Friday, 30 December 2022
मार्केट पडलं, पुढे काय?
#मार्केट_पडलं_पुढे_काय?
मार्केट कधी पडणार? हा लेख लिहून 15/20 दिवस होतात न होतात तोच आज काही दिवसानंतर मार्केट बऱ्यापैकी खाली आलंय. 3 डिसेंबरला ते सर्वोच्च शिखरावर होतं. जेव्हा सेन्सेक्स 63500 हून अधिक होता तेव्हा तो 70000 कधी जाईल याची चर्चा चालू होती तर आज तो 50000 पर्यंत खाली येऊ शकेल असे विचार अनेकजण व्यक्त करीत आहेत वाढयाला सुरुवात झाल्यावर 45 दिवसांत तो सर्वोच्च स्थानी पोहोचला पण थोडा खाली राहून तो 4,5 दिवसात सर्वोच्च स्थानापासून घसरून तीव्रतेने खाली आला. 23 डिसेंबर 2022 रोजी याची तीव्रता सर्वात अधिक होती
खरं तर यात विशेष काहीच नाही गेली अनेक वर्षे वर्षातून दोनचार वेळा मार्केटमध्ये अशी तीव्र घट आणि वाढ होण्याचे प्रसंग येत असतात मग ते कशामुळे झालं याची लेबल आता लावली जातील. 26, 27 डिसेंबर 2022 रोजी बरोबर उलटं घडलं याचं कारण काय? त्यावर अनेक वाद संवाद होतील. जी कारणे दिली जातात त्याचा शुक्रवारी मार्केट पडण्याशी आणि लगेच सोमवार मंगळवारी वाढण्याशी जो काही संबंध जोडला जाईल, तो तकलादू आहे. याबाबत कोणीही अस काही होईल असं निश्चित भाकीत केलेलं नव्हतं आणि करूही शकत नाही. इंडेक्स हा एक सर्वसामान्य मार्गदर्शक आहे, तो वाढला किंवा कमी झाला तर आपल्याकडील सर्व शेअर्स वाढतील किंवा कमी होतील असे नाही.
खरं तर अशा पडझडीची ज्यांना भीती वाटते त्यांनी बाजारात थेट गुंतवणूक करूच नये जरी म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक असेल तर त्याची एनएव्ही कमी अधिक होत राहील. ज्यांना फक्त सुरक्षितता हवीय त्यामी फिक्स डिपॉजीट किंवा डेट फंड योजनाकडे जावे आता हे दर वाजवी झाले असून ते 7 ते 8 % च्या आसपास आहेत. पारंपरिक विचारसरणीच्या लोकांना या वाढीचा फायदा उठवून अधिक दराने अधिक कालावधीच्या मुदतीच्या ठेवी ठेवता येतील. लवकरच हे दर कमी होतील अशी शक्यता वाटते रिजर्व बँकेने त्याच्या प्राईम लेंडिंग रेट कमी केला की बँका कर्जदर कमी करण्याऐवजी फिक्स डिपॉझिटचे दर ताबडतोब कमी करतात. आपल्याकडे महागाई कमी होत चालल्याचे संकेत मिळत असल्याने इतर देशांमध्ये वाढलेली महागाई आणि आपल्या इथे वाढलेली महागाई यात फरक आहे तेथे गेल्या 40 वर्षात झाली नव्हती एवढी महागाईवाढ झाली असल्याचे तेथील मागणी प्रचंड घटली आहे. आपल्याकडे मागणीत सातत्याने वाढ होत आहे यात आपल्या सणासुदीनी मोठा हातभार लावला आहे. यावर्षी प्रथमच कोणत्याही वाहननिर्माण कंपनीने वर्षाअखेर कोणतीही सवलत जाहीर केलेली नाही. कदाचित या कंपन्या पुढील वर्षी किमती वाढवणार असतील तर त्या तुलनेत 'वर्तमान भाव हीच सवलत' अशी त्यांची धारणा असेल.
जे शेअरबाजारात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांतून अप्रत्यक्ष गुंतवणूक करीत आहेत त्यानी आपले चित्त विचलित न होता आपली एसआयपी चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण 5% पडझड झाल्यास शक्य असल्यास एकरकमी गुंतवणूक वाढवावी. जे लोक एसआयपी करू शकत नाहीत त्यांनीही आपली गुंतवणूक अशी तीनचार टप्यात करावी. बरेचदा गुंतवणूकदार बाजार वर असताना एकरकमी गुंतवणूक करतात आणि खाली आल्यावर काढून घेतात त्यामुळे अपेक्षित परतावा मिळत नाही. मात्र हा नियम एसआयपीसाठी नाही ती तुम्ही कधीही करू शकता. तेथे आपोआपच सरासरी गुंतवणूकभाव साधला जातो. त्यातही बाजार खाली आल्यावर युनिट टॉप अप करू शकता. आपले गुंतवणूक उद्दिष्ट नजीक आले असल्यास म्हणजे समजा -
मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करीत असाल तर त्याला लागणारे पैसे हे त्याची बारावी पूर्ण होईल तेव्हा लागतील परंतु त्यावेळी बाजार कुठे असेल हे आपण सांगू शकत नाही तेव्हा सुरक्षितता म्हणून आपल्या गरजेच्या दोनतीन वर्ष आधी म्हणजे त्याची 9 वी किंवा 10 पूर्ण होत असेल त्यावेळी आपल्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीकडून मिळणाऱ्या स्टेटमेंटवर लक्ष ठेवावे यात आपल्याला किती परतावा मिळाला ते समजते. हा परतावा अपेक्षित असलेल्या परातव्याहून अधीक असेल / अनपेक्षित असेल कारण बाजारात अशा संधी कायम येत असतात तर -
*जरुरी नसली तरी जमा युनिटमधील एक वर्ष मागे जाऊन असलेले सर्व युनिट रिडीम करून घ्यावेत. कदाचित 1 लाख रुपयांहून अधिक दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला तर त्यावर 10% या सवलतीच्या दराने कर आकारणी होईल.
*हे पैसे आधीच चालू असलेल्या पीपीएफ /एनपीएस खात्यात किंवा डेट फंड योजना फिक्स डिपॉजीट यात पूर्ण किंवा विभागून टाकता येतील त्यातून ते जरुरीनुसार काढून घेता येतील, त्यामुळे जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा हमखास पैसे मिळतील याची निश्चिती राहील.
हे करीत असताना एसआयपी चालूच ठेवावी ती बंद करू नये.
जे थेट शेअर बाजारात गुंतवणूक करतात, त्यांना हे नक्की माहिती आहे की बाजार वरखाली होत असताना एकदम सर्व शेअर्स पडतही नाहीत आणि वाढतही नाहीत. याचा फायदा घेऊन आपण योजलेले शेअर्स खरेदी करावेत अथवा विकावेत. अगदी संधीसाधू व्हावे. (संधीसाधू शब्द थोडा खटकत असेल तर संधीशोधू व्हावे.) डे ट्रेडर्सच्या दृष्टीने बाजार असा वरखाली होत राहणे ही पर्वणीच आहे, यात अनेक संधी आहेत. साधारण 9 जानेवारीपासून कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षित असून ते उत्तम असल्यास, 31 जानेवारी 2023 पर्यंत नेहमीप्रमाणे बजेटपूर्व तेजी अपेक्षित आहे. तेव्हा यातील संधीचा शोध घ्या आणि समृद्ध व्हा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 30 डिसेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
Saturday, 24 December 2022
करोडपती कसे व्हावे?
#करोडपती_कसे_व्हावे?
माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती जसजसा काळ गेला आणि महागाई वाढली तसं 10 हजाराची जागा एक लाख रुपयांनी घेतली. मला आठवतंय सन 1992 मध्ये तत्कालीन आयडीबीआयने 25 वर्षांनी एक लाख रुपये मिळू शकतील असे डीप डिस्काउंट बॉण्ड बाजारात आणले होते जे गुंतवणूकदारांना ₹2700/- ला देऊ केले होते. यानंतर सरदार सरोवर नर्मदा निगम, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी आणि अनेकांनी 25 ते 35 वर्षे मुदतीचे जास्त व्याजदर असलेले बॉण्ड देऊ करून गुंतवणूकदारांना मोठ्या रकमेचे स्वप्न दाखवले होते. हे सर्वच बाँड त्यात असलेल्या बाहेर पडण्याच्या पर्यायांनुसार कमाल 5 ते 12 वर्षात बंद झाले कारण व्याजदर नंतर कमी कमी होत गेल्याने असे महागडे बॉण्ड चालू ठेवणे शक्य नव्हते. वित्तसंस्थाच्या दृष्टीने हा आतबट्याचा व्यवहार होता ती गोष्ट वेगळी पण अनेकांचे ते स्वप्न होते. आज तीच जागा एक कोटी रुपयांनी घेतली आहे ही रक्कम भविष्यात अपुरी पडू शकेल अनेक तज्ञांचे मत आहे. माझ्या एका स्नेह्यांच्या मते ही महागाई नव्हेच तर चलनाचे अवमूल्यन झाले आहे. प्रत्यक्षात जीवनावश्यक वस्तूचे भाव फारसे वाढले नाहीत तर तुलनेने कमी झाले आहेत परंतू आपल्या अन्य गरजा वाढल्या असल्याने खर्च वाढत असून आपले राहणीमान पूर्णपणे बदलले आहे. आपण त्याला ते उंचावले आहे असे समजतो आणि अनावश्यक खर्च वाढवत आहोत.
आज अनेक व्यक्ती आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कदाचित काही रक्कम वाचवू शकतील ते जितकी जास्त रक्कम कमी वयात वाचवू शकतील त्यांचे हे स्वप्न बचतीने पुरं झालं तरी वर म्हटल्याप्रमाणे स्वप्न पाहिलेल्या एक कोटींची जागा 10 कोटींनी घेतली असेल. तेव्हा भविष्यात काय वाढलंय हे जाणून मोठं स्वप्न पाहायला हवं. बचत आणि गुंतवणूक करून काही शिस्त पाळली तर हे स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं. ₹ दहा हजार काही वर्षात जर एक कोटींमध्ये परावर्तित झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासाठी लवकरात लवकर सुरुवात करणे जेवढे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या गुंतवणुकोचा कालावधी आणि सातत्याने उच्च परतावा मिळवून देऊ शकणारे साधन महत्वाचे आहे.
नेहमी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून, तरुणांना लवकरात लवकर आपल्या उत्पन्नातील काही भाग हा बचतीकडे वळवण्याचा सल्ला दिला जातो. बहुदा अनेकजण जणू ते बहिरेच आहेत असं समजून ऐकलं न ऐकल्यासारखं करून त्याकडे दुर्लक्ष करतात. 30/ 35 वर्षानंतर येऊ शकणारा काळ कसा असेल आपलं जीवन कस असू शकेल याचा विचार करण्याएवढी प्रगल्भता त्याच्याकडे नसते. त्यामुळे आयफोन घेणे, महागडी कार घेणे अशा प्रकारची स्वप्ने पाहताना काहीच नाही तर गुंतवणूक म्हणून म्युच्युअल फंड योजनेची एसआयपी करायची तर इएमआयच्या चक्रात ते सापडतात. आपल्या करियरच्या सुरुवातीस थोडी बचत त्यातून काही गुंतवणूक अशी शिस्त लावूनच करायला हवी.
30 वय असलेल्या व्यक्तीचा किमान मासिक आवश्यकतावरील खर्च जर दरमहा ₹तीस हजार असेल तर 6% चलनवाढ धरून होणारा मूल्यऱ्हास विचारात घेता हाच मासिक खर्च त्याच्या 60 व्या वर्षी दरमहा 1 लाख 72 हजार असेल. तुम्ही नियोजनशून्य असाल तर खर्चात होणारी ही छुपी वाढ एकदम न होता हळू हळू होत असते हे लक्षातही येणार नाही. दरवर्षी मिळणारी पगारवाढ यामुळे मूल्यवाढीची फारशी झळ पोहोचत नाही फरक पडतो तो मिळणारे उत्पन्न अचानक बंद होते तेव्हा.
याचा सर्वाधिक फटका बसतो तो तुम्ही आजारी पडल्यावर, तरुण असताना तसेच नोकरीत असतांना याचा फारसा फटका बसत नाही परंतु वयोमानानुसार आणि असाध्य रोग होण्याची शक्यता ही साठ वर्षांनंतर असल्याने यावर उपचार आणि नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या मासिक खर्चाच्या 20% रक्कम खर्च होऊ शकते आणि मोठे आजारपण आले तर आप्तेष्टांकडे हात पसरण्याची वेळ येते.
आताचा असणारा मासिक खर्च हा आपली सध्याची खर्चपद्धती कायम 30 वर्धात 30 हजारहून 1 लाख 72 हजार होईल हे आपण पाहिलं यात महागाई वाढ 6 % गृहीत धरली आहे. तेव्हा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता नसल्यास तेव्हा उपलब्ध असणारी रक्कम कमीकमी होत जाऊन संपेल यासाठी आपल्याला उपलब्ध रक्कम ही 1 कोटी असून पुरणार नाही. ती अधिक लागेल कारण आपल्या निवृत्तीनंतर महागाई वाढतच राहणार याला फक्त जुन्या पद्धतीने पेन्शन मिळणारे लोक हेच अपवाद राहतील. नवीन पेन्शन धारकांना वाढीव पेन्शन देण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी याबाबत अजून सरकारी धोरण काय असेल यासंबंधी पुरेशी स्पष्टता नाही. त्यांना आता मिळत असलेल्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये भरीव वाढ झाली तरी ती तिथेच स्थगित होत असल्याने तेही काही वर्षांनी उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असे झाल्याने अपुरेच पडणार.
निवृत्तीनंतर उपलब्ध फंड 1 कोटी असून त्यावर वार्षिक 8% दराने परतावा मिळाल्यास आणि खर्च 1 लाख 72 हजार असेल उपलब्ध रक्कम 5 वर्षात संपेल, 3 कोटीरुपयात 16 वर्ष तर 5 कोटी रुपयात 32 वर्षे काढता येतील. तेव्हा वाढलेली आयुर्मर्यादा विचारात घेऊन आपल्याला उपयोगी निवृत्ती योजना बनवायची असेल तर एक कोटी ऐवजी तुम्हाला 5 कोटींचे उद्दिष्ट ठेवावे लागेल दीर्घकाळ तुमची गरज भागवू शकेल असा परतावा आपल्याला भांडवल बाजारातील गुंतवणुकीतून मिळू शकतो आपले आर्थिक उद्दिष्ट ठरले की आपली योजना तुम्ही बनवू शकता. अल्पकाळात यातील गुंतवणूक बरीच धोकादायक वाटत असेल तरी 10, 20, 30 वर्षांनी त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. अनेकजण भविष्यकालीन गुंतवणूक म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) हा पर्याय निवडतात यावर मिळणारा परतावा हा महागाईवर जेमतेम मात करतो. गेल्या 20 वर्षात पीपीएफ मधील गुंतवणुकीची तुलना सेन्सेक्स या निर्देशांकाशी केली असता 1 लाख रुपयांची गुंतवणूक पीपीएफमध्ये 30 वर्षांनी 5 लाख झाली तर सेन्सेक्समधील गुंतवणूक याच कालावधीत 24 लाख 21 हजार झाली तेव्हा केवळ सुरक्षितता यावर कितपत समाधान मानायचे याचाही विचार करायला हवा. पीपीएफ मधील सुरक्षितता आणि थेट भांडवल बाजारातील गुंतवणुकीस उपलब्ध असलेला इक्विटी म्युच्युअल फंडाच्या योजना हा मध्यममार्ग होऊ शकतो यातील गुंतवणूक ही स्वतः संशोधन करून गुंतवणूक करण्यापेक्षा तुलनेने सोपी आहे.
*यात सहज योजना बदल करता येतो.
*निवडीस अनेक पर्याय उपलब्ध असतात.
*गुंतवणूक कमी अधिक करण्याची सुविधा. किमान गुंतवणूक अत्यंत कमी.
*पारदर्शक आणि नियंत्रित त्यामुळे जोखीम कमी.
*योजनेतील सहभाग कधीही काढून घेता येतो.
याउलट थेट गुंतवणुकीच्या असणाऱ्या समभाग गुंतवणूक व्यवस्थापन योजनांत (पीएमएस) सध्याच्या नियमानुसार किमान ₹ 50 लाख गुंतवणूक करावी लागते. ती किमान निर्धारित काळ ठेवावी लागते.
म्युच्युअल फंड योजनेतून काही वर्षानंतर लागणारी कोटींमधील रक्कम जमा करताना-
*अपेक्षित परतावा निश्चित करा इंडेक्स फंडातून 14% परतावा मिळाला आहे.
*आपल्याला किती रक्कम लागेल ते ध्येय निश्चित करा.
*यासाठी लागणारा कालावधी ठरावा.
*1 कोटी रक्कम 10 वर्षात जमा करायची असल्यास ₹30600/- दरमहा गुंतवावे लागतील पण हीच रक्कम 30 वर्षात जमा करायची असेल तर ₹1300/- दरमहा गुंतवावे लागतील.
यात मिळणारा परतावा 10% दराने असल्याचे गृहीत धरले आहे. यातील कोणतीही गोष्ट बदलली तर उत्तर बदलेल.
*तीन इक्विटी आधारित योजना निवडा.
*आवश्यक रकमेचे एसआयपी करा.
*त्यावर अधूनमधून लक्ष ठेवा.
*यात बदल करणे आवश्यक असेल तर त्याचे कर या दृष्टीने होणारे परिणाम तपासून पहा.
*श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र लक्षात ठेवा.
*आवश्यक असेल तर फी आकारून सल्ला देणाऱ्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या लक्षात ठेवा इथे किंवा कुठेच काही फुकट मिळत नाही.
अनेक गुंतवणूकदार बाजारात पडणाऱ्या फरकाने घाबरून जाउन चुकीच्या वेळी खरेदीविक्री करतात. आपल्या अनावश्यक गरजांसाठी गुंतवणूक काढून घेतात. सध्याचा गुंतवणूकदारांचा गुंतवणूक कालावधी सरासरी दोन वर्ष आहे त्यामुळे अनेकदा यातील फायदा अनुभवता येत नाही. केवळ हे टाळून थोडी डोळस गुंतवणूक केलीत तर नक्कीच करोडपती व्हाल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(आकडेवारी संदर्भ व्हॅल्यूरिसर्च ऑनलाइन या संकेतस्थळावरून मिळवला आहे. लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तीक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 23 डिसेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 16 December 2022
कोविड 19 पासून गुंतवणूकदारांनी घ्यायचा बोध
#कोविड_19_पासून_गुंतवणूकदारांनी_घ्यायचा_बोध
कोविड 19 किंवा त्याचे भयंकर वारस भारतात आहेत असे वाटत नाही. सन 2020 चा मार्च महिना आठवा. लॉकडाऊन जाहीर झाला त्यानंतर सर्व सुरळीत होईल असं वाटत असताना तो पुन्हा पुन्हा वाढवावा लागला आणि सारे व्यवहार ठप्प झाले मग दुसरी लाट येईल म्हणून अधिक दक्षता बाळगली गेली त्याचा फारसा प्रभाव न झाल्याने येणाऱ्या पुढील लाटेकडे दुर्लक्ष झाले या काळात अनेकांचे प्रचंड नुकसान झाले. बऱ्याच जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. एकंदर घबराट माजली. अनेकांना कधी काळी असे संकट येईल असे स्वप्नातही वाटत नव्हते. आता जनजीवन पूर्वीसारखे सुरळीत झाले आहे. किंबहुना असे काही संकट आलं होतं हेच लोक विसरून गेले आहेत. तरीही आजपर्यंत जगभराचे जे काही नुकसान व्हायचे होते ते झालेच. चीनमध्ये अजून त्याचे अस्तीत्व आहे म्हणतात, खरंखोटं काय ते शी जिनपिंग जाणे! आपल्या दृष्टीने हा एक अत्यंत कसोटीचा काळ होता. सुरुवातीला त्याच्या तीव्रतेचा अंदाज आला नाही त्यावर उपाय योजना काय असावी याबाबत आपण चाचपडत होतो परंतु अत्यंत कमी कालावधीत त्यावर संशोधन करून लस काढली आणि ती विक्रमी कालावधीत सर्वांपर्यंत पोहोचवली. जगभरातील लोकांना उपलब्ध करून दिली.
एक गुंतवणूकदार म्हणून आपण या मोठ्या संकटातून काय शिकलो अशा आशयाची एक पीपीटी व्हॅल्यू रिसर्च कंपनीकडून प्रसिद्ध झाली होती असता त्यातील महत्वाचे मुद्दे मी डायरीत लिहिले होते दोन दिवसांपूर्वी ते सहज वाचनात आले तेच या लेखातून सादर करीत आहे. आज जरी तो इतिहास असला तरी आपण हा विषय शिकण्याचे महत्वाचे एक प्रयोजन हे भूतकाळात घडलेल्या घटना, तेव्हा झालेल्या चुकांचा अभ्यास करून भविष्यात त्याच चुका पुन्हा न करणे हे आहे.
★सुरक्षेसाठी विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड काळात सुरक्षेसाठी विविध थर असलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता यात जसे कापडाचे थर असतात त्यामुळे विषाणूपासून संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे एकाच स्तरात केलेली गुंतवणूक ही अधिक धोकादायक असते. तेव्हा आपली गुंतवणूक ही विविध मालमत्ता प्रकारात विभागलेली हवी त्यामुळे जोखमीची तीव्रता कमी होते.
★एकच प्रकारच्या अनेक योजनांची भाऊगर्दी: ज्याप्रमाणे या संकट कालावधीत अधिकाधिक गर्दी करू नये असे सुचवण्यात आले होते त्याचप्रमाणे एकच प्रकारातील योजना टाळाव्यात विशेषतः म्युच्युअल फंडाच्या एकच प्रकारच्या अनेक योजना असतील तर त्यांचे व्यवस्थापन करणे त्रासदायक होते.
★दूरच्या लक्षाचा विचार: या कालावधीत आपण एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करत होतो. हाच अंतराचा मुद्दा शेअर्स किंवा त्यासंबंधी असलेल्या म्युच्युअल फंड योजना यामधील गुंतवणूक करताना वापरावा. त्या दीर्घ काळासाठीच आहेत याची जाणीव ठेवावी. त्यातून अपेक्षित परतावा मिळण्यासाठी 5 ते 8 वर्षाच्या कालावधी जावा लागतो हे लक्षात ठेवावे.
★फक्त बाजारातच कार्यरत : ज्याप्रमाणे या संकट काळात आपण स्वतःला आपल्या घरात डांबून ठेवले होते त्याचप्रमाणे बाजार तेजीत असो वा मंदीत, आपण त्यामधील गुंतवणूक संधी शोधत राहिलो तरच आणि तरच महागाईवर मात करणारा परतावा मिळू शकतो. त्यामुळे विचलित न होता सातत्याने बाजारात गुंतवणूक करीत राहावे.
★फक्त बाजारात पण कार्यरत: एकच गोष्ट करत असल्याचे काही दुष्परिणाम असतात त्यामुळे संकट काळात घरात राहून ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली त्याचप्रमाणे समतोल साधून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी.
★मीडियावर अवलंबून न राहणे : घरात बसलेले लोक वेगवेगळ्या समाज माध्यमावर सक्रिय झाले. त्यावर येणारी मतमतांतरे आपले चित्त विचलित करू शकतात तेव्हा येणाऱ्या उलट सुलट बातम्या फार गांभीर्याने घेतल्यास त्याचा तुमच्या गुंतवणूक निर्णयावर विपरीत परिणाम होऊ शकेतो. तेव्हा मीडिया हवा पण त्यावर अवलंबून राहणे टाळावे.
★झटपट निर्णय घेऊ नका: गुंतवणूक अर्थपूर्ण होण्यासाठी पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी अल्पकाळ झटपट परिणामकारक पर्याय तुमच्यासमोर आले तर त्याला भुलून कोणतेही निर्णय घेऊ नका. संशोधन करून लस स्वीकारण्यासाठी काही किमान कालावधी गेलाच हे लक्षात ठेवा.
★अवाजवी अपेक्षा नकोत: कठीण प्रसंगात ज्याप्रमाणे आपण आवश्यक गोष्टींना प्राधान्य दिले आणि कोणत्याही अवाजवी अपेक्षा बाळगल्या नाहीत. त्याचप्रमाणे गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा वाजवी आहे ना एवढेच पहा. त्यापासून अवास्तव अपेक्षा करू नका.
★आपल्या गरजा मर्यादेत ठेवा: आपल्या गरजा वाढवणे म्हणजे अधिक पैसे खर्च करणे. संकटकाळात प्रत्येकाने अनावश्यक खर्च टाळला त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी अधिक रक्कम उपलब्ध झाली. वाजवी दरातील दर्जेदार वस्तूंचा शोध घ्या.
★डिजिटल माध्यमांचा वापर वाढवा: या काळात डिजिटल माध्यमाचा वापर, त्यास पर्याय नसल्याने वाढला. यापासून स्फूर्ती घेऊन,पुरेशी काळजी घेऊन डिजिटल माध्यमांचा वापर करणे हे पैसा आणि वेळ वाचवणारे आहे हे ओळखून त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो याचा अनुभव घ्या.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)
Friday, 9 December 2022
मार्केट कधी पडणार?
#मार्केट_कधी_पडणार?
अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस बाजार निर्देशांक नवनवे उच्चांक करीत आहेत जून 22 च्या मध्यावर तो बर्यापैकी म्हणजे सर्वोच्च स्थानापासून 20% खाली आला होता. आता बाजार वाढणारच नाही, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यावर हळूहळू वाढत तो 12 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर वरच्या स्तराला स्थिरावला आता बाजारास कोणी रोखू शकत नाही इथून वाढणारच अशी स्थिती झाली असताना तेथून खाली येऊन 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर खालच्या स्तरावर स्थिरावला. अनेक जणांनी या वर्षात बाजार रेकॉर्ड पार करेल अशी आशा सोडल्यावर वाढू लागला 1 डिसेंबरला त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला. या पार्श्वभूमीवर मार्केट कधी पडणार? हा सर्वसामान्य प्रश्न आहे.
खर तर या सर्वच काळात म्हणजे तेजी असो अथवा मंदी, गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असतात परंतु बाजार खाली जायला लागल्यावर तो अजून खाली जाईल अशी शक्यता दिसू लागते त्यामुळे प्रत्येक जण अजून किती खाली जाणार याचा अंदाज, तर वर जात असताना वर किती जाईल याविषयी छातीठोकपणे अंदाज व्यक्त करीत असल्याने संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे व्यवहार केले जात नाहीत, त्यामुळे होणारा नफा नुकसान आभासीच राहते.
तुम्ही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणूकदार असलात, स्विंग ट्रेडिंग करत असाल किंवा एफएनओ तर या बाजारातून नफा मिळवणे हे तुमचे उद्दिष्ट असणारच तो नेमका किती असावा याचा तुम्ही नक्की विचार केलेला असला पाहिजे. या संदर्भात गुंतवणूक करण्याच्या विविध पद्धती तुम्हाला माहिती असायला हव्यात. तुमची स्वतःची एक पद्धत पद्धत (भले ती चुकीची का असेना) तुम्हाला निश्चितपणे सांगता यायला हवी. त्यावर ठरवल्याप्रमाणे त्वरित निर्णय घेता यायला हवा. ती पद्धत आपल्याला लागू पडते की नाही ते पाहावे. निश्चित कालावधी नंतर त्याचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल करता आले पाहिजेत.
आपले वय, उपलब्ध पैसे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, आपल्यावरील जबाबदाऱ्या, नजीकच्या काळात आवश्यक असलेले खर्च याचा विचार करून गुंतवणूक घोरण ठरवावे लागते. याचबरोबर आपला पुरेसा जीवन विमा, आरोग्यविमा आणि सेवानिवृत्ती विषयक धोरण ठरवाययलाच हवं यासाठी जितक्या लवकर सुरुवात कराल तितका त्याचा आर्थिक स्थैर्य येण्यास उपयोग होईल. याशिवाय आवश्यक असल्यास गरजेनुसार अन्य विमाप्रकार घेता येतील. ते जितके लवकर घेतले जातील तेवढा त्यासाठी येणारा खर्च कमी असेल.
शेअरबाजारात गुंतवणूक करताना होणाऱ्या सर्वसामान्य चुका.
★फारशी माहिती नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक: आपल्याला माहिती नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करू नये असे तज्ञ सांगतात. अनेकदा विशिष्ट व्यवसायात असलेल्या व्यक्तींना त्यातील खाचाखोचा माहिती असतात. त्यात होणारे बदल, नवनवीन कल्पना त्यांना आधी माहिती होतात. अशा कल्पेनेचे भवितव्य ओळखून त्यात सर्वात आधी गुंतवणूक केल्यास त्याचा सर्वाधिक फायदा त्यांना मिळण्याची शक्यता अधिक असते.
★एखाद्या कंपनी किंवा व्यवसायाबद्धल वाटणारे तीव्र प्रेम: काही लोक एकाच कंपनीत किंवा एकाच क्षेत्रात गुंतवणूक करतात. बाजारात येणाऱ्या आणि व्यवसायात यशस्वी ठरणाऱ्या कंपन्यांतील फक्त 3% कंपन्या व्यवसायातील सातत्य 50 वर्षाहून अधिक काळ टिकवू शकतात उरलेल्या 90% कंपन्या 15 वर्षांनंतर कालबाह्य ठरतात तर 7% कंपन्या 25 वर्षांनंतर कालबाह्य ठरतात. तेव्हा गुंतवणूक करताना एखादी कंपनी किंवा एखादे क्षेत्र याच्या फार प्रेमात असू नये.
★संयमाचा आभाव: अनेक व्यक्ती गुंतवणूक करतात परंतु गुंतवणूक मूल्य वाढले किंवा कमी झाले की त्याच्या त्यावरील प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाच्या असतात त्यामुळे त्यांचे नुकसान होते.
★अत्यल्प फायद्यातील मोठे व्यवहार: अनेक जण खूप मोठे मोठे व्यवहार करून त्यातून अत्यल्प नफा मिळवतात. खरेदी विक्री केल्यावर मिळणारा फायद्यातील 50% हून अधिक भाग जर ब्रोकरेज, एक्सचेंजचे टर्न ओव्हर फी, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, एस टी टी या सारखे स्थिरखर्च म्हणून जात असल्यास मिळणारा, मिळणारा फायदा पुरेसा नसेल तर अशा नफ्याला काही अर्थ उरत नाही याशिवाय ब्रोकरेज व्यतिरिक्त मिळालेल्या नफ्यावर आयकर आकारणी होईल ते वेगळेच तेव्हा आपल्याला होऊ शकणाऱ्या खरोखरच्या निव्वळ नफ्याचा (ब्रेक इव्हन) विचार करूनच भावातील फरक मिळवावा.
★मोह: अनेकदा क्षणिक नफा मिळवण्याच्या नादात होऊ शकणारा मोठा नफा निसटून जातो. तेव्हा या मोहापासून दूर कसे राहता त्यावर होणाऱ्या नफा तोट्याचे प्रमाण बदलेल.
★वेळीच योग्य ते बदल न करणे: अनेकदा आपल्याला मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणातून भविष्याचे संकेत मिळतात त्याप्रमाणे आपल्या गुंतवणूक घोरणात बदल करावा लागतो.
★भावना प्रधानता: भावना प्रधानता हा जीवनात चांगला गुणधर्म असला तरी गुंतवणूकीत तो दुर्गुण ठरतो.
यावर मात करण्यासाठी-
★स्वतःची योजना बनवा: वर म्हटल्याप्रमाणे स्वतःची निश्चित अशी गुंतवणूक योजना हवी. त्याचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत.
★ती आपोआप कार्यान्वित होईल ते पहा: गुगल शीट, एक्ससेल यांचा वापर करून किंवा काही ब्रोकर्सनी त्यांच्या अँपमध्ये पुरवलेल्या सवलतींचा वापर करून आपली गुंतवणूक अधिक स्मार्ट करता येईल.
★नवनवे प्रयोग करण्यासाठी काही फंड राखून ठेवा: आपल्या गुंतवणुकीतील अत्यल्प भाग यासाठी राखून ठेवा कोणत्याही परिस्थितीत असा फंड 5%हून अधिक नको.
*यातील नुकसानमर्यादा गुंतवणूक प्रमाणात असावी याहून अधिक नुकसान झाल्यास त्याची भरपाई अन्य ठिकाणातून करावी लागेल. *कदाचित सर्व रक्कम गमवावी लागेल.
*कुठे नेमके थांबावे ते ठरवावे लागेल.
★काही बंधने स्वतः पाळा: या सर्वच प्रवासात आपण स्वतःच काही नियम ठरवावे आणि त्यांचे कटाक्षाने पालन करावे. हे नियम असे असू शकतात-
*गुंतवणुकीसाठी कर्ज न घेणे.
*रोज एकच ट्रेड घेणे.
*आपली नुकसान मर्यादा सांभाळणे (स्टॉप लॉस)
असे किंवा या प्रमाणे नियम आपल्यावर स्वखुशीने लादून त्याचे पालन करावे. बाजार वरखाली होत राहिलंच आणि तो आज ना उद्या वाढणारच! बाजारात एक वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून आपले व्यवहार बाजारावर मोठा परिणाम करू शकत नाहीत पण अनेक गुंतवणूकदार एक दिशेस कार्यरत राहीले तर ते बाजार सावरू शकतात याचा अनुभव अलीकडच्या काळात आल्याने याची जाणीव ठेवून नेहमी विविध संधींचा शोध घेत राहावे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखातील मते वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 9 डिसेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत
Friday, 2 December 2022
ठेवींवरील वाढते व्याजदर
#ठेवींवरील_वाढते_व्याजदर
मुदत ठेव हा बचतीचा लोकप्रिय प्रकार आहे. अल्प आणि मध्यम मुदतीच्या गरजांसाठी त्याचा निश्चित उपयोग होतो. रोख रकमेस पर्याय या दृष्टीने अडीअडचणीसाठी पैसे लागतात म्हणून सर्वच व्यक्ती सर्वप्रथम मुदत ठेवीस पसंती देतात. याची सुरक्षितता आणि निश्चित परतावा मिळण्याची खात्री यामुळे 95% लोक काहींना काही रक्कम मुदत ठेवीत ठेव म्हणून ठेवतातच. याला अन्य गुंतवणूक पर्याय असले तरी आपल्याकडे पैसे असतील तर ते बँक किंवा पोस्टात ठेवावेत असे पारंपरिक विचार करणाऱ्या लोकांना वाटते तर गुंतवणूक करण्यास बीजभांडवल म्हणून थोडी जास्त रक्कम हाताशी असेल तर चांगला उपयोग होतो.
मुदत ठेवींचे वेगवेगळे प्रकार असून आपण त्या पोस्ट, बँक, वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्या, इतर कंपन्या, बिगर बँकिंग संस्था, पतपेढ्या यात ठेऊ शकतो. ग्राहकांच्या सोयीसाठी अशा योजनांना कल्पकतेची जोड देऊन त्या अधिक आकर्षित केल्या जातात. यातील बँक, पोस्ट, पतपेढी यांची विनिमयक्षमता अतिशय चांगली असून गरज पडल्यास काही अटींवर किंवा अटींशिवाय पैसे त्वरित उपलब्ध होऊ शकतात. कर्ज उपलब्ध होऊ शकते. कंपन्यामध्ये ठेवलेले पैसेही गरजेनुसार मिळू शकतात पण त्याला थोडा जास्त कालावधी लागतो.
ठेव योजनांचे प्रकार-
★मुदत ठेव: नावाप्रमाणेच त्यास ठराविक मुदत असते ती 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत असू शकते. कालावधीनुसार हे दर कमी, अधिक असतात. अत्यंत दीर्घ मुदतीच्चे सरकारी बॉण्ड उपलब्ध आहेत त्यांची मुदत 10 वर्षाहून अधिक ते 40 वर्षेपर्यत कितीही असू शकते. याचे व्यवहार दुय्यम बाजारात होत असले तरी विनिमय क्षमता कमी असते. अशा योजनांतील सर्वसाधारण व्याजाचा विचार करता, पोस्टात ते बँकेच्या तुलनेत जास्त असतात. काही ठिकाणी ते बाजारसापेक्ष आहेत. सरकारी बँकांहून सहकारी बँका, पतपेढ्या, इतर वित्तसंस्था, बिगर बँकिंग कंपन्या, सर्वसाधारण कंपन्या अधिक व्याज देऊ करतात, याशिवाय जेष्ठ नागरिक, महिला, शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती यांना नियमित दरापेक्षा थोडे अधिक व्याज देण्यात येते. एकरकमी रक्कम ठेवून ठराविक काळाने व्याज घेता येथे अथवा तिमाही वार्षिक व्याजाची अथवा वार्षिक व्याजाची पुनर्गवणूक करता येते आणि एकदम घेता येते.
★रिकरिंग डिपॉजिट - एक रकमी पैसे भरणे अनेकांना शक्य नसते तेव्हा हा पर्याय निवडला जातो याची मुदत 12 महिने ते 120 असू शकते. यामुळे दीर्घ काळात एकरकमी पैसे उपलब्ध होतात. यावर मिळणारे व्याज मुदत ठेवींवरील दराएवढे असते.
त्याचप्रमाणे बँकेत / पोस्टात ठेवलेली मुदत ठेव आपल्या गरजेनुसार कधीही मोडता येते असे मुदतपूर्व विमोचन करताना काही दंड आकाराला जातो. अधिक दराने दिलेले व्याज कापून घेतले जाते.
★बदलत्या व्याजदाराच्या ठेवी- यावरील व्याजदर हे एका मार्गदर्शक व्याजदाराच्या प्रमाणात ठराविक अंतराने कमी/ अधिक होत असतात.
★टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट- कर वाचवा यासाठी मुदत ठेव पाच वर्षे मुदतीने रक्कम ठेवता येते यावर सर्वसाधारण व्याजदाराहून थोडे अधिक व्याज मिळते हे व्याज नियमित अथवा एकरकमी घेण्याचे पर्याय ग्राहकांना आहेत.
सर्वसाधारणपणे ठेव ठेवतांना-
*उपलब्ध पर्याय, त्यांची सुरक्षितता यातील बँकेतील ठेवी 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षित आहेत तर अल्पबचत योजनांना सरकारी हमी असल्याने त्या अधिक सुरक्षित आहेत. कंपनी ठेवी तारणासह किंवा ताराणांशिवाय उपलब्ध असल्या तरी जर त्यांनी ठेव परत करण्यास नकार दिला तर ते परत मिळवून देणारी प्रभावी यंत्रणा नाही.
*व्याजदर, किमान रक्कम, मुदत
*व्याज /व्याजावर व्याज देण्याची पद्धत
*पैसे मुदतपूर्ती पूर्वी अंशतः किंवा पूर्ण काढल्यास होणारे परिणाम,
*करदेयता
*मिळणाऱ्या अन्य सुविधा
मुदत ठेवींचा सुरक्षितता यादृष्टीने उतरता क्रम लावायचा असल्यास पोस्ट ऑफिस, बँक, (येथील ठेवी 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षित आहेत) वित्तीय संस्था, उत्पादन कंपन्या, बिगर बँकिंग संस्था, पतपेढ्या असा क्रम लावता येईल असे असले तरी पोस्ट, बँक आणि पतसंस्था यांच्याकडे ठेव ठेवायचा लोकांचा कल आहे.
सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकांनी अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे यावेत यासाठी काही मूल्यवर्धित सवलती दिल्या आहेत.
*विशिष्ट रक्कम जमा झाल्यावर आपोआप मुदत ठेव निर्माण होणे.
*मुदत ठेवीत असणारी रक्कम सर्वसाधारण खात्यात शिल्लक दाखवणे.
*यातील 1 रुपयाच्या पटीत वापलेली रक्कम ही अंशतः मोडलेले डिपॉझिट समजून उरलेल्या रकमेवर देयदराने व्याज देणे. काही ठिकाणी अशी सोय नसते अशा ठिकाणी एकच मोठे डिपॉझिट न घेता ते विभागून घेतल्यास गरज लागल्यास आपल्याला आवश्यक तेवढी रक्कम काढून घेता येईल.
बँक / पोस्ट येथे जेष्ठ नागरिकांना ठेवींवर आणि बचत खात्यावरील व्याज 50 हजार रुपयांपर्यंत करमुक्त आहे तर अन्य व्यक्तींना फक्त बचत खात्यावरील 10 हजार रुपयांचे व्याज करमुक्त आहे. सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीत 40 हजार तर जेष्ठ नागरिकांना मिळणारे व्याज 50 हजाराहून जास्त असल्यास मुळातून करकपात केली जाते अन्य ठिकाणी 5 हजाराहून अधिक व्याज मिळत असल्यास मुळातून करकपात केली जाते. आवश्यकतेनुसार 15 जी किंवा एच फॉर्म देऊन ती टाळता येईल.
एकेकाळी सर्वोच्चदराने मुदत ठेवींवर परतावा मिळत होता आणि एकंदरीत खर्चाच्या दृष्टीने विचार करता हे दर कमी असावेत अशी उद्योगांची मागणी होती सरकारलाही हे दर कमी असावेत असे वाटत असल्याने ते टप्याटप्याने खाली आणण्यात आले. कोविड 19 चा फायदा घेऊन अर्थव्यवस्थेस चालना मिळावी या हेतूने ते मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले. ते जवळपास किमान पातळीवर आले असताना गेले काही दिवस मात्र उलट अनुभव येत आहे. महागाईत वाढ होत असल्याने आणि जगभरातील बँका व्याजदर वाढवत असल्याने अपरिहार्य परिस्थिती म्हणून रिजर्व बँकेकडून कर्जावरील दर वाढवले जात आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 2% वाढ झाली. साहजिकच ठेवींवरील दर वाढण्याच्या अपेक्षा निर्माण झाल्या. वित्तसंस्था ज्या तत्परतेने कर्जावरील व्याजदर वाढवतात त्या प्रमाणात ठेवींवरील व्याजदर वाढवत नाहीत. कर्जावरील दर कमी झाल्यास ठेवींवरील व्याजदर तत्परतेने कमी करतात असे करणे हे त्यांच्या दृष्टीने अधिक फायद्याचे असते हे दर किती असावेत याबाबत वित्तसंस्थांना स्वातंत्र्य असल्याने, असमान परिस्थिती काही काळ दिसून येते. हे फार काळ चालत नाही. कुणीतरी एकाने व्याजदर वाढवण्यात पुढाकार घेतला की नाईलाजाने सर्वांना त्याची री ओढावी वाटते. या सर्व गोष्टींचा विचार करून व्याजदर आता वाढतच राहतील असे वाटते.
15 ऑगस्टपासून सध्या अनेकजण विविध नावाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष ठेव यासारख्या योजना राबवत असून त्यामध्ये ठेव ठेवल्यास नियमित व्याजदाराहून अर्धा ते एक टक्का अधिक व्याजदर देऊ करीत आहेत आणि अनेकजण त्याचा लाभ घेत आहेत या सर्वांनीच काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
★आपल्याला मिळणारे ठेवींवरील व्याज करपात्र असल्याने, तसेच हा व्याजदर महागाईवर मात करणारा परतावा देऊ शकणार नाही. यासाठी असलेल्या विविध पर्यायांचा विचार करायाला हवा.
★प्रत्येक पर्याय कमी अधिक प्रमाणात धोकादायक आहे आपली जोखीम स्वीकारण्याची पात्रता लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य पर्यायाची निवड करावी.
★रकमेची सुयोग्य विभागणी करावी ताबडतोब रोख रकमेत रूपांतर करणाऱ्या पर्यायात, त्यावरील परताव्याचा विचार न करता आपल्या जरुरीएवढी रक्कम हवीच.
★बाजार जोखिमीशी संबंधित असलेले पर्याय टाळता येणे कठीण आहे जरी ते धोकादायक असले तरी त्यातून मिळू शकणारा परतावा महागाईवर मात करणारा आहे. याशिवाय अशा योजनांना करामध्ये असलेल्या सवलती पहाता त्या अधिक आकर्षक आहेत.
★अशा सर्व योजनांतील मूल्यांकन (Credit Ratings) आणि व्याजदर महत्वाचे असून त्याची निवड करताना रेट आणि रेटिंग विचारात घ्यावे.
©उदय पिंगळे
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेले मते अर्थ अभ्यासक म्हणून वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 2 डिसेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)