Friday, 28 December 2018

विशेष बदलती सरासरी

#विशेष_बदलती_सरासरी(Exponential Moving Average)
   
    यापूर्वी आपण साधी बदलती सरासरी (SMA) याविषयी माहिती घेतली. शेअरबाजारातील ट्रेडर्स अजून एका प्रकारच्या सरासरीवर लक्ष ठेवतात. यास विशेष बदलती सरासरी किंवा एक्सपोनेशल मुव्हिंग एव्हरेज(EMA) असे म्हणतात. एखादया शेअर्सच्या बाजारभावाबद्धल अंदाज विविध गोष्टींचा विचार करून बांधत असले तरी त्यांचा मुख्य हेतू हा चालू भावात पडणाऱ्या फरकावर अधिक केंद्रित असतो
अशी सरासरी काढताना अलीकडच्या बाजारभावाचा विचार करून ही किंमत मिळवली जाते.
   ही सरासरी विशिष्ट गोष्टीवर, साधारणपणे अलीकडच्या काळातील बाजारभावावर विशेष भर देऊन मिळवीत असल्याने त्यास वेटेज मुव्हिंग एव्हरेज (WMA) असेही म्हणतात. SMA चा विचार करताना याच्याशी संबंधित प्रत्येक घटकास सारखेच महत्व दिलेले असते तर विशेष बदलत्या सरासरीस अलीकडे असलेल्या बाजारभावाचा विचार केला जातो.
    याप्रमाणे EMA काढताना खालील पद्धतीने काढतात
1.प्रथम ज्या दिवसांचा EMA काढायचा आहे त्याचा SME काढतात. हा आपणास जेवढया दिवसांचा काढायचा आहे त्याचा बंद भावाची बेरीज करून त्यास संबंधित दिवसांच्या संख्येने भागून मिळवता येईल.
2.ज्या दिवसांचा EMA काढायचा त्यांचा गुणक (multipler) मिळवणे. हा गुणक मिळवण्यासाठी 2  भागीले संबंधित दिवसांची संख्या अधिक 1 असे सूत्र वापरावे लागते.
3.यावरून सद्याचा EMA काढणे.
    याप्रमाणे खुलता भाव, चालू भाव, दिवसाचा सर्वाधिक भाव, सर्वात कमी भाव, सरासरी भाव यांचा EMA काढता येऊ शकतो.
     या पद्धतीचा वापर करून सर्वसाधारणपणे शेअर , इंडेक्स, कमोडिटी किंवा करन्सी याचा भाव वाढेल की कमी होईल हे समजू शकते. जर EMA वाढत असेल तर भाव वाढतील आणि कमी होत असतील तर कमी होतील.
     शेअर, इंडेक्स , कमोडिटी यांच्या कोणत्या भावाला अधिक खरेदीदार मिळतील किंवा कोणता भाव आल्यास विक्रीते वाढतील ते समजेल.
      ट्रेडर्स त्यांची टार्गेट प्राईज आणि स्टॉप लॉस निश्चित करता येईल.अभ्यासक याचा वेगवेगळ्या दृष्टीने विचार करून SMA आणि EMA याचा वापर आपला अनुभव याचा वापर करून अंदाज बांधतात. याविषयी चांगली माहिती देणारे व्हिडिओ यु ट्यूब वर आहेत तसेच SMA आणि EMA चा वापर करून तयार चार्ट बनवून देणारी मोफत संकेतस्थळे उपलब्ध आहेत.

