Friday, 12 December 2025
इन्फोसिसची शेअर्स पुनर्खरेदी
#इन्फोसिसची_शेअर्स_पुनर्खरेदी
अलीकडे इन्फोसिस या आघाडीच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने त्यांचे 10 कोटी शेअर्स (त्यांच्या भाग भांडवलाच्या 2.41%) टेंडर पद्धतीने पुनर्खरेदी (बायबॅक) केले. त्यासाठी ₹18000 कोटी रुपये खर्च आला, या प्रस्तावास अभूतपूर्व (826% अधिक) प्रतिसाद मिळून 3 डिसेंबर 2025 रोजी शेअर्स होल्डरना स्वीकारलेल्या शेअर्सचे प्रतिशेअर ₹1800/- प्रमाणे पैसे मिळाले तसेच न स्वीकारलेले शेअर्स त्यांच्या खात्यात पुन्हा जमा करण्यात आले. ही सर्वात मोठी बायबॅक ऑफर असली तरी इन्फोसिससह अनेक कंपन्यांनी आपले शेअर्स यापूर्वी पुनर्खरेदी केले आहेत. या पार्श्वभूमीवर शेअर्सची पुनर्खरेदी म्हणजे काय? आणि ती कशी केली जाते, याची माहिती करून घेऊयात. एखाद्या कंपनीने स्वतः चे शेअर्स धारकांकडून विकत घेणे म्हणजे शेअर्सची पुनर्खरेदी होय. ही खरेदी सर्वसाधारणपणे बाजारभावाहून अधिक किमतीने केली जाते. यासाठी कंपनीच्या राखीव निधीमध्ये (reserves) असलेली रक्कम वापरली जाते, क्वचित कर्जही घेतले जाते. खरेदी केलेले शेअर्स रद्द (cancelled) केले जातात, त्यामुळे बाजारात उपलब्ध शेअर्सची संख्या कमी होते. शेअर्सची संख्या कमी झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या सर्व गुणोत्तरात सुधारणा होते. शेअर खरेदी केल्यामुळे अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात- ●ज्या धारकांना शेअर्सचे भाव कमी (underprice)आहेत असे वाटत असते त्यांना शेअर योग्य भावास ( fair value) विकण्याची संधी मिळते.
●कंपनीकडे मोठया प्रमाणात राखीव निधी उपलब्ध असतो त्याचा योग्य विनियोग होतो.
●प्रतिशेअर उत्पन्न (eps) वाढते
●विविध रेशोमध्ये झालेल्या वाढीचा भविष्यात फायदा होत रहातो.
●प्रमोटर्सची टक्केवारी वाढते.
●कंपनीवर कोणी ताबा (takeovers) मिळवू शकत नाही.
●जास्तीचे पैसे शेअरहोल्डरना मिळतात
●विविध धारकांचा निश्चित आकृतिबंध (holders frameworks) तयार होण्यासाठी.
●बाजार मंदीत (bear market)असताना शेअर्सचे भाव खाली येत असतील तर त्यावर आळा बसतो.
●भागभांडवलापासून अधिकाधिक लाभ होतो.
कंपनीला स्वतःच्या शेअर्सची पुनर्खरेदी करायची असेल तर चार प्रकारे करता येते.
★टेंडर ऑफर
★ओपन मार्केट ऑफर
★विक्री अयोग्य संचाची शेअर खरेदी
★कंपनीने कर्मचारी आणि त्यांच्या ट्रस्टला दिलेल्या शेअर्सची खरेदी
★टेंडर ऑफर : यात सर्व पात्र धारकांना विशिष्ठ मुदतीत, कंपनीने ठरवलेल्या भावाने, ठराविक शेअर्स खरेदी करण्याचा प्रस्ताव दिलेला असतो. धारकास दिलेल्या मुदतीत प्रस्तावित शेअर किंवा त्यापेक्षा कमीजास्त शेअर पुनर्खरेदीसाठी देण्याचा पर्याय असतो हे पूर्णतः ऐच्छिक असते. पूर्ण शेअर्सहून अधिक शेअर्स विक्रीसाठी धारकांनी दिल्यास प्रमाणित पद्धतीने अधिक शेअर घेतले जातात. जर शेअरहोल्डरची इच्छा नसेल तर कंपनीकडे खरेदी प्रस्ताव न देण्याचा त्याच्याकडे पर्याय असतो. त्याचप्रमाणे शेअर देण्याची इच्छा आहे परंतू कंपनीकडून प्रस्तावच आला नाही तरी साध्या कागदावर आवश्यक माहिती देऊन तो कंपनीस आपला प्रस्ताव देऊ शकतो. एकूण पुनर्खरेदीच्या 15% शेअर्स हे छोट्या गुंतवणूकदारांकडून निश्चित घेतले जातात.
★ओपन मार्केट ऑफर : यामध्ये कंपनी शेअरबाजारातून ठराविक मुदतीत ठरलेल्या भावाने किंवा उपलब्ध असल्यास त्याहून कमी भावाने थेट शेअर खरेदी करते. यामध्ये ज्याप्रमाणे इतर लोक शेअरबाजारात खरेदी करतात त्याचप्रमाणे बीड टाकून कंपनीच्यावतीने खरेदी केली जाते.
★विक्री अयोग्य संचातील (odd lot holder) शेअर्सची खरेदी : शेअरबाजारात शेअर्सची खरेदीविक्री ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केली जात असल्याने ज्या लोकांकडे कागदी प्रमाणपत्र (physical certificates) स्वरूपात शेअर प्रमाणपत्र आहेत ते सर्वच धारक हे विक्री अयोग्य संच धारक ठरतात जर टेंडर पद्धतीने शेअर खरेदी करण्याचे ठरले तर अशा धारकांनाही सदर प्रस्ताव द्यावा लागतो. कंपन्या फक्त अशाच लोकांना त्यांच्या सोईसाठी वेगळा प्रस्ताव देऊ शकतात.
★कंपनी कर्मचारी त्यांचा ट्रस्ट यांना दिलेले शेअर्स : अनेक कंपन्या वेळोवेळी त्याचे कर्मचारी किंवा त्यांचा कल्याणनिधीस शेअर्स देत असतात. हे शेअर्स ठराविक मुदतीनंतर विकता येतात. असे विक्रीयोग्य शेअर्सचा टेंडर ऑफरमध्ये विचारात घेतले जातात.
सेबीच्या नियमानुसार शेअर खरेदी करण्यापूर्वी संचालक मंडळास,
●तसा प्रस्ताव मंजूर करावा लागतो. यात शेअर खरेदी का? किती? कशी? कोणत्या भावाने करणार? हे जाहीर करावे लागते. ●10% हून अधिक शेअर्सची खरेदी करायची असल्यास सर्व भागधारकांची मंजुरी घ्यावी लागते. 25% हून अधिक शेअर्स खरेदी करता येत नाहीत.
●याप्रमाणे शेअर खरेदी निर्णय झाल्यास त्यास योग्य ती प्रसिद्धी द्यावी लागते यासाठी मर्चन्ट बँकरची निवड करावी लागते. ठराविक रक्कम हमी रक्कम म्हणून वेगळ्या खात्यात ठेवावी लागते.
●टेंडर ऑफर असेल तर मुदतीपूर्वी सर्व घारकांना खरेदी सुरुवात करण्यापूर्वी मागणी प्रस्ताव पोहोचणे जरुरीचे आहे. यासाठी गंगाजळीत असलेली रक्कम वापरणार की कर्ज घेणार? ते ठरवावे लागते. त्याचप्रमाणे तक्रार निवारण व्यवस्था करावी लागते.
●खरेदी करताना एकूण खरेदीच्या 15% शेअर हे छोट्या धारकांकडून (ज्यांच्या शेअरचे बाजारमूल्य 2 लाख रुपयांहून कमी आहे) खरेदी करण्याचे बंधन आहे.
●खरेदी झाल्यावर त्याआधी मान्य केलेले व बोनस याव्यतिरिक्त 1 वर्ष कोणतेही नवे शेअर्स ईश्शु करता येत नाहीत.
अशा तऱ्हेने खरेदी करण्याचे ठरवणे आणि त्याची पूर्तता न करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी संबंधीताना दंड आणि कैद अथवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात. चांगल्या कंपन्यांच्या बाबतीत शेअर खरेदी करण्याचे ठरवल्याने भावात वाढ होते आणि तो खरेदी किमतीचे जवळपास जातो. खरेदी मुदत संपली की घट होऊन काही कालावधीने प्रस्तावित खरेदी किमतीहून अधिक भाववाढ होते. असे असले तरीही या विपरीत काही उदाहरणे आहेत ज्यात शेअर्सची किंमत कधीच ऑफर प्राईजच्या जवळपासही कित्येक वर्षे गेली नाही तर काहींचा भाव एवढा वाढला की तो ऑफर किंमतीहून सदैव जास्तच राहिला आणि कधीही खाली आला नाही.
पुनर्खरेदीच्या संदर्भात महत्वाचा मुद्दा त्यामधील करदेयतेत आहे. यापूर्वी धारकांना शेअर खरेदीतीतून मिळणारा नफा पूर्णपणे करमुक्त होता त्यामुळे हा पर्याय सर्वानाच लाभदायक होता. आता 1 ऑक्टोबर 2024 पासून पुनर्खरेदीची पूर्ण रक्कम ही डिव्हिडंड म्हणून समजण्यात येऊन त्यावर नियमितदराने कर आकारणी होत आहे. आता नव्या कररचनेनुसार कर मोजणी स्वीकारणाऱ्या आणि वार्षिक 12 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणतीही कर आकारणी होणार नसल्याने, ज्याचे उत्पन्न शेअर खरेदी किंमत मिळवल्यावरही 12 लाखांहून अधिक होण्याची शक्यता नाही त्यांच्या दृष्टीने ही पर्वणी आहे. तर काही बाबतीत ट्रेडिंग हाच ज्यांचा मुख्य व्यवसाय आहे त्यांनाही याचा लाभ होऊ शकेल. ते बाजारातून कमी भावात पुन्हा शेअर्स खरेदी करू शकतील. त्याचप्रमाणे त्यांनी बायबॅकला दिलेले शेअर्स खरेदी करण्यासाठी मोजलेली किंमत ही अल्प/ दीर्घकालीन भांडवली तोटा समजला जाऊन तो पुढील आठ वर्षात भांडवली नफ्यासमोर समायोजित होईल. तेव्हा सर्वांनीच आपला फायदा शेअर खरेदी देकार देण्यात आहे की न देण्यात आहे याचा अंदाज बांधून यात भाग घ्यायचा यासंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा. इन्फोसिसच्या बायबॅक वरून असं समजून येईल की जरी पूर्ण भरणा कित्तेक पटीत झाला असला तरी अधिकचे शेअर्स स्वीकारले जाण्याचे प्रमाण छोट्या धारकांच्या बाबतीत बऱ्यापैकी अधिक आहे त्यामुळे पात्र लोकांनी बाजारात उपलब्ध होणाऱ्या अशा संधीचा वेळोवेळी लाभ घ्यावा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ही गुंतवणूक शिफारस नाही)
12 डिसेंबर 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम वर पूर्वप्रकाशीत.
Friday, 5 December 2025
भाकीत बाजार Predictive Market
#भाकीत_बाजार_Predictive_Market
भाकीत बाजार (Predictive Market) म्हणजे असा लोकचालित (crowd-driven) बाजार असून त्यात भाग घेतलेल्या लोकांना भविष्यातील एखाद्या घटनेचा अंदाज लावण्यासाठी संधी दिली जाते. हे अंदाज एकत्रित केले जातात आणि एक सामूहिक बुद्धिमत्ता (Collective Intelligence) तयार होते. अनेक अभ्यासकांच्या मते, ही सामूहिक बुद्धिमत्ता अनेक वेळा तज्ज्ञांच्या अंदाजांपेक्षा अधिक अचूक ठरते. म्हणूनच आपण भाकीत बाजार म्हणजे काय, ते कसे कार्य करतात, त्यांचे उपयोग, फायदे-तोटे, नैतिक दृष्टीकोन आणि त्याचे भारतातील भवितव्य काय असू शकते या सर्व मुद्द्यांवर अधिक माहिती मिळवूयात.
भाकीत बाजार हे आर्थिक बाजाराचे एक तत्त्वज्ञानाधारित मॉडेल आहे याला पैजेचा बाजार, माहितीचा बाजार, निर्णय बाजार आणि समारंभ व्युत्पन्न बाजार अशी वेगवेगळी नावे आहेत. हा बाजार एखाद्या घटनेचवर मोठ्या जनप्रवाहाचे सर्वसाधारण मताचा मागोवा घेतो. येथील व्यापार शेअर, बाँड्स किंवा कमोडिटीमध्ये नसून घटनांच्या संभाव्यतेत असतो. उदाहरण:
●“2026 मध्ये भारताचा GDP वाढदर 7% पेक्षा जास्त राहील का?”
●“पुढील IPL मध्ये मुंबई इंडियन्स विजयी होईल का?”
●“पुढील तिमाहीत अमुक एका कंपनीचे उत्पन्न वाढेल का?”
●“2030 पर्यंत इलेक्ट्रिक कारची विक्री पेट्रोल कारपेक्षा जास्त होईल का?”
वरील उदाहरणे अलीकडच्या काळातील असली तरी भाकीत बाजाराचा इतिहास फार जुना आहे.
इ सन 1503 मध्ये पोपचा उत्तराधिकारी कोण असेल अशा प्रश्नावर होता. इ स 1884 पासून वॉल स्ट्रीटवर निवडणूक सट्टेबाजीच्या नोंदी आहेत. अलीकडच्या काळात एकूण निवडणूक प्रचार खर्चाच्या 50% हून अधिक रकमेचा सट्टा लोकांकडून खेळला जातो.
◆भाकीत बाजारातील टप्पे:
●इस 1988 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान सादर करण्यात आलेली आयोवा विद्यापीठाची आयोवा इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ ही पहिल्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक भाकित बाजारपेठांपैकी एक आहे .
●इस 1990 च्या सुमारास प्रोजेक्ट झनाडू येथे, रॉबिन हॅन्सन यांनी पहिल्या ज्ञात कॉर्पोरेट भाकित बाजाराचा वापर केला. कर्मचाऱ्यांनी त्याचा वापर उदाहरणार्थ, कोल्ड फ्यूजन वादावर पैज लावण्यासाठी केला .
●इस 1991 मध्ये कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशनद्वारे नियंत्रित आणि बाजार म्हणून नियुक्त केलेले हेजस्ट्रीट , इंटरनेट व्यापाऱ्यांना आर्थिक घटनांवर अंदाज लावण्यास सक्षम करते.
●हॉलीवूड स्टॉक एक्सचेंज, इस 1991 मध्ये स्थापन झालेला एक आभासी बाजार खेळ आणि आता कॅन्टर फिट्झगेराल्ड, एलपीचा एक विभाग, ज्यामध्ये खेळाडू चित्रपट, अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट-संबंधित पर्यायांचे भाकित शेअर्स खरेदी आणि विक्री करतात, इस 1996 च्या 39 मोठ्या श्रेणीतील ऑस्कर नामांकनांपैकी 32 आणि 8 पैकी 7 शीर्ष श्रेणीतील विजेत्यांचे अचूक भाकित केले
●इस 2001 मध्ये, Intrade.com ने आयर्लंडमधून एक प्रेडिक्शन मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाँच केला जो सदस्यांमध्ये व्यवसाय समस्या, चालू घडामोडी, आर्थिक विषय आणि बरेच काही यासह विविध श्रेणींशी संबंधित करारांवर अंदाज बांधण्याची परवानगी देतो. यातील इंट्राडने ट्रेडिंग इस 2013 मध्ये बंद झाले.
●जुलै 2003 मध्ये, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने त्यांच्या वेबसाइटवर धोरण विश्लेषण बाजार प्रसिद्ध केला आणि असा अंदाज लावला की बाजारपेठेसाठी अतिरिक्त विषयांमध्ये दहशतवादी हल्ले समाविष्ट असू शकतात. या कार्यक्रमाला "दहशतवाद फ्युचर्स मार्केट" म्हणून टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या आणि पेंटागॉनने घाईघाईने हा कार्यक्रम रद्द केला.
●इस 2005 मध्ये, नेचर या वैज्ञानिक मासिक जर्नलमध्ये असे म्हटले आहे की प्रमुख औषध कंपनी एली लिली अँड कंपनीने औषध संशोधन आणि विकास प्रयत्नांच्या परिणामांचा अंदाज घेण्यासाठी अंतर्गत बाजारपेठांचा वापर करून कोणत्या विकास औषधांना क्लिनिकल चाचण्यांमधून पुढे जाण्याची सर्वोत्तम संधी असू शकते याचा अंदाज लावण्यासाठी भाकित बाजारांचा वापर कसा केला.
याचकाळात, गुगल इंकने घोषणा केली की ते उत्पादनांच्या लाँच तारखा, नवीन कार्यालये उघडणे आणि धोरणात्मक महत्त्वाच्या इतर अनेक गोष्टींचा अंदाज घेण्यासाठी भाकित बाजारांचा वापर करत आहे. एचपी आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या इतर कंपन्या देखील सांख्यिकीय अंदाजांसाठी खाजगी बाजारपेठ आयोजित करतात.
●ऑक्टोबर 2007 मध्ये, युनायटेड स्टेट्स, आयर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि डेन्मार्कमधील कंपन्यांनी प्रेडिक्शन मार्केट इंडस्ट्री असोसिएशनची स्थापना केली, ज्याला प्रेडिक्शन मार्केटसाठी जागरूकता, शिक्षण आणि प्रमाणीकरण वाढवण्याचे काम सोपवण्यात आले. असोसिएशनची सध्याची स्थिती निष्क्रिय असल्याचे दिसून येते.
●जुलै 2018 मध्ये, इथरियम ब्लॉकचेनवर पहिले विकेंद्रित भाकित बाजार ऑगुर लाँच करण्यात आले .
●ऑक्टोबर 2024 मध्ये, आर्थिक विनिमय आणि भाकित बाजार असलेल्या कलशीने त्यांच्या नियामक, कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशनविरुद्ध खटला जिंकला, वॉशिंग्टनमधील एका फेडरल अपील न्यायालयाने त्यांना युनायटेड स्टेट्समधील पहिल्या पूर्णपणे नियंत्रित निवडणूक भाकित बाजारांना पुनरुज्जीवित करण्याची परवानगी दिली. CFTC वरील कलशीच्या न्यायालयीन विजयामुळे निवडणूक बाजारांसाठी बाजारपेठ खुली झाली. एखाद्याप्रश्नांवर ‘होईल’ किंवा ‘नाही’ या परिणामांवर लोक "कराराची" खरेदी-विक्री करतात. बाजारात या कराराची किंमत त्या घटनेच्या संभाव्यतेचे प्रतिनिधित्व करते. (वरील सर्व संदर्भ - विकिपीडियाच्या सौजन्याने)
◆भाकीत बाजाराचे कार्य: एखाद्या घटनाविषयक प्रश्नाची रचना त्यावरून भाकीत बाजार प्लॅटफॉर्म एक निश्चित, मोजता येणारा प्रश्न तयार करतो. घटनांच्या परिणमानुसार दोन उत्तरे तयार होतात, जसे- “होईल” अथवा “नाही”. बाजारातील सहभाग घेणाऱ्या व्यक्ती म्हणजेच गुंतवणूकदार, सामान्य लोक, संशोधक, विश्लेषक त्यांचे अंदाज खरेदी किंवा विक्री या स्वरूपात व्यक्त करतात. यातून मिळणाऱ्या किंमतीतून संभाव्यता तयार होते. ज्याला जास्त खात्री असेल ते अधिक पैसे गुंतवतात. यातून निर्माण होणारी बाजाराची एकत्रित प्रतिक्रिया हीच संभाव्यतेचा सर्वोत्तम अंदाज ठरते. परिणाम निश्चित झाल्यावर नफा-तोटा होतो. गुंतवणूकदार त्यानुसार नफा/तोटा मिळवतात.
अनेक संशोधनांनी सिद्ध केले आहे की भविष्यवाणी बाजार:
●तज्ज्ञांपेक्षा अधिक अचूक अंदाज देऊ शकतात कारण ते हजारो लोकांच्या आकलन, माहिती, अनुभव आणि धारणा एकत्रित करतात.
●ताज्या आणि स्थानिक माहितीचा वापर करतात. एखाद्या प्रदेशातील हवामान, राजकीय घडामोडी, अर्थव्यवस्थेचे संकेत, स्थानिक सहभागींमुळे अत्यंत अचूकतेने बांधले जातात.
●पूर्वग्रह कमी असतात एकतर्फी मतप्रवाह किंवा राजकीय झुकाव यात कमी असतो कारण प्रत्येक सहभाग आर्थिक जोखीम घेत असतो.
●बाजारातील किंमत त्वरित बदलते माहिती बदलताच किंमत बदलते, हा खराखुरा अंदाज असतो.
◆उपयोग
1. सार्वजनिक धोरण (Public Policy): सरकार अशा बाजारांचा वापर करून सार्वजनिक धोरणांवर लोकांचा अंदाज आणि कल जाणू शकतात.
2. आर्थिक अंदाज (Economic Forecasting): ,चलनवाढ, सकल राष्ट्रीय उत्पन्न दर, स्थावर मालमत्ता किंमती, शेअर बाजार निर्देशांक याचे भाकीत अधिक अचूकतेने करता येते.
3. संशोधन आणि वैज्ञानिक अंदाज: उदा. नवीन औषधाच्या यशाची शक्यता, हवामान बदलाचे मॉडेल, पिकांचे उत्पादन यासाठी.
4. कॉर्पोरेट निर्णयप्रक्रिया: गुगल, एचपी, मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्या उत्पादनांची मागणी, नवीन फीचर्सची लोकप्रियता याचा अंदाज भाकीत बाजारामधून घेतात.
5. निवडणूक विश्लेषण: राजकीय विश्लेषणात भाकीत बाजार अत्यंत लोकप्रिय आहे. काही वेळा त्यांनी मतदान-तपासणी किंवा सर्वेक्षणांपेक्षा अधिक अचूक निष्कर्ष दिले आहेत.
◆फायदे:
●उच्च अचूकता आणि वैज्ञानिकता
●तात्काळ प्रतिसाद
●कल समजण्यासाठी उत्तम साधन
●विविध मतांचा एकत्रित परिणाम
●भाकितांची पारदर्शकता
◆धोके आणि नैतिक मुद्दे:
1. बाजारावर प्रभाव टाकण्याचा धोका: कोणी मोठ्या प्रमाणात पैसे टाकून मत वळवू शकतो.
2. चुकीची किंवा खोटी माहिती: माहितीचा गैरवापर होऊ शकतो.
3. सामाजिक राजकीय तणाव: निवडणूक किंवा दहशतवादासारख्या मुद्द्यांवर चुकीच्या भविष्यवाण्यांचा गैरप्रचार होऊ शकतो.
4. जुगारासारखा वापर: काही देशांनी याला जुगार मानून बंदी घातली आहे.
5. डेटा गोपनीयता प्रश्न: जमा होणारी माहिती संवेदनशील असू शकते.
◆भारतामध्ये भाकीत बाजाराचे भविष्य:
भारतामध्ये असा बाजार अजून मुख्य प्रवाहात नाही कारण,
●जुगारविषयक कठोर कायदे
●वित्तीय नियमनातील अस्पष्टता
●सामाजिक-राजकीय संवेदनशीलता
परंतु भविष्यात Regulated Information Market, Academic Forecasting Platforms, Corporate Internal Markets या स्वरूपात ते उदयास येऊ शकतात. भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीसोबत भाकीत बाजार भविष्याच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा घटक ठरू शकतो. सध्या स्थापित गिफ्ट निफ्टीच्या पलीकडे, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) "माहिती करार" (अंदाज बाजार) साठी मर्यादित नमुना प्रकल्प सुरू करण्याची शक्यता विचारात घेत आहे. गिफ्ट सिटी सँडबॉक्सच्या नियंत्रित वातावरणात भारताच्या भविष्यातील सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या दरासारख्या सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा धोरणात्मक निकालांवर अंदाज लावण्यासाठी या बाजारपेठांची रचना केली जाईल. हा संभाव्य विकास आणि नवीन आर्थिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक फिनटेक प्रमुख कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. गुंतवणूक कंपन्या आणि जागतिक एक्सचेंज नवीन व्यापार पर्याय आणि बाजार प्रकारांचा शोध घेत आहेत. भाकीत बाजार हे भविष्यातील अंदाजासाठी एक क्रांतिकारी साधन आहे. ते केवळ आर्थिक लाभ देत नाहीत तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीनेही मूल्य निर्माण करतात. माहितीचे लोकशाहीकरण, सामूहिक बुद्धिमत्ता आणि डेटा-आधारित अंदाज, या तीनही गोष्टी एकत्र आणणारी ही एक विलक्षण संकल्पना आहे. पुढील दशकात भाकीत बाजार हे धोरणनिर्मितीपासून ते उद्योगनिर्णयांपर्यंत व्यापक वापरले जाणारे जागतिक साधन बनेल आणि भारतही त्यापासून दूर राहणार नाही.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ही गुंतवणूक शिफारस नाही)
Subscribe to:
Comments (Atom)