Friday, 24 September 2021
अपुऱ्या सुधारणांचे डगमग(ते) पाऊल
#अपुऱ्या_सुधारणांचे_डगमग(ते)_पाऊल
नव्वदच्या दशकात ज्या मोठ्या आर्थिक सुधारणा झाल्या त्यातील महत्वाची सुधारणा म्हणजे पुर्णपणे संगणकीकृत व्यवहार होणाऱ्या राष्ट्रीय शेअरबाजाराची निर्मिती. यामुळे मुंबई शेअरबाजारास स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी पूर्णपणे बदलायला लागले. सौंदपूर्तीमध्ये नियमितता आली. व्यवहार निश्चित दिवशी पूर्ण होत असल्याने उलाढालीत प्रचंड वाढ झाली. बदला (हिंदी चित्रपटातील बदला नाही) पद्धतीने पुढे ढकलली जाणारी सौंदपूर्तीनंतर ते नव्याने सुरू झालेल्या डेरिव्हेटिव व्यवहारांत बदलून त्याची पूर्तता महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी, येथपर्यंत आपण पोहोचून आता एक आठवड्यात पूर्ण होणारेही डिरिव्हेटिव्ह व्यवहार शेअरबाजारात होतात. आपोआपच सर्व व्यवहारांत शिस्त आली. सुरुवातीला रोखीच्या व्यवहारांची पूर्तता T+5 पद्धतीने होत असे. यातील T म्हणजे व्यवहार झाला तो दिवस आणि +5 म्हणजे तो दिवस पकडून 5 वा बाजार कामकाज दिवस, ज्यादिवशी या व्यवहाराची पूर्तता केली जाईल म्हणजे शेअर खरेदी करणाऱ्यास शेअर्स विक्री करणाऱ्यास त्याचे पैसे मिळतील. यामध्ये सन 2002 पासून T+3 पद्धतीने होऊन त्यानंतर सन 2003 पासून T+2 अशी व्यवहारपूर्ती होऊ लागली. याचवेळी आपण T+1 व त्याही पुढे जाऊन तात्काळ सौदापूर्तीचे स्वप्न पाहिले होते.
मध्यंतरीच्या कालावधीत हे स्वप्न थोडे मागे पडले आणि आपण केलेली प्रगती आणि वाढलेले सौदाप्रमाण आणि उलाढाल यावर स्वतःची पाठ थोपटून घेऊ लागलो. यात थोडा बदल होऊन आता यादृष्टीने आपण अर्धे पाऊल पुढे टाकले आहे असे म्हणायला हरकत नाही. हे अर्धे पाऊल विदेशी मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी ही मागणी रेटून धरल्याने टाकले आहे. भांडवल बाजार नियामक सेबीने आपल्या 7 सप्टेंबरच्या परिपत्रकानुसार- Circular No.: SEBI/HO/MRD2/DCAP/P/CIR/2021/628
शेअरबाजारांना त्यांची इच्छा असली तर (सक्ती नाही) T+1 पद्धतीने एक अथवा अनेक शेअर्सच्या बाबतीत सौदापूर्ती करण्यास परवानगी दिली असून या परिपत्रकातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे-
*सध्या अस्तित्वात असलेल्या T+2 या पद्धतीबरोबरच T+1 या पद्धतीने, शेअरबाजारात 1 जानेवारी 2022 पासून व्यवहार करता येतील.
*कोणत्या स्टॉक मध्ये अशा व्यवहारास परवानगी द्यायची हे बाजार समिती ठरवेल, त्याचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतला जाईल.
*एक महिन्याची पूर्वसूचना देऊन कोणत्याही शेअर्सची व्यवहारपूर्ती T+1 या पद्धतीने करता येईल.
*ज्या शेअर्सची T+1 अशी व्यवहारपूर्ती पद्धत स्वीकारली आहे त्याच्या रोखीच्या व्यवहारासोबत होणारे मोठे व्यवहार म्हणजेच बल्क डील ब्लॉक डील हे ही याच कालावधीत पूर्ण केले जातील.
*T+1 पद्धत स्वीकारल्यावर त्यात किमान 6 महिने तरी बदल करता येणार नाही.
*T+1, T+2 यांचे व्यवहार वेगवेगळे मोजले जाऊन व्यवहारपूर्ती होईपर्यंत या संबंधातील पैसे आणि शेअर्स एकमेकात मिसळले जाणार नाहीत.
*T+1 पद्धतीने व्यवहार सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधितांना म्हणजेच शेअरबाजार, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉसीटरी यांना आवश्यक ते तांत्रिक बदल करून सज्य राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कारण यापुढे एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या सौदापूर्ती यामुळे कराव्या लागतील. पेमेंट आणि बँकिंग सिस्टिमची सध्याची पद्धत असे व्यवहार करण्यास नक्कीच सक्षम आहे. एक ग्राहक म्हणून गुंतवणूकदार जेव्हा खरेदी करेल तेव्हाच, पैसे दिल्याबद्दल शेअर मिळणे किंवा शेअर विकल्याबद्दल ताबडतोब पैसे मिळणे, हा त्याचा हक्क आहे. जे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य आहे, याप्रमाणे विचार करून भविष्यात सर्व संबधित यंत्रणांनी सज्य राहणे आवश्यक आहे.
मार्जिन नियमात महत्वाचे बदल करून भविष्यात उद्भऊ शकणारा व्यवहारपूर्ती संबधित धोका कमी झाला आहे. आता या नवीन पद्धतीच्या व्यवहारांनी व्यवहारपूर्ती लवकर असल्याने अधिक झटपट व्यवहार होतील त्यामुळे बाजार उलाढालीत वाढ होईल. अनेक दलालांनी अशा प्रकारे दोन पद्धतीने सौदपूर्ती करण्यास विरोध दर्शविला असून एका स्टॉकमध्ये एका एक्सचेंजवर T+1आणि दुसऱ्या एक्सचेंजवर T+2 पद्धतीने व्यवहार होत असतील तर स्टॉकच्या बाबतीत दोन एक्सचेंजमधील इंटरचेंज संबंधित मुद्दे उपस्थित केले असून सेबीच्या पत्रकात केलेल्या स्पष्ट खुलाशामुळे, व्यवहारपूर्ती होइपर्यंत दोन्ही व्यवहार वेगळे समजले जाण्याने हा मुद्दा गैरलागू ठरतो. खरं तर कोणतीही सुधारणा पुढे रेटताना सर्वच बऱ्या वाईट शक्यतांचा विचार करायला हवा. तो तसा केला जात नसावा त्यामुळे निर्णय घेणं आणि जास्त ओरडाओरड झाल्यावर तो मागे घेणं किंवा आधीच्या घोरणाशी विसंगत निर्णय घेण्याचा घटना वारंवार घडत आहेत ज्यामुळे बाजाराची आणि त्यामुळे देशाची प्रतिमा डागाळली जाते जे टाळता येणे शक्य आहे. खरंतर सर्वानाच पूर्णपणे T+1 व्यवहार करण्याची सक्ती करायला हवी होती. असे व्यवहार करताना ब्रोकर आणि व्यवहारकर्ते यांनी व्यवहारपूर्तीच्या दृष्टीने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 24 सप्टेंबर 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment