Friday, 27 December 2019

कार्ड व्यवहाराची आधुनिक पद्धत

#कार्ड_व्यवहाराची_आधुनिक_पद्धत
#Contactless_Payment_Systems

         आपल्यापैकी काही लोकांनी  नव्याने मिळालेले आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे थोडेसे वेगळे असलेले डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / स्मार्ट कार्ड नीट पाहिलंय का? या पूर्वीचे कार्ड आणि सध्याचे कार्ड यात काही फरक आहे का? चित्रात दाखवल्याप्रमाणे जर त्यावर वाय फाय सारखे चिन्ह असेल तर हे कार्ड स्वाईप न करता आपण काही मर्यादेपर्यंत त्यावर व्यवहार करू शकतो त्याची माहिती देणारे पत्र त्याबरोबर आले असेलच. सर्वसाधारण कार्डवर असणारी चुंबकीय पट्टी / इलेक्ट्रॉनिक चिप असते ती आहेच याशिवाय त्यासोबत असलेली सिग्नल यंत्रणा RFID किंवा NFC या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली ओळख सही किंवा पिन शिवाय करून देण्याचे काम करते. यामुळे छोटे  व्यवहार जलद गतीने होत आहेत. स्मार्टफोनचा वापर करून अँपच्या साहाय्याने असे व्यवहार करता येणे शक्य आहे.
           वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यावर तेथे असलेल्या POS उपकरणावर आपले कार्ड धरले /मोबाईल फोन धरला की, हिरवा दिवा लागतो अथवा बीप असा आवाज येतो आणि व्यवहार पूर्ण होतो यासाठी पिन टाकावा लागत नाही. तुम्ही मागणी केल्यास व्यवहाराची छापील नोंद (Charged slip)  मिळते अन्यथा नाही.जगभरात कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या एकूण व्यवहारापैकी 33% व्यवहार या माध्यमातून केले जात आहेत. हे कार्ड ग्राहक स्वतः आपल्या हाताने कार्ड रिडरवर धरीत असल्याने तो निर्धास्त राहू शकतो.
             हे व्यवहार रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान वापरून होत असले तरी ते पुरेशी काळजी घेऊन केले जात असल्याने आपण यापूर्वी करीत असलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप/ मॅग्नेटिक टेप + पिन प्रमाणेच सुरक्षित आहेत. याद्वारे  केला जाणारा व्यवहार क्षणार्धात होत असला तरी तो ठराविक रकमेच्या मर्यादेत करता येतो. आपल्या येथे सध्या ही मर्यादा ₹2000/- पर्यंतचा एक व्यवहार असे एका दिवसात जास्तीत जास्त 5 व्यवहार यापुरती मर्यादित असून त्यास भारतीय रिझर्व बँकेची परवानगी आहे. बँक आपल्या ग्राहकांना एक दिवसात याहून कमी रक्कम आणि कमी वेळा व्यवहार मर्यादा ठरवून देऊ शकते. त्यामुळे त्यात असलेली जोखीम मर्यादित आहे. जगभरात जेथे Mastercard, Visa या पैसे पाठवायच्या पद्धतीमार्फत व्यवहार होतात तेथून  कोठूनही हे व्यवहार करता येतात. वेगवेगळ्या ठिकाणी व्यवहार करण्याची तेथील लोकांची पद्धत वेगवेगळी असल्याने स्थानिक परिस्थितीनुसार एक व्यवहार किती रुपयांचा? आणि एकूण व्यवहार संख्या किती? याचे प्रमाण वेगवेगळ्या देशात वेगळे असते. जेथे अशी सोय आहे, तेथे ती असल्याची सूचना परिचय चिन्हासह (Logo)  ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी लावलेली असते. हे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र निर्धारित रकमेहून अधिक रकमेचा व्यवहार करायचा असेल तेथे हेच कार्ड आपण वापरू शकाल. मात्र यासाठी हे कार्ड स्वाईप करून पिन टाकावा लागेल.
           कार्ड रीडर जवळून व्यक्ती गेल्याने त्यातून पैसे गेल्याचे अनेक विडिओ प्रसारित झाले असून ते सर्व बोगस आहेत. व्यवहार होण्यासाठी कॅशियर व्यवहाराची रक्कम टाकेल ती योग्य असल्याची खात्री करून कार्डधारकास आपल्याकडील कार्ड रीडर जवळ 2 ते 5 सेमी  अंतरावर धरावे लागते तरच व्यवहार पूर्ण होतो. एका वेळी एकच व्यवहार होतो, जरी तुम्ही दोन वेळा कार्ड धरले तरी दोन वेळा पैसे वजा होत नाहीत. दोन वेगवेगळी कार्ड धरल्यास त्यातील कोणतेही एक निवडण्याचा संदेश येतो. कॅशियरकडून रक्कम टाकण्यास चूक झाल्यास त्याला आधी टाकलेली रक्कम रद्द करून नवीन रक्कम टाकता येते. कार्ड पाकिटात ठेवून व्यवहार करता येत नाही. हे कार्ड आपण कोणत्याही ठिकाणी निर्धास्तपणे वापरू शकतो.
अशी सेवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी हे कार्ड आपण पूर्वी व्यवहार करण्यास वापरत होतो त्याचप्रमाणे पिन चा वापर करून करता येईल तर ऑनलाइन व्यवहारासाठी एकदाच वापरायचा संकेतांक (OTP) घेवून व्यवहार पूर्ण करता येईल.
आपल्या बँकेने आपणास दिलेली ही सवलत बंद करता येत नाही परंतू आपली इच्छा नसल्यास कमी रकमेचे व्यवहार आपण पूर्वीप्रमाणे करू शकतो. त्याचप्रमाणें अशी सेवा कोणाला उपलब्ध करून द्यायची याचे सर्वाधिकार बँकेकडे असतात, सरसकट ही सेवा वित्तसंस्था सर्वाना देत नाहीत.
        कार्ड हरवले असता इतर कोणत्याही प्रकारची जोखीम यामध्ये आहे फक्त या व्यवहाराना   मर्यादा असल्याने तसेच असा व्यवहार झाल्याचा  संदेश संबंधित बँकेकडून येत असल्याने ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून ते तात्काळ बंद करता येईल. कार्डावरील CVV लक्षात ठेवून तेथून खोडला (गैरव्यवहार रोखण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे) असल्यास अन्य व्यवहार कोणालाही करता येणार नाहीत. एकदा कार्ड हरवल्याची तक्रार केल्यावर त्या कार्डचा वापर करून केलेल्या कोणत्याही व्यवहाराची जबाबदारी ग्राहकाची नाही सध्या बिगबाजार, सेन्ट्रल, कोस्ता कॉफी, मॅकडोनोल्डस, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स फ्रेश, इनोक्स, पिझा हट, सहकारी भांडार, स्टारबक्स, ट्रेंड्स या ठिकाणी या कार्डनी व्यवहार करायची सोय उपलब्ध आहे आणि दिवसेंदिवस अशा ठिकाणांची संख्या वाढत आहे.
          असे कार्ड किंवा अन्य कोणते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड घ्यावे का? घेतल्यास कोणती काळजी घ्यावी, त्याचा विमा घ्यावा का? त्याचे फायदे तोटे? यावर अनेक उलट सुलट चर्चा होत राहातीलच. त्यावर काय निर्णय घ्यायचा हे त्या  व्यक्तीवर अवलंबून आहे. याचे दुरूपयोग होऊ शकतात, खर्च वाढू शकतात, व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतात असे असले तरी या कार्ड मुळे तसेच त्याचा योग्य वापर केल्यास आपले जीवन सुसह्य होऊ शकले आहे  हे नाकारता येणार नाही. अनेक खाजगी बँकांबरोबर आता सरकारी क्षेत्रातील बँकांनी (SBI, BOI, PNB) आपल्या निवडक ग्राहकांना अशी कार्ड दिली आहेत. सन 2007 मध्ये युरोपमध्ये विकसित झालेले हे तंत्रज्ञान भारतात  पोहोचायला सन 2015 उजाडावे लागले. अलीकडे यात झपाट्याने वाढ होत असून ज्याच्याकडे असे कार्ड आहे किंवा भविष्यात ज्यांना असे कार्ड मिळू शकेल त्यांना यासंबंधीची अधिक माहिती मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच.

©उदय पिंगळे

अर्थसाक्षर येथे 27 डिसेंबर 2019 रोजी पूर्वप्रकाशीत.
     


         

Friday, 20 December 2019

गृहकर्ज परतफेड वेगळा विचार


गृहकर्ज परतफेड वेगळा विचार
       यापूर्वी आपण गृहकर्जाचे उपलब्ध विविध पर्याय पाहिले. जागांच्या वाढत्या किमती पाहता तूर्तास गृहकर्जास पर्याय नाही. हे दीर्घ कालावधीचे आणि घर तारण असल्याने, सर्वात सुरक्षित कर्ज असे समजण्यात येते. त्यामुळेच वित्तीय संस्था त्यास प्राधान्य देतात. त्यामुळे वित्तीयसंस्थेकडे पुढील कित्येक वर्षे सातत्याने आणि नियमितपणे पैसे येत राहतात. याउलट ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार कर्ज कोणाकडून घ्यावे यासंबंधीचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. या कर्जास उपलब्ध असलेल्या करसवलतींचा करदेयतेच्या दृष्टीने कर्जदारास फायदा करून घेता येतो. आपल्यावर कोणाचेही कर्ज असू नये, अगदीच घेण्याची वेळ आलीच तर ते लवकरात लवकर फेडून टाकावे अशा रीतीने आपल्यावर झालेले पिढीजात संस्कार आपली आर्थिक क्षमता वाढल्यावर स्वस्थ बसू देत नाहीत अनेक जण त्यांना उपलब्ध असलेले पर्याय वापरून अंशतः अथवा पूर्णतः लवकरात लवकर  कर्जमुक्त कसे होता येईल याचा प्रयत्न करतात. या शिवाय काही पर्याय आहे का? या संबंधीचा हा वेगळा विचार -
याआधीच सांगितल्याप्रमाणे  हे सर्वात स्वस्त आणि दीर्घकालीन कर्ज आहे त्यामुळे हे कर्ज फेडण्याच्या वाढीव कालावधीनुसार हप्ता कमी कमी होत जातो. म्हणजे कर्ज फेडण्याची मुदत जेवढी अधिक त्याप्रमाणे हप्ता कमी परंतू एकूण देय रकमेत वाढ होईल. सुरुवातीला याचे नियोजन अगदी काटेकोरपणे केले जाते यात आपली कर्ज घेण्याची जरुरी, हप्ता फेडण्याची पात्रता, किमान मासिक खर्च या साऱ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. कर्ज मुदतीपूर्वी काही प्रमाणात किंवा पूर्णपणे फेडावे का? यासंबंधीचे विचार काही दिवसांनी अकस्मात मिळालेले पैसे किंवा नोकरी बदलल्याने अगर वेतनवाढ झाल्याने उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे येण्यास सुरुवात होते.
     आर्थिक नियोजनकारांच्या मते कोणतेही कर्ज वेळेपूर्वी फेडणे कधीही चांगले परंतू गृहकर्ज हे त्यास अपवाद आहे. या कर्जाचा सर्वात कमी व्याजदर व करसवलत यांचा विचार करता कोणतेही गृहकर्ज घेताना, आपली त्यावेळची परतफेड क्षमता पाहून जास्तीत जास्त मुदतीचे घ्यावे यामुळे काही रक्कम आपल्याकडे अधिक शिल्लक राहिल. शिल्लक राहणारी रक्कम एस आय पी च्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवल्यास त्यामुळे भांडवल निर्मिती होऊन अधिक परतावा मिळू शकतो. अशा मोठ्या कालावधीसाठी किमान 12%  ते 15% वार्षिक परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. ते कसे ते उदाहरणासह पाहूयात. 8% व्याजदराने 1 लाख रुपये गृहकर्ज 10 वर्षाच्या मुदतीने घेतल्यास त्यासाठीचा समान मासिक हप्ता ₹ 1213/- होईल, तर व्याज परतफेड ₹ 45593/- म्हणून एकूण परतफेड ₹ 145593/- एवढी होईल. याच दराने हे कर्ज 20 वर्षं मुदतीचे घेतल्यास त्याचा हप्ता ₹ 836/- तर व्याज परतफेड ₹ 100746/- म्हणून एकूण परतफेड ₹ 200746/- एवढी होईल. हेच कर्ज 30 वर्ष मुदतीचे असेल तर त्याचा मासिक हप्ता ₹734/- एवढा म्हणजे व्याज परतफेड ₹ 164155/- एवढी तर एकूण परतफेड ₹ 264155/-एवढी होईल. समान व्याजदराच्या एका रकमेतील फरक हा 10 ते 20 वर्षांच्या कालावधीत ₹377/-  तर 10 ते 30 वर्षांच्या कालावधीत ₹ 479/- एवढा असेल.
      वरील उदाहरणातून समान मासिक हप्त्याच्या (EMI) रचनेत वीस वर्षांहून कमी कालावधीसाठी कर्ज घेतल्यास 'व्याज कमी मुद्दल जास्त' 20 वर्षाच्या कालावधीत 'मुद्दल आणि व्याज समप्रमाणात' तर 20 वर्षांहून अधिक काळासाठी घेतलेल्या कर्जास  'व्याज अधिक व मुद्दल कमी' अशी रचना असते त्यामुळेच चक्रावून टाकणारा फरक पडतो. आईसस्टाईन या शास्त्रज्ञाने चक्रवाढव्याज हे जगातील आठवे आश्चर्य असल्याचे सांगितले ते  यामुळेच. समान मासिक हप्त्यात असलेला हा फरक ₹377/- इक्विटी म्युच्युअल फंडांच्या योजनेत 20 वर्षासाठी मासिक एस आय पी च्या माध्यमातून गुंतवल्यास 12% परतव्याने ₹ 376679/- एवढे मिळतील त्यामुळे जास्तीचे व्याज म्हणून दिलेले ₹ 100746/- पूर्णपणे वसूल होऊन ₹ 275933/- एवढे शिल्लक राहतील ₹479/- 30 वर्षाच्या मासिक एस आय पी च्या माध्यमातून गुंतवल्यास 12% परताव्याने ₹ 1690828/- एवढे मिळतील त्यामुळे व्याज म्हणून देऊ केलेले ₹ 164155/- देऊन ₹ 1426673/- एवढी रक्कम शिल्लक राहिल. जर हाच परतावा यापेक्षा अधिक मिळाला तर या आकडेवारीत मोठा फरक पडेल. याप्रमाणे वेगवेगळ्या कालावधीसाठी EMI आणि SIP याची मोजदाद करता येईल. यासाठी असे कॅलक्युलेशन करणारी अँप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. ही फक्त 1 लाख रुपयासाठी काढलेली आकडेवारी आहे. आपल्या आर्थिक प्रवाहात कोणताही फरक न पडता या पद्धतीने कर्जाच्या हप्त्यातून भांडवलनिर्मिती करता येणे शक्य आहे. या सर्व कालावधीत आयकरात मिळणारी सवलत किंवा मिळालेल्या अधिकच्या रकमेवर द्यावा लागणारा कर याचा विचार केला नसला तरी या गोष्टी विचारात घेतल्या तर मिळणारा अप्रत्यक्ष फायदा याहून अधिकच असेल. सर्वसाधारण गृहकर्ज घेण्याचे प्रमाण ₹ 15 ते 70 लाख असेल तर त्याप्रमाणे 15 ते 70 पट फरक पडेल. यावरून या विषयाची व्याप्ती लक्षात येईल.
       याचप्रमाणे एकरकमी (Onetime) किंवा अंशतः (Part) परतफेड न करता ही रक्कम डेट फंडात एकरकमी गुंतवून नियमितपणे गुंतवणूक मोडून (SWP) त्या रकमेची नियमित इक्विटी फंडात गुंतवणूक SIP केल्यास मूळ रक्कम शिल्लक राहील त्यात डेट फंडातून 8% व इक्विटी फंडातून 12% परतावा मिळेल अथवा बॅलन्स इक्विटी फंडात एकरकमी गुंतवणूक करावी सध्या अशा योजनांमधून 11 ते 14% परतावा मिळत आहे. तेव्हा या संधी सोडून कमी व्याजदाराच्या कर्ज फेडण्यात फारसे हित नाही. पूर्ण कर्ज फेडले तर वाचणाऱ्या पूर्ण रकमेची नियमित गुंतवणूक होईल याची खात्री देता येत नाही तर अंशतः परतफेड केल्यास समान मासिक हप्ता कमी न होता त्यांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात होणाऱ्या घटत्या मूल्याची आताच्या दराने किंमत चुकवावी लागेल. तेव्हा कर्जाची फेड पूर्वीप्रमाणे नियमित होत राहील असे पाहावे. ही सगळीच आकडेवारी समजायला कठीण असली समजून घेणे अगदीच अशक्य नाही. केवळ समजायला सोपे जावे म्हणून अगदी कमी रक्कम उदाहरण म्हणून घेतली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे एवढेच-
★गृहकर्ज कमी मुदतीच्या ऐवजी जास्तीतजास्त मुदतीचे घेऊन आपल्याला परवडणाऱ्या हप्त्याची, कर्जफेड आणि इक्विटी म्युच्युअल फंडांच्या योजनेत गुंतवणूक अशी विभागणी करावी. यामुळे गृहकर्ज हा बोजा न वाटता गुंतवणुकीचे साधन बनेल. यातून मिळणारा परतावा खात्रीशीर नसला तरी तो दीर्घकाळात तो 12% हून अधिक मिळेल असा अंदाज आहे.
★कर्जाची एकरकमी किंवा अंशतः परतफेड न करता ती पूर्वीच्या पद्धतीने नियमितपणे करून जास्तीच्या रकमेची वेगळी गुंतवणूक करावी.
★यापूर्वी आपण कमी मुदत असलेले कर्ज घेतले असेल आणि त्यापेक्षा कमी दराने जास्त मुदतीचे कर्ज मिळू शकत असेल तर त्याप्रमाणे बदलून घ्यावे. ज्यामुळे वरील प्रकारे गुंतवणुक करून  आपल्याला अधिक फायदा करून घेता येईल.
©उदय पिंगळे
        

Friday, 13 December 2019

कार्ड सुरक्षितता योजना

कार्ड सुरक्षितता योजना
Card Protection Plan

           अनेक प्रकारच्या कार्डनी आपले जीवन व्यापून टाकलं आहे. बऱ्याच ठिकाणी आवश्यक म्हणून पॅनकार्ड, आधारकार्ड आहे. तर वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आहे. गाडीचे नोंदणी प्रमाणपत्रही आपल्याला स्मार्टकार्डच्या स्वरूपात मिळते. लोकल, मेट्रो, बस यांच्या प्रवासाकरिता वेगवेगळी कार्डस आहेत. याशिवाय तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणांमुळे बँकिंग व्यवहारासाठी ए टी एम कम डेबिट कार्ड आणि आपल्याकडे एकही पैसा नसताना थेट किंवा हप्त्याने खरेदी करण्यासाठी, अडीअडचणीला पटकन रोख पैसे  काढण्यासाठी किंवा माझ्याकडे अमक्या तमक्याचे कार्ड आहे अशा फुशारक्या मारण्यासाठी क्रेडिट कार्ड आहे. बरं ही कार्ड आपल्या आवश्यकते एवढी आहेत का? यातील किती कार्डची आपल्याला आजिबात गरज नाही याचा कोणी विचारही करत नाही. जास्तीत जास्त कार्ड असतील तर आपली प्रतिष्ठा वाढते अशी अनेकांची भ्रामक समजूत आहे. या कार्डांमुळे आपले जीवन खरच सुलभ झालंय का? या गोष्टींचा खरोखरच विचार करण्याची गरज आहे. असं असलं तरी प्रत्येकाची किमान 5/6 कार्डपासून तरी सुटका नाहीच.

            कार्डांमुळे अनेक गोष्टी सुखकारक झाल्या आहेत त्यामुळे येणारी नवी पिढी, सध्या ज्यांचे वय 18 ते 45 चे आसपास आहे ते लोक आणि कोणत्याही वयाच्या टेक्नोसेव्ही व्यक्ती व्यवहार करण्यासाठी सध्या आणि यापुढेही याचा वापर करतीलच. जोपर्यंत ही कार्ड आपल्याकडे सुरक्षित असतात तोपर्यंत आपली खर्च करण्याची ताकद आणि आत्मविश्वास वाढलेला असतो. अनेकांना त्यांच्या जरुरीपेक्षा जास्त किंवा सर्वच कार्डस जवळ बाळगायची हौस असते याचा सर्वात मोठा तोटा हा की पाकीट हरवल्यास एका झटक्यात सर्व कार्ड नाहीशी होतात. यातील काही कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून त्याचा प्राथमिक अहवाल घेणे, दुसरे कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करणे, यासाठी प्राधान्याने वेळ काढावा लागतो. जर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर ते ताबडतोब बंद करावे लागते. ही प्रक्रिया होईपर्यंत त्यावर एखादा व्यवहार झाला तर नुकसान सहन करावे लागते. डेबिट/ क्रेडिट कार्डवरून काही ऑनलाइन व्यवहार हे त्यावरील सी वी वी चा वापर करून होऊ शकतात. याशिवाय जर आपण प्रवास करीत असलो किंवा अन्य शहरात असलो तर आपली फारच मोठी गैरसोय होऊ शकते. याशिवाय होणारा मनस्ताप वेगळाच.

       बँकेचे व्यवहार करताना घ्यायची काळजी या माझ्या यापूर्वीच्या लेखात आपल्या गरजेनुसार कार्ड व्यवहारांपासून संरक्षण देणारा विमा घ्यावा असे सुचवले होते. या योजना कशासाठी? त्यांची गरज काय? या विषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. बँका, बिगर बँकिंग कंपन्या यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या सहकार्याने अशा योजना आणल्या आहेत. जर आपले डेबिट / क्रेडिट कार्ड हरवले तर साधारणपणे व्यक्ती गोंधळून जाते आणि त्याला नेमके, प्रथम काय करायला हवे ते सुचत नाही. कार्ड ताबडतोब बंद करण्यासाठी ते देणाऱ्या संस्थेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून त्यावरील व्यवहार थांबवायचे (Block) असतात. असे करण्यापूर्वी झालेल्या व्यवहाराची सर्व जबाबदारी ग्राहकाची असून कार्ड हरवल्याची सूचना दिल्यानंतर जर असा व्यवहार झाला, तर त्याची जबाबदारी ग्राहकावर येत नाही. अशी अनेक कार्ड असतील तर त्या प्रत्येक ठिकाणी अशी वेगळी सूचना देणे गरजेचे असते. यावेळी कार्ड सुरक्षितता योजनेची आपल्याला मदत होऊ शकते. अशी योजना घेऊन आपण आपली सर्व कार्ड आधीच सुरक्षित करून ठेवू शकतो.

         कार्ड सुरक्षितता योजना हा एक सर्वसाधारण विम्याचा करार असून त्यामुळे आपले क्रेडिट /डेबिट कार्ड, योजना सदस्यत्वाचे कार्ड चोरीस जाणे, हरवणे, गैरव्यवहार होणे यापासून संरक्षण मिळते. यासाठी फी म्हणून दरवर्षी निश्चित रक्कम भरावी लागते. यामुळे ही योजना घेणाऱ्यास
 कार्ड व्यवहारापासून संरक्षण आणि तातडीची आर्थिक मदत असा दुहेरी फायदा होतो. आपल्या गरजेनुसार अशा अनेक प्रकारच्या योजना सध्या उपलब्ध आहेत. या योजनांची वैशिष्ट्ये--

★सर्व प्रकारच्या कार्डाचा समावेश: या योजनेत आपल्याकडील सर्व कार्डाचा समावेश होतो जसे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ई.

★तुलनात्मक दृष्टीने अत्यल्प प्रिमियम: या साठी येणाऱ्या खर्च अत्यल्प असून वार्षिक ₹ 899/- पासून अशा योजना उपलब्ध आहेत.

★कार्ड व्यवहार बंद करणे सोपे: एकदा या योजनेत भाग घेऊन आपल्या सर्व कार्डाचा तपशील दिला असता जर कार्ड हरवले चोरीस गेले तर विमा कंपनीस कळवले की आपली जबाबदारी संपते. ही सर्व कार्ड आपल्या वतीने कंपनीकडून बंद केली जातात. त्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी फोन करावे लागत नाहीत.

★कार्ड नवीन मिळवण्यासाठी मदत: बंद करण्यात आलेल्या कार्डाऐवजी दुसरे कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत विमा कंपनीकडून केली जाते.

★कार्ड बंद करण्यापूर्वी आपण न केलेल्या व्यवहाराची भरपाई: कार्ड चोरीस जाणे, हरवणे ते ते बंद करण्याच्या कालावधीत काही गैरव्यवहार झाला असेल तर विमा कंपनीकडून त्याची भरपाई केली जाते.

★तात्पुरती आर्थिक मदत: आपण बाहेरगावी असताना कार्ड हरवल्यास जरूर तर रोख रक्कम, प्रवास खर्चाची सोय, हॉटेल बिलची भरपाई 24 तासात केली जाते. या रकमेची पूर्तता ही मदत घेतल्यापासून 28 दिवसात करायची असून त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही.

★पॅनकार्ड हरवल्यास आपल्या वतीने अर्ज करून दुसरे पॅनकार्ड मिळाव्यात येते यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

             योजनेची रचना कमीजास्त प्रमाणात  वरीलप्रमाणे असून आपल्याला योग्य वाटेल अशा योजनेचा अर्ज भरून देऊन अथवा ऑनलाइन भरून त्याचा प्रीमियम भरावा. आपली विनंती मान्य झाली की एका बंद पाकिटातून आपल्याला मान्यता पत्र, नियम अटी यांची माहिती येईल. त्याचप्रमाणे आपल्या सर्व कार्डाचा तपशील द्यावा लागेल. एकदा का हा तपशील विमा कंपनीस दिलात की आपण निर्धास्त राहू शकाल. योजनेत नमूद केलेल्या सेवा, जोखीम हमी, कमाल नुकसानभरपाई, तातडीची मदत यावर प्रिमियम रक्कम ठरत असल्याने विविध योजनांची तुलना करून आपल्या उपयोगी पडेल अशीच योजना निवडावी.

©उदय पिंगळे

Friday, 6 December 2019

बँक व्यवहार करताना घ्यायची काळजी


बँकेचे व्यवहार करताना घ्यायची काळजी

         बँक व्यवहार करताना सर्वसाधारणपणे घ्यायची काळजी---
■क्रेडिट/ डेबिट कार्ड पिन लक्षात ठेवणे आवश्यक असून तो कार्डवर अथवा कव्हरवर लिहून ठेवू नये.
■ATM मशीनच्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू असल्यास बारकाईने पाहणे जरुरीचे आहे. अनेकदा  कार्ड ठेवण्याच्या खाचेवर तसेच पिन नंबर रेकॉर्ड करू शकेल अशी छोटी उपकरणे तेथे बसवली असण्याची शक्यता असते. नीट पाहिले असता ती समजतात.
■सायबर कॅफे/ रेल्वे स्टेशन, हॉटेल येथील वाय फाय यांचा वापर करू नये. यासाठी व्यक्तिगत नेट पॅक वापरावा. काही कारणाने अपवादात्मक परिस्थितीत असे नेटवर्क वापरावे लागले तर पासवर्ड /पिन ताबडतोब बदलावा.
■पासवर्ड/ पिन वेळोवेळी बदलणे ही चांगली सवय असून पासवर्ड कोणालाही ओळखण्यास कठीण परंतू आपल्याला लक्षात ठेवायला सोपा असा असावा.
■आपली गोपनीय माहिती जसे की पॅन, आधार, कार्ड नंबर, सी वी वी मागणाऱ्या मेलना उत्तर देऊ नये. असे मेल कोणाकडून आले, त्यात आपल्याला काय संबोधले आहे यात एखादी लिंक आहे का? ते पाहावे. अशी लिंक ओपन करू नये. अशा प्रकारच्या मेल बनावट असण्याची जास्त शक्यता असते. बँक कधीही अशी माहिती मेलवर मागवत नाही.
■अपुरे रद्द झालेले व्यवहार निदर्शनास आल्यास आपल्या बँकेच्या ताबडतोब लक्षात आणून द्यावेत. कोणत्याही ए टी एम मधून पैसे न मिळाल्यास ते ए टी एम कोणत्या बँकेचे आहे हे विचारात न घेता आपल्या बँकेकडे लेखी अथवा मेलवर तक्रार करावी. लेखी तक्रारीची पोहोच घ्यावी ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार केल्यास तक्रार क्रमांक घ्यावा. हे पैसे 5 कामकाजाच्या दिवसात ग्राहकास परत मिळायला हवेत. रद्द झालेल्या IMPS आणि UPI व्यवहाराचे पैसे 24 तासात परत मिळाले पाहिजेत. यानंतर होणाऱ्या दिरंगाईसाठी ₹100 प्रति दिवस एवढी नुकसान भरपाई द्यावी लागेल. हेच नियम ऑनलाइन व्यवहारांनाही लागू आहेत. प्रत्येक बँकेकडे Transaction Dispute Form असतो जो मागणी केल्याशिवाय बँक स्वतःहून देत नाही तो भरून द्यावा.
■स्थानिक किंवा सर्व शाखांत सममूल्यास देय चेक त्याच दिवशी किंवा उशिरात उशिरा कामकाजाच्या पुढील दिवशी खात्यात जमा होणे आवश्यक आहे.
■व्यवहार शुक्ल व्याजदर त्यातील बदल याची त्वरित माहिती ग्राहकांना मिळणे आवश्यक असून बँकेच्या दर्शनी भागात सर्वाना सहज दिसेल अशा ठिकाणी ती लावलेली असली पाहिजे.
■क्रेडिट कार्ड मर्यादेत वापरून पूर्ण बिल भरणे आवश्यक तारखेपूर्वी भरावे अन्यथा भरमसाठ व्याजदराने रक्कम चुकवावी लागते. (36 ते 42%)
■ड्रॉपबॉक्स सोय असलेल्या ठिकाणी ग्राहकाची मागणी असल्यास काउंटरवर चेक स्वीकारून पावती मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे.
■पुढील तारखेचे धनादेश दिले असल्यास, खात्यात त्या दिवशी पुरेशी शिल्लख असणे आवश्यक असून चेक न वटता परत गेल्यास दंड आकाराला जातो.
■विविध कारणे सांगून जसे की कार्ड बंद होणार आहे, आयकर परतावा मिळणार आहे, बक्षीस लागले आहे, कार्ड लिमिट वाढवायचे आहे अशी किंवा अन्य कोणतीही कारणे सांगून फोनवर कार्ड तपशील,ओ टी पी मागणाऱ्यास तो देणे अत्यंत धोकादायक असून अशी माहिती फोनवरून ग्राहकास कधीही विचारली जात नाही.
■ग्राहकाच्या परवानगीशिवाय मूल्यवर्धित सेवा देण्यास प्रतिबंध आहे.
■व्यवहार करताना पिन स्वतः टाकणे आवश्यक. खरेदी करताना आपला कार्ड तपशील कोणी लिहून घेत नाही ना त्यावर लक्ष ठेवावे. अनेकजण पिन विक्रेत्यास टाकायला सांगतात, असे करू नये.
■धनादेश देणाऱ्याने त्यावरील रक्कम अंकात व अक्षरात स्वहस्ते लिहिणे गरजेचे असून सही केलेले कोरे चेक कोणालाही देऊ नयेत.
■कार्ड स्टेटमेंट तपासून सर्व व्यवहार आपणच केले असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.
■फोटो असलेले क्रेडिट /डेबिट कार्ड घेण्यास प्राधान्य द्यावे त्याच्या मागील भागातील चौकोनात सही करणे आवश्यक असून कार्डावरील सी वी वी खोडावा. कार्डसंबंधीत ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक आपल्या फोनबुकमध्ये जतन करावा तसेच अन्य सर्व तपशील सुरक्षित ठिकाणी (मोबाईलमध्ये नव्हे) ठेवावा.

■संपर्क क्रमांक बदलल्यास त्याची नोंद बँकेत लगेच करणे आवश्यक असून अशी नोंद केल्यावर त्यावर  व्यवहार केल्याचे संदेश येतात की नाही ते तपासावे.
■कार्ड वापरायचे नसल्यास बँकेस परत देऊन त्याची पोहोच घेणे महत्वाचे असून फेकून द्यायचे असल्यास त्यावरील मॅग्नेटिक स्ट्रीप तोडून त्याचे बारीक तुकडे करावेत.
■कार्डाची पाठपोट कॉपी मेलवर अथवा whatsapp वरून पाठवणे धोकादायक आहे.
■ATM व्यवहार करताना अन्य त्रयस्थ व्यक्तींना प्रतिबंध असून यात बँक कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांचाही समावेश होतो. पैसे काढण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये.
■बाहेर जाताना आवश्यक तेवढीच कार्डस बरोबर न्यावीत म्हणजे यदाकदाचित एखादे कार्ड गहाळ झाले तरी अन्य कार्ड सुरक्षित राहतील.
■कार्ड हरवल्यास ती वापरण्यास ताबडतोब वापरण्यास प्रतिबंधित (block) करणे आवश्यक आहे.
■व्यवहारासाठी सुरक्षित संकेतस्थळ वापरणे योग्य.https:/ ने सुरुवात होणारी निळ्या रंगाचे कुलूप असलेली सर्व संकेतस्थळे सुरक्षित आहेत. पैसे ensripted payment gatway च्या माध्यमातून पाठवावेत.
■जेथे ओ टी पी मागितला जातो असे व्यवहार अधिक सुरक्षित असून शक्य असेल तर सर्व व्यवहार या माध्यमातून करावेत.
■जरूरीप्रमाणे कार्ड व्यवहाराचा विमा उतरवणे आवश्यक असून यामुळे कार्ड हरवल्यास त्याची नोंद करेपर्यंत आपण न केलेले व्यवहार, त्याचप्रमाणे तात्पुरती पैशाची गरज भागवली जाते. त्याचप्रमाणे आपल्या वतीने सर्व कार्ड मिळवण्याची सोय विमाकंपनीकडून केली जाते. ज्यांचे व्यवहार मोठया प्रमाणात आहेत त्यांनी या सोईचा फायदा घ्यावा.
■बँकिंग व्यवहार करीत असलेल्या मोबाइल, कंप्युटरकरिता योग्य अँटीव्हायरस असलेले अँपलिकेशन वापरणे जरुरीचे आहे.
■सेवेसंबधी तक्रार उद्भवल्यास, तिचे निवारण करणारी व्यवस्था यांची माहिती असणे आवश्यक असून यासंबंधीची तक्रार शाखापातळीवर सोडवावी यासाठी लेखी अर्ज देऊन त्याचा पाठपुरावा करावा एक महिन्यात त्यांनी काही निर्णय न दिल्यास किंवा त्यांचा निर्णय मान्य नसेल तर बँकिंग लोकपाल, रिजर्व बँक यांच्याकडे तक्रार करता येईल. अशा तक्रारी ग्राहक न्यायालयातही दाखल करता येतात याशिवाय नियमित कायदेशीर कारवाई करता येते. या सर्व तक्रारी ऑनलाइन माध्यमातूनही करता येणे शक्य असून त्याचा चिकाटीने पाठपुरावा करावा.
©उदय पिंगळे
arthasakshar.com येथे 6 डिसेंबर 2019 रोजी पूर्वप्रकाशीत.