Sunday, 29 January 2017

परस्पर निधी (म्यूचुअल फंड)..............👿

    परस्पर निधी (म्यूचुअल फंड)

  परस्पर निधी अर्थात म्यूचुअल फंड हा एक चलनवाढीवर मात करून आकर्षक उतारा मिळवून देऊ शकणारा गुंतवणूक प्रकार असून यामध्ये अनेक प्रकारच्या योजना अाहेत. आपण त्या काय आहेत हे जाणून घेऊ या.त्याचे गुंतवणूक कालावधीवरून दोन ,गुंतवणूक साधनावरून चार ,तर उत्पन्न विभागणीवरून दोन असे प्रमुख प्रकार आहेत. यामध्ये फंडाचे पुरस्कर्ते जनतेकडून अथवा उद्योगाकडून विशिष्ठ ध्येय्य डोळ्यासमोर ठेवून निधी गोळा करतात.तज्ञ गुंतवणूक व्यवस्थापकाचे मार्गदर्शनाखाली फंडाच्या उद्देशानुसार गुंतवणूक करून मिळालेला फायदा गुंतवणूकदरात वाटला जातो अथवा त्याची पुनर्गुतवणुक केली जाते.गुंतवणूक व्यवस्थापनासाठी फी आकारली जाते आणि ती फंडाच्या वर्गणीतून गुंतवणूकदारांकडून घेतली जाते. AMFI (The Association of Mutual Fund in India)या त्यांच्या संघटनेकडून उचित व्यापारी प्रथेचे पालन आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.फंडातील गुंतवणूक ही    समभाग , कर्जरोखे ,अल्प/ दीर्घ मुदतीची कर्जे इ. भांडवलबाजाराशी संबधीत साधनांत केली जात असल्याने यावर SEBI(Securities and Exchange Board of India) या नियामकाचे अंतिम नियंत्रण आहे.
   सर्वसामान्य गुंतवणूकदारास भांडवल बाजारात गुंतवणूक करताना काही मर्यादा येतात. म्यूचुअल फंडाकडे अनेक गुंतवणूकदरांकडून एकत्रित रक्कम  जमा होत  असल्याने आणि एका विशिष्ठ ध्येय्याने आणि मार्गदर्शनाने कामकाज करीत असल्याचा लाभ त्याला होतो. म्यूचुअल फंडाचे भांडवलबाजारातील गुंतवणुकीचे मूल्यास एकूण वितरित केलेल्या यूनिट्सच्या संख्येने भागल्यास त्याचे नगद मूल्य (एन ए व्ही  ) मिळते. जेव्हा एखादी नवीन योजना बाजारात विक्रीसाठी येते तेव्हा त्याचे मूल्य त्याच्या दर्शनी मूल्याएवढे असते आणि त्यांनी केलेल्या गुंतवणूकीतील भावाचे चढउतारानुसार त्यात वट घट होते. प्राथमिक विक्री योजना बंद झाल्यावर एन ए व्ही  प्रमाणे त्याची खरेदी विक्री मान्यताप्राप्त शेअर दलाल अभिकर्ते यांचेमार्फत अथवा  फंडहाउसकडून थेट होऊ शकते. योजनेतून बाहेर पाडण्याच्या  कालावधीनुसार त्यावर अधिभार द्यावा लागतो,तो गुंतवणूक कालावधीनुसार कमी कमी व नंतर शून्य होतो.खरेदी अथवा विक्री यासाठी कामकाजाचे दिवसाची दुपारचे तीन ही महत्वाची वेळ आहे. यापूर्वीची खरेदी विक्री त्याच दिवशीचे एन ए व्ही प्रमाणे होते तर त्यानंतरची खरेदीविक्री कामकाजाचे पुढील दिवसाचे एन ए व्ही प्रमाणे होते.
   गुंतवणूक कालावधी वरून म्यूचुअल प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.
1)निरंतर (ओपन  एंडेड): यामध्ये आपणास कधीही गुंतवणूक करता येते आणि कधीही काढून घेता येते.
2)मुदतबंद (क्लोज़ एंडेड):यामधे प्राथमिक विक्रीचेवेळी यूनिट खरेदी करता येतात आणि ठराविक मुदतीनंतर यूनिटचे विमोचन (Redeem) अथवा सदर यूनिट आपोआपच निरंतर योजनेमधे वर्ग केले जातात.
  म्यूचुअल फंडाचे ते प्रामुख्याने करीत असलेल्या गुंतवणूक साधनांवरून चार प्रकार पडतात
1)ईक्विटी (समभाग)म्यूचुअल फंड : नावाप्रमाणे या फंडाची गुंतवणूक प्रामुख्याने समभागात केली जाते त्यामुळे या गुंतवणूकीतून अधिक आणि आकर्षक परतावा मिळू शकतो.समभाग वर्गवारीनुसार लार्ज /मिड /स्मॉल /इनफ्रास्ट्रक्चर /डायवर्सीफाईड /सेक्टरल /इंडेक्स फंड असे याचे उपप्रकार आहेत. या शिवाय करबचतीसाठी ई एल एस एस ही योजना आहे.
2)डेट (कर्जरोखे)म्यूचुअल फंड : या फंडातील गुंतवणूक ही कर्जरोख्यात असते त्यामुळे यातून मिळणारा परतावा तुलनेने कमी त्याचप्रमाणे धोकाही कमी असतो.रोख्याचे कालावधीवरून याचे लॉग /शॉर्ट टर्म डेट फंड असे उपप्रकार आहेत.
3)हायब्रीड फंड :यामधे इक्विटि व डेट यांचा समतोल साधण्यात येतो.अनेक गुंतवणूकदाराना कर्जरोख्यांची सुरक्षितता व समभागाचा आकर्षक परतावा या दोन्ही गोष्टी हव्या असतात. त्याचप्रमाणे अनेकांना विशेषत: सेवानिवृत्त लोकाना दरमहा ठराविक रक्कमेची गरज असते परंतु जोखिम घेण्याची तयारी नसते.या योजना बॅलन्स फंड अथवा मासिक उत्पन्न फंड योजना या नावाने विकल्या जातात.
4)मनी मार्केट म्यूचुअल फंड : यामधील सर्व गुंतवणूक अल्प/दीर्घ  मुदतीच्या कर्जात केली जाते तुलनेत सर्वात सुरक्षित असा हा फंड प्रकार असून उच्च उत्पन्नधारक आणि भरपुर गंगाजळी असलेल्या कंपन्या यामधे गुंतवणूक करतात.
म्यूचुअल फंडाचे उत्पन्न विभागणी वरून दोन प्रकार पडतात.
1)डीवीडेंड : यामध्ये ठराविक कालावधीनंतर उत्पन्नाचे वाटप लाभांश रूपाने केले जाते तो धारकास दिला जातो अथवा जर त्याने या रकमेचे यूनिट घेण्याचा पर्याय दिला असल्यास तेवढे यूनिट घेतले जातात.
2)ग्रोथ :यामधे उत्पन्नाची वाटणी केली जात नाही सातत्याने फायदेशीर पुनर्गुतवणूक केली जात  असल्याने दीर्घकाळात एन ए व्ही  वाढत असल्याने आकर्षक लाभ होतो.
  आयकरात लाभ देणाऱ्या समभागसलग्न करबचत योजना (ई एल एस एस ) आहेत.यामधे डीवीडेंड व ग्रॉथ हे पर्याय असून हे यूनिट तीन वर्ष विकता येत नाहीत तसेच लाभांश रकमेचे युनिट घेता येत नाहीत.
 त्याचप्रमाणे सर्वसाधारण गुंतवणूकदारास 'थेंबे थेंबे तळे साचे' या न्यायाने गुंतवणूकीस वाढ करण्यासाठी एस आई पी हा पर्याय  उपलब्ध आहे यामध्ये दररोज /आठवड्यास /पंधरवड्यास /मासिक /त्रीमासीक गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.यामुळे गुंतवणूकीत आवर्ती वाढ आणि बाजारातील चढ उतार यामुळे सरासरीचा फायदा मिळू शकतो.
  अनेक फंड योजना व त्यांचे पुरस्कर्ते यामुळे अधिकाधिक आकर्षक आणि गुंतवणूकदाराच्या विविध आपेक्षा पूर्ण करणाऱ्या कल्पक योजना बाजारात आहेत व येत आहेत.आपल्या आपेक्षा , जोखिम घेण्याची तयारी आणि गरजा पूर्ण करणारी योजना निवडावी. तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. www.moneycontrol.com तसेच  www.valueresearchonline.com या संकेतस्थळांवर विविध योजना त्यांचा परतावा त्यांचे कामगिरीनुसार क्रमवारी यांची माहिती उपलब्ध आहे तिचा लाभ घ्यावा.गुंतवणूक योजनेचा सातत्याने आढावा घेऊन त्यात आवश्यक बदल करावेत.आपल्या उत्पन्नातील काही भाग हा किमान दोन एस आई पी मध्ये विभागून टाकावा जेणेकरून एक एस आई पी दीर्घ मुदतीचे ध्येय आणि दूसरी एस आई पी सेवानिवृत्तीनंतर कमी येऊ शकेल.
  म्यूचुअल फंडाप्रमाणेच ई टी एफ हा एक गुंतवणूक प्रकार असून याचे व्यवहार फक्त शेअर मार्केट मध्येच होतात यामध्ये तो ई टी एफ ज्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करतो त्यांतील शेयर्सचे प्रमाणानुसार गुंतवणूक केली जात असल्याने मार्केटमध्ये ज्याप्रमाणे चढ उतार होत असतील , त्याचप्रमाणे मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार त्याचे कीमतीत (रिअल टाइम)फरक पडत असतो. मार्केट खाली असल्यास खरेदी करून आणि वाढल्यावर ई टी एफ विकून फायदा मिळवणे शक्य आहे.

उदय पिंगळे
मोबाईल नंबर 8390944222
हा व इतर अर्थ विषयक लेख या fb पेजवर वाचा आणि प्रतिसाद द्या.
https://www.facebook.com/pg/pingaleuday/community/
अथवा या blog लिंक वर जा.
https://udaypingales.blogspot.in/?m=1

Sunday, 15 January 2017

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन.......😃

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन......😆

   अजून थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल.पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज  घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू या.
  आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या. 2016/17 या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे ऐकून उत्पन्न ₹2लाख 50हजारचे आत असेल तर तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही जर आपले वय 60हून अधिक असेल तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹3लाख व आपण अतीवरीष्ठ नागरीक असाल म्हणजेच आपले वय 80 पेक्षा जास्त असेल तर ही मर्यादा ₹5लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे खर्चावर नाही आपले सर्व मार्गाने होणारे ऐकून उत्पन्न यासाठी विचारात घेणे जरुरीचे आहे.या करमुक्त मर्यादेतील 5 लाखापर्यतचे उत्पन्नावर 10% त्यावरील 10 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्नावर 20%आणि त्यावरील उत्पन्नावर 30% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर 3% दराने  शैक्षणिक,स्वच्छ भारत व कृषीकर द्यावा लागतो.ज्यांचे वार्षिक उत्पन्न  1 कोटीचे वर आहे त्या॑ना करावर 15% अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण         करदायित्वांवरील कर आहे. (Tax on tax) तर ज्यांचे एकूण उत्पन्न ₹5लाख चे आत आहे त्याना आयकर अधिनियम 87/ A अनुसार जास्तीत जास्त ₹5हजार ची कर भरपाई मिळू शकते. म्हणजेच एकूण करातून जास्तीत जास्त 5हजार रुपये कमी द्यावे लागतात.
   आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते.
यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे --
  1)विविध बचत गुंतवणूक योजना व खर्चाना मिळणाऱ्या सवलती: या मध्ये विहित मर्यादेत जमा केलेली रक्कम एकत्रित उत्पन्नातून कमी होत असल्याने एकूण करदायित्व कमी होते.आयकर अधिनियम            80/C ,80/CCC ,80/CCD एकत्रित  मिळून जास्तीत जास्त दीड लाख रुपए सूट मिळू शकते.                     80/C ची सवलत मिळणाऱ्या अनेक योजना आहेत यामध्ये पी एफ वर्गणी,वी पी एफ ,पी पी एफ मधील जमा केलेली रक्कम ,विमा हप्ते ,एन एस सी ,एन एस सी व्याज ,5 वर्ष मुदतीच्या करबचत मुदत ठेवी ,वरीष्ठ नागरिक बचत योजना ,सुकन्या समृध्धी योजना ,गृहकर्ज मूद्दल , रजिस्टरेशन खर्च ,दोन मुलांचा शैक्षणिक खर्च ,करबचतीच्या समभाग संलग्न योजना यांमधे जमा केलेली रक्कम यांचा समावेश होतो.
80/CCC मध्ये विमा कंपन्या व म्यूचुअ ल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.
80/CCD मधे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समवेत होतो.       यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली तरी सूट दीड लाख एवढीच मिळते.2015 पासून 80/ CCD(1B) नुसार एन पी एस मध्ये जमा केलेल्या ₹50000/-रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते अशाप्रकारे एकूण दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते.
   2)आरोग्य सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसन योजनावर मिळणाऱ्या सवलती : यामध्ये आयकर कलम 80/D ,80/DD ,80/DDE ,80/DU यांचा सामावेश  होतो. 
  80/D नुसार स्वतःचा , जोडीदाराचा आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर ₹25000/- जमाकर्ता जेष्ठ नागरिक असेल तर ₹30000/- पर्यत सूट मिळते त्याचप्रमाणे जमाकर्त्यावर अवलंबीत पालकांच्यासाठी भरलेल्या हप्त्यावर अतिरिक्त सूट मिळते तेव्हा या कलमानुसार किमान ₹25 ते कमाल 60 हजार रुपयांची सूट मिळू शकते.
  80/DD नुसार अवलंबीत अपंग जोडीदार, मूल ,पालक ,भाऊ बहीण यांचे वैद्यकीय              उपचार ,कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार ₹75 हजार ते ₹1लाख 25 पर्यंत आहे गृहित धरून सूट घेता येते यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही.
  80/DDE या कलमानुसार स्वतः साठी ,जोडीदारासाठी ,मूल , अवलं बीत भाऊ बहीण आई वडील यांच्यावर काही विशिष्ठ आजारावर केलेल्या खर्चाबद्द्ल वयानुसार ₹40 ते 80 हजार रुपयांची सूट घेता येते.
  80/DU या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाचे प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातून ₹75हजार ते 1लाख 25 हजारांची सूट मिळू शकते.
   3) विविध कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट : यामध्ये आयकर कलम 80/E ,Section 24 ,80/EE यांचा समावेश होतो.
  80/E नुसार   स्वतःसाठी , जोडीदारासाठी अथवा मुलांचे उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील
 व्याज कर्ज घेतल्यापासून 8वर्षापर्यत कोणत्याही मर्यादेशिवाय सूट मिळण्यासाठी पात्र आहे.
  Section 24 नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त 2लाख  रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर 30 हजार रुपयांची सूट मिळते.
  80/EE नुसार पहिल्यांदा घरासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीस 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.
  4)विविध दान आणि मदतनिधीस मिळणारी सूट : यामध्ये कलम 80/G व 80/GGC यांचा समावेश होतो.
 80/G नुसार मान्यताप्राप्त संस्था , न्यास यांना दिलेली एकूण उत्पन्नाच्या 10% मर्यादेत 50 ते 100%सूट मिळते.
  80/GGC नुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत 50% पर्यंत सूट मिळते.
  5)इतर काही कलमानुसार मिळणाऱ्या सवलती : यामध्ये 80/GG ,80/CCG ,80/TTA यांचा समावेश होतो.
  80/GG मध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा 5हजार रुपये एवढी घरभाड्याची वाजवट मिळु शकते.
   80/ CCG यानुसार 12 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले , भांडवल बाजाराशी संबध नसलेल्या लोकाना बाजारात आणण्यास प्रोत्साहन देण्यासाठी RGESS या योजनेतून त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर 50% सूट मिळते ही सूट जास्तीत जास्त 25 हजार रुपयांपर्यंत मर्यादीत आहे.म्हणजेच 50 हजार पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते.
  80/TTA या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले 10 हजार रुपयावरील  व्याज करमुक्त आहे.
   या ठळक तरतुदींशिवाय अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर मुळातून एस टी टी कापला असेल सवलतीचे दराने कर तर दीर्घ मुदतीचे भांडवली नफा करमुक्त आहे.भांडवल बाजारातील कंपन्यांनी दिलेला लाभांश करमुक्त आहे.वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पूरवाणारे करमुक्त कर्जरोख्यावरील व्याज करमुक्त आहे. 
  या तरतुदीशिवाय इतर अनेक तरतुदीमुळे आपली करदेयता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते.वर फक्त सर्वसमावेशक तरतुदींचा विचार केला आहे.यातील प्रत्येक तरतुदीवर स्वतंत्रपणे तपशीलवार लेख लिहिता येऊ शकेल.
  या सर्व तरतुदी त्यातील अटींसह  www.incometaxindia.gov.in या आयकर विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.त्या पहाव्यात अथवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.आपल्या करविषयक शंकांचे निराकरण आपण www.taxguru.in या संकेतस्थळावर प्रतिसाद देवून करु शकता.

उदय पिंगळे 
माझ्या या व इतर अर्थविषयक लिखाणासाठी fb  वरील अर्थसाक्षरतेचे दिशेने हे page पहा त्यासाठी या लिंकवर  जा........

https://www.facebook.com/pg/pingaleuday/community/

Wednesday, 11 January 2017

ऑनलाईन व्यवहार काही अनुभव.......

 ऑनलाइन व्यवहार काही अनुभव........

       नोटाबंदीच्या अनुषंगाने आपण आपले व्यवहार रोख पैसे न देता करण्यासाठी, ज्याकाही उपाययोजना सुचवल्या जात आहेत त्यामधे ऑनलाईन व्यवहार हा एक महत्वाचा पर्याय आहे. 8 नोव्हेंबर नंतर असे व्यवहार करण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. यापूर्वी असे व्यवहार उच्चशिक्षित लोक व तरुण पिढी या गटापुरता मर्यादित होता. वास्तविक अनेक लोकांकडे असे व्यवहार करता येतील अशी यंत्रणा होती परंतू ती आपण वापरावी असे फारच थोड्या लोकांना वाटत होते. त्यांना अशा व्यवहारांची भीती वाटत होती आणि अन्य मार्ग असल्याने ऑनलाइन व्यवहार करण्याची जरूरी नव्हती. त्यामुळे आपणहून असे व्यवहार करावेत असे फारच थोड्या लोकाना वाटत असणार. मी एक त्यापैकी आहे. एक तर असे व्यवहार कसे करावेत हे शिकून घेणे अगदी सोपे आहे. त्यामुळे रोख पैसे बाळगणे ,रांगेत उभे राहणे ,ठराविक वेळेचे बंधन पाळणे यापासून सुटका होते. आपणही असे व्यवहार सहज करु शकतो हा आत्मविश्वास येतो. असे व्यवहार कसे करावेत यापेक्षा यामध्ये काही गैरव्यवहार झाले तर काय करावे हेही आपणास माहिती असले पाहिजे. मी हे व्यवहार अलीकडेच शिकलो माझे वय 55 आहे. रोख किंवा चेकने पैसे देणे एवढेच मला माहिती होते या सहा महिन्यात मी अनेक गोष्टी स्वतः करून पहिल्या त्यामुळे या गोष्टी मी करु शकतो याचा मला आनंद मिळाला आज मी या गोष्टी कशा शिकलो यापेक्षा काही चुकीच्या व्यवहारासंदर्भातील आलेले दोन अनुभव कथन करतो आहे.
   मी नेटबँकिंगद्वारे एक वस्तु खरेदी केली या वस्तूचे पैसे देताना बँकेकडून आलेला ओ टी पी (One Time Password )आणि माझा पिन यांची नोंद केल्यावर हा व्यवहार पूर्ण झाला नाही असा संदेश स्क्रीनवर आला त्यामुळे मी तोच व्यवहार नवा otp घेऊन पुन्हा केला. माझ्या दृष्टीने व्यवहार पूर्ण झाल्याने विषय संपला होता परंतू प्रत्यक्षात या एकाच व्यवहारासाठी माझ्याकडून दोनदा पैसे दिले गेले असे खात्याची तपासणी केले असताना आढळून आले. व्यवहार केलेली कंपनी इंदूर मधील होती आणि वारंवार विचारणा करूनही ते लोक दाद देत नव्हते मी फोन केल की चौकशी करून आपणास पुन्हा फोन करु असे सांगायचे पण प्रत्यक्षात फोन करायचे नाहीत. वास्तविक त्याना दोन वेळा माझ्याकडून पैसे मिळले आहेत याची खात्री करून पैसे ताबडतोब परत करता आले असते आणि मग त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार राहिली नसती. मी माझ्या बँक शाखेत जाऊन ही सर्व गोष्ट कथन केल्यावर त्यांनी माझेकडून एक फॉर्म भरून घेतला तो भरून दिल्यानंतर जी काही करवाई झाली असेल ती आश्चर्यकारक होती. मला त्या कंपनीतून फोन आला त्यांनी माझी तक्रार ऐकून घेतली. त्यानंतर माझे समाधान अन्य वस्तु खरेदी करून होते का ते पाहिले मी त्यास नकार दिला त्यानंतर सतत तीन दिवस रोज मला त्यांच्याकडून फोन येत होते मी पैसे परत हवे असे म्हणत होतो.शेवटी ते पैसे देतो पण आधी तक्रार मागे घ्या असे म्हणाले मीही या गोष्टींसाठी तयार झालो परंतू बँकेत गेल्यावर त्यांनी मला सूचवले की तक्रार मागे घेतली तर जर त्यांनी नंतर पैसे नाही दिले तर तुम्ही काय करणार ?मला ते पटले मग पुन्हा फोन आल्यावर त्याना सांगितले की मी तक्रार मागे घेणार नाही जर तुम्ही आधी माला पैसे दिलेत तरच मी तक्रार मागे घेईन असे सांगितल्यावर त्यांच्याकडून येणारे फोन बंद झाले.यथावकाश कंपनीकडून बँक व बँकेकडून मला पैसे मिळाले.
   दूसरी गोष्ट अगदी अलीकडची 29 डिसेंबरला सकाळी 07:40 ला मी क्रेडिट कार्ड वर 421 USD ची मी खरेदी केली म्हणून आभार मानणारा संदेश आला आणि मी उडालोच. ही एक सायबर गुन्ह्याची केस आहे हे माझ्या ताबडतोब लक्षांत आले.मी बँकेचे ग्राहक सेवा प्रतिनिधिशी संपर्क साधून त्यांचे निदर्शनास आणली दरम्यानच एक 470 USD चा व्यवहार त्यांचेकडे माझेच कार्डवरून होणार होता तो थांबवला आणि कार्ड रद्द केले. आधीचा व्यवहार पूर्ण झालेला असल्याने त्यासंदर्भात हरकत नोंदवली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांचे ग्राहक सेवा विभागात ई मेल द्वारे तसेच रजिस्टर्ड पोस्टाने रीतसर तक्रार नोंदवली. या सर्व गोष्टीत बँकेकडून सहकार्यचा चांगला अनुभव आला. वादग्रस्त व्यवहारामुळे कमी झालेली व्यवहार मर्यादा मला ताबडतोब देण्यात आली.रद्द केलेल्या कार्डचे बदल्यात नवे कार्ड दिले गेले. त्याचप्रमाणे दिलेल्या तक्रारी संदर्भातील निर्णय योग्यची चौकशी करून मला 50 दिवसात कलावण्यात येईल असे फोन करून आणि मेलवर कळवले. थोडक्यात यथावकाश चौकशी होवून हे प्रकरण मार्गी लागेल.
    या अनुभवांवरून online व्यवहार करावेत की नाही यावर सम्भ्रम निर्माण होईल. तरीही असे व्यवहार करावेत असे माझे मत आहे कारण ही काळाची गरज आहे व्यवहारांचे तुलनेत गैरव्यवहारांचे प्रमाण अल्प आहे आणि तक्रार निवारण करण्याची यंत्रणा आहे. आपल्याकडून आपण  गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी --
   1)नेट बँकिंगसाठी बँकेचे app असेल तर ते वापरावे.
   2)कोणालाही आपले कार्ड नंबर, पिन ,ओ टी पी देऊ नये.बँक कधीही ग्राहकास ही माहिती विचारीत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही बक्षीसाचे आमिषास भूलू नये.
   3)वेळोवेळी आपण पासवर्ड बदलावा.
   4)कार्डवरील cvv लक्षांत ठेवावा आणि कोणास समजणार नाही अशा प्रकारे नाहीसा करावा.कार्ड स्वतः स्वाईप करावे आणि पिन स्वतः टाकावा.
   5)ऑनलाईन व्यवहार सायबर कॅफे फ्री वाई फाय उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे करु नयेत.
   6)शक्यतो एकच कम्प्यूटर अथवा मोबाईल वापरावा त्यावर पासवर्ड साठवून ठेऊ नये. मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतील तर योग्य anti virus टाकून घ्यावा  आणि अशा व्यवहारांकरिता जरूर तर विमा उतरवून घ्यावा.
   7)जर असा व्यवहार निदर्शनास आला तर ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही करावी.
   8)या कार्यवाहीने आपले समाधान न झाल्यास बँकिंग लोकपाल अथवा ग्राहक मंचाचे मार्फत तक्रारीचा पाठपुरावा करावा.
   9)या दरम्यान आलेले अनुभव इतरांना सांगून त्याना जरूर ती मदत व मार्गदर्शन करावे.
 
Rd
उदय पिंगळे