Friday, 31 January 2025
आरोग्यविमा दावे नाकारण्याची कारणे आणि उपाय
#आरोग्यविमा_दावे_नाकारण्याची_कारणे_आणि_उपाय
आरोग्य आणि शिक्षण यावरील खर्चात गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. एका अंदाजानुसार सर्वसाधारण महागाई वाढ 6% प्रतिवर्षी होत असेल तर आरोग्य खर्चात 14% ने वाढ होत आहे. याची अनेक वाजवी तसेच अवाजवी कारणे आहेत. गंभीर आजार क्षणार्धात आपली जमा पुंजी संपवून आपणास कर्जबाजारीही करू शकतो त्यामुळे आज अनेकजण आरोग्य विमा घेत आहेत. असा विमा असेल तर आपली आर्थिक जोखीम कमी होईल असा विश्वास त्यांना दिलासा देतो.
जीवनाविमा जितका लोकप्रिय आहे तेवढा आरोग्यविमा लोकप्रिय नाही. त्यातून कोणताही मूर्त परतावा मिळत नाही केवळ काही आजार झाल्यास त्यावरील खर्चाची हमी अथवा भरपाई मिळते. अनेकजण मला काय होणार आहे या भ्रमात असतात? आरोग्यविमा हा सर्वसाधारण विमा प्रकारात येतो. याची मुदत सामान्यतः एक वर्ष असते अलीकडे काही विमा कंपन्या तीन वर्षासाठी आपल्या ग्राहकांशी करार करतात त्याचप्रमाणे प्रत्येक पाच वर्षांच्या टप्यात एक निश्चित प्रीमियम देऊ करतात. याशिवाय आता ग्राहक वाजवी रकमेची एक पॉलिसी घेऊन त्यावरील रकमेसाठी कमी पैशांत टॉप अप संरक्षण घेऊ शकतात.
विमा कंपनीशी पूर्वकरार असलेल्या मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येतात अथवा आपल्या मर्जीनुसार योग्य ठिकाणी उपचार घेता येतील. कंपनीने बंदी घातलेल्या ठिकाणी उपचार घेतल्यास ते मान्य केले जाणार नाहीत. या संबंधातील दावे अंशतः अथवा पूर्णतः नाकारले जाण्याचे प्रकार आता वाढत असून अनेक दावे अयोग्य कारणाने नाकारले जातात. आपण यासंबंधात काही किमान माहिती समजून घेतली तर त्याविरुद्ध दाद मागता येईल. बरेचदा लोक रक्कम कमी मिळाली म्हणून कुरकुर करतात पण ती का कमी झाली याचा शोध घेत नाहीत. रक्कम मंजूर करणे, नाकारणे, अंशतः मंजूर करणे ही कामे कंपन्या स्वतः न करता असे काम करणाऱ्या संस्थाकडून कंत्राटी पद्धतीने करून घेतात. त्यांची नेमणूक कंपनीने केलेली असल्याने दावे मंजूर करताना अनेकदा ग्राहकाला न्याय्य रक्कम मिळण्याऐवजी कंपनीस अधिक फायदा कसा होईल याची पुरेपूर काळजी घेण्यात येते. अधिकाधिक ग्राहक यासंबंधात नाराज असून काहींनी नियामक यंत्रणा आणि न्यायालये यांची मदत घेऊन आपल्या तक्रारी सोडवल्या आहेत. यासाठी दावे कोणत्या कारणाने नाकारले जातात आणि त्याविरुद्ध काय करायचे यांची प्राथमिक माहिती आपण घेऊयात.
सर्वसाधारणपणे दावे नाकारण्याची प्रमुख कारणे-
●आपल्याला आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या आजाराची माहिती दडवणे- अनेकदा ग्राहक त्यांना असलेला आजार जाहीर करत नाहीत. अनेकदा पॉलिसी मंजूर होण्यासाठी यातील मध्यस्थ असे आजार लपवण्याचा सल्ला देतात. त्यामुळे विमा कंपनीकडे यासंबंधात चुकीची नोंद होते. दावा दाखल करताना याबाबतची माहिती हॉस्पिटलला दिली असल्यास आपण चुकीची माहिती दिली या कारणाने दावा नाकारण्यात येतो.
●करारात मान्य नसलेले उपचार घेणे: आपल्या करारात कोणते उपचार अथवा क्रिया नाकारल्या जातील याचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो असे उपचार करून घेतल्यास ते नाकारले जाऊ शकतात. उदा मनोविकार, बायोमेट्रिक सर्जरी, सौंदयात भर घालणाऱ्या शस्त्रक्रिया इ
●योग्य ती कागदपत्रे सादर न करणे- दावा दाखल करताना चुकीची, अर्धवट माहिती दिल्यास अथवा माहिती प्रमाणित करणारी कागदपत्रे सादर न केल्यास दावा पूर्णपणे अथवा अंशतः नाकारण्यात येतो.
●योग्य मुदतीत दावा दाखल न करणे: सर्वसाधारणपणे रुग्णाला दवाखान्यातून सोडल्यावर ताबडतोब दावा दाखल करायला हवा तरीही कंपनीने सांगीतलेल्या विहित मर्यादेत दावा सादर करावा, साधारणपणे 30 दिवसांची मर्यादा असते या मुदतीत दावा सादर केला नाही म्हणून त्यामागील कारण समजून न घेता दावे नाकारले जातात.
याशिवाय
◆नेटवर्क हॉस्पिटलमध्ये दाखल न केल्याने कॅशलेस क्लेम नाकारला जातो.
◆पॉलिसी मुदत संपल्यावर त्याच अटींसह तिचे नूतनीकरण करता येते यासाठी 30 दिवसाचा अधिकचा अवधी दिला आहे या काळात काही आजार उद्भवल्यास त्यासंबंधीचा खर्च नाकारला जातो.
◆एखाद्या आजारावरील खर्चाची जास्तीत जास्त मर्यादा उपमर्यादा ओलांडली असल्यास त्यावरील खर्च नामंजूर केला जातो.
◆काही अतिहुषार लोक संगनमताने खोटे दावे सादर करतात. त्यासाठी कागदपत्रात बदल केला जातो ते उघडकीस आल्यास दावा नाकारला जातो.
आपले दावे अंशतः अथवा पूर्णतः चुकीने नाकारले गेल्यास अनेक मार्गाने लढावे लागते या लढाईस बळ मिळण्यासाठी,
●नकाराचे कारण - जेव्हा आपला दावा नाकारला जातो तो कोणत्या कारणाने नाकारला याचा स्पष्ट उल्लेख त्यासोबतचच्या पत्रात अथवा मेलमध्ये असतो तो समजून घ्या. यातील कोणत्याही गोष्टीबद्दल काही शंका असल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधून त्याच्याकडून समजून घ्या.
●करारातील अटी शर्ती: आपल्या करारात असलेल्या अतिशर्तीशी तुलना करून दावा नाकारण्याचे कारण वाजवी आहे का ते तपासता येईल. यात फरक असल्यास कंपनीच्या निदर्शनास आणता येईल.
●पुरावे गोळा करा: आपल्या मागणीस बळकटी देणारे पुरावे जसे की अहवाल, शिफारसी, बिले, डिसचार्ज कार्ड बरोबर असल्याची खात्री करुन घ्या
आता लढाईस सुरुवात करा,सर्वप्रथम
◆आपल्या विमा कंपनीस विहित कागदपत्रांसह आपला दावा मान्य करण्याचे मुद्दे नेमकेपणाने पटवून द्या. त्याच्याकडे तक्रार निवारण करण्याची जी पद्धत असेल तिचे पालन करा. त्याच्याकडून प्रतिसाद न आल्यास किंवा त्यांनी दिलेले उत्तर मान्य नसल्यास नियमकांकडे जा.
◆नियमकांकडे तक्रार : IRDAI हे इन्शुरन्स नियामक असून विमा कंपनीने प्रतिसाद न दिल्यास अथवा दिलेला प्रतिसाद मान्य नसल्यास आपले म्हणणे नियमकांकडे सादर करा. त्याच्या पोर्टलवर जाऊन तक्रार दाखल करता येते www.irdai.gov.in हे त्यांचे संकेतसस्थळ आहे 155255 आणि 1800 425 4732 हे त्यांचे टोल फ्री क्रमांक आहेत. तेथून समाधान न झाल्यास एक वर्षाच्या आत विमा लोकपालांकडे आपले गाऱ्हाणे सादर करा.
●तेथूनही आपले समाधान न झाल्यास आणि आपली बाजू बळकट असल्याची खात्री असल्यास न्यायालयात जावे लागेल त्याऐवजी ग्राहक मंचाकडे जाता येईल. विमा लोकपालांचा निर्णय आल्यापासून अथवा तोपर्यंतच्या कोणत्याही मधल्या टप्यावर तक्रार अर्धवट सोडून परंतु दोन वर्षांच्या आत ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करता येते अथवा स्वतंत्र न्यायालयीन लढाही देता येईल.
भविष्यात दावे नाकारले जाऊ नयेत यासाठी -
◆पॉलिसी घेताना कोणतीही माहिती लपवू नका
◆आपली पॉलिसी समजून घ्या त्याच्या मर्यादा, अंतर्भाव नसलेल्या गोष्टी, को पेमेंट, नेटवर्क हॉस्पिटल, दावा दाखल करण्याची मर्यादा इ या गोष्टी आपल्याला पूरक नसल्यास 15 दिवसात पॉलिसी रद्द करता येते.
हे लक्षात असुद्या,
◆काही योग्य कारणे असतील तर 30 दिवसांची मुदत संपली तरी आरोग्यविमा दावा दाखल करता येतो.
◆पहिल्या पॉलिसीत असलेल्या अटी शर्ती नंतरच्या पॉलिसीत एकतर्फी बदलता येत नाहीत किंवा पॉलिसी पोर्ट केली तरीही बदलत नाहीत त्यामुळे तुलना करण्यासाठी सर्वप्रथम पॉलिसी आणि चालू पॉलिसी आपल्या हाती राहुद्या.
◆करारात ज्या आजाराचा स्पष्ट उल्लेख नाही त्याचा दावा विमा कंपनी नाकारू शकत नाही.
◆खर्च वाजवी नाही या कारणाने दावा नाकारला जाऊ शकत नाही.
◆पूर्व आजार आणि त्याचा चालू आजाराशी असलेला निश्चित संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे.
◆अपघात सोडून इतर आजाराचे दावे 30 दिवसानंतर मान्य केले जातात तर पूर्व आजार संबंधित दावे करारात मान्य कालावधीनंतर मान्य केले जातात.(हा कालावधी कंपनी नुसार 1 ते 4 वर्ष आहे.)
◆एकाचवेळी नियामक, विमा लोकपाल आणि ग्राहक मंच यांच्याकडे तक्रार दाखल करता येत नाही.
◆नियोजित शस्त्रक्रिया शक्यतो नेटवर्क हॉस्पिटलमध्ये करणे अधिक सोयीचे आहे.
◆हप्ता व्यवस्थित आणि वेळेवर भरणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे.
ग्राहक सजग आणि सावध असेल तर विमा कंपनीकडून दावे नाकारण्याचे प्रमाण कमी होईल तरीही ते नाकारले गेले तर तो विमा कंपनीशी लढू शकेल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तीक आहेत.)
सक्रिय आणि निष्क्रिय उत्पन्न
#सक्रिय_आणि_निष्क्रीय_उत्पन्न
आपल्याला मिळणाऱ्या विविध उत्पन्नाच्या संदर्भात आपण सक्रिय उत्पन्न (ऍक्टिव्ह इनकम) आणि निष्क्रिय उत्पन्न (पॅसिव्ह इनकम) असे शब्द ऐकले असतील. मिळणाऱ्या उत्पन्नाचे या दोन प्रमुख प्रकारात केलेलं हे वर्गीकरण आहे. या दोन संकल्पना नेमक्या काय आहेत ते थोडक्यात समजून घेऊयात.
◆सक्रिय उत्पन्न: कार्यात थेट सहभागी होऊन किंवा विशेष वैयक्तिक प्रयत्नांद्वारे हे उत्पन्न आपल्याला मिळते, जसे की नोकरी करणे किंवा व्यवसाय चालवणे. यासाठी सातत्याने अधिक वेळ देऊन उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच ते वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते.
उदाहरणार्थ-
●नोकरीतून पगार मिळतो तो मिळवण्यासाठी वेळेत जावे लागते. नेमून दिलेले काम विशिष्ट वेळात पूर्ण करावे लागते.
●फ्रीलान्सिंग किंवा सल्लागार म्हणून काम करण्याण्यासाठी आधी कौशल्य प्राप्त करून घ्यावे लागते. गरजूंना योग्य सल्ला योग्य वेळेत आणि दरात द्यावा लागतो.
●सक्रियपणे व्यवस्थापित व्यवसायातून नफा मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, अनेक व्ययधाने सांभाळावी लागतात. व्यवसायाच्या रोखता प्रवाहावर काटेकोर नियंत्रण ठेवावे लागते.
■सक्रिय उत्पनाचे फायदे
स्थिर आणि निश्चित उत्पन्न: यातून निश्चित स्थिर उत्पन्न नियमित मिळत राहते. नोकरी असेल तर दर महिन्याच्या निश्चित तारखेला पगार मिळेल याची खात्री असते. जम बसलेला व्यवसाय असल्यास वैयक्तिक मोबदला म्हणून त्यातील काही भाग नियमित काढून घेऊन
सुरुवात करणे तुलनेने सोपे: किमान शैक्षणिक पात्रता, इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल तर नोकरी मिळवता येते, अनेक व्यवसाय करता येतात. एकदा नोकरीत अथवा व्यवसाय स्थिरस्थावर झाला की निश्चित यश मिळते.
■सक्रिय उत्पन्नाचे तोटे
मर्यादित वाढ: यातून मिळणारे उत्पन्न मिळण्याचे प्रमाण आपण देऊ शकत असलेला
वेळ आणि प्रयत्न यावर अवलंबून अवलंबून असल्याने त्यातील वाढ ही मर्यादित राहते.
◆निष्क्रीय उत्पन्न: हे उत्पन्न मिळवण्यासाठी कमी किंवा अजिबात प्रयत्न करण्याची जरुरी नसते. एकदा गुंतवणूक केली की त्याचा मोबदला म्हणून ते आपोआप चालू होतं, जसे की भाडे, लाभांश किंवा रॉयल्टी. यासाठी सुरुवातीला गुंतवणूक करावी लागते किंवा थोडीफार मेहनत करावी लागते पण एकदा का ती गुंतवणूक मार्गी लागली की त्यातून त्याच्या प्रकारानुसार नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी फारसे कष्ट घ्यायची जरुरीचे नसते. उदाहरणार्थ-
★मालमत्तेच्या भाड्याने मिळणारे उत्पन्न.
★स्टॉक गुंतवणुकीवरील लाभांश.
★पुस्तके, संगीत किंवा पेटंट्स यावर मिळणारे स्वामीत्वधन (रॉयल्टी).
★ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेलवरून मिळणारे उत्पन्न.
★बचतखाते, मुदत ठेवी किंवा बाँड्सवर मिळणारे व्याज
■निष्क्रिय उत्पनाचे फायदे
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत.
स्केलेबिलिटी आणि कंपाउंडिंगची संधी
■निष्क्रीय उत्पन्नाचे तोटे
सुरुवातीला जास्त मेहनत किंवा गुंतवणूक लागते.
अधिक जोखीम (उदा. निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता आहे पण भाडेकरू नाही, भांडवल बाजारातील तीव्र चढ-उतार)
सक्रिय आणि निष्क्रिय या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नांची आपल्याला गरज आहे.
सक्रिय उत्पन्न: आपल्या नियमित आर्थिक गरजांसाठी आणि निष्क्रीय उत्पन्नासाठीच्या आवश्यक भांडवल उभारण्यासाठी महत्त्वाचे आहे. तर,
निष्क्रीय उत्पन्न: आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि दीर्घकालीन संपत्ती मिळवण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आपण सक्रिय उत्पन्नावर कमी अवलंबून राहतो.
◆गुंतवणूकदारांनी दोन्ही उत्पन्नांचे संतुलन कसे करावे?
●सक्रिय उत्पन्नासोबत सुरुवात करा:
सुरवातीस कौशल्ये वाढवा ते इतके वाढवा की त्या जोरावर आपण नोकरी करून अथवा उत्तम व्यवसाय करून स्थिर उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकू. यातील काही उत्पन्नाची
बचत करा त्यातून गुंतवणुक करण्यासाठी निधी तयार होण्यास मदत होईल.
●निष्क्रीय उत्पन्न देणाऱ्या साधनांत गुंतवणूक करा:
सक्रिय उत्पन्नाचा काही भाग विविध मालमत्ता प्रकारात गुंतवा, जसे की समभाग, स्थावर मालमत्ता किंवा निष्क्रीय उत्पन्न देणारे व्यवसाय इ.
●विविधता आणा:
गुंतवणूक करताना त्यातील जोखीम कमी करण्यासाठी त्यात विविधता आणा आणि अनेक निष्क्रीय उत्पन्न स्रोतांमध्ये गुंतवणूक करा. ज्यातून सातत्याने काहींना काही उत्पन्न मिळत राहील ते हाती येण्याऐवजी परत तिथेच गुंतवले गेल्यास त्याचा चक्रवाढ गतीने लाभ मिळेल ते पहा.
●उत्पन्न पुन्हा गुंतवा:
काही मालमत्तांमधून निष्क्रीय उत्पन्न मिळायला थोडीथोडी सुरवात झाली की ते खर्च करण्याऐवजी त्याची पुनर्गुंतवणूक करून आपल्या संपत्तीत वाढ करा.
●लक्ष्ये ठरवा:
जसजसे उत्पन्न वाढले की गरजा वाढतात थोडा सढळ हाताने पैसा वापरला जातो, त्यामुळे खर्च वाढल्याने मिळालेले अधिकचे उत्पन्न बहुदा बाजूला रहात नाही. त्यामुळे “अधिक उत्पन्न, अधिक गरजा, अधिक खर्च” या चक्रात आपण अडकतो.
हे चक्र जाणीवपूर्वक तोडण्यासाठी आपल्या एकूणच सर्व गरजांची आवश्यक आणि अनावश्यक अशी विभागणी करणे जरुरीचे आहे. या काळात आपले मित्र नातेवाईक आपल्याला अधिक खर्च करण्यास प्रोत्साहन देतील असा खर्च न केल्यास कंजूष समजतील. तेव्हा मोठेपणा मिळवायच्या नादात आपल्या उत्पन्नाहून खर्च अधिक वाढायची शक्यता असते. त्यामुळेच कदाचित जास्त व्याजदर असलेले कर्ज घेण्याची सवय लागू शकते. सध्या बाजारात कर्ज सहज उपलब्ध असून ते कुणालाही कधीही सहज उपलब्ध होऊ शकते. कर्ज रकमेच्या तुलनेत त्यासाठी मगितलेला हप्ता नगण्य वाटू शकतो, तो एक सापळा आहे समजा. सुरुवातीच्या काळात केवळ आवश्यक गरजांना प्राधान्य देऊन अधिकाधिक गुंतवणूक करा. या गुंतवणुकीचे नियोजन करून अश्या योजना तयार करा की भविष्यात केवळ निष्क्रीय उत्पन्नातूनच तुमच्या अत्यावश्यक गरजा भागतील आणि सक्रिय उत्पन्नाचा काही भाग उत्पन्न वाढीसाठी गुंतवणूक करण्यात तर काही भाग बदलत्या जीवनशैलीसाठी इच्छा आकांक्षासाठी वापरला जाईल. अशाप्रकारे सक्रिय आणि निष्क्रीय उत्पन्नाचे योग्य संतुलन साधता आल्यास जीवनात आर्थिक स्थिरता येते, आकस्मित काही खर्च उद्भवल्यास आधीच केलेल्या गुंतवणुकीतून गरज भागत असल्याने त्यासाठी फारशी ओढाताण करावी लागणार नाही. त्यामुळे तुम्ही वर्तमानकाळ आनंदात घालवू शकता आणि आपला भविष्यकाळ अधिक सुरक्षित करू शकता.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम वर 24 जानेवारी 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 17 January 2025
मालमत्ता नामांकनाचा नवा घोळ
#मालमत्ता_नामांकनाचा_नवा_घोळ
भांडवल बाजारात व्यवहार करणाऱ्याच्या व्यक्तींनी दावा न केलेल्या मालमत्तांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याची अनेक कारणे आहेत. पूर्वी या मालमत्ता कागदी स्वरूपात होत्या, त्यांचे नामांकन करायची सोय नव्हती. या मालमत्तावर दावा करण्याची प्रक्रिया क्लिष्ट, कंटाळवाणी आणि खर्चिक असल्याने अनेक किरकोळ बाजारमूल्य असलेले दावे गुंतवणूकदारांचे वारस करत नसत. काही बाबतीत आपल्या वाडवडीलानी गुंतवणूक केली आहे याची त्यांच्या वारसांना माहिती नाही, काही बाबतीत वारसांना माहिती आहे पण त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने अशी प्रकरणे पडून रहात, त्यामुळे अनेकजण कंटाळून त्याचा नाद सोडून देत असत. काही दावे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने न्यायप्रकियेतील दिरंगाईमुळे वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण व्हावे या हेतूने सेबीने मालमत्ता हस्तांतरण सुलभरीतीने व्हावे या हेतूने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. गेले वर्षभर भांडवल बाजारातील विविध मध्यस्थांशी या संबंधात चर्चा करून नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली असून नवे नियम 1 मार्च 2025 पासून लागू होतील.
नव्या नियमावलीची वैशिष्ट्ये-
●सध्या इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तींना नामनिर्देशीत करता येते त्यांची टक्केवारी ठरवता येते. अलीकडे बँकेतील रकमेसाठी एकाच वेळी (Simultaneous) तसेच एकापाठोपाठ एक (Successive) दोन पर्यायासह चार व्यक्तींचे नामनिर्देशन करता येते. आता तसाच पर्याय म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यास उपलब्ध झाला असून यात जास्तीत जास्त दहा व्यक्तींना नामनिर्देशीत करून त्यांची मालमत्तेतील टक्केवारीही निश्चित करता येईल. जेथे टक्केवारी जाहीर केली नसेल तेथे ती सारख्याच टक्केवारीत आहे असे समजण्यात येईल.
●एकल होल्डिंगसाठी आता नामांकन अनिवार्य असेल
●संयुक्त होल्डिंगसाठी ऐच्छिक: संयुक्त होल्डिंगमध्ये नामनिर्देशन करणे गरजेचे नाही. एका धारकाचा मृत्यू झाल्यास ती आधी दिलेल्या नामांकनावर परिणाम न करता दुसऱ्या धारकाच्या नावावर वर्ग केली जाईल.
वाचलेल्या संयुक्त धारकांना आधीचे नामनिर्देशन बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे.
●गंभीर आजारग्रस्त गुंतवणूकदारांसाठी, वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करून फोलिओ ऑपरेट करण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीला अधिकार मिळू शकतो.
●नामांकनाची पडताळणी करण्यासाठी एकच प्रमाणित पद्धती सुचवली आहे.
●गुंतवणूकदार अथवा नामनिर्देशीत व्यक्तीपैकी एखाद्याचा मृत्यू झाल्यास उर्वरीत नामनिर्देशीत व्यक्तींना त्यांचा वाटा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
●नामांकित केलेली व्यक्ती कायदेशीर वारस असेलच असे नाही त्यामुळे त्याच्या ताब्यात येणारी मालमत्तेची सदरहू व्यक्ती विश्वस्त असेल.
●नामांकन नोंद करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धती उपलब्ध केल्या आहेत-
*ऑनलाइन पद्धतीत नामांकन आधार सत्यापित करून, डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अथवा द्वि स्तरीय ओळख पटवून करता येईल. तर
*ऑफलाईन पद्धतीत प्रत्यक्ष फॉर्म भरून सही करून तो दोन साक्षीदारांकडून सत्यापित करता येईल.
●नामांकित व्यक्तीच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करण्यापूर्वी त्यांच्याकडून शपथपत्र आणि हमीपत्र भरून घेतले जाते यापुढे ते द्यावे लागणार नाही. केवळ गुंतवणूकदाराच्या मृत्यूचा दाखला आणि नामांकित व्यक्तीची ओळख पटवणारा पुरावा (KYC) आवश्यक असेल.
●मालमत्ता हस्तांतर झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे जी भौतिक स्वरूपात अथवा डिजिटल स्वरूपात असतील ती पुढील आठ वर्षे जतन करावी लागतील. नामांकन नोंदी त्यातील बदल अद्ययावत ठेवण्यात येतील.
●विद्यमान धारकांना ऑनलाइन यंत्रणा वापरून नामांकन रद्द करता किंवा सुधारता येईल यासाठी ओटीपी पडताळणी किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंगचा पर्याय उपलब्ध असेल.
●अस्वस्थ गुंतवणूकदारांसाठी, वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करून फोलिओ ऑपरेट करण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीला अधिकार देऊ शकते.
एकंदरीत पूर्वीपेक्षा ही पद्धती अधिक गुंतवणूकस्नेही आहे असे सकृतदर्शनी वाटते. यामुळे सकृतदर्शनी गुंतवणूकदारांना त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल. वरील विवेचनात नामांकन आणि वारसा असे दोन शब्दप्रयोग आले आहेत. आपल्याला हे दोन्ही शब्द सारखेच वाटत असले तरी त्यात भरपूर फरक आहे. कायद्याच्या दृष्टीने नामांकन केलेली व्यक्ती ही त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांची विश्वस्त असते म्हणजे सन 2020 पर्यंत तरी अशी समजूत होती. मालमत्ता धारकाच्या मृत्यूनंतर नामांकन केलेल्या व्यक्तीकडे मालमत्ता सहज हसत्तांतरीत होते. मृत व्यक्तीने मृत्युपत्र केले असल्यास त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे वाटप करणे हे त्याच्याकडून अपेक्षित आहे मृत्युपत्र केले नसल्यास व्यक्तिगत कायद्यानुसार त्याच्या मालमत्तेचे वाटप करावे लागते. थोडक्यात नामांकनधारक योग्य वारसदार शोधून मालमत्ता यथायोग्य त्याच्याकडे वर्ग करेल असे यातून अपेक्षित आहे. नामांकित व्यक्ती ही मृत व्यक्तीची एकमेव वारसदार, काही प्रमाणात वारसदार असू शकते. सध्या जर नामांकन केले नसेल वारसदारांना मालमत्ता कमी रकमेची असल्यास प्रतिज्ञापत्र आणि हमीपत्र देऊन, अधिक वारस असल्यास इतर वारसांचे ना हरकत पत्र सादर करून मागणी अर्ज द्यावा लागतो. रक्कम खूप मोठी असेल तर न्यायालयातून वारसा प्रमाणपत्र मिळवावे लागते ही एक गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया आहे यास वेळ लागतो आणि काही रक्कम (स्टॅम्प ड्युटी, वकिलांची फी इ) खर्च करावी लागते.
वारसांच्या नावाने नामांकन असेल तर मालमत्तेचे हसत्तांतरण करण्याची प्रक्रिया सुलभ होते. गुंतवणूकदारांच्या वारसांना त्यांची हक्काची रक्कम मिळवण्यासाठी फारश्या अडचणी येत नाहीत. नामांकन नसेल तर वारसदारांना त्यांची ओळख पटवून वारसाहक्क सिद्ध करावा लागतो ही एक मोठी कायदेशीर प्रक्रिया आहे.
दोन्ही गोष्टी सोईच्या किंवा गैरसोयीच्या वाटत असतील अलीकडील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार वेगवेगळ्या मालमत्ताचे नामांकित व्यक्ती किंवा वारसदार लाभार्थी असू शकतात. शेअर्स म्युच्युअल फंड याच्या बाबतीत सहधारक असल्यास ती व्यक्ती आणि नसल्यास नामांकित व्यक्ती हीच कायदेशीर वारस समजण्यात येते.
नामांकन म्हणून तुम्ही जोडीदार, जिथे जोडीदार नसेल तिथे नातेवाईक तेही नसल्यास विश्वासू मित्र यास ठेऊ शकता.अज्ञान व्यक्तीच्या नावे नामांकन केल्यास ती सज्ञान होइपर्यंत त्याचा पालक कोण ते जाहीर करावे लागते. जोपर्यंत काही वाद उपस्थित होत नाही तोपर्यंत प्रक्रियेत सहसा काही अडथळा येत नाही. वाद उपस्थित झाल्यास वारसा प्रमाणपत्र सादर केल्यावरच प्रकरण मार्गी लागेल. हे टाळण्यासाठी जिथे जिथे शक्य तिथे जोडीदारास सहधारक, शक्य नसेल तेथे नॉमिनी म्हणून आणि मृत्युपत्राद्वारे एकमेव वारस नेमल्यास कायदेशीर वादविवाद निर्माण होण्याची शक्यता कमी वाटते.
प्रत्येक मालमत्ता वेगवेगळ्या असून त्यांचे स्वतःचे असे नियम असल्याने त्याचे धारक एक की अनेक, नॉमिनी किती, लाभार्थी कोण यात असलेले साम्य अथवा वेगळेपणा सर्वांनीच माहिती करून घ्यावा. याशिवाय सध्याचा डिजिटल युगात काही अभिनव मालमत्ता निर्माण होत आहेत जसे- संकेतस्थळाचे नाव, इलेक्ट्रॉनिक वॉलेट, इलेक्ट्रॉनिक चलन, आभासी चलन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इ मेल, ब्लॉग अशा विविध मालमत्ता निर्माण झाल्या असून त्यातील अनेकांतून अर्थप्राप्तीही होऊ शकते. यातून काही रक्कम बँक खात्यात आली असल्यास त्यास बँकेचे नियम लागू होतील. यासंदर्भात सध्या निश्चित असे कायदे नसले तरी या वेगळ्या प्रकारच्या मालमत्तांचे लाभार्थी कोण असतील याबाबत सध्या त्या प्लँटफॉर्मच्या स्वतःच्या काय तरतुदी आहेत त्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
सध्या तीन व्यक्ती नामांकित करता येत असताना जास्तीत जास्त 10 व्यक्तींमध्ये नामांकन करण्यामागे नेमके आणि खास तथ्य काय असावे ते समजण्यास मार्ग नाही. खरं तर सर्वच वारस लाभार्थीच्या दृष्टीने सेबी, आरबीआय, आयआरडीए, पीएफआरडीए या सर्वच नियामकानी अधिक घोळ न घालता सर्वच मालमत्तांसाठी एकसमान पद्धतीने सुलभ नामांकन नियमावली ठरवायला हवी.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
17 जानेवारी 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Friday, 10 January 2025
दारवास बॉक्स थिअरीची ओळख
#दारवास_बॉक्स_थिअरीची_ओळख
आर्थिक विषयाच्या संदर्भात निकोलस दारवास यांचे नाव आपण कदाचित ऐकलं असण्याची शक्यता आहे त्यांचा जन्म हंगेरीत झाला. 1950 च्या दशकात ते बॉलरूम डान्सर म्हणून जगभर फिरत होते. या काळात एका क्लबने नृत्य सादर करण्याचे मानधन पैशांच्या स्वरूपात न देता कंपनी शेअर्सच्या स्वरूपात देऊ असे सांगून त्याचा बयाणा (Advance) म्हणून काही शेअर्स त्यांना देऊ केले. काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की अतिशय कमी कालावधीत त्याच्या बाजारमूल्यात वाढ झाली आहे. आपण इतके कष्ट करून पैसे मिळवतो त्यापेक्षा गुंतवणूक केल्यास इतक्या कमी कालावधीत पैसे अधिक वाढू शकतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं. पुढे काही कारणाने क्लबशी करार न झाल्याने दारवास यांनी ते शेअर्स विकत घेतले. त्यानंतर आपल्या मिळकतीतील बराचसा भाग ते शेअर्समध्ये गुंतवीत असत. त्यासाठी त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल आणि बॅरोन यांचे सदस्यत्व घेतले होते. यशस्वी लोकांचे अनुभव, टिप्स यांचा आधार घेऊन गुंतवणूक करून पाच ते सात वर्षांच्या कालावधीत त्यांनी आपले सर्वच भांडवल गमावले. त्यानंतरच्या कालावधीत आपण कोणत्या चुका केल्या त्याचा शोध घेऊन त्यांनी रोज आठआठ तास संशोधन केले. अनेक पुस्तके वाचली रेटिंग्ज अहवाल वाचले. त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की उलढालीसह सतत बाजारभाव वाढणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अतिशय फायदेशीर आहे तसेच आपला तोटा सहन करण्याच्या मर्यादेत राखल्यास अंतिमतः फायदाच होतो. केवळ शेअरबाजारात नोंदणी झालेल्या स्टॉक मध्ये ते गुंतवणूक करत असत. दारवास बॉक्स थिअरी (Darvas Box Theory) ही त्यांनी स्वतः विकसित केलेली ट्रेडिंग पद्धत आहे, जी तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि किंमत चळवळीचा (Price Action) वापर करून भावपातळीत मजबूत वाढ असलेल्या शेअर्सची ओळख पटवते आणि त्यामध्ये व्यापार करण्यासाठी मदत करते. यातील नियमांचा काटेकोर वापर करून अत्यंत कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात सौदे करून त्यांनी 10000 डॉलर्सचे 20 लाख डॉलर्समध्ये रूपांतर केवळ अठरा महिन्यात केले. या कालावधीत बाजारात तेजी होती तरीही मानक निर्देशांकाच्या तुलनेत त्यांना मिळालेले यश भव्यदिव्य होते. त्यांच्या “How I Made $2,000,000 in the Stock Market” या पुस्तकात याचा सर्व तपशील दिला आहे.
■दारवास बॉक्स थिअरीची मुख्य तत्त्वे:
◆जास्त वाढ असलेल्या शेअर्सची ओळख:
दारवास चांगल्या मूलभूत तत्त्वांवर आणि सकारात्मक बाजारभावनेवर भर देणाऱ्या स्टॉक्सवर लक्ष केंद्रित करत. स्टॉक ओळखण्यासाठी त्यांनी बातम्या आणि किंमत-उलाढाल आणि कंपनीच्या मूलभूत विश्लेषणाचा वापर केला.
◆चौकोन (Box) तयार करणे: "बॉक्स" म्हणजे स्टॉकच्या त्या किंमत श्रेणीभोवती आखलेले चौकट, जिथे तो एका चढाईनंतर वरील भावपातळत स्थिर राहतो. वरची सीमा म्हणजे स्टॉकची आजवरची सर्वोच्च किंमत आणि खालची सीमा म्हणजे अलीकडील किमान किंमत.
◆ब्रेकआउट स्ट्रॅटेजी: जेव्हा शेअर्सची किंमत चौकोनाची वरची सीमेला ओलांडते आणि उच्च उलाढालीसह वर जाते, तेव्हा खरेदीचा इशारा मिळतो. त्याला ब्रेकआउट म्हणजेच नवीन वरील पातळीकडे जाण्याची सुरुवात असे समजण्यात येते.
◆स्टॉप-लॉस शिस्त: जर शेअर्सची किंमत चौकोनाच्या खालच्या सीमेखाली गेली, तर नुकसान कमी करण्यासाठी पोजिशन सोडली जाते म्हणजेच विक्री केली जाते.
◆गतीवर आधारित व्यापार (Momentum Trading): कमजोर स्टॉक्सऐवजी चांगली गती असलेल्या स्टॉक्सवर लक्ष केंद्रित केले जाते.
◆भावनिक निर्णयांचा अभाव: पद्धतीत या व्यापार निर्णय घेण्यासाठी वस्तुनिष्ठ निकषांचा वापर केला जातो, जेणेकरून भावनिक चुका टाळता येतात.
■दारवास बॉक्स थिअरीचे उपयोग:
◆गती व्यापार: वेगाने वाढणाऱ्या शेअर्समधील वाढीचा फायदा घेण्यासाठी उपयुक्त.
◆निश्चित निर्णय दृष्टिकोन: कोणत्या भावाने शेअर्स खरेदी करायचे आणि काय भाव आल्यावर विक्री करायची याचे स्पष्ट मार्गदर्शन मिळते.
◆जोखमीचे व्यवस्थापन: स्टॉप-लॉस वापरून नुकसान कमी करण्यास मदत करते.
◆सोपेपणा: सोपी आणि सहज समजणारी पद्धत.
◆उपयुक्तता: केवळ शेअर्सच नव्हे तर कमॉडिटी आणि फॉरेक्स यांसारख्या विविध बाजारांमध्ये वापरली जाऊ शकते.
■दारवास बॉक्स थिअरीच्या मर्यादा:
◆बाजार स्थिती: ही पद्धत बाजार तेजीत चांगली काम करते; परंतु एकाच पातळीत रेंगाळणाऱ्या बाजारात किंवा मंदीची स्थिती दाखवीत असेल तर चुकीचे संकेत मिळू शकतात.
◆उशीराचे सिग्नल: चौकोन तयार करण्यासाठी मागील माहितीचा आधार असल्याने बाजारात प्रवेश आणि निर्गमन थोड्या उशिरा होऊ शकते. बाजार सातत्याने बदलत असल्याने मिळालेला संकेत वापरतो त्या क्षणी स्थितीत कदाचित बदल घडला असल्याची शक्यता असते.
◆उलढालीवर अवलंबित्व: ही पद्धत उलढालीतील वाढीवर अवलंबून आहे, जे कमी उलाढाल वाढ असलेल्या बाजारात अचूक असू शकत नाही.
◆चौकोन तयार करण्यात असलेला विषयानुसारपणा: वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे त्यांच्या आकालनक्षमतेनुसार चौकोनांच्या सीमांची मर्यादा वेगवेगळी होऊ शकते.
◆मर्यादित मूलभूत विश्लेषण: या पद्धतीत किंमत आणि उलाढाल यावर विशेष भर दिला जातो, परंतु सखोल मूलभूत विश्लेषणावर तेवढा भर दिला जात नाही.
◆शॉर्ट-टर्म ट्रेडिंगसाठी ही पद्धत योग्य नाही:
ही पद्धत मध्यम ते दीर्घकालीन ट्रेडिंगसाठी तयार केलेली आहे आणि इंट्राडे ट्रेडिंगसाठी ती तेवढी कार्यक्षम नाही.
■दारवास बॉक्स थिअरीची तत्वे आणि मर्यादा समजून घेतल्यास, ट्रेडर्स त्यांच्या व्यापार धोरणामध्ये ही पद्धत कशी वापरायची हे ठरवू शकतात. जेव्हा आजच्या इतके प्रगत तांत्रिक चार्टिंग अशक्य असताना दारवासने आपली रणनीती लागू केली. दारवास वापरलेली समान तत्त्वे आता तांत्रिक चार्टिंगसह लागू केली जाऊ शकतात. त्यामुळे आजही अनेक ट्रेडर्स झटपट नफा मिळवण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात तथापि आर्थिक तज्ञांच्या मते ही रणनीती मंदीच्या कालखंडात वापरल्यास मोठे नुकसान होऊ शकते असे असले तरी वेगवेगळे गुंतवणूकदार त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या कालावधीच्या चार्टवर याचा वापर करतात. त्यामुळे निर्णयक्षमतेवर पडणार भावनिक प्रभाव कमी होतो. उच्च वेगाने वाढणारे शेअर्सचा शोध या पद्धतीने घेता येतो. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये ही पद्धत समर्थपणे वापरता येते असे त्यातील अनेक जाणकारांचे मत आहे. या रणनीतीस सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक (RSI), बदलती सरासरी (MA), उलाढाल आणि निर्देशांकाची जोड देऊन अधिक प्रभावीपणे वापरता येणे शक्य आहे.
■दारवास बॉक्स सिद्धांत आपल्याला काही गोष्टींची सातत्याने जाणीव करून देत राहील. त्या अशा-
●शेअरबाजारात रोज याल तर नुकसान करून घ्याल कमीत कमी वेळा याल भरपूर नफा मिळवाल.
●संधी असेल तेव्हा व्यवहार केल्यानेच परतावा मिळेल. जेव्हा व्यवहार यशस्वी होईल तेव्हा गुंतवणूक वाढवा.
●आपला तोटा मर्यादित ठेवण्यासाठी स्टॉप लॉसचा वापर करा.
●मिळालेला नफा पुन्हा गुंतवणूक करायला वापरावा. पुढील नफा नियोजनाशी त्याचा वापर करता येईल.
●निष्कर्ष काढून मर्यादित गुंतवणूक करून यश मिळाल्यास त्यातील गुंतवणूक हळूहळू वाढवली पाहिजे. (Divide and Rule)
●चूक करणे मान्य आहे परंतु तीच चूक पुन्हा करणे ही मोठी चूक आहे त्यामुळे चुकूनही तीच चूक पुन्हा करू नये.
●बाजारातील प्रत्येक बातमीचा मागोवा घेणे विश्लेषण करणे आणि त्यावर आधारित व्यापार करणे अशक्य आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. हा लेख कोणतीही गुंतवणूक शिफारस करीत नाही)
10 जानेवारी 2015 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.
Friday, 3 January 2025
डाउ थिअरीची ओळख
डाउ थिअरीची ओळख
चार्ल्स एच डाउ यानी “डी जोन्स आर्थिक वृत्तसेवा” (WSJ) भागीदारीत सुरू केली. ते डाउ जोन्स अँड कंपनीचे सह-संस्थापक आणि डाउ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज (DJIA) चे निर्माता होते. कंपनीतील 27 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी लिहिलेल्या लेखांना नंतर “डाउ थिअरी” असे संबोधण्यात आले. ही एक वित्तीय संकल्पना आहे, जी जगासमोर आणण्याचे श्रेय “विल्यम्स पी हॅमिल्टन” याना जाते. त्यांनी उदाहरणांसह लेख संकलित केले. ते शेअर बाजाराच्या प्रवाहाचे विश्लेषण करण्यासाठी आणि बाजाराच्या प्रवाहाचा अंदाज घेण्यासाठी आजही उपयोगी आहेत. डाउ यांच्या स्मरणार्थ त्या संकल्पनेस डाउ थिअरी असे संबोधण्यात येते. जगभरात वापरली जाणारी सर्वांत जुनी आणि सर्वाधिक प्रचलित पद्धतींपैकी एक आहे. लोकप्रिय अशी कॅडलस्टिक पद्धत येण्यापूर्वीची ही पद्धती आहे. डाउ थिअरीचा मुख्य गाभा असा आहे की शेअर बाजार विशिष्ट प्रवाहाच्या (trends) अधीन असतो आणि या प्रवाहाची दिशा ओळखून गुंतवणूक निर्णय घेतले जाऊ शकतात. ही थिअरी काही महत्त्वाच्या गृहितकांवर आधारित आहे:
◆डाउ थिअरीची मुख्य गृहीतके:
1. बाजार प्रवाहाच्या मध्ये चालतो (Market Moves in Trends): डाउ थिअरीनुसार बाजार तीन प्रकारच्या प्रवाहांमध्ये चालतो.
●प्राथमिक प्रवाह (Primary Trend): दीर्घकालीन प्रवाह (काही महिन्यांपासून अनेक वर्षांपर्यंत) जो वरच्या दिशेने (बुल मार्केट) किंवा खालच्या दिशेने (बेअर मार्केट) असते. त्याला मेगा ट्रेंड असेही म्हणतात
●माध्यमिक प्रवाह (Secondary Trend): माध्यमिक प्रवाह (आठवड्यांपासून महिन्यांपर्यंत), जो सामान्यतः प्राथमिक प्रवाहाच्या विरुद्ध असते. तो मुख्य प्रवाहातील दुरुस्ती (करेक्शन) समजला जाते.
●त्रितीय प्रवाह (Tertiary Trend): अल्पकालीन चढ-उतार (30 दिवसाहून कमी कालावधीचे) जो प्राथमिक प्रवृत्तीवर फारसा परिणाम करत नाही. त्याला बाजारात गोंधळ (Noice) म्हणून संबोधले जाते.
2. प्राथमिक प्रवाहाचे तीन टप्पे (Three Phases of a Primary Trend):
●संचयन टप्पा (Accumulation Phase): जेव्हा जाणकार गुंतवणूकदार संभाव्य बदलांचा अंदाज घेत खरेदी किंवा विक्री करतात. या टप्प्यात व्यापार कमी प्रमाणात होतो आणि संशयास्पद वर्तन दिसते.
●सार्वजनिक सहभाग टप्पा (Public Participation Phase): जेव्हा प्रवाह स्पष्ट होतो, तेव्हा अधिकाधिक गुंतवणूकदार प्रवाहात सामील होतात. या टप्प्यात बाजार स्पष्टपणे वर किंवा खाली जातो.
●वितरण टप्पा (Distribution Phase): जेव्हा पुढे जाणाऱ्या प्रवाहाची गती कमी होते आणि जाणकार गुंतवणूकदार विक्री सुरू करतात.मात्र सामान्य गुंतवणूकदार अजूनही खरेदी करत असतो, त्याला उलट्या प्रवाहाची जाणीव नसते. बाजार कमी कमी होत असताना गुंतवणूकदारांचे वर्तन त्याहून वेगळे दिसून येते.
3. औद्योगिक आणि वाहतूक निर्देशांकांची पुष्टी (Averages Must Confirm Each Other): डाउ यांच्या मते, औद्योगिक आणि वाहतूक निर्देशांकाने (उदा. DJIA आणि Dow Jones Transportation Average) एकमेकांची पुष्टी करायला हवी. जर औद्योगिक शेअर्स आणि वाहतूक शेअर्स दोन्ही वाढत असतील तर ही खरीखुरी वाढ आहे, असे मानले जाते. अन्यथा, ती कमकुवत असू शकते.
4. व्यापाराची संख्या प्रवृत्तीला पुष्टी करते (Volume Confirms the Trend): डाउ यांच्या मते, व्यापाराची संख्या (volume) प्रवाहाला पुष्टी करायला हवी. वाढत्या प्रवाहामध्ये (uptrend) किंमत वाढताना व्यापार वाढायला हवा. कमी होणाऱ्या प्रवाहामध्ये (downtrend) किंमत घसरताना व्यापार वाढायला हवा.
5. प्रवृत्ती स्पष्ट उलट्या संकेतांपर्यंत टिकून राहतात (Trends Persist Until Clear Reversal Signals): डाउ थिअरीचे सर्वात प्रसिद्ध तत्त्व म्हणजे प्रवृत्ती उलट्या संकेतांपर्यंत कायम राहते. एकदा प्रवाह स्थिर झाली की, तो उलटण्याचे स्पष्ट संकेत मिळेपर्यंत त्याचे अनुसरण करणे अधिक फायदेशीर असते.
6.किंमत सुधारणा आणि प्रवास: किंमती खूप आधी दुरुस्त होऊ लागतात आणि इतर मूलभूत घटकांपेक्षा आधी मोठा प्रवास सुरु करतात. प्राथमिक मेगाट्रेंडच्या दिशेने उच्चांकी किंमत (Higher high) हा पुढील चढाईचा संकेत आहे.
7. मूलभूत मर्यादा आणि चार्टवरील प्रतिबिंब: बाजारातील मूलभूत मर्यादा चार्टवर प्रतिबिंबित होऊ शकतात, बाजार भविष्यातील उत्पन्न आणि चक्राकडे लक्ष देतो.
◆डाउ थिअरीचा शेअर बाजारातील वापर-
1. बाजार प्रवाह ओळखणे (Identifying Market Trends): गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स बाजाराच्या दिशा (बुलिश किंवा बेअरिश) ओळखण्यासाठी डाउ थिअरीचा वापर करतात. प्राथमिक प्रवाह ओळखून, ते खरेदी (buy) किंवा विक्री (sell) याबाबत निर्णय घेतात.
2. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ निवडणे (Timing Entries and Exits): डाउ थिअरी गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना बाजारात प्रवेश (entry) किंवा बाजारातून बाहेर पडण्याचा (exit) निर्णय घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, बुल मार्केटच्या संचयन टप्प्यात खरेदी करणे किंवा बेअर मार्केटच्या वितरण टप्प्यात विक्री करणे. बाजाराची अल्पकालीन दिशा ओळखून व्यापार करणे इ
3. प्रवृत्तीची पुष्टी (Confirming Market Trends): गुंतवणूकदार विविध निर्देशांकांची तुलना करून प्रवाहाची पुष्टी करतात. उदा. DJIA वाढत असेल, पण Dow Jones Transportation Average वाढत नसेल, तर त्यातून तेजीचा प्रवाह मजबूत नसल्याचे सूचित होऊ शकते.
4. जोखीम व्यवस्थापन (Risk Management): प्रवाह विश्लेषणाच्या आधारे डाउ थिअरी गुंतवणूकदारांना जोखीम व्यवस्थापित करण्यात मदत करते. बाजार घसरणीच्या प्रवृत्तीत असेल तर शेअर गुंतवणूक कमी करून ते संरक्षणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात.
5. व्यापार संख्येचे विश्लेषण (Volume Analysis): किंमतीतील हालचालींसह व्यापाराचे विश्लेषण करून, गुंतवणूकदार प्रवाहाची ताकद ओळखू शकतात.
◆डाऊ थिअरीच्या मर्यादा (Limitations of Dow Theory)
1. मागील डेटा आधारित संकेत (Lagging Indicator): डाउ थिअरी प्रवाह ओळखते तेव्हा तो आधीच सुरू झालेला असततो, त्यामुळे बराचसा फायदा कदाचित गमावला जाऊ शकतो.
2. तंतोतंत खरेदी-विक्री संकेत नाहीत (No Specific Buy/Sell Signals): डाउ थिअरीद्वारे विशिष्ट खरेदी किंवा विक्रीच्या वेळेचा अंदाज दिला जात नाही.
3. आधुनिक बाजाराचे गुंतागुंतीचे स्वरूप (Modern Market Complexity): सध्याच्या जागतिक घडामोडी, धोरणे, गुंतवणूकदारांच्या बदलत्या अपेक्षा इत्यादी कारणांमुळे डाउ थिअरी पूर्णतः लागू होऊ शकत नाही.
4. वैयक्तिक व्याख्या (Subjectivity): ट्रेंड्स आणि टप्पे ओळखणे काहीवेळा व्यक्तिनिष्ठ ठरते. व्यक्तीच्या मनात असलेले पूर्वग्रह त्याच्या निर्णय क्षमतेवर प्रभाव पडत असतात.
◆निष्कर्ष-
डाउ थिअरी ही तांत्रिक विश्लेषणातील एक जुनी मूलभूत संकल्पना आहे. बाजार प्रवाह, व्यापार आणि निर्देशांक पुष्टी यावर आधारित विश्लेषणाद्वारे गुंतवणूकदारांना बाजाराच्या संभाव्य दिशेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती त्यातून निश्चित मिळू शकते. मात्र सध्याच्या काळात ही थिअरी इतर पूरक साधनांबरोबर वापरणे अधिक फायदेशीर ठरते.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सलोखा मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 3 जानेवारी 2025 रोजी पूर्वप्रकाशीत
Subscribe to:
Posts (Atom)