Friday, 16 May 2025
विवरणपत्र भरण्याची पूर्वतयारी
#विवरणपत्र_भरण्याची_पूर्वतयारी
आपले सर्व मार्गाने होणारे उत्पन्न आणि त्यावर भरलेला कर करदात्याने प्रमाणित करणे म्हणजे आयकर विवरणपत्र भरणे. कायद्यानुसार विशिष्ट उत्पन्न अथवा काही अटी पूर्ण करणाऱ्या सर्वाना आयकर विवरणपत्र भरणे सक्तीचे आहे. ज्या करदात्यांना आपले आयकर विवरणपत्र भरताना हिशोब प्रमाणित करावे लागत नाहीत त्यांना सन 2024-25 या वर्षाचे आपले आयकर विवरणपत्र दंड न भरता सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. ज्यांना आयकर कायद्यानुसार हिशोबांचे लेखापरीक्षण करून मान्यता घ्यावी लागते, त्यांच्यासाठी हीच तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. गेले काही वर्षे 31 जुलै ही दंड न देता विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली गेलेली नाही. त्यामुळे यंदा ती कदाचित वाढवली जाईल, या भ्रमात कोणी राहू नये. मुदतीत विवरण पत्र न भरल्याने दंड द्यावा लागतोच पण अनेक महत्वाच्या आयकर सवलतींवर पाणी सोडावे लागते. तेव्हा आपले विवरणपत्र दिलेल्या मुदतीत भरल्याने दंड वाचतोच, शिवाय करविषयक काही सवलती मिळतात. 1 एप्रिल 2025 पासून आपल्याला दिलेल्या मुदतीत आयकर विवरणपत्र दाखल करता येत असले तरी तांत्रिक कारणाने ते अनेकांना भरता येत नाही. त्यातील काही कारणे अशी-
★शेवटच्या तिमाहीत मुळातून कापलेला कर हा ज्याने कापला आहे त्यांना 30 एप्रिल पर्यंत भरता येतो. त्यात तफावत असेल तर 31 मे पर्यंत त्याचे विवरणपत्र भरून तो समायोजित करता येतो. अनेक कंपन्या हे सर्व शेवटच्या क्षणी करतात. त्यामुळे तो करदात्याच्या 26AS अथवा AIS वर दिसायला अजून काही दिवस लागू शकतात.आता सर्व करभरणा ऑनलाइन होत असताना हा तपशील ताबडतोब दिसायला हवा किंवा एक दिवसाहून अधिक कालावधी लागायला नको. आयकर खात्याने या संदर्भात तातडीने काहितरी करून हा विलंब टाळण्याची गरज आहे.
★अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांना कायद्याने देणे आवश्यक असा फॉर्म 16, मे अखेर ते अगदी 15 जूनपर्यंत देतात त्यामुळे आपले नक्की उत्पन्न किती, करकपात किती आणि विविध कलमानुसार घेतलेली आयकर सवलत किती ते नक्की समजत नाही.
★आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक फॉर्ममध्ये दरवर्षी काही बदल केले जातात असे फॉर्म अनेकदा 1 एप्रिलला उपलब्ध नसतात. या वर्षी सुधारित फॉर्म 3 विभागाकडून 25 एप्रिल 2025 ला उपलब्ध करून देण्यात आला.
★अनेक व्यावसायिक संस्थांचे जमाखर्च तपासून त्यांचे लेखापरीक्षण होणे आणि त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते. असे असले तरीही-
ज्यांचे करपात्र उत्पन्न विहित मर्यादेहून खूप कमी आहे, ज्यांचा कर मुळातून कापला जात नाही आणि ज्यांना भांडवली नफा या सदराखाली काही उत्पन्न असेल/ नसेल असे करदाते आपले उत्पन्न मोजून ताबडतोब आयकर विवरणपत्र 1 एप्रिलपासून कधीही भरू शकतात.
आयकर विवरणपत्र दाखल करायचे विविध फॉर्म आहेत दरवर्षी विभागाकडून त्यात किरकोळ बदल होत असतात. आपण आपल्या कराची मोजणी दोन प्रकारे करू शकतो. त्याचप्रमाणे व्यवसाय उत्पन्न नसेल तर मोजणी करण्याच्या पद्धतीत सोईनुसार बदल करू शकतो. आपल्याला नेमका कोणता फॉर्म लागेल आणि तो भरण्यासाठी कोणत्या गोष्टी हाताशी ठेवल्या तर सोयीचे होईल याची माहिती घेऊयात.
★आयटीआर 1 (सहज)
कुणी भरायचा?
*करदाते ज्याचे पगार, पेन्शन, व्याज हेच उत्पनाचे साधन आहे.
*एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांहून कमी आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*फॉर्म 16
*बँक खातेउतारा
*मुळातून कर कापल्याचे प्रमाणपत्र
★आयटीआर 2
कुणी भरायचा?
*तुमचे उत्पन्न 50 लाखाहून कमी आहे.
*भांडवली नफा, घरभाडे हे तुमच्या उत्पन्नाचा भाग आहेत.
*परदेशात मालमत्ता आहे किंवा त्यात गुंतवणूक केली आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*फॉर्म 16
*फॉर्म 16 A
*भांडवली नफ्याचा तपशील
★आयटीआर 3
कुणी भरायचा?
*पगार व्यवसाय यासह अथवा शिवाय उत्पन्नाची वेगवेगळी साधने असणारे
*स्वतःचा व्यवसाय असणारे
*भागीदारीत व्यवसाय करणारे
*उत्पन्नाचे अनेक स्रोत असणारे
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 4 (सुगम)
एवढ्या दुर्बोधित फॉर्मच सुगम नाव ठेवणं हा मोठाच विनोद आहे
कुणी भरायचा?
*₹ 50 लाखाहून कमी उत्पन्न असलेले छोटे व्यावसायिक
आवश्यक कागदपत्रे-
*बँक खातेउतारा
*मुळातून करकपातीचे प्रमाणपत्र
★आयटीआर 5
कुणी भरायचा?
*मर्यादित भागीदारी व्यवसाय
*प्रोप्रायटर्स
*असोसिएशन ऑफ पर्सन
*अन्य फर्म ज्याचे उत्पन्न परिशिष्ट 11 नुसार करमुक्त आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायाचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 6
कुणी भरायचा?
*कोणतीही कंपनी ज्यांचे उत्पन्न परिशिष्ट 11 नुसार करमुक्त नाही.
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 7
कुणी भरायचा?
आयकर कायदा 139 AA/AB/AC/AD मध्ये उल्लेख असलेल्या सर्व व्यक्ती/ संस्था यात प्रामुख्याने राजकिय पक्ष, विश्वस्त संस्था, वैज्ञानिक संशोधन संस्था यांचा समावेश होतो.
आवश्यक कागदपत्रे-
*आवश्यक असल्यास हिशोब तपासनीसांचा अहवाल
*मुळातून कर कपातीचे प्रमाणपत्र
या शिवाय आयकर विवरणपत्र भरण्यासाठी उपयुक्त गोष्टी जसेकी -
पॅन, आधार, पासवर्ड, बँक खाते तपशील, बचत गुंतवणूक केली असल्यास त्याचे तपशील, व्याज प्रमाणपत्र, गृहकर्ज मूद्दल व्याज यांची विभागणी, मेडीक्लेम भरल्याची पावती, मिळालेल्या दिलेल्या भेटवस्तू, क्रेडिट कार्ड व्यवहार, स्थानिक स्वराज्य संस्थेचा भरलेला कर, करमुक्त उत्पन्नाचा तपशील, भागीदारी करार, लीज करार, मोठ्या रकमेच्या व्यवहाराचे तपशील, देणगी दिली असल्यास त्याचा तपशील बोनस, राईट, मर्जर, डीमर्जर, खरेदीविक्रीची बिले या सारखी आपल्या उत्पन्नाच्या संबंधित आवश्यक ती माहिती हाताशी ठेवावी म्हणजे आयत्याक्षणी धावपळ करावी लागत नाही. या आर्थिक वर्षात भांडवली नफा वेगवेगळ्या कार्यकालासाठी वेगवेगळया दराने लागत असल्याने आयटीआर तीन मध्ये त्यांची मोजणी आणि करदेयता वेगवेगळी दाखवावी लागेल. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबर नंतर शेअर कंपनीने शेअरहोल्डरकडून खरेदी केले असतील तर मिळालेली रक्कम लाभांश म्हणून आणि मूळ शेअर्स खरेदी करण्यास लागलेली रक्कम भांडवली तोटा म्हणून दाखवावी लागेल. त्याचप्रमाणे एक कोटी रुपयाहून अधिक मालमत्ता आणि दायित्वे असल्यास त्याचाही तपशील द्यावा लागेल त्याप्रमाणे नवीन फॉर्म तयार करण्यात आला असून तो संबंधिताना उपलब्ध आहे.
याप्रमाणे फॉर्म भरण्यास आवश्यक तपशील हाताशी असल्यास आयकर विवरणपत्र भरणे सोपे जाते. आपल्याला विवरणपत्र भरता येत नसल्यास तज्ज्ञ व्यक्ती/ संस्था यांची मदत घ्यावी. अनेकदा आपण जाणकार समजत असलेली व्यक्ती यात जाणकार असतेच असे नाही तेव्हा आपण माहिती असल्यास स्वतः अचूक मोजणी करून द्यावी आणि संबंधित व्यक्तीस समजावून सांगावी त्याने विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी तपासून आपण पहावी. अनावधानाने यात संबंधित व्यक्तीकडून चूक झाल्यास त्याची सर्व जबाबदारी करदात्यांवर येते. त्यास दंड होतो याशिवाय मनस्ताप होतो तो वेगळाच. काही व्यावसायिक फर्म यासारख्या सेवा फी आकारून आपल्या ग्राहकांसाठी करीत असतात त्यांची मदत घेता येईल. एवढी पुरेशी काळजी घेऊनही काही जाहीर करायचे राहिले असल्यास विवरणपत्र 31 डिसेंबरपर्यत (जरी ते मंजूर झालेले असले / नसले तरी) दुरुस्त करता येते.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)
18 मे 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम आणि दैनिक प्रहार मुंबई आवृत्तीमध्ये पूर्वप्रकाशित.
Monday, 12 May 2025
काही सुचिबाह्य कंपन्या भाग2
#काही_सूचिबाह्य_कंपन्या_भाग2
मागील भागात आपण विविध मंचावर उपलब्ध असणाऱ्या अपोलो ग्रीन एनर्जी, विक्रम सोलार, टाटा कॅपिटल, एसबीआय फंड मॅनेजमेंट लिमिटेड या सूचिबाह्य कंपन्यांची माहीती मिळवली आज अजून काही प्रमुख कंपन्यांची माहिती मिळवूयात.
