Friday, 29 December 2023

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा

#नव्या_कॅलेंडर_वर्षातील_महत्वाच्या_तारखा(सन 2024) 1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या वर्षात कदाचित काही आर्थिक चुका अनवधानाने आपण केल्या असतील. आर्थिक चूक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच. मागे केलेल्या चुका हा इतिहास झाला. त्यांची पुनरावृत्ती आपण या वर्षात करणार नाही असा संकल्प करूया. या वर्षातील काही लक्ष ठेवण्यासारख्या तारखा किंवा कालावधी खालीलप्रमाणे- आपल्याला सहज हाताशी येईल अशा ठिकाणी ही माहिती जपून ठेवा. यात एखादी अंतिम तारीख दिली असली तरी त्यासंबंधित गोष्टीची पूर्तता मुदतीपूर्वीच करावी म्हणजे गोंधळ उडणार नाही, दंड पडणार नाही, आपले आर्थिक नुकसान होणार नाही. 31 जानेवारी 2024 /15 फेब्रुवारी 2024/29 फेब्रुवारी 2024 ★आर्थिक वर्ष 2023-2024 येत्या काही दिवसात संपेल. हीच वेळ आहे आपल्या अंदाजित उत्पन्नचा आढावा घेऊन पुरेशी गुंतवणूक करण्याची. आपण कर मोजण्याची जुनी पद्धत स्वीकारली असेल तर काही गुंतवणूक /खर्च याची वजावट घेतल्याने आपला आयकर कमी होऊ शकतो पगार पत्रकाव्यतिरिक्त आपण काही गुंतवणूक/ खर्च केले असल्यास त्याची विहित नमुन्यात सूचना द्यावी लागते. आपल्या अस्थापनेकडून अशा सूचना देण्यासाठी वरील तीन पैकी कोणतीही अथवा एक वेगळीच अंतिम तारीख असू शकते. ती माहीती करून घेऊन आपली पगाराव्यतिरिक्त वैयक्तिक गुंतवणूक /खर्च केले असल्यास पुराव्यासह सदर तारखेच्या आत केल्यास सादर केल्यास त्याचा विचार करून अंतिम आयकर आकारणी होईल. हा फॉर्म आणि त्याचे पुरावे देण्यापूर्वी जर आपला कर अतिरिक्त कापला असल्यास समायोजित केला जाईल तरीही अतिरिक्त कर कापला असल्यास तो आपणास मालकाकडून परत मिळणार नाही तर विहित मुदतीत विवरणपत्र सादर करून आयकर खात्याकडून परत मिळवावा लागेल. 1 फेब्रुवारी 2024 ★खरंतर सन 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस. येत्या वर्षात विद्यमान सरकारची मुदत संपते त्यामुळे कदाचित पूर्ण अर्थसंकल्प सादर न करता तात्पुरत्या खर्चासाठी लेखानुदान घेतले जाऊ शकते. अशा परिस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्याचे, न करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन सरकारवर नसल्याने पूर्ण अर्थसंकल्प सुद्धा सादर केला जाऊ शकतो. त्यात कर संदर्भात काय बदल होतात ते पाहून आपल्या गुंतवणूक धोरणात बदल करावा लागेल. 15 मार्च 2024/ 31 मार्च 2024 ★ज्या लोकांना अग्रीम कर (Advance Tax) भरावा लागतो त्यांनी 15 मार्च पर्यंत 100% आणि त्यानंतरच्या व्यवहारांवरील पूर्ण आयकर 31 मार्चपर्यंत भरणे आवश्यक असून याप्रमाणे अग्रीम कर न भरल्यास 1% प्रतिमाह दंड होऊ शकतो. त्यामुळे अग्रीम कर भरणाऱ्या करदात्यांनी या तारखा लक्षात ठेवाव्यात. 31 मार्च 2024 ★चालू आर्थिक वर्षात आयकर सूट मिळावी म्हणून गुंतवणूक/खर्च करण्याचा हा शेवटचा दिवस. (80 C, 80 D, 80TTA यानुसार मिळणाऱ्या सवलती) या दिवशी गुंतवणूक किंवा खर्च करून तो आयकर विवरणपत्रात दाखवून कर सवलत मिळवता येईल जुन्या पद्धतीने कर आकारणी मान्य असलेल्या लोकांना याचा अधिक फायदा होऊ शकतो. ★अनिवासी भारतीयांना विविध देशाशी असलेल्या करारानुसार ते रहात असलेल्या देशात कर बसत असल्यास त्या देशांशी असलेल्या दुहेरी कर आकारणी धोरणानुसार तेवढ्या कराची सूट भारतात मिळते अशी सूट मिळवण्यासाठी 10 F फॉर्म आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा लागतो, यासाठी पॅन आवश्यक आहे त्याशिवाय ऑनलाइन फॉर्म प्रोसेस होऊ शकत नाही. ज्या अनिवासी भारतीयांकडे पॅन नाही अशा व्यक्ती करात सूट मिळवण्यासाठी फॉर्म ऑफलाईन पद्धतीने या तारखेपूर्वी भरू शकतील. 01 एप्रिल 2024 ★नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात (सन 2024- 2025) नवीन वर्षात आपले उत्पन्न किती होईल, आयकर किती भरावा लागेल, आयकर वाचवण्यासाठी काय करता येईल. आयकर मोजणीसाठी कोणती पद्धत स्वीकारावी याबाबत प्राथमिक विचार करू शकता. त्याप्रमाणे आपण मागील वर्षाचे सन 2023-2024 चे आयकर विवरणपत्र भरू शकता त्यासाठी आवश्यक माहितीची जमावजमाव करायला सुरूवात करा म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी दमछाक थांबेल. जिथे जिथे आपली मुळातून कर कपात होऊ नये असे वाटत असल्यास आवश्यक तेथे 15 G/H फॉर्म भरून द्यावेत म्हणजे कर कापला जाणार नाही. 15 जून 2024 ★सन 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा अंदाज करून 30% अग्रीम कराचा पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख. ★मालकाकडून कर्मचाऱ्यांना त्यांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि करकपात यांची सविस्तर माहिती देणारे फॉर्म 16 प्रकारातील प्रमाणपत्र देण्याची अंतिम तारीख. या मुदतीत प्रमाणपत्र मिळाल्यास योग्य मुदतीत विवरणपत्र आपणास भरता येईल. 30 जून 2024 ★डी मॅट खाते आणि म्युच्युअल फंड योजनांसाठी नामनिर्देशन करण्याची सक्ती भांडवलबाजार नियंत्रक सेबीने केली आहे. ज्यांच्या पूर्वीच्या खात्यांना/ योजनांना नामनिर्देशन केलेले नाही त्यांना ते करण्याची मुदत वारंवार वाढवून दिली, ही वाढलेली मुदत 30 जून 2024 ला संपेल. ज्यांनी नामनिर्देशन केले नसेल त्यांचे खाते गोठवल्याने कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. 31 जुलै 2024 ★ज्या करदात्यांना आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करावे लागत नाही त्यांना मागील आर्थिक वर्षाचे म्हणजेच सन 2023- 2024 चे आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची अंतिम तारीख. ही तारीख मागील दोन वर्षांत बदलली नसल्याने योग्य मुदतीत विवरणपत्र दाखल करावे. 15 सप्टेंबर 2024 ★सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर भरण्याचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख. यात अंदाजित कराच्या पहिल्या हप्त्यासह 45% एकूण आयकर भरला जावा अशी अपेक्षा आहे. 30 सप्टेंबर 2024 ★ज्या करदात्यांना आपल्या व्यवहारांचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागते त्याच्यासाठी आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची शेवटची तारीख. ही तारीख अनेकांचे लेखापरीक्षण पूर्ण होत नसल्याने वाढवली जाते पण भविष्यात ती वाढवली जाईलच याची खात्री देता येत नाही तेव्हा अशा सर्वच करदात्यांनी याच मुदतीत विवरणपत्र दाखल करावे. 30 नोव्हेंबर 2024 ★पेन्शन अँथोरिटीस हयात असल्याचा दाखला देण्याची अंतिम तारीख. आता हा दाखला आपल्या जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिला तरी चालतो. विहित मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास निवृत्तीवेतन स्थगित केले जाते. 15 डिसेंबर 2024 ★सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर तिसरा हप्ता भरण्याची अंतिम तारीख. या आर्थिक वर्षाच्या अपेक्षित कराच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यासह एकूण 60% कर भरावा अशी अपेक्षा आहे. 31 डिसेंबर 2024 ★आर्थिक वर्ष 2023-2024 चे आयकर विवरणपत्र दंडासाहित भरण्याची शेवटची तारीख. ★31 जुलै 2024 अथवा 30 सप्टेंबर 2924 किंवा आयकर खात्याने दंडाशिवाय विवरणपत्र भरण्याच्या जाहीर केलेल्या तारखेपूर्वी किंवा तारखेनंतर विवरणपत्र दाखल केले असल्यास सुधारीत विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख. या मधील काळात विभागाकडून विवरणपत्र मंजूर झाले असले तरीही सुधारित विवरणपत्र दाखल करता येईल. वरील तारखांबाबत काही शंका असल्यास जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. याशिवाय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार किंवा आयकर खात्याने घेतलेल्या निर्णयांमुळे किरकोळ बदल होऊ शकतात, त्यांची पूर्वसूचना देण्यात येते. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत) अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर 29 डिसेंबर 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 22 December 2023

गुंतवणूकदारांचे प्रकार

#गुंतवणूकदारांचे_प्रकार इक्विटीवाला डॉट कॉम ही वडोदरा येथे असलेली एक आर्थिक क्षेत्राशी निगडित कंपनी आहे. गुंतवणूकदार आणि गुंतवणूकीतील विविध मध्यस्थ उदाहरणार्थ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, सबब्रोकर, इन्शुरन्स एजंट यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य ही कंपनी करते. हितेश माळी हे त्याचे संचालक असून त्यांचा या क्षेत्रातील 30 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. गुंतवणूकदार, मध्यस्थ आणि वित्तिय संस्था यांची वाढ अबाधित ठेवून धोरणात्मक व्यवसाय दिशा दिग्दर्शनाचे काम त्यांच्यामार्फत केले जाते. त्यांच्या व्यवसाय भागीदारांसाठी वर्षभरात 12 व्यवसाय विकास कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमाचे शीर्षक “दि नेक्स्ट बिग थिंग” हे आहे. मध्यस्थ आणि त्यांच्याशी संबंधित गुंतवणूकदार त्यात सहभागी होऊ शकतात. ही एक अर्थसाक्षरतेची मोहीम आहे. त्यात बाजाराचा कल, गुंतवणूकदारांची मानसिकता, गुंतवणूक धोरण यासंबंधात मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या अनेक ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मला मिळत असते. खुसखुशीत पद्धतीने माळीसर त्या दिवशी निवडलेला विषय अतिशय सोपा करून सांगतात. या कार्यक्रमांचे व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. 19 नोव्हेंबरला माळी सरांनी गुंतवणूकदारांचे विविध प्रकार उलगडून दाखवले. त्यांची मानसिकता त्याचे गुंतवणूकीवर होणारे परिणाम समजावून सांगितले. आपण यातील कोणत्या गुंतवणूकदार प्रकारात मोडतो ते समजून घेतले तर गुंतवणूक निर्णय योग्य प्रकारे घेण्यास त्याची मदत होऊ शकेल. आपली आर्थिक धेय्ये, गुंतवणूकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, प्राधान्यक्रम, जोखीम घेण्याची क्षमता जाणणारा आपला गुंतवणूक सल्लागार असेल तर आपल्याला योग्य होतील अशा गुंतवणूक योजना तो सुचवू शकेल. 19 नोव्हेंबरला वर्ड कप फायनल मॅच होती आणि भारत वर्ड कप जिंकणारच अशी वातावरण निर्मिती झाली होती. माळीसर हाच धागा पकडून म्हणाले आजच्या विषयाच्या अनुषंगाने मी काल चिंतन करीत होतो. या काळात त्यांनी अनेकांना फोन करून उद्या काय होईल? याची चाचपणी केली. भारत जिंकणार यावर सर्वांचं एकमत होतं. त्यांनी लोकांना पुढे प्रश्न विचारला भारत कुणामुळे जिंकेल? याची उत्तरं मात्र वेगवेगळी होती. कोणी म्हणालं कॅप्टनमुळे आपण जिंकू, कुणी म्हणालं शुभम गिलमुळे, कोणी म्हणालं श्रेयस अय्यर काहीतरी करू शकेल, एकटा विराट बास आहे, कुलदीप यादवचे हे नेहमीचं मैदान आहे, जडेजा अष्टपैलू खेळाडू आहे त्यामुळे आपला विजय होईल अशी उत्तर आली. त्यांनी विचारलेल्या 11 पैकी 11 लोकांना भारत जिंकेल असं वाटत होतं पण कुणामुळे जिंकेल याची 11 पैकी 11 वेगवेगळी उत्तरं होती. हे कशामुळे झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असलेल्या खेळाडूंमुळे, आपल्या गुंतवणुकीचे तसंच आहे. येती 10 ते 25 वर्षे आपला देश खुप प्रगती करणार आहे. आपली अर्थव्यवस्था बचत करणाऱ्या पासून खर्च करण्याकडे वाटचाल करीत आहे. पूर्वी आपण बचत करत होतो आता गुंतवणूक करत आहोत. लोक पूर्वी पैसे फक्त मुदत ठेवीत ठेवत असत, आता जोखीम क्षमतेनुसार शेअर्स, म्युच्युअल फंड, पीएमएस, युलीप यात गुंतवणूक केली जात आहे. सन 2023 हे शेअरबाजाराच्या दृष्टीने अतिशय चांगलं वर्ष म्हणता येईल. बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला असून स्मॉलकॅप शेअर्सनी 37% मिडकॅप शेअर्सनी 32% लार्जकॅप शेअर्सनी 7% तर मिडकॅप स्मॉलकॅप यांचा एकत्रित 31% परतावा दिला. ज्यांनी लार्जकॅपमध्ये पैसे गुंतवले ते निराश झाले असतील तर स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करणारे आनंदात असतील ज्यांची गुंतवणूक एनएसइ 500 किंवा बीएसइ 200 मध्ये होती त्यांनाही 14% च्या आसपास परतावा मिळाला. जेव्हा परताव्यात मोठा फरक असतो तेव्हा गुंतवणूकदार गोंधळून जातात, निराश होतात. मग ते काय करतात आपली गुंतवणूक पद्धतीच बदलून टाकतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत. आपल्याला अस वाटतं का जडेजा ज्या पद्धतीने खेळतो त्याच प्रकारे रोहित शर्मा खेळेल, शर्मासारखे यादव खेळेल. प्रत्येकाची स्वतःची खेळण्याची लकब आहे ती सोडून तो दुसरं काही करायला गेला तर लवकर आउट होईल त्याचप्रमाणे गुंतवणूकदार म्हणून आपण कुठे आणि नेमकं काय करणार? हाच आजचं हे सेशन घेण्यामागे महत्त्वाचा उद्देश आहे गेल्या दोन वर्षात निफ्टीने दर्शविलेली वाढ 9% आहे त्या तुलनेत निफ्टी पीएसयु, निफ्टी बँक, निफ्टी एफएमसिजी, ऑटो सेक्टर यांनी खूप मोठ्या प्रमाणात वाढ दाखवली आहे अशा प्रसंगात आपण गुंतवणूक पद्धती बदलली तर खूपच फरक पडतो. आपल्या संभाषणात हितेशजी असं म्हणाले की माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवातून मी सांगू शकतो की गुंतवणूकदारांचे 5 मुख्य प्रकार आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. बाजार हा चक्राकार आहे, प्रत्येक क्षेत्राचे बरेवाईट दिवस असतात. गुंतवणूकीतील यश हे आपली मनोभूमिका आणि बाजारातील परिस्थिती यावर अवलंबून असतं त्यानुसार आपण प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराला जाणून घेऊया. ★बचत करणारे गुंतवणूकदार (सेव्हर): अनेक गुंतवणूकदारांची मनोभूमिका पैसे वाचवण्याची असते याचा अर्थ असा नाही की त्याचं उत्पन्न मर्यादित असतं म्हणून ते असं वागतात. अनेकदा उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्ती सुध्दा त्यांच्या गुंतवणुकीतून फिक्स डिपॉझिट एवढा किंवा त्याहून थोडासा अधिक परतावा मिळाला तरी चालेल पण आपली गुंतवणूक सुरक्षित राहिली पाहिजे या विचाराचे असतात. माझा एक गुंतवणूकदार ग्राहक ज्याचा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक संच खूप मोठा आहे. आपल्याला माहीत आहे लोक परतावा थोडासा कमी झाला की कासावीस होतात याला त्याच्या गुंतवणूकीवर मिळालेला परतावा बरोबर आहे ना, याची शंका आल्याने खात्री करण्यासाठी त्याने मला फोन केला. त्याला याची भीती वाटते की जास्त परतावा मिळतोय तर कदाचित माझं जास्त नुकसान भविष्यात होऊ शकेल. त्यामुळे म्युच्युअल फंड योजना, पीएमएस यासारखी एकत्रित गुंतवणूक अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. कधीकधी अशा गुंतवणूकदारांनी त्यांचं गुंतवणूक घोरण बदलणं जरुरीचे असतं जर ते तरुण असतील, त्याच्यावर कोणतीही जबाबदारी नसेल, कोणतेही कर्ज घेतलं नसेल आणि तरीही ते बचत करणारे गुंतवणूकदार असतील तर त्यांच्यासाठी ते योग्य नाही. या परीस्थितीत तुम्ही अधिक जोखीम घेऊ शकता तेव्हा याच प्रकारास चिटकून राहायची त्यांना गरज नाही. ★कमी कालावधीत कमी पैशात संपत्ती निर्माण करण्याची इच्छा बाळगणारे गुंतवणूकदार (ट्रेडर): अनेकदा यांना जुगारी प्रवृत्तीचे लोक म्हटले जाते. जगभरात कॅसिनो आहेत अनेक लोक रात्रभर जागून तेथे पैसे लावत असतात. त्यांना आशा असते की एकदा तरी आपलं भाग्य उजळेल. मग जिंकतात कोण? ज्यांना अनुभव असतो, स्वतःची गणितं असतात ते. तेव्हा हे सगळं आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. जेव्हा आपल्यापुढे भांडवलवृद्धीचे वेगवेगळे पर्याय असतात तेव्हा आपल्याला कमी कालावधीत होणारी भांडवलवृद्धीची भुरळ पडते. याचा अर्थ ट्रेडिंग करू नये ते वाईट आहे असा न धरता आपण त्याच्या किती आहारी जाणार ते ठरवायला हवं. ★अंदाजेपंचे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार (प्रेडीक्टर): ही सर्व भारतीयांना जडलेली वाईट सवय आहे आपण प्रत्येक गोष्टीचा अंदाज बांधून आणि सर्वाना सांगून मोकळे होतो. ही सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. एक वेळ जुगारी लोक चांगले कारण आपण किती कोणता धोका स्वीकारतो आहोत याची त्यांना जाण असते. पण माझ्याकडे आतल्या गोटातील माहिती आहे, मला असं सारखं वाटतंय असे अंदाज बांधणारे कदाचित अल्पकाळात फायदा मिळवत असतील पण दिर्घकाळात ते संपत्ती निर्माण करू शकत नाहीत. ★उधळपट्टी करणारे गुंतवणूकदार (स्पेण्डर): असेही गुंतवणूकदार आहेत ते नफा मिळाला की ताबडतोब खर्च करतात. ते संपत्ती निर्माण करू शकत नाही त्यांना मिळालेले पैसे बाजूला ठेवण्याऐवजी खर्च करायला आवडतं. ते ज्या पद्धतीने फुशारक्या मारतात त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आपल्याला मिळालेल्या पैशातून दिर्घकाळात संपत्ती निर्माण करता यायला हवी. तुम्हाला वाटेल काही मौजमजा न करता फक्त गुंतवणूक करायची का तर तसं नसून मौजमजा आणि गुंतवणूक यांचा समतोल साधला गेला पाहिजे. जेव्हा संयमित पद्धतीने आपण गुंतवणूक करू तेव्हा यशाची खात्री असते. जेव्हा गुंतवणूक केल्यावर आपण त्यात अति उल्हासित होऊ लागतो तर ती गुंतवणूक घोकादायक बनू लागते आणि आपलं स्वास्थ्य बिघडतं. ★स्मार्ट गुंतवणूकदार (प्लॅनर): त्यांच्या गुंतवणूकीत नियोजनाला महत्व असतं त्याप्रमाणे निर्णय झाला की विविध मालमत्ता प्रकारात ते गुंतवणूक करतात आणि शांत बसतात. त्याचा दीर्घकालीन गुंतवणूकीवर विश्वास असतो. प्रचलित व्याजदर आणि महागाई यांच्या तुलनेत थोडा अधिक परतावा त्यांना मिळतो त्यावर ते आपल्या गुंतवणूकीकडे समाधानाने नजर टाकू शकतात. हे लोक आपल्या गुंतवणूकीबद्धल फारसे बोलत नाहीत, बाजार कुठे जाणार यावर चर्चा करीत नाहीत, कुणाकडे टीप्सही मागत नाहीत. आपले आयुष्य समाधानात जगत असतात. त्याची गुंतवणूक पिरॅमिडसारखी असते त्याच्याकडे संकटकाळात उपयोग होईल असा फंड असतो, आपत्कालीन योजना असते, मेडिक्लेम असते, टर्म इन्शुरन्स असतो, म्युच्युअल फंड, शेअर्स अशी त्यांची गुंतवणूक असते. निवृत्तीची योजना असते, आपली भविष्यातील नेमकी गरज काय ती पूर्ण करण्यासाठी त्यांची निश्चित योजना असते. त्याचप्रमाणे आपल्या नंतर संपत्तीचे वाटप कसे व्हावे याची निश्चित योजना असते. आपण नेमकं बरोबर त्यांच्या उलट करून प्रथम मालमत्ता निर्माण करण्याच्या नादात इएमआयच्या चक्रात अडकतो. तेव्हा प्रथम संपत्तीची निर्मिती करून त्यातून मालमत्ता निर्माण करता आली पाहिजे. गुंतवणूक करण्याच्या नादात आपल्या मनावर कोणताही तणाव येता कामा नये. सुख समाधानात जगाचा निरोप घेता यायला हवा. गुंतवणूकदारांचे जसे प्रकार आहेत तशा गुंतवणूकीच्या विविध पद्धती आहेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊन आपल्याला कोणती पद्धत सोयीची होईल याचाही गुंतवणूकदाराने विचार करायाला हवा. जी गुंतवणूक आपली झोप उडवेल आपल्याला सतत अस्वस्थ करेल ती गुंतवणूक आपल्यासाठी नाही. आपण यातील कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहेत ते तपासून पहा. मॅनेजमेंटच्या पुस्तकात आणखी अनेक प्रकारचे गुंतवणूकदार सांगितले असले तरी मला हे पाचच महत्वाचे प्रकार वाटतात तेव्हा आता स्वतःला तपासून पाहून आवश्यकता असेल तर बदल करा नसेल तर त्या त्या प्रकारातील नियमांचे नीट पालन करा. यातील स्मार्ट गुंतवणूकदार होण्याचा प्रयत्न करा. अनेकदा आपल्याला निव्वळ परतावा आकर्षक वाटतो पण तो किती काळाने मिळाला याचे महत्व लक्षात घ्या आणि चक्रवाढवाढीचा वार्षिक दर किती त्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करा जर आपल्याला सातत्याने 12 ते 15% चक्रवाढवाढीने दीर्घकाळ परतावा मिळत असेल तर आपल्या संपत्तीत दिर्घकाळात प्रचंड भर पडेल. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पैसा साध्य नसून साधन आहे ज्या पद्धतीने आपण गुंतवणूक करतोय त्यांनी आपल्याला आनंद मिळतोय ना? अशी पद्धतशीर गुंतवणूक आपण करणार असाल आपल्याला भारताची हारजित महत्वाची न वाटता मॅचमधील आनंद महत्वाचा वाटेल. तेव्हा आपल्या आर्थिक सल्लागाराच्या संपर्कात रहा. तो आपल्या टीमच्या प्रशिक्षकासारखी मदत करेल. शेवटी हा खेळ असल्याने आज हारजितचा विचार न करता तुम्ही या आणि यापुढील प्रत्येक मॅचचा तन्मयतेने आनंद घ्याल, हेच या आपल्या आजच्या विषयाचे सार आहे. या मानसिकतेने गुंतवणूक कराल तेव्हा आपला गुंतवणुकीवरील विश्वास दृढ होईल त्याने देशाची प्रगती होईल ती नुसतीच प्रगती नसेल तर समाधान देणारी प्रगती असेल. पैसे वाढतील पण ते कोणत्या पद्धतीने वाढतात, गुंतवणूकदाराला समाधान देतात का? तेव्हा आजच्या मॅचमध्ये कोणता खेळाडू काय करतो यापेक्षा रनरेटवर लक्ष ठेवा त्याचप्रमाणे आपल्या गुंतवणूकीचा तुकड्या तुकड्याने विचार न करता त्यातून मिळणाऱ्या चक्रवाढ वाढीकडे पहा आनंदात रहा. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक असून इक्विटीवाला डॉट कॉम या कंपनीशी लेखकाचे कोणतेही आर्थिक संबंध नाहीत.) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 22 डिसेंबर 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 15 December 2023

गृहकर्ज पुनर्रचना करताना

#गृहकर्ज_पुनर्रचना_करताना मी मुंबई ग्राहक पंचायतीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचा सदस्य आहे. ग्राहक तितुका मेळवावा या मुखपत्राच्या संपादनासाठी सहाय्य करतो. महारेराचा सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहे. हौस म्हणून कथा, कविता, लेख आत्मचरित्र यांचे अभिवाचन करतो. प्रामुख्याने आर्थिक विषयावर लिहितो. वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक, ऑनलाइन पोर्टल आणि समाज माध्यमांवर माझे लेख, मुलाखती, लाइव्ह कार्यक्रम प्रकाशित होत असतात. मुंबई ग्राहक पंचायतीमुळे अनेक जण त्याच्या वेगवेगळ्या समस्यांबद्धल माझ्याशी संपर्क साधतात. या समस्या केवळ ग्राहक म्हणूनच नाही तर खाजगी, कौटुंबिक कोणत्याही प्रकारच्या असतात. माझ्या आकलनशक्तीप्रमाणे मी त्याचा निराकरण करत असतो. ते करत असताना आपला ज्या संस्थांशी संबंध आहे त्यांच्या समाजमानसातील प्रतिमेला चुकूनही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते कारण समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठीचा त्यांचा वाटा मोलाचा आहे. गेल्या चार महिन्यांपासून दैनिक सामनामध्ये दर गुरुवारी विचारा तर खरं हे आर्थिक विषयावरील प्रश्नोत्तराचे सदर चालू आहे. वाचकांनी विचारलेल्या आर्थिक विषयावरील प्रश्नाचे उत्तर असे त्याचं स्वरूप आहे. आठवड्यात मेलवर येणाऱ्या प्रश्नांपैकी सर्वांना उपयोग होईल अशाच प्रश्नांची उत्तरे मी देतो. गेल्या गुरुवारपर्यत सुमारे 40 प्रश्नांना मी उत्तरं दिली. येणारे प्रश्न विविध आर्थिक विषयांशी संबधित होते. यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे मला सहज देता आली. अनेकदा प्रश्न इतका दीर्घ आणि अनावश्यक तपशील देऊन विचारला जातो की उत्तर देण्यापेक्षा तो कमीतकमी शब्दात नेमकेपणाने कसा विचारावा म्हणजे इतरांना समजेल यासाठी जास्त विचार करावा लागतो. आजपर्यंत आलेल्या प्रश्नांतील दोन प्रश्न मला जास्त आव्हानात्मक वाटले. मला काय माहिती आहे, त्यापेक्षा काय माहिती नाही ते नक्की माहिती असल्याने या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काही संदर्भ मिळवावे लागले यातील एक प्रश्न एलआयसीच्या योजेनेसंबंधी होता तर दुसरा गृहकर्जाबाबत होता. जरी यासंबंधात मला थोडीफार माहिती असली तरी कोणत्याही प्रश्नाचं योग्य आणि नेमकं उत्तर दिलं जावं यावर माझा कटाक्ष असतो त्यासाठी माझ्या संपर्कातील तज्ञ व्यक्तीचं मी मार्गदर्शन घेत असतो. यासंबंधात मला आमचे ग्राहक पंचायत कार्यकर्ते सहकारी अभय दातार रिटायर्ड बँकर आणि तक्रार मार्गदर्शन केंद्रप्रमुख शर्मिला रानडे यांची मोलाची मदत होते. मला आनंद वाटतो की जुजबी संपर्कातील इतर लोकही तत्परतेने मार्गदर्शन करतात. एलआयसी संबधित प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ठाण्यातील विमाव्यवसायिक किरण मराठे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्यामुळे मला प्रश्नकर्त्यास सुयोग्य मार्गदर्शन करण्यास मदत झाली. यातील दुसरा गृहकर्जाबाबतचा जो प्रश्न होता तो मला जास्त महत्वाचा वाटतो म्हणून या लेखातून सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे सदरहू कर्जदाराने सन 2021 रोजी हे कर्ज घेतले अलीकडे तीन महिन्यांपूर्वी त्याने इएमआय रक्कम वाढवून घेतली आहे सध्या त्याच्या कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर 9.5% आहे. बँक नवीन कर्जदारांना 8.4% ने कर्ज देत असून कर्जदाराच्या पगारात वाढ झाल्याने इएमआय रक्कम वाढवायची असून व्याजदर कमी करून हवा आहे. बँक त्यास दाद देत नाही. कर्जदाराची मागणी मला रास्त वाटते अनेक बँका काही किरकोळ शुल्क आकारून ही सवलत आपल्या कर्जदारांना देत आहेत. त्यामुळे मी बॅंकेकडे तक्रार करून पाठपुरावा करावा अथवा अन्य ठिकाणी कर्जाचे हस्तांतरण करावे असा सल्ला दिला आहे. खरं तर हा स्मार्ट पर्याय बँकेने कर्जदारांस द्यायला हवा पण बँका ते करत नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती कोणतेही कर्ज घेते ते कर्ज काही कागदपत्रांची पूर्तता केल्यावर मिळते यात एक करारही असतो अनेक सह्या करताना कोणीही कर्जदार आपण कशावर सह्या करतो ते विचारातही नाहीत यातील कराराची प्रत कर्जदाराने मागणी केली तरच बँक देते अनेक कर्जदारांना असा काही करार असतो हेही माहितही नाही फक्त कर्ज मंजुरीचे पत्रच कर्जदारास दिले जाते. जर आपण कर्ज घेतले असेल तर कराराची प्रत ज्यात नियम अटी समाविष्ट असतात तो अवश्य मागून घ्या. त्यात- *कर्जरक्कम, व्याजदर, इएमआय कालावधी, व्याज आकारणीची पद्धत याची माहिती असेल. *कर्ज स्थिर व्याजदराने (फिक्स) आहे की बदलत्या व्याजदराने(फ्लोटिंग) *व्याजदरात बदल कधी होईल तो ममध्ये करायचा असेल तर त्यासाठी किती प्रक्रिया शुल्क आकारले जाईल. *इएमआयमध्ये खंड पडल्यास लागणारे शुल्क *कर्ज अंशतः किंवा पूर्णपणे फेडण्याची पद्धत त्यावरील प्रक्रिया शुल्क यासारख्या अनेक गोष्टींचा उल्लेख असणारच कारण हा ग्राहकाने कर्ज मिळवण्यासाठी बँकेशी केलेला कायदेशीर करार आहे. व्याजदरात होणाऱ्या बदलाने यासंबंधात अनेक प्रश्न निर्माण होतात. व्याजदर एका ठिकाणी स्थिर होऊन कोविड काळानंतर खूप खालच्या पातळीवर आले होते. गेल्या वर्षभरात त्यात विक्रमी वाढ झाली. महागाई स्थिर झाल्याची रिझर्व बँकेस अजून खात्री वाटत नसल्याने ते नजीकच्या काळात कमी होण्याची शक्यता कमीच वाटते. अशा परिस्थितीत निर्माण होणारे प्रश्न कर्जदाराने कसे सोडवायचे? बँकेसंबंधीत कोणत्याही विषयावर तक्रार असल्यास प्रत्येक बँकेत तक्रार निवारणीची त्रिस्तरीय यंत्रणा आहे. ग्राहकाने तेथे लेखी अथवा मेलवर तक्रार करून त्याचा पाठपुरावा करावा. त्याने समाधान न झाल्यास बँकिंग लोकपालाकडे जाता येईल. अनेकांना फक्त काहीही झालं की लोकपालाकडे तक्रार करायची असते एवढेच माहिती असते. ते ठामपणे लोकपालाकडे जा असा सल्ला देत असतात. अशा थेट तक्रारींची कोणतीही दखल घेतली जात नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे राहता राहिलं वरील प्रश्नांवर नेमकं काय करावं? यावर बँक नेमकं काय म्हणते ते शक्यतो पाहावं. त्यांना व्यवसाय करायचा असल्याने त्यांनी कर्जदारास सहकार्य करणं अपेक्षित आहे. हे काम कमी भुर्दंड पडून होऊ शकते. अशा प्रकरणी बँकांनी कोणती भूमिका घ्यावी यासंबंधी मार्गदर्शक तत्व रिझर्व बँकेने सर्व बँकांना एका पत्रकाद्वारे कळवली (RBI/DBR/2015-16/20, दिनांक 03/03/2016) असून अलीकडे त्याची आठवण करून देणारे पत्रही (RBI/2023-24/53 दिनांक18/08/2023) पाठवले आहे. याचा तपशील रिझर्व बॅंकेच्या संकेतस्थळास भेट देऊन मिळवता येईल. या पत्रात बँकांनी नेमकं काय करावं त्याबद्दल सूचना आहेत. या सूचना असल्याने बँकेने त्या मान्य केल्याच पाहिजेत याची आपण सक्ती करू शकत नाही, तेव्हा पाठपुरावा करून काही उपयोग झाला नाही तर त्यावर फारसं काही करता येणं शक्य नाही. आपल्या अटीशर्तीनुसार कर्ज देणाऱ्या दुसऱ्या वित्तसंस्थेकडे सदर कर्जाचे हसत्तांतरण करणे हाच अंतिम मार्ग राहतो यासाठी थोडा अधिक खर्च करावा लागला तरी व्याजदरात पडणाऱ्या किरकोळ फरकानेही व्याजामध्ये लक्षणीय फरक पडतो. ज्यांची कर्ज लवकरात लवकर फेडण्याची क्षमता आहे किंवा आता ती झाली आहे त्यांनी गृहकर्ज लवकरात लवकर फेडण्याचा विचार करू नये असे माझे स्पष्ट मत आहे. जे मी यापूर्वीच्या लेखांतून मी वेळोवेळी व्यक्त केले आहे. गृहकर्ज हे सर्वात कमी दराने उपलब्ध असलेले कर्ज असून जुन्या पद्धतीने करमोजणी केल्यास त्यावर आयकरात बऱ्याच सवलती आहेत. त्यामुळे जास्त असलेले पैसे एकरकमी अथवा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून त्यावर अधिक परतावा मिळवता येणे शक्य आहे. पुरेशी रक्कम जमल्यावर कर्ज रक्कम कमी असल्यास सर्व कर्जाची एकरकमी परतफेड करण्याचा विचार करता येईल. अधिक व्याजदराने घेतलेले कर्ज जसे क्रेडिट कार्डवरील शिल्लख, वैयक्तिक कर्ज, वाहनकर्ज मात्र लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करावा. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत, महारेराच्या सलोखा मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावीत.) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 15 डिसेंबर 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 8 December 2023

आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

#आर्थिक_चुकांचा_आढावा_आणि_नवसंकल्प सन 2023 कसं आणि कधी संपत आलं ते कळलेच नाही. या वर्षात आपण काही चुका केल्यात का? यातून आपण काही शिकलो का? जर त्याच त्याच चुका आपण पुन्हापुन्हा करणार असलो तर आपली प्रगती होणार नाही आणि त्या जर आर्थिक चुका असतील तर होणारे नुकसान आर्थिक असणार! या वर्षाला निरोप देताना आपण अशा आर्थिक चुकांचा आढावा घेऊ, ज्या कदाचित टाळता आल्या असत्या. त्याचप्रमाणे नव्या वर्षी आपल्याकडील रोखता प्रवाह असा ठेवू ज्यामुळे आयकर कमी लागेल. आपण अधिक गुंतवणूक करू शकू असा संकल्प करूया, ज्या योगे येणारे वर्ष भरभराटीचे जाईल. बाजाराचा कल सातत्याने बदलत असतो. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत असते. हातात खेळत असणाऱ्या पैशांनुसार आपल्या इच्छा, गरजा आणि अपेक्षाही बदलत असतात. करविषयक नियमही थोडेफार बदलत दरवर्षी असतात, त्याचप्रमाणे गुंतवणूकीच्या नव्या संधी उपलब्ध होत असतात. डिसेंबर हा महिना असा आहे जेथे शांतपणे थोडं थांबून निरोप देत असलेल्या वर्षाचा आपण आढावा घेऊ शकतो. केलेल्या आर्थिक चुकांचे विश्लेषण करू शकतो. नवीन वर्ष किंवा त्या पुढील काळासाठीचे घेय्य निश्चित करू शकतो. पूर्वी केलेले संकल्प ठरवलेली उद्दिष्ट योग्य आहेत की त्यात बदल करावा, याकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकतो. सर्वसाधारणपणे बाजाराची दिशा कशी आहे, ती आपल्या मानसिकतेस अनुकूल आहे की प्रतिकूल, यात जोखीम कशी आणि किती याचा विचार करून पुढील वर्षातील गुंतवणूक संधी कोणत्या असतील याचा अंदाज बांधता येईल. त्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवता येईल का, ते ठरवता येईल. जिथे काहीतरी अभ्यास करून अंदाज बांधावा लागतो तेथे चुका होणं अगदी साहजिकच आहे पण त्या कमीत कमी कशा होतील, एकाच प्रकारच्या चुका वारंवार होत असतील तर त्या टाळता कशा येतील, यावर आपली प्रगती होऊ शकते. यादृष्टीने गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा एक धावता आढावा घेऊयात- ★कोणत्याही उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक: अनेकदा कोणतेही धेय्य न ठेवता गुंतवणूक केली जाते, यात आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते कारण अशी गुंतवणूक ही त्या वेळेची बाजारातील स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच अल्पकालीन स्थितीचा लक्ष्यात घेऊन केलेली असते. ती गरजेला आपल्याला उपयोगी पडेलच याची खात्री देता येत नाही कारण उद्दिष्टचं नसल्याने नेमकी किती गुंतवणूक किती काळासाठी आणि कुठे करायची याचा विचारच केलेला नसतो. गुंतवणूक ही जाणीवपूर्वक त्यातील धोका स्वीकारून त्यातून मिळणारा परतावा हा इतर धोकारहित योजनांत मिळत असलेल्या परताव्याहून अधिक असावा या हेतूनेच केलेली असते, हेच त्यामागील प्राथमिक तत्व आपण विसरून जातो. आपलं उद्दिष्ट हे, S M A R T म्हणजेच- Specific निश्चित, Measurable मोजता येणारे, Achievable शक्य असणारे, Relevant संबंधित, Time-bound विशिष्ट कालमर्यादेत असावं असं गुंतवणूक तज्ञांचं मत आहे. म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊनच मागील गुंतवणूकीचा आढावा घ्यावा आणि नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. याच दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुका आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करूयात- ★आपत्कालीन खर्चाची तरतूद नसणे: प्रत्येकाच्या जीवनात काहींना काही संकटे येत असतात यावर मात करण्यासाठी काहीतरी योजना असावी लागते. या वर्षात अशी काही संकटं आपल्यावर आली का, तेव्हा आपण काय केलंत, तेव्हा आपल्याकडे पुरेशी तरतूद होती का,आठवून पहा कोणती संकटं आली ती? नोकरी गेली, कुणीतरी गंभीर आजारी पडलं, गाडी बिघडली ती दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू एकापाठोपाठ एक बिघडल्याने नवीन घ्याव्या लागल्या. हे आपण टाळू शकत नाही यासाठी पुरेशी तरतूद नसेल तर उधार उसनवार करावी लागते, कर्ज घ्यावं लागतं, मालमत्ता विकावी लागते. यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत प्रगती होण्याऐवजी आपण दोन पावलं मागे जातो कदाचित क्रेडिट कार्डसारख्या महाग कर्जाच्या सापळ्यात अडकतो. असा काही प्रसंग आपल्यावर आला का? यासाठी आपला किमान घरखर्च 12 महिने चालेल असा आपत्कालीन फंड आपल्याकडे हवा. तो नसल्यास असा फंड कसा निर्माण करता येईल या दृष्टीने नववर्षाचा विचार करावा. ★निवृत्ती नियोजनासाठी लवकरात लवकर तरतूद करण्याची आवश्यकता न वाटणं: आपण जसे आयुष्य आज जगत आहोत तसेच आयुष्य आपल्या निवृत्तीनंतर याच जीवनशैलीच्या जवळपास असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागते ही गुंतवणूक आपण जितक्या लवकर (शक्यतो उत्पन्न मिळवायला लागल्यावर दोन महिन्यात आणि उत्पन्नाच्या दहा टक्के) करू तेवढी कमीतकमी करावी लागते आणि त्याच्या चक्रवाढीचा फायदा आपल्याला मिळतो. हे करण्यासाठी जेवढा विलंब तेवढी गुंतवणूक रक्कम वाढवावी लागते. ★आयकर कायद्याच्या संबंधित चुका: अनेकदा आयकर, अग्रीमकर आयकर विवरणपत्र वेळेवर न भरणं यामुळे आपल्याला दंड भरावा लागतो काही सवलती सोडून द्याव्या लागतात. कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ केल्यास त्याचा आर्थिक ताण पडू शकतो. तेव्हा यासाठीची निश्चित योजना बनवून ठेवावी. ★आपल्या गुंतवणूक संचाचा आढावा न घेणे: गुंतवणूक संचाचा वेळोवेळी आढावा घेऊन तो आपल्या घोरणानुसार अपेक्षित परतावा देत आहे की नाही ते पाहून त्यात योग्य ते बदल करणं हे उत्तम गुंतवणूकदाराचं लक्षण आहे. जर एखादी गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नसेल तर थोडाफार तोटा सहन करून त्यातून वेळीच बाहेर पडणे आवश्यक असतं. असा आढावा वर्षातून किमान दोनदा तरी घ्यावा. ★महाग कर्जाचा बोजा कमी न करणे: गृहकर्जाचा अपवाद सोडल्यास कोणतेही कर्ज लवकरात लवकर फेडणे कधीही चांगले. अनेकदा गुंतवणूक करण्याच्या नादात महाग कर्ज फेडलं जात नाही. कर्ज काढून गुंतवणूक करणं हे आर्थिक मागासलेपणाचं लक्षण आहे यामुळे व्याजाचा बोजा तर वाढतोच पण गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यास दुहेरी नुकसान होतं. जेव्हा गुंतवणूकीतून व्याज देऊन अधिक परतावा मिळवण्याची हमखास खात्री असल्यास असे धाडस करावे, शक्यतो अशी नसती उठाठेव करू नये. ★जीवनविमा, मेडिक्लेमकडे दुर्लक्ष करणं: आयुष्य अशाश्वत असल्याने कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावल्यास पूर्ण आर्थिक घडी विस्कटते त्यासाठी जीवनविमा असतो. सातत्याने वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे घरातील एखाद्या सदस्यास एखाद्या गंभीर आजाराशी सामना करायला लागल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. जीवनविमा आणि आरोग्यविमा यासाठी करावा लागणारा खर्च त्यात असलेल्या जोखमीची किंमत समजावी. पुरेशा रकमेचा विमा घेऊन त्याचे वेळेवर नूतनीकरण करावे. सर्वसाधारणपणे होत असलेल्या या आणि अशा चुका आपण टाळाव्यात. येणाऱ्या नवीन वर्षात आपण आणि आपले कुटुंबीय यांचे आरोग्य उत्तम राहून आर्थिक भरभराट व्हावी, या सदिच्छा💐 ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते आणि मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 8 डिसेंबर 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 1 December 2023

कार्ड क्रमांक नसलेले अभिनव क्रेडिट कार्ड

#कार्ड_क्रमांक_नसलेले_अभिनव_क्रेडिट_कार्ड माझ्या पत्नीच्या नावाचे, मी सहधारक असलेले सेव्हिंग खाते ऍक्सिस बँकेत आहे. त्याचे क्रेडिट कार्ड मार्केटिंग करणारे लोक लैचं भारी आहेत. ग्राहकांनी त्याचेच कार्ड काही करून घ्यावेच म्हणून ते इतकी गळ घालतात. त्या प्रकारास एखाद्याच्या मागे हात धुवून लागणे हे कुत्र्यासारखे मागे लागतात असे वाटते. माझ्या पत्नीचे नावे खाते असले तरी मोबाईल नंबर माझा असल्याने सर्व मॅसेज, कॉल मलाच येतात. मध्यंतरी अनेक दिवस या कार्ड मार्केटिंग करणाऱ्या मंडळींनी आपल्या गोड आवाजात पण दररोज चारचार वेळा, वेळी अवेळी कधीही फोन करून भंडावून सोडलं होतं. शेवटी कस्टमर केअरकडे तक्रार करून, मला क्रेडिट कार्ड नकोय, यापुढे क्रेडिट कार्ड संबंधित फोन आल्यास मी बँकेतील खातेच बंद करेन असा निर्वाणीचा इशारा दिल्यावर त्यानंतर काही दिवसांनी हे फोन यायचे बंद झाले. माझे अजूनही मन:परिवर्तन होऊन मी त्यांचे क्रेडिट कार्ड घेईन अशी भाबडी आशा त्यांना अजूनही वाटत असावी, त्यामुळेच काही दिवसांनी माझी आठवण झाल्यावर त्यांचा एखादा फोन येतोच. पूर्वी वारंवार फोन येत असताना आमच्यात होणारा संवाद साधारण असा असायचा- ●हॅलो मी ऍक्सिस बँकेतून बोलतोय ■बोला ●हा अमुक अमुक नंबर अमक्याचा आहे का? ■हो ●मॅडमना जरा फोन देता का ■ती माझी पत्नी आहे पण तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मी त्या अमुक अमुक खात्याचा जॉईंट होल्डर आहे. ●बँक आपल्याला लाईफ टाईमसाठी एक क्रेडिट कार्ड ऑफर करतेय त्याचे बल्ला… बल्ला… बल्ला… फायदे, एवढे पॉईंट मिळतील एवढे कॅशबॅक मिळेल वगैरे वगैरे ■मॅडमना थोडे दिव्यांगत्व आलेले असल्याने त्या एकट्या कुठे जात नाहीत, त्यांना कार्ड नकोय. ●असं का? सॉरी सर, मग तुम्ही घ्याना, आमचं हे क्रेडिट कार्ड त्याचे हे, हे फायदे आहेत, बल्ला… बल्ला… बल्ला….. ■माझ्याकडे दुसऱ्या बँकेचं कार्ड आहे तेच फारसं वापरलं जातं नाही त्यामुळे आम्हाला दुसऱ्या कार्डची गरज नाही. ●घ्याना सर लाईफ टाइम फ्री आहे,ऑफर आहे ■मी (किंचित रागावून) तुम्ही फ्री देताय म्हणजे मी घेतलं पाहिजे अशी सक्ती आहे का? ●अस नाही सर पण…. ■नकोय आम्हाला कार्ड! असं म्हणून मी फोन कट करत असे तरी रोज दिवसातून चार पाच वेळा फोन यायला लागल्यावर मी वैतागलो मग फोनवर ●हॅलो मी ऍक्सिस बँक…. ■क्रेडिट कार्ड संबधी आहे का? ●हो ■आम्हाला कार्ड नकोय म्हणून फोन कट भारतातील खाजगी क्षेत्रातील मोठी बँक, ऍक्सिस बँक आणि फइब यांनी एकमेकांच्या सहकार्याने भारतातील पहिलंच नंबर विरहित को ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून दिलं आहे. आजपर्यंत गेली अनेक वर्षे आपण कार्ड धारकाचे नाव,16 अंकी कार्ड क्रमांक, त्या कार्डची वैधता ही सर्व माहिती सर्वसाधारणपणे एका बाजूवर तर दुसऱ्या बाजूस या कार्डची खात्री सिद्ध करणारा सिविवी क्रमांक असलेलं क्रेडिट कार्ड पहात आलो आहोत. हे नंबर बहुदा खाचलेले किंवा फुगीर असतात, अलीकडे अगदी साधे डिजाईन असलेली कार्डही अनेकांनी आणली असली तरीही त्यावर नंबर असतोच. 10 ऑक्टोबर 2023 रोजी हे नंबर विरहित क्रेडिट कार्ड प्रथमच वितरित करण्यात आलं. यावर फक्त धारकाचे नाव आहे. ऍक्सिस बँक आणि फइब यांच्या सहकार्याने ही अभिनव निर्मिती आपल्यापुढे आली आहे. फईब म्हणजेच फेडरेशन ऑफ युरोपियन अँड इंटरनॅशनल इन बेल्जियम, सन 1949 कोणतेही आर्थिक लाभ न मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेली नामवंत संस्था आहे. आपल्या सभासदांना अनेक बाबतीत योग्य ते मार्गदर्शन आणि मदत या संस्थेमार्फत केली जाते. ते कोणत्याही बाबतीतील व्यावसायिक सल्ला, आवश्यक असल्यास त्या क्षेत्रातील दिग्गजांचा संपर्क, विविध प्रश्नावरील सर्व्हे, अत्यावश्यक प्रशिक्षण, सभासदांच्या अडचणी, विचारांची देवाण घेवाण, वादविवाद, नवीन माहितीची देवाणघेवाण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. ऍक्सिस बँकेच्या मदतीने त्यांनी हे अधिक सुरक्षित तंत्रज्ञान देऊ केले असून फइबचे मोबाईल अँप्लिकेशन वापरणाऱ्या ग्राहकांना लाभ होईल. याच फइबची भारतातील कंपनी सोशल वर्थ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड येथे आपल्या व्यावसायिक भागीदारांच्या सहाय्याने पूर्णपणे पेपरलेस पद्धतीने तात्काळ कर्ज,पगारदारांना पगाराची उचल देणारा सावकारी व्यवसाय करते. त्कंपनीचे कर्ज देणारे अँप असून, बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून रिझर्व बँकेकडे कंपनीची नोंदणी झालेली आहे. क्रेडिट कार्ड वरील व्यवहार हे एक कर्जच आहे, त्यावर ग्राहकांची वैयक्तिक माहिती नसल्याने कार्डवरील माहितीच्या चोरीमुळे होणारे गैरव्यवहार टळतील. ग्राहक या कार्डावर विश्वास ठेवून निश्चिंत राहू शकतात असा ऍक्सिस बँकेच्या कार्ड विभागाचे प्रमुख संजीव मोघे यांचा दावा आहे. या कार्डावरून उपहारगृह, मनोरंजन, पर्यटन यासंबंधी ऑनलाइन व्यवहार केल्यास दरमहा ₹1500/- च्या अधिकतम मर्यादेत 3% कॅशबॅक मिळेल. या नवीन कार्डाची ऑपरेटिंग एजन्सी व्हिसा, मास्टरकार्ड नसून एनपीसीआयने विकसित केलेली रूपे ही स्वदेशी आहे. याशिवाय हे कार्ड कोणत्याही यूपीआय प्रणालीशी जोडले जाऊ शकते त्यामुळे हेच क्रेडिट कार्ड वापरून ग्राहक गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अँप्लिकेशन बरोबर त्यास लिंक करून पेमेंट करू शकतात. याचा वापर करून वर्षातून चारदा देशांतर्गत एअरपोर्टवरील लॉन्ज सेवेचा उपभोग घेता येईल. कार्डचा वापर करून ₹400/- ते ₹5000/-पर्यंत इंधन खरेदी केल्यास त्यावर सरचार्ज घेतला जाणार नाही. वेळोवेळी ऍक्सिस बँकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध ऑफर्सचा कार्डधारकांना लाभ घेता येईल. फइबच्या ग्राहकांना हे कार्ड फिजिकल स्वरूपात त्याचप्रमाणे अँपवरदेखील मिळेल. त्याचा आयुष्यभर मोफ़त वापर करता येईल तसेच ते घेण्यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही. नंबर नसलेल्या कार्डचा वापर, हा सध्या जगभरात नव्याने आलेला ट्रेंड आहे. यातील फिजिकल कार्ड हरवले तरी तुमची माहिती अँपमध्ये सुरक्षित असल्याने त्यापासून कोणताही धोका संभवत नाही. हे कार्ड वापरणारा ग्राहक टेक्नोसॅव्ही असावा त्याला अँप वापरून कार्ड व्यवहारांवर नियंत्रण ठेवता यायला हवं. डिजिटल व्यवहार करणारी तरुणाई हे या क्रेडिट कार्डचे संभाव्य ग्राहक आहेत. भारतीय रिझर्व बँकेने अलीकडेच निवडक बँकांना त्याच्या ग्राहकांना क्रेडिट लाईन ही कर्ज सुविधा देण्याची परवानगी दिली आहे त्यास अनुसरून या क्रेडिट कार्डचा वापर करून अनेक ग्राहकांना घेतलेल्या कर्जाचे विविध माध्यमातून सुरक्षितरीत्या पेमेंट करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावीत, लेखात माहिती दिलेले क्रेडिट कार्ड आणि अन्य तात्काळ कर्ज योजना यांची कोणतीही शिफारस नाही) अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर 1 डिसेंबर 2023 रोजी पूर्वप्रकाशीत