Friday, 26 January 2018

ब्लॉक डील आणि बल्क डील

#ब्लॉक_डील_आणि_बल्क_डील

  मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी विक्रीच्या संदर्भात block deal आणि bulck deal  हे शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतात .जरी हे शब्दप्रयोग मोठ्या व्यवहारासंदर्भात वापरले जात असले तरी ते पूर्णपणे भिन्न आहेत , म्हणजे  काय ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया .या दोन्ही प्रकारचे व्यवहार प्रामुख्याने प्रमोटर्स , खूप मोठी मालमत्ता असलेले गुंतवणूकदार , स्वदेशी आणि परदेशी वित्तसंस्था , म्यूचुयल फंड , पेन्शन फंड , विमा कंपन्या  यांच्याकडून केले जातात .हे व्यवहार जाहीर केले जात असल्याने गुंतवणूकदारांना कोण आणि कशासाठी व्यवहार करीत आहेत या संबंधी अंदाज बांधता येतो . एखादी व्यक्ती किंवा संस्था यांचे कोणत्या कंपनीच्या शेअर्स घेण्यात उत्सुक आहेत ते समजते . एकाद्या कंपनीच्या उलाढालीत होणारे बदल हे तांत्रिक विश्लेषणाचा ( Technical Analyses) एक महत्वाचा भाग आहेत .त्यामूळे टेक्निकल एनालिस्ट त्यावर लक्ष ठेवून असतात .
    १.ब्लॉक डील :ब्लॉक डील हा एक असा व्यवहार आहे जो किमान 5 कोटी रुपयांचा असतो .असा सौदा 2 व्यक्ती /संस्था यांच्यात एकमेकांच्या मान्यतेने होतो .यातील शेअर्सचा मान्य भाव हा या व्यवहाराच्या आधीच्या दिवसाच्या बंद भावापेक्षा 1% कमी /अधिक असू शकतो . असे सौदे डिलिव्हरी बेसच केले जातात .हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळी व्यवस्था केली असून सकाळी 09:15 ते 09:50 या 35 मिनिटांच्या काळात ते करावे लागतात .नेहमीच्या platform वर  हे व्यवहार दिसत नाहीत . ते एक्सचेंजकडून ताबडतोब जाहीर केले जातात .
   २.बल्क डील : भागभांडवलाच्या अर्धा टक्यांहून अधिक शेअर्सचे  खरेदी / विक्री व्यवहार यांना बल्क डील असे म्हटले जाते .असे व्यवहार बाजाराच्या वेळेत एक अथवा अनेक व्यवहारामधून होत असल्याने तसेच ते त्या त्या वेळेच्या  बाजारभावाच्या प्रमाणे होत असल्याने शेअरचे भाव कमी जास्त होण्यात मोठी भूमिका बजावू शकतात .यात डे ट्रेडिंगही करता येते . एका व्यक्तीकडून,  एक वा अनेक व्यवहारातून एकाच कंपनीच्या शेअरमध्ये असे व्यवहार झाल्यास ब्रोकरला एक्सचेंजमध्ये  कळवावे लागते .एक्सचेंजमधून बाजार नियामक  सेबीला (Securities and exchange board of india) त्यांची माहिती दिली जाते .काही शंका आल्यास हे व्यवहार नियमांना धरून आहेत ना ? याची तपासणी करून यातून काही अनुचित व्यवहार निदर्शनास आले तर असे व्यवहार करणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई केली जावून त्यांना पुढे कोणतेही व्यवहार करण्यासाठी अपात्र अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात त्याचप्रमाणे झालेले व्यवहार रद्द होवू शकतात .
    मोठ्या रकमेचे व्यवहार एकंदरीत गुंतवणूक प्रमाण वाढल्याने कोणी टाळू शकत नाहीत .त्याचप्रमाणे त्यावर कोणतेही बंधनही आणू शकत नाही .अशा व्यवहारांमुळे घबराट होवून भाव खाली आल्यास छोट्या गुंतवणुकदारांचे नुकसान होवू शकते . मार्केटवरील लोकांचा विश्वास वाढावा आणि शेअरचे भाव त्याच्या मुल्याएवढे होण्यास मदत व्हावी .   यासाठी अशी पद्धत स्वीकारण्यात आली आहे .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 19 January 2018

बँकिंग चार्जेस यू टर्न ....

सध्या सोशल मीडिया वर बँक चार्जेसचे संदर्भात एक पोस्ट वायरल झाली असून त्यात उल्लेख केल्याप्रमाणे आता बँकिंग सेवा महाग होणार असून यापूर्वी फुकट मिळणाऱ्या सेवांबद्दल आता शुल्क द्यावे लागणार आहे . ' ABP माझा'  या वाहिनीने याबाबत  एका विशेष रिपोर्टद्वारे खुलासा करून भारतीय स्टेट बँकेखालोखाल तळागाळात पोहोचलेली देशातील दुसरी मोठी सरकारी बँक , बँक ऑफ इंडिया आता अनेक बँकिंग सेवांसाठी 20 जानेवारी 2018 पासून  शुल्क आकारणार आहे , अन्य बँकांचे सध्याचेच धोरण चालू राहील , असे जाहीर केले आहे . एकीकडे सरकार ऑनलाइन व्यवहार अधिकाधिक व्हावेत म्हणून प्रयत्नशील आहे तर ऑनलाईन /ऑफलाइन असे दोन्ही व्यवहार हे आपल्या उत्पन्नाचे साधन बँक ऑफ इंडिया बनवू पहात आहे .ही प्रेरणा त्यांनी बहुतेक स्टेट बँकेकडून घेतली असावी . अर्थखात्याकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या आठ महिन्यात किमान शिल्लक न ठेवल्याने त्यावरील आकारणीतून काही कोटी रुपये मिळवले आणि आपली अकार्यक्षमता झाकली .याबाबत स्टेट बँकेने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही .
   रिझर्व बँकेने सेवांवर शुल्क आकारणिस सर्व बँकांना परवानगी दिली आहे , त्याचे दर आणि संख्या ठरवण्याचे स्वातंत्र दिले आहे . ज्या ग्राहकांच्या ठेवींवर आपण सर्वाधिक नफा मिळवतो त्यांना त्यांच्या गरजेच्या सेवा या विनामूल्य मिळायलाच हव्यात नव्हे किंबहुना त्याचा तो हक्कच आहे या गोष्टींकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे .मी या सेवांचा उल्लेख विनामूल्य केला आहे ' फुकट ' हा शब्द टाळला आहे .सर्वांना फुकट , सेल , डिस्काऊंट या गोष्टींचे आकर्षण आहे परंतू फुकट काही मिळत नाही याची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची जरूरी आहे . प्रत्येक सेवेला तिचे काहीतरी मूल्य आहे आणि ते वसूल केले जावे याबद्धल दुमत नसावे परंतू सर्वसामान्य ग्राहकांचे हित टांगणीला लावून अशा तऱ्हेने शुल्कवसुली हे त्याचे आर्थिक  शोषणच आहे .
  या शुक्लवाढीचा झटका हा सामान्य ठेवीदारांना बसणार आहे कारण त्यांच्या अडीअडचणीला बँकेतील ठेव हा त्यांचा मुख्य आधार आहे .त्यांनी बँकेच्या नियमानुसार किमान ठेवलेल्या रकमेपेक्षा कितीतरी मोठी रक्कम वेळप्रसंगी उपयोगी पडेल म्हणून आपल्या बचत खात्यात अतिरिक्त ठेवली आहे जरी ही ठेव मागणीदेय (on demand) असली तरी एकाच वेळी त्यांची मागणी येत नसल्याने खूप मोठी रक्कम बँकेला सर्वात कमी व्याजदरांत (3.5%) उपलब्ध होते .याचा मोबदला म्हणून दरमहा त्याला आपल्या गरजेइतके व्यवहार विनामूल्य करता यायला हवेत .हे व्यवहार शोधून त्यांची आवश्यकता लक्षात घेवून त्यांची संख्या निश्चित करणे गरजेचे आहे . त्याचप्रमाणे या सेवाचे दर निश्चित करण्याची जरूरी आहे .प्रत्येक बँकेची ओपेरेटिग कॉस्ट वेगळी असली तरी या सेवांच्या दरात असणारा जमीन आसमानाचा फरक लक्षात घेता यावर काहीतरी बंधन असणे जरूरीचे आहे .प्रगत तंत्रज्ञानांच्या वापराने या सेवाचे दर दिवसेंदिवस कमी  होणे जरूरीचे आहे .या संदर्भात पाश्चात्य देशांचा दाखला देण्यात येतो .तेवढी सक्षम आणि दर्जेदार सेवा आपणास बँकांकडून मिळते का ? याचाही विचार होणे आवश्यक आहे . यातील आपल्या फायद्याच्या तरतुदी स्विकारायच्या आणि ग्राहकांच्या हिताच्या तरतुदींकडे दुर्लक्ष करायचे , हा कोणता न्याय ?
   या शुक्ल वाढीचे दोन महत्वाचे परिणाम होवू शकतात -
१. अशी शुल्क आकारणी करणारी बँक आपले विद्यमान आणि संभाव्य ग्राहक गमावू शकते .
२. अनेक बँकांना यापासून आपली अकार्यक्षमता लपवून उत्पन्न मिळवण्याचा एक नवा मार्ग उपलब्ध होईल आणि ऑपरेटिंग कॉस्टचे नावाखाली ते या सेवा महाग करतील .
  सध्याच्या परिस्थिती दुसरी शक्यता जास्त वाटत असून यातून बँकांची मनमानी वाढण्याची जास्त शक्यता वाटते त्यामुळे ग्राहकांनी , त्यांच्या संघटनांनी या विषयी रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे (banking regulator) यात हस्तक्षेप करण्याची मागणी करावी .जर अशा प्रकारे चार्जेस लावायचेच असतील तर ग्राहकांनाही त्यांच्या गुंतवणूक कालावधीनुसार वाढीव व्याज दिले जावे अशी मागणी करावी .बँकानी आपला मूळ व्यवसाय म्हणजे ठेवी मिळवणे , कर्ज देणे आणि त्याची नियमित वसुली करणे यावर अधिक लक्ष केंद्रित करून आपले एन पी ए प्रमाणाबाहेर वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे उत्पन्न मिळवण्याचे असे दुय्यम मार्ग शोधण्याची त्यांच्यावर वेळ येणार नाही .
    सध्या असे कोणतेही शुल्क घेण्याचा विचार नसल्याचा खुलासा इंडियन बँक असोसिएशनने केला असून बँक ऑफ इंडियाने त्यांच्या संकेतस्थळावरून हे परिपत्रक मागे घेतले आहे . याआधी श्री अभय दातार मुंबई ग्राहक पंचायत , यांनी फेब्रुवारी 2012 ला ग्राहकांचे वतीने अशा तऱ्हेने एकतर्फी शुल्कवसुली करण्यास विरोध दर्शविणारे पत्र रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक असोसिएशन यांना पाठवले होते त्यानंतर यातील काही चार्जेस मागे घेण्यात आले . तेव्हा पुन्हा ते लागू करण्याविषयी ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया काय आहेत ? याची चाचपणी बँका करीत असण्याची शक्यता असून नियोजित फर्डि बिलाप्रमाणे या संदर्भातील घडामोडींवर लक्ष ठेवून ग्राहकांनी वेळीच आवाज उठवण्याची गरज आहे .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 12 January 2018

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

#सरते_आर्थिक_वर्ष_आणि_करनियोजन.....


   अजून थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज  घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू या.
आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या. 2017/18या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे ऐकूण करपात्र उत्पन्न ₹2लाख 50हजारचे आत असेल तर तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही. जर आपले वय 60हून अधिक असेल तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹3लाख व आपण अतीवरीष्ठ नागरीक असाल म्हणजेच आपले वय 80 पेक्षा जास्त असेल तर ही मर्यादा ₹5लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे  खर्चावर नाही (त्यासाठी GST आहे) आपले सर्व मार्गाने होणारे ऐकून उत्पन्न यासाठी विचारात घेणे जरुरीचे आहे.यातून बचत आणि गुंतवणूक केलेली एकूण विहीत  मर्यादेतील रकमेची सूट घेवून निव्वळ करपात्र उत्पन्न काढता येते . यातील 2.5 लाख ते 5 लाखापर्यतचे करपात्र उत्पन्नावर 5% त्यावरील 10 लाख रुपयापर्यंतचे करपात्र उत्पन्नावर ₹12500+20%आणि त्यावरील करपात्र उत्पन्नावर ₹112500+ 30% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर सरचार्ज म्हणून 3% दराने शिक्षण व उच्च शिक्षण कर द्यावा लागतो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न  50 लाखांचेवर परंतू 1कोटीचे आत आहे त्या॑ना करावर 10% आणि 1कोटीहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 15 अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण  करदायित्वांवरील कर आहे. (Tax on tax) तर ज्यांचे एकूण करपात्र उत्पन्न ₹5लाख चे आत आहे त्याना आयकर अधिनियम 87/ A अनुसार जास्तीत जास्त ₹2500/- ची कर सूट एकूण देय करात मिळू शकते. म्हणजेच एकूण करातून जास्तीत जास्त 2500/-रुपये कमी द्यावे लागतात.
    आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते.
   यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे --
   1)विविध बचत गुंतवणूक योजना व खर्चाना मिळणाऱ्या सवलती: या मध्ये विहित मर्यादेत जमा केलेली रक्कम एकत्रित उत्पन्नातून कमी होत असल्याने एकूण करदायित्व कमी होते.आयकर अधिनियम  80/C ,80/CCC ,80/CCD एकत्रित  मिळून जास्तीत जास्त दीड लाख रुपए सूट मिळू शकते.
   80/C ची सवलत मिळणाऱ्या अनेक योजना आहेत कंसात त्यावरील 1जानेवारी 2018 ला मिळू शकणारे  व्याजदर दिले आहेत  यामध्ये पी एफ वर्गणी (8.65%,वी पी एफ 8.65% ,पी पी एफ (7.6%) मधील जमा केलेली रक्कम ,एन एस सी (7.6%) ,एन एस सी व्याज ,5 वर्ष मुदतीच्या करबचत मुदत ठेवी ( जास्तीत जास्त 7.25%),वरीष्ठ नागरिक बचत योजना (8.3%) ,सुकन्या समृध्धी योजना (8.1%),विमा हप्ते , गृहकर्ज मूद्दल , रजिस्टरेशन खर्च ,दोन मुलांचा शैक्षणिक खर्च ,करबचतीच्या समभाग संलग्न योजना यांमधे जमा /खर्च केलेली रक्कम यांचा समावेश होतो.
   80/CCC मध्ये विमा कंपन्या व म्यूचुअल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.
   80/CCD मधे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समवेत होतो.  यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली तरी एकूण सूट दीड लाख एवढीच मिळते. 2015 पासून 80/ CCD(1B) नुसार एन पी एस मध्ये जमा केलेल्या ₹50000/-रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते अशाप्रकारे एकूण जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते .
    2)आरोग्य सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसन योजनावर मिळणाऱ्या सवलती : यामध्ये आयकर कलम 80/D ,80/DD ,80/DDE ,80/DU यांचा सामावेश  होतो.
   80/D नुसार स्वतःचा , जोडीदाराचा आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर ₹25000/- जमाकर्ता जेष्ठ नागरिक असेल तर ₹30000/- पर्यत सूट मिळते त्याचप्रमाणे जमाकर्त्यावर अवलंबीत पालकांच्यासाठी भरलेल्या हप्त्यावर अतिरिक्त सूट मिळते तेव्हा या कलमानुसार किमान ₹25 ते कमाल 60 हजार रुपयांची सूट मिळू शकते.
   80/DD नुसार अवलंबीत अपंग जोडीदार, मूल , पालक ,भाऊ बहीण यांचे वैद्यकीय उपचार , कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार ₹75 हजार ते ₹1लाख 25 पर्यंत आहे गृहित धरून सूट घेता येते यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही .
     80/DDE या कलमानुसार स्वतः साठी , जोडीदारासाठी ,मूल , अवलंबीत भाऊ बहीण आई वडील यांच्यावर काही विशिष्ठ आजारावर केलेल्या खर्चाबद्द्ल वयानुसार ₹40 ते 80 हजार रुपयांची सूट घेता येते.
   80/DU या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाचे प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातून ₹75हजार ते 1लाख 25 हजारांची सूट मिळू शकते.
   3) विविध कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट : यामध्ये आयकर कलम 80/E ,Section 24 ,80/EE यांचा समावेश होतो.
   80/E नुसार   स्वतःसाठी , जोडीदारासाठी अथवा मुलांचे उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील
व्याज कर्ज घेतल्यापासून 8वर्षापर्यत कोणत्याही मर्यादेशिवाय सूट मिळण्यासाठी पात्र आहे.
Section 24 नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त 2लाख  रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर 30 हजार रुपयांची सूट मिळते.
    80/EE नुसार पहिल्यांदा घरासाठी कर्ज घेणाऱ्या आणि एकमेव घर असणार्या व्यक्तीस 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.
    4)विविध दान आणि मदतनिधीस मिळणारी सूट : यामध्ये कलम 80/G व 80/GGC यांचा समावेश होतो.
   80/G नुसार मान्यताप्राप्त संस्था , न्यास यांना दिलेली एकूण उत्पन्नाच्या 10% मर्यादेत 50 ते 100%सूट मिळते.
   80/GGC नुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत 50% पर्यंत सूट मिळते.
   5)इतर काही कलमानुसार मिळणाऱ्या सवलती : यामध्ये 80/GG  ,80/TTA यांचा समावेश होतो.
   80/GG मध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा 5हजार रुपये एवढी घरभाड्याची वाजवट मिळु शकते.
    80/TTA या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले 10 हजार रुपयावरील  व्याज करमुक्त आहे.
  या ठळक तरतुदींशिवाय शेअर खरेदीविक्रीतून काही अटींसह अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर मुळातून एस टी टी कापला असेल सवलतीचे दराने 15%कर तर दीर्घ मुदतीचे भांडवली नफा करमुक्त आहे. भांडवल बाजारातील कंपन्यांनी दिलेला लाभांश करमुक्त आहे.वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पूरवाणारे करमुक्त कर्जरोख्यावरील व्याज करमुक्त आहे. या तरतुदीशिवाय इतर अनेक तरतुदीमुळे आपली करदेयता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते.वर फक्त सर्वसमावेशक तरतुदींचा विचार केला आहे.यातील प्रत्येक तरतुदीवर स्वतंत्रपणे तपशीलवार लेख लिहिता येऊ शकेल.
     या सर्व तरतुदी त्यातील अटींसह  www.incometaxindia.gov.in या आयकर विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.त्या पहाव्यात अथवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.आपल्या करविषयक शंकांचे निराकरण आपण www.taxguru.in या संकेतस्थळावर प्रतिसाद देवून करु शकता.

©उदय पिंगळे


ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 5 January 2018

गोष्टी सांगेन युक्तीच्या चार

#गोष्टी_सांगेन_युक्तीच्या_चार.....

   शेअरबाजारात केलेली गुंतवणूक ही जाणीवपूर्वक धोका स्वीकारून केली जाते .महागाईवर मात करणारा परतावा यातून मिळावा आणि आपली दीर्घकालीन उद्दीष्टे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत ही या मागे इच्छा असते .अंतिमतः आपला फायदाच व्हावा अशी येथे गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाची अपेक्षा असते .अनेकजण मला मी कोणते शेअर ,  म्यूचुअल फंडाची कोणती योजना घेवू ते विचारतात . या प्रत्येकाची सर्व तपशिलवार माहिती माझ्याकडे बहुदा नसते . त्यामुळे त्याना उपयोगी पडेल अशी माहिती मी त्याना चर्चा केल्याशिवाय देवू शकत नाही .बाजारात आपण कोणता शेअर कधी आणि कोणत्या भावाने घेणार आणि विकणार यावर आपल्याला होणारा नफा /तोटा निश्चित होतो .
  चांगले शेअर घ्यावेत हे सर्वमान्य आहे .यासाठी अभ्यास करावा लागतो आणि त्याला पर्याय नाही . याशिवाय आपल्याकडे किती पैसे आहेत ? ते कधी हवे आहेत ? किती परतावा अपेक्षित आहे ?आपण किती जोखीम घेवू शकतो ? किती झटपट आणि अचूक निर्णय घेवू शकतो ? यासारख्या अनेक गोष्टींवर ते अबलंबून आहे .चांगले शेअर  कोणते ? ते कसे शोधावे ? यासाठी कोणते मार्ग आहेत ज्यामूळे आपले नुकसान होणार नाही यावर विचार करुयात .
   १. शेअर मार्केटच्या अभ्यासासाठी इंग्रजीत अनेक पुस्तके उपलब्ध आहेत .याशिवाय N I S M / B S E / N S E यांचे विविध विषयावरिल प्रमाणपत्रांचे अभ्यासक्रम अल्पखर्चात उपलब्ध आहेत त्यावर पुस्तके उपलब्ध आहेत .त्यांची माहिती सदर संस्थांच्या संकेतस्थळांवर आहे .मराठीत ज्याला शेअरबाजाराची गीता असे म्हणता येईल असे ' शेअर बाजार , जुगार छे ! बुद्धीबळाचा डाव ' हे रवींद्र देसाई यांनी लिहिलेले राजहंस प्रकाशन यांनी प्रसिद्ध केलेले पुस्तक अतिशय उपयुक्त आहे .यामध्ये देसाई सर यांनी चांगली कंपनी कशी शोधायची त्यासाठी excel sheets मध्ये कोणत्या माहितीचे संकलन करुन त्याचे विश्लेषण कसे करावे हे सविस्तर सांगितले आहे . शेअरचे भाव अनेक कारणांनी वाढतात / कमी होतात , परंतू कंपनीच्या चांगल्या कामगिरीवरून टिकून रहातात,  स्थिर होतात आणि अंतिमतः वाढतात .
   २.moneycontrol , mutulfundonline , bseindia , nseindia यांचे संकेतस्थळावर गुंतवणूकदाराना उपयुक्त शेअर आणि म्यूचुअल फंड याविषयी रेडीमेड माहिती उपलब्ध आहे .म्यूचुअल फंडाचे टॉप रेन्किंग आणि टॉप परफॉर्मींग असे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते .त्यांचे टॉप होल्डिंग पाहायला मिळते त्यांनी निवडलेले स्टॉक या 100% चांगल्याच कंपन्या नेहमी असतात .
   ३.सी सी पी ( Coffee can portfolio) या तंत्राने अनेक फंड हाऊस ,वित्तसंस्था त्यांनी शोधलेले चांगले शेअर्स जाहीर करतात .ही माहिती आपणास गुगलवरून सहज उपलब्ध होते .ते तपासुन उपलब्ध माहिती पडताळून पहावी .
  ४.जर आपल्याला चांगल्या कंपन्या शोधता आल्यास त्यांचा RSI ( relative strength index) गुगल वरून शोधावा. 0 ते 100 अशा %मध्ये दर्शविला जातो  जर तो 30 चे आसपास असेल तर त्याचा अर्थ असा होतो की सदर स्टॉक कमी किंमतीस उपलब्ध असून तो खरेदी करण्यास हरकत नाही .तर 70 चे आसपास असेल तर विक्रीस हरकत नाही .याला अपवाद काही कंपन्या आहेत यांचे भान ठेवावे .
  ५.शेअरबाजार या विषयाची अनेक मासिके आणि स्वतंत्र चॅनेल आहेत .यावर लक्ष ठेवून आपले मत बनवावे यांचे मालकीहक्क उद्योग समुहाकडे असल्याने यातून निष्पक्षपाती माहिती मिळेलच असे नाही याची जाणीव ठेवावी .माझ्याकडे गेले 20 वर्षे कॉर्पोरेट इंडिया हे पाक्षिक येते त्यांनी सुचवलेले शेअर वर्षभरात उत्तम रिटर्न देतात असा अनुभव आहे .मांत्र माझ्याकडे पाक्षिक येईपर्यंत त्यांनी सुचवलेल्या किमतीचेवर शेअरचा भाव नेहमीच गेलेला असतो .अश्यावेळी मी तो भाव लिहून ठेवून त्या जवळपास अथवा खाली भाव येण्याची वाट पाहून मगच तो शेअर खरेदी करतो .
   ६.एक वर्षानंतर शेअरविक्रीतून मिळालेला नफा पुर्णपणे करमुक्त आहे .यामुळे आपल्याजवळ असलेले आणि चांगला भाव मिळू शकणारे शेअर अनेकजण तसेच ठेवतात .यावर फक्त 15% कर द्यावा लागतो .तेव्हा गुणवत्तेवर हे शेअर ठेवावे की लगेच विकावे याचा निर्णय घ्यावा .फक्त कर भरावा लागेल की नाही एवढाच विचार करू नये .
   ७.वर्षभरात किमान दोन वेळातरी काहीतरी घबराट होवुन शेअर मार्केट खाली येते .ही वेळ उत्तम शेअर खरेदी करायची अनमोल संधी असते .संधीसाधू होवुन त्याचा लाभ घ्यावा .अल्पकाळात उत्तम रिटर्न मिळू शकतो .
   ८.आपल्याला किती रिटर्न मिळतो आहे हे त्वरित काढता येणे जरुरीचे आहे म्हणजे निर्णय त्वरित घेता येतो .प्ले स्टोरवरून finanicial calculation हे एप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे .यात सिंपल आणि कम्पाउन्ड इंटरेस्ट काढाता येते .कोणते एप्लिकेशन घ्यावे याबद्धल संभ्रम असेल तर fncalculation.com येथे जावे .
   ९. भाव कमी आहे एवढ्याच निकषावर कोणाताही शेअर खरेदी करू नये .फायदा होणे महत्वाचे आहे . नाहीतर  मोठया प्रमाणात रक्कम अडकून राहू शकते किंवा नूकसानही  होवू शकते .
   १०.डे ट्रेडिंग /फॉरवर्ड ट्रेडिंग आपल्याकडे असलेल्या पूर्ण पैशाएवढे करावे .जास्त मिळणारे एक्पॉजर टाळावे .कर्ज घेवून खरेदी करू नये .
    बाजारात आपल्याला शेअरचे भाव दिसत असतात त्याचे मूल्य शोधून काढायचे असते .अनुभव आणि ज्ञान यासाह्याने ते आपल्याला जमू शकते . व्यवहारज्ञान हे येथील भांडवल असून त्याला अभ्यास आणि विश्लेषण यांची जोड मिळावी. तेव्हा समृद्ध व्हा आणि शेअरवरील आपले अनुभव शेअर करा !

©उदय पिंगळे

( या लेखात उल्लेख असलेले पुस्तक , संकेतस्थळे , पाक्षिक , एप्लिकेशन यांच्याशी लेखकांचा कोणाताही व्यावसाईक संबंध नाही .शेअर, म्यूचुअल फंड यातील गुंतवणूक ही धोकादायक प्रकारात मोडत असून यासंबंधात कोणतीहि शिफारस नाही. तज्ञांकडून योग्य ती माहिती घेवूनच आपली गुंतवणूक करावी )
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Tuesday, 2 January 2018

आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणित सोने इंडीया मिंटकडून विकसित

#आंतरराष्ट्रीय_दर्जाचे_प्रमाणित_सोने_इंडिया_मिंटकडून_विकसित....

  जगातील दुसरी चीननंतरची सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ असलेला भारतातील सोनार आजपर्यंत शुद्ध सोन्याच्या तपासणीसाठी  स्विझर्लेंड आणि कॅनडा येथून आयात केलेल्या शुद्ध सोन्यास आधारभूत मानत असत .आता इंडीया मिंटकडून विकसित '9999'(99.99%) शुद्ध सोन्याच्या बारचा संदर्भ म्हणून आधार घेवून त्यावरून खरेदी केलेले  सोने , नाणी , दागिने यातील सोन्याची शुद्धता निश्चित करता येवू शकेल .यातील सोन्याची शुद्धता उच्च दर्जाची असून त्यात दहा लाख भागात शंभर एवढी अत्यल्प अशुद्धता असेल .हे व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे होईल .
  BND -4201 असे या विकसित केलेल्या सोन्याचे वर्णन असून भारतीय निर्देशक द्रव्य असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे .हे प्रमाणित सोने विकसित करण्यात इंडीया गव्हर्मेन्ट मिंट , भाभा अणुशक्ती केंद्र , कौंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च -नॅशनल फिजिकल लेबॉरेटरी आणि नॅशनल सेंटर फॉर कॉंपोझीशनल क्यारेक्टरायझेशन ऑफ मटेरियल यांचा महत्वाचा सहभाग  होता . Make in india या पंतप्रधानांच्या महत्वांकांक्षी कार्यक्रमाचा हा एक भाग आहे .मानक सोने हे सोनारांकडे संदर्भ म्हणून हॉलमार्किंगसाठी त्याचप्रमाणे जमा सोने , दागिने यांची शुद्धता निश्चित करण्यासाठी , सुवर्ण संचय योजनेतील सोन्याचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी उपयुक्त असते .
   वीस ग्रेम्स वजनात उपलब्ध BND -4201 हा बार त्यांच्यासारख्या अन्य आयात बारच्या किंमतीच्या तुलनेत 25% स्वस्त असून या बारचे सहायाने केलेले यांत्रिक प्रमाणीकरण हे पारंपरिक पद्धतीच्या भट्टी प्रामाणिकरणापेक्षा कमी वेळखावू आणि पर्यावरणास पूरक असे आहे .ज्याचा उपयोग सोनार आणि हॉलमार्क सेंटर यापुढे करू शकतील .या विकसित सोन्याचे आंतरराष्ट्रीय मानकीकरण IS (इंटरनॅशनल सिस्टिम ऑफ युनिट) यांनी मान्य केल्याने या बारची निर्यात होवू शकते .अशीच इतर सुवर्ण आणि इतर मौल्यवान धातू यांची मानके भविष्यात निर्माण  करण्याची इंडिया मिंट ली यांची महत्वांकांक्षी योजना आहे .

©उदय पिंगळे

   ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .