Friday, 23 December 2016

बचतीच्या विविध योजना

   .... बचतीच्या विविध योजना....

     दैनंदिन जीवनात बचत आणि गुंतवणूक ही फार महत्वाची आहे.आपल्या अल्प, मध्यम आणि दीर्घ उद्दिष्टांची काहीअंशी पूर्तता ही बचतीतून होते. सर्वसाधारणपणे प्रत्येकजण थोड्या प्रमाणात लागणारी रक्कम रोख स्वरूपात, परंतू घरातच वेगळ्या ठिकाणी ठेवतात. मोठ्या प्रमाणात अशी रक्कम जवळ ठेवणे धोकादायक ठरू शकते. साठलेल्या रकमेवर व्याजही मिळत नाही. यामुळे बहुतेक सर्वचजण आपल्याकडील अतिरिक्त रक्कम बँक , पोस्ट , पतसंस्था ,भीशी ,चीट फंड व इतर शासकीय योजना यामधे जमा करतात अथवा पगार बँकेमार्फत  होत असल्यास गरजेनूसार रक्कम काढून घेवून उरलेली रक्कम शिल्लक ठेवली जाते. या योजना मधून पतसंस्थां, बँका , सरकारी योजना ,बिगर बँकिंग संस्था यांना भांडवल म्हणून अल्पदरात मोठ्या प्रमाणात रक्कम उपलब्ध होते. या सर्व संस्था कोणत्या ना कोणत्या नियामकाचे मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याने, ठेवींवर अल्प व्याज देत असल्याने ,त्याचप्रमाणे अडीअडचणीला रक्कम ताबडतोब देत असल्याने लोक विश्वासाने आपले पैसे तेथे ठेवतात. या किंवा अशा योजना आपणास माहीत असतीलच आपण या लेखातून अशा विविध योजनांची माहिती घेवूया.
   1)बचत खाते : (Saving account )या प्रकारचे खाते बँक ,पोस्ट ,पतसंस्था यामध्ये उघडता येते. खाते उघडण्यासाठी ओळख व रहिवासाचा पुरावा (KYC) द्यावा लागतो. यांच्यातील स्पर्धेमुळे प्रत्येक संस्थेचे नियम थोडेफार वेगवेगळे आहेत. असे असले तरी या खात्यामधे रक्कम कधीही भरता येते आणि कधीही काढता येते. दैनंदिन शिल्लक रकमेवर दर तीन महिन्यांनी व्याज देण्यात येते. व्याजदर प्रतिवर्ष 3.5ते 6% यामध्ये आहे. यावर व्यक्तीला मिळणारे ₹10000/- पर्यंतचे व्याज 80टी टी ए नुसार करमूक्त आहे.
   2)मुदत ठेव : (Fixed deposit )वर उल्लेख केलेल्या संस्थाशिवाय काही नोंदणीकृत कंपन्या, सार्वजनिक न्यास अशा ठेवी स्वीकारतात. याच्या नावाप्रमाणे रक्कम विशिष्ट मुदती करीता ठेवली जाते. व्याज दर 3.5 ते 8%पर्यत असू शकतो. तर मुदत 14दिवस ते 30वर्षे एवढी असू शकते.रक्कम मुदतीपुर्वी काढायची असल्यास काही घट कापली जावू शकते.रक्कम गुंतवण्यापूर्वी शर्ती व अटी तपासून घ्याव्या. मिळणारे व्याज करपात्र असून सध्या व्याजदर 8% च्या आसपास आहे याचे भान ठेवावे. सरकारी बँकामधे हा दर जास्तीत जास्त 7.1% आहे, सहकारी बँका ,पतसंस्थांचे मधे 8% आहे ,पोस्टामधे 7.6%आणि कंपन्यांमधे 9%आहे. वरिष्ठ नागरिकांना 1/4% अधिक व्याज  बँक ,पतसंस्था व कम्पनीमधे दिले जाते. ठेवीवरील व्याज ठराविक मुदतीने अथवा मुदतपुर्तीचे वेळी येते.व्याजदर हे  वेळोवेळी मागणी पुरवठ्याचे तत्वानुसार बदलत असतात याची माहिती पैसे ठेवण्यापूर्वी करावी. काही पतसंस्थांमधील ठेव ही ₹50000/-पर्यत व बँकेतील ठेव 1 लाख रुपयापर्यत सुरक्षित असते.पोस्टामधील ठेवीना सरकारची हमी असते. कंपनीठेवी या पूर्णपणे असुरक्षित समजल्या जातात तेव्हा तेथे ठेव ठेवताना मान्यताप्राप्त पतमापन संस्थेने दिलेल्या दर्जावरून निर्णय घेणे जरुरीचे आहे. उच्च दर्जा मिळवलेल्या (ट्रिपल ए ) कंपनीतील ठेवी सुरक्षित असतात. तेव्हा ठेव ठेवताना व्याजदर ,रोकड सुलभता आणि सुरक्षितता या सर्वांचा विचार करावा. बँक , गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या यांच्या 5 वर्षे मुदतीच्या टेक्स सेविंग एफ डी ला एकूण मर्यादेत 80/सी नुसार ₹150000/-पर्यत सूट मिळते.
   3)आर्वती ठेव योजना :(Recurring deposit )एका ठराविक मुदतीत दरमहा ठरावीक रक्कम जमा करून मुदतपूर्तीचे वेळी एकरकमी मोठी रक्कम व्याजासह घेणे अशा प्रकारची ही योजना आहे. याचे खाते बँक ,पतसंस्था,पोस्ट ,वित्तीय संस्था येथे काढता येत असून त्याचा व्याजदर हा मुदत ठेवीचे व्याजदराएवढाच असतो. यावर मिळणारे व्याज करपात्र आहे.
   4) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे :(National Saving Certificate ) सदर योजना ही 5 वर्ष कालावधीच्या मुदत ठेवीचा एक प्रकार असून याची रक्कम व्याजासह मुदतपूर्तीचे  वेळी मिळते. ही प्रमाणपत्रे ₹100/-,500/-,1000/-,5000/- 10000/- यामधे उपलब्ध असून व्याजदर 7.6%आहे . जमा रक्कम व व्याज यांना एकूण मर्यादेत ₹1.5लाख रुपयापर्यत 80/सी नुसार सूट मिळते.कर्जासाठी तारण म्हणूनही या प्रमाणपात्रांचा उपयोग होतो. मिळणारे व्याज करपात्र आहे.
   4) किसान विकास प्रमाणपत्र : ही एक दाम दुप्पट मुदत ठेव योजना असून या मधे ठेवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम 118महिन्यानंतर मिळते.2.5 वर्षानंतर कधीही रक्कम काढून घेता येते. व्याजदर 7.3%असून व्याज करपात्र आहे.
   5) पब्लिक प्रोव्हीडंड फंड :(PPF)करमुक्त परतावा देणारी ही लोकप्रिय सरकारी योजना असून त्याचे खाते पोस्ट किंवा बँकेत काढता येते. ही योजना 16 आर्थिक वर्षाची असून यामधे दरवर्षी किमान  ₹500/- कमाल 1.5 लाख एवढी रक्कम एकरकमी अथवा वर्षभरात 12हप्त्यांत विभागून टाकता येते. जोडीदार व 2अज्ञान मुलांचे नावे पालकास  खाती उघडता येवून दरवर्षी सर्व खात्यांत एकत्रित रक्कम एकूण मर्यादेत भरता येते. 80/सी  अंतर्गत जमा रकमेवर एकत्रित मर्यादेत ₹1.5 लाख रुपयांची सूट मिळते. 5 तारखेच्या शिल्लक रकमेवर 7.6%वार्षिक व्याज मिळते.मिळणारे व्याज करमुक्त असून त्यावर जप्ती आणता येत नाही. व्याजदर सरकारकडून वेळोवेळी निश्चित केले जातात.तीसरे आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यावर कर्ज व सहावे आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यावर नियमानुसार अंशतः रक्कम गरजेनुसार काढता येवू शकते.16 आर्थिक वर्षे पूर्ण झाली की जर पाहिजे असेल तर 5 वर्षे मुदतवाढ वेळोवेळी वाढवून घेता येते तसेच जमा रकमेतील 60% रक्कम एकदाच अथवा विभागून काढता येते. या खात्यात मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. नियमित उच्च करमुक्त परतावा देणारी तसेच वेळोवेळी आपली आर्थिक गरज भागवणारी अशी ही योजना आहे. मुदत पूर्ती खेरीज हे खाते बंद करता येत नाही.
   6)सुकन्या समृद्धी योजना :(Sukanya smruddhi yojana) पंतप्रधानांच्या बेटी बचाओ बेटी सीखाओ या धोरणानुसार दहावर्षाखालील मुलीचे नावाने पोस्ट अथवा बँकेत सदर खाते उघडता येते. दरवर्षी किमान 1000/-₹ जास्तीत जास्त 1.5 लाख रक्कम एकरकमी अथवा विभागून  सदर खात्यात टाकता येते. पालकांना 2 मुलींच्या (अपवादात्मक परिस्थितीत 3) नावे वेगवेगळी अशी दोन खाती काढता येतात. मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यावर शिक्षणासाठी अंशतः रक्कम काढता येते. मुलीचे लग्नाचे वेळी अथवा 21वर्षे पूर्ण झाले की खाते बंद होवून सर्व रक्कम मुलीला मिळते. जमा केलेल्या रकमेवर 80/सी नुसार सवलत मिळते. 10 तारखेपर्यत शिल्लक रकमेवर सध्या वार्षिक 8.1%व्याज दिले जाते. व्याजदर सरकारकडून वेळोवेळी निश्चित केले जातात.
   7)मासिक प्राप्ति योजना :(M I S)या योजनेत ठेवलेल्या पैशांवर दरमहा व्याज दिले जाते. हे खाते पोस्टात उघडता येते. एका व्यक्तीस स्वतंत्रपणे ₹4.5 लाख व संयुक्तपणे ₹9लाख या मर्यादेत एक अथवा अनेक खाती काढता येतात. व्याजदर सरकारकडून वेळोवेळी निश्चित केला जातो. सध्याचा व्याजदर 7.4% आहे. व्याज करप्राप्त आहे. पैशाची गरज असल्यास एक वर्षांनंतर दंड भरून रक्कम काढता येते.
   8)वरिष्ठ नागरिक योजना :(Senior Citizen Saving scheme )ही योजना 60वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीकरीता असून या योजनेचे खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत काढता येते. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या 55 वर्ष पूर्ण व्यक्तीस त्याला पैसे मिळाल्यापासून एक महिन्यात हे खाते काढता येऊ शकते.15 लाख रुपयांचे मर्यादेत एक अथवा अनेक खाती काढता येतात.व्याजदर वेळोवेळी सरकार निश्चित करते. सध्या हा दर 8.3% असून व्याज दर तिमाहीस मिळते.जमा रकमेवर 1.5लाख रुपयांपर्यंत 80/सी खाली सूट मिळते व्याज करपात्र आहे. व्याज बचत खात्यात जमा करण्याची सूचना देता येते. अचानक पैशाची गरज पडल्यास एक वर्षानंतर काही रक्कम दंड भरून पैसे परत घेता येतात.
9)भीशी :गृहीणी ,अल्पशिक्षित ,छोटे व्यापारी यामध्ये असलेला बचतीचा  लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये दरमहा सभासदाकडून ठराविक रक्कम गोळा करून चिठ्ठी टाकून अथवा लिलावाद्वारे एका सदस्यास एकरकमी पैसे दिले जातात. याचे नियमन सभासद संमतीने ठरवतात. जिथे चिठ्ठी टाकून भीशी दिली जाते तेथे अप्रत्यक्ष व्याजाच्या रुपाने प्रथम भीशी मिळणाऱ्यास नफा होतो तर शेवट मिळणाऱ्यास तोटा होतो. जेथे भीशी लिलाव करून दिली जाते तेथे लिलावातून मिळालेली रक्कम काही दिवसांनी सभासदांत वाटली जाते. हा सर्वच व्यवहार गटातील सभासदांच्या परस्पर विश्वासाने चालतो त्याचा गैरफायदा घेऊन रक्कम अपहार करण्याचे अनेक प्रकार झाले आहेत.
   10)चीट फंड : हा भीशीचा सुधारीत प्रकार असून काही खासगी आणि सरकारी कंपन्या त्याचे व्यवस्थापन करतात.
   11)बचत गट : याचे कार्य भीशी प्रमाणे चालते. यासंबंधीच्या मार्गदर्शन तत्वानुसार गटाचे कार्य चालते.
   12)सरकारी रोखे /कंपनी कर्जरोखे /नाबार्ड /पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या वेळोवेळी त्यांच्या गरजेनुसार रोखे  विक्रीसाठी आणतात. त्यांची मुदत  व्याजदर ,रोकड सुलभता आणि पत यांचा एकत्रित विचार करून आपले पैसे यामध्ये टाकण्याचा विचार करावा.
   सर्वसाधारपणे अल्प/मध्यम मुदतीसाठी बचत खाते ,मुदत ठेव , आवर्ती ठेव ,बचत प्रमाणपत्र ,
भीशी ,चीट फंड तर मध्यम ते दीर्घ मुदतीकरीता किसान विकास प्रमाणपत्र ,पी पी एफ ,विविध कर्जरोखे यात गुंतवणूक करावी. मुलीचे शिक्षण व विवाह यासाठी सुकन्या समृध्धी ही योजना असून ज्याना निवृत्तीवेतनप्रमाणे पैशांची सातत्याने गरज आहे त्यांच्याकरीता   मासिक प्राप्ती व वरीष्ठ नागरिक योजना आहे. यात उल्लेख केलेले व्याजदर 01/01/2018 पासून लागू असलेले आहेत हे दर सातत्याने बदलत असल्याने पैसे ठेवण्यापूर्वी योजनेची सर्व माहिती करून घ्यावी.जाणकारांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. अलीकडे सर्वच ठिकाणी पैसे ठेवताना व काढताना KYC सक्तीचे केले आहे.त्याच प्रमाणे ठराविक रकमेपेक्षा जास्त व्याज झाल्यास मुळातून करकपात करणे सक्तीचे केले आहे. जे लोक करकक्षेत येत नाहीत त्यांना कर कापू नये म्हणून 15/जी किंवा 15/एच फॉर्म भरून देण्याची सवलत दिली आहे.काही योजनांना  प्राप्तिकर सवलत देऊ केली आहे. या सर्वच  गोष्टी विचारात घेऊन आपल्या गरजा ,उपलब्ध पैसे यांची योग्य ती सांगड घालावी आणि उत्तम व्यवहारे धन जोडावे.


उदय पिंगळे
मोबाईल क्रमांक 8390944222
ई मेल udaypingale23@gmail.com/udaypingale@yahoo.com

या व माझ्या अन्य लेखनासाठी व त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी वाचा माझा ब्लॉग....
 htpps://udaypingales.blogpost.com

Sunday, 18 December 2016

......😃 तीन महत्वाची गुंतवणूक साधने 😃..

   तीन महत्वाची गुंतवणूक साधने..........

    या पूर्वीच्या लेखातून आपण बचत आणि गुंतवणूक यामधील फरक समजवून घेतला. गुंतवणूक ही विविध साधनांमधे विभागून करायची असते हेही आपणास माहीत झाले आहे. समभाग ,म्यूचुअल फंडाचे यूनिट्स ,वायदेबाजार ,स्थावर मालमत्ता ,शुध्द स्वरूपातील सोने,चांदी ,धातू अथवा ई टी एफ स्वरूपातील सोने वैयक्तिक जोखिम विमा ,अपघात विमा ,आरोग्य विमा ,गृह कर्ज विमा ,मालमत्ता विमा इ. या प्रकारांमध्ये आपल्या गुंतवणूकीची विभागणी करायची असते हे आपणास माहीत आहेच. यातील विविध विमा योजना या जोखमीपासून संरक्षण देतात आणि त्यामुळे आत्मिक समाधान मिळते आणि काही अंशी संकटसमयी आर्थिक स्वरूपात भरपाई मिळते त्यामुळे संकटात लढण्यास बळ मिळते. समभाग म्यूचुयल फंड यूनिट्स यातून दीर्घकाळात चलनवाढीवर मात करणारा परतावा मिळू शकत असल्याने आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांचा उपयोग होतो.  तर वायदे व्यवहारातून जोखिम कमी होऊन भावातील फरकाचा फायदा घेता येऊ शकतो. यातून मिळणारे उत्पन्न अनिश्चित असल्याने त्याचप्रमाणे मूद्दल गमावण्याचा धोका असल्याने गुंतवणूक कोणत्या साधनांत करावी असा प्रश्न पडू शकतो, म्हणून आपली कमाल गुंतवणूक किमान खालील तीन ठिकाणी असावी असे वाटते.
     1) मुदत विमा : (Turm insurance )अतिशय कमी रक्कम भरून सदर विमा आपणास खूप मोठे संरक्षण पूरवतो. हा विमा जास्तीत जास्त रकमेचा ,दीर्घ मुदतीचा आणि लवकरात लवकर घेतल्यास अतिशय कमी हप्ता भरून मिळतो. म्हणूनच नोकरी उद्योग सुरू करताना ताबडतोब घ्यावा.विमा व्यवसायातील स्पर्धेमुळेआणि  जर तो अभिकर्त्याशिवाय घेतला तो आणखीनच स्वस्त पडतो. याविषयी आणि विविध कंपन्यांची मुदत व हप्ता यांची सविस्तर माहिती प्रत्येक कम्पनी  तसेच www.policybazar.com या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. साधारणपणे वय 25 वर्ष असताना 1कोटी रुपयांचा 45 वर्षे मुदतीचा विमा वार्षिक 6 हजार रुपयाचे आसपास एवढ्या अल्प रकमेत मिळतो. आपल्या वार्षिक उत्पनाच्या 20 पट रकमेचा मुदत विमा घ्यावा. जर आपले वार्षिक 5 लाख असल्यास 1 कोटीचा विमा घ्यावा. त्याचप्रमाणे उत्पन्नात वेळोवेळी होणाऱ्या वाढीप्रमाणे दर 5वर्षानी अधिक रकमेचा विमा धेवून हे प्रमाण कायम राखावे. त्यामूळे कमावत्या व्यक्तीचे दुर्दैवाने निधन झाल्यास त्यावर अवलंबीत व्यक्तींची आर्थिक ओढाताण होत नाही.
     2)आरोग्यविमा : (Medi claim )आजकाल अनेक संस्था त्यांचा कामगारांना आरोग्यसेवा किंवा विमा देतात परंतु नोकरीतील बदलामुळे खंडित होणारी सुविधा आणि सातत्याने ,झपाट्याने आरोग्यसेवेतील खर्चात होणारी वाढ ही आकस्मिक संकटाची नांदी ठरते आणि एका झटक्यात आपल्या आयुष्यभराच्या कमाईचा नाश करते यासाठी प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नच्या दुप्पट रकमेचा आरोग्यविमा घ्यावा. जर वार्षिक उत्पन्न 5 लाख असेल तर 10 लाख रूपयाचा आरोग्यविमा घ्यावा.वर दिलेल्या संकेतस्थळावर याचे विविध कम्पन्याचे हप्ते समजतील. हे हप्ते वयानुसार बदलतात आणि त्यात सातत्याने वाढ होत असते. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी नॅशनल इन्शुरेन्स कम्पनीचे सहाय्याने कुटुंब गट आरोग्यविमा देऊ केला आहे. त्यांचा 5 लाख रुपयाच्या आरोग्यविमा हप्ता ₹7240/- एवढा आहे.
   मुदत विमा(turm insurance )व आरोग्य विमा (mediclaim ) असणे ही काळाची गरज असून यांवर होणारा  खर्च फुकट जाणे म्हणजे सर्व काही ठीक असणे असा होतो. तेव्हा यात असे  नुकसान होणे हाच आपला मोठा फायदा असे समजले पाहिजे.
    3)म्यूचुअल फंडाचे एस आई  पी :आपली दीर्घ मुदतीची धेय्ये ही 10 किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीसाठी  केलेल्या गुंतवणूकीतून पूर्ण होऊ शकतात आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 30% भाग हा विभागून किमान 2 SIPमधे टाकावा.यातील एक एस आई  पी  हे केवळ सेवानिवृत्ती करीता रक्कम जमा करेल तर दूसरे आपले अन्य लक्ष पूर्ण करायचा प्रयत्न करेल. हे दूसरे लक्ष प्रत्येक व्यक्तींसापेक्ष मुलांचे शिक्षण ,लग्न ,घरखरेदी ,पर्यटन इ. कोणतेही असू शकते. म्यूचुअल  फंडात दीर्घकाळ केलेल्या गुंतवणूकीतून 12 ते 15% नफा होऊ शकतो. तेव्हा आपल्या गुंतवणूकीचा  आढावा धेवून त्याप्रमाणे माहिती मिळवून आपल्या गुंतवणूकीचे साधनांची सुयोग्य विभागणी करावी. योग्य चर्चेचे स्वागत आणि शुभेच्छा...

उदय पिंगळे
मोबाईल क्रमांक : 8390944222
ई मेल : udaypingale@yahoo.com
या व इतर लेखांसाठी माझा blog वाचा
https://udaypingales.blogpost.com

Friday, 25 November 2016

गुंतवणूक सल्लागार, सेबीची नविन नियमावली आणि गुंतवणूकदार.....

    गुंतवणूक सल्लागार, सेबीची नवीन नियमावली आणि गुंतवणूकदार......😉


   गुंतवणूकदार म्हणजे तुमच्या आमच्यासारखी कोणीही व्यक्ति अथवा संस्था ज्यांना आपली अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची ध्येय्ये गाठण्यासाठी उपलब्ध असलेल्या पैशांतून चांगला परतावा  मिळवायचा आहे. परंतू असा पैसा विनासायास मिळत नाही तर त्याकरिता कष्ट घ्यावे लागतात, अभ्यास करावा लागतो, नियोजन करावे लागते. गुंतवणूकदार त्याचे समोरील उपलब्ध पर्याय, त्यामधील जोखिम, निर्णयक्षमता आणि उपलब्ध पैसे यांची उत्तम सांगड घालण्यासाठी 'गुंतवणूक सल्लागाराची' मदत घेऊ शकतो. येथे 'गुंतवणूक सल्लागार' हा शब्द समभाग, राेखे,म्यूचुयल फंड योजना, वायदे व्यवहार, वस्तू बाजारपेठ, समभाग सलग्न बचत योजना (ELSS), विमा सलग्न, निवृत्ती सलग्न योजना (ULIP/ELPS) याच्या संदर्भात मर्यादित अर्थाने वापरला आहे. यापैकी काहींचे नियंत्रण वेगवेगळ्या नियामकाकडे असले तरी त्या भांडवलबाजाराशी संबधीत असल्याने त्यावर अंतिम नियंत्रण सेबीचे (Securities and Exchange Board India) आहे.
   कोण आहेत हे गुंतवणूक सल्लागार? कोणीही आपले मित्र, नातेवाईक, गुंतवणूकीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेल्या व्यक्ती, विविध गुंतवणूक संस्थांचे अभीकर्ते, वितरक, सल्लागार, बँक कर्मचारी इ. हे लोक आपले वैयक्तिक व व्यक्तिगत सबंध, ते काम करीत असलेल्या संस्थांची समाज मनातील प्रतिमा यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मध्यम व उच्च मध्यम वर्गाकडून गुंतवणूक खेचत आहेत. त्यांचे गुंतवणूकदाराशी असलेले सबंध हे मागील पिढीतील फॅमिली डॉक्टरसारखे असावेत. त्यानी गुंतवणूकदाराला त्याचे जरूरीप्रमाणे योग्य तो सल्ला द्यावा व आपला व्यवसाय प्रमाणितपणे करवा अशी अपेक्षा होती परंतू त्यांच्याविषयी आलेल्या अनेक तक्रारीवरून हे लोक गुंतवणूकदारांकडे दुर्लक्ष करून त्याना मिळणारे कमीशन, भेटी, बढती आणि विपणन लक्षे पूर्ण करण्याचा नादात अवास्तव आश्वसने देऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचे आढळून आल्याने त्यांचावर नियंत्रण आणण्यासाठी 21 जानेवरी 2016 रोजी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यामधे गुंतवणूक सल्लागाराचे त्याचे ग्राहकाप्रती असलेले दायित्व अधोरेखित करण्यात आले होते. बँकिंग व्यवसाय करणाऱ्यानी गुंतवणूक सल्लागाराचा व्यवसाय बँकेचे मार्फत न करता येत्या तीन वर्षात वेगळी उपकंपनी स्थापन करून त्यामार्फत करावा. गुंतवणूक सल्लागाराने जर तो एखाद्या योजनेचा अभिकर्ता, वितरक किंवा पुरस्कार्ता असेल तर त्याची माहिती त्याला मिळणारे कमिशन याची माहिती गुंतवणूकदारास द्यावी इ. तरतुदी सुचवल्या होत्या ज्या व्यवसाय पारदर्शकतेच्या दृष्टीने योग्यच होत्या. परंतू दोन नियंत्रकातील आभावामुळे 16 एप्रिल 2016  आरबीआईने बँकाना परिपत्रक पाठवून गुंतवणूक सल्लागाराचा व्यवसाय बँकिंग व्यवसापासून वेगळा करावा  असे सांगितले. दरम्यात  AMFI या म्यूचुअल फंडाच्या शिखर संस्थेने जे  गुंतवणूकदार अभिकर्त्याशिवाय गुंतवणूक करीत आहेत त्यांची माहिती गुंतवणूकदाराचे संमतीने गुंतवणूक सल्लागाराना देण्याची मागणी केली. PARDA या निवृत्तीवेतन नियामकाने निवृत्तीसबंधी सल्ला देण्यास योग्य व्यक्तिचे निकष जाहीर केले. एकूणच जगभरात गुंतवणूक सल्लागार स्वतंत्रपणे व्यवसाय करीत असून ते त्यांचा मोबदला गुंतवणूकदाराकडून वसूल करीत असल्याने त्यास अनुसरून SEBI ने नवीन नियमावली 7 ऑक्टोबर 2016 रोजी जाहीर केली आहे. त्यांतील महत्वपूर्ण मुद्दे असे :--
1)गुंतवणूक सल्लागाराचा व्यवसाय करणाऱ्या अभिकर्ते, वितरकांना यापुढे गुंतवणूक सल्लागार म्हणून व्यवसाय करता येणार नाही. जर त्याना हा व्यवसाय करायचा असेल तर नव्याने नोंदणी करून आधीचा व्यवसाय बंद करावा लागेल व आपले पूर्वीचे व्यवसायिक सबंध जाहीर करावे लागतील.
2)स्टॉक ब्रोकर, पोर्टफोलीओ मॅनेजर,सी ए, सी एस, फायनानशियल प्लॅनर यांचा गुंतवणूक सल्ला हा जरी मूळ व्यवसाय असेल तरी गुंतवणूक सल्लागार म्हणून नव्याने नोंदणी करावी लागेल. मर्चंट बेंकर, कॉरपोरेट पोर्टफोलीओ अड्वाइज़र्स आणि ज्या व्यक्ती IRDA व PARDA यांच्यासाठी विविध योजना बनवित आहेत त्याना नोंदणीतून वगळण्यात आले आहे.
3)व्यापारी बँकाना उपकंपनीमार्फत तर नॉन बँकिंग कंपनीला वेगळा विभाग स्थापन करूनच गुंतवणूक सल्लागाराचा व्यवसाय करता येईल,त्यांच्या अभीकर्ते व वितरक यांना हा व्यवसाय करता येणार नाही.
4)गुंतवणूक सल्ला म्हणजे समभाग सलग्न योजना, समभाग खरेदी विक्री यासंबंधी लेखी तोंडी अथवा माध्यमातून सल्ला देणे अशी करण्यात आली असून वृतपत्रे मासिके सोशल मीडिया यातून सल्ला देताना रिसर्च एनेलेसीस रेग्युलेशनचे पालन करावे लागेल.
5)फक्त नोंदणीकृत सल्लागारानाच  Tips, SMS, E mail,Blogs, Internet आणि इतर सोशल मीडिया या माध्यमातून सल्ला देता येईल.
6)भांडवल बाजाराशी संबधीत योजनांची माहिती देण्यासाठी मेळावे घेणे बक्षिसे देणे यावर बंदी आहे. अनुचित व्यापारी प्रथेखाली असे करणे गुन्हा होईल.
7)रिसर्च एनालिस्ट यांनी काय करावे व काय करू नये याविषयी महत्वपूर्ण तरतुदी आहेत.
8)गुंतवणूक सल्लागाराने गुंतवणूकदाराशी करार करून त्यासाठी सुयोग्य फीची आकारणी करावी. दिलेल्या सल्ल्याची आणि गुंतवणूकदाराची नोंद ठेवावी. जोखमीच्या बाबी गुंतवणूकदारास लेखी द्याव्यात. कोणत्याही निश्चित परताव्याचे आश्वासन देऊ नये.
9)गुंतवणूक सल्लागार आणि गुंतवणूकदार यांतील वादाचे मुद्दे लवाद कायद्यानुसार सोडवण्यात यावेत.
10)गुंतवणूक सल्लागाराने किंवा पुरस्करत्याने जाहिरात करताना खोटी माहिती अवास्तव अश्वासने देऊ नये.
11)गुंतवणूकदारास फ्री ट्रेडिंग टिप्स देता येणार नाहीत. गुंतवणूकीसंबंधी वेगवेगळी सॉफ्टवेर त्यांतील धोक्याची जाणीव करून दिल्याशिवाय सुचविता येणार नाहीत.
12)गुंतवणूक सल्लागाराची किमान शैक्षणिक पात्रता निश्चित केली असून त्याने दिलेल्या सल्यांची 5 वर्षे नोंद ठेऊन दर तीन महिन्यांनी त्याचे लेखापरीक्षण करण्यात येईल.
  अशा प्रकारे ग्राहकांच्या हिताचे दृष्टीने अनेक चांगल्या तरतुदी या नियमावलीत आहेत. मात्र या नियमावलीचे कायद्यात रुपांतर झाल्यावर त्याचे नियमन करण्याएवढी सक्षम यंत्रणा आज तरी SEBI कडे नाही.त्याचप्रमाणे काही तरतुदी इतक्या कडक आहेत  की या विषयावर चर्चा करणे हासुद्धा गुन्हा होईल की काय असे वाटते. कोणत्या गुन्ह्यांस कोणती शिक्षा असे ठोस न सुचवल्याने न्यायालयीन वाद वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्व प्रकारचा माध्यमांतून गुंतवणूकदाराना जागरूक करणे हाच त्यावरील उपाय असून हे मोठे आव्हान SEBI कडे आहे. भांडवल बाजारातील गुंतवणूक अनिश्चित व दीर्घकालीन असते सध्या या नवीन मसूद्याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठीचे आक्षेप, तक्रारी, हरकती मागवल्या असून जिज्ञासूंनी त्या पहाव्यात व त्यावर आपले मतप्रदर्शन करावे म्हणजे त्यातील योग्य मतांचा कायदा करताना विचार केला जाईल.