©उदय पिंगळे

मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 28 डिसेंबर 2018 रोजी पूर्वप्रकाशित
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 21 December 2018

साधी बदलती सरासरी

#साधी_बदलती_सरासरी (Simple moving average)

        शेअर्सच्या भावासंदर्भात प्रामुख्याने साधी बदलती सरासरी किंमत म्हणजेच सिंपल मुव्हिंग एव्हरेज (SMA) हा शब्दप्रयोग वारंवार बोलण्यात येतो. शेअर्सचा भाव किंवा बाजाराची दिशा दाखवणारी ही सोपी किंमत असून याद्वारे ट्रेडर्स बाजार किंवा विशिष्ठ शेअरच्या भावाचा अंदाज बांधू शकतात.
       संख्याची सरासरी म्हणजे काय ? हे आपल्याला माहीत आहेच. दिलेल्या पाच विविध संख्याची सरासरी आपण त्या पाच संख्याची बेरीज करून येणाऱ्या संख्येस पाचने भागून काढतो. याच प्रमाणे शेअरचा किंवा इंडेक्सचा रोजचा खुलता भाव, बंद भाव, विशिष्ठ वेळेचा भाव, किंवा दिवसभराच्या भावाची सरासरी अश्या वेगवेगळ्या किंमती विचारात घेऊन आपण वेगवेगळ्या सरासरी काढू शकतो. अशी सरासरी काढताना पुढील दिवसाचा भाव विचारत घेऊन जर मागील 15 दिवसांची सरासरी काढायची असेल तर आधीच्या अंशस्थानातील सर्वात जुनी किंमत गाळली जाते आणि नवी किंमत विचारात घेतली जाते त्यामुळे येणाऱ्या किमतीत थोडाफार फरक पडू शकतो. असा फरक पडतो म्हणूनच याला बदलती सरासरी म्हणतात, अशा तऱ्हेने SMA काढता येतो.
        moneycontrol.com किंवा त्याच्या अँपमध्ये कोणत्याही इंडेक्सवर क्लीक केले असता त्या निर्देशांकाचा 30, 50, 150, 200 दिवसाचा SMA तयार उपलब्ध असतो त्यावरून विविध काळातील सरासरी भाव कळल्याने त्यावरून अंदाज बांधणे ट्रेडर्सना सोपे जाते. येथे कोणत्याही शेअरला क्लीक केले तर जे पेज येते त्यावर खाली स्टॉक अलर्ट या शीर्षकाखाली जर या कालावधीतील भावापेक्षा काही फरक असल्यास त्याचे नोटीफिकेशन येते. ट्रेडर्स कडून सर्वसाधारणपणे बंद भाव काढून मिळालेला सरासरी भाव विचारात घेतला जातो. या प्रकारच्या किमती विचारात घेऊन आपण त्याचा चक्राकार आलेख (Chart) बनवला तर एका दृष्टिक्षेपात सहज नजर टाकून अंदाज बांधता येणे शक्य आहे. यासाठी किती दिवसांच्या भावाची सरासरी घेऊन अंदाज बांधायचा हे ट्रेडरच्या कौशल्याचे काम आहे. असे अल्पकालीन अंदाज बांधताना आणखी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्यायेथे एकाच किमतीला सर्वत्र सारखेच प्राधान्य दिले असल्याने काहींच्या मते त्यातून काढलेले निष्कर्ष मर्यादित स्वरूपाचे आहेत.
       असे असूनही तांत्रिक विश्लेषकांच्या मते या किंमती उपयोगी असून नजीकच्या कालखंडातील बाजाराचा अथवा शेअरच्या भावाचा अंदाज बांधण्यासाठी कमी कालखंडातील 30 ते 50 दिवसांचा SMA तर थोडया दिर्घकाळाच्या किंमतीचा अंदाज बांधण्यासाठी जास्त कालखंडातील 150 ते 200 दिवसांचा SMA उपयुक्त आहे. सर्वसाधारणपणे SMA वाढतोय याचा अर्थ भाव वाढण्याची तर कमी होतोय याचा अर्थ भाव कमी होण्याची शक्यता आहे. तरीही असा अंदाज बांधण्यापूर्वी अन्य काही कारण असण्याचीही शक्यता असते त्याचाही शोध घ्यावा.अशा प्रकारे सरासरी मिळवताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.
1.सरासरीचा कालावधी: हा कालावधी काही मिनिटे, तास, दिवस ,आठवडे असू शकतो.
2. हे अंदाज बांधण्याचे साधन आहे, असे होईलच असे नाही.
3.एकाच वेळी अनेक लोकांकडून त्यावर उपाय योजले गेल्याने अल्पकाळात फरक पडू शकतो.
4.अचानक भाव मोठ्या प्रमाणात वाढला किंवा कमी झाला तर एकूण किमतीत बऱ्यापैकी फरक पडतो.
      दीर्घकालीन गुंतवणुकीच्या हेतूने गुंतवणूकदार याच पद्धतीचा उपयोग करून जर मार्केट वाढण्याची शक्यता असेल तर एखाद्या शेअर्समधील आपली गुंतवणूक वाढवू शकतात किंवा मार्केट कमी होण्याची शक्यता असल्यास आपल्याकडील होल्डिंग विकून कमी भावात खरेदी करू शकतात.अशाप्रकारे प्राथमिक अंदाज आणि गुंतवणूक निर्णय दोन्हींसाठी ही पद्धत उपयोगी होऊ शकते.

©उदय पिंगळे

मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 21 डिसेंबर 2018 रोजी पूर्वप्रकाशित.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 14 December 2018

बी एस सी चे मोबाइल अँप

#BSE _India_Experiance_the_new

   मुंबई शेअर बाजार (BSE) या आशियातील सर्वात जुन्या आणि जगात सर्वाधिक कंपन्यांचे व्यवहार होत असलेला शेअर बाजार असून बाजारातील घडामोडी गुंतवणूकदारांना समजाव्यात म्हणून BSE India या नावाचे अँप गुगल स्टोरवर उपलब्ध आहे. हे अँप डाउनलोड करून क्लीक केले की होम पेज उघडण्यापूर्वी शेअरबाजाराची इमारत व 'Experiance the new' ही अँपची कॅचलाईन येते आणि होमपेज उघडते. होमापेजवर डिफॉल्ट ऑप्शन म्हणून विविध इंडेक्स, सेन्सेक्स, कमोडिटी, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ दिसतील परंतू ते आपल्या मर्जीप्रमाणे तयार करता येतील त्यांचा क्रम बदलता येईल.
        याचे होमापेज चित्रात दाखवल्याप्रमाणे असून डाव्या बाजूस असलेल्या तीन आडव्या रेषा हा मेन्यू दाखवत असून त्यातून अँप मध्ये प्रवेश करता येईल. या शेजारी bse चा लोगो असून त्याशेजारी माईकचे चित्र आहे तो गुगलचा व्हाईस सर्च असून त्याद्वारे अँपमध्ये हाताने टाइप करण्याऐवजी आवाजाचा वापर करून टाइप करता येईल. शेजारी सर्चसाठी दुर्बिणीचे चित्र दिले असून त्यामुळे शेअर, डिरिव्हेटिव, म्युच्युअल फंड/ ई टी एफ,  डिबेंचर आणि इतर गोष्टी यांचे भाव पहाता येतील. या बाजूला असलेले वर्तुळाकार बाण आपणास पहिल्या जागी म्हणजे आपण जेथून सुरुवात केली तेथे नेतील. या शेजारी असलेल्या तीन ठिंबावर क्लिक केल्यास एडिट वॉचलिस्ट/पोर्टफोलिओ, एडिट होमापेज, री ऑर्डर टेब, सेटिंग, अबाउट अस, हेल्प हे पर्याय दिसतील. यातील हेल्पला क्लिक केले असता होमापेज एडिट कसे करता येईल ते समजते. आपल्या गरजेनुसार ते करता येईल.
      मेन्यूला क्लिक केले असता, होम, इक्विटी, इंडीसेस, सेन्सेक्स, एस एम इ , डिरिव्हेटिव, करन्सी, कमोडिटी, इंटरेस्ट रेट डिरिव्हेटिव, इ टी एफ, कॉर्पोरेट, मार्केट स्टेटेस्टीक, मार्केट टर्नओव्हर, आय पी ओ/ ओ एफ सी, लिस्टिंग, नोटिसेस, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ हे पर्याय दिसतील. यामुळे आपल्याला खालील अनेक प्रकारची माहिती मिळते.
1.ज्यांचे भाव वाढले / कमी झाले असे समभाग, ज्यांची उलाढाल जास्त झाली असे समभाग, त्याचा आधीचा बंद भाव, उलाढाल, 52 आठवड्यात उच्च आणि नीच किमतीचे समभाग यांचे भाव दिसतील.
2. विविध निर्देशांकांचे भाव, त्याचा बंद भावाशी संबध आणि टक्केवारीतील बदल समजेल.
3. यातून विविध सेन्सेक्स, त्यात समाविष्ट समभाग, त्याचा बंद भाव, त्यातील भावातील फरक, टक्केवारीत झालेला बदल, खरेदी / विक्री किंमत निर्देशांकाशी असलेला संबध समजेल. याशिवाय निर्देशांकांचा आढावा व आलेख दिसेल.
4. ज्या कंपन्या छोट्या आहेत त्यासाठी bse ने एक वेगळी खरेदी विक्री व्यवस्था सुरू केली असून त्यांना बाजारातून भांडवल उभारणी करता येईल याची स्वतंत्र  व्यवस्था केली असून त्यांचे भाव, झालेले सौदे, मागील भाव, त्यातील रुपयात पडलेला आणि टक्केवारीत पडलेला फरक आणि खरेदी विक्री संख्या दिसेल.
5. डिरिव्हेटिव कराराचे / करन्सीचे / कमोडिटीचे/इंटरेस्ट रेट डिरिव्हेटिवचे /ई टी एफ या सर्वांचे भाव, उलाढाल, मागील किंमत, त्यात रुपयात आणि टक्केवारीत पडलेला फरक, खरेदी विक्रीची संख्या दिसेल.
6. विविध कंपन्यांच्या कॉर्पोरेट बेनिफिट दाखवणाऱ्या सूचनांची माहिती मिळेल.
7. बाजारातील विविध आकडेमोड/ उलाढाल, विविध कंपन्या आणि संबंधितांच्या सूचना पाहता येतील.
8.आपण तयार केलेली वॉचलिस्ट आणि पोर्टफोलिओ या संबंधीची सर्व माहिती मिळेल.
नाविन्यपूर्ण अनुभव असे देणारे हे अँप असून मार्केट व्यवहाराशी संबंधित सर्वांनी ते आपल्याकडे ठेवणे जरुरीचे आहे.
       या अँपची माहिती होण्याच्या दृष्टीने हा लेख लिहिला असून, मी हे अँप डाउनलोड करून वापरत आहे व ते उपयुक्त आहे असे माझे मत आहे. अँप निर्माण करणाऱ्या कोणाशीही माझा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक संबध नाही.

©उदय पिंगळे

मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 14 डिसेंबर 2018 रोजी पूर्वप्रकाशित.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 7 December 2018

एन पी एस चे अँप

    राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही PARDA यांनी प्रवर्तित केलेली अत्यल्प व्यवस्थापन फी असलेली पेन्शन योजना आहे. जरआपण त्याचे सदस्य असलात (?) तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एका चुटकीसरशी आपणास आपल्या खात्यासंबंधीची माहिती मिळू शकते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटऑथोरिटी यांनी नुकतेच एक नवीन अँप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोर आणि अँप स्टोरवर ते उपलब्ध आहे. या अँपच्या साहाय्याने खातेदारांस आपल्या खात्यासंबंधी सर्व अद्ययावत माहिती एन पी एस चे रेकॉर्ड किपर nsdl cra च्या संकेतस्थळाचा लॉग इन आय डी व पासवर्ड वापरून मिळू शकते. हे अँप गुंतवणुकांदाराना हाताळायला सोपे (users friendly) असून अँड्रॉईड सिस्टीम असलेल्या सर्व मोबाईलमध्ये चालते.
        हे अँप डाऊनलोड केल्यावर क्लिक केले की nps चे सांकेतिक चिन्ह (logo) असलेले पेज येईल.त्याच्या खाली लॉग इन आणि कोंट्रिब्युशन हे पर्याय येतील. त्यांच्या मधोमध हिंदी असे लिहले असून त्यावर क्लिक केल्यास पेजची भाषा हिंदी होईल. याखालीच तीन वर्तुळाकार गोल असून यातील पहिल्या गोलावर क्लीक केले की नवीन रजिस्ट्रेशन करता येते. यातील लॉग इन आय डी हा तुमचा nps खातेक्रमांक असून पासवर्ड cra च्या वेबपेजचा असेल. येथे आपणास नवीन पासवर्ड तयार करता येईल. याप्रमाणे पासवर्ड तयार केलात की आपण लॉग इन करू शकाल. याशेजारील एक गोल तुम्हाला पेन्शन किती मिळेल हे सांगेल तर दुसरा गोल आपणास उतारा किती मिळत आहे हे दाखवून देईल. येथे आपण आपला लॉग इन आय डी (म्हणजेच आपला nps खातेक्रमांक) आणि पासवर्ड टाकणे जरुरीचे असून येथेच नविन पासवर्ड तयार करता येईल. येथे लॉग इन न करता contribution हा पर्याय निवडल्यास आपला खातेक्रमांक व जन्मतारीख याची विचारणा करण्यात येवून त्याची खात्री करून द्यावी लागेल. ती करून दिली की सर्व गोष्टी बायपास करून आपणास tier 1 किंवा 2 खात्यात विविध पर्याय वापरून थेट गुंतवणूक करता येईल.
     लॉग इन केल्यावर होम पेज उघडेल. येथे उजवीकडे होम, अकाउंट डिटेल्स, प्रोफाइल सेटिंग आणि लॉग आऊट या क्रमाने आयकॉन आहेत. यातील होम आयकॉनवर योजनेतील एकूण गुंतवणुकीचे एकत्रित मालमत्ता मूल्य दिसेल. ते tear1 आणि tear 2 असे स्वतंत्ररीत्या पहायची सोय आहे. त्याशेजारील आयकॉनवर क्लिक केले असता आपल्या खात्याचा तपशील समजतो जसे नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल क्रमांक, स्थायी पेन्शन खाते क्रमांक (pran), आपली वैयक्तिक खाते माहिती आणि यासंबंधीत तक्रारीची स्थिती हे सर्व समजेल. त्याशेजारी असलेला आयकॉन प्रोफाईल सेटिंगचा असून आपणास येथून कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे मोबाइल क्रमांक व मेल आय डी बदलता येईल. तसेच सुरक्षितता म्हणजेच आपला पासवर्ड आणि सुरक्षिततेचा प्रश्न बदलता येईल. त्याच्या शेजारी लॉग आऊट असून येथून बाहेर पडता येईल. उजव्या बाजूस तेथे डाव्या वाजूस असलेल्या तीन रेषावर क्लीक केले असता अँपमध्ये प्रवेश होऊन स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्या प्रमाणे होम, अकाउंट डिटेल्स, कोंट्रिब्युशन, रिसेंट कोंट्रिब्युशन, स्कीम चेंज, ऍड्रेस चेंज,प्रोफाईल सेटिंग,नोटिफिकेशन, टियर 2 विथड्रावल, इन्कवायरी आणि ग्रीव्हसेस यासारखे विविध पर्याय येतील.
     या अँपचा वापर आपण खालील कारणासाठी करू शकतो.
1.आपल्या खात्याची शिल्लक पाहणे.
2.आपल्या खात्यावरील उलाढालीची नोंद आपल्या मेलवर पाठवण्याची विनंती करणे.
3.Tear-1 आणि Tear-2 खात्यात रक्कम भरणे.
4.योजनेचा प्राधान्यक्रम बदलणे.
5.आधार क्रमांक खात्यास जोडणे
6.पत्यात बदल करणे
7.Tear 2 खात्यातील रक्कम काढून घेणे.
8.आपल्या खात्याची पूर्ण माहिती पाहणे.
9.शेवटचे 5 व्यवहार पहाणे.
10. मोबाईल क्रमांक ईमेल मधील बदल नोंदवणे.
11.पासवर्ड, कळीचा प्रश्न बदलणे.
12.ओटीपी चा साहाय्याने पासवर्ड बदलणे.
13.एन पी एस संबंधित बदलांची नवनवीन माहिती मिळवत राहणे.
       एन पी एस ही स्वतंत्र योजना असून याविषयीची सर्व माहिती आपण यापूर्वीच्या लेखात करून घेतली आहेच. यावरील गुंतवणुकीवर योजनेच्या अखेरीस काही प्रमाणात  कर लागत असल्याने तसेच यातून किती परतावा मिळेल याची हमी नसल्याने त्यातून भविष्यात 15 % हुन अधिक परतावा मिळाला तरच ही योजना फायदेशीर ठरेल, असे होइल की नाही ते येणारा काळच ठरवेल. तूर्तास या योजनेस मिळणारी 50 हजाराची 80/CCD (1B) अनुसार अधिकची करसवलत त्यातून सर्वाधिक करदेयता असणाऱ्या व्यक्तींचा वाचू शकणारा 15 हजार रुपयांचा कर एवढेच आकर्षण आहे.

©उदय पिंगळे

मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 07 डिसेंबर 2018 रोजी पूर्वप्रकाशीत.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

आयुष्यमान भारत योजना

#आयुष्यमान_भारत

         आयुष्यमान भारत ही भारत सरकारची महत्वाकांक्षी आरोग्यविमा योजना असून त्यामधून 10.36 कोटी अल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांतील साधारणपणे 50 कोटी लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्यविम्याचे संरक्षण दरवर्षी मिळेल.23 सप्टेंबर 2018 रोजी ही योजना सर्व भारतभर अमलात आल्याने जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्यविमा योजना ठरली आहे.
या योजनेची वैशिष्ठ्ये--
१. या योजनेनुसार गरीब कुटुंबाला 5 लाख रुपयांचा आरोग्यविमा दरवर्षी मिळेल.
२.यात सुमारे 10.36 कोटी गरीब कुटुंबे आणि 50 कोटीच्या आसपास व्यक्तींना विमासंरक्षण मिळेल.
३. मुली, स्त्रिया आणि जेष्ठय नागरिक यांच्यावर मोफत आणि प्राधान्याने , सरकारी अथवा मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात विनामूल्य उपचार केले जातील.
४. यामध्ये हॉस्पिटलमध्ये भरती करून अत्यावश्यक  उपचार आणि आवश्यकता असल्यास विशेष उपचार केले जातील.
५.या उपचारात 1350 विविध शस्त्रक्रिया, वैद्यकीय आणि अल्पकालीन उपचार ,औषधोपचार आणि तपासण्या यांचा सामावेश आहे.
६.आधी असलेल्या आजारामुळे आजार उद्भवला या कारणाने नकार देता येणार नाही.
७. यासुविधा घेण्यासाठी कागदपत्रांची आणि रोख रकमेचा वापर करावा लागणार नाही.
८.रुग्णालयाला यात ठरवल्याप्रमाणे दरानेच उपचार करावे लागतील. अधिक पैशांची मागणी करता येणार नाही.
९. याचे लाभार्थी, संपूर्ण भारतात कुठेही उपचार घेता येतील.
या योजनेचे लाभार्थी कुटुंबीय 2011 च्या जनगणना उत्पन्नआणि जात नोंद या आधारे निश्चित करण्यात येतील. यात कुटूंबातील सदस्य संख्या आणि सदस्यांचे वय यामुळे काहीही फरक पडणार नाही.सध्या एका कुटुंबातील 5 सदस्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी कच्च्या घरात राहात असणारी कुटुंबे, अशी कुटुंबे जी केवळ महिलांच्या कमाईवर चालतात, एखादी व्यक्ती अपंग आहे, निराश्रित आणि निराधार व्यक्ती, केवळ मोलमजुरी करणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश असेल. कुटूंबाचे मासिक उत्पन्न 10 हजाराहून अधिक नसेल. शहरी भागातील कुटुंबाची पात्रता निश्चित करण्यासाठी कचरा वेचणाऱ्या व्यक्ती, घरकाम करणाऱ्या व्यक्ती, छोटे उद्योग मोलमजुरी करणारी कुटुंबे ज्यांचे मासिक उत्पन्न 10 हजाराहून अधिक नसेल यांचा प्राधान्याने विचार केला जाईल. दुर्बल जाती आणि समाजातील वंचित यांचा विचार केला जाईल.अशा प्रकारे या योजनेचा लाभ होऊ शकेल अश्या कुटूंबाची यादी बनवून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल असे पत्र पाठवण्यात येईल.एक संकेतांक त्यांना देण्यात येईल.सामायिक सेवा केंद्रातून ही माहिती त्यांच्यापर्यंत गावातील मान्यवर लोकामार्फत पोहचवण्यात येईल. जरी असे पत्र आले नसेल तरीही पात्र व्यक्तीवर मोफत उपचार होतील. यासाठी आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र किंवा योजनेचे इ कार्ड असणे जरूर आहे.
   उपचार घेण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये असलेल्या आयुष्यमान / आरोग्य मित्राशी संपर्क करावा. आपली ओळख पटवून द्यावी आणि कुटूंबाशी असलेले नाते सांगावे ही ओळख पटवून दिल्यावर त्याच्याकडून एक फोटो घेण्यात येईल. ही सर्व माहिती नोंदवून एक तात्पुरते ओळखपत्र दिले जाईल.या माहितीची सत्यता पडताळून घेऊन त्या कुटूंबास योजनेचे ई कार्ड देण्यात येईल.
    या योजनेतील लाभार्थी कुटूंब आणि त्यातील सदस्य यांची यादी सरकारकडून प्रसिध्द करण्यात आली असून त्यात आपण अथवा आपले कुटुंब आहे की नाही याची पडताळणी करता येते. यासाठी mera.pmjay.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला मोबाईल क्रमांक ओ टी पी one time passward घेऊन नोंद करावा लागेल.यानंतर उघडणाऱ्या पेजवर जाऊन काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल यानंतर सर्च हा पर्याय निवडून ते बटन क्लिक केले तर आपले किंवा कुटुंबाचे लाभार्थी म्हणून नोंद झाली असेल तर सर्व तपशील समोर येईल. हीच माहिती 14555 या टोल फ्री क्रमांकास फोन करून अथवा स्थानिक स्वराजसंस्थेच्या कार्यालयात जाऊनही  मिळवता येईल. योजनेत नाव नसेल आणि आपली पात्रात असेल, तर आरोग्यमित्राच्या मदतीने या    योजनेचा लाभार्थी म्हणून आपल्या नावाची नोंद करता येईल.
       आजारपणामुळे एखाद्या गंभीर आजारामुळे कुटूंबाची पूर्ण वाताहत होऊ शकते. मध्यम परिस्थितीत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या मित्र नातेवाईक यांची मदत होऊ शकते उच्च उत्पन्न असलेली कुटुंबे जागरूक असल्याने आरोग्यविमा घेतात. अत्युच्च उत्पन्न असलेल्या लोकांना या गोष्टीमुळे फारसा काही फरक पडत नाही. अनेक सरकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत न पोहोचल्याने ते यापासून वंचित रहातात. आपल्या माहितीत या योजनेचा लाभ होऊ शकेल अशी कुटुंबे असल्यास ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची नावे लाभार्थी म्हणून आहेत का हे शोधण्यात, नसेल तर नवीन नोंदणी करण्यास त्यांना मदत करून, आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण करावी.

©उदय पिंगळे

मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 30 नोव्हेंबर 2018 रोजी पूर्वप्रकाशित
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .