Friday, 26 August 2022

काही भविष्यवेधी उद्योग

#काही_भविष्यवेधी_उद्योग माझ्या शेअरबाजार एक चक्रव्यूह या लेखात येत्या काही वर्षात ज्या उद्योगांना उज्वल भवितव्य आहे असे काही उद्योग सुचवले होते,उदा. इलेक्ट्रिक वाहने, ड्रोन उद्योग, ऍनिमेशन, सौरऊर्जा या विषयावर माझ्या मित्राच्या डॉ मुलाशी चर्चा करीत असताना काही अजून वेगळ्या वाटा लक्षात आल्या काही वर्षांपूर्वी स्मार्टफोनचे सध्या आपण करीत असलेले वापर कुणी सुचवले असते तरी ते अशक्य वाटले असते. जगात असे काही लोक आहेत त्यांनी सातत्याने नाविन्याचा ध्यास घेतलेला असतो. आपल्या मनातही येणार नाहीत अशा कल्पना ते करू शकतात प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड खर्च ते करू शकतात. या कल्पना सर्वात आधी करून साध्य करता आल्या तर या कल्पनेचे उद्योगात रूपांतर करून त्याचा सर्वाधिक फायदा मिळवता येतो. याचा संबंध भविष्यात बाजार कसा विकसित होईल, त्यासाठी काय करावं लागेल आणि याचा सर्वाधिक फायदा कोण करून घेईल यासारख्या गोष्टींवर अवलंबून आहे. 20 वर्षांपूर्वी आज ज्या पद्धतीने मोबाईल क्रांती होऊन अगदी सामन्यातील सामान्य माणसापर्यंत मोबाईल पोहोचला आहे, यूपीआयने कोणत्याही अँपवरून क्षणार्धात पेमेंट करता येऊ शकेल या गोष्टी स्वप्नवत होत्या. ओएनडीसीच्या माध्यमातून आज B2B आणि B2C व्यवहार पारदर्शक पद्धतीने भारतात कुठूनही कोठे येत्या महिन्याभरात होऊ शकतील. आज सेमीकंडक्टर निर्मितीच्या क्षेत्रात तैवान आघाडीवर आहे उत्पादक, दर्जा आणि दर याबाबत ते आपले वर्चस्व टिकवून आहेत. जर चीनने तेथे आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला तर याचे दूरगामी परिणाम सर्व जगावर होतील. कोणत्या उद्योगांना उज्वल भविष्य आहे याचा अंदाज, बाजारात कोणत्या उद्योगांचे भाव जोरात आहेत आणि त्या प्रकारात येणाऱ्या स्टार्टअप उद्योगांची संख्या वाढतेय का त्यावरून बांधू शकतो. अनेक चर्चांचे केंद्रबिंदू असे उद्योग बनतात यातील काही उद्योग असे- 1.उडणाऱ्या गाड्या- यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी अशा गाड्या अस्तित्वात आल्या आहेत. अनेक कंपन्यांनी त्याचे नमुने बनवून त्याच्या चाचण्या घेतल्या आहेत. उडणाऱ्या, ड्रायव्हर नसलेल्य, तरीही विनाअपघात इच्छित स्थळी नेणाऱ्या गाड्या ही फार दूरची गोष्ट नाही. जगभरात अनेक कंपन्या अशा गाड्या तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यावरील संशोधन कार्यावर करोडो डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. यातील सर्वात ओठा खर्च यासाठी लागणाऱ्या ऊर्जा साठ्यावर आहे. त्यासाठी लागणाऱ्या बॅटरीज कमी वजनाच्या आणि शक्तिशाली कशा बनतील यादृष्टीने संशोधन चालू आहे यात अन्य पर्यायांच्या साहाय्याने अशा गाड्या तासंतास कशा उडत राहतील यादृष्टीने संशोधन चालू आहे. सध्या या गाड्या 20 मिनिटं उडू शकतील यास यश आले आहे. 2 रेस्टॉरंटचे संपूर्ण यांत्रिकीकरण: जेव्हा आपण एखाद्या उपहारगृहात जाऊ तेव्हा आपली ऑर्डर घेणे. तो पदार्थ बनवणे या गोष्टी माणसे न करता यंत्रमानव करतील. पदार्थ तयार करणं तो गिर्हाईकाला बसल्या जागी आणून देणे. त्याची होम डिलिव्हरी देणे ही कामे यंत्रमानव करेल. 3.दुय्यम बाजाराची जागा खाजगी कंपन्यांनी घेणे: एखादी कंपनी जर सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन केल्यास त्यांना कमी खर्चात भांडवल मिळते, कमी दराने कर्ज मिळू शकते याशिवाय आयकारात सवलत मिळू शकते यातून मिळू शकणारा नफा भवितव्य असलेल्या खाजगी उद्योगात गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जोखीम स्वीकारणारे गुंतवणूकदार या पद्धतीने गुंतवणूक करत असतातच. यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे असे गुंतवणूकदार स्वतंत्रपणे आपल्या अटी उद्योगाशी संमत करून गुंतवणूक करतील. यापूर्वी अशी गुंतवणूक होत असलीच तरी भविष्यात यात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. ही गुंतवणूक शेअर बाजाराशी स्पर्धा करू शकेल. 4 कारखान्यात बनवलेली तयार घरे: भविष्यात कारखान्यात बनवलेली घरे निवडून आपल्याला योग्य वाटेल अशा जागी बसवता येतील हे काम झटपट आणि कमी खर्चात उपलब्ध होऊ शकेल. जिथे जिथे व्यक्तिद्वारे कामे केली जातात त्या सर्वच गोष्टींचे यांत्रिकीकरण होईल. बँकांच्या शाखा असणार नाही कर्ज प्रकरणे ऑनलाइन मंजूर होतील. पैसे भरणे अगर काढणे याचे कोणतेही व्यवहार रोखीने होणार नाहीत. या तंत्रज्ञानाशी जोडण्यास जे असमर्थ राहतील त्यांना असे व्यवहार करण्यास मदत घ्यायला लागली तर त्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. सर्व करार त्यांची अंमलबजावणी ऑनलाइन माध्यमातून होऊ शकतील. अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांची यात भर टाकता येईल आज जरी त्या अशक्य वाटल्या तरी त्या व्यावसायिक दृष्ट्या साकारल्या जातील. या बदललेल्या तंत्राला अनुसरून त्याची देखभाल, दुरुस्ती यांच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कमी काळात होणाऱ्या फार मोठ्या बदलांस यापुढील पिढीस जमवून घ्यावें लागेल. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 27 ऑगस्ट 2022 रोजी पूर्वप्रकाशीत. हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी- माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक, https://udaypingales.blogspot.com/?m=1 'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक, https://www.facebook.com/pingaleuday/

Friday, 19 August 2022

शेअरबाजार महत्वाची गुणोत्तरे

#शेअरबाजार_आणि_महत्वाची_गुणोत्तरे गुणोत्तरे म्हटली ज्यांना आपल्या शालेय जीवनात गणित विषय आवडत नसे त्यांच्यासाठी काहीतरी किचकट अनाकलनीय कल्पना आहे असा समज आहे याचा जीवनाशी काय संबंध? हे सारे शिकलंच पाहिजे का? असे प्रश्न मनात येतील. हा भाग तेव्हा कदाचित तुम्ही दुर्लक्षित केला असेल परंतू जर तुम्ही गुंतवणूक करणारे असाल आणि जाणकार असाल कुशल गुंतवणूकदार म्हणून योग्य निर्णय घेण्यास या सर्वांची नक्की मदत होईल. कंपनीचे मूलभूत संशोधन करण्यासाठी त्याच्या अहवालातून जी आर्थिक माहिती मिळते तिचा वापर करून ही गुणोत्तरे काढली जातात. याचा वापर करून, बाजार भावाच्या तुलनेत कंपनीचे वास्तविक मूल्य काढले जाते. यासाठी अनेक गुणोत्तरांचा वापर केला जातो त्यातील सहा महत्वाची गुणोत्तरे- खेळते भांडवल प्रमाण (working capital ratio), the quick ratio, earnings per share (EPS), price-earnings (P/E), debt-to-equity, and return on equity (ROE). ही सर्व गुणोत्तरे एकेकटी नसून एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत त्यामुळे कंपनीची नाडीपरिक्षा करताना त्याचा एकत्रित विचार केला जावा. 1.खेळते भांडवल प्रमाण - (Working Capital Ratio) कंपनीचे आर्थिक आरोग्य यावरून समजते कंपनीकडे जमा होणारे पैसे आणि अल्पकालीन देयके यांचे एकमेकांशी असलेले प्रमाण पाहून कंपनीचा रोखता प्रवाह समजतो. यासाठी खेळते भांडवल म्हणजे चालू मालमत्ता आणि चालू देणी यामधील फरक या वरून कंपनीची देणे फेडू शकण्याची पात्रता लक्षात येते यासाठी अल्पकाळात म्हणजे एखाद्या कंपनीच्या दृष्टीने साधारणपणे एक वर्षात जमा होत असलेली आणि द्यावी लागणार असलेली रक्कम याच गोष्टींचा विचार केला जातो. याप्रकारे चालू मालमत्तेस चालू देण्याने भागले असता हे गुणोत्तर मिळते. हे गुणोत्तर जर एक असेल तर कंपनीस अल्पकाळात देणी देण्यास ताण येत आहे असे समजले जाते जर हे गुणोत्तर दोन असेल तर अशी देणी देण्यावर ताण येत नाही. जर हे गुणोत्तर खूपच अधिक असल्यास कंपनीकडे अतिरिक्त पैसा असून त्याचे नियोजन करण्यात व्यवस्थापनाची काहीतरी कमतरता आहे असे म्हणता येईल. 2. तात्काळ गुणोत्तर - (Quick Ratio) कंपनीकडे असलेल्या मालमत्तेचे रुपांतर रोखतेत करता येईल त्यास तात्काळ गुणोत्तर असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादे आम्ल झटकन परिणाम दाखवते त्याप्रमाणे या मालमत्तेचे पैशात रूपांतर होऊ शकत असल्याने यास कंपनीची ऍसिड टेस्ट असेही म्हणतात. तात्काळ गुणोत्तर मोजताना मालमत्तेतून शिल्लख माल आणि आगाऊ खर्च वजा करण्यात येतात बाकी गुणोत्तर खेळत्या भांडवलाच्या प्रमाणेच आहे यातून कंपनीची आर्थिक स्थिती अधिक स्पष्ट होते. जर हे गुणोत्तर एक असेल तर ती कंपनीस आपली अल्पकालीन देणी भागवू शकणार नाही. ही परिस्थिती तात्कालिकही असू शकते. भाग भांडवल वाढवून किंवा कर्ज घेऊन यात बदल घडवून आणता येईल. 3.प्रतिशेअर कमाई- (Earnings per Share- EPS) जेव्हा एखादया कंपनीत गुंतवणूक केली जाते तेव्हा गुंतवणूकदार हा कंपनीच्या भविष्यकाळात गुंतवणूक करत असतो. कंपनी पुढे उत्तम नफा मिळवेल अगर तोट्यातही जाईल याची जोखीम स्वीकारत असतो. प्रतिशेअर कमाई कंपनी किती नफा मिळवू शकते याची जाणीव करून देते ज्या योगे गुंतवणूकदार कंपनीचा भविष्यकालीन भाव काय असू शकेल त्यामुळे आपला किती फायदा होईल याचा अंदाज बांधू शकतात. कंपनीच्या निव्वळ उत्पन्नास वितरित करण्यात आलेल्या समभागाच्या संख्येने भागून प्रतिशेअर कमाई काढता येते. हे गुणोत्तर कंपनी तोट्यात असल्यास वजा येते तर जसा फायदा वाढत जाईल त्याप्रमाणे अधिकाधिक होत जाते. 4. किंमत प्रतिशेअर गुणोत्तर - (Price Earnings Ratio, P/E) या गुणोत्तराने गुंतवणूकदार भावात किती वाढ होऊ शकण्याची ताकद आहे याचा अंदाज बांधू शकतात. हे गुणोत्तर कंपनीच्या बाजारभावास प्रतिशेअर कमाईने भागल्यास मिळते. शून्य किंवा उणे किंमत प्रतिशेअर गुणोत्तर ती गुंतवणूक योग्य कंपनी नाही असे दर्शवते फक्त यात काही सुधारणा होत आहे का हे वेगवेगळ्या काळातील गुणोत्तरांची तुलना करून पहाता येते. नामवंत कंपन्या सतत फायद्यात असल्यास आणि त्याच्या नफ्यात वाढ होत असल्यास त्यासाठी अधिक किंमत मोजण्यास लोक तयार असतात साहजिकच त्याचे किंमत प्रतिशेअर गुणोत्तर वीस किंवा त्याहूनही खूप जास्त असते 5.कर्ज आणि भांडवल प्रमाण - (Debt-to-Equity Ratio) एखादया कंपनीचे कर्ज वाढत चालले असता त्यावर द्यावे लागणारे व्याज यामुळे कंपनीच्या नफाक्षमतेवर परिणाम होतो यामुळे स्थिर खर्च वाढत जातात त्यामुळे नफा कमी होत जातो. या गुणोत्तराने कंपनी घेतलेल्या कर्जाचा नफा मिळवण्यासाठी कसा वापर करीत आहे ते समजते. भविष्यात विपरीत परिस्थिती उद्भवल्यास भांडवलातून कर्जाची भरपाई होईल का? हे समजते. एकाच प्रकारच्या व्यवसायाच्या कंपन्यांचे सरासरी कर्ज भांडवल काय आहे याच्याशी तुलना करता येईल आणि गुंतवणूक करण्यातील जोखीम समजून घेता येईल. काही उद्योगांचे फायदे मिळण्यात दीर्घकाळ जावा लागतो अशा उद्योगांना मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागते. 6. भांडवल परतफेड प्रमाण - (Return on Equity ,ROE) या गुणोत्तरातून एखादी कंपनी अधिकाधिक नफा मिळवून समभाग धारकांचा कसा फायदा करून देत आहे ते समजते. हे टक्केवारीत दाखवले जाते निव्वळ नफ्यास भांडवलाने भागून मिळते. चांगल्या कंपन्या समभागाचा वापर करून अधिक उत्पन्न मिळवतात. अधिकाधिक नफा मिळवून त्या समभागधारकांच्या मूल्यात भर घालत असतात. प्रत्येक उद्योगासाठी लागणारी भांडवलाची गरज, आवश्यक कर्ज, त्यातून मिळू शकणारा नफा त्यास लागणारा कालावधी भिन्न असतो त्यामुळे तुलना एकाच प्रकारच्या उद्योगांची एकमेकांशी करावी, तरच अचूक अंदाज बांधता येईल. निश्चित केलेल्या कंपनीचे खरेखुरे मूल्य ठरवता येईल आणि ते बाजारभावाहून अधिक आहे की कमी आहे ते समजून घेऊन असे समभाग खरेदी करायचे की आपल्याकडे असतील तर त्यांची विक्री करायची हे ठरवता येईल. यास काही तांत्रिक ज्ञानाची जसे- आलेख रचना आणि उलाढाल भाव यात विशिष्ट कालावधीत पडणारा फरक यांची जोड दिल्यास आपल्याला अधिक अचूक अंदाज बांधता येतील. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 19 ऑगस्ट 2022 रोजी पूर्वप्रकाशीत. हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी- माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक, https://udaypingales.blogspot.com/?m=1 'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक, https://www.facebook.com/pingaleuday/

Friday, 12 August 2022

शेअरबाजार एक भुलभुलैया

#शेअरबाजार_एक_भुलभुलैया माझे एक अत्यंत अभ्यासू मित्र माधव भोळे यांनी अलीकडे समाज माध्यमावर टाकलेली पोस्ट वाचली. ती त्यांनी मला टॅग केली आहे. याचा अर्थ मी त्यावर माझे मत व्यक्त करावे असा त्याचा अर्थ होतो. मी यातील तज्ञ असे न मानता स्वतःला अभ्यासक असे समजतोय या पोस्टचा विषय एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो असे वाटत असल्याने मूळ पोस्ट मधील मुद्दा आणि त्यावरील माझे मत व्यक्त करतोय. ★कित्येक वेळा आपण शेयर मार्केट बद्दल पोस्ट वाचताना अशा पोस्ट वाचतो की विप्रो कम्पनिमध्ये 1980 साली रु 10,000 गुंतवले असते तर आज त्याचे 1400 कारोड झाले असते, राकेश झुंनझुनवला 39,000 कोटींचा मालक आहे वगैरे, वगैरे. ■अशा प्रकारच्या हजाराचे कोटी रुपये झाल्याचा इतिहास असलेली अनेक उदाहरणे आहेत त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी लाखोंनी गुंतवणूक करूनही त्यांना बुडावणाऱ्या कंपन्यांनीही उदाहरणे आहेत. अस असलं तरी गुंतवणूक सल्लागार दीर्घकाळ गुंतवणूक करावी असा सल्ला देतात यात 2 / 3 चांगल्या कंपन्या मिळाल्या तरी इतर ठिकाणी होऊ शकणारे नुकसान भरून काढूनही मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. आता सन 1980 सालातील ₹ 10000/- बद्धल, आपण इतिहासात डोकावलो तर त्या काळी अनेकांचे वार्षिक उत्पन्नसुध्दा एवढे नव्हते त्यामुळे तेव्हाच्या हिशोबाने ती प्रचंड रक्कम होती त्यामुळे इतकी मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची संधी खूपच थोड्या लोकांपुढे उपलब्ध होतती यातील गुंतवणूक कदाचित त्यातील बऱ्याच जणांनी गुंतवणुकीशी निगडित जोखीम लक्षात घेऊन त्यांच्या हिशोबाने ती गुंतवणूक लगेचच काडून घेतली असणार. आज अनेक जणांकडे दीर्घकाळ गुंतवणूक करू शकतील एवढी रक्कम आहे यातील अनेकजण आमची गुंतवणूक दीर्घकालीन आहे म्हणत असले तरीही बाजारात थोडीशी उलथापालथं खरतर पालथच झाली की त्याचा जीव वरखाली होतो. त्यामुळे अशा पद्धतीने भावनांवर नियंत्रण ठेऊन गुंतवणूक करणारे आजही खूप कमी लोक आहेत ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः सन 1994 साली केलेल्या ₹ 1000/- गुंतवणूकीचे आजचे बाजार मूल्य ₹ 14 लाखाहून अधिक आहे तर सन 2016 साली केलेल्या ₹ 10000/- गुंतवणुकीचे आजचे बाजारमूल्य ₹ 3.75 लाखाच्या आसपास आहे. अशी चिकाटी आपल्याकडे असेल तर आज अनेक कंपन्या असा चमत्कार यापुढेही घडवू शकतील. गरज आहे अशा कंपन्या शोधून त्यात दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची चिकाटी बाळगणाऱ्यांची! ★आपण अशा अनेक पोस्ट वाचतो की हा स्टोक मल्टिब्यागर आहे तो स्टोक एव्हडे रिटर्न गेल्या एव्हडे वर्षात देऊन गेला वगैरे. पण असे स्टोक ओळखायचे कसे की जे पुढे जाऊन एव्हडे रिटर्न देतील. ■हे खरं तर खूप कौशल्याचच काम आहे. अशी कंपनी जी दीर्घकाळात मल्टीब्यागर ठरेल आणि उत्तम परतावा देतील. या कंपन्या आपण जितक्या लवकर ओळखून खरेदी करून अधिक काळ बाळगू शकू तेवढी होणाऱ्या फायद्यात भर पडणार. यासाठी या विषयातील किमान प्राथमिक माहिती असणे जरुरीचे आहे. सध्या माहितीचा महापूर असलेल्या जगात योग्य आणि खरीखुरी माहिती शोधायची असल्यास ती नक्की आणि नेमकी कुठे मिळेल हे माहिती असले पाहिजे. या विषयावरील अधिक आणि अधिकृत माहिती ही NISM, BSE Training Institute आणि NSE ट्रेनींग सेंटर यांच्याकडूनच मिळू शकते हे लोक सतत विविध ट्रेनींग प्रोग्रॅम आणि त्यांच्या परीक्षा घेत असल्याने त्याच्याकडील माहितीत जसे बदल होतील ते अद्ययावत करत असतात. याशिवाय आपण निवड केलेल्या कंपनीचा अहवाल याचे वाचन करता यायला हवे त्यातील आकडेवारी बरोबरच डायरेक्टर रिपोर्ट, लेखा परीक्षकांचा अहवाल महत्वाचा आहे. कंपनी विषयी निश्चित आणि नेमकी माहिती अधिकृतपणे मिळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. याचबरोबर कंपनीचे व्यवस्थापन कुणाकडे आहे हे सुद्दा महत्त्वाचे आहे. आज या क्षेत्रातील जे दादा लोक आहेत त्याचे अनुभव, ट्रेडिंग करण्याची, स्टॉक निवडण्याची पद्धत यांचा अभ्यास करून आणि ते पडताळूनच स्वतःचे मत बनेल ते पुन्हा तपासून खात्री करून घ्यावी लागेल. नुसते वाचन करण्याऐवजी त्याची टिपणे काढली पर पुन्हा उजळणी होऊन मुद्दा अधिक चांगल्या रीतीने लक्ष्यात राहतो. यातील काही गोष्टी या केवळ अनुभवानेच लक्षात येतात. निफ्टी प्रमाणेच निफ्टी नेक्स्ट 50 नावाचा इंडेक्स आहे यातील शेअरही भविष्यात निफ्टीमध्ये येऊ शकतील. कंपनीने घेतलेले कर्ज याचे भांडवलशी असलेले प्रमाण, प्रवर्तकांनी गहाण ठेवलेल्या शेअर्सचे प्रमाण, अस्थिरतेचा निर्देशांक या सारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. ★अशी कोणती क्षेत्र आहेत ज्यात भारतीय कँपन्यांना जगभर वाव आहे आणि जगाचा पैसा अपल्याकडे खेचून आणतील? ■इन्फर्मेशन आणि टेक्नॉंलॉजी हे असे क्षेत्र आहे की त्यात भारतीय कंपन्या सातत्याने टिकून असून यातील अनेक कंपन्यांनी दीर्घकाळात 25% हुन अधिक परतावा 25 वर्षाहून अधिक काळ दिला आहे. उदा इन्फोसिस, टीसीएस, विप्रो त्यामुळे आपण हे क्षेत्र हा हुकमी एक्का असे अजूनही म्हणू शकू. माहिती तंत्रज्ञान, त्यातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिक वाहनांची किफायतशीर निर्मिती, हलक्या वजनाच्या बॅटरी मध्ये ऊर्जा साठवून ठेवण्याचे तंत्र, आपल्या परंपरागत ज्ञानाचा वापर करून तयार केलेली आणि सिद्ध झालेली औषधे, ड्रोन तंत्रज्ञान, ऍनिमेशन, सौर ऊर्जा निर्मिती यांचे किफायतशीर तंत्र, उच्च प्रतीचे हवामानातील बदलांना जुळवून घेणारे बी बियाणे यांची निर्मिती, विशेष रसायने बनवणाऱ्या कंपन्या ही कदाचित उज्वल भविष्य असलेली क्षेत्रे असतील. या सर्वानाच पैसा लागणार तो पुरवणारे बँकिंग फायनान्स क्षेत्रआहे त्यामुळे त्यालाही उज्वल भवितव्य आहे. यात आपल्या ज्ञानानुसार भर घालता येईल. ★अशा कोणत्या कँपन्यां आणि मॅनेजमेंट आहे की जे येणाऱ्या आव्हानांना तोंड देत, येणाऱ्या वरील संधीचा पुरेपूर फायदा उठवतील आणि शेयर होल्डर्सना मालामाल करतील? त्यांना ओळखायचे कसे? त्यांच्यामध्ये कोणते गुण आवश्यक वाटतात? ■यादृष्टीने आपल्या नजरेसमोर काही कंपन्या ठेवाव्यात. उदा पॉलीकॅब, फाईन ऑर्गनिक्स, दीपक फर्टिलायझर, कोटक बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, लार्सन, टीसीएस, इन्फोसिस, पॉवरमॅक, टिमकेन इ यात अजूनही भर पडू शकते. अशा कंपन्या ज्यांनी सातत्याने चांगले रिटर्न दिले आहेत त्यात तुमची थांबण्याची तयारी असेल तर फायदाच होईल परंतू असे शेअर्स जर 52 आठवड्याच्या कमी भावाच्या जवळपास घेता आले तर लवकर आणि अधिक फायदा होऊ शकतो. आज ज्या आघाडीच्या कंपन्या आहेत त्या एकेकाळी सामान्य कंपन्या होत्या. असे शेअर ओळखण्यासाठी, काही प्राथमिक गोष्टी माहिती हव्यात त्यात - *कोणत्या प्रकारातील कंपनी आहे, त्यांचे व्यवस्थापन त्यांचे अन्य व्यवसाय? *व्यवसाय चक्राप्रमाणे तेजीत आहे की मंदीत? *मूलभूत विश्लेषण आणि तांत्रिक विश्लेषण याचा भाग येईल. यात विविध गुणोत्तराचा समावेश होतो त्यांची तुलना त्या प्रकारच्या उद्योगांच्या सरासरीशी करावी. भाव आणि उलाढाल यांचा परस्परांशी असलेला संबंध. उपलब्ध चार्टच्या साहाय्याने गोल्डन गेट तयार झाल्याचे संकेत मिळत असताना खरेदी कसण्याचे तंत्र *वर्षभरात भावातील फरकाचा लाभ घेऊन या लाभाची आणि लाभांशाची योग्य वेळी त्याच शेअरमध्ये गुंतवणूक. *वाजारात होणाऱ्या हालचालीमुळे मनोबल कमी अधिक न होता तेजी, मंदी यांच्याशी मुकाबला करून मंदी ही संधी समजून लाभ घेणे अथवा काहीही न करणे. *योग्य वेळी बाहेर पडून आवश्यक असल्यास पुन्हा खरेदी करणे किंवा नुकसान होत असेल तरीही त्याचा कर नियोजन या दृष्टीने काही लाभ घेता येईल का? असा विचार करणे. *कंपनीचा नफा,त्यात होणारी वाढ, नफा कमी होण्याची कारणे, भविष्यातील योजना. *लार्ज, मिड, स्मॉल कंपन्या कुणाला म्हणायचे याचे निकष सेबीने ठरवले असून ही यादी दर सहा महिन्यांनी अद्ययावत होत असते या यादीत पूर्वी स्मॉलकॅप कॅम्पनी मिडकॅपमध्ये किंवा मिडकॅप कंपनीने लार्ज कॅपमध्ये प्रवेश केला आहे का ते पाहून निर्णय घेता येईल. *नाविन्यपूर्ण क्षेत्रात असलेल्या आणि स्थिर होऊन नफा मिळवू लागणाऱ्या कंपन्या शोधता येतील. ★शेयर मार्केट वर क्लास चालवणारे डे ट्रेडिंग आणि टेक्निकल अनलिसिस वर भर देते ते फक्त तात्पुरत्या उपाययोजना असतात. त्यांची परिणीती ब्रोकर लोकांच्या व्यवसाय वृध्दीत होते. ■ब्रोकरकडील लोकांना तुमचा भांडवल संच सतत हलता हवा असतो तरच उलाढाल वाढून त्याच्या व्यवसायात वृद्धी होते त्यामुळे असे तथाकथित व्यावसायिक किंवा क्लासचे चालक याना तुम्हाला स्वयंपूर्ण करणे हा उद्देश नसतोच ते कायमच तुम्हाला त्यांच्यावर अवलंबून राहायला लावतील, एखादे सॉफ्टवेअर घ्यायला लावतील, याला काही सन्माननीय लोक अपवाद आहेत पण सर्वसाधारण कल हा तुम्ही पांगळे कसे राहाल असाच आहे. यासर्वांचीच मदत आपण शिकण्यासाठी उपयोग होईल एवढी प्राथमिक माहिती मिळावी एवढ्यासाठीच करावा. बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर याहून भयानक आहेत ते तुमच्या गरजेचा अजिबात विचार करीत नाहीत. जरूर असो अथवा नसो, कोणालाही युलीप योजना स्वीकारण्यास सांगून फक्त तीन वर्षे पैसे भरा नंतर नाही भरलेत तरी चालतील असे सांगून गुंतवणूकदारांचे नुकसान करतात. बँकेत काम करणाऱ्या माणसाने सांगितल्याने लोक त्यावर पटकन विश्वास ठेवतात. एखादी गोष्ट जाणकार व्यक्तीकडून समजून घ्यावी त्यासाठी आवश्यक असेल तर थोडीफार रक्कम खर्च करावी ती ज्ञानातील गुंतवणूक ठरेल असे कुणाला वाटतच नाही. त्यामुळे 60% ते 84% या दराने व्याज देतो वर्षात पैसे दुप्पट करून देतो अशा आमिषाला लोक बळी पडतात सर्वस्व गमावतात. आज अनेकांना काही न करताच आपल्याला चागला परतावा मिळावा अशी योजना हवीय' टिप्स हव्या आहेत,या मानसिकतेचा धूर्त लोक फायदा घेतात. हे क्षेत्रच खूप मोठे आहे त्यामुळे ज्ञान आद्ययावत ठेवून निष्कर्ष काढावे आणि पडताळून पहावे. याचे निश्चित नियम बनवणे शक्य नाही वेगवेगळ्या कोनांतून याचा विचार करावा लागतो. इतके सर्व करूनही, पुरेशी काळजी घेऊनही निष्कर्ष चुकू शकतात याची जाणीव ठेवून त्यातूनही अजून नवीन काही शिकण्याची तयारी ठेवावी. लेखात उल्लेख केलेल्या कंपन्या केवळ अभ्यासासाठी असून यात गुंतवणूक करण्याची शिफारस नाही. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 12 ऑगस्ट 2022 रोजी पूर्वप्रकाशीत. हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी- माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक, https://udaypingales.blogspot.com/?m=1 'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक, https://www.facebook.com/pingaleuday/

Friday, 5 August 2022

सुरक्षाकवच कायम ठेवणारा आरोग्यविमा

#सुरक्षाकवच_कायम_ठेवणारा_आरोग्यविमा यापूर्वी आपण आरोग्य विमा घेताना कोणती काळजी घ्यावी हे मी लिहिलेल्या लेखांमध्ये वाचले असेलच. त्याची थोडी उजळणी करतो- आरोग्यावर करायला लागणाऱ्या खर्चात कोविड 19 नंतरच्या काळात सातत्याने, सर्वसाधारण महागाईच्या दोन ते तीन पटवाढ होत असल्याने नेमक्या किती रकमेचा आरोग्यविमा घ्यावा हा प्रश्न पडू शकतो. आता घरातील प्रत्येकाचा वैयक्तिक विमा घेणे परवडणारे नसल्याने अनेकजण संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित (Family floater policy) घेतात. आरोग्य विमा घेताना या गोष्टी लक्षात घ्या- 1.करारातील नियम अटी, 2. दावे मंजूर करण्याचे प्रमाण, 3. प्रीमियम रक्कम इतर कंपन्यांचा तुलनात्मक प्रीमियम, 4. मिळणाऱ्या विविध सोई सुविधा जसे *ओपीडी खर्च, *विविध तपासण्या, *रुग्णालयात भरतीचा कालावधी, *डे केअर सुविधा, *राहण्याचा खर्च, *रुग्णवाहिकेचा खर्च, *कोणते आजार समाविष्ट आहेत/ नाहीत, *आजारावरील खर्चाची मर्यादा, मोतीबिंदू सारख्या विशिष्ट आजाराची पात्रता, *घरातून केलेल्या उपचार खर्चाची भरपाई, *विशेष उपचारांची सोय, *पर्यायी उपचार पद्धतीची सोय, *आधुनिक तंत्रज्ञान वापरायची सोय, *वर्षभरात दावा दाखल न झाल्यास पात्र बोनस किती, *दुसऱ्या तज्ञांचे मत घेण्याची सुविधा, *रुग्णालयात भरती होण्यापूर्वी व सोडल्यावर किती दिवसापर्यतच्या खर्चास मंजुरी *नाकारले जाणारे खर्च *जवळपास कॅशलेस हॉस्पिटलची सोय. *कॅशलेस सुविधा 100% कॅशलेस नसते, हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे काही डिपॉझिट तेथे ठेवावे लागते (साधारण 20%) *खर्च मर्यादा, को पेमेंटची गरज. 5. शक्यतो सर्व कुटूंबाची एकच पॉलिसी घेऊन बरोबर रायडर घेणे अधिक फायद्याचे, जरूर तर विशेष योजना वेगळी घ्यावी 6.आजाराचा पूर्वेतिहास असल्यास त्याची भरपाई पात्रता कधी ते माहिती करून घ्यावे. हा कालावधी थोडी अधिक रक्कम भरून कमी करता येतो. 7. आरोग्य तपासणीची सुविधा 8. गरजेनुसार सुरक्षा कवच वाढवण्याची सोय 9. पॉलिसी पोर्ट करण्याची म्हणजेच इन्शुरंस देणारी विमाकंपनी बदलण्याची सोय 10. तक्रार निवारण यंत्रणा. हे सर्व गोष्टी तपशीलवार पुन्हा देण्याचे कारण यामुळे असा आकस्मित खर्च उद्भवला तर त्याचा अतिरिक्त भार आपल्यावर पडत नाही. आरोग्यविमा घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने- *नियामकांच्या संकेतस्थळावरील ग्राहक शिक्षण विभागात दिलेली माहिती वाचावी *आरोग्य विमा पुस्तिका डाउनलोड करावी. *अर्ज स्वतः भरावा आणि सही करावी *ऑनलाईन पॉलिसी खरेदी करणाऱ्यांनी तसेच जर योग्य वाटत असलेल्या सर्वानीच इन्शुरंस रेपोजेटरी खाते उघडून आपल्या सर्व पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घ्याव्यात आपल्या मृत्यूनंतर खात्यावरील पॉलिसीचे दावे दाखल करण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी नेमावा, यासाठी वारसाची नेमणूकही करता येते. ही विनामूल्य सुविधा आहे. *आपल्या विमा कंपनीचा तसेच IRDA च्या कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक आणि मेल लिहून ठेवावा. *कंपनीकडून आलेले सदस्यता पत्र, पॉलिसी कागदी स्वरूपात असल्यास ते करारपत्र याशिवाय सहज मिळेल अशा ठिकाणी आपली ओळख पटवून देणारे कागदपत्र वेळेवर व सहज मिळतील अशा ठिकाणी ठेवावेत म्हणजे मनस्ताप होणार नाही. पॉलीसी डिजीलॉकर या सरकारी अँपमध्ये साठवून ठेवता येते. पोर्ट केलेल्या पॉलिसीचे पुरावे जपून ठेवावेत. *रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास लवकरात लवकर 24 तासात कंपनीस माहिती द्यावी जर पूर्वनियोजित शस्त्रक्रिया असेल तर नियोजित तारखेपूर्वी कंपनीस माहिती द्यावी. *आवश्यकता असणाऱ्यानीच बाळंतपणाच्या खर्चाची भरपाई देणाऱ्या योजना विचारात घ्याव्यात. *भरपाई दावे त्वरित सादर करावेत मुदत निघून गेल्यास योग्य ते स्पष्टीकरण करणारे टिपण सोबत जोडावे. रुग्णालयातून सोडल्यावर 30 दिवसांत सादर केलेल्या मागणीस काही अडचण शक्यतो येत नाही. *विमा नविनीकरण करण्याच्या कालावधीत काही उपचार घ्यावे लागल्यास त्याचा खर्च आपल्याला करावा लागतो. यासाठी मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण न विसरता करावे. यासाठी मोबाईलमध्ये रिमाईंडर लावता येईल. आकस्मित संकट सोडून जर काही पूर्वनियोजित उपचार करायचे असतील तर ते कॅशलेस पद्धतीनेच घ्यावेत, जर ही योजना नसती तर हॉस्पिटलमध्ये आपण कोणता क्लास स्वीकारला असता? याचा विचार करावा आपल्याला मिळणारा खर्च ही वसुली नाही कारण औषधांच्या किमती सोडून इतर सर्व खर्च हे तुमच्या क्लासशी निगडित असतात. आपण अधिक वरचा क्लास स्वीकारला तर खर्च वाढतो, त्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. आता अनेक प्रकारच्या कल्पक पोलिसीज बाजारात आल्या असून त्यात विमाधारकांच्या उपयोगी पडतील अधिक गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात. थोडा अधिक प्रीमियम देवून मिळू शकणाऱ्या सुविधा अनेकांना माहिती नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत यातील एक सुविधा म्हणजे विमा कालावधीत आजारामुळे मूळ विमा रक्कम पूर्ण वापरून झाल्यास तेवढ्याच रकमेची पुनर्स्थापना (Restoration benifit) करण्यात येते. जे लोक आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एकत्रित पॉलिसी त्याच्यासाठी अशी सुविधा अत्यंत उपयुक्त आहे. काही कारणांमुळे कुटुंबातील सदस्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आल्यास एक किंवा दोन वेळेतच पूर्ण रक्कम संपून जाण्याची शक्यता असते त्यामुळेच पुरेश्या रकमेची पॉलिसी नसल्याने पॉलिसी असूनही आर्थिक संकटाशी सामना करावा लागतो. आरोग्यविमा आपोआप पुनर्स्थापित करणारी ही योजना विमा रक्कम संपल्यावर पुन्हा पुन्हा जादू झाल्याप्रमाणे स्थापित होत असल्याने विमाधारकास कायमचे सुरक्षाकवच प्राप्त होत असते. ही योजना दोन प्रकारात आहे. एका प्रकारात पॉलिसी रक्कम पूर्ण वापरून झाल्यावर पुनर्स्थापित होते. तर दुसऱ्या प्रकारात रक्कम अर्धवट वापरून झाल्यास लगेच पुनर्स्थापित केली जाते. म्हणजेच 5 लाखाचे सुरक्षाकवच असणाऱ्या एका कुटुंबातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे 4 लाख आणि 3 लाख रकमेचे दोन दावे असतील तर पहिल्या प्रकारात 7 लाखांऐवजी प्रथम 5 लाख रुपयांच्या कवचाबद्धल 5 लाख मंजूर होईल आणि पुन्हा 5 लाख रुपयांचे सुरक्षा कवच पुनर्स्थापित होईल जे यानंतर काही संकट आल्यास उपयोगी पडेल तर दुसऱ्या प्रकारात 4 लाख मंजूर झाल्यावर शिल्लख राहिलेले 1 लाखाचे कव्हर 5 लाख होईल त्यातून 3 लाख मंजूर होऊन राहिलेल्या 2 लाखाचे कव्हर पुन्हा 5 लाख होईल आणि ते पुन्हा काही प्रसंग आल्यास उपयोगी पडेल. या योजनेत- *वर्षभरात कोणताच दावा दाखल न झाल्यास त्याचा पुढील वर्षी काही फायदा होईल अशी तरतूद नसते. *पहिला दावा दाखल करताना मर्यादेहून अधिक रकमेचा असेल तर तो मूळ प्रमाणात मंजूर होऊन नंतर पुनर्स्थापित होईल. म्हणजेच पॉलिसी कव्हर 5 लाख आणि पहिलेच बिल 8 लाख असल्यास फक्त 5 लाखच मंजूर होतील. *सुरक्षा कवचाची पुनर्स्थापना वेगवेगळ्या आजारांनुसारही होऊ शकते. काही पॉलिसीत एकाच प्रकाराचा आजार एकास व्यक्तीस झाल्यास सुरक्षा कवच पुनर्स्थापित होणार नाही अशी अट असते मात्र असा आजार अन्य व्यक्तीस झाल्यास सुरक्षा कवच पुन्हा पॉलिसी रकमेएवढे होते काही तर पॉलिसीत अशी अट नसते. जे लोक संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित पॉलिसी घेतात ते लोक आपण कुठे राहतो त्यासाठी तेथे एका आजारास किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज घेऊन पुरेशा रकमेची विमा पॉलिसी घेऊ शकतात. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 5 ऑगस्ट 2022 रोजी पूर्वप्रकाशीत. हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी- माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक, https://udaypingales.blogspot.com/?m=1 'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक, https://www.facebook.com/pingaleuday/