Friday, 31 May 2019

विशेष मुलांच्या भविष्याची तरतूद

#विशेष_मुलांच्या_भविष्याची_तरतूद

        जगातीक आरोग्य संघटनेच्या अलीकडील अहवालानुसार जगभरात 15% लोकांत काहीतरी शारीरिक किंवा मानसिक कमतरता आहे. यातील 2.5% लोक कोणतेही काम करू शकत नाहीत. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या 2.21% लोक यात 56%(1.5 कोटी) पुरुष तर 46% (1.18 कोटी)  स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अत्यल्प असली तरी त्यांच्यापुढील आणि त्यात सामाविष्ट मुलांच्या पालकांपुढील समस्या अधिक  गंभीर आहेत. आयकर कायद्यानुसार विशेष  व्यक्तीना व्यक्तिगत, तर ते ज्यांच्यावर अवलंबित आहेत त्यांना आयकरात काही सूट देण्यात आली आहे. अनेक राज्य सरकारांनी व्यवसाय करातून त्यांना वगळले आहे. त्यांच्या कल्याणासाठी काही सोई सवलती देण्यात आल्या आहेत जसे नोकरी, शिक्षण यात राखीव जागा, परीक्षेसाठी लेखनिक घेण्याची परवानगी, काही विषयात सूट, परीक्षेसाठी जास्त वेळ, कर्ज मिळण्यात प्राधान्य, व्याजात सवलत, प्रवासखर्चात सवलत इत्यादी. यासर्व कल्याणकारी योजना असून यासर्वाचा अशा व्यक्तिंना लाभ घेता येऊ शकतो.
      अशा विशेष मुलांचे बरेच प्रकार आहेत त्यानुसार प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत.
*त्यांच्या अपंगत्वाची टक्केवारी किती आहे?
*जे जन्मजात आहे की नंतर आले आहे ?
*ते आयुष्यभर तसेच राहील की बरे होण्याची शक्यता आहे.
*या व्यक्ती स्वताची कामे स्वतः करतील? की कुणावर अंशतः अवलंबून असतील? की पूर्णपणे परावलंबीत असतील.
*ते काही व्यवसाय कौशल्य शिकू शकतील की ज्यामुळे त्यांना सन्मानाने जगता येईल.
*पालकांचे उत्पन्न त्यांना मिळणाऱ्या इतर सोयीसुविधा.
*तयांची काळजी घेण्यासाठी हमखास उपलब्ध मनुष्यबळ.
या विषयाची व्याप्ती बरीच आहे. ज्यांची मुले *विशेष* आहेत त्याच्यासाठी गुंतवणुकीच्या वेगळ्या योजना आहेत का याचा शोध घेतला असता दुर्दैवाने अशी कोणतीही योजना नाही. सर्वसाधारण मुलांसाठी गुंतवणुकीच्या असलेल्या पर्यायावर मागे आपण विचार केला होता.  विशेष मुलांचा विचार करता यात, फक्त गुंतवणूक कशासाठी ? ही त्याची उद्दिष्टे बदलतील. उत्तराचे पर्याय पी पी एफ, म्युच्युअल फंड योजना आणि शेअर्समध्ये थेट गुंतवणूक यांच्या टक्केवारीत सुयोग्य विभागणी हेच राहातील. याशिवाय अधिक काय काय अधिक करता येऊ शकेल याचा विचार करूया. यासर्वात आपली गरज काय? त्यासाठी किती रक्कम लागेल? याचबरोबरीने पाल्याच्या व्यतिरिक्त स्वतःच्या गरजा आणि निवृत्ती याचा विचार करावा लागेल. यासाठी व्यावसायिक तज्ञाची मदत घेता येईल. ज्यातून निश्चित परतावा मिळेल अशी कोणतीही योजना त्यांनी कितीही दावा केला तरी 7 ते 8.5% हून अधिक परतावा असणारी नाही. काही योजना दरसाल 9 ते 15% पर्यंत परतावा देत असल्याचा दाखवीत आहेत परंतू तो विलंबित काळाने देत असल्याने अप्रत्यक्ष परतावा फारच कमीच आहे. तेव्हा आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करावे. यापूर्वी जीवन विमा मंडळ (LIC) आणि भारतीय युनिट ट्रस्ट (UTI) यांच्या हमखास 10 ते 12% परतावा देणाऱ्या योजना होत्या. त्या बंद झाल्या असून ज्यांनी पूर्वीच या योजना घेतल्या त्यांनी त्या चालू ठेवाव्यात. आपल्या मुलांमध्ये कमतरता आहे, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे या वास्तवाचा, मनाने स्वीकार करावा. आयकर कायद्यानुसार मिळणारे लाभ घ्यावेत. त्यासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळवावीत.
*पालकांचा मुदत विमा: आपल्या वार्षिक उत्पन्नचा विचार करून पुरेशा रकमेचा टर्म इन्शुरन्स पालकांनी काढावा. सर्वसाधारण मुलाच्या खर्चापेक्षा या मुलांना खर्च अधिक येतो यात कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास आर्थिक बाजू एकदमच कमकुवत होते.
*आरोग्य विमा: वैद्यकीय खर्चाची तरतूद आपल्या मालकाकडून असेल तर ठीक नाहीतर पुरेसा आरोग्यविमा काढावा. किती आरोग्यविम्याची गरज आहे याचा अंदाज घ्यावा. काही विशिष्ट आजार असलेल्या विशेष मुलांच्या वैद्यकीय खर्चासाठी 1 लाख रुपयांची मेडिक्लेम योजना (निरामय)  सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून उपलब्ध आहे त्यांची अंमलबजावणी सामाजिक संस्थाच्या मार्फत करण्यात येते. स्टार हेल्थ इन्शुरन्स कडून स्वमग्नता असलेल्या 3 ते 25 वर्षांच्या विशेष मुलांसाठी 3 लाख रुपयांचा मेडिक्लेम उपलब्ध आहे. ज्याचा वयानुसार याचा वार्षिक प्रीमियम कर वगळता ₹4800 ते ₹6075/- आहे.
*सामाजिक न्याय व कल्याण या विभागाकडून, अपंगांसाठी कमी व्याजदाराचे कर्ज, संगोपन केंद्र, कायमस्वरूपी निवारा , शिष्यवृत्ती, आर्थिक मदत या योजना असून आपल्या गरजेप्रमाणे भविष्यात त्यांचा लाभ घेता येईल का? ते पाहावे.
*या मुलांना भविष्यात काही कमाई करता येईल असे शिक्षण आणि  उद्योगासाठी लागणारे भांडवल याची उभारणी करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावेत. हे आपल्यावर आलेले संकट असे न समजता एक आव्हान म्हणून ते स्वीकारावे.
* विशेष मुलांच्या कल्याणासाठी वेगळ्या न्यासाची (Trust)  निर्मिती करावी. त्याची कार्यपद्धती कशी असावी? त्यावर सदस्य कोण असावेत ? ते आपल्या मुलांची काळजी कशी घेतील?  कुटूंबाबाहेरील व्यक्ती ट्रस्टी म्हणून असल्यास त्याचे मानधन किती असावे ? ते ठरवावे. ट्रस्टला स्वतंत्रपणे ओळख असल्याने त्यास कायद्याने मिळणारे लाभ मिळतील.
*आपल्या वैयक्तिक मालमत्तेची कोणत्या पद्धतीने विभागणी व्हावी यासाठी इच्छापत्र बनवावे. विशेष मुलांचा खर्च अधिक होत असल्याने संपत्तीतील अधिक वाटा त्यांना देता येईल. असे इच्छापत्र न बनवल्यास आपल्या संपत्तीचे हसत्तांतरण न होता मालमत्तेची समान वाटणी वारसाहक्क कायद्याने (Succession law) होईल.
* आपल्या नंतर मुलाचे कायदेशीर पालकत्व (Legal guardianship) कोणाकडे असावे याचाही विचार करून ठेवावा त्याप्रमाणे तरतूद करावी.
*जर मुलाचे आईवडील दोघेही नोकरी करत असतील तर सांभाळ करण्यासाठी कदाचित एकाला नोकरी सोडावी लागेल तेव्हा यामुळे उत्पन्नात होणारी घट याचा विचार करावा त्याचबरोबर त्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी काही पर्याय आहेत का? याचा शोध घ्यावा.
*अशा मुलांच्या पालकांचे स्व मदतगट (Self help  groops) आहेत त्यामध्ये सामील होऊन आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करावी. असे काही गट IPH ठाणे यांनी तयार केले आहेत.
      विशेष मुलांचे संगोपन, संवर्धन आणि पुनर्वसन ही सोपी गोष्ट नाही. यासाठी लागणारा पैसा हे एक साधन आहे, साध्य नाही. केवळ पैशांचा कमतरतेमुळे  अनेक मुले सामाजिक व्यवस्थेच्या बाहेर फेकली जात असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत हे आपले कर्तव्य आहे.

©उदय पिंगळे

(विशेष मुलांच्या पालकांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने सदर लेख लिहिला असून यात सुचवलेल्या योजनांची शिफारस नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी सविस्तर चर्चा करावी.)
मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 31 मे 2019 रोजी पूर्वप्रकाशीत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .


      

Friday, 24 May 2019

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) नवे बदल
        एन पी एस ही सरकार पुरस्कृत सामाजिक सुरक्षितता योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर हमखास आणि नियमितपणे निवृत्तीवेतन मिळावे, आवश्यकता असल्यास एकरकमी रक्कम मिळावी हा या योजनेचा हेतू आहे. 1 एप्रिल 2004 नंतर सरकारी नोकरी  स्वीकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना (संरक्षण विभागातील कर्मचारी वगळून) ही योजना सक्तीने  लागू करण्यात आली आहे. या योजनेची माहिती आपण यापूर्वीकरून घेतली आहे. ती माहिती आपल्याला- लेखाखालील लिंकवर जाऊन वाचता येईल.अन्य पेन्शन योजनांच्या तुलनेत या योजनेत काही त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करण्यात आल्या असून काही नवीन सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही योजना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षित झाली आहे. तेव्हा हे महत्वाचे बदल कोणते त्याचा आपण आढावा घेऊयात.
*योजना वर्गणीत वाढ : सरकारी कर्मचारी किंवा आपल्या कामगारांसाठी ही योजना ऐच्छिकरित्या स्वीकारलेल्या खाजगी कंपन्या (कॉर्पोरेट मॉडेल) यांना त्यांच्या मूळ पगार + महागाई भत्ता यांच्या किमान 10%  वर्गणी कर्मचारी व व्यवस्थापन यांच्याकडून प्रत्येकी भरली जात असे 1 एप्रिल 2019 पासून यात सरकारने बदल केला असून आता व्यवस्थापनाचे योगदान मूळ पगार व महागाई भत्याच्या 14% एवढे राहील. मालकाला त्याच्या योगदानासाठी मिळणारी करसवलत आणि कर्मचाऱ्यांना मिळणारी करसवलत, निश्चित वयानंतर मिळणारे निवृत्तीवेतन व एकरकमी करमुक्त रक्कम हे या योजनेचे आकर्षक आहे.
*फंड मॅनेजरच्या संख्येत वाढ : योजना व्यवस्थापक म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना ( कॉर्पोरेट मॉडेल) तीन फंड मॅनेजरपैकी एकाची तर सर्वसाधारण व असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना (ऑल सिटीझन मॉडेल) सहा फंड मॅनेजरपैकी एकाची निवड करता येत होती. आता या दोघांनाही 8 पैकी एका फंड मॅनेजरची निवड करता येईल. फंड व्यवस्थापनाने आपणास अपेक्षित कामगिरी न केल्यास त्यात बदल करता येऊ शकेल.
*योजनेतील समभागांच्या टक्केवारीत वाढ : या योजनेचे कार्य म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स योजनेनुसार असेल अशी रचना करण्यात आली आहे. यापूर्वी योजनेतील समभाग गुंतवणूक मर्यादा सरकारी कर्मचाऱ्यांना 15% तर सर्वसाधारण व्यक्तींना 50% होती(Active choise). तसेच याच मर्यादेत समभाग गुंतवणुकीची मर्यादा ठरवण्याचे स्वातंत्र्य होते किंवा आपल्या जीवनचक्रानुसार (Life cycle) समभागात गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य होते (Auto choise). यात आता  जीवनचक्रानुसार 25%,50%, 75% समभागात गुंतवणूक करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना तो 50% तर इतरांना 75% पर्यंत वाढवता येऊ शकतो. यामुळे समभाग टक्केवारी वाढल्याने परतावा  मिळण्याची शक्यता वाढते.
*योजना पूर्तीतील 20% करप्राप्त रक्कम आता करमुक्त : योजनेच्या पूर्तीनंतर 40% जमाराशीची पेन्शन योजना आणि 60% रक्कम एकरकमी घेता येत असे.यातील एकूण रकमेच्या 20% रक्कम करप्राप्त होती आता ती करमुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता यातील गुंतवणूक, वाढ आणि मुदतपूर्ती तिन्ही करमुक्त झाल्याने ही योजना पी एफ, पी पी एफ आणि ई एल एस इस च्या समकक्ष झाली आहे.
*योजनेतून करमुक्त उचल मिळण्याची सवलत : योजनेत तीन वर्षं पूर्ण करणाऱ्या सभासदास त्याच्या आणि मालकाच्या, जमा व लाभ रकमेच्या 25% रक्कम सुयोग्य कारणासाठी (लग्न, घरबांधणी, आजारपण, शिक्षण) काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाच वर्षांच्या अंतराने एकूण तीनवेळा अशी रक्कम गरजेनुसार काढता येऊ शकेल ती पूर्णपणे करमुक्त असेल. यामुळे मोठा आकस्मित खर्च भागवता येऊ शकेल.
*किमान गुंतवणूक रकमेत घट : यातील टियर -1 खात्यात वार्षिक किमान ₹6000/- तर टियर -2 मध्ये  वार्षिक किमान ₹2000/- भरण्याचे बंधन होते. ही मर्यादा टियर -1 मधील कॉर्पोरेट खात्यास ₹500/- तर सर्वसाधारण खात्यास ₹1000/- करण्यात आली असून टियर-2 मधील खात्यास ₹250/- इतकी कमी करण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक लोकांना हे खाते चालू ठेवणे सोपे जाईल.
*अनिवासी भारतीयांना हे खाते काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
        या प्रमाणे काही बदल करून सवलती देण्यात आल्याने ही योजना आता अधिक आकर्षक झाली आहे. आशा अन्य योजनांचा मिळणारा सध्याचा परतावा हा पी एफ मधून 8.65%, पी पी एफ मधून 8% निश्चित आहे. ई एल एस एस  मधून बाजार जोखमीसह 10 ते 12%  अपेक्षित आहे तर गेल्या 35 हुन अधिक वर्षात निर्देशांकापासून मिळालेला परतावा हा 14 % हून अधिक असल्याने दीर्घकाळात चांगला परतावा या योजनेतून मिळू शकेल अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नसावी. याशिवाय यातील टियर-1 मधील गुंतवणूकीस 80CCD-2 नुसार 50 हजार रुपयांची अतिरिक्त करसवलत मिळत असल्याने ज्यांचे उत्पन्न अधिक त्यांना मिळणाऱ्या करसवलतींचा विचार करता अधिक फायदेशीर आहे. या योजनेवर PFRDA या पेन्शन नियमकांचे लक्ष आहे. योजनेच्या व्यवहार नोंदी nsdl e Governance infrastructure ltd व karvy computershare pvt ltd यांच्याकडे सुरक्षित आहेत. योजनेचा व्यवस्थापन खर्च अन्य योजनांच्या तुलनेत अत्यल्प आहे. या खात्यात कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय गुंतवणूक करता येत असल्याने दीर्घकाळात मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करण्यासाठी, मर्यादित जोखीम घेऊन गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेता येईल. योजनेसंबंधीत सर्व व्यवहार nps अँपवर ऑनलाइन करता येतात. या अँपची माहितीही आपण यापूर्वीच करून घेतली आहे.
©उदय पिंगळे
NPS वरील लेखाची लिंक-
https://www.facebook.com/393354804342744/posts/424530961225128/
NPS च्या अँपवरील लेखाची लिंक-
https://www.facebook.com/393354804342744/posts/780930732251814/
    (हा लेख म्हणजे NPS मध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस नसून आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊनच यासंबंधीचा निर्णय घ्यावा)
मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 24 मे 2019 रोजी पूर्वप्रकाशीत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://www.facebook.com/pingaleuday/
‌हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे 

Friday, 17 May 2019

कंपन्यांचे प्रकार


#कंपन्यांचे_प्रकार
     कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. सन 2013 चा कंपनी कायदा, यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कंपनी कायद्यानुसार किंवा संसदेने मंजूर केलेल्या अन्य वेगवेगळ्या कायद्यातील तरतुदीनुसार तिची निर्मिती आणि अस्तीत्व हे त्या कायद्याच्या चौकटीत असते.
           भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन  प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.
*सभासद संख्येवरून कंपन्यांचे प्रकार-
१.एकल कंपनी (One Person Company) : अशा तऱ्हेच्या कंपनीची रचना अलीकडेच केली गेली. भविष्याचा वेध घेणारी, मागणी असलेली नवनिर्मिती अथवा सेवा याचे कंपनीत रूपांतर करता यावे या उद्देशाने याची रचना करण्यात आली आहे. खाजगी फर्मपेक्षा वेगळी अशी याची रचना असून त्याचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आणि मर्यादित उत्तरादायित्व आहे.
२. खाजगी कंपनी (Private Company) : दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन कायदेशीररीत्या तिची स्थापना केलेली असते. यातील भागभांडवलाचे खरेदी विक्री व्यवहार कोणत्याही शेअरबाजारात होत नाहीत किंवा खाजगिरीत्या कोणास देता येत नाहीत. अशा प्रकारच्या कंपनीचे जास्तीत जास्त 200 सभासद असू शकतात. कमी भांडवलाची आवश्यकता असलेल्या छोट्या व्यवसायासाठी अशा प्रकारच्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत.
३. सार्वजनिक कंपनी (Public Limited Company) : सात किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येऊन उत्पादन किंवा सेवा देण्याच्या उद्देशाने, हिची स्थापना येते. याच्या भागभांडवलाची मान्यताप्राप्त शेअरबाजारात नोदणी करता येऊ शकते त्यामुळेच त्याच्या भागांचे हसत्तांतरण कोणालाही करता येते. सभासद संख्येचे बंधन नसल्याने तिचे कितीही सभासद असू शकतात. अनेक सवलतींमुळे या कंपनीस मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करता येते. या कंपनीच्या उपकंपनीसही सार्वजनिक कंपनी असेच म्हणतात. मोठया प्रमाणात भांडवल ज्या उद्योगास लागते तेथे या प्रकारच्या कंपन्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
*उत्तरादायित्वावरून कंपन्यांचे प्रकार:
१. समभागांच्या मर्यादेत उत्तरादायित्व असलेली कंपनी (Company limited by Shares) : यातील सभासदाचे उत्तरादायित्व हे तिच्या घटनेतील भांडवलाच्या मर्यादेत असते.
२. वैयक्तिक हमीच्या मर्यादेतील उत्तरदायित्व असलेली कंपनी (Company limited by Guarantee) : यातील सभासदांचे उत्तरदायित्व हे त्यांनी हमी घेतलेल्या मर्यादेत असून कंपनीच्या मालमत्तेत उत्तरादायित्व असते. या काळात जरी त्या कंपनीचे अस्तित्व संपले तरी हमी दिलेल्या मर्यादेएवढे सभासदाचे उत्तरादायित्व राहील.
३. अमर्याद हमी असलेले उत्तरादायित्व असलेली कंपनी (Unlimited Company) : अशा प्रकारच्या कंपनीतील सभासदाचे उत्तरादायित्व हे कोणत्याही मर्यादेशिवाय असून जोपर्यंत तो कंपनीचा सभासद आहे तोपर्यंत कायम असते.
*विशेष कंपनी:
१.सरकारी कंपनी (Government Company) : केंद्र किंवा राज्यशासन यांचे स्वतंत्र किंवा संयुक्तपणे 51% हून अधिक भांडवल असलेल्या कंपनीस किंवा त्याच्या उपकंपनीस सरकारी कंपनी असे म्हणतात.
२.परदेशी कंपनी (Foreign Company) : परदेशात नोंदलेली परंतु भारतात परंपरागत अथवा आधुनिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या कंपनीस परदेशी कंपनी असे म्हणतात.
३. विशेष कंपनी कलम 8 नुसार (Section 8 Company) : धर्मादाय उद्देशाने कलम 8 नुसार स्थापना  झालेल्या कंपनीस विशेष कंपनी म्हटले जाते. वाणिज्य, शास्त्र, खेळ, कला, संशोधन, शिक्षण, परिसर, धर्म या उद्देशाने या कंपन्या स्थापन झाल्या असून नफा मिळवणे हा त्यांचा हेतू नसतो, त्यामुळे यांच्या भागधारकांना लाभांश मिळत नाही.
४. सार्वजनिक वित्तसंस्था (Public Financial Company) : अर्थकारणास गती मिळावी आणि भांडवली गुंतवणूक वाढावी या हेतूने स्थापन झालेल्या आणि त्यात सरकार किंवा सरकार पुरस्कृत संस्थेचे 51% हून अधिक भागभांडवल आहे, अशा संस्थेस सार्वजनिक वित्तसंस्था असे म्हणतात. या कंपन्या कंपनी कायद्याच्याखाली किंवा वेगळ्या विशेष कायद्याने स्थापन झाल्या आहेत. उदा. UTI, LIC
*नियंत्रणावरून प्रकार
१. नियंत्रित कंपनी (Holding Company): ज्या कंपनीच्या मालकी किंवा संचालनावर अन्य कंपनीचे नियंत्रण असते त्या मूळ कंपनीस नियंत्रित कंपनी असे म्हणतात.
२.उपकंपनी (Subsidiary Company) : ज्या कंपनीच्या भागभांडवलात 51% हिस्सा अन्य कंपनीचा असेल त्यास मूळ कंपनीची उपकंपनी असे म्हणतात.
३. सहयोगी कंपनी (Associate Company) : व्यवसाय वृद्धीसाठी करार करून एकत्रितपणे काम करणाऱ्या किंवा किमान 20% भांडवली सहभाग असणाऱ्या कंपनीस मूळ कंपनीची सहयोगी कंपनी असे म्हणतात.
    या सर्व प्रकारांशीवाय शेअर बाजारात व्यवहार होऊ शकणाऱ्या कंपनीस नोंदणीकृत (Listed Company) तर व्यवहार होवू  न शकणाऱ्या कंपनीस अनोंदणीकृत कंपनी (Unlisted Company) असे म्हणतात. एखादी कंपनी कायदेशीररीत्या स्थापन होऊन काहीही कार्य करीत नसेल तर त्यास निष्क्रिय कंपनी (Dorment Company) असे म्हणतात. सभासदांमध्ये बचत करण्याची सवय वाढून त्यांना गुंतवणूक करण्याची आणि आपापसात कर्ज मिळण्याची सोय व्हावी या हेतूने निधी कंपन्यांची (Nidhi Company) स्थापना करण्यात येते.
©उदय पिंगळे
मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 17 मे 2019 रोजी पूर्वप्रकाशीत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 10 May 2019

शेअरबाजारातील प्राणी

#शेअरबाजारातील_प्राणी

       जॉर्ज ऑरवेलची 'Animal farms' ही कादंबरी माहिती आहे का? यात त्यांनी व्यक्तींमधील प्रवृत्तींचे दर्शन प्राण्यांच्या प्रतिकांमधून घडवले होते. भांडवल बाजारासंदर्भात बैल (Bulls) आणि अस्वल (Bears) या प्राण्यांचा उल्लेख केलेला आपल्या ऐकण्यात आला असेलच. यासंबंधात काही हुशार व्यक्तींनी अनेक पशु आणि पक्षांचा संबध या बाजाराशी जोडला आहे. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' असे म्हटले जाते. कोणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही. त्यामुळे त्यांची गुंतवणूक करण्याची सवय आणि गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असणारच. त्यामुळेच त्यांच्या वर्तनावरून ही नावे दिली असावीत. अर्थात हीच नावे का दिली? ते अगदी ठामपणे सांगता येणार नाही. हे प्राणी म्हणजे बाजारात असलेल्या प्रवाहातील विशिष्ट  गटातील लोकांचा समूह आहे. बाजारातील तेजीचा संबध बैलाशी तर मंदीचा संबंध अस्वलाशी जोडल्याने आणि तेजी मंदीचे चक्र सातत्याने चालू असल्याचे या दोन प्राण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. तेव्हा त्यांच्यासह काही अपरिचित पशु आणि पक्षी या प्रकारांच्या वर्तनांचा गंमत म्हणून मागोवा घेऊयात.
*बैल (Bull) : शेअर बाजारातील ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य अधिक आहे (Large cap) अशा कंपन्यांचे भाव वाढतील या हेतूने हे लोक भराभर शेअर खरेदी करतात यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती झाल्याने भाव आपोआपच वाढू लागतात. यामुळे अल्पकाळात झालेल्या भावातील वाढीमुळे दिपून इतर अनेकजण खरेदी करत सुटतात त्यामुळे अधिक भाव वाढतात आणि त्यावर कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा विपरीत परिमाण होत नाही. या काळात हे बुल्स आपल्याकडील शेअर्स विकून भरपूर कमाई करतात त्यामुळेच याना तेजीवाले असेही म्हणतात.
*अस्वल (Bear) बेअर्स हे बुल्सच्या बरोबर विरुद्ध प्रकारचे लोक असून मोठ्या कंपन्यांचे भाव खाली उतरतील आशा हेतूने ते आपल्याकडील शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री करतात. त्यांना मंदिवाले असेही म्हणतात, त्यांनी बाजारावर नियंत्रण मिळवले तर रोज नवा नीचांक स्थापन झाल्याने बरेच लोक आपल्याकडील शेअर्सची घाबरून विक्री करतात यामुळे भाव अधिक पडतात. या कालावधीत बेअर्स त्यांच्या विक्रीपेक्षा खूप कमी पातळीवर शेअर पुन्हा खरेदी करून नफा मिळवतात.
        या दोन्ही प्रवाहातील व्यक्तींची बाजारात रोज चाढाओढ चालूच असते. त्यामुळेच शेअर्सचे भाव वरखाली होऊन कुठेतरी स्थिर राहण्यास मदत होते आणि हे भाव त्या कंपनीच्या कर्तृत्वाची दिशा पकडतात. भांडवल बाजाराची स्थिरता राखण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या प्रवाहांची आवश्यकता आहे.
*हरीण (Stag) : स्टॅग या प्रवाहातील गुंतवणूकदार हे बुल्स आणि बेअर्स याहून अधिक वेगळे आहेत. हे लोक त्यांना प्राथमिक विक्रीतून मिळालेले शेअर, त्यांची ज्या दिवशी  नोदणी (listting) असते त्याच दिवशी विकून नफा मिळवतात. शेअर विक्री करताना पूर्वीच्या (CCI) नियमांपेक्षा अधिक अधिमूल्य आकारणे आता शक्य असल्याने आता बहुतेक सर्व  कंपन्या अधिकाधिक अधिमूल्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात, यामुळेच अलीकडे यातून अधीक नफा मिळवणे पूर्वीएवढे सोपे राहिलेले नाही.
*ससा (Rabbits) : प्रामुख्याने डे ट्रेडर्सना रेबीट्स म्हटले जाते काही क्षणातील भावात पडणाऱ्या फरकातून नफा मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते त्यांचा गुंतवणुकीचा कालावधी हा सेकंदाचा काही भाग ते जास्तीतजास्त एकाच दिवसातील बाजार चालू असण्याच्या मिनिटांएवढा मर्यादित असतो.
*कासव (Turtle) : या प्रामुख्याने मध्यम किंवा दीर्घकाळ गुंतवणूक करणारे लोक येतात. अल्पकाळात भावात पडणाऱ्या फरकाकडे हे लोक फारसे लक्ष देत नाहीत.
*डुक्कर (Pigs) : हे अतिउत्साही ट्रेडर्स आहेत ते कोणताही अभ्यास करीत नाहीत, दुसऱ्यांनी दिलेल्या टिप्सवर काम करतात. झटपट पैसे मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो तो काही वेळा सफलही होतो त्यामुळेच अधिक जोखीम घेण्याचा प्रयत्नात आपले पैसे गमावून बसतात.
*शहामृग (Ostrich) : एकाच दिशेने विचार करणारे हे गुंतवणूकदार मंदीच्या काळात आपले नुकसान होईल याचा विचारही करीत नाहीत त्यामुळेच ते फार फायदाही मिळवू शकत नाही. शहामृग त्याच्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्यापुढे हतबल होऊन पळून न जाता वाळूत डोके खुपसून बसतो व आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो.
*कोंबड्या (Chicken) : कोणत्याही प्रकारे जोखीम न पत्करणारे असे हे पारंपरिक गुंतवणूकदार असून ते कोणताही धोका न पत्करता फक्त सरकारी योजनांत गुंतवणूक करतात.
*मेंढ्या (Sheep) : या प्रकारचे गुंतवणूकदार हे कोणाचे तरी अनुकरण करीत असतात. ते बाजाराचा कल अनुसरत असतात ते अभ्यास करीत नाहीत किंवा स्वताची व्यवहार करण्याची पद्धत ठरवू शकत नाहीत.
*कुत्रे (Dogs) : हे पेनी स्टॉक आवडीने खरेदी करणारे अशा प्रकारचे लोक आहेत. या कंपन्याना भविष्य नसल्याने हे गुंतवणूकदार मार खातात.
*लांडगे (Wolves) : लांडगे या आडनावाची व्यक्ती नव्हे. हे लोक अतिशय लबाड असतात. यंत्रणेतील त्रुटींचा स्वताच्या फायद्यासाठी ते वापर करून घेतात. अनैतिक मार्गाने पैसे मिळवतात. अनेक आर्थिक घोटाळ्यात यांचा सहभाग असतो. हर्षद मेहता, केतन पारेख, निरव मोदी ही अशा लोकांची उदाहरणे आहेत.
        याशिवाय आपले खूप नुकसान करून नादारी जाहीर करणाऱ्याना Lame Ducks (लंगडी बदके) आर्थिकबाबींचे धोरण ठरवण्यात ठाम भूमिका घेणाऱ्याना Hocks (जनावरांच्या मागच्या पायाचा घोटा) तर मुळमुळीत धोरणाचा पुरस्कार करणाऱ्याना Doves (कबुतरे) बाजारास एक दिशा देण्यास भाग पडणाऱ्याना whales (देवमासा) बाजारातील संधी साधून फायदा घेणाऱ्याना sharks (शार्कमासा) म्हटले जाते. तर मंदीच्या काळात एखाद्या दिवशी बाजाराने उसळी मारली तरी नंतर तो खालीच येतो यास dead cat bounce (मेलेल्या मांजरास फेकले तर त्यांनी मारलेली उडी खालीच येणार) तर फक्त निर्देशांकात सामाविष्ट शेअर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना dogs of sensex (निर्देशांकाचे पाईक) असा शब्दप्रयोग वापरला जातो.

©उदय पिंगळे

मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 11 मे 2019 रोजी पूर्वप्रकाशीत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .
        

Friday, 3 May 2019

नव्या रुपातील गुंतवणुकदारांचा मितवा

#नव्या_रूपातील_गुंतवणूकदारांचा_मितवा

        एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीवर आपले लक्ष हवे. त्याची अधिकृत माहिती मिळवण्याचे पुस्तके, अहवाल, संकेतस्थळे, मोबाईल अँप यासारखे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी  Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. या अँपविषयी पूर्वी माहिती देताना मी त्यास गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या आशा अर्थाने *मितवा* असे म्हटले होते. या अँपमध्ये  अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही. अनेकांना हे अँप शेअर, म्युच्युअल फंड युनिटचे भाव पाहण्याचे आहे असे वाटते. यापलिकडे त्याचा कसा वापर करावा याची माहितीच नसते. अलीकडेच या अँपने आपला चेहरा मोहरा बदलल्याने थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा थोडक्यात ह्या अँपचा कसा उपयोग होऊ शकतो ते जाणून घेऊयात.
         ज्यांच्याकडे हे अँप पूर्वीपासून आहे किंवा ज्यांच्या मोबाइल मध्ये आधीपासूनच (Inbuilt) आहे. त्यांना त्याचे रूप बदलले आहे हे लक्षात आले असेलच. ज्यांच्याकडे ते नाही त्यांनी प्ले स्टोरवरून इंस्टोल करून घ्यावे. ते सुरू झाल्यावर  होमपेज दिसेल. (पाहिले चित्र पहा) पेजच्या वरील डाव्या बाजूस Home तर उजव्या बाजूस गोलात app चे , त्याच्या शेजारी दुर्बिणीचे, त्याच्या बाजूस एका गोलात व्यक्तीचे चित्र आहे. त्याखाली एक व्यावसायिक जाहिरात, त्याखाली शेअरचे भाव दाखवणारी धावती पट्टी त्याखाली Top news आणि Indises यामध्ये momeycontrol pro ची जाहिरात दिसेल. तर एकदम तळात डावीकडून उजवीकडे Home, Market, Portfolio, News आणि Menu यांचे आयकॉन दिसतील. आपण आत्ता Home वर आहोत हे त्याखाली असलेल्या निळ्या रेषेवरून समजेल. येथील Home आणि Menu सोडून आयकॉन हे वेगवेगळ्या विभागाचे शॉर्टकट्स आहेत. तेव्हा आपण Home पेजवरील उजव्या बाजूस तळाला असलेल्या Menu ला क्लिक करू.
     Menu ला क्लिक केले की अलिबाबाच्या गुहेसारखा 'खुल जा सिमसीम' म्हणून सर्व खजिनाच उघडेल. ( दुसरे चित्र पहा) अगदी वरती एका गोलात व्यक्तीचे चित्र त्याशेजारी आपला ई मेल त्याखाली आपली प्रोफाइलची खात्री करून घेतली असेल/नसेल तर verified / not verified असे येईल. त्याशेजारील उजव्या बाजूस चौकोनी दाते असलेले चक्र दिसेल त्यावर क्लिक केले असता आपण पुन्हा होम पेजवर जाऊ शकतो. याखाली moneycontrol pro कडे जाण्याचा मार्ग आणि त्याखाली विविध विभाग उप विभाग दिसतील. ते क्रमानुसार असे --
*Home: येथूनही होम पेजवर जाता येईल. येथे Menu मधील 60% हून अधिक गोष्टींचे शॉर्टकट आहेत.
*News: याचे Top news, My news, Markets, Stocks, Opinion, Prodcast, Business, Moneycontrol research, Mutual funds, Commodities, Economy, Politics, International आणि Start ups हे उपविभाग दिसतील. सर्व प्रकारच्या बातम्या येथे मिळतील.
*Stock Premier Leage: हा एक शेअर मार्केट वरील क्रिकेटसारखा खेळ आहे ज्यात कोणीही भाग घेऊ शकतो तो कसा खेळायचा याची माहितीही आहे. याचे दैनिक, साप्ताहिक व मासिक विजेते जाहीर केले जातात.
*Media : हा या खालील विभाग असून त्यात CNBC चे TV18, AWAAZ, BAJAR हे चॅनल लाईव्ह पाहता येतील. तर या चॅनेलवरील काही निवडक भागांचे व्हिडीओज Vedios on demand मध्ये उपलब्ध आहेत.
*Foram: याचे My Forum, Explore, Surch Massages असे उपविभाग आहेत. यातून आपल्या गुंतवणुकीच्या संबधी इतरांची मते समजतात तसेच आपण आपले मतही तेथे व्यक्त करू शकतो.
* Specials: या विभागात गुंतवणूक संबंधित चालू विषयावरील लेख / पीपीटीज आहेत त्यातील 5/6 निवडक लेखांचे शिर्षक दिले असून त्यावर क्लिक केले तर तो लेख / पीपीटी पहाता येईल.
*My Portfolio: यात आपल्या शेअर, म्युच्युअल फंड युनिट, एसआयपी, सोने, पीपीएफ, एफडी , रिअल इस्टेट, युलीप अशा सर्व प्रकारच्या बचत आणि गुंतवणुकीची नोंद ठेवता येऊन  त्याचे गुंतवणुकीप्रमाणे तसेच एकत्रित मूल्य पाहता येईल तसेच असलेल्या कर्जाची नोंद ठेवून त्याचा आढावा घेता येईल.
*My Watchlist : या विभागात आपण लक्ष ठेवीत असणाऱ्या Stocks, Mutual Funds, Commodities, Futures, Currencies याची सर्व माहिती मिळेल. ही यादी हवी तेव्हा अद्ययावत करता येऊन यासंबंधीची अधिक महत्वाची बातमी My Alerts या उपविभागातून मिळेल.
*Personal Finance : या विभागातून आपल्या गुंतवणुकीच्या संदर्भातील विविध विषयांवरील लेख वाचयाला मिळतील.
*या खालील विभाग चालू घडामोडीवर असून सध्या निवडणुका चालू असल्याने यासंबंधीत लेख तेथे आहेत
*Markets : या विभागात Indian Indices, Global Indices, Market Moovers, Earnings, F&O Action, IPO, FII, DII & MF Activity, Broker Research असे उपविभाग आहेत. यात विविध निर्देशांक, त्यातील शेअर्स, त्याचे दिवसातील, 5  दिवसातील, 1,3,6 महिन्यातील व एक वर्षातील सर्वात कमी/जास्त भाव, उलाढाल, सर्वाधिक मागणी असलेले/ नसलेले शेअर्स, त्याचे दर्शनी मूल्य, बाजारभाव, विशेष माहिती, ऑप्शन फ्युचर्स चा लॉट , कंपनीच्या विषयीची सर्व माहिती, लोकांच्या प्रतिक्रिया, बोकरेज हाऊसचे मत, ओपन इंटरेस्ट अशी सर्व आवश्यक माहिती मिळेल.
*Commodities : Top Commodities आणि Commodities Movers वस्तुबाजारातील विविध वस्तूंचे दर, त्यांच्या मागणी पुरवठ्यातील फरक आणि भविष्यातील दर समजू शकतील.
*Currencies : Top Currencies, Currency Movers आणि Exchange Rate असे उपविभाग असून त्यामधून चलनांसंबंधी सर्व माहिती मिळून विविध चलनांचा विनिमय दर समजेल.
*Mutual Funds: Top Ranked Schemes आणि Top Performed Schemes असे उपविभाग आहेत यात योजनेविषयी सर्व माहीती- त्याचा प्रकार, गुणवत्ता आणि 1 महिना ते 5 वर्षात मिळालेला परतावा समजू शकेल, ज्यामुळे म्युच्युअल फंड योजनेची निवड करता येईल
*Tools : यात नेहमीच्या उपयोगाची सूत्रे आहेत. ज्यायोगे झटपट निष्कर्ष काढता येईल.
*Supports: यात आपण आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतो.
*Saved Articles: यात आपण आपणास सवडीने वाचावा वाटेल असा लेख घेऊन तो ऑफ लाईन वाचू शकतो.
*App Info : यात Privacy Policy, Share this App, Rate this App आणि More Apps हे विभाग असून यात अँप विषयीची माहिती, ते मित्रांना पाठवायची विनंती, त्याचे आपण केलेले मूल्यांकन नोंदवायची सोय आहे तसेच या प्रकाराची अन्य अँप्स  कोणती आहेत ती डाउनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध आहे. यातील प्रत्येक विभाग, उपविभाग परिपूर्ण असून जेवढे खोलवर जाऊ तेवढी अधिक माहिती मिळेल. यातील प्रत्येक विभागावर स्वतंत्र लेख होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे उपविभागात क्लिक करून थेट जाता येते. सर्वात शेवटी तज्ञ व्यक्तींचे सल्ले आहेत. जे थोड्या प्रमाणात मोफत तर अधिक प्रमाणात फी आकारून दिले जातील.
        जे लोक पुर्वी हे अँप वापरीत होते त्यापेक्षा अधिक माहिती या अँपमध्ये असल्याने ते सर्वांना उपयुक्त ठरेल. हे फ्री अँप असल्याने यात काही व्यावसायिक जाहिराती आहेत पण त्या व्यत्ययकारक नाहीत. जाहिराती नसलेले पेड व्हर्जन हवे असल्यास आहे आवश्यकतेप्रमाणे घेता येईल.

©उदय पिंगळे

(बदललेल्या momeycontrol अँपची माहिती सर्वांना व्हावी या हेतूने हे लेखन केले असून त्याच्या निर्मात्यांशी लेखकाचे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत.)
मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 3 मे 2019 रोजी पूर्वप्रकाशीत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .