Friday, 5 January 2018

गोष्टी सांगेन युक्तीच्या चार

#गोष्टी_सांगेन_युक्तीच्या_चार.....

   शेअरबाजारात केलेली गुंतवणूक ही जाणीवपूर्वक धोका स्वीकारून केली जाते .महागाईवर मात करणारा परतावा यातून मिळावा आणि आपली दीर्घकालीन उद्दीष्टे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत ही या मागे इच्छा असते .अंतिमतः आपला फायदाच व्हावा अशी येथे गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाची अपेक्षा असते .अनेकजण मला मी कोणते शेअर ,  म्यूचुअल फंडाची कोणती योजना घेवू ते विचारतात . या प्रत्येकाची सर्व तपशिलवार माहिती माझ्याकडे बहुदा नसते . त्यामुळे त्याना उपयोगी पडेल अशी माहिती मी त्याना चर्चा केल्याशिवाय देवू शकत नाही .बाजारात आपण कोणता शेअर कधी आणि कोणत्या भावाने घेणार आणि विकणार यावर आपल्याला होणारा नफा /तोटा निश्चित होतो .
  चांगले शेअर घ्यावेत हे सर्वमान्य आहे .यासाठी अभ्यास करावा लागतो आणि त्याला पर्याय नाही . याशिवाय आपल्याकडे किती पैसे आहेत ? ते कधी हवे आहेत ? किती परतावा अपेक्षित आहे ?आपण किती जोखीम घेवू शकतो ? किती झटपट आणि अचूक निर्णय घेवू शकतो ? यासारख्या अनेक गोष्टींवर ते अबलंबून आहे .चांगले शेअर  कोणते ? ते कसे शोधावे ? यासाठी कोणते मार्ग आहेत ज्यामूळे आपले नुकसान होणार नाही यावर विचार करुयात .
   १. शेअर मार्केटच्या अभ्यासासाठी इंग्रजीत अनेक पुस्तके उपलब्ध आहेत .याशिवाय N I S M / B S E / N S E यांचे विविध विषयावरिल प्रमाणपत्रांचे अभ्यासक्रम अल्पखर्चात उपलब्ध आहेत त्यावर पुस्तके उपलब्ध आहेत .त्यांची माहिती सदर संस्थांच्या संकेतस्थळांवर आहे .मराठीत ज्याला शेअरबाजाराची गीता असे म्हणता येईल असे ' शेअर बाजार , जुगार छे ! बुद्धीबळाचा डाव ' हे रवींद्र देसाई यांनी लिहिलेले राजहंस प्रकाशन यांनी प्रसिद्ध केलेले पुस्तक अतिशय उपयुक्त आहे .यामध्ये देसाई सर यांनी चांगली कंपनी कशी शोधायची त्यासाठी excel sheets मध्ये कोणत्या माहितीचे संकलन करुन त्याचे विश्लेषण कसे करावे हे सविस्तर सांगितले आहे . शेअरचे भाव अनेक कारणांनी वाढतात / कमी होतात , परंतू कंपनीच्या चांगल्या कामगिरीवरून टिकून रहातात,  स्थिर होतात आणि अंतिमतः वाढतात .
   २.moneycontrol , mutulfundonline , bseindia , nseindia यांचे संकेतस्थळावर गुंतवणूकदाराना उपयुक्त शेअर आणि म्यूचुअल फंड याविषयी रेडीमेड माहिती उपलब्ध आहे .म्यूचुअल फंडाचे टॉप रेन्किंग आणि टॉप परफॉर्मींग असे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते .त्यांचे टॉप होल्डिंग पाहायला मिळते त्यांनी निवडलेले स्टॉक या 100% चांगल्याच कंपन्या नेहमी असतात .
   ३.सी सी पी ( Coffee can portfolio) या तंत्राने अनेक फंड हाऊस ,वित्तसंस्था त्यांनी शोधलेले चांगले शेअर्स जाहीर करतात .ही माहिती आपणास गुगलवरून सहज उपलब्ध होते .ते तपासुन उपलब्ध माहिती पडताळून पहावी .
  ४.जर आपल्याला चांगल्या कंपन्या शोधता आल्यास त्यांचा RSI ( relative strength index) गुगल वरून शोधावा. 0 ते 100 अशा %मध्ये दर्शविला जातो  जर तो 30 चे आसपास असेल तर त्याचा अर्थ असा होतो की सदर स्टॉक कमी किंमतीस उपलब्ध असून तो खरेदी करण्यास हरकत नाही .तर 70 चे आसपास असेल तर विक्रीस हरकत नाही .याला अपवाद काही कंपन्या आहेत यांचे भान ठेवावे .
  ५.शेअरबाजार या विषयाची अनेक मासिके आणि स्वतंत्र चॅनेल आहेत .यावर लक्ष ठेवून आपले मत बनवावे यांचे मालकीहक्क उद्योग समुहाकडे असल्याने यातून निष्पक्षपाती माहिती मिळेलच असे नाही याची जाणीव ठेवावी .माझ्याकडे गेले 20 वर्षे कॉर्पोरेट इंडिया हे पाक्षिक येते त्यांनी सुचवलेले शेअर वर्षभरात उत्तम रिटर्न देतात असा अनुभव आहे .मांत्र माझ्याकडे पाक्षिक येईपर्यंत त्यांनी सुचवलेल्या किमतीचेवर शेअरचा भाव नेहमीच गेलेला असतो .अश्यावेळी मी तो भाव लिहून ठेवून त्या जवळपास अथवा खाली भाव येण्याची वाट पाहून मगच तो शेअर खरेदी करतो .
   ६.एक वर्षानंतर शेअरविक्रीतून मिळालेला नफा पुर्णपणे करमुक्त आहे .यामुळे आपल्याजवळ असलेले आणि चांगला भाव मिळू शकणारे शेअर अनेकजण तसेच ठेवतात .यावर फक्त 15% कर द्यावा लागतो .तेव्हा गुणवत्तेवर हे शेअर ठेवावे की लगेच विकावे याचा निर्णय घ्यावा .फक्त कर भरावा लागेल की नाही एवढाच विचार करू नये .
   ७.वर्षभरात किमान दोन वेळातरी काहीतरी घबराट होवुन शेअर मार्केट खाली येते .ही वेळ उत्तम शेअर खरेदी करायची अनमोल संधी असते .संधीसाधू होवुन त्याचा लाभ घ्यावा .अल्पकाळात उत्तम रिटर्न मिळू शकतो .
   ८.आपल्याला किती रिटर्न मिळतो आहे हे त्वरित काढता येणे जरुरीचे आहे म्हणजे निर्णय त्वरित घेता येतो .प्ले स्टोरवरून finanicial calculation हे एप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे .यात सिंपल आणि कम्पाउन्ड इंटरेस्ट काढाता येते .कोणते एप्लिकेशन घ्यावे याबद्धल संभ्रम असेल तर fncalculation.com येथे जावे .
   ९. भाव कमी आहे एवढ्याच निकषावर कोणाताही शेअर खरेदी करू नये .फायदा होणे महत्वाचे आहे . नाहीतर  मोठया प्रमाणात रक्कम अडकून राहू शकते किंवा नूकसानही  होवू शकते .
   १०.डे ट्रेडिंग /फॉरवर्ड ट्रेडिंग आपल्याकडे असलेल्या पूर्ण पैशाएवढे करावे .जास्त मिळणारे एक्पॉजर टाळावे .कर्ज घेवून खरेदी करू नये .
    बाजारात आपल्याला शेअरचे भाव दिसत असतात त्याचे मूल्य शोधून काढायचे असते .अनुभव आणि ज्ञान यासाह्याने ते आपल्याला जमू शकते . व्यवहारज्ञान हे येथील भांडवल असून त्याला अभ्यास आणि विश्लेषण यांची जोड मिळावी. तेव्हा समृद्ध व्हा आणि शेअरवरील आपले अनुभव शेअर करा !

©उदय पिंगळे

( या लेखात उल्लेख असलेले पुस्तक , संकेतस्थळे , पाक्षिक , एप्लिकेशन यांच्याशी लेखकांचा कोणाताही व्यावसाईक संबंध नाही .शेअर, म्यूचुअल फंड यातील गुंतवणूक ही धोकादायक प्रकारात मोडत असून यासंबंधात कोणतीहि शिफारस नाही. तज्ञांकडून योग्य ती माहिती घेवूनच आपली गुंतवणूक करावी )
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:

Post a Comment