Friday, 30 June 2023
सिंगापूर निफ्टी नाही आता गिफ्ट निफ्टी
#सिंगापूर_निफ्टी_नाही_आता_गिफ्ट_निफ्टी
आपल्या सर्वांच्याच नवे घर, मुलांचे शिक्षण, पर्यटन, निवृत्ती नियोजन यासारख्या आशाआकांक्षा असतात. त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी, महागाईवर मात करण्यासाठी गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीत असलेल्या संभाव्य घोक्यांचा आपण जाणीवपूर्वक स्वीकार केलेला असतो. अलीकडील काळात अपेक्षित अधिक वाढ व्हावी म्हणून सर्वाधिक गुंतवणूक प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे शेअर्समध्ये केली जाते. अधिकाधिक लोक शेअरबाजारात गुंतवणूक करत असल्याने त्यांच्याशी संबंधित काही महत्वाच्या संज्ञा प्राथमिक माहिती म्हणून माहीत असणे जरुरीचे आहे. शेअरबाजाराचे लोकप्रिय निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी हे आपल्याला माहिती असतील. शेअरबाजारातील विविध क्षेत्रातील शेअर्सची एका विशिष्ट दिवसाची किंमत ही त्यांची मूळ किंमत ठरवून त्या सापेक्ष आजची किंमत यावरून निर्देशांक समजतो. त्यामुळे बाजाराची सर्वसाधारण दिशा समजायला मदत होते. निर्देशांक कोणत्या शेअर्सवरून ठरवायचा, त्यांचा आढावा कधी घ्यायचा, त्यातील शेअर्सची बदली कशी आणि कधी करायची, याबाबत सेबीचे निश्चित नियम असून त्यानुसार शेअरबाजाराची कार्यकारी समिती त्यासंबंधी निर्णय घेते. सेन्सेक्स हा मुंबई शेअरबाजारातील 30 शेअर्सवर आधारित निर्देशांक असून निफ्टी हा राष्ट्रीय शेअरबाजारातील 50 शेअर्सवर आधारित निर्देशांक आहे.
वेगवेगळ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीनुसार
अनेक कल्पक गुंतवणूक प्रकार बाजारात येत असतात. देशी विदेशी वित्तसंस्था मोठे गुंतवणूकदार यांना जोखीम व्यवस्थापन करणे सोपे जावे म्हणून हेजिंग करण्यासाठी बाजारात डिरिव्हेटिव व्यवहार होण्यास सुरुवात झाली यात व्यवहार करण्यास भांडवल कमी लागून अधिक फायदा मिळवता येतो हे लक्षात आल्यावर अनेकजण त्यात उतरले. सध्या बाजारात होणाऱ्या ट्रेंडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये सर्वाधिक व्यवहार या प्रकारात होतात. हे व्यवहार शेअर, निर्देशांक, कमोडिटीमध्ये करता येतात. सध्या भारतात होणारे सर्वाधिक व्यवहार हे डिरिव्हेटिव पद्धतीचे असून यातील सर्वाधिक व्यवहार राष्ट्रीय शेअरबाजारात होतात.
खुल्या अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार केल्याने जगभरातील गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजाराकडे आकर्षित झाले असून त्यांची डिरिव्हेटिव व्यवहार करण्याची प्रथम पसंती सिंगापूर येथील आंतराष्ट्रीय शेअरबाजारास आहे. कारण -
*तेथील व्यवहाराचे चार्जेस कमी आहेत.
* हा बाजार दिवसभरात 16 तास चालू असल्याने सर्व गुंतवणूकदारांना सोयीचा आहे. *तेथे दिवसभरात मोठ्या प्रमाणात होणारे व्यवहार आणि त्यातून निश्चित होणारी किंमत यावरून भारतातील ट्रेडर्सना आज बाजारात काय होईल याचा अंदाज बांधता येतो. विदेशी गुंतवणूकदारही या माहितीचा भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यासाठी उपयोग करतात.
भारतीय निफ्टी आणि सिंगापूर निफ्टी या दोन्हींचे व्यवहार जोखीम व्यवस्थापनासाठी असले तरी त्यात काही फरक आहेत.
*भारतीय निफ्टी चे व्यवहार 75 च्या संचात (lot) होतात. तर सिंगापूर बाजारात अशी लॉट साईज नाही. भारतातील व्यवहारांचा संच हा जेव्हा अस्तित्वात येईल तेव्हा तो किमान पाच लाख रुपयांचा असतो.
*भारतीय बाजार सव्वासहा तास चालू असतो सिंगापूर बाजारात हे सौदे 16 तास चालू असतात. सिंगापूर बाजारातील सर्वाधिक म्हणजे एकूण व्यवहारांच्या 10% उलाढाल SGX Nifty मध्ये होते. भारतीय रुपयात ही दैनिक उलाढाल ₹ 82000 कोटीच्या आसपास आहे. या बाजारात सर्वसामान्य भारतीयांना गुंतवणूक करता येत नाही. ब्रोकिंग फर्म त्यांचे प्रोप्रायटर्री व्यवहार करू शकतात याशिवाय विदेशी वित्तसंस्था आणि पी नोट्स द्वारे व्यवहार करणाऱ्या कंपन्या तेथे उलाढाल करून अंदाज घेऊन भारतीय बाजारात उतरतात कारण -
*सिंगापूर शेअरबाजार आपला बाजार सुरू होण्यापूर्वी चालू झालेला असतो आणि आपला बाजार बंद झाला तरी चालू असतो.
*जगातील घडामोडीचा तात्काळ परिणाम या बाजारावर दिसून येतो कारण येथील व्यवहारात बाजारभाव मोठ्या प्रमाणात वरखाली होतात. त्यामुळे भावातील फरकाचा फायदा मिळवता येतो.
*सिंगापूर निफ्टी सौदापूर्तीच्या (सेटलमेंट) दिवशी पैशात (डॉलर्समध्ये) समायोजित केली जाते, तर येथील निफ्टीची सौदापूर्ती डिलिव्हरी मध्ये होते.
अलीकडेच सिंगापूर शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार यांनी परस्परांच्या संमतीने यापुढे सिंगापूर निफ्टीचे व्यवहार गिफ्ट सिटीतील एनसीइ आयएक्स या आंतरराष्ट्रीय शेअरबाजारात करायचे ठरवले असून त्यासंबंधी एमएसइ आयएक्स आणि सिंगापूर शेअरबाजार यांनी सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार-
*03 जुलै 2023 पासून सिंगापूर आंतरराष्ट्रीय शेसरबाजारात टाकलेले सर्व सौदे एनएसइ आयएक्सकडे वळवले जातील
*भारतीय प्रमाणवेळेनुसार पहिले सत्र सकाळी 06:30 ते दुपारी 03:40 नंतर दुसरे सत्र दुपारी 04:35 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 02:40 पर्यत म्हणजेच जवळपास 19 तासाहून अधिक काळ करता येतील.
* भारतात ते एएनएसइ आयएफएसएक्स क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडून समायोजित केले जातील.
*ते यापुढे सिंगापूर निफ्टी ऐवजी गिफ्ट निफ्टी या नावाने ओळखले जातील.
जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपण उदयास येत असताना जागतिक गुंतवणूकदारांना आपण ही सोय उपलब्ध करून देत आहोत.
या नव्या वेगळ्या व्यवस्थेचे उद्घाटन काल 29 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याबरोबरच या दिवशी गिफ्ट सिटीमध्ये त्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सुवर्ण बाजाराचेही (IIBE) उद्घाटन करण्यात आले. हा अशा पद्धतीचा जगातील तिसरा मोठा सुवर्ण बाजार आहे ज्यामुळे सोन्याची खरीखुरी किंमत पारदर्शक पद्धतीने मिळू शकेल. याशिवाय याच दिवशी एमएसइ आयएक्सने जगातील चार भांडवल बाजार नियंत्रकांशी, वित्तीय नियमन देखरेख नियंत्रण यासंबंधातील देवाणघेवाण, नवीन आर्थिक साधनांचा शोध, उपलब्ध आर्थिक साधनांचा विकास या संबंधात करार केला असून या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार आहोत.
©उदय पिंगळे
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून ती कोणत्याही गुंतवणुकीची शिफारस करीत नाहीत)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 30 जून 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 23 June 2023
वैयक्तिक कर्जास पर्याय
#वैयक्तिक_कर्जास_पर्याय
वैयक्तिक कर्ज ही सर्वसाधारणपणे, विनातारण असतात. बँका, पतसंस्था अथवा नॉन बँकिंग कंपन्या यांच्याकडून ते आपल्याला मिळू शकते. तातडीच्या अडचणींवर जसे की आजारपण, शिक्षण, लग्नाचा खर्च, घराचे नूतनीकरण, स्थावर मालमत्ता खरेदी, परदेश प्रवास इ अशा तात्कालीक मोठया खर्चावर मात करण्यासाठी अशी कर्जे घेतली जातात. तर काही जण असे कर्ज सुलभतेने मिळते आहे असे समजल्यावर, ते मुद्दाम घेऊन आपल्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठीसुद्धा घेतात.
असे कर्ज बँका , बिगर बँकिंग कंपन्या आपल्या अनुभवावर वितरित करतात. कर्ज परतफेडीची पात्रता हा त्यांचा महत्वाचा निकष असतो. बँकाबँकांमध्ये आणि फायनान्स कंपन्यामध्ये असलेली तीव्र स्पर्धा यामुळे असे कर्ज देण्याच्या अटी, परातफेडीचा कालावधी, कमान /किमान कर्जरक्कम, व्याजदर यात भिन्नता आढळते. हे कर्ज सामान्यतः विनातारण मिळत असल्याने त्यात जोखीम अधिक असते त्यामुळे त्यावरील व्याजदर हा तारण कर्जाहून अधिक असतो. सध्या अशा प्रकारच्या कर्जावरील सध्याच्या व्याजदर 12 ते 15% प्रतिवर्ष आहे.
कर्ज वितरीत करण्यासाठी, अर्जदाराची पात्रता निश्चित करण्याचे बँक आणि फायनान्स कंपन्या यांचे सर्वसाधारणपणे काही निकष आहेत. यात त्यांच्या धेय्यधोरणानुसार थोडाफार फरक असू शकतो.
*अर्जदाराचे वय 18 ते 60 व्यावसायिकांसाठी 55 वर्षापर्यंत असावे.
*तो नोकरदार किंवा व्यावसायिक असावा.
त्याची हाती येणारे मासिक उत्पन्न किमान 15 ते 25 हजार रुपये असावे.
*कर्ज फेडीची मुदत 3 ते 5 वर्षे
*सिबिल (CIBIL) या पतमापन संस्थेकडे असलेला अर्जदाराचा पतदर्जा (rating) किमान 750 (उच्च दर्जाचे) हून अधिक असावा.
*नोकरदारांना कमाल 15 लाख तर व्यावसायिकांना 30 लाख रुपये वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
आवश्यक कागदपत्रे:
*यासाठी नियमाप्रमाणे अर्ज, फोटो ओळखपत्र , निवासाचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा व फोटो द्यावा लागतो.
*व्यावसायिकांना मागील दोन वर्षांचा लेखपालाने प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला लागतो. क्वचित एखादी व्यक्ती हमीदार म्हणून हवी असेल तर तिची माहिती व फोटो लागतो.
सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर वैयक्तिक कर्ज 48 तासात मंजूर होऊ शकते.
अन्य कर्जाप्रमाणे ते त्याच कारणास वापरले पाहिजे असे बंधन नसते.
कर्ज रक्कम जरुरीप्रमाणे लागेल तशी टप्याटप्याने घेता येते. परतफेड आपणास शक्य होईल असा हप्ता बांधून करता येते.
कर्ज प्रक्रिया:
बँक वित्तीय संस्था यांच्या संकेतस्थळावर भेट देऊन आपण ऑनलाईन कर्ज मागणी करू शकतो. या वेबसाईटवर व्याजदर, प्रक्रिया फी, कर्जरक्कम ,परतफेडीची मुदत याशिवाय अन्य काही खर्च यांची माहिती घेऊन त्यांची तुलना करता येते.
वैयक्तिक कर्जामुळे आपली तात्कालीन गरज झटपट पूर्ण होते. सध्या खाजगी क्षेत्रांतील बँका म्हणजे एचडीएफसी बँक, अक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स श्रीराम गृप यांनी मोठया प्रमाणात वैयक्तिक कर्ज व्यवसायावर ताबा मिळवलेला आहे. याशिवाय झटपट कर्ज देणाऱ्या अनेक मान्यताप्राप्त आणि मान्यता नसलेल्याही अनेक संस्था या बाजारात कार्यरत आहेत.
अशा प्रकारे कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
*आपल्याला किती कर्जाची गरज आहे ते निश्चित करावे.
*कर्ज घेणे कोठून फायदेशीर होईल याचा शोध घ्यावा.
*आपला पतदर्जा तपासून पहावा.
*कर्ज करारातील बारीकसारीक तपशील वाचावा.
*विशेषतः कर्ज मुदतीपूर्वी परत केल्यास काही आकारणी फी द्यावी लागेल अथवा नाही ते तपासावे.
*आपल्याला योग्य अशी मुदत आणि कर्जफेड रक्कम ठेवावी.
*आपली पात्रता, कर्जफेडीची क्षमता, व्याजदर या गोष्टी विचारात घ्याव्यात.
*प्रोसेसिंग फी ची तुलना करावी.
*कर्ज परतफेडीसाठी पुढील तारखेचे धनादेश, किंवा इसिएस (ECS), नच या सारख्या माध्यमातून परस्पर हप्ता कापण्याची सूचना देऊन ठेवावी.
असे कर्ज घेणे ही अनेकांची अपरिहार्यता असते. तरीही अनेक लोक असे आहेत की जे आपले पैसे मुदत ठेवीत कमी व्याजाने ठेवून अधिक व्याजदर असलेले अनावश्यक कर्ज उचलतात. यामुळे आपण आर्थिक नव्हे तर वैचारिकदृष्ट्या मागासलेले आहोत हेच कर्ज होते. ते झटपट मिळत असले तरी याचा व्याजदर अधिक असतो.
त्याहून कमी व्याजदराने आपण खालील मार्गाने कर्ज मिळवू शकतो.
*मित्र नातेवाईक यांच्याकडून पैसे उधार घेऊन
*असलेली गुंतवणूक मोडून
*असलेले सोनेनाणे विकून
*पीपीएफ, पीएफ मधून अंशतः पैसे काढून घेबून
यात व्याज देण्याचा प्रश्न येत नाही आणि गरज तात्काळ पूर्ण होते. असे करण्यास संकोच किंवा कमीपणाचे वाटत असेल, थोडेफार व्याज गेले तरी चालेल अशी विचारसरणी असेल तर खऱ्याखुऱ्या गरजेसाठी काही पर्याय असे-
★मुदत ठेवींवरील कर्ज- आपली मुदत ठेव असलेल्या संस्थेकडून आपल्यास कर्ज मिळू शकते हे कर्ज ठेव रकमेच्या 70 ते 90% असते तसेच त्यावरील व्याजदर ठेव दराहून 1 ते 3% अधिक असतो.
फायदे-
*मालमत्ता न मोडता झटपट कर्ज
*व्याजदर परवडणारा
*कमीतकमी कागदपत्रे
*प्रक्रिया शुल्क नाही.
तोटे
*कर्ज रक्कम आणि परतफेड मुदत ठेवींच्या प्रमाणातच
★क्रेडिट कार्ड
हे एक अल्पमुदतीचे कर्जच आहे. कमी कालावधीसाठी काही रक्कम खर्चास उपलब्ध होते. काही संस्था 6 महिने मुदतीचे बिनव्याजी कर्ज आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देतात.
फायदे
*कमी कालावधीची गरज पूर्ण होते.
*शून्य व्याजदर
*खर्च करण्याची पत वाढते
*नियमितता असल्यास सीबील स्कोर वाढतो
तोटे
*परतफेड न करता आल्यास त्यावर दंड आणि व्याज यामुळे कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची शक्यता.
*त्यामुळे सीबीलवर परिणाम होतो.
*यात छुपे खर्च बरेच असतात.
★सुवर्ण तारण कर्ज
आता जवळपास सर्व वित्तीय संस्था हे कर्ज सहज देतात. यासाठी सोन्याचे दागिने नाणी तारण म्हणून असल्याने हा सुरक्षित कर्जाचा प्रकार म्हणता येईल.
फायदे
*वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत व्याजदर कमी
*चांगल्या सीबील स्कोर आणि निश्चित उत्पन्न असण्याची आवश्यक नसते
तोटे
*परतफेड कालावधी मध्यम जास्तीत जास्त 24 महिने
*तारण सोन्याची किंमत ठरवण्याचे निकष वेगळे
★विमा पॉलिसीवरील कर्ज-
आपल्याकडे असलेल्या अनेक विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकते. पॉलिसी व्हॅल्यू, कालावधी यावर किती कर्ज मिळेल ते ठरवले जाते.
फायदे
*झटपट वितरण
*कमी व्याजदर
तोटे
*या पॉलिसीवर किती कर्ज मिळू शकते ते आपण इन्शुरन्स कंपनीकडे किती रक्कम जमा केली त्यावर अवलंबून असते त्यामुळे नेमके किती कर्ज मिळू शकेल याची चौकशी करावी लागेल.
*कर्जफेड न केल्यास पॉलिसी रद्द होण्याची शक्यता त्यामुळे पॉलिसी घेण्यामागील हेतुलाच धक्का पोहोचण्याची शक्यता.
★पी टू पी प्लॅटफॉर्म-
कर्ज देणारे ऑनलाइन प्लँटफॉर्म उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या अटी शर्तीनुसार कर्ज मिळू शकते.
फायदे
*कर्ज देणारा आणि घेणारा यांच्यातील एकमतानुसार योग्य अटींवर कर्ज मिळण्याची शक्यता
तोटे
*ब्रोकरेज अधिक जाते
*यातील प्लॅटफॉर्म फारसे विश्वासार्ह नाहीत
★शेअर्स तारण ठेवून कर्ज
शेअर, कर्जरोखे, युनिट तारण ठेवून कर्ज मिळू शकते हे कर्ज त्याच्या बाजारभावावर अथवा निव्वळ मालमत्ता मूल्यावर अवलंबून असते.
फायदे
*तात्काळ मिळते, व्याजदर कमी
°आपल्या मर्जीनुसार फेडता येते.
तोटे
*गहाण ठेवलेले शेअर्स, रोखे, युनिट त्यावरील बोजा हाटवल्याखेरीज विकू शकत नाही.
*यदाकदाचित भाव खूप खाली आले तर यातील मार्जिन पैसे किंवा अधिक शेअर्स गहन ठेवून पूर्ण करावे लागते.
★स्थावर मालमत्ता तारण ठेऊन कर्ज :
घर, दुकान, फार्म हाऊस, जमीन अशी स्थावर किंवा व्यवसायाची मशिनरी कच्चा माल, तयार माल यासारखी मालमत्ता तारण ठेवून असे कर्ज मिळते.
फायदे
*याचे पात्रता निकष निश्चित आहेत. मालमत्तेच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 ते 70% रक्कम कर्ज मिळू शकते.
तोटे
*कागदपत्रे तयार करण्यात वेळ जातो.
वैयक्तिक कर्जासाठी वरील पर्याय हे स्मार्ट पर्याय होऊ शकतील. शक्यतो कर्ज घेण्याची वेळच येऊ नये यासाठी -
*खर्चावर नियंत्रण ठेवावे. नियमित बचत गुंतवणूक करावी.
*प्रवासासाठी शेअरिंग किंवा सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा.
*घरातील अनावश्यक वस्तूंची विक्री करावी.
*छोटा मोठा व्यवसाय करून उत्पन्नात भर घालावी.
*येणाऱ्या रकमेचे योग्य नियोजन करावे. यासाठी नियमितपणे जमाखर्च लिहून वेळोवेळी त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यातून मिळालेली शिकवण लक्षात घेऊन योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. यामुळे यदाकदाचित कर्ज घेण्याची वेळ आलीच तर त्यावर आपल्याला नक्कीच मात करता येईल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असून लेखातील मते वैयक्तिक असून कर्ज घेण्यासंदर्भात कोणतीही शिफारस करीत नाहीत)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 23 जून 2023 रोजी पूर्वप्रकाशीत
,
Friday, 16 June 2023
एमआरएफची गरूडभरारी
#एमआरएफची_गरुडभरारी
एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा बाजारभाव किती असू शकतो? सध्या भारतातील प्रमुख शेअरबाजारात नोंदण्यात आलेल्या कंपन्यांची संख्या पाहिली तर मुंबई शेअरबाजारात 5300 कंपन्या असल्या तरी 4000 कंपन्या व्यवहारासाठी उपलब्ध असून यातील 3700 कंपन्यातच व्यवहार होतात. राष्ट्रीय शेअरबाजारात 2200 कंपन्या नोंदवलेल्या असून त्यातील 1900 हून कमी कंपन्यामध्ये व्यवहार होतात. याचाच दुसरा अर्थ असा अनेक कंपयाच्या शेअर्सचे कोणतेही व्यवहार होत नाहीत. सध्या नोंदणी केलेले समभाग हे प्रामुख्याने ₹1,2, 5, 10 चे आहेत. ते पूर्णांकी संख्येतच असावेत आणि त्यात खरेदी विक्री व्यवहार करायचा असल्यास तो किमान 1 शेअर्सचा असावा असे सध्याचे नियम आहेत. शेअरबाजारात असलेल्या कंपनीचा बाजारभाव हा बाजार चालू असताना सातत्याने अनेक कारणांनी बदलत असला तरी तो प्रामुख्याने मागणी पुरवठा यावर अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्वावर ठरून कंपनीच्या कामगिरीमुळे कुठेतरी एका पातळीवर स्थिरावतो. सध्या बाजारात 4 / 5 अंकी संख्येत बाजारभाव असलेल्या अनेक कंपन्या आहेत. बाजाराचे दिशानिदर्शक सेन्सेक्स आणि निफ्टी त्याच्या उच्चतम स्थानांच्याजवळ असून ते नवा उच्चांक निर्माण करण्याची लवकरच शक्यता आहे.यात प्रथमच 6 अंकी भाव नोंदवून एमआरएफ कंपनीने आज 13 जून 2023 रोजी प्रथमच नवी गरुडझेप घेतली आहे. यापूर्वी 8 मे 2023 रोजी याच कंपनीचा फ्युचरमधील भाव एक लाखाहून अधिक नोंदण्यात आला होता त्याची आज रोख (Cash segments) बाजारात त्याची अशी पूर्तता होत आहे.
आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या बालपणी टायरचा गाडा बनवून त्यावर काठी मारून तो दूरवर नेला असेल. टायर सोबत पळण्याचा आणि त्याला पळवण्याचा हा खेळ जरी असला आणि तो आता आपण खेळत नसलो तरी अधिकाधिक पैसे कसे मिळतील त्या मागे धावण्याचा एक नवा खेळ खेळू लागलो आहोत. गेली अनेक वर्षे सचिन, विराट याच्या बॅटवरील एमआरएफ लोगोचे स्टिकर्स आणि विविध माध्यमातून दिसणारा एमआरएफचा मसलमॅन आपल्या अंतर्मनात कुठेतरी आहे. आज एमआरएफ टायर हा जगभरात रबर क्षेत्रातला राजा मानला जातो, ते सर्व प्रकारचे अगदीं विमानांचेही टायर बनवतात. आपल्या संरक्षण खात्यास ते त्यांच्या गरजेनुसार खास प्रकारचे टायर्स बनवून देत आहेत. याशिवाय रबरी खेळणी, कन्व्हेअर बेल्ट, क्रीडा उपकरणे, आच्छादने आणि रंगनिर्मितीच्या क्षेत्रातही ते आहेत. तर जाणून घेऊया एमआरएफची यशोगाथा
टायर म्हटलं की आपसूक डोळ्यापुढे एमआरएफ हे नाव येतं. एमआरएफ ही भारतातली सगळ्यात मोठी टायर निर्माण करणारी, विकणारी आणि निर्यात करणारी कंपनी आहे. या एमआरएफ कंपनीची सुरवात केली के एम मम्मन मप्पिलाई यांनी. सन 1922 साली केरळच्या एका ख्रिश्चन परिवारात त्यांचा जन्म झाला. 9 भावंड असलेला असा त्यांचा मोठा परिवार होता, मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं त्यांच्या वडिलांचा न्यूजपेपर आणि बँकेचा व्यवसाय होता पण स्वातंत्र्यकाळातील आंदोलनांमुळे एका वादात ते सापडले आणि हे व्यवसाय कायमचे बंद होऊन त्यांना जेलमध्ये जावं लागलं. मप्पिलाई यांच्यासाठी हा मोठा धक्का होता, वडिलांना अटक झाल्यावर घरची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. आशा बिकट परिस्थितीत आपलं शिक्षण कसबसं पूर्ण करून के एम मम्मन मप्पिलाई पत्नीसोबत एका झोपडपट्टीत राहू लागले. या झोपडपट्टीत राहत असताना नातेवाईकांकडून उधारीवर पैसे घेतलेआणि फुगे बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. या कंपनीचं नाव त्यांनी ठेवलं मद्रास रबर फॅक्टरी. (सन 1946)
के एम मम्मन मप्पिलाई हे फुगे बनवून स्वतः विकायला जात असे. ते बोलण्यात इतके पटाईत होते कि ग्राहकांना ते रिकाम्या हाताने कधीच जाऊ देत नसत, चांगल्या बोलण्याने ते त्याला मोहित करत असत. सन 1949 पासून त्यांनी रबरी खेळणी विकायला सुरवात केली. एक नवीन ऑफिस सुरु केलं. मप्पिलाई यांनी इथून आपला व्यवसाय विस्तारण्यास सुरवात केली. ते आपल्या एका भावाला भेटले ज्याचा टायरवर रबर चढवण्याचा व्यवसाय होता. सुरुवातीला ते रबर परदेशातून मागवत असत. भावाच्या मदतीने के एम मम्मन मप्पिलाई रबर बनवायचं तंत्र शिकले आणि या क्षेत्रात त्यांनी उडी मारली. एमआरएफने इथून मागे वळून पाहिलंच नाही, ग्राहकांना एमआरएफच्या टायरांची भुरळ पडू लागली. कारण हे टायर टिकावू आणि मजबूत होते. एमआरएफच्या एन्ट्रीने इतर कंपन्यांनी या क्षेत्रातून काढता पाय घेतला. एमआरएफ हा टायर बाजारातला दादा बनला. एमआरएफ टायरला सरकारकडून चांगलं उत्तेजन आणि मदत मिळाली. सन 1967 हे साल महत्वाचं होतं कारण भारताने जगात सर्वाधिक टायर बनवणाऱ्या अमेरिकेलाच एमआरएफचे टायर विकायला सुरवात केली. अनेक कंपन्यांसोबत भागीदारी करून एमआरएफने आपला व्यवसाय वाढवला आणि विदेशातही आपली हवा केली.
भारतीय लोकांची एके काळची स्वप्नातील गाडी मारुतीमध्ये एमआरएफचे टायर होते. आज घडीला भारतात 10 ठिकाणी असलेल्या एमआरएफच्या विविध युनिटमुळे 20 हजार हून अधिक लोकांना रोजगार मिळतोय. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षाअखेर एमआरएफ कंपनीची ओळख अशी सांगता येईल.
*भारतातली सगळ्यात मोठी आणि जगातील दुसरी मोठी टायर उत्पादक आणि निर्यात करणारी कंपनी
*उलाढाल 23008 कोटी
*निव्वळ नफा 738 कोटी
*प्रति समभाग (₹10)उत्पन्न ₹1813/-
*कर्ज भांडवल गुणोत्तर 0.17
*पुस्तकी मूल्य (book value) ₹33085
*शेअरहोल्डिंग प्रमोटर 28% जनता 42% देशी वित्तसंस्था 18% विदेशी वित्तसंस्था 12%
याशिवाय
13 जून 2023 चा
*किमान कमाल भाव ₹ 99150.20 ते ₹ 100439.95
*मागील 52 आठवड्यातील किमान कमाल भाव ₹ 65878.35 ते 100439.95
*बाजारमूल्य ₹ 42408 कोटी
*रोजची सरासरी उलाढाल 7962 शेअर्स
*डिलिव्हरी प्रमाण 33.94%
*बीटा फेक्टर (शेअरच्या बाजारभावात बाजाराच्या निर्देशांकाच्या तुलनेत होणारी हालचाल) 0.75
कंपनीच्या भवितव्याच्या दृष्टीने काही काळजी वाटणाऱ्या बावी
*पुस्तकी मूल्याच्या तुलनेत बाजारभाव अत्यंत कमी
*गेल्या 5 वर्षात उलाढालीत 9% वाढ
*मागील तीन वर्षात निव्वळ नफा 7% हून कमी
*नफ्यातील केवळ 8% वाटा मागील तीन वर्षात शेअरहोल्डर्सना मिळाला.
सध्या शेअरबाजारात 5 अंकी बाजारभाव असलेले काही शेअर्स आणि त्यांचे 13 जून रोजीचे भाव असे-
हनिवेल आटो ₹ 41234
पेज इंडस्ट्री ₹ 38387
नेस्ले ₹ 22393
बॉश ₹ 19060
लक्ष्मी मशीन ₹ 12268
सहा अंकी एमआरएफ शिवाय पाच अंकी भाव असलेल्या मोजक्याच कंपन्या असून या सर्व आघाडीच्या आणि चांगल्याच कंपन्या असल्या तरी त्यांचा भाव 6 आकडी होण्यासाठी अजून बराच कालावधी जावा लागेल.