●एनएसई इंडिया लिमिटेड: सन 1992 मध्ये सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेले राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे जगातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे ज्यामध्ये सुमारे 2300 कंपन्या सूचीबद्ध आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय स्टेट बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन त्याचे महत्वाचे भागधारक आहेत. सन 1994 मध्ये, NSE ने इलेक्ट्रॉनिक स्क्रीन-आधारित ट्रेडिंग आणि इंटरनेट ट्रेडिंग सुरू केले भारतीय शेअरबाजारात क्रांती केली. NSE चा प्रमुख निर्देशांक, निफ्टी 50, भारतीय भांडवली बाजारांसाठी जागतिक बेंचमार्क म्हणून काम करतो. NSE हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे ज्याचा जागतिक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंगमध्ये 21% वाटा आहे. चलनातील फ्युचर्स ट्रेडिंगसाठी ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज देखील आहे. NSE चे भांडवली बाजार व्यवसाय मॉडेल प्रामुख्याने ट्रेडिंग सेवा, एक्सचेंज लिस्टिंग, मार्केट डेटा फीड, निर्देशांक आणि तंत्रज्ञान उपाय प्रदान करते. त्याचे रोख बाजार इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, ईटीएफ, आरईआयटी, सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, टी-बिल इत्यादींच्या व्यापारासाठी एक व्यासपीठ देते. कर्ज बाजार सरकारी, कॉर्पोरेट बाँड, व्यावसायिक कागदपत्रे आणि इतर कर्ज साधने उपलब्ध करून देते. एनएसई इक्विटी निर्देशांक, हायब्रिड निर्देशांक आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, विमा कंपन्या, गुंतवणूक बँका, पीएमएस आणि स्टॉक एक्सचेंजसाठी कस्टमाइज्ड निर्देशांकांसाठी निर्देशांक व्यवस्थापन सेवा देखील प्रदान देत आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीने 35% च्या सीएजीआरवर कामगिरी केली आहे. एनएसईचा आर्थिक वर्ष 2024 अखेरचा महसूल ₹ 15640 कोटी तर निव्वळ नफा ₹ 8327 कोटींवर पोहोचला आहे. प्रति शेअर कमाई ₹ 33.47 आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 1650/- च्या आसपास असून व्यवहार किमान 50 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹1560/₹8160 या मर्यादेत होती. काही अंतर्गत चौकशींमुळे त्याचा पब्लिक इशू लांबला तो लवकरच येण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मार्च 2025 प्रतिशेअर 35/- रुपये लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
●चेन्नई सुपर किंग्ज लिमिटेड: चार वेळा आयपीएल विजेता असलेला सीएसके हा भारतातील एकमेव असा क्रीडा संघ आहे ज्यामध्ये सर्वसामान्यांना गुंतवणूक करता येईल. सीएसके ही सर्वात लोकप्रिय आयपीएल फ्रँचायझींपैकी एक आहे ज्याचे ब्रँड व्हॅल्यू मजबूत आहे. या ब्रँडची स्थापना सन 2008 मध्ये चेन्नई, तमिळनाडूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आयपीएल क्रिकेट संघाच्या रूपात झाली. ही इंडिया सिमेंट्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. आयपीएलची लोकप्रिय फ्रँचायझी असल्याने, सीएसके देशातील पहिली स्पोर्ट्स युनिकॉर्न बनली. या ब्रँडचे मार्केट कॅप 7800 कोटीपर्यंत वाढले.
चेन्नई सुपर किंग्ज विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळवते जसे की- गेट तिकीट कलेक्शन, स्टेडियममधील जाहिराती आणि मर्चेंडाईज विक्री. संघाला एकूण महसुलाच्या 60% रक्कम मीडिया राईट्समधून मिळते, जी सर्वाधिक महसूल प्रवाह आहे. प्रायोजकत्वातून मिळणारे उत्पन्न एकूण महसुलाच्या सुमारे 15 ते 29% आहे आणि त्यानंतर तिकीट विक्रीतून 10% आहे. महामारीचा अनेक ब्रँडवर परिणाम झाला असला तरी, सीएसकेने अप्रत्यक्ष महसूल प्रवाहांद्वारे संतुलन राखण्यात यश मिळवले. आयपीएलमधील सर्वात आवडत्या संघांपैकी एक, सीएसके, मर्चेंडाईज विक्री, प्रायोजकत्व, बक्षीस रकमेचा काही भाग आणि डिजिटल व्ह्यूअरशिपद्वारे ठोस महसूल मिळवत राहील. आर्थिक वर्ष 2024 अखेर कंपनीने ₹695 कोटींच्या उलाढालीवर ₹ 201 कोटींचा निव्वळ नफा कमावला. त्यांची प्रति शेअर कमाई ₹ 6.14 आहे. दहा पैसे दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 190/- च्या आसपास असून व्यवहार 250 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹166/₹220 या मर्यादेत होती. कंपनी शेअरबाजारात येताना त्याचे दर्शनी मूल्य शेअर एकत्रित करून ₹ 1 करेल कारण भारतीय बाजारात एक रुपयांहून कमी दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे व्यवहार होत नाहीत.
●ऑर्बिस फायनान्शियल्स कॉर्पोरेशन लिमिटेड: सन 2005 मध्ये स्थापित, ऑर्बिस फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील वित्तीय सेवा क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे. ऑर्बिस कस्टडी आणि फंड अकाउंटिंग, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज क्लिअरिंग, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज क्लिअरिंग, शेअर ट्रान्सफर एजन्सी आणि ट्रस्टी सेवा यासारख्या विस्तृत सेवा देते. कंपनीच्या ग्राहकांत 50 हून अधिक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs), 150 पर्यायी गुंतवणूक निधी (AIFs) आणि 800 हून अधिक अनिवासी भारतीय (NRIs) यांचा समावेश आहे. कंपनी कस्टोडियल आणि क्लिअरिंग उत्पन्न आणि ट्रेझरी-संबंधित उत्पन्नातून महसूल मिळवते. ती भांडवली बाजारातून देखील उत्पन्न मिळवते.
अलिकडच्या वर्षांत, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 अखेर 366 कोटी रुपयांच्या उलढालीवर 141 कोटींच्या निव्वळ नफ्यासह उत्कृष्ट आर्थिक वाढ दर्शविली आहे. प्रति शेअर कमाई ₹ 12.1 आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 470/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹290 / ₹510 या मर्यादेत होती.
●स्टड्स एक्सेसरीज लिमिटेड: दुचाकी हेल्मेट उत्पादनात जागतिक आघाडीवर असल्याने, स्टड्स संघटित दुचाकी हेल्मेट बाजारपेठेत जवळजवळ एक तृतीयांश वाटा उचलतात. कोविड-१९ दरम्यान स्टड्सना जास्त मागणी असताना फेस शिल्ड आणि प्रोटेक्शन वेअर तयार करण्याची संधी मिळाली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारत फक्त BIS-प्रमाणित दुचाकी हेल्मेटच तयार आणि विक्री करेल असे जाहीर केल्यावर स्टड्सच्या विक्रीला आणखी एक चालना मिळाली. कोविड-19 नंतर वाहतूक पुन्हा सुरू झाल्यामुळे दुचाकी हेल्मेटची मागणी झपाट्याने वाढत आहे. याशिवाय, लोक अनेकदा दोन ते तीन वर्षांत त्यांचे हेल्मेट बदलतात, ज्यामुळे कंपनीला अधिक व्यवसाय मिळतो. स्टड्स रायडिंग गियर ग्लोव्हज, गॉगल्स, जॅकेट आणि सेफ्टी आणि स्टोरेज गियरसह अॅक्सेसरीज उत्पादनाचा विस्तार करत आहे. याव्यतिरिक्त, स्टड्सला सायकल हेल्मेट विक्रीवर वर्चस्व गाजवण्याची संधी देखील आहे. कंपनी युरोप आणि अमेरिकेसह 40 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. अलीकडेच, कंपनीने हरियाणातील फरीदाबादमध्ये आपली उत्पादन क्षमता दुप्पट केली आहे. सन 2024 आर्थिक वर्ष अखेर कंपनीची उलाढाल ₹531 कोटी असून प्रति शेअर कमाई ₹ 14.54 आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 680/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹670 / ₹1550 या मर्यादेत होती.
विविध मंचावर हे आणि असे अनेक कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध असून त्यांचा व्यवहार संच आणि बाजारभाव यात मंचानुसार फरक पडू शकतो. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करायची असल्यास बाजारभावात फरक पडू शकतो. हा लेख कोणतीही गुंतवणूक शिफारस करीत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत
काही सुचिबाह्य कंपन्या भाग1
#काही_सूचिबाह्य_कंपन्या_भाग1
मागील दोन लेखातून सुचिबद्ध नसलेल्या कंपन्या आणि त्याचे व्यवहार करणारे मंच यांची माहिती घेतली. या दोन्ही लेखांतून अशा कंपन्यांचा उल्लेख मी ‘असुचिबद्ध’ असा केला होता, त्याऐवजी ‘सूचिबाह्य’ असा शब्दप्रयोग माझ्या एका स्नेह्यांनी सुचवला असून तो अधिक योग्य वाटतो. गेल्या काही वर्षांत सूचिबाह्य शेअर्स अधिक लोकप्रिय झाले असून गुंतवणूकदार अशा उदयोन्मुख कंपन्यांचे शेअर्स खरेदी करीत आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करून, तुम्हाला दोन प्रकारे परतावा मिळतो.
◆ओव्हर-द-काउंटर ट्रेडिंगमुळे या शेअर्सच्या किमती दीर्घकाळात वाढू शकतात.
◆तुम्हाला प्री-लिस्टिंग (सुचिबद्ध होण्यापूर्वी) आणि लिस्टिंग नफा (सुचिबद्ध झाल्यानंतर सहा महिन्यांनी) मिळू शकतो.
अनेक लोक सूचिबाह्य शेअर्सबद्दल अधिक चौकशी करीत असून त्यांच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. त्यातील सध्या उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असलेल्या काही महत्वाच्या कंपन्यांची माहिती आपण आज घेऊयात.
●अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड: शाश्वत ऊर्जा क्षेत्रात प्रगती करण्याचे उद्दिष्ट ठेवून, अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ही भारतातील उगवत्या कंपन्यांपैकी एक आहे. सन 1994 मध्ये स्थापन झाली असून ती अपोलो ग्रुपची मालकीची आहे. अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लागणाऱ्या सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते. त्यांची खासियत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास आणि ऊर्जा साठवणूक उपायांना अनुकूलित करणे यामध्ये आहे. एनएचपीसी, आइओसी, अडाणी ग्रीन हे त्याचे ग्राहक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हरित ऊर्जा संसाधनांकडे वळण्यासाठी उद्योग आणि समुदायांना सोबत घेऊन कार्बन फूटप्रिंट कमी करणे हे त्यांचे ध्येय आहे. ही कंपनी नफ्यात असून प्रति समभाग ₹16 कमाई करीत आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1380 कोटी आणि आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये मध्ये 2000 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवेल अशी अपेक्षा आहे. सध्या, कंपनी विविध प्रकल्पांवर काम करत आहेत, उदा स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन, थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणि ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्प हे काही प्रकल्प आहेत. अंमलबजावणी अंतर्गत प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 1375 कोटी आहे. आशादायक वाढीसह, अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनली आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 240/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹155/₹515 या मर्यादेत होती.
●विक्रम सोलर लिमिटेड: सन 2006 मध्ये स्थापित, विक्रम सोलर ही भारतातील आघाडीच्या सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादकांपैकी एक आहे. सध्या, 3.5 गिगावॅट क्षमतेसह, कंपनी एकात्मिक सौर ऊर्जा उपाय, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) सेवा आणि ऑपरेशन्स आणि देखभाल देखील प्रदान करते. विक्रम सोलरचे तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये तीन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीचे भारतातील 600 जिल्ह्यांमध्ये 42 हून अधिक वितरक आहेत. विक्रमचा 70% महसूल पीव्ही मॉड्यूलमधून आणि सुमारे 20% ईपीसी सेवांमधून येतो.
कोची (केरळ) विमानतळावर पूर्णपणे सौरऊर्जा वापरण्यात, कोलकातामध्ये तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापना करण्यात आणि संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात छतावरील सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात योगदान देणारी ही पहिली कंपनी आहे. कंपनीची अमेरिकेत विक्री कार्यालये देखील आहेत आणि त्यांनी 32 हून अधिक देशांमध्ये सौर पीव्ही मॉड्यूलचा पुरवठा केला आहे. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2015 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो त्यामागील आर्थिक वर्षाच्या महसुलापेक्षा 18% जास्त आहे. त्याची प्रति शेअर कमाई ₹3.08 आहे. विक्रम सोलरने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) साठी सेबीकडे अर्ज केल्याची बातमी असून दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची
विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 410/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹235/₹505 या मर्यादेत होती.
●टाटा कॅपिटल लिमिटेड: ही टाटा सन्सची उपकंपनी असून भारतीय रिझर्व बँकेकडे ठेवी स्वीकारत नसलेली एनबीएफसी म्हणून नोंदणीकृत आहे. तिच्या उपकंपन्यांसह, टाटा कॅपिटल कॉर्पोरेट, रिटेल आणि संस्थात्मक ग्राहकांना वित्तीय सेवा देते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारची कर्जे, गुंतवणूक सल्लागार, क्लीनटेक फायनान्स, खाजगी इक्विटी, संपत्ती उत्पादने, व्यावसायिक आणि एसएमई फायनान्स, लीजिंग सोल्यूशन्स आणि टाटा कार्ड यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये उलाढाल ₹8630/- कोटींवर पोहोचली. प्रति शेअर कमाई ₹ 8.57 आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 960 /- च्या आसपास असून व्यवहार 30 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹865/₹1130या मर्यादेत होती.
●एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड: ही भारतातील लोकप्रिय आणि सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक आहे. सन 1987 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी हा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अमुंडी (एक जागतिक निधी व्यवस्थापन कंपनी) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. एसबीआयकडे सध्या 63% हिस्सा आहे आणि उर्वरित 37% हिस्सा अमुंडीचा आहे. एसबीआय म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंड, डेट फंड, हायब्रिड म्युच्युअल फंड, सोल्युशन-ओरिएंटेड स्कीम आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड यासारख्या विस्तृत श्रेणीतील म्युच्युअल फंड योजना देतात. कंपनीने सन 2015 मध्ये पर्यायी गुंतवणूक व्यवस्थापन फंड (एआयएफ) देखील लाँच केला आणि भविष्यात आणखी निधी लाँच करू शकते. 53 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड योजनांसह, एसबीआय म्युच्युअल फंडांकडे ₹1.65 ट्रिलियन रुपयांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) आहे आणि 12 दशलक्षाहून अधिक गुंतवणूiकदार आहेत. एसबीआय फंड व्यवस्थापन सन 1988 पासून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना सेवा देत आहे. कंपनी भारतातील समर्पित ऑफशोअर फंडांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करते. कंपनी एचएनआय, मोठे भविष्य निर्वाह निधी, संस्था आणि निवडक ट्रस्ट यांना पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा देखील देते. एसबीआयएफएमचा एएयूएम पुढील सर्वात मोठ्या समकक्ष (आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड) पेक्षा 44% जास्त आहे. आणि उर्वरित बाजारपेठेने पाच वर्षांच्या कालावधीत 10% वितरित केले असताना त्यांनी त्याच कालावधीत 27% सीएजीआर गाठला आहे. अलीकडील आर्थिक अहवालांनुसार (मार्च 3024), एसबीआय फंड व्यवस्थापनाने 3418 कोटी रुपयांचा निव्वळ महसूल मिळवला आहे. प्रति शेअर कमाई ₹ 41.1 आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 2625/- च्या आसपास असून व्यवहार 75 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹1785/₹2940 या मर्यादेत होती.
यापुढील भागात एनएसई इंडिया, ओर्बीस फायनांशीयल सर्व्हिसेस, चेन्नई सुपर किंग्ज आणि स्टड एक्सेसरीज लिमिटेड या कंपन्यांची माहिती घेऊ. या लेखातील माहिती हा गुंतवणूक सल्ला नाही. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम वर पूर्वप्रकाशीत.
असुचिबद्ध शेअर्सची खरेदी विक्री
#असुचिबद्ध_शेअर्सची_खरेदीविक्री
शेअर बाजारात नोंदणी न केलेले शेअर्स म्हणजे असुचिबद्ध शेअर्स हे आपल्या लक्षात आले असेलच. यांची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे. त्यांची थोडक्यात उजळणी करूयात.
■असुचिबद्ध शेअर्स घेण्याचे फायदे:
●ते असुचिबद्ध असले तरी त्याची खरेदी विक्री करणारे अनेक मंच उपलब्ध असून त्यातून फायदा मिळवता येतो.
●असे शेअर्स सुचिबद्ध झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर त्याची विक्री करून नफा मिळवता येईल.
●याशिवाय डिव्हिडंड, राईट आणि बोनस यामुळेही त्यातून मूल्यवृद्धी होऊ शकते.
●उज्वल भविष्य असणारे शेअर्स अधिक प्रमाणात कमी मूल्यात मिळवून निश्चित अथवा दिर्घकाळात प्रचंड लाभ मिळवता येणे शक्य आहे.
■सुचिबद्ध शेअर्सहून असुचिबद्ध शेअर्समधील वेगळेपणा अथवा फरक:
●कमी तरल
●कमी अपारदर्शक बाजारभाव
●कमी नियामक नियमन
●सहज उपलब्ध माहिती नसल्याने मूल्यांकन करणे कठीण
●मोठ्या व्यवहार संचांमुळे खरेदीदार आणि विक्रेते यांना होणारी व्यवहार असुलभता
■असुचिबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक करताना विचारात घ्यायचे घटक:
●गुंतवणूकदाराची जोखीमक्षमता
●गुंतवणुकीमागील हेतू
●तरलतेचा अभाव
●गुंतवणूक संच विविधता
●नियामक असुविधा
■असुचिबद्ध शेअर्सवरील करआकारणी: असे शेअर्स दोन वर्षांच्या आत विकल्यास अल्प मुदतीचा भांडवली नफा होऊन तो करदात्यांच्या नियमित उत्पन्नात मिळवून कर आकारला जाईल तर दोन वर्षानंतर होणारा नफा दीर्घकालीन भांडवली नफा समजण्यात येऊन त्यावर सरसकट 12.5% दराने या विशेष दराने कर आकारला जाईल.
■नियामक बंधने: असे शेअर्स भविष्यात शेअरबाजारात नोंदले गेल्यावर किमान सहा महिने ते विकता येत नाहीत, एवढी गोष्ट सोडून आशा शेअर्सची खरेदी विक्री करण्यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. भांडवल बाजारात होणाऱ्या होणाऱ्या सर्व व्यवहारांच्या पुर्ततेची हमी बाजाराने घेतलेली असते त्यामुळे असे व्यवहार झाल्यावर शेअर बाजाराच्या निश्चित नियमांनी ते पूर्ण केले जातात. यामध्ये वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. अशी निश्चित व्यवस्था असुचिबद्ध शेअर्स करिता नसल्याने या व्यवहारात अधिक जोखीम असते. आता अनेक मध्यस्थ, मान्यताप्राप्त ब्रोकर्स, फिनटेक कंपन्या, खाजगी कंपन्या यातील व्यवहार खात्रीपूर्वक करून देतात. हे व्यवहार 24 ते 48 तासात पूर्ण होतात. ते करणाऱ्या काही मंचाची, फिनटेक कंपन्यांची आपण माहिती आपण करून घेऊया.
◆अनलिस्टेडझोन: झिरोदाने ज्याप्रमाणे सुचिबद्ध शेअर्सच्या ब्रोकिंग व्यवसायात क्रांती घडवून आणली त्याप्रमाणे सन 2018 स्थापन झालेल्या या मंचाने असुचिबद्ध शेअर्सच्या व्यवहारात क्रांती घडवून आणली. उमेश पालिवाल आणि संतोष सिंग हे अभियांत्रिकी आयआयटी पदवीधर याशिवाय 15 वर्षाहून अधिक काळ भांडवल बाजार व्यावसायिक दिनेश गुप्ता यांनी एकत्रित येऊन हा मंच स्थापन केला आहे. या क्षेत्रातील संधी ओळखून तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंगवर आधारित असा हा गुंतवणूक स्नेही मंच आहे. त्यावर शेअर्सच्या मागील व्यवहार किंमती उपलब्ध असल्याने त्यावरून सध्याच्या किमतीचा अंदाज घेता येऊ शकतो त्यांनी व्यापक संशोधन केलेले असल्याने त्यावर आधारित व्हिडीओ ब्लॉग पाहून गुंतवणूकदारांना योग्य निर्णय घेण्यास उपयोग होऊ शकतो. त्यांचे भागीदार बनल्याने असुचिबद्ध शेअर्सच्या संशोधन अहवाल, बातम्या मिळू शकतात. त्याचा वापर गुंतवणूकदार आणि त्याच्याशी संबधीत व्यक्तीना होतो. त्यांचे अँपही उपलब्ध असून त्याद्वारे खरेदी विक्री करता येऊन असुचिबद्ध शेअर्स, त्यांचे भाव, आलेख (चार्ट), प्री आयपीओ गुंतवणूक, स्टार्टअप यासंबंधीत माहिती मिळाल्याने अशा कंपन्यांमध्ये त्यांच्या मध्यस्थीने गुंतवणूक करता येणे सहज शक्य आहे.
◆आर्म्स सिक्युरिटीज: परसराम ग्रुपशी संबंधित असलेली ही खाजगी कंपनी गेली 35 वर्ष गुंतवणूकदारांना असुचिबद्ध शेअर्स, सुचिबद्ध पण व्यवहार होत नसलेले शेअर्स आणि कमी तरलता असलेल्या शेअर्सचे व्यवहार करीत आहे. असुचिबद्ध शेअर्सचा एक मॉलच येथे आहे असे म्हणता येईल. विश्लेषण, वाजवी सेवादर, स्पर्धात्मक किमती,
आणि गुंतवणूक मार्गदर्शन ही या कंपनीची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्याचेही अँप उपलब्ध आहे.
■प्लानिफाय: हा एक फिनटेक मंच असून असुचिबद्ध शेअर्स, कमी तरलता अथवा कोणतीही तरलता नसलेल्या शेअर्समधील व्यवहार पूर्ण करून देतो. त्याचेही अँप उपलब्ध आहे या शिवाय ते कंपन्या, उद्योजक यांना निधी उभारून देण्याची मदतही ते करतात. अनेक अनिवासी भारतीय या मंचाचा वापर करीत असून नजीकच्या भविष्यात प्रचंड मोठे होण्याची ताकद या मंचाकडे आहे. शार्क टँकच्या चवथ्या भागात सर्वाधिक गुंतवणूक या मंचाने पुरस्कृत केलेल्या उद्योगांत झाली.
■3i ग्रुप पीएलसी: हा ब्रोकरेज मंच असून तो सुचिबद्ध आणि असुचिबद्ध शेअर्सचे व्यवहार करण्याचे काम करतो
■एनरीच ऍडव्हरटायजर: याच क्षेत्रातील ही एक नामवंत मंच असून त्यांनी गुंतवणूकदारांना केलेल्या शिफारसीतून 34% परतावा मिळवून दिला आहे असा त्यांचा दावा आहे. 250 हून अधिक कंपन्यांचे व्यवहार या मंचावरून नियमितपणे होत असतात.
पूर्वीच्या तुलनेत असुचिबद्ध शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी अनेक खात्रीपूर्वक मंच उपलब्ध आहेत वर उल्लेख असलेल्या मचांशिवाय वेल्थ विस्डम, इंक्रेड मनी, शेअरकार्ट, स्टोकिफाय, कुबेरग्रोव हे आणि यासारखे अनेक मंच अशा शेअर्सची खरेदी विक्री करण्यात कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी काही कंपन्यांचे उपलब्ध असलेले शेअर्स, त्यांचे व्यवसायक्षेत्र, दिनांक रोजी असलेला बाजारभाव, खरेदी विक्री संच अशी नमुन्यादाखल माहिती सोबतच्या चित्रात दिली आहे. यात दाखवलेले भाव, नक्की किती गुंतवणूक करणार यावर कमी अधिक होऊ शकतात. हे भाव केवळ माहिती असावे म्हणून दिले असून त्यातील बाजारभाव आणि बाजार व्यवहार संच यात बदल होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करायची असेल तर इच्छुक व्यक्तींशी विशिष्ट दराबाबत वाटाघाटी करता येणे येथे शक्य आहे.
अनेक ब्रोकर्स त्यांच्या नियमित ग्राहकांना असुचिबद्ध शेअर्सची खरेदीविक्री सुविधा देत असतात. त्यात ते मध्यस्थ म्हणून काम करत असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. यात उल्लेख केलेले गुंतवणूक मंच आणि असुचिबद्ध शेअर्स या मध्ये गुंतवणूक करताना यातील सोय गैरसोय यांचा पूर्ण विचार करूनच मगच योग्य तो निर्णय घ्यावा. लेखात सुचवण्यात आलेले मंच आणि त्यावर व्यवहार होत असलेल्या शेअर्सची कोणतीही शिफारस हा लेख करीत नाही.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
25 एप्रिल 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.
सुचिबद्ध नसलेले शेअर्स
#सुचिबद्ध_नसलेले_शेअर्स
सध्या शेअरबाजारात व्यवहार होऊ न शकणारे म्हणजेच असुचिबद्ध पण भविष्यात याच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या जाहिराती विविध समाज माध्यमात आपण पाहिल्या असतील. काही कंपन्यांचे शेअर्स बाजार नियमावलीचे पालन न केल्याने त्यांच्यावरील कारवाईचा भाग म्हणून बाजारातून असुचिबद्ध (डिलिस्ट) केल्याच्या किंवा काही कंपन्यांनी आपले शेअर्स बाजारातून स्वेच्छेने असुचिबद्ध केल्याच्या तुरळक घटना आपण ऐकल्या असतील. सुचिबद्ध शेअर्सना बऱ्यापैकी तरलता असते, त्याचे बाजारभाव मागणी पुरवठा तत्वानुसार कमी अधिक होऊन शेवटी कंपनीची कामगिरी आणि सर्वसाधारण बाजारकल, यावर कुठेतरी स्थिरावतात. शेअरबाजारात व्यवहार केलेल्या शेअर्सच्या व्यवहारपूर्ततेची बाजाराची हमी असते म्हणजे विकलेल्या शेअर्सचे पैसे अथवा खरेदी केलेले शेअर्स निश्चित कालावधीत आपल्या डी मॅट खात्यात येतात. काही तांत्रिक
अडचणींमुळे व्यवहार पुरा न झाल्यास बाजार नियमानुसार त्याची पैशात भरपाई केली जाते.
असुचिबद्ध शेअर्समध्ये खरेदीविक्री व्यवहार होऊ शकतो. त्यासाठी विक्रेता आणि खरेदीदार समोरासमोर येणे आवश्यक आहे, त्यासाठी विविध मंच आहेत. या शेअर्समध्ये तरलता नसल्याने त्याची योग्य किंमतशोध या मंचावर होईलच नाही. त्याचप्रमाणे या शेअर्सचे व्यवहार प्रत्येकवेळी अधिक शेअर्सच्या पटीत करावे लागतात त्यामुळे अनेकदा ते विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना अडचणीचे होऊ शकते. याशिवाय या शेअर्सच्या गुंतवणूकदारांना सुचिबद्ध शेअर्सवर मिळणारे भांडवली नफ्याचे विशेष फायदे मिळत नाहीत. शेअर्स सुचिबद्ध करायला हवेत असे कंपनीवर कोणतेही बंधन नाही. त्याप्रमाणे त्यावर किती अधिमूल्य आकारावे याचेही बंधन नाही त्यामुळे अधिक भाव मिळावा या हेतूने बाजार चढा असतानाच सर्वसाधारणपणे ते सर्वाना उपलब्ध करून दिले जातात. ज्यांचे शेअर्स सुचिबद्ध असतील त्या भांडवल बाजारातील कंपन्यांना अनेक करविषयक सोईसवलती प्रवर्तक आणि गुंतवणूकदार या दोघांनाही आहेत. त्यांना भांडवल बाजार आणि सेबी यांचे नियम पाळून मोठ्या प्रमाणांत भांडवल (भाग भांडवल आणि कर्ज अश्या दोन्ही स्वरूपात) उभे करता येते.
असुचिबद्ध शेअर्स सामान्यतः त्या कंपन्यांचे प्रवर्तक, त्यांचे नातेवाईक, त्याचे धनको (कर्ज देणारे), धाडसी गुंतवणूकदार काही प्रमाणात म्युच्युअल फंड योजना, गुंतवणूक संच व्यवस्थापन कंपन्याच्या योजना पर्यायी गुंतवणूक फंड योजना, अशा कंपन्यांतील कामगार, हितचिंतक आणि काही प्रमाणात वेगळ्या गुंतवणूक पर्यायाचा शोध घेणारे सामान्य गुंतवणूकदार असू शकतात.
■सुचिबद्ध आणि असुचिबद्ध शेअर्समधील फरक-
●तरलता: सुचिबद्ध शेअर्समध्ये जगभरातून मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने ते असुचिबद्ध शेअर्सहून अधिक तरल आहेत.
●पारदर्शकता: सुचिबद्ध शेअर्सचे भाव बाजारातील मागणी पुरवठा तत्वावर आणि कंपनीच्या कामगिरीवर ठरत असल्याने ते अधिक पारदर्शक असतात.
●नियमन: सुचिबद्ध शेअर्सना शेअर बाजार आणि सेबी यांच्या नियमावलीचे पालन करावे लागते. त्या तुलनेत असुचिबद्ध शेअर्सची नियमावली कंपनी व्यवस्थापनाच्या दृष्टीने कमी जाचक आहे.
●मूल्यांकन: सुचिबद्ध शेअर्सचे मूल्यांकन बरीच माहिती उपलब्ध असल्याने त्यांच्या आधारे करणे सोपे आहे तर असुचिबद्ध शेअर्सबाबत मर्यादित माहिती उपलब्ध असल्याने त्यांचे अचूक मूल्यमापन करणे कठीण आहे.
●व्यवहार सुलभता: सुचिबद्ध शेअर्सचा केवळ एक शेअर्सच्या पटीत (संच) व्यवहार होऊ शकतो. त्यातुलनेत असुचिबद्ध शेअर्सचे व्यवहार मोठ्या संचात करावे लागतात जर असे व्यवहार कमी संचात करायचे असले तर सामान्य गुंतवणूकदारांना त्याची अधीक किंमत चुकवावी लागते.
■असुचिबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक करताना विचारात घ्यायचे घटक-
●गुंतवणूकदाराची जोखीमक्षमता: असे शेअर्स कमी तरल आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे अधिक धोकादायक असल्याने ते अधिक जोखिमयुक्त आहेत त्यामुळे त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखिमक्षमता ओळखून त्या मर्यादेतच गुंतवणूक करावी. यातील बरेचसे व्यवहार केवळ विश्वासावर होत असल्याने काही वेळा नुकसान होऊ शकते. अनेकदा अस्थिर बाजारामुळे सदर कंपन्यांची सुचिबद्धता अपेक्षित काळापेक्षा अधिक काळ लांबणीवर पडू शकते.
●गुंतवणूकीमागिल हेतू: जर दीर्घकालीन गुंतवणूक या दृष्टीने या गुंतवणूकीकडे पहात असाल तर ती कदाचित योग्य गुंतवणूक होऊ शकते.
●तरलतेचा अभाव: झटपट व्यवहारांची गरज हा आपला गुंतवणूक हेतू नसेल तर आणि तरच ही गुंतवणूक आपल्याला कदाचित योग्य असू शकते.
●गुंतवणूक संच विविधता: आपल्या गुंतवणूक संचात विविधता असावी असे अनेक गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात, आपण या मताशी सहमत असल्यास एक अधिकचा पर्याय म्हणून याचा विचार करता येईल.
●नियामक उपलब्धता: या कंपन्या नोंदणीकृत नसल्याने सेबीच्या अंतर्गत येत नाहीत त्यामुळे त्या अनुषंगाने उपलब्ध संरक्षण या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना उपलब्ध नाही. ज्या वेळी या कंपन्या नोंदवण्याची प्रक्रिया चालू होतील तेव्हाच त्याचा सेबीशी आणि भांडवल बाजाराशी संबंध येतो.
■असुचिबद्ध कंपन्यात गुंतवणूक कशी करायची?
●थेट गुंतवणूक: गुंतवणूक करण्यासाठी थेट कंपनी अथवा त्याच्या मध्यस्थांशी संपर्क साधा. अनेक विश्वास ठेवावे असे गुंतवणूक मंच, फिनटेक कंपन्या, दलाल या संबंधात कार्यरत आहेत त्यांची मदत घेता येईल. ही गुंतवणूक आता सॉफ्ट कागदपत्रांचा वापर करून ऑनलाईन होऊ शकते. डिमॅट खाते, चेक कॉपी, आधार कार्ड, पॅन कार्ड याच्या सॉफ्ट कॉपी आणि पैसे दिले की 24 ते 48 तासात शेअर्स तुमच्या खात्यात येतील किंवा हेच डिटेल्स वापरून तुम्हाला ते शेअर्स तुमच्या खात्यातून विकता येतील.
●इसॉपच्या माध्यमातून: तुम्ही अशा कंपनीचे कामगार असाल आणि तुमच्या मालकाकडून हे शेअर्स तुम्हाला मिळत असतील तर ते त्याची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता.
●खाजगी फंड आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांची गुंतवणूक: हे लोक अशी गुंतवणूक करतात आणि त्याची पुनर्विक्री करतात. त्याच्या मार्फत सर्वसाधारण लोक अशी गुंतवणूक करू शकतात.
■करआकारणी: आशा शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक 2 वर्षाच्या आत अल्पकालीन गुंतवणूक समजली जाऊन त्यातून होणारा नफा नियमित उत्पन्नात मिळवून त्यावर नियमित दराने कर आकारणी केली जाते तर दोन वर्षानंतर विक्री केली असता होणारा नफा दीर्घ मुदतीचा समजून त्यावर 12.5% दराने कर आकारणी होईल.
■नियामक बंधने: अशा कंपनीचा पब्लिक इशू जाहीर झाल्यावर शेअर्सची नोंदणी झाल्यापासून किमान 6 महिने ते शेअर्स गुंतवणूकदार बाजारात विकू शकत नाही.
सुचिबद्ध नसलेले पण पुढे बाजारात सुचिबद्ध होण्याची शक्यता असलेले शेअर्स योग्य वेळी योग्य किमतीस घेतल्यास दिर्घकाळात मोठा लाभ होऊ शकतो. त्यांचे व्यवहार करणारे विश्वासू मंच आणि सध्या त्यावर उपलब्ध असलेल्या शेअर्सची माहिती आपण पुढील लेखांतून घेऊयात.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
18 एप्रिल 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)