल्क आकारले जाईल.
*इएमआयमध्ये खंड पडल्यास लागणारे शुल्क
*कर्ज अंशतः किंवा पूर्णपणे फेडण्याची पद्धत त्यावरील प्रक्रिया शुल्क
यासारख्या अनेक गोष्टींचा उल्लेख असणारच कारण हा ग्राहकाने कर्ज मिळवण्यासाठी बँकेशी केलेला कायदेशीर करार आहे.
व्याजदरात होणाऱ्या बदलाने यासंबंधात अनेक प्रश्न निर्माण होतात. व्याजदर एका ठिकाणी स्थिर होऊन कोविड काळानंतर खूप खालच्या पातळीवर आले होते. गेल्या वर्षभरात त्यात विक्रमी वाढ झाली. महागाई स्थिर झाल्याची रिझर्व बँकेस अजून खात्री वाटत नसल्याने ते नजीकच्या काळात कमी होण्याची शक्यता कमीच वाटते. अशा परिस्थितीत निर्माण होणारे प्रश्न कर्जदाराने कसे सोडवायचे?
बँकेसंबंधीत कोणत्याही विषयावर तक्रार असल्यास प्रत्येक बँकेत तक्रार निवारणीची त्रिस्तरीय यंत्रणा आहे. ग्राहकाने तेथे लेखी अथवा मेलवर तक्रार करून त्याचा पाठपुरावा करावा. त्याने समाधान न झाल्यास बँकिंग लोकपालाकडे जाता येईल. अनेकांना फक्त काहीही झालं की लोकपालाकडे तक्रार करायची असते एवढेच माहिती असते. ते ठामपणे लोकपालाकडे जा असा सल्ला देत असतात. अशा थेट तक्रारींची कोणतीही दखल घेतली जात नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे
राहता राहिलं वरील प्रश्नांवर नेमकं काय करावं? यावर बँक नेमकं काय म्हणते ते शक्यतो पाहावं. त्यांना व्यवसाय करायचा असल्याने त्यांनी कर्जदारास सहकार्य करणं अपेक्षित आहे. हे काम कमी भुर्दंड पडून होऊ शकते. अशा प्रकरणी बँकांनी कोणती भूमिका घ्यावी यासंबंधी मार्गदर्शक तत्व रिझर्व बँकेने सर्व बँकांना एका पत्रकाद्वारे कळवली (RBI/DBR/2015-16/20, दिनांक 03/03/2016) असून अलीकडे त्याची आठवण करून देणारे पत्रही (RBI/2023-24/53 दिनांक18/08/2023) पाठवले आहे. याचा तपशील रिझर्व बॅंकेच्या संकेतस्थळास भेट देऊन मिळवता येईल.
या पत्रात बँकांनी नेमकं काय करावं त्याबद्दल सूचना आहेत. या सूचना असल्याने बँकेने त्या मान्य केल्याच पाहिजेत याची आपण सक्ती करू शकत नाही, तेव्हा पाठपुरावा करून काही उपयोग झाला नाही तर त्यावर फारसं काही करता येणं शक्य नाही. आपल्या अटीशर्तीनुसार कर्ज देणाऱ्या दुसऱ्या वित्तसंस्थेकडे सदर कर्जाचे हसत्तांतरण करणे हाच अंतिम मार्ग राहतो यासाठी थोडा अधिक खर्च करावा लागला तरी व्याजदरात पडणाऱ्या किरकोळ फरकानेही व्याजामध्ये लक्षणीय फरक पडतो.
ज्यांची कर्ज लवकरात लवकर फेडण्याची क्षमता आहे किंवा आता ती झाली आहे त्यांनी गृहकर्ज लवकरात लवकर फेडण्याचा विचार करू नये असे माझे स्पष्ट मत आहे. जे मी यापूर्वीच्या लेखांतून मी वेळोवेळी व्यक्त केले आहे. गृहकर्ज हे सर्वात कमी दराने उपलब्ध असलेले कर्ज असून जुन्या पद्धतीने करमोजणी केल्यास त्यावर आयकरात बऱ्याच सवलती आहेत. त्यामुळे जास्त असलेले पैसे एकरकमी अथवा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून त्यावर अधिक परतावा मिळवता येणे शक्य आहे. पुरेशी रक्कम जमल्यावर कर्ज रक्कम कमी असल्यास सर्व कर्जाची एकरकमी परतफेड करण्याचा विचार करता येईल. अधिक व्याजदराने घेतलेले कर्ज जसे क्रेडिट कार्डवरील शिल्लख, वैयक्तिक कर्ज, वाहनकर्ज मात्र लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करावा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत, महारेराच्या सलोखा मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावीत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 15 डिसेंबर 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)