Friday, 6 May 2022

एमएफ सेन्ट्रल

#एमएफसेंट्रल म्युच्युअल फंडाच्या 44 मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आहेत. गुंतवणूकदारांना उपयुक्त अशा 39 प्रकारात विभागलेल्या 2500 हून अधिक योजना त्यांच्याकडे आहेत. त्यात मार्च 2022 अखेपर्यंत गुंतवणूकदारांनी 3770296 कोटी रुपये गुंतवले आहेत. या सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या ग्राहकसेवा कॅम्स लिमिटेड आणि के फिनटेक लिमिटेड या दोन कंपन्याकडून दिल्या जातात, त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने दिल्या जातात. यातील 67% वाटा कॅम्स लिमिटेड तर 33% वाटा के फिनटेक कडे आहे.गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी त्यांची मोबाईल अँप देखील आहेत. या कंपन्यांच्या दोन्ही अँपमुळे गुंतवणूकदारांच्या सर्व गरजा पूर्ण होतात. या दोन्ही कंपन्यानी एकत्र येऊन गुंतवणूकदारांना सेवा द्यावी असा प्रस्ताव होता. एमएफसेंट्रलमुळे तो पूर्ण होत आहे. त्यांनी एकत्र येऊन संकेतस्थळ आणि मोबाईल अँप बनवले असून सर्व मालमत्ता कंपन्यांच्या बहुतेक ग्राहकसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. *एमएफ सेंट्रल तुमच्या सर्व मालमत्ता कंपन्यांच्याकडे असलेल्या गुंतवणुकीचा शोध घेईल. *या योजना शोधण्यासाठी पॅन आणि मोबाईल क्रमांक याचा वापर केला जाईल. *हे युनिट खातेपत्रकाच्या स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कसेही असले तरी चालतील. *मात्र सध्या उपलब्ध सर्व प्रकारच्या सेवा या खातेपत्रकाच्या स्वरूपात असलेल्या आणि काही सेवा ज्यांचे एकत्रित बाजारमूल्य ₹ 10 लाखाच्या आतील असेल अशा योजनांपुरत्या मर्यादित असतील. यामुळे गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या सेवा *माझे पूर्ण गुंतवणूक पत्रक (My Portfolio) यात खातेपत्रक स्वरूपात आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कोणत्या योजनेचे किती युनिट आहेत ते समजेल. *विविध सेवा विनंत्या- IDCW पर्याय बदलणे इ मेल बदलणे मोबाईल क्रमांकात बदल करणे. एका योजनेच्या विविध खात्यांचे एकत्रीकरण. चुकांची दुरुस्ती बँक खात्यातील बदल वारस नोंद किंवा त्यातील बदल अन्य बँक खात्यांशी जोडणी बँक IFSC मधील बदल खातेधारकाच्या अधिवासातील बदल म्हणजे निवासी भारतीयाचे अनिवासी भारतीयात किंवा अनिवासी भारतीयाचे निवासी भारतीयात रूपांतर. *खातेधारकाच्या मृत्यूनंतर युनिट वारसदारांना वर्ग करण्याची क्रिया. *FATCA/CRS यांची माहिती भरून देण्यास. खातेदार सज्ञान झाल्याची नोंद (minor to major) करण्यासाठी. *मुळातील करकपात टाळण्यासाठी 15/G किंवा 15/H या फॉर्मचा स्वीकार करण्यासाठी. *याशिवाय आपल्या खात्याची स्थिती पाहणे, न मिळालेला डिव्हिडंड मिळवणे एकत्रित खातेपत्रक मिळवणे ही सर्व कामे केली जातील. यामध्ये आपली वैयक्तिक आणि गुंतवणूकीची सर्व माहिती आपल्या रजिस्ट्रारकडेच सुरक्षित असेल. त्यांच्या केंद्रीय यंत्रणेकडे गुंतवणूकदारांची माहिती सुरक्षित राहून फक्त कामाच्या जरुरीप्रमाणे लागणाऱ्या माहितीची मर्यादित स्वरूपात सुरक्षित वातावरणात देवाणघेवाण होईल. एमएफ सेन्ट्रल कसे वापरायचे? *यासाठी प्लेस्टोर वरून एमएफ सेंट्रल हे अँप डाऊनलोड करावे. चित्रातील लोगो पहावा. *Get started यावर क्लिक करावे. *यानंतर अँप चालू करण्यासाठी पॅन आणि मोबाईल क्रमांक मागितला जाईल. तो देऊनI am not robot वर क्लीक करावे. *नियम अटी मान्य कराव्या. *यानंतर येणारा ओटीपी टाकून आपली ओळख पटवणारे 5 प्रश्न निवडावेत आणि त्याची उत्तरे नोंदवावी. *आता आपले अँप सज्ज झाले असून युजर आय डी म्हणून पॅन टाकावा आणि पासवर्ड सेट करावा लॉग इन करावे आणि पिन सेट करावा म्हणजे अँप सर्व सेवा देण्यास योग्य होईल. *यानंतर कधीही अँप उघडक्यावर Get strated ऐवजी log in वर क्लीक करून युजर आय डी म्हणजे पॅन, आपण नोंदवलेला पासवर्ड, ओळख पटवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आणि पिन टाकावा म्हणजे अँप उघडून अनेक दालने उघडतील. *यातील सर्वात पहिले दालन न नोंदवलेल्या खात्यांचे असेल यात आपल्याकडे असलेले विविध युनिट खाती ज्यावर वेगळा मोबाईल क्रमांक नोंदला आहे त्यांची माहिती मिळेल. यातील जी खाती एमएफ सेंट्रलशी जोडण्याची विनंती करता येईल. *दुसरे दालन व्ह्यू पोर्टफोलिओ यावर क्लिक केल्यावर आपला एकत्रित फॉलिओ खातेपत्रकाच्या नुसार किंवा डी मॅट खात्यानुसार दिसेल. यात एकूण गुंतवलेली एकत्रित रक्कम त्याचे चालू बाजारमूल्य यातील निव्वळ नफा तोटा आणि त्याची गुंतवणुकीशी टक्केवारी दिसेल. याच्याच खाली मालमत्तेचे विभागणी गुंतवणूक प्रकारानुसार किंवा फंड हाऊस नुसार पाहता येईल. *याखाली दालन सेवा विनंतीचे असून एमएफ सेन्ट्रलशी जोडलेल्या खात्यासंबंधीच्या 14 प्रकारच्या सेवा विनंत्या स्वीकारल्या जातील. एकत्रित गुंतवणुकीचे बाजारमूल्य 10 लाखाहून अधिक असल्यास काही विनंत्या जसे बँक खात्यातील बदल, अन्य खात्यांशी जोडणी या सारख्या विनंत्या मान्य होणार नाहीत. *याखालील दालन आपण केलेल्या विनंतीवरील कार्यवाही पाहण्याचे आहे. *एमएफ सेन्ट्रलच्या होम पेजवरून एंटरला क्लीक करूनही या सर्व गोष्टी आपल्याला करता येतील. याशिवाय जर एखाद्या फंड हाऊसकडे मागणी न केलेला डिव्हिडंड असेल तर तो पाहून त्याची मागणी करता येईल. त्याच्या शेजारी असलेल्या 4 वेगवेगळ्या आयकॉन वरून सर्व्हिस डॅशबोर्डवरून किती विनंत्या केल्या त्यातील किती मान्य झाल्या किती पेंडीग आहेत ते समजेल त्याशेजारील आयकॉनवरून सर्वसाधारण प्रश्नाची उत्तरे मिळतील. याच्या शेजारी नोटिफिकेशन आयकॉन असून त्यावर आपल्या विनंतीच्या संदर्भातील सूचना मिळतील. याच्या बाजूच्या आयकॉनवर क्लीक केले असता आपली प्रोफाइल दिसेल त्याचप्रमाणे अँपमधून बाहेर पडता येईल. गेल्यावर्षी डिसेंबर अखेर आलेले हे अँप काहींना उपयुक्त असून त्यात - *डी मॅट खात्या संदर्भात असलेल्या सेवा विनंत्या स्वीकारल्या जाव्यात *₹10 लाख बाजारमूल्य असल्यास नाकारल्या जाणाऱ्या विनंत्या स्वीकारल्या जाव्यात. *युनिट विमोचन Redemption requests स्वीकारल्या जाव्यात. यासारख्या काही सुधारणा होणे नजीकच्या काळात अपेक्षित असून त्यामुळे लवकरच हे अँप सर्वाना उपयोगी पडेल अशी आशा बाळगूयात. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 6 मे 2022 रोजी पूर्वप्रकाशीत. हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी- माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक, https://udaypingales.blogspot.com/?m=1 'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक, https://www.facebook.com/pingaleuday/

No comments:

Post a Comment