Friday, 30 September 2022
मृत्युपत्र अपरिहार्य आवश्यकता भाग 2
#मृत्युपत्र_अपरिहार्य_आवश्यकता भाग 2
याशिवाय-
★भारतीय करार कायदा कलम 17 नुसार त्याची नोंदणी करणे आवश्यक नसले तरी नोंदणी करणे केव्हाही चांगलेच आहे.
★मृत्युपत्र संयुक्तपणे बनवता येत असले तरी स्वतंत्र बनवावे.
★यासाठी यातील तज्ञ व्यक्ती आणि वकील या दोघांची मदत घ्यावी. तज्ञ व्यक्ती आपल्या अपेक्षा त्यात येतात की नाही याची काळजी घेण्यासाठी तर वकील आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून भविष्यात कोणत्या अडचणी येऊ शकतील यादृष्टीने त्यातील तरतुदी, वाक्यरचना कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत की नाही हे पाहण्यासाठी असावा.
★मृत्युपत्राचा निर्माता आणि 2 साक्षीदार यात एक डॉक्टर असेल तर उत्तम यांनी प्रत्येक पानावर सह्या कराव्यात. शक्यतो त्या एकाच वेळी एकमेकांसमोर केल्या तर ते केव्हाही चांगले.
★मृत्युपत्राची मुळप्रत सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये, आपल्या वकिलाकडे व्यवस्थापक नेमला असल्यास त्याच्याकडे किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
★माहिती असल्यास किंवा नसल्यास अशी माहिती मिळवून त्यात अगदी थोडक्यात असा घराण्याचा इतिहास लिहावा. आयुष्यात उपयोगी पडलेल्या व्यक्तींचा उल्लेख कृथार्थथेने करावा. भविष्यात काही अडचण आल्यास कोणाकडून मार्गदर्शन घ्यावे याचा उल्लेख असावा. असे सुचवण्यामागे मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असून त्यास समाज घटकांची उपयुक्तता पटवून द्यावी असा व्यापक हेतू आहे. असेच करायला हवे असे नाही.
★या संबंधातील वादविवादांच्यामध्ये संबंधित न्यायालयाने मृत व्यक्तीच्या स्थानी आपण आहोत असे समजून सारासार विचार करून या विषयी आपला निर्णय द्यावा अशी कायद्याची अपेक्षा आहे.
मुंबई ग्राहक पंचायतीने या विषयावर एक छोटी पुस्तिका बनवली होती यात किमान प्राथमिक माहिती आणि संदर्भासाठी मृत्युपत्राचा एक नमुना दिला आहे सध्या या पुस्तिकेची छापील प्रत उपलब्ध नाही. याची सॉफ्ट कॉपी कुणाला हवी असल्यास माझ्याकडून मागून घ्यावी. त्याचाच आधार घेऊन पूर्वी सुचवलेल्या नमुन्यात कालानुरूप योग्य ते बदल करत मृत्युपत्राचा नमुना कसा असावा ते येथे देत आहे.
मृत्युपत्र (नमुना)
★मी खाली सही करणार -
नाव: ×××
राहणार: ×××
पूर्ण पत्ता: ×××
व्यवसाय: ×××
मोबाईल क्रमांक: ×××
वय:××× वर्षे
★प्रास्ताविक: या भागात घराण्याचा इतिहास, आपल्या जडण जडणघडणीत /अडीअडचणीत मदत करणाऱ्या/ भविष्यात मार्गदर्शन होईल अशा व्यक्तींचा थोडक्यात कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा. असे न करताही मृत्युपत्र बनवता येईल.
★माझ्या पश्चात माझ्या संपत्तीचे वाटप विनातंटाबखेडा व सुलभरितीने व्हावे या हेतूने स्वखुशीने व संतुलित मानसिक अवस्थेत असताना माझ्या वाट्यास आलेल्या वंशपरंपरागत मालमत्तेचे / स्वकष्टार्जित मिळकतीचे मी स्वतःच्या इच्छेने खालीलप्रमाणे मृत्युपत्र (Will) करून ठेवीत आहे.
★मालमत्ता निर्मितीचे मार्ग: माझी सर्व मालमत्ता मला माझ्या वाट्यास आलेल्या वडिलोपार्जित मिळकतील भाग,माझ्या नोकरीच्या / व्यवसायाच्या उत्पन्नातून निर्माण झालेली आहे, पगार /मानधन / व्यवसायातील नफा/ गुंतवणुकीतून मिळणारे व्याज, लाभांश, भांडवली नफा, मिळणारे घरभाडे हे माझ्या उत्पन्नाचे साधन आहे या सर्व स्वकष्टार्जित आणि वारसाहक्काने माझ्या वाट्यास आलेल्या मालमत्तेची माझ्या मनाप्रमाणे विल्हेवाट करण्यास पूर्ण मुखत्यार आहे.
★मृत्यूपत्रातील लाभधिकारी:
माझे कुटुंबातील खालील व्यक्ती या मृत्यूपत्राचे लाभाधिकारी आहेत.
पत्नी: नाव ×××
व्यवसाय; ×××
वय: ×××
पत्ता ×××
मोठा मुलगा / मुलगी: नाव ×××
वय ×××
व्यवसाय ×××
पत्ता ×××
त्याच्या जोडीदारविषयी माहिती
त्यांच्या अपत्यांची माहिती
मुलगा/ मुलगी: नाव ×××
वय ×××
व्यवसाय ×××
त्याच्या जोडीदाराची माहिती
त्याच्या अपत्यांची माहिती
मुलगा/ मुलगी: ×××
याच्या सह/ शिवाय अन्य कुणा व्यक्तीस/ संस्थेस किंवा स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या कौटुंबिक ज्ञासास मालमत्तेतील सर्व अथवा काही भाग द्यायचा असल्यास त्यांचा पूर्ण तपशील द्यावा त्याचप्रमाणे असे करण्याचे पटेल असे कारण त्याची शक्यतो कोणास वाईट वाटणार नाही अशा पद्धतीने मांडणी करून सांगावे किंवा कोणतेही कारण न देताही असे लिहू शकता.
★माझी स्थावर जंगम मिळकत खालीलप्रमाणे:
स्थावर मालमत्ता
1)राहत्या जागेचा तपशील घर/ फ्लॅट
2)शेतजमीन/ फार्महाऊस संपूर्ण तपशील
3)पडीक जमीन तपशिलासह
4)अन्य घर/ फ्लॅट लीजने दिले असल्यास त्याचा तपशील
5)गोडाऊन/ ऑफिस/ व्यापारी गाळा याचा तपशील.
6)अन्य स्थावर मालमत्ता
जंगम मालमत्ता
1. बँक/पतपेढी खाती तपशीलवार माहिती
*बँकेचे नाव
शाखा
खाते प्रकार
खातेक्रमांक
IFSC
विशिष्ट दिवशी शिल्लख असलेली रक्कम
₹
अन्य तपशील
सहधारक
नॉमिनी
अन्य बँका पतपेढी यातील खात्याची वरील पद्धतीने माहिती.
यातील कोणती खाती कशासाठी प्रामुख्याने वापरली जातात याचीही माहिती द्यावी.
2 शेअर्स:
★ब्रोकिंग फार्मचे नाव,पत्ता, ट्रेडिंग कोड
★डिपॉजीटरी / डिपॉजिटरी पार्टीसीपंटचे नाव, खाते क्र
विशिष्ठ दिवशी खात्यात असलेल्या शेअर/ बॉण्ड/ इनवीट/ रिटस/ इटीएफ यासारख्या मालमत्तेचा तपशील, बाजारमूल्य.
याचप्रकारचे अन्य खाते असल्यास त्याचा तपशील
3.मुदत ठेवी
बँक/ पतपेढी/ कंपनी येथील मुदत ठेवींचा संपूर्ण तपशील
शाखेचे नाव
खाते क्रमांक/FDR No
Amt
मुदतपूर्ती दिनांक
या सर्व गुंतवणुकीत त्याच्या व्यवहार्यतेनुसार तपशिलात बदल होऊ शकतो. याचा वर्षातून एकदा आढावा घेऊन 31 मार्च अखेरीस असलेला तपशील माझ्या वैयक्तिक डायरीत वेगळा लिहून ठेवीन.
4 सोने इतर मौल्यवान वस्तू:
तपशील प्रकार, वजन, वस्तू कायम वापरात आहे की लॉकरमध्ये
यातील तपशिलात फरक पडण्याची शक्यता आहे/ नाही तरीही 31 मार्च रोजी आढावा घेऊन लिहून ठेवीन.
5.अन्य गुंतवणूक त्याच्या तपशिलासह
*पोस्टाच्या योजना (NSC, MIS, TD, SSY इ)
*वरिष्ठ नागरिक योजना (SCSS)
*प्रधानमंत्री वयवंदना योजना (PMVVY)
*सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी योजना (PPF)
*विमा संलग्न बचत योजना (ELSS)
*खाजगी गुंतवणूक, अन्य योजना
*राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS)
*उधार म्हणून दिलेले पैसे
*म्युच्युअल फंड योजना डी मॅट खाते वगळून
योजनांची नावे
फोलिओ क्र
युनिट संख्या
बाजारमूल्य
*क्रेप्टो करन्सी मधील गुंतवणूक तपशील
*कमोडिटी करन्सी यातील गुंतवणूक तपशील
*या उल्लेख नसलेल्या अन्य योजनांचा तपशील
भविष्यातील गरजा, गुंतवणूक प्राधान्य आणि कर नियोजनयानुसार आवश्यक बदल करून वर्षांतून त्यांचा आढावा घेऊन नोंद ठेवली जाईल. त्यामुळे जंगम मालमत्ता तपशिलात फरक पडेल यातील काही गोष्टी वगळण्यात येतील तर काही नव्याने केल्या जातील.
★या सर्व माझ्या नावावर अस्तीत्वात असलेल्या निर्माण होणाऱ्या सर्व स्थावर जंगम मालमत्ता माझ्या पश्चात
माझी पत्नी (नाव)××× यांना मिळाव्यात
दुर्दैवाने ती नसल्यास मुलगा/मुलगी (नाव) ××× आणि मुलगा/मुलगी (नाव) ××× यांना सम / विषम प्रमाणात
मिळाव्यात
अथवा याशिवाय अन्य व्यक्ती / संस्था (नाव) ××× याना संपूर्ण अथवा काही प्रमाणात मिळाव्या.
यात लाभार्थींचा उल्लेख त्यांना मिळू शकणाऱ्या लाभासह / लाभशिवाय कारणासह करावा. सदर लाभार्थीनी आपल्या मर्जीनुसार त्याचा उपभोग घ्यावा.
★श्री. नाव ××× पत्ता ×××याना या मृत्युपत्राचे व्यवस्थापक म्हणून नेमले असून त्यांनी आणि / अथवा मृत्यूपत्राचे लाभार्थी म्हणजेच (त्यांची नावे) यांनी अथवा त्यांच्या वारसांनी यात व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे संपूर्ण अधिकार मी त्यांना देत आहे.
★मी यापूर्वी मृत्यूपत्र केलेले नाही/ किंवा मी यापूर्वी ×××या तारखेस केलेले मृत्युपत्र रद्द करीत आहे सबब सदरचे मृत्युपत्र हे अखेरचे मृत्युपत्र समजण्यात यावे.
मृत्युपत्र धारकाची सही
पूर्ण नाव ×××
स्थळ ×××
दिनांक ×××
आमचे देखत श्री (नाव) ×××यांनी त्यांच्या मृत्युपत्रावर सही केली असून त्यांचे देखत आम्ही साक्षीदार म्हणून
1(नाव) ×××
आणि
2(नाव) ×××
आमच्या सह्या केल्या आहेत.
साक्षीदार 1.×××
सही
राहणार ×××
साक्षीदार 2.×××
सही
राहणार ×××
याप्रमाणे आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपले मृत्युपत्र बनवून यातील जाणकार आणि वकील यांचे त्यावरील मत घ्यावे. कायद्याने आवश्यक नसले तरी डॉ कडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे, नोंदणी करावी. याची प्रत नोंदणी अधिकारी/ व्यवस्थापक/ ट्रस्टी कंपनी यांच्याकडे अथवा स्वताकडे सुरक्षित ठेवावे मृत्यूपत्र हा महत्वाचा दस्त असून ते तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करणे केव्हाही चांगले!(संपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 30 सप्टेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत
Friday, 23 September 2022
मृत्युपत्र अपरिहार्य आवश्यकता भाग 1
#मृत्युपत्र_अपरिहार्य_आवश्यकता भाग 1
मृत्यु या विषयाची चर्चा लोक अजिबात करत नाहीत तर मृत्यपत्र बनवणं ही खूप दूरची गोष्ट झाली. वास्तविक जन्माला असलेला जीव एक ना एक दिवस मरणारच त्यामुळेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तो अपरिहार्य आहे परंतू याबाबत आपण अत्यंत बेफिकीर आहोत.
मृत्युपत्र या शब्दाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यास इच्छापत्र असे म्हणावे असे अनेकजण सुचवतात परंतु ते प्रत्यक्षात आपले मृत्यूपश्चात इच्छापत्र असते. इच्छा अनेक असू शकतात त्या पूर्ण होऊ शकतील नाही होणार पण मृत्यू अटळ असल्याने त्यास मृत्युपत्र असेच म्हणणे योग्य होईल वास्तविक आपल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक जीवनात यावर सखोल चिंतन केलेले आहे असे असूनही आपण त्यावर चर्चा करणे टाळतो. ही एक अशुभ गोष्ट आहे अशी समजूत असल्याने त्यावर काही बोलले जात नाही. मृत्युपत्र म्हणजे अल्प जीवनास आमंत्रण असाही यामागे गैरसमज आहे. अज्ञान, भीती आणि स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास यामुळे अनेकदा ते करण्याचे टाळले जाते.
योग्य प्रकारे केलेले मृत्युपत्र त्यात उल्लेखलेल्या संपत्तीचे सुयोग्य वाटप करण्याचे सर्वात सर्वात सोपे अधिकृत साधन आहे. मृत्युपत्र बनवणे त्याची नोंदणी करणे सक्तीचे नाही तरीही ते योग्य प्रकारे कायद्यास अपेक्षित तरतुदीनुसार केले असल्यास आणि नोंदणी केली असल्यास त्यातील लाभार्थीच्या नावे संपत्तीचे हसत्तांतरण सुलभ होते. अनेक मालमत्ता प्रकारात नॉमिनी नेमण्याची तरतूद आहे. यामुळे चल अचल संपत्तीवर नाव लागू शकते परंतु यातील नॉमिनी हाच त्या संपत्तीचा अधिकारी नसून तो केवळ विश्वस्त असतो जर मृत्यूपत्र बनवले नसेल तर त्यामुळे मृत व्यक्तीच्या कायदेशीर हक्कात कोणताही बदल नाही त्यामुळे त्याच्या वारसांचे हक्क अबाधित रहातात. यातील चल/अचल मालमत्ता हसत्तांतर करण्यास अडचण येत नाही मात्र अचल मालमत्ता विक्री च्या वेळी ती सर्व बाजूने कायदेशीर हक्क असलेली (क्लिअर टायटल) आहे ना? त्यात अन्य कुणाचे हितसंबंध आहेत का ते पाहावे लागते. अशा वेळी मृत्यूपत्र उपयोगी पडते. कायद्यानुसार नॉमिनी या संपत्तीचा फक्त विश्वस्त असतो जर मृत्युपत्र बनवून संपत्तीचे वाटप केले नसेल तर हिंदू वारसा कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार मालमत्तेची वाटणी होते. भारतातील बहुतेक व्यक्तींना लागू होणारा हिंदू विवाह कायदा हा शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांना लागू आहे यानुसार एखादी व्यक्ती मृत्युपत्र न करता निधन पावल्यास त्याची वाट्यास येऊ शकणारी परंपरागत मिळकत आणि स्वकष्टार्जित मिळकत असल्यास त्यावर निधन पावलेल्या व्यक्तीसाहित सर्वांचा सारखा हिस्सा असतो. पारंपरिक मिळकतीचा आपल्याला मिळालेल्या वाट्याचा आणि स्वकष्टार्जित मालमत्तेचा विनियोग व्यक्ती आपल्या मर्जीनुसार कमीअधिक करू शकते अन्यथा ती जोडीदार आणि मुले (यात मुलगा किंवा मुलगी, तसेच मुलीची विवाहित अविवाहित स्थिती, त्याचप्रमाणे औरस, अनौरस, दत्तक असा कोणताच भेदभाव न करता) यामध्ये समान विभागणी केली जाते. जर त्या व्यक्तीस जोडीदार/ मुले नसतील तर प्रथम भाऊ अगर त्यांच्या वारसास असे कोणी नसल्यास बहीण अगर बहिणीच्या मुलांना ही संपत्ती वारसाहक्काने मिळते.
मृत्युपत्राद्वारे व्यक्ती त्याचा पूर्ण अधिकार असलेली वारसाहक्काने वाटप पूर्ण होऊन मिळालेली आणि स्वकष्टार्जित संपत्ती कशी वाटली जावी याबद्धल निर्देश देऊ शकतो. याची अंमलबजावणी मृत्यूनंतर होते. ती करण्याचे व्यवस्थापकीय अधिकार आपल्याला वारसास, त्रयस्थ व्यक्ती किंवा अशा प्रकारचे काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या कंपनीस देता येतात. त्यात ही संपत्ती किंवा तिचा भाग नेमका कुणाला आणि किती टक्के मिळावा यात काही कमीअधिक करायचे असेल किंवा एखाद्या संस्थेस द्यायचे असेल तर तशी तरतूद करता येते. वारस नसलेल्या अन्य त्रयस्थ व्यक्तीसही ही संपत्ती देता येईल किंवा स्वतंत्र कौटुंबिक न्यास स्थापन करून त्या न्यासासही देता येईल. मात्र संस्था किंवा न्यास यास संपत्ती देताना अशा मृत्यूपत्राची नोंदणी करणे सक्तीचे आहे. आपल्याला भविष्यात काय होईल ते माहिती नसल्याने शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच ते बनवणे योग्य ठरते. त्यामुळे त्यात केलेल्या तरतुदी या वादाचे मुद्दे ठरण्याची शक्यता कमी राहाते.
मृत्युपत्र बनवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी -
★आपल्या हक्काची वारसा हक्काने मिळालेली, स्वकष्टार्जित संपत्ती यांचे वाटप कसे व्हावे याची व्यवस्था करता येते. व्यक्तीने निर्माण केलेल्या, व्यवसाय भागीदारी, एकल कंपनी, कंपनी, ट्रस्ट यांना स्वतंत्र अस्तीत्व असल्याने त्यातील तरतूदीनुसार त्याची व्यवस्था लावता येईल.
★विवाहित महिलेस लग्नात माहेर आणि सासरच्या लोकांनी केलेले नातेवाईकांकडून वेळोवेळी भेट मिळालेलेले दागिने हे कोणीही कितीही प्रमाणात दिले असले0 तरी त्यावरील सर्वार्थाने तिचीच मालकी असते त्यास स्त्रीधन असे म्हणतात, सदर महिलेशिवाय अन्य कोणीही म्हणजे तिचा नवरा, आईवडील अथवा मुले यांचा त्यावर कोणताही अधिकार नसल्याने त्याचे वाटप कसे करावे ते ठरवू शकत नाही.
★मृत्यूपत्राचा निश्चित असा नमुना नाही तरी त्यात कोणकोणत्या गोष्टीचा कसा उल्लेख करावा याचे नमुने उपलब्ध आहेत आपल्या वकीलाशी चर्चा करून त्याचा तपशील निश्चित करावा. स्थावर जंगम मालमत्तांचा तपशील व्यवस्थित लिहावा.
★आपण किंवा आपला जोडीदार यापैकी कुणाला तरी आधी जावे लागणार याचा विचार करून जोडीदाराची पुरेशी तरतूद करावी किंवा त्यास अधिक मालमत्ता द्यावी त्याचप्रमाणे त्याच्या निवासाची सोय करावी.
★मुलांपैकी कुणाला कमी अधिक संपत्ती द्यायची असेल त्याचे सुयोग्य कारण लिहावे. म्हणजे गैरसमज होणार नाहीत. अन्य व्यक्ती संस्था यांना काही द्यायचे असल्यास त्याचाही उल्लेख कारणासह करावा. वारसा व्यतिरिक्त कुणाला काही द्यायचे असल्यास होता होईतो आपल्या हयातीतच त्यांना द्यायच्या गोष्टी देऊन टाकाव्यात. यावरून काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
★अविवाहित किंवा पुनर्विवाहित व्यक्तीने त्याच्या विवाहापूर्वी बनवलेले मृत्युपत्र विवाहानंतर आपोआपच रद्दबातल ठरते
★मृत्युपत्र बनवले आहे सांगावे आपले वारस हेच सर्व ठिकाणी नॉमिनी म्हणून असतील तर सोईचे होते परंतु त्यात काही बदल करायचा असल्यास आणि तो वारसाहक्काशी सुसंगत नसल्यास त्यातील तरतुदी जाहीर करू नयेत.
★मृत्युपत्र बनवण्याच्या दिवशी काही आजार असले आपली मानसिक स्थिती उत्तम असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरकडून घ्यावे. दोन साक्षीदार शक्यतो आपल्यापेक्षा वयाने लहान असलेले निवडून त्यांनी वाचून त्यावर साक्षीदार म्हणून सही केली आहे अशी अपेक्षा आहे. काही विवाद निर्माण झाल्यास साक्षीदारास न्यायालय साक्ष देण्यासाठी पाचारण करू शकते.
★जरी ते प्रथम करत असाल तरी त्यास अखेरचे मृत्युपत्र म्हणावे जर आधी बनवून त्यात बदल केला असल्यास सुधारित मृत्युपत्रावर अखेरचे मृत्युपत्र असे म्हणून आधीच्या पत्राचा उल्लेख करून चालू मृत्युपत्र हेच अंतिम मृत्यूपत्र असल्याचा उल्लेख करावा.
★यातील एखादा लाभार्थी आपल्या मृत्यूपूर्वी दुर्दैवाने मरण पावल्यास त्यास मिळणारी संपत्ती किती प्रमाणात कुणास देण्यात यावी याचा स्पष्ट करावा.(अपूर्ण)
©उदय पिंगळे
Saturday, 17 September 2022
पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत 3
पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3
★असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे डाऊन पेमेंट देण्यासाठी पैसे नाहीत अशा परिस्थितीत आम्ही आमची गुंतवणूक मोडू का?
■नाही तुमच्याकडे डाऊन पेमेंट देण्यास पैसे नसतील तर घर घेण्याचा विचारही करू नका. माझी यासंबंधी निश्चित अशी मतं आहेत.
*तुमच्या उभयतांच्या (नवरा बायको) वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट रकमेचे घर घ्या.
*तुमच्याकडे घरच्या किमतीच्या 40% रक्कम स्वताकडे तयार असायला हवी
*गृहकर्ज 20 वर्षाहून अधिक कालावधीचे नको.
*सर्व प्रकारच्या कर्जाचा एकत्रित EMI कापून जाऊन हातात येणाऱ्या मासिक प्राप्तीच्या 30% हून अधिक नको.
हे चारही निकष पूर्ण होत असतील तेव्हाच घर घेण्याचा विचार आपण करा अन्यथा भाड्याने राहा.
★कोविडनंतर मला मिळणारा निव्वळ परतावा बाजार पुरेसा वाढूनही अपेक्षित नाही, त्यामुळे मी नाखूष आहे मी काय करू? माझी सर्व गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे दीर्घकाळ थांबायची माझी तयारी आहे.
■तुमची सर्व गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे म्हणजे बाजारात व्यवहार होतात, कसे करायचे याची तुम्हाला माहिती आहे. अशी माहिती नसेल तर व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची सेवा तुम्ही घेऊ शकता त्याला फी देऊ शकता. तुम्ही नाखूष आहात याचा अर्थ काय? तुम्हाला खुश करणं हे बाजाराचं काम नाही. बाजार आपली दिशा ठरवेल. नाखूष असायला अनेक कारणं कायम सापडतील. इंडेक्स 12% रिटर्न देतोय आणि तुमचा फोलिओ 11% च वाढला म्हणून तुम्ही नाखूष. इंडेक्स 12% वाढला आणि तुमचा फोलिओ 13 % वाढला पण तो 25% का वाढला नाही म्हणून तुम्ही नाखूष व्हाल, इंडेक्स 20% वाढला पण तुम्हाला 12% रिटर्न मिळाला तुम्ही अधिक नाराज व्हाल. अशी कारणं वेगवेगळी असू शकतील. तुमची खरेदी चुकीच्या वेळी झाली असेल. एवढं मात्र निश्चित की तुमचा परतावा चालू बाजार परातव्यातून खूप अधिक फारसा कधी असणार नाही.
★अशा वेळी सल्लागाराशी मदत घ्यावी किंवा त्याच्याशी चर्चा करावी का?
■तुम्ही स्वतःच व्यवस्थापन करत असाल तर अशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही त्याच्याशी किंवा एखाद्या योजनेशी तुलना करून पहा ना? तुम्हाला 12% परतावा मिळतोय आणि त्याला 18% मिळत असेल तर स्वतःच मॅनेज करण्यापेक्षा त्याच्याकडे जाऊ शकता.
★एका जेष्ठ नागरिकांनी इथे एक प्रश्न विचारला आहे की त्याचं वय 63 आहे. या वयात एक कोटी रुपये मिड कॅप, स्मॉल कॅप शेअरमध्ये मी गुंतवू का? हे पैसे मला पुढे किमान 10 वर्षतरी लागणार नाहीत.
■याचा विचार करतानाही तुमचं भांडवल किती तेही पाहिलं पाहिजे तुमचे येणारे उत्पन्न दरवर्षी 5 लाख असेल तर तुमच्या निवृत्तीच्या दृष्टीने दीड कोटीं मालमत्ता त्याच्याकडे असणे जरुरीचे आहे. तुमच्याकडे 10 कोटी असतील तर ही चैन परवडू शकेल. पण जर 2 कोटी असतील तर तुमची मालमत्ता तुम्हाला पुरेल एवढीच आहे मग हे धाडस तुम्ही करू नये त्याने कदाचित तुम्ही अडचणीत येऊ शकाल. आपण पहाल रतन टाटा, अजिझ प्रेमजी 80 च्या जवळपास आहेत त्यांची बहुतेक गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे पण ती रक्कम प्रचंड असल्याने त्यात पडणाऱ्या भावातील फरकाने त्यांना काही फरक पडत नाही. वय महत्वाचं नाही असं मी म्हणत नाही पण एकूण किती पैसे आहेत ते अधिक महत्वाचं आहे.
★एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की आपल्या गुंतवणूक संचाचे परीक्षण कधी करावं? त्याचे निकष नेमके काय असावेत.
■वर्षातून एकदा तरी परीक्षण केलेच पाहिजे. जेव्हा कधी मोठा खर्च जसे मुलीचे लग्न, परदेशी मिळालेली शिक्षक संधी अशा प्रसंगात खूप जास्त खर्च होतो त्यावेळी त्याचं परीक्षण करावं. मी नेहमी याची तुलना शाळेत घेत असलेल्या पालकसभेशी करतो. माझ्या मुलीच्या शाळेत अशी सभा असायची तेव्हा मी तिच्या क्लास टीचरना मी त्या सभेस यायलाच हवं का? विचारायचो ते नेहमीच तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणायचे. बहुदा त्यांच्या तिच्याविषयी तक्रारी नसाव्यात पण त्यांनी तुम्ही यायलाच हवं सांगितले असतं तर मला जावं लागलं असतं. वर्षातून एकदा आपल्या गुंतवणुकीवर नजर टाकून त्याच्याबद्धल तक्रारी आहेत अशा अपेक्षित परतावा न देणाऱ्या गुंतवणुकीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्य गुंतवणूक तशीच ठेवावी. एका निश्चित दिवशी वर्षभरात एकदा तरी असे करावे आणि त्याच तारखेचे पुढील वर्षी पालन करावे म्हणजे त्यात एकसमानता राहते.
★मुलांच्या उच्च शिक्षणाची तरतूद आपण कशी करू शकतो?
■तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची ही जबाबदारी आहे की त्यांनी तुम्हाला छोटी मुले असतील तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी एकादी योजना त्याचप्रमाणे तुमच्या निवृत्ती नियोजनासाठी एक तरी योजना सुचवायला हवी. किती वर्षांचा कालावधी आहे ते पाहून गुंतवणूक मालमत्तांची समभाग आणि कर्जरोखे यांची विभागणी सुचवावी. तुमच्या मुलांना त्याच्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे पत्रक त्यात दाखवलेली वाढ ही कशी झाली समजावून सांगावे. त्यांच्या विचारांना चालना द्यावी. त्यांनी काही मागणी केली तर यातून पैसे काढून घेऊया का विचारावे. तो नक्कीच नको म्हणेल. तुम्ही जबाबदारीने वागत असाल तर तेही जबाबदारीने वागतील. आपोआपच तो अर्थसाक्षर होईल. सल्लागाराने योग्य अशी योजना बनवून आपल्याला समजावून द्यायला हवी. आपलं उद्दिष्ट मुलांचे उच्च शिक्षण त्यासाठी ही योजना आपल्या निवृत्तीसाठी एक योजना हवीच हवी. प्रत्येक कुटूंबाच्यासाठी त्याच्या आवश्यकतेनुसार ती वेगळी असेल यासाठी अमुक अमुक हा एकच पर्याय नसेल. आपल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणूक केली जाईल, वाढवली जाईल आवश्यक असल्यास स्थगित केली जाईल पण काढून घेतली जाणार नाही. कर नियोजन करण्याच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे.
★मालमत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने एसआयपी करावी की एकरकमी गुंतवणूक करावी तसेच भविष्यात एसडब्लूपी करायची असेल तर त्यातून किती रक्कम काढून घ्यावी.
■मी काही जरी याबद्दल सांगितले तरी तुम्ही ऐपतीप्रमाणेच गुंतवणूक करणार. तुम्हाला दरमहा पगार मिळत असेल तर मासिक एसआयपी करायला हरकत नाही, पण जर एखादा शेतकरी असेल तर विशिष्ठ काळातच गुंतवणूक करता येईल तो एकरकमी गुंतवणूक करू शकेल व्यवसाय करीत असणारी व्यक्ती रोज काही पैसे बाजूला ठेऊ शकेल. प्रत्येक व्यक्तीनुसार गुंतवणूक पद्धत बदलावी लागेल. शेतकरी दररोज एसआयपी करू शकत नाही.
★विविध मालमत्तेत विभागणी कशी केली जावी?
■हे पण व्यक्तिव्यक्ती नुसार बदलेल. तुमचं उत्पन्न, उपलब्ध साधने,पर्याय, जबाबदाऱ्या या सर्वानुसार ही विभागणी बदलत राहील याचे एक ठोस उत्तर कुणालाच देता येणार नाही.
★एक अंतिम प्रश्न आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकेल अशी एखादी योजना आपल्याला सांगता येईल का?
■इंग्रजी rich आणि welth असे दोन शब्द आहेत त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. रिच खूप आहेत होतील पण त्यांचे मार्ग मर्यादित आहेत ते बंद झाले तर सगळंच डळमळीत होईल पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल जर welthy असाल तर उत्पन्नाचा एक मार्ग बंद झाला तर तुम्हाला चिंता वाटणार नाही त्याला तुम्ही पर्याय शोधू शकाल. तेव्हा तुम्ही कोण आहात, तुमचे उत्पन्न, गरजा, उदिष्ट, जबाबदाऱ्या याचा पूर्ण विचार करून योजना बनवणे आणि त्या पार पाडणं आणि welthy बनणं हेच तुमचं अंतिम उद्दिष्ट हवं.
अतिशय रंगतदार झालेल्या या चर्चेत सरांनी बारीक बारीक गोष्टी विचारात घेऊन त्यावरील आपली मतं मांडली. स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवानिमित्त या मुलाखतीचे आयोजन इक्विटीवाला डॉट कॉम यांनी हा कार्यक्रम ऑगस्ट 2022 रोजी आयोजित केला होता यात व्यक्त करण्यात आलेल्या विचारापैकी घर हा विषय सोडून सर्वच विचारांशी मी सहमत आहे.
घर घेण्याचा विचार करताना सर असे म्हणतात-
*तुमच्या उभयतांच्या (नवरा बायको) वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट रकमेचे घर घ्या.
*या किंमतीचे मुंबईत काय पण उपनगरात घर मिळणे अशक्य आहे.
*तुमच्याकडे घरच्या किमतीच्या 40% रक्कम स्वताकडे तयार असायला हवी.
*ही रक्कमही किमान 25 लाख होईल ते जमण्यास बराच कालावधी लागेल.
*गृहकर्ज 20 वर्षाहून अधिक कालावधीचे नको.
*जास्तीत जास्त रकमेचे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज घ्यावे असे माझे ठाम मत आहे. यामुळे गृहकर्ज देणाऱ्यांना फायदा होत असला तरी हे सर्वात कमी दराने मिळणारे कर्ज असल्याने शिल्लक पैशाची स्मार्ट गुंतवणूक केल्यास भांडवल निर्माण होऊन कर्ज एकरकमी फेडताही येऊ शकते. ते कसे? हे मी वेगळ्या लेखातून समजावून दिले आहे. आधीच मोठ्या झालेल्या या लेखाच्या विस्तार भयामुळे अधिक लिहीत नाही.
*सर्व प्रकारच्या कर्जाचा एकत्रित EMI कापून जाऊन हातात येणाऱ्या मासिक प्राप्तीच्या 30% हून अधिक नको.
*कर्ज अधिक घेणार म्हणजे हातात उत्पन्न कमी येणार ते 40 ते 50% असावेत हे गृहकर्जाचे निकष आहेत त्यामुळे सुरवातीस थोडा त्रास झाला तरी नंतर ठीक होते असा अनुभव आहे.
हे चारही निकष पूर्ण होत असतील तेव्हाच घर घेण्याचा विचार आपण करा अन्यथा भाड्याने राहा.
असे ठरवले तर अनेक काळ भाड्याच्याच घरात राहावे लागेल. हे मुद्दे सोडले तर अतिशय उत्तम विचार असलेले व्याख्यान म्हणजे काय असा समृद्ध करणारा अनुभव मिळाला तो आपल्याला मिळावा त्या हेतूने या सर्व गोष्टी पूर्ण स्वातंत्र्य घेऊन तीन भागात लिहू शकलो. तूर्तास विराम घेतो.(संपूर्ण)
©उदय पिंगळे
Friday, 9 September 2022
पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 2
#अर्थात
#पी_व्ही_सुब्रमण्यम_यांच्याशी_बातचीत_भाग_2
★आपण वेगवेगळे उत्पनाचे मार्ग कसे निर्माण करू शकतो.
■याचा संबंध आपल्या रोखता प्रवाहाशी आहे जर तुम्ही उत्पन्न मिळवत असाल तर भविष्याचा विचार संपत्ती निर्माण करूनच त्याद्वारे वेगवेगळे उत्पनाचे मार्ग निर्माण होऊ शकता. संपत्ती ही शेअर्समधून निर्माण होऊ शकेल त्यातून तुम्हाला कदाचित फारसा डिव्हिडंड मिळणार नाही पण त्यातून भविष्यात मूल्यवृद्धी झालेली दिसून येईल. याशिवाय एसआयपी करून त्यात वाढ करूनही आपल्या संपत्तीचे मूल्य वाढू शकेल काही कारणाने एसआयपी करणे जड जात असेल तर स्थगित करा पण पैसे काढून घ्यायचा विचारसुद्धा मनात आणू नका जमेल तशी त्यात वाढ करा तरच दीर्घकाळात संपत्तीत आणि त्यामुळे उत्पन्नातही वाढ होईल.
★आपली खर्च करण्याची पद्धत बदलूनही आपण बरीच बचत करू शकतो याबद्दल काय सांगाल?
■ हे तुमच्याशिवाय कोणी ठरवू शकत तुम्ही तरुण असाल तर कोणतीही जबाबदारी नसेल तर अधिक पैसे वाचवू शकाल आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करू शकाल तेव्हा या वयात अधिकाधिक शिल्लक कशी राहील यावर लक्ष केंद्रित करा जर निवृत्तीच्या जवळ आला असाल तर उपलब्ध साधनातून अधिकाधिक परतावा कसा मिळवू शकतो याचा विचार करा. हे सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहे प्रत्येकाला आयुष्यात वेगवेगळ्या टप्यावर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या सारख्याच नसतात.
★शेअरबाजार अशाश्वत आहे म्हणून लोक त्याकडे पाठ फिरवतात त्यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष बाजारात यावे म्हणून काय प्रयत्न करायला हवेत.
■अशाश्वतीच्या भीतीने तुम्ही बाजारापासून लांब रहात असाल तर महागाईवर मात करणारा परतावा आपण कधीच मिळवू शकणार नाहीत. तुम्हाला आयुष्यभर कष्टच करावे लागतील तुम्ही कधीही निवृत्तीचा विचार करू शकणार नाही. पारंपरिक गुंतवणूक तुम्हाला जोखिमरहित परतावा देईल पण त्यातून तुमच्या संपत्तीत वाढ होणार नाही. तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल तर तुम्हाला ही चैन परवडेल अन्यथा बचत करून जमा झालेल्या पैशातून गुंतवणूक करावी लागेल जोखीम घ्यावीच लागेल.
पूर्वी राजेशाही होती तेव्हा राजवाडा, अंतःपुर, सैन्य, खजिना राजाकडे असायचा यात बदल झाल्यावर गावातील एखादं दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीकडे या गोष्टी असायच्या अनेकांना त्याचे आकर्षण वाटायचं याच अनुकरणातून चैनच्या गोष्टी आपल्याकडे आहेत म्हणजे आपण श्रीमंत झालो अशी भ्रामक कल्पना अनेकांच्या मनात रुजली आहे. आज जगात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक व्यक्ती अत्यंत साधेपणाने रहातात हे लक्षात घ्या वास्तविक ते इतकं कमावत आहेत की त्याच्या दृष्टीने आपण ज्याला चैन समजतो ती करणं ही अगदीच क्षुल्लक बाब आहे.
बाजारात तुम्ही गुंतवणूक करणार तर कशी करणार, स्वतः करणार की कुणाची मदत घेणार प्रत्यक्ष करणार की अप्रत्यक्षपणे करणार यात बदल होऊ शकतो पण संपत्तीत वाढ करायची असल्यास अशी गुंतवणूक तुम्ही टाळू शकत नाही.
★आजकाल घोटाळे वाढत आहेत अशा परिस्थितीत चांगला सल्लागार कसा शोधावा?
■घोटाळे, फसवणूक, गैरव्यवहार आधीही होत होते आताही होतात फक्त आता ते जास्त रंगवून सांगितले जातात. या गोष्टी ताबडतोब फ्लॅश होतात, जगभर पसरतात त्याला मिठमसाला लावला जातो, त्यास कधी कधी जातीय रंगही दिला जातो. नकारात्मक गोष्टी पटकन मनाची पकड घेतात त्याच गोष्टी वारंवार फॉरवर्ड केल्या जातात अनेकदा अनेकांकडून पुनः पुन्हा त्या आपल्याकडे येत राहतात. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करावं तरीही एखादी कंपनी एखादा फंड संशयास्पद वाटत असेल तर त्यातून बाहेर पडावं आपल्या बाबतीत असं होणारच नाही का हे सांगता यायचं नाही फ्रेंक्लीन, अक्सिसमध्ये काही घोटाळे झाले जे झालं ते निश्चित चांगलं झालं म्हणता येणार नाही पण याचा अर्थ गुंतवणूकदारांचे सर्व पैसे घेऊन फंड मॅनेजर पळाले असा नाही. आपल्याला या बातम्यांनी ताण येत असल्यास बातम्या पाहू नका, समाज माध्यमापासून दूर राहा. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलात की आपोआपच सर्व सकारात्मक होईल.
★शेअर आणि म्युच्युअल फंड याशिवाय अजून असे काही गुंतवणूक प्रकार आहेत का ज्यात गुंतवणूक केली जावी.
■असे अनेक पर्याय आहेत पण त्यात खूप गुंतवणूक करावी लागणार तुलनेत त्यातून फार परतावा मिळणार नाही त्यामुळे ते सामान्य लोकांसाठी नाहीत भरपूर संपत्ती असल्यास तुम्ही अनेक घरं घेऊ शकता त्यांची देखभाल करू शकता परतावा मिळण्यासाठी अतिदीर्घकाळ थांबू शकता. यासाठी खूप मोठी रक्कम लागते जी आपल्याकडे नसते तेव्हा एसआयपी करणे वाढवणे संयम बाळगणे शांत राहणे हेच आपल्यापुढे असलेले पर्याय आहेत.
★गुंतवणूक कधीही करावी असं म्हणतात तसच ती काढून कधी घ्यायची याबद्धलची एखादी योजना आपण सांगू शकाल.
■माझे यासंबंधीचे विचार वेगळे आहेत. अशी कोणती योजनाच असावी असे मला वाटत नाही, काही गुंतवणूक विशिष्ठ उद्देशाने केलेली असते ती चालूच ठेवावी बंद करू नये. या उद्दिष्ट ठेवलेल्या गरजा पूर्ण करणारा फंड वगळून बाजार चांगला आहे मिळणारा परतावा उत्तम आहे अशा परिस्थितीत काही पैसे काढून घेऊन आपल्या सुप्त इच्छा जसे वर्ड टूर, मोठा स्क्रीन असलेला टी व्ही अशासारखे खर्च करावेत म्हणजे घरच्यांचही समाधान होईल आणि खात्री होते की यातून काहीतरी मिळतंय फक्त असं करत असताना आपण फक्तच चैन करतोय अस होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक अडचणीत आहात, कोणी आजारी पडलंय यासाठी आपले पैसे काढण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. यामुळे गुंतवणुकीचे मूळ उद्देश सफल होत नाहीत यासाठी आपल्याकडे इमर्जन्सी फंड हवा, मेडिकल इन्शुरन्स हवा.
★निवृत्तीसाठी गुंतवणूक करण्यास नेमकी कधी सुरुवात करावी.
■या प्रश्नामुळे मला निवृत्तीवर मी लिहिलेल्या पुस्तकाची आठवण झाली. त्यात मी एखाद्याला 40 व्या वर्षी निवृत्ती घ्यायची असल्यास त्याने 22 व्या वर्षांपासून रोज ₹40/- असे महिना ₹1200/- म्हणजेच वर्षाचे ₹14400/- वाचवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता किंवा अमेरिकन मानांकनाप्रमाणे उत्पन्नाच्या 10% भागाची गुंतवणूक करायला हवी. ती दरवर्षी उत्पन्नाप्रमाणे वाढवत न्यावी ही रक्कम घर घेणं, लग्न करणं, शिक्षणासाठी वापरणं अशा कारणांसाठी वापरू नये. याची सुरुवात नियम म्हटला तर पहिल्या पगारापासून करावी परंतु अनेक कारणांनी नोकरी लागल्या लागल्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतात त्यासाठी 3 / 4 महिने आपल्या प्रियजनांना भेटी देण्यात सर्व पगार असाच संपून जातो. हा कालावधी सोडून लगेच गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली पाहिजे.
★मृत्यपत्र याविषयी आपलं काय मत आहे ते कधी बनवावं?
■अनेकजण अस समजतात की मी मृत्युपत्र बनवलं की मी लगेच मरेन मी माझं मृत्यूपत्र 20 वर्षांपूर्वी बनवलं मी न मेल्याने माझ्या घरातील नीलोकांचा कोणताही फायदा झाला नाही यातील गमतीचा भाग सोडला तर जेव्हा कधी तुम्ही स्थावर मालमत्ता घ्याल त्यानंतर लगेच बनवावे. कारण स्थावर मालमत्तेची विक्री सदर मालमत्ता टायटल क्लिअर असणे जरुरीचे असते. अन्य ठिकाणची इतर मालमत्ता काही अटींची पूर्तता केल्यावर नॉमिनीच्या नावावर वर्ग केली जाते. मात्र स्थावर मालमत्तेच्या संदर्भातील खरेदी विक्री व्यवहार त्यामुळे होऊ शकत नाहीत नाहीत त्यासाठी मृत्युपत्राचा उपयोग होतो. या अनुषंगानेच मृत्युपत्राच्या संबंधीत असलेल्या दाव्याची संख्या गेली अनेक वर्षे सातत्याने वाढत आहे. त्याच कारण ते योग्य रीतीने बनवलेल नाही. योग्य आर्थिक सल्लागार, वकील यांची मदत घेऊन ते रजिस्टर केल्यास सहसा कायदेशीर अडचणी येत नाहीत त्यासाठी येणारा जास्तीत जास्त खर्च फक्त ₹ 9000/- एवढाच येईल. तो वाजवी आहे.
★म्युच्युअल फंड गुंतवणूक थेट करावी की मध्यस्थाची मदत घेऊन?
■जर तुम्ही या गोष्टी स्वतः करता येत असतील तर करू शकता. तुम्ही गावी चालला आहात. जर तुम्ही फिट असाल तर आपली बॅग प्लॅटफॉर्मवरून स्वतः घेऊन जाऊ शकता पण समजा तुम्हाला ताप येईल असं वाटतंय तर तुम्ही अन्य कोणाची मदत घेऊ शकता अगदी तसच आहे हे त्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. प्रत्येक वेळी सल्लागाराची जरूर असते असं नाही जेव्हा जरूर असेल तेव्हा सल्लागाराची मदत घ्यावी. तुमचा सल्लागार तुमच्यासाठी काय करतो तो तुम्हाला कसं मार्गदर्शन करतो तुमचा गुंतवणूक संच यथायोग्य बनवून देऊन तुमचा जीवन विमा, आरोग्यविमा, करदेयता याची काळजी घेतो का? या सर्वांवर याचे उत्तर अवलंबून आहे. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 9 सप्टेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Friday, 2 September 2022
पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग1
#पी_व्ही _सुब्रह्मण्यम_यांच्याशी_बातचीत_भाग_1
पी व्ही सुब्रमण्यम हे भारतातील अग्रगण्य प्रशिक्षक असून त्यांनी आर्थिक नियोजन या विषयावर पुस्तकेही लिहली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून नुकतीच 75 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने आपण स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव साजरा करीत आहोत परंतु आजही भारतातील 70% जनतेस आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचे? हे जर आपण जाणून घेतले तरच भविष्यात आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ. बरेचदा आपण ध्येयनिश्चिती करत असतो, परंतु त्यापर्यत पोहचू शकत नाही. आपल्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा आपण सर्व गोष्टी स्वतःच करण्याचा प्रयत्न करीत असतो. स्वतःच घर, स्वतःची गाडी, विविध खर्च जसे आरोग्यावरही खर्च, मनोरंजन इतर खर्च इत्यादी. ही पात्रता येण्यासाठी बरच काही ज्ञान मिळवावं लागतं, त्याचा योग्य तो वापर करावा लागतो. याच विषयावरील चर्चेनेही आपला जीवनक्रम/ प्राधान्यक्रम बदलू शकतो. सरांचे ज्ञान, एवढ्या वर्षाचा विविध क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता त्यातून महत्वाची माहिती मिळणे हे स्वाभाविकच होतं. या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी -
★त्याच्या मनात स्वातंत्र्य या विषयी कोणते विचार आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ■त्यांच्यामते, स्वातंत्र्य संकल्पनाच खूप व्यापक आहे, महात्मा गांधींनी या सर्वाचा विचार खूप खोलवर केला होता. फक्त आर्थिक नव्हे तर प्रत्येक गोष्टींपासून त्यांना स्वातंत्र्य मिळवायचं होतं. स्वावलंबन हे त्याचं महत्वाचं सूत्र होतं. ते स्वतः सूतकताई करत कापड विणत, त्यांनी पाळलेल्या बकरीचे दूध ते स्वतः काढत असत, साफसफाई ते स्वतःच करत असत, फारसे आजारी पडत नसत. आपण व्यवस्थित राहिलो, श्रम केले, योग्य वेळी योग्य आहार घेतला तर आजार होणार नाही. समस्या या आपण स्वतःच ओढवून घेत असतो असं ते म्हणत. हे थोडं मजेशीर वाटत असलं तरी यामागील तथ्य तपासून पाहू माझं डोकं दुखत असेल तर मी तेच धरून बसतो. त्याचा विचार करताकरता मी पडून पाय मोडला तर माझे लक्ष डोकं दुखतंय त्यावरून उडून पायावर केंद्रित होतं. जेव्हा तुम्ही मला बरं नाही म्हणता तेव्हा मला कोणताच विकार होऊ नये यासाठी मी काय केलं याचा विचार प्रथम करावा. मी जर व्यवस्थित काम केलं असतं, योग्य आहार घेतला असतापैसे , व्यायाम केला असता तर ही वेळच माझ्यावर आली नसती तेव्हा मी आजारी आहे असं म्हणायची आपल्याला शरम वाटायला हवी. आता लोकांना अस वाटतं माझ्याकडे आहेत त्यामुळे मी आजारी पडल्यास उत्तम हॉस्पिटलमध्ये भरती होऊ शकतो, वेगळा सेवक ठेऊ शकतो, आचारी ठेवू शकतो, ड्रायव्हर बाळगू शकतो. लोकांना समस्या मुळातून सोडवावी असे वाटतच नाही. त्यांना व्यायाम करा सांगणारा डॉक्टर आवडत नाही. त्यांनी तुम्हाला ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे सांगणारा डॉक्टर आवडतो जणू काही त्यांना असलेले विकार त्यांच्या प्रतिष्ठेत भर घालणारे आहेत असे वाटते. तेव्हा स्वातंत्र्य या संकल्पनेचा विचार करताना मला हवं असणार स्वातंत्र्य, हे नक्की कशापासून हवंय? ताणापासून हवंय, आजारापासून हवंय? अनारोग्यापासून हवंय? अस पूर्ण सामाजिक स्वातंत्र्य, मानसिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य हवंय अस यातून अभिप्रेत आहे. एक गोष्ट आहे आणि दुसरी नाही याचा अर्थ आपण कोणावरतरी अवलंबून आहोत. तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे स्वतः निश्चित करायचं आहे.
★आता तुम्ही आरोग्याचा विषय काढलात पण बरेचदा आपण पैसे मिळवण्यावर लक्ष केंद्रित करीत असतो त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा आरोग्य आणि आरोग्यविमा या कडे आपण कसं पहाता? याची आवश्यकता का आहे? याबाबत काही सांगू शकाल?
■आपल्याकडे थोडे जास्त पैसे आले की आपल्या आहाराच्या सवयी बदलतात. जगभरात याबद्दल काय होते ते मला माहिती नाही पण भारतात पैसे असलेला माणूस दिवसांतून सातवेळा खातो प्रत्यक्षात त्याची खरी गरज दोनदा जेवण आणि एकदा न्याहारी अशी फक्त तीन वेळाच आहे. तेव्हा आपलं आरोग्य राखण्यासाठी तीन वेळाहून अधिक खाण्याची गरज नाही जर तुम्ही दिवसभरातून 6/ 7 वेळा खात असाल तर हळू हळू ते कमी करा. तेव्हा आहार कमी आणि तुलनेत व्यायाम अधिक केलात तर आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. तरीही काही झालंच तर आरोग्यविमा आहे याचा अर्थ तुमचं बिल तुम्ही नाही तर अन्य कोणीतरी भरणार आहे पण तुमच्या वेदना तुम्हालाच भोगाव्या लागतील त्या कोणी घेऊ शकत नाही. तेव्हा आरोग्याची काळजी घ्या सकस आहार घ्या, प्रोसेस फूड टाळा नियमित व्यायाम करा. हेल्थ इन्शुरन्स तुमच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित आहे. तो असावा पण वापरला जावा अशी इच्छा बाळगू नका. आपल्याला इन्शुरन्स वापरावा न लागणे म्हणजे आपण खुश (वाढलेला प्रीमियम आपल्याला अलीकडे नाराज करत असतो तो भाग वेगळा) लोकांचा प्रीमियम मिळत राहून क्लेम आला नाही म्हणजे आपली इन्शुरन्स कंपनी खुश. माझ्या टर्म इन्शुरन्सचा हप्ता फुकट जावा अशी मी प्रार्थना करत असतो. माझा इन्शुरन्स वापरला न जाणे म्हणजे मी जगणे, इन्शुरन्स असल्याने आपल्या मागे काय होईल याबद्दल निश्चितता तर क्लेम न आल्याने कंपनी यांना आनंद मिळेल.
★इन्शुरन्स नक्की किती रकमेचा असावा?
माझ्या दृष्टीने प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तो कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणारा असावा. मेडिकल इन्शुरन्स ही माझ्या दृष्टीने अतिशय विरोधाभास असलेली अत्यंत हास्यास्पद संकल्पना आहे. ज्याला जरुरी नाही त्याला तो सहज मिळतो आणि ज्याला खरोखरच जरुरी आहे तो त्याच्या आवाक्यातील नाही. ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्याच्या दृष्टीने यासाठी केला जाणारा खर्च तुलनेने किरकोळ असतो तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्याच्या दृष्टीने काही खर्च करायची वेळ आली तर तो आपली मोठी कमाई हरवून बसतो. ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत त्याला 30 लाख हॉस्पिटल बिल ही किरकोळ गोष्ट असते पण ज्यांच्याकडे 2 कोटी रुपये आहेत त्याला हेच तीस लाख खूप जास्त वाटतील तर अनेकांच्या दृष्टीने ही न परवडणारी रक्कम होईल. तेव्हा आपण जितका हप्ता सहज भरू शकतो तेवढे टॉपअपसह किमान कव्हर असावे हे सरसगट सर्वांसाठी निश्चित रक्कम ठरवणे कठीण आहे. जरी तुमच्याकडे तुमच्या मालकाने दिलेला आरोग्यविमा असला तरी स्वतःचा विमा असणे जरुरीचे आहे.
★राखीव निधी म्हणून किती रक्कम असावी आणि ती कुठे ठेवावी.
■याचंही उत्तर व्यक्तीनुसार बदलेल. ही गरज नेमकी किती असेल याचा तुम्हीच अंदाज घेऊ शकता. तेवढी रक्कम तुम्ही रोखीने घरात, सेव्हिंग खात्यात, मुदत ठेवीत विभागून ठेऊ शकता. पैशाच काम पैसाच करू शकतो, तुम्हाला तुमची मुले किंवा आईवडील यांच्याकडून आणीबाणीच्या प्रसंगी पैसे मिळू शकतील याची खात्री असेल तर तुमच्याकडे स्वताकडे पैसे नसतील तर चालू शकतं. या सर्व शक्यता तपासून पहा. म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात पैसे ठेवण्याचा अनेकजण सल्ला देतात पण हे पैसे मिळण्यास 1 ते 3 दिवसाचा कालावधी लागू शकतो हे समजून घ्या. अशाच व्यक्ती किंवा नातेवाईक यांच्यावर विश्वास ठेवा जे तुम्हाला नक्की उपयोगी पडू शकतील. नाहीतर तुम्हाला जेव्हा पैसे हवे असतील तेव्हा हे लोक वेगवेगळी कारणे पुढे करतील. असे लोक कोण हे अनुभवाने तुमच्या लक्षात आले असेलच किंवा मोठ्या रकमेचे लिमिट असलेल्या क्रेडिट कार्डनेही ही गरज भागू शकते. त्याचा वापर आपले मित्र नातेवाईक यांच्यासाठीही अडीअडचणीसाठी करता येईल.
★गुंतवणूक काढून घेता येईल असे कोणते सहज गुंतवणूक पर्याय आपण सांगू शकाल?
■सर्वच गुंतवणूक सहज काढता यावी अस नाही नाहीतर त्यातून सुयोग्य परतवा मिळणार नाही. तेव्हा आपली गरज ओळखून तेवढीच रक्कम सहज मिळेल अशी ठेवावी. ही गरज व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते. सहज परत मिळणाऱ्या गुंतवणुकीतून फारसा परतावा मिळू शकत नाही हे सत्य आहे.(अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 2 सप्टेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Posts (Atom)