उदय पिंगळे
मोबाईल क्रमांक 8390944222
ई मेल udaypingale@yahoo.com/udaypingale23@gmail.com

UPI(Unified Payment Intrerface) एक पाऊल नव्या अर्थक्रांतीकडे......

     UPI एक पाऊल नव्या अर्थक्रांतीकडे....😄

    2009 साली whatsapp आले आणि संपर्कक्षेत्रात मोठी क्रांती झाली. या क्रांतिचे आपण साक्षीदार आहोत. अशाच प्रकारची महत्वाची क्रांती अर्थक्षेत्रांत होऊ घातली आहे. भारतीय रिझर्व बँकेने  परावर्तित केलेली NPCL (National Payment Corporation of India) ही संस्था आणि भारतात कार्यरत असणाऱ्या व्यापारी बँकांनी परावर्तित कलेली IBA (Indian Banks Association) यांनी पैशांची देवाणघेवाण सहज, सुलभ आणि जलद होण्यासाठी UPI ही प्रणाली विकसित केली आहे. तिचे कार्य Mastercard, Visa, Rupay या प्रणाली प्रमाणे चालते. 11एप्रिल 2016 रोजी RBI चे तत्कालीन गवर्नर डॉ रघुराम राजन यांचे हस्ते ती लोकार्पण करण्यात आली.
   या प्रणालीचे प्रमुख वैशिष्ठ म्हणजे आपला स्मार्टफोनच आपले  debit card होईल. त्याचे सहाय्यानेआपण पैशांचे व्यवहार कुठेही, कधीही आणि झटपट करू शकतो. यापूर्वी आपण हे व्यवहार Netbanking, Mobile app, NEFT, RTGS, IMPS, Mobile wallet याद्वारे करीत होतोच. त्याद्वारे व्यवहार करताना खाते क्रमांक, खात्याचा प्रकार, बँकेचे नाव,IFSC कोड यांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे नवीन लाभार्थीची नोंदणी करण्यासाठी काही तासांचा अवधी लागू शकतो. UPI प्रणाली ही IMPS ची सुधारीत आवृती असून आपणास व्यवहार पूर्ण करण्यास VPA (Verchual payment address) ची गरज असते. दोन VPA मधील व्यवहार इतर कोणत्याही माहितीची देवाणघेवाण  न होता फक्त मोबाईल पिनने पूर्ण होतात.
   सध्या देशातील सरकारी व सहकारी बँकापैकी 30प्रमुख
 बँकांनी त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा देण्याचे मान्य केले असून अनेकांनी VPA बनवण्यास Play store वर App उपलब्ध करुन दिले आहेत. हे app download करुन activate करून आपला VPA बनवणे सहज सोपे आहे. यासाठी आपली वैयक्तिक माहिती देऊन OTP चे साह्याने VPA बनवता येतो. तो सर्वसाधारपणे email id प्रमाणे 'स्वतःचे नाव @बँकेचे नाव' या स्वरूपाचा असतो. याप्रमाणे एकदा हा VPA तयार झाला की आपण आपले आर्थिक व्यवहार झटपट करण्यास मोकळे. या प्रणालीने आपण जेव्हा एखादी वस्तू अगर सेवा खरेदी करू तेंव्हा त्याला आपला VPA देऊ सदर पुरवठादार त्याचे बिल VPA वर पाठवेल ते आपण मान्य केल्यास एका click ने आपल्या खात्यातील पैसे विक्रेत्याचा खात्यात जाऊन व्यवहार पूर्ण होईल. यासाठी मोबाईल पीन पुरेसा असून वेगळा OTP घ्यावा लागणार नाही. याचपद्धतीने आपणास मित्र व नातेवाईक यांचेमध्ये पैशांचे व्यवहार करता येतील. यापूर्वींचे प्रणालीमध्ये व्यवहार कोण करीत आहे? व कशासाठी करीत आहे? यासाठी एक मध्यस्थ होता या प्रणालीत एक लाख रुपयांचे व्यवहार कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट होत असल्याने रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. रोज 2500 कोटी व्यवहार विनाव्यत्यय होऊ शकतील इतक्या मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा सक्षम आहे. या  पध्दतीने व्यवहार करण्यास  RBI ने फक्त व्यापारी बँकांनाच परवानगी दिली आहे. याच पध्दतीचे व्यवहार Globle vertual payment address बनवून जगभरात करता येऊ शकतील. सध्या ज्या वेगाने या पध्दतीने व्यवहार करणारांची संख्या वाढते आहे त्यावरून Credt card, Debit card, Netbanking, mobil app/wallet यांना मागे सारून रोख रकमेऐवजी UPI या एकच माध्यमातून सर्व व्यवहार होतील. याचाच वेध घेऊन आपणही आपला VPA बनवून आपले व्यवहार करण्याची सुरुवात करुया.
 
या प्रणालीच्या काही मर्यादा आहेत.
 1)ही प्रणाली वापरण्यास स्मार्टफोन (अँड्रॉइड) असणे गरजेचे आहे.
 2)सध्या सर्व बँकानी ही प्रणाली आपल्या ग्राहकांना देऊ केलेली नाही. यात TJSB सारखी छोटी सहकारी बँक आहे तर Bank of  India सारखी मोठी सरकारी बँक नाही.
 3)सध्या किमान ₹50/- तर कमाल ₹1लाख पर्यंतच व्यवहार या प्रणालीने करता येतात.
 4)अधिकाधिक ग्राहकांनी ही पध्दत वापरावी यासाठी बँका स्वतःहून प्रयत्न करतील असे वाटत नाही.
  असे असले तरी अधिकाधिक लोकांनी जर या प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात केली तर भविष्यात सर्व बँका आपल्या सर्व ग्राहकांना सर्व प्रकारच्या  मोबाईलवर (IOS, Window) ही सुविधा देऊ शकतील. ग्राहक संघांचे संघप्रमुख आणि संघ सभासद UPI प्रणाली देऊ करणाऱ्या बँकेचे ग्राहक असतील तर त्यानी आपल्या संघाचे व्यवहार स्वतचा VPA बनवून करण्यास सुरुवात करावी सध्या खालील बँकांचे VPA बनवण्याचे app playstore वर उपलब्ध आहे.
 1)Allahabad Bank
 2)Andhra Bank
 3)Axis Bank
 4)Bank of Baroda
 5)Bank of Maharashtra
 6)Bhartiya Mahila Bank
 7)Canara Bank
 8)Catholic Syrian Bank
 9)DCB Bank
10)Federal Bank
11)HDFC Bank
12)HSBC Bank
13)ICICI Bank
14)IDBI Bank
15)IDFC Bank
16)Indus Ind Bank
17)Karnataka Bank
18)Kotak Mahindra Bank
19)Oriental Bank of Commerce
20)Panjab National Bank
21)Ratnakar Bank
22)State Bank of India
23)South Indian Bank
24)Standard Chartered Bank
25)TJSB Sahakari Bank
26)UCO Bank
27)United Bank of India
28)Union Bank of India
29)Vijaya Bank
30)Yes Bank


उदय पिंगळे
मोबाईल 8390944222
ई मेल udaypingale@yahoo.com/udaypingale23@gmail.comR

Sunday, 20 November 2016

१.बचत आणि गुंतवणूक

            बचत आणि गुंतवणूक 

      भारतातील अर्थसाक्षरतेबद्धल एका संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच वाचण्यात आले. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :--

 1)बहुतेक लोक FD आणि  Insurance (Money back) यांना गुंतवणूक समजतात. 

 2)सोन्याचे दागिने व  रहाते घर यांचे सध्याचे बाजारमूल्य कितीही जास्त असले तरी ते  आभासी आहे. त्याचा फारसा काही उपयोग नसून त्याने फक्त मानसीक समाधानच लाभू शकते.

 3)महागाईवर मात करणारा परतावा मिळाला पाहिजे हे अनेकांना माहीत नाही.

 4)म्यूचुयल फंड हा  विमा प्रकार असून SIP ही पॉलिसी आहे असे अनेकांना वाटते.

 5)आपल्याकडे किती रकमेची, कोणत्या कंपनीची आणि किती वर्षाची विमा पॉलिसी आहे; तसेच कोणत्या म्यूचुयल फंडामधे आपली किती रक्कम आहे हे अनेकांना अंदाजेही सांगता येत नाही आपल्या विमा रकमेवर मिळत असणारा परतावा 6% पेक्षाही कमी आहे हे अनेकांना माहीत नाही.

 6)फारच थोड्या लोकांनी योग्य रकमेचा, योग्य मुदतीचा आणि योग्य वर्षांचा मुदत विमा  (Turm insurance) व आरोग्यविमा (Mediclaim) घेतला आहे. यामधे भरत असलेल्या हप्त्यांचा उपयोग न  होण्यातच आपला खराखुरा फायदा आहे, हे त्यांचा लक्षांतच येत नाही.

 7)अनेक लोक भविष्यकाळातील तरतुदीबद्दल जागरूक नाहीत तर अनेकजण मुलांवर अवलंबून  आहेत.

 8)गुंतवणूक साधनांची वेगवेगळ्या प्रकारांत विभागणी करायची असते हे कित्येकाना माहीत  नाही.

 9)येथील बहुतेक लोकांना व्याज करपात्र तर लाभांश आणि मुळातून STT कापला असेल तर दीर्घमुदतीचा भांडवली नफा करमुक्त याची माहिती नाही.

10)सोन्याचे दागिने घेण्याऐवजी शुध्द स्वरूपातील सोने, गोल्ड ETF अथवा गोल्ड Bonds मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे याची लोकांना जाणीव नाही.

11)Taxfree bonds हे 80/सी ची सवलत देतात असे बरेचजण मानतात तर 54/ई सी bonds, infrabonds, pms, corporate fds यांविषयी फारच थोड्या लोकांना माहीती आहे.

12)पूर्णपणे आर्थिक नियोजन करणारे लोक नगण्य आहेत.

   या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकच निष्कर्ष काढता येईल की आपल्याकडे गुंतवणूक संस्कृती रुजलेली नाही.

   असे होण्याचे महत्वाचे कारण असे की आपण आपले जे पैसे बचत खाते,मुदत ठेवी, पोस्टाच्या योजना, पीपीएफ आणि मनी बॅक पॉलिसीमध्ये टाकले आहेत; सोन्याचे दागिने केले आहेत त्यालाच गुंतवणूक असे समजत आहोत परंतू ही गुंतवणूक नसून बचत आहे. बचत आणि गुंतवणूक यांचा एकमेकांशी सबंध असला तरी या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ढोबळमनाने असे म्हणता येईल की उत्पन्नातील असा भाग जो गरजांसाठी खर्च न  करता साठवून ठेवला आहे किंवा वेगवेगळे खर्च केल्यावर जी रक्कम शिल्लक रहाते ती म्हणजे बचत तर गुंतवणूक म्हणजे अशी ठरवून केलेली प्रक्रिया ज्यामधे आपण आधिक फायदा मिळवण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिठ्ये पाहूया :--

 1)बचतीमध्ये पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवतो त्यामुळे नजीकच्या काळात वापरू शकतो. उदा. बचत खाते, मुदत ठेव, परावर्तीत ठेव, आवर्ती ठेव तर गुंतवणूकीत आपण पैसे अशा साधनांमध्ये ठेवतो की ज्यापासून भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकेल उदा. समभाग, यूनिट, फ्यूचर, सोनेचांदी, वस्तू बाजारपेठ, स्थावर मालमत्ता. 

 2)बचत ही अल्पकालीन क्रिया असून तिची सुरुवात कधीही करता येते तर गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे त्यामुळे तिची सुरुवात जितक्या लवकरात लवकर करू तेवढे चांगले.

 3) बचतीचे पैसे नजीकच्या काळात वापरू शकतो तर गुंतवणुकीचा भविष्यकाळात उपयोग होतो.

 4)बचत ही सवय तर गुंतवणूक ही प्रक्रिया आहे.

 5)बचत ही सुरक्षित असून त्यावर मिळणारा लाभ अल्प आहे तर गुंतवणूकित जोखिम जास्त असून जेवढी जोखिम जास्त तेवढा मोठा फायदा किंवा तोटा होण्याची शक्यता असून क्वचित प्रसंगी मुद्दल गमावण्याचा धोकाही आहे.

 6) बचतीत सुरक्षितता असल्याने त्याचा आढावा घ्यावा लागत नाही तर गुंतवणूकीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यांतील बदलांबद्धलचा निर्णय त्वरित घ्यावा लागतो.

 7)बचतीची साधने आपणास निष्क्रिय बनवतात तर गुंतवणूकीची साधने स्वातंत्र्याचा अनुभव देतात.

 8)बचतीचे पैसे अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडतात तर गुंतवणूकीचे साधनातून दीर्घ काळासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात.

 9)बचत ही भीतीपोटी केली जाते तर गुंतवणूक आत्मविश्वासपूर्वक करावी लागते.

10)बचतीचे पैसे त्वरित उपलब्ध होतात तर गुंतवणूकीतील पैसे मिळवण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो. 

11)बचतीसाठी फारशा ज्ञानाची गरज नसते तर गुंतवणूकीसाठी सखोल ज्ञान व  नियोजनाची गरज गरज असते. तज्ञांची मदत घ्यावी लागते अथवा स्वतः तज्ञ व्हावे लागते.

12)बचतीमुळे पैशाचे रक्षण होते तर गुंतवणुकीमुळे योग्य उत्पन्न व चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्याने चलनवाढीवर मात करता येते.

   वरील सर्व विवेचनावरून अशी समजूत होऊ शकते गुंतवणूक चांगली व बचत वाईट किंवा बचत चांगली आणि गुंतवणूक वाईट परंतु यामधील कोणतीही एक गोष्ट पूर्ण बरोबर व दुसरी गोष्ट पूर्ण चूक असे नसून आपली अल्प, मध्यम व  दीर्घ मुदतीची ध्येये पूर्ण करण्यासाठी बचत आणि गुंतवणूक या दोघांची आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका आहे. जर बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल आपण साधु शकलो तर आणि तरच भविष्यातील वाढत्या गरजा व चलनवाढ यांच्याशी सामना करू शकू.

   दुर्दैवाने आपल्या शालेय शिक्षणात बचत आणि गुंतवणूक यांतील फारच थोड्या गोष्टींचा स्पर्श होतो, तरीही इतर अनेक गोष्टी आपण जीवनात करून पाहतो.चूकतो, धडपडतो, पडतो पुन्हा उठून उभे राहतो. आपले ज्ञान आणि अनुभव यांची सांगड घालून पैशांच्या सर्व बाजूंचा विचार करून, व्यवहारिक व व्यवसायिक दृष्टीकोन बाळगू शकलो तर आपल्या स्वकष्टार्जित व वडिलोपार्जित सम्पत्तीचा सांभाळ करू शकू. तेव्हा पैशाच्या सर्व पैलुंचा विचार करूया, माहिती घेऊया, जागरूक राहू, नियोजन करू आणि स्वतःबरोबरच इतरांनाही अर्थसाक्षर करूया.

उदय पिंगळे 

मोबाईल क्रमांक 8390944222

Email : udaypingale@yahoo.com/udaypingale23@gmail.com