Friday, 28 January 2022

सा₹थी

#सा₹थी सन 1988 रोजी सेबीची स्थापना होऊन त्यांना 12 एप्रिल 1992 रोजी कायदेशीर अधिकार मिळाले. या घटनेस लवकरच 40 वर्षे पूर्ण होतील. आज अनेक वर्षे उलटल्यावर त्याच्या स्थापनेमागील महत्वाचा उद्देश म्हणजे 'गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण' हे कितपत साध्य झाले हा कायमच वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. सुरुवातीला ही यंत्रणा चाचपडत होती असे आपण समजू शकतो परंतू अलीकडच्या काळात कार्वी, अनुग्रह, एनएससी को लोकेशन घोटाळा यासंदर्भात आधी संकेत मिळूनही सेबीने डोळेझाक केलली ही प्रकरणे न्यायालयीन कारवाईत आहेत. अनेक ब्रोकर्स नादार होऊनही बाजारातील गुंतवणूकदार रक्षण फंडातून त्यांना नियमानुसार मिळू शकणारे पैसे त्यांना मिळालेले नाहीत. 6 ऑगस्ट 2013 पासून नॅशनल स्पॉट एक्सचेंजवरील व्यवहार बंद होऊनही काही गुंतवणूकदारांना अद्याप त्यांची बरीच रक्कम मिळायची बाकी आहे. गुंतवणूकदार शिक्षण या नावाखाली म्हणजे तारांकित सेमिनार प्रायोजित करणे एवढेच चालू आहे. तक्रार निवारणात आलेली तक्रार संबंधितांना पाठवणे त्याचे पुढे काय झाले याबाबत पुरेसा पाठपुरावा केला जाऊन किती तक्रारींची खरोखर सोडवणूक झाली हा संशोधनाचा विषय आहे. या सर्व निराशाजनक पार्श्वभूमीवर 19 जानेवारी 2022 रोजी गुंतवणूकदारांना उपयुक्त होईल असे 'सा₹थी' या नावाचे अँड्रॉईड आणि आयओएस या यंत्रणेवर चालणारे दोन्ही प्रकारचे मोबाइल अँप सेबीने सुरू करून खऱ्या अर्थाने सामान्य गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्याच्या दृष्टीने एक मोलाचे पाऊल उचलले आहे. प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर याच नावाची अनेक अँप असल्याने केवळ Saa₹thi यातील 'R' च्या जागी रुपयांचा '₹' हा लोगो टाकला आहे. ते अँप सेबीचे आहे ते डाउनलोड करून चालू करावे लागेल. यासाठी नाव, इ मेल, फोन नंबर, पासवर्ड आणि इच्छा असल्यास पॅन टाकून नोंदणी करावी लागेल त्यानंतर एक ओटीपी येईल तो टाकून किंवा आपले फेसबुक, गुगल खात्याचा संदर्भ देऊनही नोंदणी करता येईल आणि लॉग इन प्रक्रिया पूर्ण होईल. हे सर्व न करताही पाहुणे सदस्य म्हणूनही आपण तेथे जाऊ शकता. याप्रमाणे लॉग इन करून अथवा न करता या अँपच्या मुखपृष्ठावर (Home page) जाता येईल. तेथे भांडवलबाजाराची ओळख, शंका आणि तक्रार मागोवा, सेबीची माहिती, गुंतवणुक कशी करू?, सेबीची संसाधने, सेबीशी संपर्क असे सहा प्रमुख विभागांची सहा दारे दिसतील. उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक केले असता आपल्याला भाषा आणि अँप मधून बाहेर पडण्याचा मार्ग असे दोन पर्याय दिसतील. भाषा मध्ये इंग्रजी आणि हिंदी असे दोनच पर्याय आहेत त्याचा वापर करून आपणास भाषा बदलता येईल. याखाली असलेल्या एक्झिटवर क्लिक केले तर अँपमधून बाहेर पडता येईल. मुखपृष्ठावरील पहिल्या म्हणजेच भांडवलबाजारची माहिती या दरवाजातून प्रवेश केल्यावर सहा उपविभाग येतील यातील सेबी आणि भांडवलबाजार यात सेबीची स्थापना उद्देश याविषयी माहिती आहे. त्याखाली असलेल्या म्युच्युअल फंड आणि इटीएफ यावर गेल्यास त्यांची प्राथमिक माहिती दिली आहे. याखाली असलेल्या उपविभागात रिटस आणि इनव्हीट याची प्राथमिक माहिती दिली आहे. याबाजूला असलेल्या उपविभागात शेअर्सविषयीची प्राथमिक माहिती आहे यात दुय्यम बाजारात व्यवहार करण्यासाठी खाते उघणे या विषयी माहिती आपला ग्राहक ओळखा (KYC), डिपॉजीटरी सेवा याविषयी माहितीच्या लिंक्स आहेत. याखाली असलेल्या उपविभागात कर्जरोख्याविषयी प्राथमिक माहिती आहे. याखाली असलेल्या उपविभागावर गेले असता डेरीवेटीव म्हणजेच व्युत्पन्न करारासंबंधी संबधित प्राथमिक माहिती आहे. मुखपृष्ठावरील शंका आणि तक्रार मागोवा या दरवाजातून गेलो असता तक्रार निवारण कसे करावे याविषयीच्या माहितीची लिंक असून खाली सेबीची SCORS ही तक्रार निवारण यंत्रणा, काही चौकशी करायची असल्यास माहिती मागवण्याची सोय, सेबीचे गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेले टोल फ्री संपर्क क्रमांक, शेअरबाजार, बस्तूबाजार, सिडिएसएल, एनएसडीएल याचे तक्रार करायची असल्यास त्यांना थेट मेल करण्याची सोय आहे. यापुढील विभाग आहे सेबीची माहिती असणारा या दारातून प्रवेश केला असता यात सहा उपविभाग आहेत त्यातील पहिला भाग सेबी कशासाठी? याची माहिती देतो, दुसरा भाग सामान्यतः विचारले जाणाऱ्या प्रश्नाचा असून वेगवेगळ्या 28 मुद्यांशी संबधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे आहेत. त्यापुढील विभागात सेबीशी संबंधित बाजारातील 7 महत्वाच्या वेगवेगळ्या मध्यस्थाची नावे पत्ते फोन नंबर आहेत. यापुढील उपविभाग सेबीची भांडवल बाजारातील भूमिका, त्यांनी काढलेली विविध परिपत्रके, नोंदणीकृत कंपन्या रजिस्ट्रार या सारख्या 35 प्रकारच्या सहभागी माध्यस्थांची माहिती देणारे आहेत. यानंतरचा विभाग गुंतवणूक कशी करायची? यावर दरवाजातून गेले असता, अनुक्रमे गुंतवणूक म्हणजे काय? भांडवलबाजारात गुंतवणूक कशी करायची? भांडवलबाजाराच्या अभ्याससंबंधीत शैक्षणिक माहिती असलेल्या पुस्तिका, बचत गुंतवणूक यातील फरक, केवायसी संबधित माहिती, वेगळे व्हीडीओज आणि कार्यशाळा यांची माहिती आहे. यापुढील विभाग सेबीच्या साधन संपत्तीचा विभाग असून सेबीसंबंधीत ताजी माहिती, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा, सेबीचे संकेतस्थळ, गुंतवणूकदारांची सनद, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सुरू झालेल्या विविध उपक्रमांची माहिती आहे. सेबीच्या मुख्य आणि वेगवेगळ्या स्थानिक कार्यालयांचे पत्ते आणि संपर्क क्रमांक आहेत या ठिकाणी थेट जाण्याचा स्वतंत्र दरवाजा मुख्य पानावरही आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअरबाजाराशी संबंधित प्राथमिक संकल्पना, केवायसी प्रोसेस, बाजार व्यवहार परिपूर्ती, चालू घडामोडी, तक्रार निवारण यंत्रणा या सर्वांसाठी उपयुक्त होईल असे हे अँप असून यात अजून काही गोष्टींचा समावेश करून अधिक परिपूर्ण होऊ शकते त्याप्रमाणे त्यात वेळोवेळी बदल केले जाणार असून लवकरच हे प्रादेशिक भाषांत उपलब्ध करून देण्याचा मानस आहे असे म्हणतात. त्याप्रमाणे ते खरोखरच उपलब्ध झाले तर खऱ्या अर्थाने सर्वच गुंतवणूकदारांना त्याचा अधिक चांगला उपयोग होईल. मुंबई शेअरबाजार महाराष्ट्रात असून त्याच्या प्रशिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळा अल्प आणि दीर्घ मुदतीचे प्रमाणपत्र वर्ग, पदवी, पदव्युत्तर, पदविका, प्रगत अभ्यासक्रम किंचित महाग परंतू अत्यंत उपयोगी आहेत. हे प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम केवळ इंग्रजी माध्यमात उपलब्ध आहे. शेअरबाजार चालू होऊन 146 वर्षे उलटल्यावर आणि बाजाराचे प्रशिक्षण केंद्र सुरू होऊन 47 वर्षे होऊन गेल्यावरही किरकोळ पुस्तिका, पत्रके, जाहिराती सोडून आज शेअरबाजारा विषयीचे खात्रीशीर साहित्य आणि अभ्यासक्रम बाजार व्यवस्थापनाकडून मराठीत उपलब्ध नाही आणि येथील राज्यकर्त्यांना ते मराठीत असावेत असे वाटत नाही हे मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सर्व गुंतवणूकदारांना उपयोग होईल असे द्वैभाषिक अँप निर्माण करून विनामूल्य उपलब्ध केल्याबद्दल सेबीचे मनःपूर्वक अभिनंदन! ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 28 जानेवारी 2022रोजी पूर्वप्रकाशीत. हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी- माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक, https://udaypingales.blogspot.com/?m=1 'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक, https://www.facebook.com/pingaleuday/

Friday, 21 January 2022

आयपीओ नवीन नियमावली

#आयपीओ_नवीन_नियमावली सन 2021 हे भांडवल बाजाराच्या दृष्टीने अतिशय चांगले वर्ष गेलं असं म्हणावं लागेल. या पूर्ण वर्षभरात सेन्सेक्समध्ये 22% तर निफ्टीमध्ये 24% अशी घसघशीत वाढ नोंदवली गेली. याच कालावधीत 63 कंपन्यांनी प्रारंभिक भागविक्री करून ₹ 119882 कोटी रुपये जमा केले. या सर्व कंपन्या त्यांनी विक्रीस काढलेल्या भांडवलाहून अधिक रक्कम जमा करू शकल्या म्हणजेच त्यांची भागविक्री यशस्वी झाली असे म्हणता येईल. अशी भागविक्री करण्याचे अनेक हेतू असतात त्यातील महत्वाचा भाग खाजगी कंपनी ऐवजी सार्वजनिक मर्यादित कंपनीस करात मिळणारी सूट. यात अधिक जोखीम स्वीकारून गुंतवणूक केलेल्या मूळ भागधारकांना चांगली किंमत मिळून आपले समभाग बाजारात विकण्याची संधी. कंपनी लौकिकात वाढ होऊन भविष्यकालीन योजनांना माफक दरात कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता या सारख्या अनेक गोष्टी शक्य होतात. जर ही भागविक्री याशिवाय एखाद्या खास हेतूने उदा नवीन व्यवसायसंधी शोधण्यास सध्याच्या व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यास केली असेल तर अत्यल्प दराने भांडवल जमा करण्याची संधी मिळते. कारण यावर व्याज द्यावे लागत नाही, लाभांश देण्याची सक्ती नाही. फायद्यात असणाऱ्या कंपनीने भांडवल बाजारात आरंभीची भागविक्री करताना किती अधिमूल्य यावर कोणतेही बंधन नाही. त्याचप्रमाणे स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी जर कंपनीत वित्तीय संस्थांची 25% हून अधिक गुंतवणूक असल्यास त्यांनाही पाहिजे ते अधिमूल्य घेण्याची परवानगी आहे. यापूर्वी हे अधिमूल्य अर्थखात्याच्या कंट्रोलर ऑफ कॅपिटल इशूज यांच्याकडून ठरवण्यात येत असे. त्याचे निकष खूप कडक असल्याने अवास्तव अधिमूल्य मिळवणे जवळपास अशक्य होते. या पूर्ण विभागाचे सेबीमध्ये विलीनीकरण झाले. जेव्हापासून कितीही अधिमूल्य मिळवण्यास परवानगी मिळाली तेव्हापासून सर्वच कंपन्या त्यांना अधिमूल्य अधिक कसे मिळेल हे पाहू लागल्या.बाजार वाढत असणे ही त्यांच्यासाठी पर्वणीच होती त्यामुळे याचाच अधिकाधिक फायदा या कंपन्या घेत आहेत. हे करणे बेकायदेशीर नसल्याने त्यात काही अनैतिक आहे असे त्यांना वाटण्याची शक्यता नव्हती. या नियमानुसार तोट्यातील कंपन्या वित्तीय कंपन्यांना भांडवल देऊन त्यांच्याशी मधुर संबंध जुळवू लागल्या. अनेकांनी त्यास विरोध केला त्यामुळेच वर्षभरात काही भागविक्री कायम चर्चेत राहिल्या यात पेटीएम, झोमॅटो, नयका, पॉलीसीबाजार यासारखे मोठे इशू आहे लइशू येण्यापूर्वी आणि नंतर त्यांच्या किमतीबद्धल वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून लिहिण्यात आले त्यात प्रारंभिक भाग विक्रीच्यावेळी आकारण्यात आलेले अधिमूल्य वाजवी आहे का? तोट्यात असलेल्या कंपन्याचे मूल्यांकन करताना सध्याची नियमावली योग्य आहे का? यातील मोठ्या गुंतवणूकदारानी आपली गुंतवणूक किमान किती दिवस ठेवायला हवी असे या निमित्ताने झालेल्या चर्चेचे मथळे होते. या सर्वांचाच परिणाम होऊन सेबीने नवीन वर्षांपासून भागविक्रीच्या नियमात काही बदल केले आहेत. हे सर्व नियम 1 एप्रिल 2022 पासून बाजारात येणाऱ्या सर्व प्रारंभिक भागविक्रीस लागू होतील. चालू वर्षातील भागविक्रीत देहलीवरी, ओयो, मोबीक्विक, फार्माईजी, बायजु, एलआयसी यासारखे मोठे आणि चर्चेत असलेले असलेले इशू आहेत. बदललेल्या नियमावलीचा, कंपन्या आणि गुंतवणूकदार याच्यावर काय परिणाम होऊ शकेल याचा विचार करूया. यापूर्वी फार पूर्वी अस्तीत्वात असलेल्या ज्या सूत्रानुसार अधिमूल्य घेण्यात येत होते, आता बदललेल्या परिस्थितीत ती पुन्हा आणणे म्हणजे नविन बदलांना नकार देणे असे होईल म्हणूनच नियमावलीत थोडे बदल करून सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करता येईल का? त्यादृष्टीने आपण यासर्वांकडे पाहुयात. ★निधी उभारणीचा उद्देश आणि लक्ष यावरील निर्बंध- यापूर्वी आयपीओ माध्यमातून भांडवल उभारणी करताना जमा रकमेचा विनियोग कसा करणार हे जाहीर करायचे बंधन नव्हते नव्या नियमानुसार व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवणूक केली जाणार नसेल एकूण जमा लक्षाच्या 35% रक्कमच उभारता येईल. एखादा व्यवसाय ताब्यात घ्यायचा नसेल तर 25% अधिक रकमेची उभारणी करता येणार नाही. यामुळे केवळ बाजार वरच्या पातळीवर आहे म्हणून प्रारंभिक भागविक्री करणाऱ्या कंपन्यांना निधी उभारण्यावर मर्यादा येतील. यातील कायदेशीर प्रक्रियांची त्यांना पूर्तता करावी लागेल. ★आयपीओद्वारे जमा रकमेच्या वापरावर मूल्यांकन कंपन्यांचे लक्ष: या पूर्वी जमा केलेल्या रकमेवर कोणतेही नियंत्रण नव्हते नवीन नियमानुसार विशिष्ट हेतूने उभारलेल्या भांडवलावर त्याचा पूर्ण वापर होईपर्यंत मूल्यांकन कंपन्या लक्ष ठेवतील. ■यामुळे निधीच्या गैरवापरावर आळा बसू शकतो याची अंमलबजावणी कशी होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरेल, नाहीतर असा नियम केवळ कागदोपत्री राहील. ★मुक्त प्रीमियमवर निर्बंध: नवीन नियमानुसार बुक बिल्डिंग पद्धतीने भाव निश्चित करताना त्याच्या किमान प्रीमयमहुन कमाल प्रीमियम 105% अधिक हवा असे सुचवले आहे. म्हणजेच जर किमान प्रीमियम ₹100 असेल तर कमाल ₹ 205 असावा. ■यामधील फरक मोठा असल्याने शेअरची योग्य किंमत शोधण्यास मदत होऊ शकेल आणि सामान्य गुंतवणूकदारांना त्या किमतीत शेअर्स मिळतील. ★विद्यमान भागधारकांना त्याचे शेअर विकण्यावर निर्बंध(OFS): इशू येण्यापूर्वी 20% हुन अधिक भांडवल असलेल्या भागधारकांना शेअर विक्री करण्यावर कोणतेही बंधन नव्हते. नवीन नियमानुसार असे लोक आपल्याकडे असलेल्या शेअर्सपैकी 50% शेअर्सच विकू शकतील. ज्यांचे भागभांडवल कमी आहे त्यांना इश्यू पूर्वीच्या 10% भांडवलाहून अधिक भांडवलाची विक्री करता येणार नाही. ■यामुळे प्रवर्तकांना पूर्णपणे वाढीव भावामुळे होणारा फायदा घेता येणार नाही. नंतर दुय्यय बाजारात काही गडबड झालीच तर सामान्य गुंतवणूकदारांना ज्याप्रमाणे आपल्याकडील शेअर्स विकणे कठीण जाते तीच वेळ प्रवर्तकांवर येईल. ★अँकर गुंतवणूकदारांना गुंतवणूक लगेच काढून घेण्यावर निर्बंध: सामान्य गुंतवणूकदारानी भागविक्रीस चांगला प्रतिसाद द्यावा म्हणून संस्थापक गुंतवणूकदाराना विशिष्ट संख्येने शेअर्स दिले जात ते त्यांना लगेच विकता येत होते. नवीन नियमानुसार शेअर दिले गेल्याच्या 30 दिवसांनी 50% आणि 90 दिवसांनी सर्व शेअर्स विकता येतील. ■हमखास फायद्यासाठी अशी गुंतवणूक करण्यावर काही प्रमाणात अंकुश बसेल. याशिवाय ■2 लाखाहून अधिक परंतू 10 लाखाच्या आत शेअर्सचे लॉट भरणाऱ्या गुंतवणूकदारांना HNI मधील कोट्यातील 33% शेअर्स राखून ठेवले आहेत त्यामुळे या गटातील व्यक्तींना अधिक शेअर्स मिळण्याची शक्यता आहे याचा सामान्य गुंतवणूकदार म्हणून काही संबंध येत नसला तरी केवळ असा बदल प्रस्तावित आहे हे माहिती असावे म्हणून लक्षात आणून देत आहे. या सर्वच बदलांचा सकारात्मक दृष्टीने नव्या आर्थिक वर्षात काय प्रभाव पडतो ते पाहुयात. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 21 जानेवारी 2021 रोजी पूर्वप्रकाशित ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे ! अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे या ब्लॉगची लिंक https://udaypingales.blogspot.in/?m=1 अर्थसाक्षरतेच्या दिशेने या फेसबुक पेजची लिंक https://www.facebook.com/pingaleuday/. हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 14 January 2022

संगणकीय सुवर्ण पावती EGR

#संगणकीय_सुवर्ण_पावती (EGR) गुंतवणूक या दृष्टिकोनातून, आपण सोने या धातूकडे आजपर्यंत कधी पाहिलेच नाही. एकहाती किंवा थोडे थोडे सोने जमा करून त्यात भर घालून मनाजोगते दागिने करणे एवढाच आपला सोन्याशी संबंध. संस्कार, परंपरेची जपणूक, प्रेमाचे प्रतीक आणि पिढीजात वारसा म्हणून याची आवश्यकता असली तरी खऱ्या अर्थाने ही गुंतवणूक होत नाही. नवीन शैलीचा दागिना बनवायला जितक्या सहजतेने जुने दागिने मोडले जातात त्या तुलनेत अत्यंत कठीण प्रसंगातही ते विकून पैसे उभे उभारणे होता होईतो टाळले जाते त्यामुळे यातून मानसिक समाधानाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष परतावा मिळत नाही या उलट अशा स्वरूपाच्या व्यवहारात वजनात घट आणि मजुरी यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून आपले नुकसानच होते याशिवाय त्यावर कर द्यावा लागतो. सोने हे पर्यायी चलन म्हणून समजले जाते, चलन या शब्दाचा  संबंध गतिमानतेशी आहे. जेव्हा त्याचे दागिने बनतात तेव्हा त्याची गती म्हणजे हालचाल थांबते. तेव्हा आपल्या गरजेहून अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने घेणे यात आर्थिक नुकसान आहेच याशिवाय सुरक्षितपणे साठवण्याची जोखीम आहेच. आपली गुंतवणूक विविध प्रकारात विभागून असावी. ती सुरक्षित, महागाईहून अधिक परतावा देणारी असावी आणि त्यात रोकडसुलभता असावी. गेल्या 10 वर्षात विविध गुंतवणूक प्रकारांनी महागाईच्या तुलनेत किती परतावा दिला हे तपासून पाहिले असता शुद्ध स्वरूपातील सोन्यास हे तिन्ही निकष लागू पडतात. सोन्यातून मिळालेला परतावा 10% असून तो महागाईवर मात करणारा आहे. मोठ्या आर्थिक संकटात लोकांचा प्रचलित चलनावरील विश्वास कमी होऊन ते अधिक प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करीत असल्याने सुवर्ण गुंतवणुकीचे महत्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. आपल्या एकूण गुंतवणुकीतील 10% भाग  सोन्यामध्ये असावा याबाबत सर्व गुंतवणूक तज्ञांमध्ये एकमत आहे. हा धातू दुर्मिळ आणि जगमान्य असल्याने त्यांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. जगभरातील बँकांची पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्यास प्रथम पसंती आहे. गुंतवणूक म्हणून सोने खालील प्रकारांनी खरेदी करता येईल. ★नाणे / वळे स्वरूपात सोन्याची खरेदी : बँकेतून किंवा सोनाराकडून अशी खरेदी कधीही अथवा सुमुहूर्तावर करता येईल. यावर 3% जीएसटी द्यावा लागतो. खरेदी विक्रीचे दर प्रचलित बाजारभावाशी मिळतेजुळते असतात. दुकानात खरेदी आणि विक्रीचे दरपत्रक लावलेले असते. विक्रीचा भाव  खरेदीच्या भावाहून अधिक असतो. बँकेतील सोन्याची विक्री किंमत प्रचलित बाजारभावाहून अधिक असते याशिवाय ते विकायचे असल्यास बँका विकत घेत नाहीत. ★सुवर्ण संचय योजना: अनेक सोनारकडे अशा योजना असून त्याद्वारे दरमहा पैसे भरून मुदत पूर्ण झाली की काही रक्कम बोनस म्हणून जमा होईल त्याचे सोने घेऊन घडणावळीत सूट अशा स्वरूपाची ही योजना असते. दुसऱ्या प्रकारच्या योजनेत आपल्याकडील सोने विशिष्ठ कालावधी करता ठेवून त्याबद्धल पैसे किंवा सोने अशा स्वरूपाची ही योजना आहे. सोने ठेवल्याबद्दल पैसे घेण्यापेक्षा त्यावर सोने घेणे अधिक फायदेशीर आहे. यामध्ये आपण ज्या पेढीशी हा व्यवहार करणार तिची विश्वासहर्ता महत्वाची असून यात फसवणुकीचे प्रकार झाल्याने अनेक गुंतवणूकदारांचे खूप नुकसान झाले आहे. सोन्यावर सोने देणाऱ्या योजनांवर रिजर्व बँकेने बंदी आणली असून अशा योजनांचा लाभ विद्यमान धारकांनाच घेता येईल. ★गोल्ड फंडातील गुंतवणूक: यात दोन प्रकारचे फंड आहेत, प्रत्यक्ष सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे आणि अप्रत्यक्षपणे म्हणजे सोन्याच्या फंडात गुंतवणूक करणारे फंड आणि कंपन्या यात गुंतवणूक करणारे फंड. म्युच्युअल फंडाच्या अन्य योजनेप्रमाणे यात एकरकमी किमान ₹ 100/- तर एसआयपी स्वरूपात ₹ 100/- व त्यावर ₹1/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल. यासाठी डी मॅट खाते हवेच ही अट नाही. यातील गुंतवणुकीची विक्री करून फायदा मिळवता येईल. यात उलाढाल कमी असल्याने हजर भावात पडणारा फरक येते ताबडतोब प्रतिबिंबित होत नाही. ★गोल्ड ईटीएफ: हे वेगळ्या प्रकारचे फंड असून त्याचा पुरस्कार करणाऱ्या कंपन्या 95% गुंतवणूक धातूस्वरूपातील सोन्यात करतात बाजारातील सोन्याच्या भावाप्रमाणे यात चढ उतार दिसून येतात. एक ग्रॅम अथवा त्याहून कमी वजन असलेले वेगवेगळे ईटीएफ उपलब्ध आहेत. शेअरप्रमाणे याचे व्यवहार केले जातात. यासाठी डी मॅट खाते असणे गरजेचे असून या युनिटची बाजार भावाप्रमाणे खरेदी विक्री करता येऊन फायदा मिळवता येईल अथवा नियमानुसार युनिट जमा करून त्याबदल्यात प्रत्यक्ष सोने घेता येईल. ★ई गोल्ड : एमसीएक्स, एनसिडीएक्स या वस्तुबाजारात यातील पुढील तारखेचे म्हणजे भविष्यातील व्यवहार होतात. यातील भावातील फरक मिळवणे किंवा प्रत्यक्ष वस्तू ताब्यात घेऊन व्यवहारपूर्ती करणे असे दोन्ही पर्याय उपलब्ध असून वस्तुबाजारातील लॉट साइज प्रमाणेच यात व्यवहार होतात. यात डिलिव्हरी घेण्याचे प्रमाण नगण्य असून 98% व्यवहार भावातील फरकाने समायोजित केले जातात. ★डिजिटल गोल्ड : यापद्धतीने अगदी अल्प रक्कम गुंतवून सोने खरेदी / विक्री करता येते. पाहिजे तर ते धातू स्वरूपात रूपांतरित करता येऊ शकते. सध्या अनेक अँप, वॉलेट यांनी आपल्या धारकांना अशा सुविधा दिल्या आहेत. ★सार्वभौम सुवर्ण रोखे: सोने खरेदीमध्ये खर्च होणारे बहुमूल्य परकीय चलन वाचावे या उद्देशाने रिझर्व बँकेने याची निर्मिती केली असून यातील गुंतवणुकीस सरकारी हमी असल्याने ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. ठराविक कालावधीने ते जारी केले जातात. एक रोखा 1 ग्रॅम सोन्याचे प्रतिनिधित्व करतो वर्षभरात एका गुंतवणूकदार ते 4 किलोपर्यंत खरेदी करू शकतो. विक्रीदर घाऊक बाजारातील दराशी निगडित असून डिजिटल व्यवहार करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन म्हणून ₹ 50 सूट मिळते. यातील रकमेवर वार्षिक 2.5% दराने दर सहामाहीस व्याज मिळते 8 वर्षांनी बाजारभावाने रक्कम परत मिळते. दुय्यम बाजारात याची खरेदी विक्री होऊ शकते. मात्र त्यासाठी डी मॅट व ट्रेडिंग खाते असण्याची गरज आहे, याशिवायही हे रोखे खरेदी करता येतील. सोने फक्त खरेदी किंवा खरेदी/ विक्री साठी अनेक पर्याय उपलब्ध असले प्रचलित यंत्रणेतून पारदर्शक पद्धतीने सोन्याच्या बाजारभावाचा शोध घेता येण्यावर अनेक मर्यादा आहेत. यासाठी चालू अर्थसंकल्पात आपल्या अर्थमंत्रांनी कोठार विकास आणि नियामन प्रशिकरणाची निर्मिती आणि स्वतंत्र सुवर्ण बाजाराची स्थापना यांची घोषणा करून त्याचे नियमन सेबीकडे असेल, यासंबंधातील नवी नियमावली लवकरच सेबी जाहीर करेल अशी घोषणा केली होती. यातील अपेक्षेनुसार सोन्याचा भाव हा खऱ्याखुऱ्या मागणी पुरवठा यांनी शोधला जावा यासाठी सोन्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संगणकीय सुवर्ण पावत्या (Electronic Gold Reciepts) तयार केल्या जातील. त्यांना सुवर्ण रोखे म्हणून मान्यता देण्याची सेबीची योजना असून यात शक्य असल्यास स्वतंत्र सुवर्णबाजार निर्माण करण्यास सेबीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे ईजिआर आणि सोन्याचे प्रत्यक्ष स्वीकार आणि वितरण करणारा नियमित सुवर्ण बाजार (Gold Exchange) भविष्यात निर्माण होऊ शकेल. जेथे या ईजिआर ची खरेदी विक्री केली जाईल. त्याची निर्मिती खऱ्याखुऱ्या सोन्याच्या बदल्यात केली गेल्याने यासाठी एक स्वतंत्र व्हॉल्टिंग यंत्रणा तयार करण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेले शेअरबाजार या ईजिआरची खरेदी विक्री करण्यासाठी सध्याच्या बाजारातच स्वतंत्र खरेदी विक्री दालनाची निर्मिती करू शकतात. याबाबत 31 डिसेंबर 2021 ला सेबीने जाहीर केलेल्या अधिसूचनेप्रमाणे व्हॉल्ट व्यवस्थापकांची नोंदणी करण्यात येऊन ईजिआर तयार करण्यासाठी तसेच त्यांच्याकडे ठेवलेल्या सोन्यासाठी व्हॉल्टिंग सेवा प्रदान करण्यासाठीचे मध्यस्थ म्हणून सेबीकडून नियमन केले जाईल.  व्हॉल्ट व्यवस्थापक घातूस्वरूपातील सोन्याचा स्वीकार करून त्याचे ईजिआर रोख्यात रूपांतर करेल. जमा झालेले सोने सुरक्षित ठिकाणी साठवण्यात येईल. डिपॉसीटरीमधील व्यवहारांची नोंद ठेवेल याचप्रमाणे एक्सचेंजमधील झालेले व्यवहार नियमित काळात पूर्ण करेल. व्हॉल्ट व्यवस्थापक म्हणून व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेली व्यक्ती किंवा संस्था ज्यांची किमान संपत्ती ₹ 50/- कोटी असेल. सेबीद्वारा नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र वैध असेल. व्हॉल्ट व्यवस्थापक अन्य कोणताही व्यवसाय करीत असल्यास सोने साठवण्यासाठी, ईजिआर व्यवसायासाठी स्वतंत्र जागा आणि साठवणुकीचे ठिकाण असणे गरजेचे आहे. या जागेत अन्य वस्तूंचा साठा करता येणार नाही. व्हॉल्टिंग सेवेसंबंधीत सर्व व्यवहार करण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, सोन्याची शुद्धता तपासणारी यंत्रणा, ईजिआर निर्मिती आणि रद्द करण्याची त्याचप्रमाणे यासंबंधातील तक्रार निवारण करणारी यंत्रणा त्याचप्रमाणे व्यवहार तपशील पुढील पाच वर्ष जपून ठेवण्याची यंत्रणा असणे आवश्यक आहे. व्हॉल्टमध्ये सोने ठेवण्यासाठी ईजिआर बनवण्यास कोणत्याही व्यक्तीस रीतसर विनंती करावी लागेल. ते सोने जमा करून त्याचे वजन शुद्धता तपासून ईजिआरची निर्मिती करून त्याच्याकडे असलेल्या डिपॉसीटरीकडील धारकाच्या लाभार्थी मालक खात्यात तेवढे सोने जमा करेल. याचप्रमाणे सोने धातूरूपात पाहिजे असलेल्या गुंतवणूकदारास डिपॉसीटरीकडे विनंती करावी लागेल. याची खात्री करून घेऊन डिपॉसीटरीकडून मान्यता मिळाल्यावर संबंधित गुंतवणूकदारास सोने सुपूर्द करून त्यासमान ईडीआर रद्द करण्यात येईल. सुवर्ण बाजाराच्या हितरक्षणासाठी सेबी संबधित व्हॉल्टची, ठेवींची, कागदपत्रांची तपासणी करू शकेल. ही तपासणी करण्यापूर्वी 10 दिवस आधी व्हॉल्टधारकांना त्याची सूचना देण्यात येईल.  याबाबत सर्व नियम 31 डिसेंबरपासून लागू झाले असून त्यामुळे सुवर्णबाजारात मोठे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक अर्थसाक्षर.कॉम येथे 14 जानेवारी 2021 रोजी पूर्वप्रकाशित ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे ! अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे या ब्लॉगची लिंक https://udaypingales.blogspot.in/?m=1 अर्थसाक्षरतेच्या दिशेने या फेसबुक पेजची लिंक https://www.facebook.com/pingaleuday/. हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .         

Friday, 7 January 2022

चांदीमधील नव्या गुंतवणूक संधी

#चांदीमधील_नव्या_गुंतवणूक_संधी चांदीमध्ये गुंतवणूक ही संकल्पना अनेकांसाठी अपरिचित आहे यासंबंधातील मागील एका लेखात आपण उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा विचार केला होता दागिन्यांच्या बाजारात सोन्याखालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंत होते. त्यात होणारी भाववाढ किंवा घटही सोन्यापेक्षा अधिक अस्थिर आहे त्यामुळे त्यातून परतावाही कदाचित अधिक मिळू शकतो. सोन्याने गेल्या अनेक वर्षात महागाईवर मात करणारा परतावा दिला आहे. दिर्घकाळात चांदीतून चांगला परतावा मिळेल का? आपल्याला काय वाटते. मागील 10 वर्षात सोन्यामधून मिळालेला परतावा 10% तर चांदीमधून मिळालेला परतावा अर्ध्या टक्यापेक्षा कमी आहे. सोन्याखालोखाल जरी चांदीचे दागिने बनवले जात असले जगभरातील स्त्रियांची पहिली पसंती सोन्यास आहे. याशिवाय चांदीचे दागिने मोडून मिळणारी किंमत आणि यामध्ये कापली जाणारी कसर याचा विचार करता असा व्यवहार आतबट्याचा ठरतो. हे दोन्ही धातू उपयुक्त असले तरी सोन्याच्या तुलनेत चांदीचा दर खूपच कमी असल्याने नाणी,वापरातील अनेक वस्तू म्हणजे दैनंदिन उपयोगाच्या वस्तू शोभेच्या वस्तूमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याशिवाय चांदी सर्वाधिक विद्युतवाहक असल्याने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूत त्याचप्रमाणे औद्योगिक वापर केला जातो, फोटोग्राफी मध्येही त्याचा वापर होतो. याच्या भावात बरेच चढउतार होत असल्याने त्यातून गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध होतात. 925 होलमार्क असलेले चांदीचे दागिने 92.5% शुद्धतेचे असतात तर औद्योगिक वापरासाठी लागणारी चांदी 99.99% शुद्धतेची असते. उपलब्ध चांदीमधील अर्ध्याहून अधिक चांदी औद्योगिक वापरासाठी वापरली जाते. चांदीमध्ये सध्या उपलब्ध गुंतवणूक प्रकार- ★नाणी, बार स्वरूपात: आपण सोनाराकडून प्रत्यक्ष नाणी, बार खरेदी करून चांदीमध्ये गुंतवणूक करता येईल याची शुद्धता उत्तम असल्यास 2% प्रक्रिया शुल्क वजा करून पैसे परत मिळू शकतात. ज्या वित्तसंस्था चांदीची विक्री करतात त्या पुनर्खरेदी करीत नाहीत, मात्र अशी चांदी आपल्याकडे असल्यास सोनार ती खरेदी करतात. ★कमोडिटी बाजारात सौदे करून: आपल्याला चांदीच्या भावात पडणाऱ्या फरकाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यातील भविष्यातील सौदे करता येतील. हे सौदे प्रत्यक्ष चांदी घेऊन अथवा त्यातील भावातील फरकाचा लाभ घेऊन अशा दोन्ही प्रकारे करता येतात. कमोडिटी मधील सर्वाधिक सौदे MCX या एक्सचेंज वरती होतात त्यातील 98% सौदे हे भावातील फरकाचा लाभ घेण्याच्या हेतूने केले जातात. सौंदापूर्तीच्या कालावधीपर्यंत खुले असलेले सौदे प्रत्यक्ष पैशांची देवाण घेवाण करून बंद केले जातात. ★इ सिल्व्हर: येथील ब्रोकरेज फर्मनी परदेशी गुंतवणूक संस्थाशी करार करून तर काही परकिय फर्मच्या भारतीय शाखांनी या योजना आपल्या खातेदारांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे नियम अटी किमान दलाली मालमत्ता व्यवस्थापन खर्च याची खात्री करूनच तिथे गुंतवणूक करावी. अनेक स्वदेशी आणि विदेशी कंपन्यांनी डिजिटल माध्यमातून चांदी खरेदी करण्याचा त्याचप्रमाणे पाहीजे असेल तर भावातील फरक किंवा धातुरुपात चांदीची खरेदी पर्याय दिला आहे. ★MMTC या सरकारी कंपनीने स्विझरलँड मधील कंपनीच्या सहकार्याने चांदीची नाणी आणि दागिने खरेदी करण्याचा पर्याय दिला असून ही खरेदी ऑनलाईन ऑफलाईन करता येईल. माईलस्टोन या कंपनीने स्थावर मालमत्ता आणि मौल्यवान धातूंत गुंतवणूक करण्याच्या विविध योजना आणल्या आहेत, परंतू त्यात मोठी किमान गुंतवणूक करावी लागत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या उपयोगाच्या नाहीत. जेथे धातूरूपात प्रत्यक्ष चांदीची देवाण घेवाण होईल तेथे 3% जीएसटी आकारण्यात येतो. या उपलब्ध योजनांमध्ये आता 2 नवीन योजनांची भर पडत आहे. ★सिल्वर इटीएफ: या योजनेत जमा होणारी रक्कम शुद्ध चांदी आणि चांदीसंबंधित उद्योगात केली जाईल. हा म्युच्युअल फंड योजनेसारखा प्रकार असला तरी त्याच्या युनिटची खरेदी विक्री शेअरबाजारात होईल. आयसीआयसीआय म्युच्युअल फंडामार्फत या युनिटची प्रारंभिक युनिट विक्री 5 जानेवारी 2022 पासून 19 जानेवारी 2022 पर्यंत चालू आहे. अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच योजना असून लंडन मेटल एक्सचेंज वरील भावानुसार घाऊक भारतातील चांदीच्या भावावर होणाऱ्या परिणामांचा फायदा मिळवणे हा या योजनेचा हेतू आहे. याचा व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी (0.4 ते 0.5%) असेल. यामुळे धातूस्वरूपात चांदी आपल्याकडे न ठेवता त्याचा फायदा मिळवता येईल. किमान गुंतवणूक ₹100/- त्याहून अधिक गुंतवणूक ₹1/- च्या पटीत असेल. यासाठी डी मॅट खाते असणे जरुरीचे आहे खरेदी विक्रीच्या वेळी नियमानुसार ब्रोकरेज व इतर कर द्यावे लागतील. हजर भावाच्या तुलनेत एक्सचेजवरील भाव काय राहील? हे मागणी पुरवठ्यावर अवलंबून असल्याने अभ्यासावे लागेल. अशाच प्रकारची दुसरी योजना निप्पोन इंडिया फंडाकडून 13 जानेवारी ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत येत असून यातील किमान गुंतवणूक ₹1000/- व त्याहून अधिक गुंतवणूक ₹1/- च्या पटीत असेल. ★सिल्व्हर फंडस ऑफ फंड: फक्त सिल्वर इटीएफ फंडामध्ये गुंतवणूक करणारा हा फंड असून तो अन्य म्युच्युअल फंड योजनेसारखा असेल. अशी योजना निप्पोन इंडिया फंड 13 जानेवारी ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत आणत असून यात किमान ₹100/- आणि त्याहून अधिक ₹1/- च्या पटीत रक्कम गुंतवता येईल. यासाठी डी मॅट खाते हवेच ही अट नाही. आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाने अशाच प्रकारची योजना लवकरच बाजारात आणण्याचे ठरवले आहे. योजना परिचालन खर्च 1% असेल ब्रोकरेज द्यावे लागणार नाही. सोन्याची खरेदी विक्री करण्याच्या तुलनेत चांदीची फक्त खरेदी आणि खरेदी / विक्री करण्यासाठी मोजकेच मार्ग असले ते असे व्यवहार करणे अत्यंत सोपे आहे. खरेदी करताना जगभरात आणि भारतात विविध ठिकाणी चालू असलेला बाजारभाव त्यातील चढ उतार तपासून खरेदी विक्री करण्याचा विचार करावा. उद्योग क्षेत्रात चांदीची मागणी वाढल्याने नजीकच्या भविष्यकाळात चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची जास्त शक्यता आहे असे झाल्यास त्यातून चांगला परतावा मिळू शकतो. सोन्याचे भाव आणि शेअरबाजार यांचे नाते एकमेकांच्या विरोधात आहे म्हणजे निर्देशांक वाढत असल्यास सोन्याच्या भावात कमी वाढ होते तर निर्देशांक कमी झाल्यास सोन्याचे भाव वाढतात. औद्योगिक प्रगती झाल्यास निर्देशांक वाढतो आणि त्याच बरोबर चांदीचे भाव वाढत असतात असे संकेत आहेत. चांदीबाबत नव्याने उपलब्ध झालेल्या इटीएफ आणि एफअँडएफ योजनांची आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या गुंतवणूक संधीची माहिती देणे हाच या लेखाचा उद्देश असून ही गुंतवणूक शिफारस नाही. याबाबत आपला निर्णय गुणवत्तेवर किंवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करूनच घ्यावा. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 7 जानेवारी 2022 रोजी पूर्वप्रकाशीत. हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी- माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक, https://udaypingales.blogspot.com/?m=1 'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक, https://www.facebook.com/pingaleuday/