Friday, 14 July 2023

शेअरबाजारातील व्यवहार आणि आयकर

#शेअरबाजारातील_व्यवहार_आणि_आयकर 'आपल्या मतानुसार जगात जगता येणं म्हणजे यश' अशी यशाची नवी व्याख्या आहे. यासाठी गुंतवणूक केली जाते, त्यातील जोखीम स्वीकारली जाते,काही धाडसी व्यवहारही केले जातात. बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार शेअर्स, कर्जरोखे, म्युच्युअल फंडाचे युनिट्स, रिटस, इनवीट, कमोडिटी, करन्सी, रोखे यांची खरेदीविक्री करतात मध्यम आणि दीर्घकाळात अपेक्षित असा अधिक परतावा मिळवणे हा त्यांचा हेतू असतो. यातील काही लोक स्वतःचा गुंतवणूक संच तयार करतात. तर काही लोक अल्पकाळात कमी भांडवलावर अधिक परतावा मिळवण्यासाठी झटपट व्यवहार करत असतात हे व्यवहार काही सेकंद ते त्या कामकाज त्यादिवसातच पूर्ण करावे लागतात, यास डे ट्रेंडिंग अशी संज्ञा आहे. असे व्यवहार जरी कायदेशीर असले तरी ते सट्टा या प्रकारात मोडतात. बाजारात होणाऱ्या डिलिव्हरी, डे ट्रेंडिंग, डिरिव्हेटिव या सर्वच व्यवहाराना ट्रेंडिंग असेच म्हणत असले तरी आयकर कायद्याच्या दृष्टीने ते वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवहार समजले जाऊन त्यावर असलेला कराचा दर वेगवेगळा आहे. शेअर्सचा ताबा घेऊन जे व्यवहार केले जातात त्यांना सर्वसाधारणपणे गुंतवणूक व्यवहार समजले जातात ते शेअर्स किती काळ धारण केले त्यानुसार अल्प किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा तोटा मोजून त्यावर कर आकारणी होते. केवळ व्यापार म्हणूनही असे व्यवहार करता येऊ शकतात. त्यामुळे हे व्यवहार गुंतवणूक म्हणून करायचे की व्यापार म्हणून? ते पूर्णपणे करदात्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. यासंबंधी करदाते आणि आयकर खाते यात सातत्याने वाद होत असल्याने न्यायालयाने आता असे व्यवहार गुंतवणूक म्हणून करायचे की व्यवसाय म्हणून? ते करदात्यांवर सोपवले असून एकदा हे व्यवहार, व्यवसाय म्हणून व्यापारी व्यवहार करायचे ठरवले तर नंतर त्यात बदल करता येत नाही. थोडक्यात शेअरबाजारात जे व्यवहार केले जातील ते या दोन मुख्य प्रकारात असतील. ★गुंतवणूकदार म्हणून केलेले डे ट्रेंडिंग आणि डिलिव्हरीचे व्यवहार यातील शेअर्सच्या डे ट्रेडिंगच्या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न हे सट्टा या प्रकारातील व्यापारी उत्पन्न म्हणून समजले जाऊन ते करदात्याच्या नियमित उत्पन्नात मिळवले जाते. या व्यवहारात तोटा होत असल्यास तो अन्य उत्पन्नातून वजा होत नाही. तो त्या वर्षांनंतर पुढील तीन वर्षात अशाच प्रकारच्या नफ्यात समायोजित करता येतो. बाजारातून खरेदी केलेले शेअर्स एक वर्षाच्या आत विकल्यास अल्पकालीन भांडवलो लाभ होईल तर एक वर्षानंतर विकल्यास मिळणारा नफा दीर्घकालीन भांडवली लाभ समजला जातो. सध्या त्यावरील करदेयता दोन पद्धतीने मोजली जाईल जुन्या पद्धतीने मोजणी केल्यास योग्य त्या वजावटी घेऊन येणाऱ्या उत्पनावर सर्वसाधारण व्यक्तींसाठी अडीच लाख करपात्र उत्पन्नावर कोणताही कर नाही. अडीच ते पाच लाख उत्पन्नापर्यंत 5%, पाच ते दहा लाख उत्पन्नावर 20% तर दहा लाखाहून अधिक उत्पन्नावर 30% दराने कर आकाराला जातो. 60 वर्षे पूर्ण होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची करदेयता तीन लाख रुपये करपात्र उत्पन्नावर सुरू होते तर 80 वर्षे पूर्ण करणाऱ्या अतिजेष्ठ नागरिकांची करदेयता करपात्र उत्पन्न पाच लाख झाल्यास सुरू होते. पाच लाखाहून कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांच्या जास्तीतजास्त ₹12500/- एवढी करात सूट जुन्नी प्रणाली स्वीकारल्यास मिळेल तर नवीन करप्रणालीनुसार सरसकट सर्वानाच तीन लाखावरील करपात्र उत्पन्नावर 10% पासून टप्याटप्याने 15 लाखाहून अधिक उत्पन्नासाठी 30% कर लागतो. या प्रणालीत करपात्र उत्पन्न सात लाखपर्यंत असल्यास जास्तीतजास्त ₹25000/- एवढी करात सूट मिळते. दीर्घ मुदतीचा भांडवलो नफा सोडून पगार, व्याज, डिव्हिडंड, अन्य उत्पन्न या मार्गाने मिलेल्या उत्पन्नावर जुन्या प्रणालीप्रमाणे भरपूर करसवलती घेऊन अधिक दराने कर द्यावा लागेल किंवा नवीन प्रणालीनुसार कमी सवलती घेऊन कमी दराने कर आकारणी केली जाईल..करदात्याने कोणती प्रणाली स्वीकारल्यास कमी कर पडेल ते पाहून योग्य निर्णय घ्यावा. दोन्ही पद्धतीत अल्प मुदतीच्या भांडवली लाभावर 15% या विशेष दराने कर आकारणी होईल.तोटा होत असल्यास तो पुढील तीन वर्षात समायोजित करता येईल. तर दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावर 1 लाखावरील रकमेवर 10% या विशेष दराने कर आकारणी केली जाईल. तोटा होत असत्यास पुढील सात वर्षातील नफ्यात समायोजित करता येईल. केवळ दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ हेच उरपन्नाचे साधन असल्यास 1 लाखावरील सर्व उत्पन्नावर 10% या विशेष दराने कर द्यावा लागेल. करदाता डीरिवेटीव पद्धतीचे व्यवहार करत असेल तर त्यातून मिळणारे उत्पन्न हे कायद्याने सट्टा नसलेले अन्य मार्गाने मिळालेले व्यापारी उत्पन्न समजले जाते. या व्यवहारांसाठी उलाढाल मोजण्याची पद्धत वेगळी आहे अशी उलशाल ही उलाढाल नफा असो अथवा तोटा त्याच्या निरपेक्ष पद्धतीने मोजावा लागतो म्हणजेच तोटा असेल तर तो वजा न करता अधिक आहे असे समजून मिळवावा लागतो अशी उलाढाल 10 कोटी रुपयांहून अधिक झाल्यास त्याचे लेखापरीक्षण करणे सक्तीचे आहे. यापासून मिळालेले उत्पन्न हे उलाढाल 50 लाखाहून कमी असल्यास कोणताही हिशोब न ठेवता अन्य व्यापारातील उत्पन्न समजून त्यास कोणताही हिशोब न ठेवता 50% उत्पन्न हे अंदाजित फायदा म्हणून दाखवून त्यावर वरील दोनपैकी आपण जी प्रणाली स्वीकाराल त्या पद्धतीने कर आकारणी होईल. व्यवहारात झालेला तोटा हा पगाराव्यतिरिक्त उत्पन्नात समायोजित करता येतो अथवा त्या आर्थिक वर्षापुढील सात वर्षात अशाच व्यवहारातील लाभात समायोजित करता येतो. ★पूर्णवेळ व्यवसाय म्हणून केलेले डे ट्रेंडिंग आणि डिलिव्हरीचे व्यवहार केवळ व्यवसाय म्हणून अशा व्यवहारातून होणारा नफा हे व्यवसायाचे व्यापारी उत्पन्न म्हणून स्वीकारल्यास त्या अनुषंगाने येणारे सर्व खर्च म्हणजे एक्सचेंजला दिलेले विविध कर, इंटरनेटचा खर्च, तज्ञाला दिलेली सल्ला फी, विकत घेतलेले सॉफ्टवेअर, ते वापरण्याची फी वीजबिल, प्रवास, बँक चार्जेस यासारख्या व्यावसायीक खर्चाची वजावट घेता येईल मात्र यातून मिळणाऱ्या निव्वळ नफ्याचे प्रमाण एकूण उलढालीच्या किमान 6% असणे गरजेचे आहे जर ते तेवढे नसेल तर उलाढाल 10 कोटीहून कमी कितीही असली तरी त्यातील व्यवहारांचे टॅक्स ऑडिट करूब घ्यावे लागेल. शेसरबाजारातील व्यवहार आणि आयकर याविषयी किमान प्राथमिक माहिती यातून आपल्यास मिळाली असेल तरीही यासंबंधात काही शंका असल्यास कर सल्लागारांचा सल्ला अंतिम समजून त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. ©उदय पिंगळे (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयं:सेवी ग्राहक संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे पदाधिकारी असून लेखातील मते वैयक्तिक आहेत) अर्थसाक्षर डॉट कॉमवर 14 जुलै 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.

No comments:

Post a Comment