बाजारात 4 अंकी भाव असलेल्या उदा. लार्सन, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी, रिलायन्स या कंपन्या कदाचित यापूर्वीच 6 अंकी भाव दाखवू शकल्या असत्या परंतू त्यांनी वेळोवेळी बक्षीसभाग (बोनस), हक्कभाग (राईट्स), प्राधान्यभाग (प्रेफ्रंशियल), भाग विभागणी (स्प्लिट) केली आणि आपल्या भागधारकांना मालामाल केले आहे. या गोष्टींचा परिणाम म्हणून त्यांचा बाजारभाव समायोजित झाला आहे. तो सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात आहे, त्यामुळेच या कंपन्यांत सातत्याने मोठी उलाढाल होत असते याउलट एमआरएफ भागधारक फक्त लाभांशच घेत असून त्यांचे भाग भांडवल ₹4.24 कोटी असल्याने वरील कंपन्यांच्या तुलनेत त्यात होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण अत्यंत कमी आहे, तसेच सध्याच्या बाजारभावानुसार मिळणारा लाभांश परतावा 0.2 टक्क्यांहून कमी आहे. अशी वस्तुस्थिती असली तरी दाखवीत असलेला 6 अंकी भाव भांडवल बाजाराशी संबंधित प्रत्येकाने नक्कीच आनंदाने साजरा करायला हवा कारण हा पल्ला गाठणारी ही पहिलीच आणि सध्यातरी एकमेव कंपनी आहे आणि गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत झालेली वाढ ही नक्कीच भुरळ पाडणारी असून या ऐतिहासिक घटनेचे आपण सारे साक्षीदार आहोत.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत. लेखात उल्लेख असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही शिफारस हा लेख करत नाही)
16 जून 2023 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.
Saturday, 10 June 2023
बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना
#बदललेल्या_स्वरूपातील_राष्ट्रीय_पेन्शन_योजना
★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय म्हणून 1 जानेवारी 2004 रोजी लष्करी सेवे व्यतिरिक्त नव्याने नोकरीत रुजू होणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली. ही योजना स्वीकारणे न स्वीकारणे खाजगी संस्थाना ऐच्छिक होते. यात दोन प्रकारच्या योजना आहेत एक कॉर्पोरेटसाठी दुसरी सर्वांसाठी. यापैकी फक्त एकाच प्रकारचे खाते उघडता येत होते आवश्यक असल्यास त्यात बदल करता येतो. व्यक्तींनी नोकरी करीत असताना गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करावी आणि त्यारून उपलब्ध पेन्शन योजना आपल्या गरजेनुसार घ्यावी. थोडक्यात स्वतःच्या निवृत्तीची तरतूद स्वतः करावी असा यामागील दुहेरी हेतू आहे.
★1 जानेवारी 2009 पासून ही योजना सर्व नागरिकांना खुली करण्यात आली आहे. छोटी रक्कम आपल्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवून मोठी रक्कम उभी करावी आणि निवृत्ती नंतर तेव्हा चालू असलेल्या पेन्शन योजना घेण्याचा पर्याय त्यात आहे. या खात्यामध्ये टियर 1 आणि 2 असे दोन खाते पर्याय आहेत. टियर1 हे पेन्शन साठीचे गुंतवणूक खातेअसून टियर 2 बचत खाते आहे, यातील दुसरे खाते उघडले नाही तरी चालते.
★किमान गुंतवणूक वार्षिक ₹ 1000 कमाल मर्यादा नाही.
★18 ते 70 वर्षाच्या व्यक्तीस खाते उघडता येते. अनिवासी भारतीयही खाते उघडू शकतो. योजनेचा किमान कालावधी 5 वर्षे कमाल 57 वर्षे. एक व्यक्ती एक खाते, याशिवाय अटल पेन्शन योजना व्यक्तींना उपलब्ध आहे. जोडीदार अपत्ये याच्यासह संयुक्त खाते उपलब्ध नाही. वारसांची नोंद करता येईल.
★60 पूर्ण झालेल्या वर्षापासून 75 व्या वर्षापर्यंत कधीही खाते बंद करता येते. आवश्यक असल्यास 60% रक्कम एकरकमी काढून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे मात्र किमान 40% रक्कम उपलब्ध पेन्शन योजनेत गुंतवावी लागते. रक्कम काढून घेण्याची सक्ती नाही.
★ एनपीएस योजनेचे संपूर्ण नियमन राष्ट्रीय निवृत्ती नियोयन न्यासाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या पीएफआरडीए या नियामकाचेद्वारे होते, त्यांनी म्युच्युअल फंडा सारख्या काम करणाऱ्या परंतु पूर्णपणे स्वतंत्र असलेल्या वेगळ्या व्यवसायिक पेन्शन फंड मॅनेजमेंट कंपन्यांची या कामासाठी फंड मॅनेजर म्हणून नेमणूक केली गेली असून आपला फंड मॅनेजर कोण असावा ते निवडण्याचे स्वातंत्र्य गुंतवणूकदारास दिले आहे त्याचप्रमाणे कोणताही आकार न घेता आपला फंड मॅनेजर बदलण्याचे स्वातंत्र्यही दिले आहे.
★पीएफआरडीएने मान्यता दिलेल्या कुठल्याही एका व्यवस्थापकाची निवड योजनेच्या सुरुवातीला सभासदाला करता येते. त्याचप्रमाणे अलीकडे केलेल्या बदलानुसार खात्यात अधिक रक्कम जमा असल्यास 2 व्यवस्थापकही नेमता येतात.
★नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ही एक 'परिभाषित योगदान प्रणाली' जिथे आपले योगदान, विविध मालमत्ता - इक्विटी, बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज आणि आपल्या आवडीनुसार वैकल्पिक गुंतवणुकीत गुंतविले जाते. फंड मॅनेजर आणि गुंतवणूक मालमत्ता प्रमाण यात आपल्या मनाप्रमाणे उपलब्ध पर्यायात बदल करता येतो.
★या योजनेचे कार्य म्युच्युअल फंडच्या बॅलन्स योजनेनुसार असेल अशी रचना करण्यात आली होती. तरीही सुरुवातीस प्रयोग म्हणून शेअर्समध्ये 50% अधिक रक्कम गुंतवण्याचे स्वातंत्र्य नव्हते अलीकडे यात बदल करण्यात आला असून आता अधिक लाभ मिळवण्याच्या हेतूने गुंतवणूक विभागणी आपल्या जीवनचक्रानुसार (Life cycle) (Auto choice). जीवनचक्रानुसार, 25%, 50%, 75% शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना तो आता इच्छा असल्यास 75% पर्यंत वाढवता येऊ शकतो. (Active choice) समभाग टक्केवारी वाढल्याने परतावा मिळण्याची शक्यता वाढते.
★अन्य पेन्शन योजनांपेक्षा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे वेगळेपण खालीलप्रमाणे-
*फंड व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी,
*मालक आणि कर्मचारी दोघांनाही करात सवलत,
*बाजाराच्या तुलनेत अधिक परतावा मिळण्याची शक्यता,
*फंड व्यवस्थापनात सुलभतेने बदल.
*व्यावसायिक व्यवस्थापन,
*नियामकांचे नियंत्रण.
*80C खाली मिळणारी अतिरिक्त करसवलत (जास्तीत जास्त ₹200000/-)
★18 ते 70 वर्षाच्या कालावधीच्या आतील वय असलेल्या सर्व निवासी अनिवासी नागरिकांना या योजनेत भाग घेता येतो. विदेशी भारतीय, परदेशी परंतु मूळ भारतीय नागरिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबीय हे खाते उघडू शकत नाहीत.
★नॅशनल सॅक्युरिटी डिपॉझिटरी ली- सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी सर्व खातेधारकांची माहिती अद्ययावत ठेवते. हे खाते बँका वित्तीय संस्थांच्या ठराविक ठिकाणी काढण्याची सुविधा (पीओएस) आहे याशिवाय त्याच्या अँपवरून ऑनलाइन पद्धतीने खाते काढता येईल. अशा कोणत्याही ठिकाणी न जाता एनएसडीएलच्या संकेतस्थळावर जाऊन खाते काढता येते.
*प्रथम व्यक्तीस स्वतःचा पेन्शन रजिस्ट्रेशन अकाउंट नंबर (पीआरएएन) निर्माण करावा लागतो.
*मग त्याच्या मोबाईल क्रमांक आणि इमेलवर संदेश पाठवून खात्री केली जाते.
*यानंतर खातेदार त्यात ठराविक अंतराने रक्कम जमा करू शकतो. एका वेळी किमान ₹500/- वर्षभरात किमान ₹1000/- त्यामध्ये जमा करण्याची कोणतीही कमाल मर्यादा नाही.
*पैसे क्रेडिट कार्डद्वारेही भरता येणारी ही एकमेव गुंतवणूक योजना आहे.
*मुदत संपल्यावर अथवा खाते बंद केल्यावर काही रक्कम (कमाल 60%) परत घेता येते तर उरलेल्या रकमेची उपलब्ध असलेली पेन्शन योजना निवडून त्यात गुंतवणूक करावी लागते. त्या योजनेच्या अटींवर पेन्शन मिळू लागते.
*जर खातेदारांची इच्छा असेल तर पेन्शन योजना खरेदी करून 10 हप्त्यात एकूण रक्कम टप्याटप्याने काढण्याची सोय आहे.
★योजनेत तीन वर्ष पूर्ण करणाऱ्या सभासदास त्जमा केलेल्या रकमेच्या 25% रक्कम योग्य कारणासाठी (लग्न, घरबांधणी, आजारपण शिक्षण) काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाच वर्षांच्या अंतराने जास्तीत जास्त एकूण तीन वेळा अशी रक्कम गरजेनुसार काढता येऊ शकेल आणि ती पूर्णपणे करमुक्त असेल. यामुळे मोठा आकस्मिक खर्च भागवता येऊ शकेल.
★यातून मिळणारा परतावा निश्चित नसला तरी योग्य पद्धतीने गुंतवणूक करून करबचत होऊन भांडवलवृद्धी होण्याची शक्यता जास्त आहे.
योजनेची उपयुक्तता लक्षात घेता अधिकाधिक लोकांनी यात गुंतवणूक करून आपल्या भावी आयुष्याची तरतूद करावी.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळात असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक समजावीत)
9 जून 2023 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.
Saturday, 3 June 2023
प्रवासविमा
#प्रवासविमा (Travel Insurance)
विमा हा विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यातील करार आहे आणि जोखीम व्यवस्थापन या मागील उद्दिष्ट आहे. करारातील अटीशर्तीनुसार त्याची आर्थिक भरपाई केली जाते. जीवनाविमा आणि सर्वसाधारण विमा असे इयाचे मुख्य प्रकार आहेत. स्वातंत्र्यापूर्वी अनेक खाजगी विमा कंपन्या होत्या यानंतर विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण होऊन सरकारी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली. आर्थिक उदारीकरणाच्या काळात हे क्षेत्र खुले करून यात थेट परकीय गुंतवणूक आली. सुरुवातीला हे प्रमाण 26% होते असून अलीकडे हे प्रमाण 74% पर्यंत वाढवले आहे त्याचप्रमाणे उपकंपनीच्या माध्यमातून 100% परकीय गुंतवणूक करण्यास परवानगी आहे. यामुळे याक्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. सध्या 57 वेगवेगळ्या कंपन्या हा व्यवसाय करीत असून हे क्षेत्र झपाट्यानं वाढत आहे. याचे नियमन करण्यासाठी आयआरडीए हे स्वतंत्र नियामक आहेत. पूर्वी पर्यटन या दृष्टीने प्रवास सहसा केला जात नसे आता पर्यटन करणे हा अन्न वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन ह
याप्रमाणे मानवी जीवनाचा भाग झाले आहेत. यातील मनोरंजनाच्या विविध उपप्रकारात पर्यटनाचा समावेश करता येईल.
आपल्या साचेबद्ध व्यस्त जीवनातून थोडा मोकळा वेळ काढून पर्यटन केल्याने व्यक्ती ताजीतवानी होऊन त्याला आपले नियमित कार्य करण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळते. अशा प्रकारे प्रवास करत असताना काही अनपेक्षित संकटे येऊ शकतात. उदा पैशांचे पाकीट हरवणे, कपड्याची बॅग हरवणे, पासपोर्ट हरवणे, अचानक गंभीर आजारी पडणे यासारखी, संकटे सांगून येत नाहीत अशावेळी प्रवासविमा घेतला असता थोडा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास प्रवास विमा उपयोगी पडतो. आता आपल्या देशातील अनेक सर्वसाधारण विमा कंपन्यानी अशा प्रकारच्या प्रवासविमा योजना सर्वाना उपलब्ध करून दिल्या आहेत.
★प्रवासविमा -प्रवासविमा म्हणजे अशी विमा योजना जी आपल्या प्रवासात येऊ शकतील अशा संभाव्य अडचणींवर मात करण्यास अथवा त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करून देण्याची हमी ग्राहकास देते.
या अडचणी खालील प्रकारच्या असू शकतात
*प्रवासात तातडीने उपचार करण्याची गरज जसे अपघात होणे, पक्षाघात, हृदयविकार याचा झटका येणे,
*चेक इन करण्यात उशीर होणे, बॅग हरवणे,
*पासपोर्ट हरवणे,
*प्रवास किंवा सहल रद्द होणे
याची भरपाई पैशांच्या स्वरूपात केली जाते.
या योजनेत कोणत्या परिस्थितीत कशी भरपाई केली जाईल याचा करारात स्पष्ट उल्लेख असतो. अशा योजना देशांतर्गत प्रवास किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध आहेत आंतरराष्ट्रीय प्रवासातही जगातील विशिष्ट भागासाठी खास योजना उपलब्ध आहेत. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या योजना असून त्यातही आंतरदेशीय आंतरराष्ट्रीय किंवा विशिष्ठ विभाग यासाठी स्वतंत्र योजना आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणताना त्यात त्यांच्या वयानुसार दावे वाढण्याची शक्यता विचारात घेता वैयक्तिक ग्राहकांसाठी कमी पर्याय उपलब्ध आहेत.
कधीतरी पर्यटनास जाणारे आणि वारंवार जाणारे अशी वेगळी विभागणी असून दोघांनाही विशिष्ट प्रवासापुरते मर्यादित अथवा सर्वच प्रवासासाठी असे गरजेनुसार पर्याय उपलब्ध आहेत. वारंवार प्रवासाच्या विमा योजना एक वर्ष मुदतीच्या आहेत. एकच ट्रिप च्या योजना त्या विशिष्ट दिवसाच्यासाठीच सुरक्षा कवच देतात.
या योजना ज्याप्रमाणे व्यक्तीला घेता येतात त्याचप्रमाणे व्यक्तींच्या गटासही मिळतात.
सर्वसाधारणपणे एकाच ठिकाणी पर्यटनास जाणाऱ्या व्यक्तीच्यासाठी पर्यटन कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी खरेदी करतात किंवा काही मोठ्या कंपन्या त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने वारंवार प्रवास कराव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्त्यांच्या मालकाकडून घेतल्या जातात.
उच्च शिक्षणासाठी सध्या अनेक विद्यार्थी परदेशात जातात तेथे वैद्यकीय उपचार प्रचंड महागडे असल्याने खास त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आहेत. ज्या त्यांना परवडू शकतील असा प्रीमियम देऊन उपलब्ध आहेत. होणाऱ्या मनस्तापाची देखील काही कंपन्या भरपाई देतात.
प्रवासविमा देणाऱ्या भारतातील आघाडीच्या खाजगी कंपन्या अशा-
1. Tata AIG Travel Insurance
2. Apollo Munich Travel
Insurance
3. Religare Travel Insurance
4. Bajaj Allianz Travel Insurance
5. HDFC ERGO Travel Insurance
सर्वसाधारणपणे वर दिलेल्या संभाव्य अडचणी या योजनेत कव्हर होतात याशिवाय अपघात आणि काही कायदेशीर देयता निर्माण होत असतील तर त्यापासून योजनेतून संरक्षण मिळते. विमा कंपन्या त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी अधिकाधिक ग्राहकाभिमुख होऊन योजनेत थोडेफार बदल करून ग्राहकांच्या सोयीसाठी कल्पक योजना बाजारात आणीत आहेत.
असे असले तरी-
काही परिस्थितीत आपले दावे नाकारले जाऊ शकतात, उदाहरणार्थ
*डॉक्टरांनी मनाई केली असताना प्रवास करीत असताना निर्माण झालेले दावे.
*मुद्दामहून केलेला धोकादायक प्रवास त्यातून निर्माण झालेले दावे.
*युद्धजन्य परिस्थिती नैसर्गिक आपत्ती यातून निर्माण झालेले दावे नाकारले जाऊ शकतात.
पॉलिसीद्वारे मिळणारे सुरक्षा कवच हे त्यात उल्लेख केलेल्या परिस्थितीस अनुरूप असते. यासाठी निश्चित केलेली रक्कम ही आंतरदेशीय प्रवासासाठी रुपयात तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी डॉलर या चलनात असते. एकाच घरातील सर्वजण एकत्रित प्रवास करणार असल्यास त्यांना प्रत्येकाची वेगळी पॉलिसी न घेता पूर्ण कुटूंबासाठी एकच पॉलिसी घेता येऊ शकते.
पर्यटन करणे जितके आनंददायी आहे तितकेच ते जोखमीचेही आहे याची जाणीव ठेवून ग्राहकांनी आपली गरज आणि आर्थिक क्षमता ओळखून आपल्याला योग्य आणि आवश्यक अश्याच योजनेचा स्वीकार करावा. यात उल्लेख केलेल्या कंपन्या / योजना संदर्भ म्हणून आहेत त्या शिफारस म्हणून न समजता अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून यासंबंधात निर्णय घ्यावा.
©उदय पिंगळे
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळात पदाधिकारी असून लेखातील मते वैयक्तिक समजावीत)
अर्थसाक्षर डॉट कॉम वर 2 जून 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)