Friday, 28 March 2025
गोंधळात टाकणाऱ्या आर्थिक संकल्पना भाग 1
#गोंधळात_टाकणाऱ्या_आर्थिक_संकल्पना_भाग1
आर्थिक विषय समजून घेताना त्यातील काही संकल्पना निश्चित काय आहेत याबद्दल गोंधळ उडण्याची शक्यता असते. यातील काही संकल्पनांचा उल्लेख एकमेकांसोबत केला जातो तर काही संकल्पनांत शेवटचा शब्द अथवा अक्षर सारखे असल्याने त्यातून नाद उत्पन्न होतो. अशाच दोन काहीशा सारख्याच वाटणाऱ्या परंतु त्याच्या अर्थाबद्धल गोंधळात भर घालणाऱ्या संकल्पना त्यांचा अर्थासह यापुढील दोन तीन भागात क्रमशः समजून घेऊयात.
■उत्पन्न आणि नफा (Revenue and Profit) : व्यवसायाच्या दृष्टीने,
●उत्पन्न: म्हणजे व्यवसायाच्या सामान्य कामकाजातून मिळणारे एकूण पैसे, जसे की मालाची विक्री किंवा सेवा पुरवल्याबद्धल मिळालेले पैसे. उत्पन्नामध्ये कोणताही खर्च वजा केलेला नसतो. त्यामुळे व्यवसायात झालेली वाढ आणि बाजारातील मागणीचे याचा अंदाज घेता येतो.
●नफा: म्हणजे व्यवसायाने मिळवलेल्या उत्पन्नामधून सर्व खर्च (उदा. उत्पादन खर्च, वेतन, व्याज, कर इ.) वजा केल्यावर शिल्लक राहणारी रक्कम. नफा हा व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. नफा वाढल्यास व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर ठरतो. उदाहरणार्थ,
जर एका दुकानाचे एकूण उत्पन्न ₹ 100000/- रुपये असेल आणि एकूण खर्च ₹ 80000/- रुपये असेल, तर त्या दुकानाचा नफा (Profit) ₹ 20000/- रुपये असेल.
■'जमा लेखा' (Accrual Accounting) आणि 'रोख लेखा' (Cash Accounting):
●जमा लेखा : या पद्धतीत, व्यवहार रोख स्वरूपात झाला की नाही याचा विचार न करता, तो व्यवहार नोंदवला जातो. म्हणजे, जर तुम्ही एखादी वस्तू विकली आणि पैसे येणे बाकी असेल तरीही ती विक्री नोंदवली जाते.
उदाहरणार्थ,
जर उत्पादकाने एखाद्या ग्राहकाला वस्तू दिली आणि त्याने पैसे 30 दिवसानंतर देण्याचे वचन दिले, तर तुम्ही लगेच विक्री नोंदवाल, जरी पैसे लगेच मिळाले नसले तरी. या पद्धतीमुळे व्यवसायाची खरी आर्थिक स्थिती अधिक स्पष्टपणे दर्शविली जाते, कारण तेथे महसूल आणि खर्चाची नोंद वेळेनुसार केली जाते.
●रोख लेखा : या पद्धतीत, व्यवहार फक्त रोख स्वरूपात झाल्यावरच नोंदवला जातो. म्हणजे, पैसे मिळाल्यानंतरच विक्री नोंदवली जाते आणि जेव्हा पैसे दिले जातील तेव्हाच खर्च नोंदवला जातो.
उदाहरणार्थ,
जर एखाद्या ग्राहकाला वस्तू विकली आणि त्याने लगेच पैसे दिले, तरच तो व्यवहार लगेच नोंदवला जातो. ही अतिशय सोपी पद्धत असून लहान व्यवसायांसाठी उपयुक्त आहे.
■मालमत्ता (Assets) आणि दायित्वे (Liabilities):
●मालमत्ता: ही अशी संसाधने आहेत जी एखाद्या व्यक्ती किंवा व्यवसायाच्या मालकीची किंवा नियंत्रित असतात आणि त्यांचे आर्थिक मूल्य असते.
उदाहरणांमध्ये रोख रक्कम, स्थावर मालमत्ता, गुंतवणूक, उत्पादन उपकरणे आणि रक्कम प्राप्त करण्यायोग्य खाती, शिल्लक कच्चा आणि पक्का माल यांचा समावेश आहे. ही
मालमत्ता रोख रकमेत रूपांतरित केली जाऊ शकते त्याचप्रमाणे भविष्यात आर्थिक फायदे मिळवण्यासाठी वापरली जाऊ शकते.
●दायित्वे:हे एखाद्या व्यक्तीने किंवा व्यवसायाने इतरांना दिलेले वचन किंवा कर्ज दर्शवितात.
उदाहरणांमध्ये उधारीवर उचललेला कच्चा माल, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज, अन्य देय खाती, यांचा समावेश होईल.
■भांडवली खर्च (CapEx) आणि परिचालन खर्च (OpEx):
●भांडवली खर्च: मालमत्ता, इमारती, तंत्रज्ञान किंवा उपकरणे यासारख्या दीर्घकालीन मालमत्ता मिळवण्यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा समावेश होतो.
उदाहरणांमध्ये नवीन यंत्रसामग्री खरेदी करणे, कारखाना बांधणे किंवा सॉफ्टवेअर अपग्रेड करणे समाविष्ट आहे. हे खर्च सामान्यतः एकदाच करावे लागतात, आवर्ती नसलेले असतात आणि दीर्घकालीन फायदे मिळवण्याच्या हेतूने केले जातात.
●कार्यक्षम खर्च (OpEx): व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेले दैनंदिन खर्च जसे की, कच्या मालाची खरेदी, पगार, भाडे, विपणन, देखभाल खर्च यांचा समावेश होतो. हे खर्च सामान्यतः आवर्ती असतात आणि व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असतात.
■एकूण नफा टक्केवारी (Gross Margin) आणि निव्वळ नफा टक्केवारी (Net Margin)
●एकूण नफा टक्केवारी: याचा अर्थ कंपनीने तिच्या महसुलातून विक्री केलेल्या वस्तूंच्या निर्मिती करण्यासाठी केलेला खर्च वजा केल्यानंतर मिळवलेल्या नफ्याचा संदर्भ दिला जातो, यात कर आणि दिलेले व्याज याचा समावेश केला जात नाही. तो महसुलाच्या तुलनेत टक्केवारीत व्यक्त केला जातो. कंपनी तिच्या उत्पादन खर्चाचे व्यवस्थापन किती कार्यक्षमतेने करते हे ते यातून समजते. यातून व्यवसायाचा ढोबळ नफा समजतो.
●निव्वळ नफा टक्केवारी : हा काढताना कंपनीच्या महसुलातून उत्पादन परिचालन खर्च, व्याज आणि कर यासह सर्व खर्च वजा केल्यानंतर मिळणाऱ्या नफ्याचे खरेखुरे प्रतिनिधित्व करतो, हा नफा देखिल महसुलाच्या तुलनेत टक्केवारीत व्यक्त केला जातो.
■व्यवसायाची व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी पूर्वीची कमाई (EBITDTA) आणि
निव्वळ उत्पन्न (Net Income)
●व्यवसायाची व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी पूर्वीची कमाई: कंपनीच्या मुख्य व्यवसायिक कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे गुंतवणूकदारांना कंपन्यांची तुलना करता येते.
ते मोजण्याची पद्धत,
EBITDA = परिचालन उत्पन्न + घसारा + कर्जमाफी.
●निव्वळ उत्पन्न: कंपनीचा एकूण नफा, जो सर्व खर्च आणि उत्पन्नानंतर शिल्लक राहतो. यामुळे कंपनीच्या एकूण आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. असे असले तरी त्यातून निश्चित असा रोख प्रवाह समजून येत नाही ही त्यातील त्रुटी आहे.
मोजण्याची पद्धत,
निव्वळ उत्पन्न = एकूण महसूल - सर्व खर्च.
■गुंतवणुकीवर परतावा (Return on Investment) आणि समभागावरील परतावा (Return on Equity):
●गुंतवणुकीवरील परतावा: हा वाक्यांश गुंतवणुकीच्या एकूण नफ्याचा संदर्भ देतो, जो बहुतेकदा टक्केवारीतच व्यक्त केला जातो.
●समभागावरील परतावा: हा वाक्यांश विशेषतः कंपनीच्या भागधारकांच्या समभागाद्वारे निर्माण होणाऱ्या नफ्याचा किंवा मालकांनी गुंतवलेल्या पैशाच्या रकमेचा संदर्भ देतो.
■बाजार मूल्य (Market Cap) आणि उद्योग मूल्यांकन (Enterprise Value):
● बाजारमूल्य: बाजारमूल्य म्हणजे कंपनीच्या सर्व विक्रीयोग्य शेअर्सची बाजारभावानुसार एकूण किंमत. उदाहरण:
जर एका कंपनीचे 100 लाख शेअर्स असतील आणि प्रत्येक शेअरची किंमत ₹100 असेल, तर त्या कंपनीचे बाजारमूल्य ₹100 कोटी (100 लाख * ₹100) असेल.
बाजारमूल्याने कंपनीच्या आकाराचे आणि बाजारातील स्थानाचे (size and position) मोजमाप करता येते. लार्ज, मिड, स्मॉल कंपन्यांचे निकष त्यांच्या बाजारमूल्यानुसार ठरतात. बाजार मूल्यानुसार कंपन्यांचा क्रम लावला असता पहिल्या 100 कंपन्या या मोठ्या आकाराच्या (लार्ज कॅप) 101 ते 250 क्रमांकाच्या कंपन्या मध्यम (मिड कॅप) आकाराच्या आणि अन्य सर्व छोट्या आकाराच्या ( स्मॉल कॅप) समजल्या जातात.
●उद्योग मूल्यांकन: म्हणजे कंपनीच्या एकूण मूल्याचे मोजमाप, ज्यात कंपनीचे समभाग, कंपनीवरील कर्ज आणि त्यातील मालकीचे स्वारस्य यांचा समावेश होतो. यामुळे कंपनीच्या एकूण मूल्याचे अधिक व्यापक आणि वस्तुनिष्ठ चित्र डोळ्यासमोर येते, जे मार्केट कॅपपेक्षा अधिक उपयुक्त असू शकते. याचा वापर कंपनीच्या मूल्यांकनासाठी आणि वित्तीय विश्लेषण करण्यासाठी केला जातो.
■स्थिर खर्च (Fixed Cost) आणि परिवर्तनीय खर्च (Variable Cost):
●स्थिर खर्च: उत्पादन किंवा विक्रीच्या प्रमाणात वाढ किंवा घट झाल्यास, या खर्चावर फारसा कोणताही परिणाम होत नाही.
उदाहरणार्थ,
भाडे, पगार, कर्जाचे हप्ते, इत्यादी.
या खर्चाला 'निश्चित खर्च' असेही म्हणतात.
●परिवर्तनीय खर्च: उत्पादन किंवा विक्रीच्या प्रमाणात बदलल्यास, या खर्चात बदल होतो.
उत्पादन वाढले तर खर्च वाढतो आणि उत्पादन घटले तर खर्च घटतो.
उदाहरणार्थ,
कच्चा माल, पॅकेजिंग, वाहतूक खर्च.
■आर्थिक कर्ज (Financial liverages) आणि निधीतून कार्यक्षम वापर (Operating liverages):
●आर्थिक कर्ज: व्यवसाय विस्तारासाठी कर्ज घ्यावे लागते त्यावर व्याज द्यावे लागते किंवा अधिमूल्याने समभाग वितरित केल्यास अधिक निधी प्राप्त होतो. यातील समभागावर लाभांश द्यावा लागतो. हे करत असताना कंपनीला आर्थिक धोका निर्माण होऊ शकतो. जर भांडवलावर परतावा कर्जावर द्याव्या लागणाऱ्या व्याजाहून अधिक असल्यास किंवा काही कालावधीनंतर अधिक होण्याची शक्यता असेल तर सकारात्मक मानला जाईल. कर्जाची तीव्रता ईपीएसमध्ये टक्केवारीतील बदलाला ईबीआयटीमध्ये टक्केवारीतील बदलाला भागून मिळवता येते
●निधीचा कार्यक्षम वापर : जेव्हा एखादी कंपनी कार्यात्मक क्रियाकलापांमध्ये निश्चित खर्च-वाहक संसाधनांचा वापर करून तिच्या एकूण खर्चाची काळजी घेण्यासाठी अधिक उत्पन्न मिळवते तेव्हा त्याला ऑपरेटिंग लीव्हरेज म्हणतात. विक्रीच्या समायोजनामुळे व्याज आणि कर (EBIT) पूर्वीच्या कमाईवर होणारा परिणाम मोजण्यासाठी ऑपरेटिंग लीव्हरेजची तीव्रता (DOL) मोजली जाते. EBIT मधील बदलाच्या टक्केवारीस विक्रीमधील टक्केवारीतील बदलाने भागून ती मोजता येते.
यापुढील भागात आपण आणखी काही गोंधळात पाडणाऱ्या आर्थिक संकल्पना समजून घेऊयात. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
28 मार्च 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Friday, 21 March 2025
लाभांश आणि मूल्यवृद्धीद्वारे उत्पन्नवाढ
#लाभांश_आणि_मूल्यवृद्धीद्वारे_उत्पन्नवाढ
आपल्या वाजवी इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि आपण आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे यासाठी गुंतवणूक करावी लागते. ती करण्यासाठी काही रक्कम प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवावी लागते. ती पुरेशी नसेल तर उत्पन्न कसे वाढेल याचे मार्ग शोधावे लागतात. आपल्या सारखेच आपल्या देशाच्या विकास कामासाठी सरकारला पैसे लागतात. कर हे सरकारच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. वेगवेगळ्या मार्गाने अधिकाधिक कर कसा गोळा होईल हे सरकार पहात असते. त्यातील काही कर सरसकट सर्वाना द्यावे लागतात (उदा जीएसटी) तर काही पगार किंवा व्यवसायाच्या उत्पन्नावर (उदा.आयकर) द्यावे लागतात. काही कर हे विशेष कर म्हणता येतील (उदा भांडवली नफ्यावरील कर, आयात निर्यातीवरील कर) आपल्या सरकारचा अर्थ संकल्प तुटीचा आहे ही तूट भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावे लागते त्यावर व्याज द्यावे लागत असल्याने सरकारी खर्चात पर्यायाने महागाईत वाढ होते. आपल्या देशात लोकांच्या उत्पन्नात प्रचंड तफावत आहे. 90% संपत्ती 10% लोकांकडे एकवटली असल्याने अनेक लोकांना आपल्या किमान गरजा पूर्ण करता येत नाहीत. अशा लोकांसाठी सरकारी योजना आहेत. तरीही अशी अनेक कुटुंबे आहेत जी आपल्या गरजा कशाबश्या भागवत असतात. याहून थोडा वरचा स्तर असलेले लोक थोड्या वाढलेल्या उत्पन्नावर आयकर देत होते. खर तर या वर्गाने त्यांच्या अडीअडचणीसाठी थोडी गुंतवणूक करणे आवश्यक होते.
कारण कोणतेही असेना यावर्षी आयकर मर्यादेत नवीन पद्धतीने मोजणी केल्यास प्रत्येक स्तरावर भरीव वाढ तसेच काही अटी पूर्ण करणाऱ्या ₹ 12 लाखाच्या आत करपात्र उत्पन्न असलेल्याना आयकर सवलतीमुळे कर द्यावा लागणार नसल्याने हा वर्ग अधिक खर्च करू शकेल, त्याचप्रमाणे गुंतवणूकही करू शकणार आहे. 90% व्यक्तींचे उत्पन्न या मर्यादेत असल्याने आता त्यांना आयकर द्यावा लागणार नाही. टीडीएस आणि टीसीएस मर्यादा वाढल्या आहेत. याचा मागोवा घेण्याच्या हेतूने गेल्या वर्षी आयकर विवरणपत्र ज्यांनी भरली त्या सर्व करदात्यांचा तपशील उपलब्ध झाला आहे. ही आकडेवारी 31 मे 2024 पर्यत विवरणपत्र दाखल केलेल्याची असून त्यातून मिळालेली महत्वाची माहिती अशी,
●विवरण पत्र भरणाऱ्या करदात्यांची संख्या 7,97,12145 आहे.
●72% लोकांनी नवीन करमोजणी पद्धतीचा स्वीकार केला आहे.
●Range
All Taxpayers - Gross Total Income (AY 2023-24)
(in Lakh INR) No. of Returns
<0= 0 1,441,175
>0 and <=1,50,000 4,144,666
>150,000 and <=
2,00,000 1,509,747
>2,00,000 and <=
2,50,000 3,036,825
>2,50,000 and <=
3,50,000 5,946,214
>3,50,000 and <=
4,00,000 4,055,198
>4,00,000 and <=
4,50,000 6,024,031
>4,50,000 and <=
5,00,000 12,600,689
>5,00,000 and <=
5,50,000 6,154,414
>5,50,000 and <=
9,50,000 20,697,590
>9,50,000 and <=
10,00,000 1,084,818
>10,00,000 and <=
15,00,000 6,379,208
>15,00,000 and <=
20,00,000 2,503,932
>20,00,000 and <=
25,00,000 1,240,128
>25,00,000 and <=
50,00,000 1,953,619
>50,00,000 and <=
1,00,00,000 589,762
>1,00,00,000 and <=
5,00,00,000 291,929
>5,00,00,000 and <=
10,00,00,000 26,379
>10,00,00,000 and <=
25,00,00,000 17,041
>25,00,00,000 and <=
50,00,00,000 6,529
>50,00,00,000 and<=
100,00,00,000 3,730
>100,00,00,000 and<=
500,00,00,000 3,555
Total 79,712,145
Average Gross
Total Income 10,253,113
ज्यांचा आर्थिक स्तर एकदम कमी त्यांना गुंतवणूक शक्यच नाही आणि ज्यांचा आर्थिक स्तर एकदम वरचा आहे त्याना असंख्य गुंतवणूक पर्याय आहेत. आता 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास कर बसणार नसल्याने एक मोठा वर्ग आयकरापासून मुक्त होईल. करवाढीच्या प्रत्येक टप्यात फेररचना झाल्याने सर्वच करदात्यांचा एकंदर कर बऱ्यापैकी कमी होणार आहे. यातील अनेक जण वाचलेला कर खर्च करतील तर काहीजण बचत आणि त्यातून गुंतवणूक करू शकतील.
गुंतवणूक करताना आपल्याला ‘वाजवी’ लाभ मिळावा अशी अपेक्षा असणे साहजिक आहे. ‘वाजवी’ हा सापेक्ष शब्द असला तरी मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी महागाईवर मात करेल असा परतावा मिळू शकेल आणि रक्कमही सुरक्षित राहील असा एक उत्तम पर्याय म्हणजे थोडेथोडे करून लाभांश (डिव्हिडंड) देणारे असे शेअर्स घ्यावेत की त्यातून मिळणारा परतावा बँकेत पैसे ठेवले तर मिळणाऱ्या रकमेच्या आसपास असेल. भविष्यात भावात वाढ झाली की भांडवल वृद्धी होईल आणि कमी जोखीम घेऊन बऱ्यापैकी परतावा मिळेल. ₹ बारा लाखापर्यंत उत्पन्नावर कर नाही आणि दरवर्षी ₹ एक लाख पंचवीस हजाराचा करमुक्त दीर्घकालीन भांडवली नफा या दोन्हींचा लाभ घेता येईल असे नियोजन करता येईल. महागाईशी निगडित पेन्शन न मिळणारे ज्येष्ठ नागरिकही आपली निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम प्रथम स्थिर उत्पन्न देणाऱ्या वरीष्ठ नागरिक बचत योजनेत (SCSS सध्याचा व्याजदर 8.2%), रिझर्व बँकेच्या बदलत्या व्याजदराच्या रोख्यांमध्ये गुंतवून (RBI FRB सध्याचा व्याजदर 8.05%) जास्तीची रक्कम अशा शेअर्स मध्ये गुंतवू शकतात. अनेक ब्लू चिप कंपन्यांचे भाव कायमच जास्त असून त्यातून मिळणारा लाभांश परतावा नगण्य असल्याने या गुंतवणूकदार वर्गासाठी त्यांचा विचार जाणीवपूर्वक केला नाही.
यासाठी काही निवडक शेअर, त्याचा मंगळवार 18 मार्च 2025 चा बंद बाजारभाव, त्यातून मिळणारा परतावा आणि गेल्या 52 आठवड्यात सर्वात कमी/सर्वाधिक भाव असे,
●बीपीसीएल, 262, 12.2%, 234-376
●सिपीसीएल 560, 9.82% 433-1275
●एचपीसीएल324, 9.72% 288-455
●एनएमडीसी 67, 7.37% 60-95
●कोल इंडिया389, 6.55% 249-544
●वेदांत 460, 6.51% 261-626
●जीपीपीएल 131, 5.54% 123-250
●ओएनजीसी 232, 5.28%, 215-345
●व्हीएसटी 258, 5.28%, 242-436
5% ते 12% लाभांश परतावा मिळणारे हे शेअर्स असून त्यांचा सर्वाधिक भाव आणि सर्वात कमी भाव यात 50% हून जास्त फरक आहे. फारसे कष्ट न घेता वर्षभरानंतर लाभांश घेऊन भाव वर्षभरात 15 ते 20% वर गेल्यास भांडवली नफा मिळवता येणे शक्य आहे. यातील बहुतांश कंपन्या सरकारी आहेत त्या खनिजे, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राशी निगडित आहेत. त्यांनी आपल्या भागधारकांना वेळोवेळी बोनस शेअर्सही दिले आहेत. सुरक्षित गुंतवणूकीचे हे एक साधन होऊ शकते. 2% ते 4% परतावा देणाऱ्याही अनेक चांगल्या कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत. या दृष्टीने आपल्या आर्थिक सल्लागारशी चर्चा करावी. सध्या या सर्व कंपन्या त्याच्या 52 आठवड्यातील सर्वात कमी भावाच्या जवळपास मिळत असल्याने, येथून त्यांचे भाव खाली जाण्याची शक्यता बरीच कमी आणि वाढण्याची शक्यता बरीच अधिक आहे. अशा पद्धतीच्या कंपन्यांची सविस्तर यादी स्क्रीनर, इटी मनी, मनी कंट्रोल यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपल्या गरजेनुसार त्यांची अधिक माहिती तेथून मिळवता येईल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख कोणतीही गुंतवणूक शिफारस करीत नाही. शेअरबाजारातील गुंतवणूक धोकादायक प्रकारात मोडत असल्याने अशी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी अथवा यातील तज्ज्ञ व्यक्तीशी चर्चा करून मगच गुंतवणूक निर्णय घ्यावा.)
21 मार्च 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Friday, 14 March 2025
भांडवल बाजारातील अप्रत्यक्ष गुंतवणूक भाग 2
#भांडवल_बाजारातील_अप्रत्यक्ष_गुंतवणूक_भाग_2
मागील भागात आपण भांडवल बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध म्युच्युअल फंड, गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा आणि पर्यायी गुंतवणूक निधी तीन पर्यायांची थोडक्यात माहिती घेतली. यातील म्युच्युअल फंड हा पर्याय सर्वच गुंतवणूकदारांना उपयुक्त आहे तरीही अनेक गुंतवणूकदार अधिक परतावा मिळावा या हेतूने डमी गुंतवणूक व्यवस्थापन योजनांत गुंतवणूक करतात त्यातील काहींना लाभ होतो गुंतवणूक करण्यासाठी अनेक अधिकृत पर्याय उपलब्ध असले तरी लोभ आणि हव्यास यामुळे अनेक गुंतवणूकदार अधिक आकर्षक परतावा देण्याचे वचन देणाऱ्या योजनांना बळी पडतात. पीएमएस आणि एआयएफ मधील किमान गुंतवणूक ही अनुक्रमे पन्नास लाख ते एक कोटी रुपये असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यातील नाही. तेव्हा अशा गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि पीएमएस यांच्यातील अंतर भरून काढू शकेल असा अधिकचा, वेगळा पण अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळण्याची शक्यता असलेला गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल असे गेल्या अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार सेबीने या योजनेची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. सर्व म्युच्युअल फंडांची स्वशासित संघटना अँफी यांना यासंबंधीची गुंतवणूक नियमावली सेबीशी चर्चा करून 31 मार्च 2025 पर्यंत जाहीर करावी असे सुचवले. या मार्गदर्शक तत्वाचा आधार घेऊन निश्चित नियम असलेल्या योजना नव्या आर्थिक वर्षात सर्वाना उपलब्ध होतील असा अंदाज आहे. ज्यांना डिरिव्हेटिव व्यवहारातील प्राथमिक माहिती आहे त्यांना यातील संकल्पना समजतील अन्य व्यक्तींना कदाचित ते समजायला कठीण असल्याने स्वतंत्रपणे केवळ याच योजनेची माहिती आपण या लेखातून करून घेऊ.
या योजनेचे नाव विशेषीकृत गुंतवणूक योजना असे असेल. योजनेचे व्यवस्थापन करणारी कंपनी, किमान गुंतवणूक, उपलब्ध गुंतवणूक प्रकारासह योजनेची मुख्य वैशिष्ठ्ये-
■मालमत्ता व्यवस्थापन कंपनीसाठीचे पात्रता निकष-
●किमान 3 वर्षांचा कार्यकाळ आणि ₹10,000 कोटींचा गुंतवणूक निधी त्यांच्याकडे (गेल्या 3 वर्षांचा सरासरी AUM) असणे आवश्यक.
अथवा
किमान 10 वर्षांचा निधी व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) ची नियुक्ती करून ₹5,000 कोटींचा सरासरी गुंतवणूक निधी व्यवस्थापन करण्याचा अनुभव असावा.
●अतिरिक्त फंड मॅनेजर कडे ₹ 500 कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा.
●सेबी कायद्याच्या सेक्शन 11, 11B आणि 24 नुसार फंड हाऊस विरुद्ध अलीकडच्या तीन वर्षात कोणतीही कारवाई झालेली नसावी.
●या निधींची जाहिरात करून म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांना त्याचे ब्रॅण्डिंग करता येईल.
● या निधींसाठी स्वतंत्र गुंतवणूकस्नेही संकेतस्थळ किंवा स्वतंत्र पेज बनवावे लागेल.
■ किमान गुंतवणूक रक्कम:
●किमान ₹10 लाख गुंतवणूक आवश्यक (SIP, SWP, STP परवानगी आहे, परंतु एकूण गुंतवणूक ₹10 लाखांपेक्षा कमी असता कामा नये).
●जर बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणूक ₹10 लाखांखाली गेली तर चालेल परंतु ती अयोग्य व्यवस्थापनामुळे अथवा वारंवार गुंतवणूक धोरण बदलल्याने खाली जात आहे असे गुंतवणूकदारास वाटल्यास संपूर्ण रक्कम त्यास बाजारभावाने मागे घेता येईल.
●गुंतवणूक कोणत्या मालमत्ता प्रकारात किती टक्यांपर्यत करावी याच्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.
●मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांसाठी (हा एक वेगळा अधिक जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा प्रकार आहे) हा नियम लागू नाही.
■गुंतवणूकीस उपलब्ध फंड प्रकार : गुंतवणूकदारांना सध्या इक्विटी आधारित तीन कर्जरोख्यांवर आधारित दोन आणि एकत्रित असे दोन प्रकारचे फंड असे एकूण सात प्रकार उपलब्ध होतील.
(अ) इक्विटी-आधारित फंड:
◆इक्विटी लॉन्ग-शॉर्ट फंड: किमान 80% इक्विटीमध्ये गुंतवणूक, आणि 25% शॉर्ट पोझिशन्स (डेरिव्हेटिवद्वारे).
◆इक्विटी Ex-Top 100 लॉन्ग-शॉर्ट फंड: टॉप 100 स्टॉक्सच्या बाहेरील 65% गुंतवणूक.
◆सेक्टर रोटेशन लॉन्ग-शॉर्ट फंड: 80% इक्विटी गुंतवणूक (कमाल 4 सेक्टर्समध्ये).
(ब) डेट-आधारित फंड:
◆डेट लॉन्ग-शॉर्ट फंड: डेट इन्स्ट्रुमेंट्सवर लॉन्ग व शॉर्ट पोझिशन्स.
◆सेक्टरल डेट लॉन्ग-शॉर्ट फंड: विशिष्ट क्षेत्रांतील डेट इन्स्ट्रुमेंट्सवर लक्ष केंद्रित.
(क) हायब्रीड फंड:
◆ऍक्टिव्ह असेट अलोकेटर लॉन्ग-शॉर्ट फंड: वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये गतिशील वाटप.
◆हायब्रीड लॉन्ग-शॉर्ट फंड: इक्विटी आणि डेट गुंतवणुकीसह संतुलित धोरण.
यातील कोणत्याही फंडाचे गुंतवणूक धोरण ठरवताना त्यातील मान्य प्रचलीत निर्देशांक हे मानद निर्देशांक म्हणून स्वीकारता येतील.
■डेरिव्हेटिव्ह्स धोरण:
◆SIF फंडांना 25% पर्यंत डेरिव्हेटिव मधील व्यवहार करण्याची परवानगी आहे. हेजिंगसाठी (जोखीम व्यवस्थापन हेतूने) व्यवहार करण्याशिवाय असलेली ही अधिकतम मर्यादा आहे.
ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी इक्विटी लॉंग शॉर्ट फंडाकडे ₹100 कोटी निधी असेल तर तो खालील पद्धतीने गुंतवण्यात येईल.
*गुंतवणूक केलेल्या शेअर्समध्ये त्याचा चालू बाजारभाव ₹2500/- असल्यास विहित मर्यादेत कॅशमध्ये,
~500 लॉट शेअरच्या फ्युचर्सची किंमत ₹2525/-
~कॉल ऑपशन ₹90/- आणि
~पुट ऑप्शन ₹85/- असल्यास
~फ्युचर शॉर्ट करायचे असल्यास एकूण रक्कम 10 कोटींहून अधिक न होता 79 लॉटची खरेदी विक्री करता येईल.
~वेगवेगळ्या शेअरसाठी हेजिंग वगळून एकत्रित डिरीव्हेटिव्ह व्यवहार मर्यादा 25 कोटींची असेल
~कॉल ऑप्शन लॉंग पोझिशन 2222 लॉट एकूण रक्कम 10 कोटींहून कमी
~कॉल ऑपशन शोर्ट पोझिशन 80 लॉट
एकुण रक्कम 10 कोटींहून कमी
असे व्यवहार होऊ शकतात.
यामध्येवेगवेगळे निधी गुंतवणूक धोरण होऊ शकते
उदाहरण 1
शेअर्समधील गुंतवणूक 70 कोटी
रोख रक्कम 5 कोटी
शॉर्ट एक्सपोजर एकत्रित शेअर्स/ इंडेक्स मधील 25 कोटी.
उदाहरण 2
शेअर्स मधील गुंतवणूक 62.5 कोटी,
हेजिंग व्यवहार लॉंग फ्युचर आणि लॉंग ऑपशन व्यवहार 10 कोटी,
रोख रक्कम 2.5 कोटी
शॉर्ट एक्सपोजर शेअर/ इंडेक्स यातील 25 कोटी.
यातील 25 कोटींची मर्यादा हेजिंग आणि गुंतवणूक संच पुनर्स्थापना करण्याच्या शिवाय आहे.
यासह वेगवेगळ्या चौदा उदाहरणांसाहित दोन वेगवेगळ्या पोझिशन ऑफसेट होतील की नाही आणि त्यावरून नेट एक्सपोजर काय असेल? ते समजावून सांगणारा तक्ता सेबीने प्रकाशित केला आहे.
■वर्गणी आणि परतफेड (Subscription & Redemption) विषयक धोरण:
◆SIF ओपन-एंडेड, क्लोज-एंडेड किंवा इंटरवल फंड स्वरूपात असू शकतो.
●परतफेडीचा कालावधी दररोज, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक असू शकतो.
●15 कार्यदिवसांपर्यंत परतफेडीसाठी नोटीस कालावधी लागू शकतो.
■सूचीबद्धता (Listing) निकष:
◆सर्व क्लोज-एंडेड आणि इंटरवल फंडांना स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक बाजारभावावर गरजेनुसार काढून घेण्याचा पर्याय उपलब्ध राहील
■जोखीम व्यवस्थापन आणि त्यांचे प्रकटीकरण:
◆जोखीम मूल्यांकन दर महिन्याला जाहीर करावे लागेल (AMC च्या वेबसाइट आणि AMFI वेबसाइटवर).
◆‘Risk-Band’ पद्धतीने जोखीम पाच विविध स्तरांमध्ये विभागली जाईल. लेव्हल 1 सर्वात कमी जोखीम ते लेव्हल 5 सर्वाधिक जोखीम असा चढता क्रम असेल.
◆फंड मॅनेजरना त्यांचे पुढील निधी गुंतवणूक धोरण आणि त्याचा जोखीम स्तर दरवर्षी 31 मार्च पूर्वी जाहीर करावे लागेल. याशिवाय ◆वर्षभरात त्यात काही बदल केल्यास त्याची माहिती एएमसी आणि अँफी यांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत करावी लागेल.
◆योजनेतील गुंतवणूक दर दोन महिन्यांनी जानेवारी, मार्च, मे, जुलै, सप्टेंबर, आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी म्युच्युअल फंड योजनांच्या पद्धतीने जाहीर करण्यात येईल.
◆योजनेच्या परीचालनासाठी केलेले व्यवहार हे वैयक्तिक गुंतवणूकदारांचे व्यवहार समजले जाणार नाहीत जेव्हा गुंतवणूक काढून घेतली जाईल तेव्हाच अल्प/ दीर्घ मुदतीचा भांडवली लाभानूसार कर आकारला जाईल. हा कर मुळातून कापला जाणार नाही.
■वितरण व प्रमाणपत्र:
◆SEBI ने NISM Series-XIII: Common Derivatives Certification परीक्षा उत्तीर्ण असलेल्या वितरकानाच विशेषीकृत गुंतवणूक निधीवर आधारित उत्पादने वितरित करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामुळे संभाव्य गुंतवणूकदार हा गुंतवणूक प्रकार त्यातील जोखीम बक्षीस संकल्पना समजून घेऊ शकेल.
सेबीने जाहीर केलेली ही नवीन मार्गदर्शन तत्वे नियमन पारदर्शकता वाढवणे, गुंतवणूकदारांना अधिक लवचिकता देणे आणि मजबूत सुरक्षा उपाय प्रदान करणे या उद्देशाने प्रकाशित केली आहेत.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते ही पूर्णपणे वैयक्तिक आहेत. डिरिव्हेटिव मधील गुंतवणूक ही अत्यंत धोकादायक गुंतवणूक समजली जात असल्याने परस्पर गुंतवणूक करू नये यासंदर्भात आपल्या वित्तीय सल्लागाराची मदत घेता येईल)
अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर 14 मार्च 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 7 March 2025
भांडवल बाजारातील अप्रत्यक्ष गुंतवणूक भाग 1
#भांडवल_बाजारातील_अप्रत्यक्ष_गुंतवणूक_भाग_1
भांडवलबाजारात अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करण्याचे सध्या उपलब्ध असलेले तीन मार्ग म्हणजे,
◆म्युच्युअल फंड (MF)
◆गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा (PMS)
◆पर्यायी गुंतवणूक निधी (AIF)
या तिन्ही योजना गुंतवणूकदारांच्या वतीने जाणकार व्यक्तींकडून व्यवस्थापित केल्या जातात. प्रत्येक योजनेत फरक आहे त्याचे फायदे /तोटे किंवा तारक / बाधक गोष्टी आहेत त्या कोणत्या ते थोडक्यात पाहू. पुढील आर्थिक वर्षात विशेषीकृत गुंतवणूक निधी (SIF) आणण्याचे ठरवल्याने चौथा पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल.
■म्युच्युअल फंड -
फायदे
●खूप कमीत कमी गुंतवणूक, अगदी मामुली रकमेपासून कितीही रकमेची गुंतवणूक करता येते. सुरुवातीस लागणारी गुंतवणूक अत्यंत कमी असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आवडेल अशी ही गुंतवणूक आहे. त्याचप्रमाणे उच्च उत्पन्न असलेल्या गटांसाठी ही लाभदायक आहे.
●गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. त्यातही धेय्यांच्या, विशिष्ट मुदतीच्या अथवा कधीही गुंतवणूक करण्यायोग्य अथवा काढण्यायोग्य अशा अनेक योजना उपलब्ध आहेत.
●अत्यंत कर-कार्यक्षम, फंड हाऊसने केलेल्या खरेदी विक्रीवर फंड हाऊस किंवा गुंतवणूकदारांना आयकर द्यावा लागत नाही. ज्यावेळी गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेईल तेव्हाच भांडवली कर लागू होतो.
●सुलभ हाताळणी, पद्धतशीरपणे गुंतवणूक / हस्तांतरण / पैसे काढणे शक्य आहे. त्यामुळे निधी कोणत्या परिस्थितीत गुंतविला जातो त्यासंबंधीचा धोका कमी होत असल्याने आर्थिक नियोजन करताना अंतिमतः ते किफायतशीर ठरते.
●सामान्यतः कमी जोखीम असलेले, निर्देशांक आधारित वैविध्यपूर्ण गुंतवणूक प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
●गुंतवणूक जेवढी अधिक कालावधीसाठी केली जाईल तेवढी जोखीम कमी होऊन भांडवल वृद्धिंगत होण्याची शक्यता अधिक असते. गुंतवणूकीचे एक अतिशय सोयीस्कर साधन असून आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून खूप मौल्यवान आहे.
तोटे /बाधक गोष्टी-
●निर्देशांक किंवा व्यवसाय प्रकाराव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट श्रेणी किंवा गुंतवणूक शैलीवर आधारित गुंतवणूक योजना नाहीत.
●निधी व्यवस्थापन करताना कमी जोखीम घेतली जात असल्याने मिळणारा परतावा कमी होतो.
●निधी व्यवस्थापक सोडून गेल्यास होणाऱ्या बदलांचा गुंतवणूकीवर परिणाम होऊ शकतो.
●म्युच्युअल फंडांचा मुख्य दोष म्हणजे, या रचनेमुळे अधिक भिन्न आणि उच्च जोखीम-परतावा धोरणे देणे सोपे होत नाही. यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकीची परतावा क्षमता मर्यादित होते. त्यामुळेच अनेक उच्च उत्पन्न धारक (एचएनआय) गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा (पीएमएस) किंवा पर्यायी गुंतवणूक निधीत (एआयएफ) गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात.
■गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा - केवळ उच्च मालमत्ता असणाऱ्यांसाठीच मर्यादित अशी ही योजना असून त्याचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे
फायदे
●भिन्न रणनीती
●जोखीम-बक्षीस पर्यायांची मोठी श्रेणी
●गुंतवणूकदारांच्या जोखीम क्षमतेस अनुकूल गुंतवणूक संच बनवणे शक्य.
●स्टॉकची थेट मालकी
●फंड व्यवस्थापन स्थिरता (मालक-व्यवस्थापित पीएमएस)
●विशिष्ट श्रेणी/गुंतवणूक शैलींभोवती सखोल विशेषज्ञता निर्माण केली जाऊ शकते.
तोटे / बाधक गोष्टी
●किमान गुंतवणूक 50 लाख, जी सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्याबाहेर आहे.
●कर गैरसोय, योजनेतील खरेदी विक्री ही संबंधित व्यक्तीची समजुन त्यावर कर आकारणी होत असल्याने अधिक कर द्यावा लागतो.
●अशा योजना व्यवस्थापित करणे हे कौशल्याचे काम आहे. या योजनेत कर्ज घेणे आणि शॉर्ट सेलिंग करणे यास परवानगी नाही.
कमीत कमी नियामक बंधने आणि किमान कॉर्पस अडथळ्यांसह, पीएमएस प्लॅटफॉर्म हे फंड व्यवस्थापकांसाठी स्वतःची अशी स्वतंत्र गुंतवणूक धोरणे पडताळून पाहण्यासाठी आणि चालवण्यासाठीचे सर्वात सोपे गुंतवणूक साधन आहे. यामुळे विविध जोखीम-परतावा गुणोत्तरांसह मोठ्या संख्येने विभेदित धोरणे उपलब्ध होतात, जी अधिक नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकतात. याव्यतिरिक्त, पीएमएस प्लॅटफॉर्म वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इक्विटी पोर्टफोलिओ कस्टमाइझ करण्याची परवानगी देखील देतात. अलिकडच्या वर्षांत, मोठ्या संख्येने उच्च दर्जाचे फंड व्यवस्थापकांनी एएमसीमधील त्यांच्या वरिष्ठ गुंतवणूक पदांचा त्याग करून स्वतःचे पीएमएस हाऊस स्थापन केले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मुख्य फंड व्यवस्थापन टीमच्या दीर्घकालीन स्थिरतेवर विश्वास ठेवता येईल. हा व्यवसाय असल्याने सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या व्यवस्थापकास जावे लागत असले तरी म्युच्युअल फंड योजनांच्या तुलनेत कमी धोका आहे. सध्या अनेक उच्च दर्जाच्या पीएमएस योजना आहेत, तरी तितक्याच मोठ्या संख्येने कमी दर्जाच्या योजनाही आहेत. यामुळे गुंतवणूकदार आणि सल्लागार यांना गुंतवणूक करण्यापूर्वी खऱ्या जोखीम-बक्षीसाची अधिक चांगली समज असणे खूप महत्वाचे आहे. अतिशय उच्च उत्पन्न असलेल्या लोकांच्या दृष्टीने शॉर्टिंग आणि लीव्हरेजवरील निर्बंध, पीएमएस हाऊसेसना एआयएफ रचनेअंतर्गत शक्य असलेल्या अधिक जटिल धोरणे सुरू करण्यापासून प्रतिबंधित करतात. पर्यायी गुंतवणूक निधीत हे शक्य असते.
■पर्यायी गुंतवणूक निधी -
फायदे
●अत्यंत गुंतागुंतीच्या रणनीती शक्य
जोखीम-बक्षीस पर्यायांची मोठी श्रेणी उपलब्ध असून फंड व्यवस्थापन स्थिरता उपलब्ध आहे. (मालक-व्यवस्थापित एआयएफ)
●विशिष्ट श्रेणी/गुंतवणूक शैलींभोवती सखोल विशेषज्ञता निर्माण केली जाऊ शकते.
तोटे अथवा बाधक गोष्टी
●किमान गुंतवणूक 1 कोटी रुपये
●कर गैरसोय, गुंतवणूक व्यक्तीने स्वतः केली समजून कर आकारणी होते.
●अनेकदा खरे जोखीम-बक्षीस समजणे कठीण असू शकते.
एआयएफचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे - कॅटगिरी एक (प्रारंभिक टप्प्यातील आणि स्टार्ट-अप उपक्रमांमधील गुंतवणूक), कॅटगिरी (जे कॅटगिरी १ किंवा ३ मध्ये बसत नाहीत) आणि कॅटगिरी ३ (लीव्हरेजच्या वापरासह विविध किंवा जटिल धोरणे वापरणारे फंड). AIF द्वारे स्वीकारल्या जाणाऱ्या काही अधिक गुंतागुंतीची व्यापार धोरणे सल्लागारांना किंवा गुंतवणूकदारांना खरोखर समजून घेणे कठीण असू शकते. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या जोखीम-परताव्याची खरी समज असल्याने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. यातील कॅटगिरी तीन एआयएफ वरील उत्पन्नाच्या प्रकारावर (व्यवसाय उत्पन्न, भांडवली नफा आणि लाभांश) आधारित फंड पातळीवर कर आकारला जातो.
एआयएफ हे तीन गुंतवणूक साधनांपैकी सर्वात लवचिक आहेत, जे लिव्हरेज आणि शॉर्टिंगच्या वापरासह अनलिस्टेड शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देतात. यामुळे एआयएफ पीएमएस किंवा म्युच्युअल फंड स्ट्रक्चर्स अंतर्गत शक्य असलेल्या तुलनेत खूप जास्त पातळीच्या गुंतागुंतीची धोरणे वापरू शकतात. यामुळे गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या जोखीम-बक्षीस पर्यायांची सर्वोच्च श्रेणी मिळते. मोठ्या संख्येने उच्च दर्जाचे फंड व्यवस्थापकांनी एएमसीमधील वरिष्ठ गुंतवणूक पदे सोडून स्वतःचे एआयएफ स्थापन केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना मुख्य फंड व्यवस्थापन टीमच्या दीर्घकालीन स्थिरतेवर विश्वास मिळतो. एआयएफ फंड व्यवस्थापनांना अधिक लवचिकता देतात. एआयएफमध्ये, जेव्हा फंडाला इनफ्लो किंवा रिडेम्प्शन मिळते, तेव्हा फंड मॅनेजर कोणती विशिष्ट कंपनी खरेदी करायची किंवा विकायची हे निवडू शकतो. दुसरीकडे, पीएमएसमध्ये, फंड मॅनेजरला संपूर्ण मॉडेल पोर्टफोलिओ विकण्यास भाग पाडले जाते. एआयएफ स्ट्रक्चरमुळे अधिक कार्यक्षम गुंतवणूक निर्णय घेता येतात, विशेषतः तरल बाजार परिस्थितीत किंवा विशिष्ट स्टॉक मोठ्या प्रमाणात खाली वर होत आहेत अशा परिस्थितीत.
क्लोज-एंडेड एआयएफमुळे एफएमला स्टॉक निवडीमध्ये सर्वात जास्त लवचिकता मिळते. क्लोज-एंडेड एआयएफचा एक मोठा फायदा म्हणजे फंड मॅनेजरला फंड फ्लोची दृश्यमानता असते आणि त्यानुसार अधिक अतरल स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता असते (ज्यापासून एफएम ओपन-एंडेड स्ट्रक्चरमध्ये दूर राहिले असेल). तथापि, एक महत्त्वाचा तोटा देखील आहे - क्लोज-एंडेड एआयएफमध्ये, फंड परिपक्व होण्याच्या वेळी बाहेर पडण्यासाठी बाजारातील परिस्थिती अनुकूल असणे खूप महत्वाचे आहे. प्रतिकूल बाजार परिस्थितीमुळे, असलेल्या बाजारभावाने जबरदस्तीने बाहेर पडावे लागू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या परताव्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. पीएमएसमध्ये, तुमचे स्टॉक तुमच्या स्वतःच्या डीमॅट खात्यात ठेवले जातात आणि ते एका सामान्य ट्रस्ट स्ट्रक्चरच्या युनिट्स म्हणून ठेवले जात नाहीत. हे तुम्हाला रोख रकमेऐवजी सिक्युरिटीजच्या हस्तांतरणाद्वारे रिडीम करण्याचा पर्याय देते.
AIF पातळीवर कर आकारणी: कॅट III AIF वर AIF पातळीवर कर आकारला जात असल्याने, गुंतवणूकदारांना स्वतःहून कर भरण्याच्या गुंतागुंतीचा सामना करावा लागत नाही (जसे PMS मध्ये असते).
म्युच्युअल फंड, गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा (PMS) आणि पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) ही सर्व गुंतवणूक साधने आहेत, जिथे तुमचे इक्विटी किंवा कर्जरोखे यातील गुंतवणूक व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केली जाते. तुमच्या गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य गुंतवणूक साधन तुमच्या आवश्यकतांवर अवलंबून असल्याने यासंबंधी आपल्या गुंतवणूक मार्गदर्शकाची मदत घेणे उचित ठरेल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायतीचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सलोखामंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
7 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Tuesday, 4 March 2025
स्विंग ट्रेडिंग
#स्विंग_ट्रेडिंग
शेअरबाजारात विविध प्रकारचे व्यवहार केले जातात या सर्वच व्यवहारांना ट्रेडिंग म्हटले जाते. ट्रेडिंग कालावधीनुसार त्यास वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हा कालावधी अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीत विभागला असला तरी त्यास निश्चित सीमारेषा नाही. सदर कालावधी सेकंदाच्या काही भागापासून कित्येक वर्षांचा असू शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळत असला तरी अल्पकालीन गुंतवणुकीतूनही लाभ होत असल्याने बाजारात सर्वाधिक व्यवहार हे डे ट्रेडिंग आणि त्याखालोखाल पोझिशनल ट्रेडिंग या प्रकारात होत असतात.
डे ट्रेडिंगमध्ये सर्व व्यवहार त्याच दिवशी पूर्ण केले जातात तर पोझिशनल ट्रेडिंगमध्ये हा काळ काही दिवस ते वर्ष एवढा असू शकतो. डे ड्रेडिंग मधील अत्यल्प कालातील वारंवार केल्या जाणाऱ्या व्यवहारांना स्कॅल्पिंग म्हटले जाते त्याचप्रमाणे पोझिशनल ट्रेडिंगमध्ये कमी कालावधीत बाजारातील किंमत लाटेप्रमाणे वरखाली होण्याच्या कालावधीचा अंदाज बांधून जे व्यवहार पूर्ण केले जातात त्यास स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात. ते बाजारात नोंदलेल्या कोणत्याही मालमत्ता प्रकारात म्हणजेच शेअर्स, रोखे, इंडेक्स, कमोडिटी, करन्सी या सर्वच प्रकारात करता येणे शक्य आहे. मध्यम कालावधीत किंमतीत पडणाऱ्या फरकातून लाभ मिळवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. यामधून आपल्याला पोझिशनल ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग यातील सूक्ष्म फरक लक्षात आला असेल प्रत्येक स्विंग ट्रेडिंग हे पोझिशनल ट्रेडिंग असले तरी त्याचा कालावधी हा पोझिशनल ट्रेडिंगच्या कालावधीहून निश्चितच कमी असतो. यातील सर्व कालावधी हे व्यक्तीसापेक्ष आहेत.
■स्विंग ट्रेडिंगची वैशिष्ट्ये
●कमी कालावधी -
स्विंग ट्रेडिंगमध्ये केल्या जाणाऱ्या व्यवहारांचा कालावधी हा एक दिवस ते काही आठवडे असू शकतो. बदलणारे भाव सातत्याने पडद्यावर न पहाता भाव हालचाल (प्राईज एक्शन) याचा अंदाज घेऊन ट्रेडर्स खरेदी विक्रीचा निर्णय घेतात यातील रोखीच्या व्यवहाराव्यतिरिक्त अन्य सर्व मालमत्ता प्रकारातील व्यवहारात खरेदी अथवा विक्री व्यवहार (शॉर्ट सेलिंग) आधी करता येऊ शकतात.
●निश्चित उद्दिष्ट -
स्विंग ट्रेडिंग करण्यामागे विशिष्ठ कालावधीत भावातील फरकाचा लाभ घेणे अथवा आपली जोखीम मर्यादा (स्टॉप लॉस) संपल्यास त्यातून बाहेर पडणे अपेक्षित आहे. त्यानुसार कोणत्या भावात खरेदी किंवा विक्री करायची, कधी हा व्यवहार सोडून द्यायचा ते आधीच ठरवलेले असते त्यानुसारच व्यवहार केले जातात.
●तांत्रिक विश्लेषणाचा आधार -
स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी योग्य कंपनी निवडणे अपेक्षित असून त्यासाठी काही लोक मूलभूत विश्लेषणाचा वापर करीत असले तरी भाव हालचाली ओळखण्यासाठी तांत्रिक विश्लेषण म्हणजेच विविध आलेख, त्याच्या रचना आणि त्यातून समजणारा अर्थ याचाच प्रामुख्याने वापर केला जातो.
●बाजाराचा कल -
बाजार हा अष्टपैलू कलाकार असून तो आपले रंग सातत्याने बदलत असतो स्विंग ट्रेडिंगसाठी बाजाराचा कल ओळखता येणे हे गरजेचे आहे तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता ते यात महत्वाचे ठरते.
यात प्रामुख्याने दोन दृष्टीकोन सांगता येतील
◆सर्प दृष्टी - साप जमिनीवर सरपटत असल्याने त्याला खूप छोटी गोष्ट कितीतरी मोठी दिसते.
◆गरुड दृष्टी - गरुड उंच आकाशात विहार करीत असल्याने त्यास कितीही मोठी गोष्ट छोटी वाटू शकते.
या दोन्ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी ज्या व्यक्तींना चार्टबद्धल प्राथमिक माहिती आहे त्यांनी मनीकंट्रोल किंवा कोणत्याही संकेतस्थळावरील 1दिवस, 5 दिवस, 1महिना, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष त्यापुढे जाऊन 10 वर्ष, 15 वर्ष 25 वर्ष असे निफ्टी आलेख पाहावेत. जसजसे हे आलेख आपण एकाच फ्रेमवर पहाल तसतसा आपला त्याकडे पाहायचा दृष्टिकोन अधिकाधिक विशाल होत जाऊन गेले काही दिवसात बाजारात झालेली पडझड किरकोळ वाटू लागेल. सोबत नमुन्यादाखल 1 दिवस ते 5 वर्षाचे 6 आलेख जोडले आहेत ते जरूर पाहावे.
अनेक ट्रेडर त्यांच्या व्यवहाराकडे आपापल्या नजरेतून पाहत असल्याने त्याबद्दल त्यांनी बाजाराच्या दिशेबद्धल बांधलेल्या अंदाजात फरक पडतो.
●जोखीम व्यवस्थापन -
बहुतेक स्विंग ट्रेडर्सना आपल्या जोखीम स्विकारण्याच्या मर्यादा माहिती असल्याने फारसे नुकसान न होऊ देता आपले भांडवल सुरक्षित राहावे असे वाटत असते. त्याप्रमाणे आपण किती नुकसान सहन करू शकू याच्या कुवतीनुसार ते त्यांच्या स्टॉप लॉस ऑर्डर्स आधीच टाकून ठेवतात. ही सुविधा ब्रोकरेज फर्म ने आपल्या ग्राहकांना दिली असून त्यामध्ये विशिष्ट भाव आला की अपेक्षित खरेदी अथवा विक्रीची ऑर्डर सिस्टीममधून आपोआप टाकली जाते.
सर्वसाधारणपणे कमी कालावधीत कमी जोखीम प्रत्करून आपले भांडवल सुरक्षित रहावे आणि फायदा मिळत राहावा असे वाटणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांची इच्छापूर्ती होऊ शकेल असा मार्ग आहे. अशा संधी प्रत्येक चढत्या अथवा उतरत्या दिशेने जाणाऱ्या बाजारात असल्या तरी त्या एका पातळीत राहणाऱ्या बाजारात अधिक असतात. अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदार, मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार, देशी विदेशी वित्तसंस्था ही पद्धत वापरत असून त्यातून आकर्षक अधिक्य मिळवत आहेत.
■फायदे-
●अधिक लवचिक व्यवहार -
डे ट्रेडर्सच्या तुलनेत स्विंग ट्रेडर काही दिवस काही आठवड्याने व्यवहार पूर्ण करीत असल्याने त्यात अधिक लवचिकता असते.
●कमी ताण देणारे -
हे व्यवहार लगेच पूर्ण करायचे नसल्याने मागे पुढे केले तरी चालते त्यामुळे असे व्यवहार पूर्ण करताना येणारा मानसिक ताण कमी असतो.
●अधिक लाभदायक -
हे व्यवहार मध्यम कालावधीसाठी करण्यात येत असल्याने योग्यवेळी प्रवेश करून त्यांची पूर्तता केल्यास अधिक लाभ मिळू शकतो.
●तंत्र आणि तंत्रज्ञानस्नेही -
स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी वेगवेगळी तंत्र आणि तंत्रज्ञान वापरले जात असल्याने त्यातील ज्ञान आणि त्याचा योग्य वापर करण्याचे कौशल्य असलेल्या व्यक्ती अनुभवातून त्यात यशस्वी होऊ शकतात.
■तोटे
●बाजार प्रदर्शन -
आपले व्यवहार जेवढे दिवस होल्ड करून ठेवणार तेव्हा विविध बातम्या, अफवा किंवा अन्य शेकडो कारणांनी भाव वरखाली होऊ शकतात. त्यातून अंदाज चुकूही शकतात.
●अधिक ब्रोकरेज-
या व्यवहारांवर अधिक दलाली आणि इतर आकार द्यावे लागतात त्यामुळे अधिकाधिक व्यवहार झाले तर झालेल्या प्रत्येक खरेदी विक्री व्यवहारावर अधिक ब्रोकरेज द्यावे लागते. यामुळे खर्चात वाढ होते. अनेक दलाली पेढ्यानी गुंतवणूकदारांना यासाठी सुलभ ब्रोकरेज पर्याय दिले आहेत त्याचा अवश्य विचार करावा.
●ताणतणाव -
व्यक्तीसोबत भाव भावना आल्या त्यामुळे बाजारातील तीव्र हालचालींचा ताणतणाव स्विंग ट्रेडिंग करणाऱ्यांवर येऊ शकतो.
●निर्णय घेण्यावर मर्यादा -
हे व्यवहार अधिक कालावधीसाठी होत असल्याने बदललेल्या परिस्थितीनुरूप तात्काळ निर्णय घेण्यावर मर्यादा येतात.
●सर्व गुंतवणूकदारांसाठी अयोग्य -
स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी खास कौशल्य लागत असल्याने ते सर्वाना योग्य होईल असे नाही. नवीनच व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ते आव्हानात्मक ठरू शकतं.
■स्विंग ट्रेडिंगच्या लोकप्रिय पद्धती
●ट्रेंड फॉलोईंग - बाजार कल ओळखून त्या दिशेने केले जाणारे व्यवहार
●रिव्हर्सल ट्रेडिंग - किंमत बदलावर बाजारातील कलबदल आधीच ओळखून केलेले व्यवहार
●ब्रेकआऊट ट्रेडिंग - सपोर्ट रेझिस्टन्स मधील बदल त्वरित ओळखून केलेले व्यवहार
●मोमेंटम ट्रेडिंग - बाजार कल बदल किती काळ राहील याचा अंदाज बांधून केलेले व्यवहार
●स्विंग हाय स्विंग लो - वाढत जाणारे भाव काही काळाने स्थिर होऊन खाली येणार किंवा कमी कमी होत असलेला भाव कुठेतरी स्थिर होऊन वाढणार ते बिंदू निश्चित करून केलेले व्यवहार
या त्या पद्धती आहेत.
डे ट्रेडिंग आणि लॉंगटर्म ट्रेडिंग यामधील समतोल साधणारा मध्यममार्ग म्हणून पोसिशनल ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग याकडे पाहता येईल. यशस्वी स्विंग ट्रेडर्स होण्यासाठी - तांत्रिक विश्लेषणाचे सखोल ज्ञान, जोखीम व्यवस्थापनाचे ज्ञान, स्वयंशिस्त, बाजारज्ञान आणि स्थितप्रज्ञ वृत्ती असणे गरजेचे आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखातील मते पूर्णपणे वैयक्तिक असून ती कोणतीही शिफारस करीत नाहीत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)