Friday, 27 August 2021
सट्टेबाज, व्दैध व्यवहार रक्षक आणि संधीशोधक Speculators Hedgers and Arbitragers
सट्टेबाज, व्दैध व्यवहार रक्षक आणि संधीशोधक
Speculators, Hedgers and Arbitrageurs
सध्या शेअरबाजारात शेअर्स, बॉण्ड्स, इटीएफ, इनव्हीट, रिटस, टी बिल्स, सरकारी रोखे, सुवर्ण सार्वभौम रोखे यांचे त्याचबरोबर काही निवडक शेअर, विविध निर्देशांक, चलन, व्याजदर यातील भविष्यातील व्यवहार व पर्याय व्यवहार (F&O) होत असतात. हे व्यवहार, गुंतवणूकदार, विक्रेते, सट्टेबाज, भावात पडणाऱ्या फरकांपासून मालमत्ता नुकसान टाळण्याच्या हेतूने केलेले व्यवहार, दोन बाजारातील किंवा दोन सेगमेंट प्रकारातील भावांमध्ये असलेल्या फरकाचा लाभ घेण्याच्या हेतूने, भावात स्थिरता यावी या हेतूने केलेले व्यवहार अशा प्रकारचे असू शकतात. आपल्याला फक्त शेअर खरेदी किंवा विक्री व्यवहार माहिती असून मालमत्तेच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या 20 हून अधिक पद्धतीत ते करता येतात.
बाजारात कार्यरत गुंतवणूकदार, देशी परदेशी वित्तीय संस्था त्याचे प्रतिनिधी, याशिवाय, दलाली पेढ्या, मार्केट मेकर्स, सट्टेबाज, हेजर्स आरबीट्रेजर्स यांच्याकडून केले जातात. बाजारात स्थिरता येण्यासाठी या सर्वांची गरज आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीचे वाजवी मूल्य मिळवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. यातील सट्टेबाज (Speculators), व्दैध व्यवहार रक्षक (Hedgers) आणि संधीशोधक (Arbitrageurs) यांच्याविषयी थोडं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
सट्टेबाज (Speculators)-सट्टेबाज हा शब्द आपण चांगल्या अर्थी वापरत नाही. खरं तर हे अतिशय सुसंस्कृत सवयी असलेले गुंतवणूकदार ट्रेडर्स असतात, व्यक्ती अथवा संस्था असे ही ते असू शकतात. बाजार नियमांची त्यांना पूर्ण माहिती असते. त्याचा हेतू मोठ्या प्रमाणात व्यवहार करून, कमीतकमी वेळात अधिकाधिक फायदा मिळवणे हाच असतो. दरवेळी असे होईलच असे नसल्याने अशा व्यवहारात मोठा तोटाही होऊ शकतो त्यामुळे बाजाराच्या दृष्टीने हे लोक मोठी जोखीम स्वीकारत असतात. यापूर्वी हे लोक आपल्या आर्थिक ताकदीच्या बळावर बाजारास त्याच्या मर्जीप्रमाणे दिमशा देऊ शकत होते यामुळे गोंधळ उडून सामान्य गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागत असे. आता सेबीच्या नियमानुसार त्यांनाच असे नाही तर सर्वानाच विशिष्ट मर्यादेतच व्यवहार करता येतात. याहून अधिक रकमेचे व्यवहार करायचे असल्यास त्याची पूर्वसूचना द्यावी लागते. असे असले तरी अनेक सट्टेबाज एकत्र येऊन बाजारावर आपला प्रभाव पाडू शकतात. यामुळे विशिष्ट शेअरच्या बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. बाजारात वाढलेली उलाढाल व भावातील चढउतार यावर बाजार व्यवहार समिती लक्ष ठेवून असते. त्यांनी प्रत्येक शेअर्सची अधिकतम वाढ अथवा घट याची मर्यादा ठरवून दिलेली असते या मर्यादेहून अधिक प्रमाणात त्यात चढ उतार होऊ शकत नाही. यात फक्त खरेदीदार असल्यास त्या शेअर्सला अप्पर सर्किट तर फक्त विक्रेते असल्यास लोअर सर्किट लागले असे म्हटले जाते. जर एखादा समभाग वर अथवा खाली जात असेल किंवा त्यातील उलाढाल वाढली असेल तर ही मर्यादा आवश्यक असल्यास स्टॉक एक्सचेंजकडून कमी अधिक करण्यात येते. त्यामुळे अमर्याद वाढ अथवा घट होऊ शकत नाही. जर फार मोठ्या प्रमाणात निर्देशांकात घट किंवा वाढ झाली तरीही काही काळ व्यवहार स्थगित ठेवले जातात किंवा सदर दिवसासाठी पूर्णपणे बंद केले जाऊ शकतात त्यामुळे गुंतवणूकदारांना सारासार विचार करायला अवधी मिळतो.
व्दैध व्यवहार रक्षक (Hedgers)- असे व्यवहार गुंतवणुकीतील धोका कमी करण्यासाठी सामान्यतः मोठे गुंतवणूकदार, वित्तसंस्था, म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्या यांच्याकडून केले जातात. आपल्या मालमत्तेत असलेल्या शेअर्सचे भाव खाली जात असतील तर त्याच्या विरुद्ध पोझिशन एफअँडओ व्यवहारात केली जाते. यामुळे होऊ शकणारे संभाव्य नुकसान टळते. थोडक्यात फार जोखीम न घेता आपल्या मालमत्तेचे मूल्य घटणार नाही असा त्यांचा प्रयत्न असतो. बाजारभाव त्यांच्या मनाप्रमाणे नसेल तरी तोटा होणार नाही किंवा तो वाढणार नाही याची काळजी ते घेतात.
संधीशोधक (Arbitrageurs)- हे लोक मोठे गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड, वित्तसंस्था, ब्रोकरेज फर्म यांनी नेमणूक केलेले लोक असू शकतात. दोन बाजारातील किंवा दोन सेगमेंटमधील दरात असणाऱ्या फरकाचा हे लोक लाभ करून घेतात. बाजारात चाललेल्या दरावर ते घारीसारखे लक्ष ठेवून असतात. भावात नेमका किती फरक असला म्हणजे आपल्याला निव्वळ नफा होईल याची गणिते त्याच्या मनात पक्की बसलेली असतात. खरेदी विक्रीच्या ऑर्डर झटकन टाकण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. अशा प्रकारचे काम व्यक्तिगतरित्या अथवा कुणाच्या वतीने देखील करता येते. निश्चित वेतन नफ्यात सहभाग किंवा दोन्हीही पद्धतीने मोबदला देण्याचा करार करून असे व्यवहार केले जाऊ शकतात. आता असे व्यवहार करता येऊ शकतील अशी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आली आहेत त्यात कृत्रिम बद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. बाजार कायम हलता ठेवण्यात या सर्वांचाच महत्वपूर्ण वाटा आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 27 ऑगस्ट 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment