Friday, 26 April 2019

भांडवल बाजारासंबंधी दावे : अनुचित व्यापारी प्रथा

  #भांडवल_बाजारासंबंधी_दावे : #अनुचित _व्यापारी_प्रथा
         भांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत. या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.
        अलीकडेच मी माझे घराजवळील बँकेत पुस्तक भरून घ्यायला गेलो होतो तेथील रिलेशनशिप मॅनेजर ने मला एका युनिट लिंक योजनेची माहिती देऊन  त्यात गुंतवणूक करण्याची गळ घातली. मी त्यास प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर त्याने म्युच्युअल फंड योजनेची माहिती देण्यास सुरुवात केली. खरंतर बँक व्यवसायाशी याचा काडीमात्र संबंध नाही आणि अशा प्रकारे बँकेमध्ये इतर योजनांचे प्रमोशन करण्यास बंदी आहे. हा व्यवसाय ठराविक मर्यादेत मूळ व्यवसायापासून वेगळा करावा अशा भांडवल बाजार नियामक यांच्या सूचना आहेत. याचे सर्वच बँकांमध्ये सरळ सरळ उल्लंघन केले जात आहे. रोजच्या वर्तमानपत्रात फसवे दावे करणाऱ्या जाहिराती येत आहेत. ज्यांचे डी मॅट खाते आहे त्यांच्या वैयक्तिक माहितीची बेकायदेशीर विक्री होऊन इंदूर, सुरत, राजकोट, भावनगर येथून गुंतवणुकदारांना वारंवार फोन येत आहेत. ज्यात व्यक्तींना बोलण्यात गुंगवून ट्रेडिंग करून हमखास भरपूर फायदा करून देत असल्याचे दावे करण्यात येत आहेत.
         भांडवल बाजारातील गुंतवणूक ही अत्यंत धोकादायक प्रकारात मोडत असल्याने यातून कोणतेही ठाम दावे करणे ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. भांडवल बाजाराशी संबंधित कोणत्याही उत्पादनात असा दावा करता येत नाही. यातील धोक्याची जाणीव करून देऊन 6% ते 10% परतावा ( Return) मिळाला तर किती रक्कम कदाचित मिळू शकते तेवढेच जाहीर करता येते. आधीच्या उत्पादनातून किती टक्के परतावा मिळाला ते सांगता येते. यातील नियम मोडून अथवा त्यास बगल देऊन अनेक गोष्टी घडत आहेत. अलीकडेच भांडवल बाजार नियंत्रकानी स्वतःहून कारवाई करून हमखास प्राप्ती करून देणाऱ्या आणि वार्षिक 300% ते 800% उतारा मिळेल अशा प्रकारचे दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या 12 संकेतस्थळाच्यावर (वेबसाईट) आणि 3 व्यक्ती यांच्यावर बंदी आणून त्यांना भांडवल बाजारातून हद्दपार केले आहे. या व्यक्ती व संकेतस्थळे खालीलप्रमाणे-
व्यक्ती
Rishabh Jain
Ubaidur Rahman
G Kadar Hussain
संकेतस्थळे (websites) www.trade4target.com, www.niftysureshot.com, www.mcxbhavishya.com, www.callput.in, www.newsbasedtips.com, www.futuresandoption.com, www.optiontips.in, www.commoditytips.in, www.sharetipslive.com, www.thepremiumstocks.com, www.callputoption.inwww.tradingtipscomplaints.com
या व्यक्ती आणि संस्थांनी गुंतवणूक सल्लागार म्हणून नोदणी न करता वरील वेबसाईटच्या मार्फ़त 5 कोटीहून अधिक रक्कम सल्ला शुल्क म्हणून गोळा केले. हे शुल्क वार्षिक 7500 रुपये ते 1 लाख रुपये होते. या योजनेस ‘zero loss’, ‘jackpot’, ‘rumour based’, आणि ‘sureshot’ अशी आकर्षक नावे  होती. यांच्या सूचनांचा (टिप्स) तंतोतंतपणा 90 ते 99 % बरोबर येत असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर कडी म्हणजे एका संकेतस्थळाने नुकसान झाल्यास त्याची भरपाई करून देण्याची हमी दिली होती. लोकांना सुरुवातीला काही दिवस शेअर खरेदी विक्री संबधी सूचना दिल्या फोनवरून प्रतिसाद दिला आणि अचानक  एक वर्षाची वर्गणी भरली असताना सल्ला देणे बंद केले आणि चौकशी करणाऱ्या लोकांना उत्तर देण्यात टाळाटाळ करू लागले. यासंबंधी अनेक तक्रारी सेबीकडे आल्याने त्यांच्यावर कारवाई झाली.
     अशा तऱ्हेच्या कारवाया होत राहातील एक सजग गुंतवणूकदार म्हणून आपण अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पुन्हा काही गोष्टींची उजळणी--
*लाभ आणि लोभ यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक धोकादायक प्रकारात येते याची सतत जाणीव ठेवावी.
*गुंतवणूक सल्लागार नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
*रीतसर करार करावा आणि उभयपक्षांनी त्यातील अटींचे पालन करावे. अन्य छुपे करार करू नयेत.
*आपल्या व्यवहाराची माहीती कोणास देऊ नये अशी माहिती मागणाऱ्या व्यक्तींचे नंबर त्यांच्याशी काही न बोलता ब्लॉक करावेत.
*गुंतवणुकीवर लक्ष ठेवावे, शंका असल्यास त्याचे निराकरण करून घ्यावे.
*आपले ट्रेडिंग खाते आपणच वापरावे आपल्या वतीने ते कोणी चालवून आपल्याला फायदा करून देईल या भ्रमात राहू नये. अपयश पोरके असते त्याची जबाबदारी कोणी घेत नाही.
*ब्रोकर्सकडून मिळणारे एक्सपोजर लिमिट घेऊ नये.
*काही न सुटणारा वाद असेल तर यासंबंधीची तक्रार संबंधित यंत्रणांकडे ताबडतोब करावी.
©उदय पिंगळे
हा लेख 'मुंबई ग्राहक पंचायत' यांच्या दैनिक नवाकाळ मधील 'ग्राहकमंच' या सदरात 25 एप्रिल 2019 आणि  26 एप्रिल 2019 रोजी मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर प्रकाशित झाला आहे.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 19 April 2019

किफायतशीर मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूक


किफायतशीर मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूक
          गुंतवणूकदारांवचे विविध प्रकार आपण यापूर्वी पाहिले आहेत यात गुंतवणूक कालावधीनुसार रोजच्या रोज व्यवहार करणारे ते डे ट्रेडर्स, मध्यम कालावधी साठी गुंतवणूक करणारे त्यांना पोझिशनल ट्रेडर्स, तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्याना लोन्ग टर्म ट्रेडर्स असे संबोधण्यात येते. आपल्या  जोखिम घेण्याच्या क्षमतेनुसार  गुंतवणूकदार व्यवहार करीत असतात. डे ट्रेडिंग विषयी माहीती आणि त्यावरील श्री  नितीन पोताडे यांनी शोधलेल्या पद्धतीची आपण माहीती यापूर्वी एका लेखात करून घेतली आहे. अलीकडे त्यांनी पोझिशनल ट्रेडर्सना त्याचे व्यवहार अधिक किफायतशीर कसे बनतील यावर मार्गदर्शन करणारा मूळ इंग्लिशमधील लेख मला पाठवला होता. जो मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणुकदारांना त्यांची गुंतवणूक अधिक फायदेशीर करून देईल. या पद्धतीचे महत्वाचे फायदे असे--
*ही गुंतवणूक भावनारहित (Emostion less) होते. त्यामुळे भाव वर खाली गेले तरी आनंदच मिळतो.
*यासाठी बाजाराचा कल (Trend)ओळखण्याची गरज नाही.
*ज्या समभागांचे भाव त्याच्या आधीच्या दिवसाच्या सर्वोच्च भावाहून अधिक (Gap up) किंवा आधीच्या दिवसाच्या किमान भावाहून कमी (Gap Down) दराने उघडतात तेव्हा अधिक फायदा होतो.
*ज्या काळात बाजारभाव मोठया प्रमाणात खालीवर होतात (Volatile market) ही पद्धत अतिशय उपयोगी आहे.
       समभागात केलेली कोणतीही गुंतवणूक अधिक  फायदेशीर होण्यासाठी त्याच्या किमतीपेक्षा त्याचे आंतरिक मूल्य ओळखता येणे यासाठी अभ्यास करणे जरुरीचे आहे. बाजारातील किमतीत होणाऱ्या फरकाने गडबडून घाबरून चुकीचा निर्णय घेतल्याने अपेक्षित परिणाम मिळत नाही. तेव्हा अवास्तव अपेक्षा न करता  विवेक बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी गुंतवणूकयोग्य शेअर्स मध्ये निरंतर गुंतवणूक करण्याची (SIP) आणि निरंतर गुंतवणूक मोकळी करण्याचा (SWP) एकत्रित पर्याय सुचवला आहे. बहुतेकांचा असा अनुभव आहे की आपण ज्या शेअर मध्ये गुंतवणूक केली त्याचा भाव आपण खरेदी केल्यावर नेमका खाली आला आणि विक्री केल्यावर वाढला. यामुळे नाही म्हटलं तरी आपला निर्णय चुकला तर नसेल ना? अशी शंका येवून निराशा येते. यासाठी स्थिरचित्त राहणे महत्वाचे आहे. आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे याची खात्री आणि ठाम विश्वास आपल्याला असेल तरच आपली गुंतवणूक अधिक फायदेशीर होईल. यासाठी-
*आपण कोणते समभाग व त्यात गुंतवणूक किती रकमेची करायची हे प्रथम निश्चित करावे.
*यांतील 50% रकमेची एकदम गुंतवणूक करावी.
*आधी खरेदी केलेल्या शेअर्सच्या संख्येच्या 5% शेअरची खरेदी करण्याची ऑर्डरच्या शेवटच्या (येथे मूळ खरेदी किमतीच्या) 5% खालील भावाने टाकावी.
त्याचबरोबर-
*आधी खरेदी केलेल्या शेअर्सच्या संख्येच्या 5% शेअरची विक्री करण्याची ऑर्डर शेवटच्या (येथे मूळ खरेदी किमतीच्या) 5% अधिक भावाने टाकावी.
*याप्रमाणे आपली खरेदी आणि विक्री यांची सूचना लिमिट ऑर्डर तसेच आफ्टर मार्केट ऑर्डर या प्रकारांनी देता येईल. त्यासाठी सतत लक्ष ठेवून संगणकावर बाजारभाव पहात बसण्याची आवश्यकता नाही.
      याचा फायदा असा की या शेअर्सचे भाव खाली येत असतील (मंदी) तर जास्त किंमत मोजून घेतलेले सर्व शेअर अंगावर पडत नाही शिवाय भावात सातत्याने बऱ्यापैकी फरक पडत असेल तर खरेदी आणि विक्रीतून होणाऱ्या नफ्याने सरासरी किंमत खाली येते. याचा एकच तोटा असा की भाव वर जात असतील (तेजी) तर फायदा कमी होईल. कसं ते उदाहरणासह पाहुयात. समजा आपण 'अबक'  ही कंपनी आपण निवडली असून त्याचा भाव  ₹200/ शेअर आणि ₹2 लाख पर्यंत गुंतवणूक करायची आपली तयारी आहे.तर-
* आपल्या संभाव्य गुंतवणुकीच्या 50% ₹1 लाख गुंतवणूक केली की सदर कंपनीचे 1 लाख ÷ 200= 500 शेअर येतील.
*यानंतर रोज 500 शेअरच्या 5% म्हणजेच 25 शेअर मूळ खरेदी भावाच्या 5% कमी म्हणजे ₹190 ने खरेदीसाठी तर 5% अधिक म्हणजे ₹210 ने विक्री करण्यासाठी ठेवायचे आहेत.
*जर खरेदीची ऑर्डर ₹190 ने पूर्ण झाली तर अजून 25 शेअर्स ₹180 ने खरेदी करण्यासाठी आणि ₹200 ने विक्रीसाठी ठेवायचे आहेत.(शेवटच्या खरेदीच्या ₹190 च्या 5% कमी अधिक भावाने)
*जर विक्रीची ऑर्डर ₹210 ने पूर्ण झाली तर अजून 25 शेअर्स ₹200 ने खरेदी करण्यासाठी आणि ₹220 ने विक्री  करण्यासाठी ठेवायचे आहेत. (शेवटच्या विक्रीच्या ₹210 च्या 5% कमी अधिक भावाने)
     या प्रकारे ऑर्डर सातत्याने टाकत राहिल्याने आपल्याकडे शेअर्स जमा होत राहून सतत थोडेफार पैसे मिळत राहतील. बाजारामध्ये होणाऱ्या चढ उतार याचा फायदा घेता येईल. कितीही संयमित गुंतवणूकदार असेल तरी भाव खाली आला तर तो थोडा निराश होतो. त्याला यापुढे भाव खाली आला ही खरेदीची संधी आहे या दृष्टीने त्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे एकूण गुंतवणूकीबद्धलचा दृष्टिकोनच बदलून गेल्याने गुंतवणुकीचा आनंद घेता येईल. अशा प्रकारचे धोरण पूर्ण पैशाची गुंतवणूक होईपर्यंत किंवा पूर्ण पैसे मोकळे करून घेण्यासाठीही करता येईल.
      सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सचे गेल्या 52 आठवड्यातील सर्वात जास्त आणि सर्वात कमी  भाव यावर नजर टाकली असता भावातील फरक किती मोठा आहे ते समजेल. आपण जे शेअर्स घेण्याचे ठरवले आहे त्या कंपनीच्या कमी जास्त भावातील मर्यादा आपल्याला नीट समजली आणि थोडेसे तारतम्य वापरले तर भावातील फरकामुळे आपला  फायदाच  होईल. त्यातून त्याच कंपनीचे शेअर घेतले तर एकूण शेअर्सची संख्या वाढेल आणि पर्यायाने एकूण नफ्यातही वृद्धी होईल. यासाठी शांत संयमित धोरणाची गरज असून त्यासाठी अशा प्रकारे व्यवहार करण्याची जास्त गरज आहे.
*याबद्दल अधिक माहिती नितिन पोताडे यांच्या यू ट्यूब चॅनेल वर मिळू शकेल. तसेच खालील लिंकमधील मोबाईल नंबरवर त्यांना आपला मेल आयडी कळवून या पध्दतीवरील पीपीटी फाईल मागवावी.*
©उदय पिंगळे
पूरक संदर्भ:
डे ट्रेडिंग वरील माझ्या लेखाची लिंक  https://www.facebook.com/393354804342744/posts/639040543107501/
श्री नितीन पोताडे यांच्या यु ट्यूब चॅनल लिंक
https://www.youtube.com/user/ndpotade
यात उल्लेख असलेले श्री नितीन पोताडे हे माझे मित्र असून त्यांची ही पद्धत मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उपयुक्त होईल असे वाटल्याने हा लेख लिहिला असून त्यांना दाखवून तो संमत करून घेतला असून आमच्यात कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत. ही गुंतवणूक धोकादायक प्रकारात मोडत असल्याने आपल्या गुंतवणूक सल्लागाराची चर्चा करून याबाबत आपले धोरण स्वतःच्या जबाबदारीवर ठरवावे.
मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 19 एप्रिल 2019 रोजी पूर्वप्रकाशीत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

















Tuesday, 16 April 2019

निवडणूक रोखे

#निवडणूक_रोखे (Electroral Bonds)
          भारतातील निवडणूका या mind, muscles आणि money या 3M वर लढवल्या जातात असे म्हटले जाते. सर्वात मोठ्या लोकशाही देश असलेल्या आणि गेल्या सात दशकांची निवडणूक परंपरा असलेल्या आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया पुरेशी पारदर्शक नाही. राजकीय पक्षांना विविध ठिकाणी त्यांच्या कार्यालयांच्यासाठी, तेथे कामाला असलेल्या लोकांचे पगार देण्यासाठी, विविध मोहिमांसाठी याशिवाय देशभरात कुठेना कुठे होत असलेल्या निवडणुकांच्या खर्चासाठी मोठ्याप्रमाणात निधी लागतो. यासाठी विविध राजकीय पक्ष पैसा जमा करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या लढवून देणग्या मिळवत असतात. या देणग्या सर्वसामान्य लोक, व्यापारी , कंपन्या, मोठे उद्योगपती यांच्याकडून रोखीने घेतल्या जात असल्याने आणि त्याचा तपशील ठेवण्याचे कायदेशीर बंधन नसल्याने काळ्या पैशांची निर्मिती होत होती. हे व्यवहार पारदर्शी व्हावेत या हेतूने 2017/18 च्या अर्थसंकल्पात राजकिय पक्षांना मदत करण्याचा हेतूने निवडणूक रोख्यांची निर्मिती केली आहे. असे रोखे खरेदी करणारी व्यक्ती अगर संस्था यांना आणि हे रोखे स्वीकारल्याचे आयकर विवरणपत्र मुदतीत भरणाऱ्या राजकीय पक्षास आयकरात सवलत दिली आहे. अशा प्रकारचे रोखे निर्मिती करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. 1 हजार, 10 हजार, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी अशा दर्शनी मूल्याचे हे रोखे हमीपत्राच्या  स्वरूपात असून यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे 2 जानेवारी 2018 रोजी सरकारकडून जाहीर करण्यात आली. यातील प्रमुख तत्वे खालील प्रमाणे--
*कोणीही भारतीय व्यक्ती, संस्था राजकीय पक्षाला देणगी देण्यासाठी हे रोखे खरेदी करू शकेल. यापूर्वी फक्त नफा मिळवणाऱ्या कंपन्याच मर्यादित प्रमाणात राजकीय पक्षांना देणगी देऊ शकत होते. तसेच ही देणगी कोणत्या पक्षास दिली ते जाहीर करण्याचे बंधन होते. आता कोणत्याही मर्यादेशिवाय तोट्यातील कंपन्याही हे रोखे खरेदी करता येतील आणि ही देणगी कोणत्या पक्षास  दिली ते जाहीर करण्याची आवश्यकता नाही.
*हे रोखे वर उल्लेख केलेल्या दर्शनी मूल्यातच उपलब्ध होतील व कितीही संख्येने खरेदी करता येतील.
*प्रत्येक राजकीय पक्षाने सार्वजनिक न्यास कायदा 1951 च्या कलम 29/A नुसार पक्षाची नोंदणी करावी. राष्ट्रीय पक्षाने सर्वात अलीकडील लोकसभेसाठी झालेल्या मतदानात किमान एक टक्का मते मिळवणे तर प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत सर्वात अलीकडील विधानसभा निवडणुकीत एक टक्का मते मिळवणे गरजेचे असून केवळ असेच पक्ष सदर रोखे देणगी म्हणून स्वीकारू शकतील. रोखे जमा केलेल्या दिवशीच त्यात नमूद रक्कम पक्षाच्या खात्यात जमा केली जाईल. नियमित विवरणपत्र सादर करणाऱ्या पक्षांना या रकमेवर कोणताही कर द्यावा लागणार नाही.
*हे रोखे खरेदी करणाऱ्या व्यक्ती /संस्थेने आपली ओळख (KYC) बँकेस पटवून देणे जरुरी आहे.
*रोखे खरेदीदाराचे नाव बँकेकडून गुप्त ठेवण्यात येईल.
*हे रोखे जारी केलेल्या तारखेपासून 15 दिवस वैध असतील. ही मुदत संपण्यापूर्वी ते पक्षाच्या खात्यात जमा करावे लागतील.
*या रोख्यांवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
*भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) देशभरातील निवडक  29 शाखातून मिळतील.
*बँकेला हे रोखे खरेदी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांची पूर्ण माहिती असेल.
*प्रत्येक तिमाहीस पहिले 10 दिवस हे रोखे विक्रीस उपलब्ध असतील, निवडणूक वर्षात 30 अतिरिक्त दिवस विक्रीसाठी उपलब्ध असतील.
*रोखे जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबरच्या सुरुवातीस 10 तारखेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतील.
*या रोख्यातून मिळालेल्या एकूण रकमेची माहीती वर्ष अखेरीस निवडणूक आयोगास द्यावी लागेल.
           हे रोखे अस्तित्वात येण्यापूर्वी राजकीय पक्षांना 20 हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम देणगी रोख स्वीकारण्याची आणि ही देणगी कोणी दिली ते जाहीर न करण्याची परवानगी होती. सर्वच पक्ष या तरतुदीचा दुरुपयोग करून नक्की किती आणि कोणाकडून रक्कम मिळाले ते जाहीर करीत नसत. यामुळे काळ्या पैशांची निर्मिती होत होती. आता रोखीने फक्त 2 हजार देणगी स्वीकारता येत असल्याने त्यास काही अंशी आळा बसेल. कोणत्या पक्षास किती रक्कम देणगी स्वरूपात मिळाली ते समजेल. मात्र ही देणगी कोणी दिली ते समजत नसल्याने ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे असे म्हणणे धाडसाचे होईल. तसेच दोन हजार रुपयांपर्यंत ची रोख देणगी कोणाकडून मिळाली त्याचा तपशील ठेवण्याची कायदेशीर गरज नाही. त्याचप्रमाणे नवीन घटना दुरुस्तीने विदेशी कंपन्यांच्या उपकंपन्यानाही हे रोखे खरेदी करता येणार असून राजकीय पक्षांना या रोख्यांचा कोणताही तपशिल निवडणूक आयोगास द्यावा लागणार नाही.
         ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी म्हणून एका राजकीय पक्षांने व अन्य एका स्वयंसेवी संस्थेने या कायद्याच्या वैधतेस आव्हान देऊन रोख्यांचे वितरण त्वरित थांबवून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यातील वादग्रस्त तरतुदींमध्ये तथ्य वाटल्याने दोन्ही पक्षकारांचे वाद प्रतिवाद अलीकडेच होवून या रोखे विक्रीस सध्या स्थगिती न देता सर्व राजकीय पक्षांना नेमकी किती कोणाकडून देणगी मिळाली? त्याचा तपशील बंद पाकिटातून 30 मे पर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यासंबंधात खंडपीठ जो काही अंतिम निर्णय देईल त्यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.
©उदय पिंगळे
हा लेख अर्थसाक्षर.कॉम या ई पब्लिकेशन्ससाठी लिहला असून तो तेथे आणि मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 16 एप्रिल 2019 रोजी पूर्वप्रकाशीत झाला आहे.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

    




Friday, 12 April 2019

ओपन क्लोज पोझिशन आणि अल्गोरिदमीक ट्रेडिंग

#ओपन_क्लोज_पोझिशन_आणि_अल्गोरिदमीक_ट्रेडिंग

       भांडवल बाजारातील शेअर, इंडेक्स, एफ एन ओ, करन्सी, कमोडिटी यांच्या व्यवहारासदर्भात ओपन पोझिशन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग यासारखे शब्द ऐकायला मिळतात. हे म्हणजे नक्की काय आहे  ते जाणून घेऊयात. आपल्याला माहीत आहेच की शेअरबाजार, वस्तुबाजार, विदेशी चलनबाजार  हे भांडवल बाजाराचे घटक आहेत. या बाजारामध्ये तेथे खरेदी/ विक्री केली जाऊ शकेल अशा सर्वांचे,  रोखीचे /हजर (Cash) आणि भावी व्यवहार (Derivetives) केले जातात. यात खरेदीदार विक्रेते या दोघांचा सामावेश होतो. यामध्ये विशिष्ठ भावात केलेल्या खरेदीची नंतर विक्री करता येते किंवा आधी केलेल्या विक्रीची विहित काळात खरेदी करून देता येते.
      जेव्हा बाजारात कार्यरत गुंतवणूकदार व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडे आधी खरेदी केलेली भांडवली मालमत्ता असते तेव्हा त्यांची (खुली स्थिती) ओपन पोझिशन आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून पूर्णपणे नव्याने खरेदी किंवा विक्रीसाठी शेअर्स, वस्तू, निर्देशांक किंवा चलन यांची ऑर्डर टाकली जाते. ही ऑर्डर मार्केट ऑर्डर असेल तर लगेच स्वीकारली जाते किंवा लिमिट ऑर्डर असेल तर अपेक्षित भाव आल्यावर पूर्ण होते या सर्वच ऑर्डर्स जोपर्यंत त्याच्या विरुद्ध ऑर्डर केल्या जाऊन जुळून पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या सर्व पोजिशन ओपन आहेत असे म्हणतात. उदा एखाद्या गुंतवणूकदाराकडे  L & T या कंपनीचे 100 शेअर्स आहेत ही व्यक्ती जोपर्यंत ते शेअर्स विकत नाही तोपर्यंत ही पोझिशन ओपनच राहाते अशाप्रकारे अनेक पोझिशन ओपन राहू शकतात. ओपन पोझिशन आहे याचा अर्थ असा की संबंधित गुंतवणूकदाराने भांडवल बाजारात गुंतवणूक करून त्याच्याशी संबंधित असलेला धोका मान्य केला आहे. अल्पकालीन गुंतवणूकदार जसे डे ट्रेडर, पॉझिसशनल ट्रेडर आणि दीर्घकालीन  गुंतवणूकदार यांच्या ओपन पोझिशन या सेकंदाच्या काही भागाहून कमी ते कित्येक वर्षे एवढ्या कालावधीपैकी कितीही कमी अधिक काळ असू शकतात.
       या ओपन पोझिशन त्याच्या विरुद्ध ट्रेड केला की क्लोज होतात यालाच (बंद स्थिती) क्लोज पोझिशन असे म्हणतात. खरेदी केलेली मालमत्ता विकून अथवा आधी विकलेली मालमत्ता खरेदी करून देऊन ओपन पोझिशन क्लोज होऊ शकते. क्लोज पोझिशन ही अनेक कारणासाठी केली जाऊ शकते. त्यातील सर्वात महत्वाचे कारणे खालीप्रमाणे-
*अपेक्षित उतारा मिळतो आहे असे वाटल्याने.
*काही अडचणींवर मात करण्यासाठी असलेली पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी.
*जास्त पैसे नसल्याने डे ट्रेडिंगमध्ये नाईलाजाने कापण्यासाठी.
*संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी स्टॉप लॉसचा वापर केल्याने.
*बाजाराच्या नियमानुसार मालमत्ता अगर पैसे वेळेत न देऊ शकल्याने रिव्हर्स झालेले सौदे.
      शेअरबाजारात व्यवहार करण्यासाठी ऑर्डर देण्याच्या विविध पद्धतीमध्ये आपणास कव्हर ऑर्डर व ब्रकेट ऑर्डर यांची माहिती यापूर्वीच मिळवली आहे. कव्हर ऑर्डर टाकून आपला संभाव्य तोटा मर्यादित ठेवू शकतो तर ब्रकेट ऑर्डरमुळे मर्यादित तोटा आणि अपेक्षित फायदा मिळवता येतो या पद्धतीने एका विशिष्ठ भावास ऑर्डर आपोआप टाकली जाईल अशी व्यवस्था आहे त्याप्रमाणे काही मोठे गुंतवणूकदार संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या ऑर्डर विशिष्ट संगणक प्रणालीच्या साहाय्याने करतात. कोणत्या भावास कोणते शेअर्स घ्यायचे किंवा कोणत्या भावास विक्री करायची याचे स्वतंत्र तंत्र विकसित करून त्याप्रमाणे खरेदी विक्रीची ऑर्डर टाकली जाईल याची व्यवस्था करतात. यास अल्गोरिदमीक ट्रेडिंग असे म्हणतात. यामुळे फंड व्यवस्थापन अचूक आणि सुलभ होते. ही पद्धत विकसित करण्यासाठी खुला भाव, बंद भाव, विशिष्ट वेळेतील सरासरी भाव, बदलता सरासरी भाव, उलाढाल, मागील सर्वोत्तम भाव, किमान भाव, मागील 52 आठवड्यातील भाव या सर्वांचा वापर करण्यात येतो. ही पूर्ण संगणकीय प्रणाली असल्याने तिची योग्य ती सुरक्षा राखली न गेल्यास त्याचे हॅकिंग होऊन मोठा घोटाळाही होण्याचा धोका असल्याने विद्यमान पद्धत निर्दोष होऊन गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये यासाठी भांडवल बाजार नियामक उपाय योजत आहे.

©उदय पिंगळे

मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 12 एप्रिल 2019 रोजी प्रकाशित.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Thursday, 4 April 2019

संकल्प जुनेच वर्ष नवे

#संकल्प_जुनेच_आर्थिक_वर्ष_नवे

        1 एप्रिल 2019 ला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहेत. नव्या वर्षांची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पानी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान 40% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही. मी अलीकडेच महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीकरीता, 'मुलांसाठी गुंतवणूक करायचीय ?' याविषयावर एक लेख दिला होता. त्यात पी पी एफ, म्युच्युअल फंडाचे एस आय पी आणि शेअर्सच्या एस आय पी यांची माहिती दिली होती. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार त्यांची टक्केवारीत विभागणी करून त्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय सुचवला होता. खरंतर कोणतेही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचा हा अतिशय समतोल पर्याय आहे. याचबरोबर या नव्या आर्थिक वर्षांसाठी आपण कायकाय  करणे अपेक्षित आहे याची उजळणी करुयात.
*मुदतीचा विमा: वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट हवा. तेवढा आहे का नाही ते पहा? योग्य ती रक्कम टॉप अप करा.
*आरोग्य विमा : वार्षिक उत्पन्नाच्या 2/3 पट आहे की नाही ते पहा.
वरील दोन्ही योजना अखंड चालू राहणे महत्वाचे आहे. याची आठवण करून देणाऱ्या तारखेचा रिमाईंडर मनात आणि मोबाईलमध्ये सेट करा. याशिवाय आपली कोणतीही विशेष गरज असेल त्याप्रमाणे जोखीम लक्षात घेऊन योग्य ते सुरक्षा कवच घ्यावे.
*समभाग संलग्न बचत योजना (ELSS): कर वाचवण्यासाठी elss योजनेस प्राधान्य द्या. त्यात एस आय पी करा. elss, म्युच्युअल फंडाच्या योजना, शेअर्स यातून असाधारण कमाई होत असेल कर भरावा लागेल याचा विचार न करता फायदा काढून घ्या आणि तो सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF), स्वेच्छा भविष्यनिर्वाह निधी (VPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या करमुक्त योजनेत गुंतवा. काही विशेष हेतूने एस आय पी  केले असेल तर त्यातील बहुतेक रक्कम आपल्या जरुरीपूर्वी काढून घेऊन मनी मार्केट फंडात ठेवा म्हणजे जेव्हा खरच पैशांची गरज असेल तेव्हा मार्केट खाली असेल तर नुकसान होणार नाही.
*राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS):  आपले करपात्र उत्पन्न 5 लाखाहून अधिक असेल तर जास्तीचे 50 हजार एन पी एस मध्ये टाका यामुळे कर तर वाचेलच (80 CCD/1-B नुसार) आणि दीर्घकाळात त्याचा अधिक फायदा होईल. आता एन पी एस खाते ऑनलाइन उघडता येते तसेच वेळोवेळी त्यात पैसेही भरता येतात. यातील शेअर्सच्या गुंतवणुकीची मर्यादा 75% पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच मुदत पुर्ण झाली की त्यातून 60% रक्कम काढता येते ती पूर्णपणे करमुक्त आहे.
*स्वेच्छा निवृत्तीवेतन योजना (VPF) : आपल्या पी एफ मध्ये स्वेच्छेने अधिक रक्कम टाकता येते.  ती वाढवा, भरणे चालू केले नसल्यास चालू करा.
पी पी एफ, व्ही पी एफ, एस एस वाय यात गुंतवलेली, आणि एन पी एस मधून काढून घेता येणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असल्याने करसवलतींचा विचार न करता अधिकाधिक गुंतवणूक करा ज्यामुळे मोठी रक्कम जमा होईल आणि करमुक्त उत्पन्नात भर पडेल.
*आकस्मिक निधी: यासाठी ठेवलेली रक्कम बँकेच्या बचत (Saving) अगर मुदत खात्याऐवजी (FDR) नव्याने चालू झालेल्या पेमेंट बँकेत ठेवा तेथे अधिक व्याज मिळेल.
*करकपात होऊ नये म्हणून 15/G, 15/H फॉर्म : आपले करपात्र उत्पन्न सेक्शन 87 मधील करसुट धरून 5 लाख या करपात्र मर्यादेच्या आत असल्यास, सर्वसाधारण लोकांनी 40 हजारापेक्षा जास्त व्याज मिळू शकणार असेल तर 15/G  आणि जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50 हजारहून अधिक व्याज मिळू शकणार असेल 15/H फॉर्म एप्रिलमध्येच भरून द्यावा म्हणजे मुळातून करकपात होणार नाही. अनेक ठिकाणी हे फॉर्म ऑनलाईनही भरून देता येतात. ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेहून अधिक आहे त्यांनी हे फॉर्म भरून देऊ नयेत. ज्यांना आयकर विवरणपत्र भरावे लागते त्यांनी आपल्या मागील वर्षाचे पगाराव्यतिरिक्त मिळणारे सर्व उत्पन्न मोजावे जिथे मुळातून करकपात झाली असेल त्याच्याकडून कर कापल्याचे  प्रमाणपत्र कधीपर्यंत मिळेल याची चौकशी करून ठेवावी म्हणजे आयत्या वेळी धावपळ करावी लागणार नाही.
     आपल्या गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेणे जरुरी आहे. असा आढावा वर्षातून किमान एकदा तरी घ्यावा. म्युच्युअल फंड आणि शेअर्सचा उतारा ऋण झाला म्हणून घाबरून जाऊन विक्री न करता त्याचे आंतरिक मूल्य लक्षात घ्यावे. यासर्व जुन्याच गोष्टी आहेत फक्त त्यांची आठवण या नवीन आर्थिक वर्षांतील पहिल्या लेखात करून देतोय म्हणूनच 'संकल्प जुनेच आर्थिक वर्ष नवे'. वॉरेन बफे यांच्या तरुणांना उपयुक्त सूचना लेखासोबतच्या चित्रात.

©उदय पिंगळे

मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 5 एप्रिल 2019 रोजी पूर्वप्रकाशित
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .