Friday, 29 June 2018

कागदी समभागपत्रे हसत्तांतरावर सेबीची बंदी

#कागदी_समभागपत्रे_हसत्तांतरीत_करण्यावर_सेबीची_बंदी

   8 जून 2018 चे राजपत्रात प्रसिध्द केल्याप्रमाणे भांडवलबाजार नियंत्रक सेबी यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून मूर्त शेअर (कागदी समभाग पत्रे) 5 ऑक्टोबर 2018 नंतर कोणालाही एकमेकांत हसत्तांतरीत करता येणार नाहीत असा निर्णय घेतला आहे, हे प्रसिद्ध केले आहे.  या तारखेनंतर अशा प्रकारच्या शेअर्सची मालकी केवळ  वारसांमध्ये हसत्तांतरीत होऊ शकेल किंवा नावाचा क्रम बदलणे एवढया मर्यादित असेल. जर ते  हसत्तांतरीत करायचे असतील तर ते प्रथम डी मॅट करून घ्यावे लागतील आणि मगच ट्रान्सफर करता येईल. या संबंधीच्या बातमीत वर उल्लेख केलेली तारीख 5 डिसेंबर 2018 आहे परंतू 8 जून 2018 रोजीच्या पत्रकात गेझेटमध्ये प्रसिद्द झाल्यावर 118 दिवसांनी ही बंदी लागू होईल असे म्हटले आहे. (Notification No. SEBI/LAD-NRO/GN/2018/24 by issuing SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) (FOURTH AMENDMENT) REGULATIONS, 2018) याचाच दुसरा अर्थ असा की या तारखेनंतर (5 ऑक्टोबर2018)  कागदी स्वरूपातील समभाग प्रमाणपत्रांचे खरेदी/विक्री व्यवहार होऊ शकणार नाहीत.
  डिपॉसीटरी ऍक्टनुसार कोणत्याही कंपनीचे शेअर हे मूर्त (physical) अथवा अमूर्त (electronic) दोन्ही पद्धतीने आपल्याजवळ ठेवता येतात. यामुळेच कागदी प्रमाणपत्रे बाळगण्यावर बंदी घालायची असेल तर या कायद्यात तसा बदल करावा लागेल. समभाग कागदी स्वरूपात असतील तर त्यावरील कॉर्पोरेट बेनिफिट जसे लाभांश, बोनस हे भागधारकाची माहिती अद्ययावत नसल्यास कंपनीकडे मागणी न केलेले म्हणून पडून राहतात. बाजारातील बहुतांश व्यवहार हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात त्यामुळे हसत्तांतरण करणे आणि लाभार्थी निश्चित करणे तुलनेने अधिक सोपे झाले आहे.
   अलीकडेच काही शेअर्सचे हसत्तांतरण नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे उघडकीस आल्यावर संबधित रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंटना दंड आणि काही काळ व्यवसायबंदी सारख्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. तर यासंबंधीत जबाबदार व्यक्तींवर गुन्हेगारी केसेस दाखल करण्यात आल्या. जरी अशा अवैध प्रकारांची संख्या कमी असली तरी असे प्रकार यापुढेही घडू शकण्याची शक्यता होती, यावर मात करण्यासाठी तातडीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्यांनी आपले शेअर्स डी मॅट करून घेतले नाहीत अशा सर्व प्रमोटर्सना त्यांनी आपले होल्डिंग इलेक्ट्रॉनिक पद्धतीत बदलून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे. यामुळे संभाव्य गैरव्यवहाराला आळा बसेल. ट्रान्सफर अधिक पारदर्शक पद्धतिने लवकर होईल. भांडवलबाजाराच्या, गुंतवणूकदारांच्या हिताची यातून जपणूक होऊ शकेल.
   या सर्वाचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नाही. तरीही आपल्या माहितीत मित्र,नातेवाईक यापैकी कोणाकडे असे शेअर्स असतील तर त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवावी. अशाप्रकारे काही लोकांकडे अजूनही शेअर आहेत आणि त्यांना त्याची काहीही फिकीर नाही. हे लोक विहित कालावधीत आपल्या मनाप्रमाणे ट्रान्सफर करून घेऊ शकतील. कारण एखाद दुसऱ्या कंपनीकरता डी मॅट खाते उघडणे नंतर शेअर ट्रान्सफर करून खाते बंद करणे अनेकदा खर्चिक आणि त्रासदायक होऊ शकते.

©उदय पिंगळे

मनाचेtalks येथे 29/06/2018 रोजी पूर्वप्रकाशीत
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 22 June 2018

म्युच्युअल फंड युनिट फंडहाऊसकडून की एजनटकडून?

#म्युच्युअल_फंड_युनिट_थेट_फंडहाऊसकडून_की_एजंटकडून?

   2013 पासून सेबीच्या सूचनेप्रमाणे सर्व योजनांना फंड हाऊस कडून थेट गुंतवणूक करण्याचा पर्याय देण्यात आला. यामुळे गुंतवणूकदारांना मध्यस्थाशिवाय गुंतवणूक करण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला आहे. यामध्ये म्युच्युअल फंडाच्या एकंदर व्यवस्थापनासाठी लागणारा खर्च  (expenses ratio) जो नियमानुसार जास्तीतजास्त 3% असू शकतो. यात सामाविष्ट असलेले एजंट कमिशन 0.5 ते 0.75% ने वाचते. यामुळे एकाच प्रकारचे युनिट हे थेट फंड हाऊस कडून विकत घेतल्यास त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) थोडे जास्त असते. याचा  दिर्घकाळात होणारा परिमाण म्हणजे अशा योजनांतून मिळणारा परतावा (return) थोडा जास्त असतो. त्यामुळे वरवर पाहता युनिट खरेदी थेट खरेदी करणे हेच फायद्याचे होईल असे वाटणे सहाजिक आहे. आज पाच वर्षे झाल्यानंतर सर्व योजनांचा एजंटसह आणि एजंटशिवाय मिळालेला परतावा अभ्यासला असता या विधानाला बळकटी मिळणारी आकडेवारी उपलब्ध आहे. यामध्ये पडलेला 0.1%चा फरक हा मोठया कालावधीत आणि मोठया रकमेत खूप अधिक होतो. त्यामुळेच मोठे गुंतवणूकदार, स्वदेशी आणि विदेशी वित्तसंस्थाना कमी खर्चात त्यांची गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध झाली आहे आणि ते त्याचा योग्य उपयोग करीत आहेत.
  ही सोय सर्वांना उपलब्ध असल्याने सामान्य गुंतवणूकदारांनाही अशा तऱ्हेने कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करता येऊ शकेल. आज mf utility आणि groww या माध्यमातून कोणत्याही तसेच प्रत्येक म्युच्युअल फंडहाऊसच्या संकेतस्थळावरून त्यांच्या योजनेत थेट गुंतवणूक ऑनलाईन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही सर्व पद्धती गुंतवणूकदाराला सहज हाताळता येईल अशा रीतीने त्यांची रचना केलेली आहे. जे लोक ऑनलाईन व्यवहार सहज करू शकतात त्यांना याचा उपयोग करून फंडहाऊसकडून थेट युनिटची खरेदी करता येणे शक्य आहे.केवळ याच निकषावर गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते कारण यात जे कार्य ब्रोकर करतो ते आपल्याला करावे लागते. याशिवाय आपल्या गरजेनुसार योजनेची निवड करणेही तितकेच महत्वाचे आहे यासाठी थोडाफार अभ्यास करावा लागतो आणि तसेच योजनेच्या परताव्यावर अधूनमधून लक्ष ठेवावे लागते .या गोष्टी आपण moneycontrol किंवा valuereserchonline याच्या मदतीने करू शकतो. परंतू हे शिकून घ्यायचीआपली तयारीआहे का ? त्यासाठी थोडा वेळ आणि मेहनत आपण घेणार का? अन्यथा यासाठी आपल्याला एजंटची मदत होऊ शकते. याशिवाय भविष्यात अजून काही अडचण आली तर ती आपण त्याच्या मदतीने सोडवू शकतो.
     असे असले तरीही आपल्याला काय माहिती आहे?  आणि आपल्या एजंटची सेवा कशी आहे? याचा विचार करून निर्णय घ्यावा. इतर कोणत्याही व्यवसायाची एजन्सी घेण्याच्या तुलनेत म्युच्युअल फंड एजंट होणे तुलनेने सोपे आणि कमी खर्चिक असल्याने यात अनेक अपप्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे. तर काही नामवंत एजंट बरोबर बातचीत केली असता सध्या अनेक सुशिक्षित गुंतवणूकदार कोणतीही शाहनिशा करण्याऐवजी केवळ सांगू तेथे सही करणे आणि चेक देणे यात धन्यता मानत आहेत. आपण कष्टाने मिळवलेल्या पैशाची सुयोग्य गुंतवणूक होते की नाही याची त्यांना फारशी फिकीरच नाही. तेव्हा आपण कसे आहोत? आणि आपला एजंट कसा आहे? याचा विचार करून पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर यासंबंधीचा निर्णय घ्यावा. केवळ कमिशन वाचेल एवढा संकुचित विचार करून कोणताही निर्णय घेऊ नये. असे सर्वसाधारण मत यासंदर्भात मांडतो आहे.
    याच संदर्भातील अजून कोणीही न मांडलेला एक  विचार ज्याचा सविस्तर उल्लेख मी 'सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन' यावरील लेखात केला होता तो पुन्हा आपल्यासमोर ठेवत आहे. म्युच्युअल फंडाच्या योजनेतून केवळ नियमित उत्पन्न मिळावे याच हेतूने काहीनी गुंतवणूक केली आहे. यामध्ये पेन्शन न मिळणारे सेवानिवृत्त लोक किंवा मुलांचा शैक्षणिक खर्च भागवला जावा, आकस्मित खर्चाची भरपाई व्हावी अथवा अधिक मासिक उत्पन्न मिळावे अशासारख्या हेतूने ज्यांनी गुंतवणूक केली आहे यांचाही सामावेश आहे. अशा व्यक्तींनी आपली गुंतवणूक एजंटचे मार्फतच करावी किंबहुना अशा प्रकारे गुंतवणूक करणे ही त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांना खर्चासाठी अधिक रक्कम मिळेल. एजंटमार्फत खरेदी केलेल्या युनिटची nav कमी असते, त्यामुळे अधिक युनिट आणि पर्यायाने अधिक डिव्हिडंड त्यांना मिळतो. फंड हाऊसच्या दृष्टीने एकाच योजनेचे  एजंटमार्फत किंवा एजंटशिवाय घेतलेले युनिट सारखेच समजले जातात. त्यांना एकाच दराने डिव्हिडंड दिला जातो. फक्त त्याचे निव्वळ मालमत्तामूल्य(NAV) कमी अधिक असल्याने विक्री/ खरेदी किंमती वेगवेगळ्या असतात. तेव्हा हे सर्व मुद्दे विचारात घेऊन युनिट एजंटशिवाय किंवा एजंटकडून घेण्याचा अंतिम निर्णय घ्यावा.

©उदय पिंगळे

मनाचेtalks येथे २२/०६/२०१८ रोजी प्रकाशित
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Wednesday, 20 June 2018

आर्थिक ज्ञानामोती उत्तरार्ध

#आर्थिक_ज्ञानमोती (उत्तरार्ध) *Pearls of financial wisdom 💰💰*

१२. वैयक्तिक गुंतवणूकदार योग्य मार्गाने गुंतवणूक करीत असल्याची एक मोठी खूणगाठ म्हणजे त्याचा गुंतवणूक संच स्थिर अथवा कमी बदलता असतो.
12) One best sign of *progress in individual investor’s portfolio* is no churn or very less churn.
१३.झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपल्याकडे असेल नसेल ते घालवण्यासाठीची  खात्रीची योजनाच.
13) Trying to get rich fast is a *foolproof way to lose what we have.*
१४. पैसे वाया घालवण्यापेक्षा एखादी गुंतवणूक योजना अथवा संधी वाया घालवणे कधीही चांगलेच. घाईगडबडीत अविचाराने गुंतवणूक करू नये. संधी वारंवार येत असते.
14) *Loosing an investing deal or opportunity is far better than losing money. Opportunity always comes.* Don’t invest in haste & hurry !!
१५. शक्य तेवढया झटपट पैसे मिळवणे हा गुंतवणूक मार्ग नाही परंतू दुर्दैवाने बहुतेक अनेकजण या मोहाला बळी पडतात.
15) *Making as much money as quickly as possible* is not an investment strategy. Unfortunately, for most of us that is the strategy.
१६.अधिक बचत करणे यासआक्रमकवृत्तीने बचत करणे हा पर्याय होऊ शकत नाही.
जास्तीत जास्त गुंतवणूक करून थोडा धोका स्वीकारणे हे कमी गुंतवणूक करून जास्त धोका स्वीकारण्यापेक्षा केव्हाही चांगलेच. यशस्वी होण्यासाठी, खर्चावर नियंत्रण ठेवून अधिक गुंतवणूक करणे हे सूत्र लक्षात ठेवावे.
16) Aggressive strategy cannot be a substitute for high savings. *
*Save high and take moderate risk: than saving less and taking high risk.* Spending less or saving more is d guaranteed formulae for “confirmed success”.
१७. हातचे सोडून पाळत्याच्या मागे धावू नका , फायद्यापेक्षा आपले नुकसान होणार नाही याची काळजी घेणे यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आहे.
17) The day we realise that “not losing” is as important as “winning”; *we would stop blindly chasing returns.*
१८.प्रतिकूल काळापेक्षा अनुकूल काळ अधिक असतो जरी आपण प्रतिकूल परिस्थितीत असाल तरी कोणतीही छोटी चांगली संधी गमावू नका.
18) Good periods are more than bad periods. By not timing, though we go through bad periods, do not miss even a single good period.
१९.झटपट फायदा मिळवण्यासाठी शक्ती वाया घालवण्यापेक्षा शेअर्समधील गुंतवणूक पूर्णपणे व्यावसायिकतेने केली तर संपत्तीत वाढ होईल.
19) We’ll stop looking for quick money the moment we consider stocks as businesses and realise that our wealth grows in line with business growth.
२०. अधिकाधिक फायदा, कमी फायदा, शून्य फायदा आणि तोटा हे गुंतवणूकचक्र आहे. दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी याचा अनुभव घ्यावाच लागतो.
20) There are 4 phases of investment cycle:
*# high returns,*
*# low returns,*
*# no returns* and
*# negative returns.*
We need to essentially go through all these phases to get good  *long term returns.*
२१.अनेकांनी व्यक्त केलेले बाजाराचे अंदाज आणि दररोज समभाग निवडीचे सल्ले ऐकून केलेली गुंतवणूक बहुतेकदा ही धोकादायक ठरते.
21) *Listening to many ‘market forecasts’ & daily dosage of ‘stock selection advice’ is not only useless but can be very harmful too; if you start acting on them.
२२. एवढ्या प्रचंड लोकसंख्येतील केवळ 3% भारतीय लोक गुंतवणुकीसंबंधीचे निर्णय स्वतः घेऊन आर्थिक स्वावलंभानाचा अनुभव घेत आहेत. हे कटू असले तरी सत्य आहे तेव्हा सजग राहून, अधिक जबाबदारीने वागून, जागृत होऊन गुंतवणुकींच्या संधीचे सोने करा.
22) *The hard truth is only around 3% of our Indian population are in a position to aspire for making own investment decisions to achieve financial independence! So, don’t waste this rare privilege bestowed upon you! Be wise & act with maturity!.
  यातील काही वचनांबद्धल मतभिन्नता असू शकते, परंतू सर्वसाधारण एकमत होईल यात शंका नाही म्हणून हा सर्व खटाटोप.
(संपूर्ण)

©उदय पिंगळे

‌मनाचेtalks येथे १९/०६/२०१८ रोजी पूर्वप्रकाशीत
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

विशेष निगराणीखालील समभाग

#विशेष_निगराणीखालील_समभाग (Additional Serveillance Measure)
    भांडवल बाजार नियंत्रक सेबी आणि शेअर बाजाराची व्यवहार कमिटी याचे व्यवहार होणाऱ्या कंपन्यांच्या भावावर लक्ष असते. बाजारात अनेक लोक कार्यरत असल्याने सट्टेबाजाकडून एखाद्या शेअर्सचे भाव नियंत्रित केले जावू शकतात. त्यामुळे मोठया प्रमाणात घबराट होऊन खरेदी अथवा विक्रीचे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. उलाढाल मोठया प्रमाणावर वाढून भाव एकाच दिशेने जाऊ लागतात. भाव खाली येत असेल तर आणखी घबराट होऊन विक्री वाढते त्यामुळे भाव अजून खाली जावून अजून जास्त घबराट होते. तर वाढणारे भाव अधिक वाढतील म्हणून कोणतीही मूलभूत माहिती नसताना भावात अनावश्यक वाढ होऊ शकते. ही भाववाढ खरेदीदारांना आकर्षित करून घेत असल्याने ते मोठया प्रमाणावर खरेदी करण्याची शक्यता वाढते. या दोन्हीं परिस्थितीत बाजारात फक्त विक्रेते किंवा फक्त खरेदीदार अशी स्थिती उद्भवते.  यामुळे सामान्य गुंतवणूकदार गडबडीत चुकीचा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे त्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठीच बाजाराची स्थिरता राखणे आणि गुंतवणूकदारांचे रक्षण करणे, या हेतूने सेबी आणि बाजार व्यवहार समिती आपापसात चर्चा करून त्यांना असलेल्या अधिकारात अशा समभागांच्या व्यवहारावर स्वतः हस्तक्षेप करून नियंत्रण आणू शकतात. बाजारभावात अल्प कालावधीत पडणारा फरक आणि उलाढालीत झालेली अपवादात्मक वाढ किंवा घट हे त्याचे प्रमुख निकष आहेत. ज्या शेअर्सचे बाबतीत ते या उपाययोजना लागू करतील त्यांना विशेष निगराणीखालील असलेले समभाग additional serveilance measures असे म्हणतात.
    अलीकडेच बाजारात झालेल्या पडझडीत काही मिडकॅप आणि स्मॉलकॅप यामध्ये अपवादात्मक उलाढाल वाढून त्यांचे भाव खूप खाली / वर झाले आणि अनेकदा त्यांना लोअर/अपर सर्किट लावावे लागले. अशावेळी सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ म्हणून अनेक शेअर वेळोवेळी निगराणीखाली (ASM) आणण्यात आले आहेत. असे करणे हा बाजार व्यवहाराच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. एफ ऍण्ड ओ मधील शेअर सोडून इतर सर्व शेअर्सना भावातील 20% फरकावर सर्किट फिल्टर लावलेले असतात.म्हणजेच त्या शेअर्सचे भाव दिवसभरात 20% हून कमी अधिक होऊ शकत नाहीत. जरूर पडल्यास एफ एन ओ मध्ये ट्रेड होत असलेल्या शेअर्सना फिल्टर लावले जाऊ शकतात किंवा त्यांच्या  व्यवहारांवर तात्पुरती बंदी आणली जाऊ शकते.             निगराणीखाली असलेल्या शेअर्सचे बाबतीत, सध्या--
१. हे फिल्टर 20% पेक्षा खूप कमी केलेले आहेत अनेक शेअर्सचे बाबतीत सध्या ते 5% वर ठेवले असल्याने त्यांचे भावात एका दिवसात 5% हून अधिक फरक पडू शकत नाही.
२. या शेअर्सचे बाबतीत डे ट्रेडिंग (त्याच दिवशी प्रथम खरेदी / विक्री करून नंतर विक्री / खरेदी) करता येणार नाही.
३.अशा शेअर्सचे खरेदीसाठी पूर्ण रक्कम (100℅) द्यावी लागेल.
४.विक्री करण्यासाठी आपल्या डी मॅट खात्यात तेवढे शेअर्स असले पाहिजेत तरच विक्री करता येईल. शॉर्ट सेलिंग करता येणार नाही.
  या निर्बंधांमुळे समभागातील सट्टेबाजीस आळा बसेल. मात्र जे खरेखुरे खरेदीदार किंवा विक्रेते असतील त्यांना खरेदी / विक्री करण्यास कोणताही अडथळा नसेल. खरेदी/ विक्री संदर्भात डे ट्रेडिंगवरील बंदी म्हणजे कंपनीवर केलेली कारवाई समजण्यात येणार नाही. या निर्बधांचा दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात येऊन त्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील. 6 जून 2018 रोजी ASM मध्ये NSE मधील 64 तर BSE मधील 109 नोंदणीकृत कंपन्यांचा सामावेश आहे.
   अलीकडेच अस्तित्त्वात आलेल्या परंतू फारसा वापर न केलेल्या या पद्धतीचा वापर, बाजारातल्या पडझडीमुळे अनेक शेअर्सचे बाबतीत नुकताच केला गेला. या तरतुदी माहीत नसल्याने काही जणांना संभ्रम झाला आहे. त्यातच एक्सचेंजकडून काढलेल्या परिपत्रकातून या शेअर्सचे डे ट्रेडिंग व्यवहार थांबवले आहेत, याचा सर्वच व्यवहार थांबवले आहेत असा समज निर्माण झाला. हे व्यवहार थांबवले नसून त्यावर तात्पुरते निर्बंध आणले आहेत. शेअर्समधील सट्टेबाजीस रोखण्याच्या या तरतुदी ट्रेड टू ट्रेड (T2T) पद्धतीशी मिळत्याजुळत्या आहेत.

©उदय पिंगळे

   ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Tuesday, 19 June 2018

आर्थिक ज्ञानमोती पूर्वार्ध

#आर्थिक_ज्ञानमोती  *Pearls of financial wisdom 💰💰*

      आजकाल व्हॉट्सऍपवर अनेक पोस्ट फिरत असतात. गंमत म्हणजे मी लिहलेल्या पोस्ट पोरक्या किंवा  दुसऱ्याच्या नावाने पुन्हा माझ्याकडे येतात. एकंदरीत आर्थिक विषयावर कमी पोस्ट असतात आणि फारच थोडे लोक त्या वाचतात. अलीकडेच एका पोस्टमध्ये आर्थिक विषयावर सुंदर माहिती आढळून आली ती कुणी संकलित केले ते माहीत नाही. त्यातील भाव कायम ठेवून आशय पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न. यात भावानुवाद आणि मूळ वचन एकापाठोपाठ एक दिले आहे. यात काही दोष असेल तर त्यात माझी समजूत कमी पडते आहे असे समजावे.

१.कर्जरोखे म्हणजे धनसंचय तर समभाग म्हणजे धननिर्मिती.
1) *Bonds are for storing wealth and equities are for creation of wealth*.
२. माझ्यामते, आपली सर्वात मोठी मालमत्ता म्हणजे आपल्यावर कोणतेही कर्ज नसणे.
2) In my opinion, the biggest asset one can have is *zero debt*.
३.सर्वात मोठी आर्थिक शिस्त म्हणजे आपल्या ऐपतीपेक्षा कमी खर्च करणे.
3) The greatest discipline in personal finance is *living below your means.*
४. बेन चार्लसन्सच्या मते, भावनांच्या मोजमापनाची पुनर्तपासणी करणे शक्य नाही. म्हणूनच पूर्वीची मंदी ही गुंतवणुकीची हुकलेली संधी होती असे वाटते तर अनेकदा भविष्य साशंक वाटते.
4) As Ben Carlson says, emotions cannot be back tested. That’s why past bear market always looks like opportunities and future ones scary.
५. लवकर मिळवलेले आर्थिक स्वावलंबन आणि आधी मिळवलेली निवृत्ती ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते पाहिल्यात हार्दिक शुभेच्छा आहेत तर दुसऱ्यात लवकर झालेली स्वप्नपूर्ती आहे.
5) *Early financial independence and early retirement are completely different.*
To me, the former is a blessing and the latter is a curse.
६. दहा वर्षांपूर्वी एखादया गोष्टीची आपण सुरुवात केली असती तर आता कुठे असतो याचा विचार आत्ता करण्यापेक्षा आज सुरुवात करून 10 वर्षानंतर आपण कुठे असू याचे स्वप्न पहा.
6) Don’t think how it would have been if you’ve started 10 years ago. *Start today and visualise: how you would feel 10 years from now.*
७. आपण ज्यांच्या संगतीत असतो त्यांच्याप्रमाणेच आपली जीवनशैली आणि खर्च करण्याची वृत्ती बनते. त्यामुळेच त्यांची निवड करताना आपली उद्दिष्टे, खर्च करण्याची क्षमता आणि व्यक्तित्व यांच्याशी सुसंगत व्यक्तींच्या संगतीत रहा.
7) The neighbourhood we live determines our life style & spending. *Need to be careful in choosing one which matches our goals, pocket (budget) and personality.*
८. क्रेडिट कार्डची किमान देय एवढीच रक्कम नियमित भरण्याची सवय हा आपण भविष्यात मोठया कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचा पहिला संकेत आहे.
8) Paying minimum balance regularly on your credit card is the first sign *that you’re getting into huge, certain debt trap.*
९. अनेक दीर्घ कालावधीची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मंदीची वाट पहात हाती असलेल्या सुवर्णसंधी सोडतात. या संधीचा उपयोग करणाऱ्या ९०% दीर्घकालीन गुंतवणूकदारांना यातून सर्वाधिक फायदा होतो.
9) Many are *long term investors* till next bear market.... Ignoring the ‘bear market phase’ mostly benefits 90% long term investors.
१०. नेहमी मर्यादित जोखीम स्वीकारा. अतिधाडस दाखवून घेतलेला एक चुकीचा निर्णय आपल्याला आपल्याला आर्थिकदृष्ट्या एक तापाहून अधिक मागे घेऊन जाऊ शकतो.
10) Don’t take aggressive bets.
*But take measured & pre-calculated risk.* Remember: one blunder can push you back by a decade or more in terms of wealth.
११.अधिक बचत,योग्य गुंतवणूक निर्णयआणि संयम यांच्या संयोगातूनच मोठया प्रमाणात संपत्ती निर्माण होते. लक्षात ठेवा शेअरबाजारात कमीपात्र व्यक्तीची संपत्ती अधिकपात्र व्यक्तीकडे हस्तांतरित होत असते.
11) Big money can be made through high savings, wise investing decisions and huge patience.  Remember:
*Stock market is the place where wealth is transferred from an impatient men to a patient, mild & sober guy!*
(अपूर्ण)

©उदय पिंगळे

मनाचेtalks येथे १९/०६/२०१८ रोजी पूर्वप्रकाशीत
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 8 June 2018

म्युच्युअल फंड युनिट ग्रोथ की डिव्हिडंड पर्याय ?

#म्युच्युअल_फंड_युनिट_ग्रोथ_की_डिव्हिडंड_पर्याय?

  1 एप्रिल 2018 पासून  इक्विटी म्युच्युअल फंडावरील एक लाखाहून अधिक दीर्घकालीन नफ्यावर काही अटींसह 10% कर अधिक सेस लावण्यात आला आहे तर या युनिट्सवर मिळणाऱ्या लाभांशावर 10% डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टेक्स अधिक अधिक सेस लावण्यात आला आहे. यामुळे यातील कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे याबाबत चर्चा चालू आहे. एक लाखापर्यंत दिर्घमुदतीच्या नफ्यावर कर नाही त्या तुलनेत लाभांश रूपाने मिळालेल्या एक रुपयांवरही कर द्यावा लागेल. त्यामुळे सकृतदर्शनी ग्रोथ पर्याय फायदेशीर होईल असे वाटते परंतू असा सरसकट निष्कर्ष काढणे चुकीचे होईल. या दोन्ही पर्यायांचे काही फायदे तोटे आहेत. मुळात तुलना ही समान गोष्टीत होऊ शकते या दोन्ही गोष्टी असमान आहेत. योजनेस झालेल्या नफ्याचे ठराविक काळाने धारकांना वाटप हा झाला डिव्हिडंड पर्याय अशा प्रकारे सातत्याने काहीतरी उत्पन्न मिळत राहणे ही काही लोकांची विशेषतः पेन्शन न मिळणाऱ्या निवृत्त लोकांची गरज असू शकते. त्यामुळे ग्रोथ पर्यायात एक वर्षांनंतर मिळू शकणारा एक लाख रुपये करमुक्त फायदा हा त्यांच्या दृष्टीने व्यवहार्य पर्याय होवू शकत नाही. ग्रोथ पर्यायात मिळालेला फायदा हा धारकांना न देता त्याची गुंतवणूक केल्याने योजनेच्या मूल्यात वाढ होते. ज्यांना नियमित उत्पन्नाची अजिबात गरज नाही अशा व्यक्तींना  हा पर्याय फायद्याचा होऊ शकतो. जर वेळोवेळी एक लाख रुपयांचा करमुक्त भांडवली नफा त्यांनी काढून घेतला आणि तो व्यवस्थित गुंतवला तर अधिक त्यातून अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळेच कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी त्याचा सर्व बाजूनी विचार करायला हवा.
   त्यामुळेच जे लोक दीर्घ कालावधीच्या हेतूनेच गुंतवणूक करीत आहेत त्यांना ग्रोथ पर्याय योग्य आहे. फक्त यातील गुंतवणुकीतील नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली कर कदाचित द्यावा लागेल ही बाब लक्षात ठेवून आपले धोरण बदलावे लागेल. तर येणारा डिव्हिडंड हेच ज्यांचे उत्पन्नाचे साधन त्यांना जरी कर बसत असेल आणि त्यामुळे उत्पन्न थोडे कमी होत असेल तरी त्यांना कोणताही किफायतशीर पर्याय नसल्याने लाभांश घेणे याशिवाय पर्याय नाही. अलीकडेच एच डी एफ सी म्युच्युअल फंडाने यावर  लोकांना पर्याय म्हणून त्यांच्या रिसर्च टीमने सादर केलेला एक रिपोर्ट माझ्या वाचनात आला. त्यात त्यांनी सध्याचे युनिट याच योजनेच्या ग्रोथ योजनेत स्विच करून अपेक्षित रकमेची एस डब्लू पी घेण्याचा पर्याय  सुचवला असून यामुळे करबचत होऊन फायदा कसा होऊ शकतो हे सप्रमाण दाखवून दिले आहे. ही आकडेवारी अचूक आहे यात शंकाच नाही. परंतू केवळ यामुळे हा पर्याय स्वीकारावा का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे कारण त्याचे संभाव्य परिणाम विचारात घेता नुसता फॉर्म भरून सही करण्याऐवढे ते सोपे नाही. इतर अनेक गोष्टींचा विचार करणे जरूरीचे आहे.
   लाभांश पर्याय स्वीकारण्याचा हेतू : आपण लाभांश पर्याय हा एफ डी ला पर्याय म्हणून घेतला होता यात सातत्याने खर्चाला पैसे मिळावेत आणि मूळ गुंतवणूक अल्पप्रमाणात वाढावी या हेतूने घेतले असतील तर --
आपण स्विच करणाऱ्या युनिटवर दीर्घ मुदतीचा नफा / तोटा किंवा अल्पमुदतीचा नफा / तोटा होऊ शकतो. जर नफा असेल तर त्यावर कदाचित कर भरावा लागेल. तोटा असेल तर तर तो आठ आर्थिक वर्षातील नफ्यासोबत  समायोजित होऊ शकतो. यामुळे निव्वळ परतावा कमी होऊ शकतो. याशिवाय जी आकडेवारी आपला कर वाचवला जात आहे असे दर्शवते तशीच बाजाराची चाल पुढील काही वर्षे चालू राहिली तरच मिळेल. अन्यथा निव्वळ उत्पन्न आणि मूळ रक्कम यात घट होत राहील. यावर उपाय म्हणून लक्ष ठेवून एस डब्ल्यू पी बंद करणे हा पर्याय होऊ शकतो अन्यथा 'तेलही गेलं आणि तूपही गेलं' अशी अवस्था व्हायची. तेव्हा या सर्व गोष्टी विचारात घेऊन स्विच संबंधी निर्णय घ्यावा. याशिवाय एस डब्लू पी बंद केल्याने आपल्या रोख प्रवाहितेत cash flow फरक पडेल ते वेगळेच.
   ज्यांना नियमितपणे लाभांशाची जरुरी नाही परंतू लाभांश पर्याय स्वीकारला आहे त्यांनी युनिट स्विच करण्यास कोणतीही हरकत नाही. डिव्हिडंड ऐवजी बोनस युनिट देण्याचा पर्याय ग्रोथ आणि डिव्हिडंड पर्याय स्वीकारणाऱ्या धारकास देण्याची गरज आता या तरतुदीमूळे निर्माण झाली आहे. असा पर्याय युनिटधारकाना पूर्वी होता तो फंड हाऊसनी पुन्हा उपलब्ध करून द्यावा आणि युनिटधारकांनी याबद्दल आग्रह धरावा. जर आपल्या ग्राहकांचा कर मोठया प्रमाणात वाचावा अशी त्यांची खरोखरच इच्छा असेल या सूचनेचा ते जरूर विचार करतील.

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 1 June 2018

आयकरासंबंधी 9 महत्वाचे बदल

#आयकरासंबंधी_9_महत्वाचे_बदल
  1 एप्रिल 2018 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. यावर्षांपासून लागू असलेल्या आयकरासंबंधीच्या महत्वांच्या बदलांकडे एक दृष्टीक्षेप.
१. दीर्घ मुदतीच्या नफ्यावर कर (Long Turm Capital Gain) : या वर्षी झालेला हा सर्वात महत्वाचा बदल असून शेअर आणि इक्विटी म्युच्युअल फंडावर एक वर्षांनंतर मिळणारा दीर्घ मुदतीचा करमुक्त नफा आता काही अटींसह करप्राप्त झाला आहे. 31 जानेवारी 2018 पर्यंत होऊ शकणाऱ्या दीर्घकालीन नफ्यास यातून वगळण्यात आले आहे.1 एप्रिल 2018 पासून एक वर्षानंतर होणारा नफा हा दीर्घकालीन नफा समजण्यात येऊन त्यातील 1 लाख रुपयांहून अधिक नफ्यावर 10% कर द्यावा लागेल. या नफ्याची मोजणी कशी करायची यासंबंधी Central Board of Direct Taxes ने विस्तृत परिपत्रक काढले असून त्याप्रमाणे 31 जानेवारी 2018 पर्यंत होऊ शकणाऱ्या फायद्यास नियमानुसार सूट मिळेल. तसेच दीर्घकालीन तोटा यात मिळवला जाईल,तरीही तोटा राहात असेल तर तो त्यापुढील 7 वर्षातील फायद्यात तो मिळवता येऊ शकेल. या पत्राचा भावानुवाद मागील एका लेखात आहे तो अवश्य पहावा.
२. प्रमाणित वजावट (Standared Deduction) : पगारदार लोकांना ही सवलत असून त्यांना एकूण उत्पन्नातून 40 हजार रुपयांची वजावट मिळेल. त्यांना मिळणारा 15 हजार रुपये आरोग्यभत्ता आणि 19 हजार 2 शे पर्यंत मिळणारा प्रवासभत्ता यावर मिळणारी सवलत काढून घेण्यात आली आहे.
३.जेष्ठ नागरिकांना काही सवलती : जेष्ठ नागरिकांना व्याजाचे उत्पन्न म्हणून जी रक्कम मिळेल त्यातील 50 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या व्याजावर कर लागणार नाही. यात सेव्हिंगबँकवरील व्याजाशिवाय मुदत ठेव आणि आवर्ती ठेवी यांचा सामावेश करण्यात आला आहे. यामुळे त्यांना यापूर्वी सर्वांना बचत खात्यावरील 10 हजारापर्यंत मिळू शकणाऱ्या करमुक्त व्याजाची सवलत त्यांना मिळणार नाही. यापूर्वी त्यांना मिळत असलेली 30 हजार रुपयांपर्यंतची आरोग्यविमा वर्गणी 50 हजार पर्यंत करमुक्त असेल. गंभीर आजारावरील उपचाराकरिता मिळणारी 60 ते 80 हजार रुपयांची वजावट सरसकट 1 लाख करण्यात आली आहे.
४.राष्ट्रीय निवृत्ती योजनेची ( National Pension Scheme) सर्वांना सरसकट करमुक्त वजावट : पगारदार व्यक्तींना या योजनेचे खाते बंद करताना यातील 40% रक्कम करमुक्त होती. यामुळे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर अन्याय होत होता. आता ह्या सवलतीचा लाभ सर्वांना घेता येईल.
५.दीर्घ मुदतीचा कर वाचवणाऱ्या विशिष्ट रोख्यांच्या कालावधीत वाढ Capital Gain Bonds : मूलभूत सुविधांत वाढ व्हावी म्हणून अशा प्रकारच्या रोख्यात 6 महिन्याच्या आत गुंतवणूक करून 50 लाखापर्यंत दीर्घ मुदतीच्या नफ्यावरील कर वाचवता येतो. यापूर्वी त्याचा कालावधी 3 वर्ष होता तो आता 5 वर्ष करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी ही सवलत कोणत्याही दिर्घमुदतीच्या नफ्यावर घेता येत असे यापुढे ही सवलत जमीन, घर, व्यावसायिक जागा अशा स्थावर मालमत्तेच्या विक्रीपुरती मर्यादित असेल.
६.लाभांश वितरण कर Dividend Distribusion Tax : याआधी इक्विटी म्युच्युअल फंडाचा डिव्हिडंड युनिट धारकांना करमुक्त मिळत होता आता त्यावर 10% कर त्यावर12% सरचार्ज आणि 4% सेस लावण्यात आला आहे. हा कर कापूनच लाभांश युनिटधारकांना मिळेल. सहाजिकच त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात वाढीव कराने घट होईल. युनिट धारकाचे उत्पन्न कितीही कमी असले तरी हा कर कापला जाईल आणि त्याचा कोणताही परतावा मिळणार नाही.
७. सेसमध्ये वाढ : सेस म्हणजेच करावर घेतला जाणारा जास्तीचा कर यापूर्वी 3% होता तो आता 4% करण्यात आला आहे.
८.कलम287/A नुसार करात मिळणाऱ्या सवलतीत बदल : यापूर्वी ज्या सर्वसाधारण करदात्यांचे आणि वरिष्ठ नागरिकांचे उत्पन्न 5 लाख होते त्यांना या कलमाने 5 हजार रुपयांची करसवलत मिळत होती ती 2 हजार पाचशे करण्यात येऊन सर्वसासाधारण व्यक्तीची करपात्र उत्पन्न मर्यादा 5 वरुन 3 लाख आणि जेष्ठ नागरिकांना 3.5 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
९. उशिरा विवरणपत्र Income Tax Return सादर करण्याच्या दंडात वाढ : गेल्या आर्थिक वर्षाचे (2017/18) विवरणपत्र दाखल करण्याची मुदत 31 जुलै 2018 आहे किंवा नंतर सरकारकडून अधिकृतरित्या जी तारीख सांगितली जाईल ती असेल. यानंतर उशिरा दाखल केलेल्या विवरणपत्राना 31 डिसेंबर 2018 पर्यंत 5 हजार आणि 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 या कालावधीत 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत31 मार्च 2019 नंतर 2017/18 या कालावधीचे विवरणपत्र भरता येणार नाही. हा दंड भरल्यानंतरच विवरणपत्र दाखल करता येईल.तथापि ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाखाहून कमी असेल त्यांना हाच दंड 1हजार रुपये एवढा मर्यादित असेल.
  आयकारासंबंधी हे महत्वाचे बदल लक्षात ठेवून त्याप्रमाणे वेळीच उपाययोजना करावी म्हणजे आयत्या वेळी धावपळ करून होणारा मनस्ताप टाळता येईल.

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .