Friday, 31 August 2018

#पेनी_स्टॉक

      दर्शनी मूल्यापेक्षा (Face Value) कमी बाजारभाव (Market Value) असलेल्या शेअर्सना सर्वसाधारणपणे पेनी स्टॉक असे म्हटले जाते.अशा कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 100 कोटीहून कमी असते. अमेरिकेत 5 $ पेक्षा कमी बाजारभाव असलेल्या सर्व शेअर्सना पेनी स्टॉक असे संबोधले जाते. जरी अशा शेअर्समधून प्रचंड नफा होण्याची शक्यता असली तरी अचानक डिलिस्ट होऊन त्यात मोठया प्रमाणात पैसे अडकून नुकसान होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळेच गुंतवणूक तज्ञ सर्वांना त्यापासून लांब राहण्यास सांगतात. असे असले तरीही पैशांची फारशी फिकीर नसलेले, आणि फक्त पैसे टाकण्याशिवाय कोणतेही ज्ञान मिळवण्याची इच्छा नसलेले अनेक गुंतवणूकदार झटपट फायद्याचे आशेने यात गुंतवणूक करीत असतात. तर काही गुंतवणूकदार असे आहेत की ते फक्त पेनी स्टॉक मधेच गुंतवणूक करतात.
      मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदवण्यात आलेले अनेक शेअर्स पेनी स्टॉक म्हणता येतील असे आहेत. या शेअर्सचे भाव खूपच कमी असल्याने ते आणि त्याची मागणी कृत्रिमरीत्या वाढवणे सहज शक्य आहे. अनेक लोक मोठया प्रमाणात यांची खरेदी अथवा विक्री करून त्यांना अपेक्षित असलेली दिशा देऊ शकतात. अशा कंपन्या बहुतांशी शेअरबाजार नियमावली पाळत नाहीत. वेळेवर अहवाल प्रसिद्ध करीत नाहीत त्यामुळे त्यांच्या व्यवहारावर बंदी आणता येऊ शकते. परंतू केवळ छोट्या गुंतवणूकदाराना यातून बाहेर पडण्याची संधी असावी या हेतूनेच बाजार नियामक मंडळ त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करीत नाही. त्यामुळेच बाजारात कार्यरत असे काही विशिष्ठ घटक आक्रमक होतात. यापूर्वी असे शेअर ट्रेड टू ट्रेड या पद्धतीने केले जात असत याचीच अलीकडील सुधारित आवृत्ती म्हणजे ए एस एम द्वारे विशेष निगराणीखाली आणले जातात. यात एका विशिष्ठ मर्यादेवर किंमत किंवा उलाढाल वाढली तर तर कोणत्याही शेअर्सची वाढ थोपवण्यासाठी विविध उपाय योजले जातात. जे टी टू टी पद्धतीशी मिळतेजुळते आहेत. त्याचा दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात येतो.
     असे असले तरी या शेअर्समध्ये अल्पावधीत होऊ शकणारी जबरदस्त वाढ अनेकांना आपल्या मोहात पाडते. यात अल्पावधीत सहज होऊ शकणारी 10 पट वाढ वर्षानुवर्षे चांगले शेअर्सही 10 वर्षातही दाखवू शकत नाहीत. त्यामुळे बाजारातील अनेकांचे सहज लक्ष वेधून देऊ शकतात. या काळात फायदा मिळवण्याची आशा असलेले अनेक लोक यासंबंधी अनुकूल बातम्या पसरवून आपले समभाग विकून टाकतात. याच काळात अनेक छोटे गुंतवणूकदार त्यांनी शेअर्स खरेदी केलेले असल्याने आणि त्याच वेळेस भाव खाली आणि कोणी खरेदीदार नसल्याने मोठया प्रमाणात अडकतात. त्यांना थोडा तोटा सहन करून बाहेर पडायची इच्छा असेल तरीही ते तसे करू शकत नाहीत. या काळात शेअर्सचे लिस्टिंग रद्द झाले तर पैसे गमावून बसतात.
  काही पेनी स्टॉक हे मल्टीबार्गर झाल्याची उदाहरणे आहेत परंतू केवळ यामुळे ते खरेदी करणे अत्यंत  धोकादायक आहे. याशिवाय त्यांच्याबद्धल ठाम निष्कर्ष काढता येऊ शकेल अशी माहिती उपलब्ध नसल्याने रिसर्च हाऊसना त्यांचा अभ्यास करता येऊ शकत नाही. सावध गुंतवणूकदारांनी पेनी स्टॉक खरेदी संबधी विचार करण्यापूर्वी खालील गोष्टीचा शोध घेणे गरजेचे आहे.
१. हा शेअर्स पेनी स्टॉक होण्यामागची कारणे कोणती ? याची किंमत कमी असली तरी आंतरिक मूल्य यापेक्षा अधिक आहे का?
२. यांचा व्यवसाय कोणता आणि व्यवस्थापन कोणाचे आहे ? भविष्यकाळ कसा असेल ?
३. प्रमोटर्सची भागभांडवलात टक्केवारी किती?
४.ही एखाद्या मोठया कंपनीने प्रवर्तित केलेली आहे का? कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्याची त्यांची काय योजना आहे.
५.यांच्या काही उपकंपन्या आहेत का ? त्यांचे इनस्टिट्यूटल भागीदार जसे, देशी / परदेशी वित्तसंस्था आहेत का?
६.कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसे आहेत?
अशी माहिती मिळवून तसही हे खूपच कठीण आहे, जर आपली खरोखर खात्री झाली की या शेअर्सचा भाव कमी  आहे पण त्यात आंतरिक मूल्य दडलेले आहे आणि भाव कमी राहणे हे कंपनी व्यवस्थापनाच्या नियंत्रणापलीकडचे आहे तरच यात गुंतवणूक करण्याचा थोडाफार विचार करता येईल नाहीतर हमखास परतावा देऊ शकतील अशा कितीतरी कंपन्याचे शेअर्स त्यांच्या मूल्याहून कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत, म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांचे युनिट आहेत. तेव्हा हातचे सोडून पाळत्याच्यामागे न धावणे कधीही श्रेयस्करच !

©उदय पिंगळे

विशेष सूचना : पेनी स्टॉक म्हणजे काय ? याची सर्वसाधारण माहिती होण्याच्या दृष्टीने वरील लेख लिहिला असून हा लेख पेनी स्टॉकची कोणत्याही प्रकारे शिफारस करीत नाही.
मनाचेtalks येथे 31ऑगस्ट 2018 रोजी पूर्वप्रकाशीत

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Thursday, 23 August 2018

#एफ_अँड_ओ_उलाढाल_मोजणी_आणि_करदेयता


     समभाग (Share), निर्देशांक(Index), वस्तू (Commodity), चलन (Currency) यातील वायद्यांचे करार (Derivetive) हे भविष्यकालीन (future) आणि पर्याय (Option) व्यवहार यापैकी कोणत्यातरी प्रकारचे असतात.जर आपण असे व्यवहार नियमितपणे करत असाल तर त्यांची व्यवहारसंख्या (Trading quantity) आणि एकूण उलाढाल (Turnover) खूप मोठी होते. या उलाढालीच्या तुलनेत यातून मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण अत्यंत अल्प असते. या व्यवहारांची संख्या आणि त्यात झालेली उलाढाल आणि यातून झालेला नफा /तोटा (Profite /loss) याची मोजणी इतर कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत थोडी वेगळी आहे. त्याच पद्धतीने त्याचा हिशोब करून आयकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल करावे लागते. वास्तविक यातील बहुतेक सर्व व्यवहार हे डिलिव्हरी न घेता भावातील फरकाने पैशामधून पूर्ण केले जात असल्याने सट्टेबाजीचे (Speculative) व्यवहार या प्रकारात मोडतील परंतू आयकर अधिनियम 43(5) मध्ये सुचवलेल्या सट्टे व्यवहारातून त्यांना  विशेष सूट देण्यात आली असून ते इतर व्यापारी व्यवहारासारखे व्यवहार आहेत असे समजण्यात येते.  त्याचप्रमाणे व्यापारी व्यवहाराप्रमाणे त्यातून काही गोष्टींची/ खर्चांची  वजावट घेता येते. फक्त उलाढाल मोजणी करण्याची पद्धत किंचित वेगळी आहे. ती कशी आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
    या व्यवहारातून होणारा नफा तोटा हा व्यापारी उत्पन्न  (Business Income) समजण्यात येऊन ते आयकर विवरणपत्रात दाखवावे लागेल. यासाठी सध्या ITR-4 हा फॉर्म भरून द्यावा लागतो. यास सट्टेबाजीतून वगळले जाऊन व्यापारी व्यवहार समजण्यात आल्याने ते करण्यासाठी आलेला खर्च जसे ब्रोकरेज, शासकीय कर, इंटरनेट चार्जेस, कम्प्युटर देखभाल खर्च, टेलिफोन बिल, वर्तमानपत्र मासिके यांची वर्गणी , या कामी एखादया व्यक्तीची नेमणूक केली असेल तर त्याचे वेतन आणि व्यावसायिक सल्ला फी याची सुयोग्य वजावट घेता येते. यात 10 हजार रुपयांहून अधिक रकमेची रोख देवाणघेवाण झाली नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. यानंतर निव्वळ करपात्र रक्कम (Net taxable Income) निश्चित करण्यात येऊन त्याप्रमाणे कर द्यावा लागतो.
1.यासाठी जमा खर्चाची नोंद (Books of Accounts) मध्ये 44/AA अधिनियमानुसार ठेवावी लागते
2. यातील एक लॉट हा सामान्यतः खूप मोठा असतो परंतू  त्यासाठी मार्जिन अथवा प्रीमियम अत्यल्प  द्यावा लागतो. यातून मिळणारा नफा उलाढालीच्या प्रमाणात खूपच कमी असतो. आयकर अधिनियम 44/AB प्रमाणे संगणकाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवसायातील नफा 6% हून कमी असल्यास आणि उलाढाल 2 कोटींहून अधिक असल्यास सनदी लेखपालाकडून (CA) त्याचे लेखापरीक्षण ( Tax Audite) करून घ्यावे लागते.
  वर उल्लेख केल्याप्रमाणे हे व्यवहार प्रत्यक्षात डिलिव्हरी न घेता पैशांच्या स्वरूपात डिलिव्हरी डेटला किंवा डे ट्रेडिंगमध्ये समायोजित केले जात असल्याने, त्याचे बिल पूर्ण स्वरूपात परंतू समायोजन त्यातील फरकाने केले जाते. यामुळेच यातील उलाढालीची मोजणी करताना ---
1.त्यांतील फक्त फरकाचीच मोजणी नफा किंवा तोटा न पाहता केली जाते. म्हणजेच यामधून झालेला नफा किंवा तोटा किती आहे यापेक्षा फरक किती रुपये आहे विचार केला जातो.
2.ऑप्शन सेल करून मिळालेला निव्वळ प्रिमियम एकूण उलाढालीत मिळवला जातो.
3. जर एखादा व्यवहार रिव्हर्स करण्यात आला तर त्यातील फरकही उलाढालीत मिळवण्यात येतो.
   समजा एखाद्याला फ्युचरमधील व्यवहारातून ₹30 हजार डिलिव्हरी डेटला मिळाले. डे ट्रेडींग मध्येएक व्यवहार उलटा करून ₹5 हजार मिळाले. ऑप्शन व्यवहारात ₹10 हजार तोटा झाला. ऑप्शन सेल करून ₹20 हजार मिळाले तर त्याचा एफ अँड ओ टर्न ओव्हर होईल ₹30+ 5 + 10+ 20=₹65 हजार होईल यात नफा तोटा याचा विचार न करता फक्त फरक गृहीत धरला आहे. तर व्यवहारातील फायदा मोजताना नफा तोट्याचे समायोजन केल्याने नफा 30 +5 -10+ 20= ₹55 हजार समजण्यात येईल. ही उलाढाल 2 कोटी हुन अधिक असेल,  जे अशा प्रकारच्या व्यवहारात सहज शक्य आहे आणि त्यावरील फायदा 6% पेक्षा कमी असेल तर त्यास टॅक्स ऑडिट करून घ्यावे लागेल. अशा व्यवहारात तोटा झाला असेल तरी त्याची वजावट पुढील वर्षी 7 वर्षात घेता येते. यातून झालेला तोटा कॅपिटल गेन आणि पगारापासून मिळणाऱ्या उत्पन्नाशी ऍडजस्ट होणार नाही. तोटा पुढील वर्षी ओढण्यासाठी आयकर विवरण पत्र निर्धारित मुदतीत भरणे जरुरी आहे. सदर व्यवहार विवरणपत्रात न दाखवणे आणि आवश्यकता असल्यास टॅक्स ऑडिट करून न घेणे हा गुन्हा असून त्यासाठी दंडात्मक तरतुदी आहेत. आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी ज्यांना टॅक्स ऑडिट करावे लागत नाही अशा करदात्यांना 31 ऑगस्ट 2018 पर्यंत, तर टॅक्स ऑडिटची आवश्यकता असणाऱ्या करदात्यांना 30 सप्टेंबर 2018 पर्यंत विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर दंड भरून उशिरात उशिरा 31 मार्च 2019 पर्यंत आपले विवरणपत्र भरता येऊ शकेल.

©उदय पिंगळे

 मनाचेtalks या ई पब्लिकेशनवर 24 ऑगस्ट 2018 रोजी पूर्वप्रकाशीत
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 17 August 2018

#म्युचुअलफंड_युनिट_नवीन_वर्गीकरण_आणि_करदेयता

     भांडवलबाजार नियंत्रक सेबीच्या आदेशानुसार, गुंतवणूकदारांच्या सोईसाठी म्युचुअलफंडांच्या विविध ओपन एंडेड योजनांचे, 5 मुख्य प्रकारांत आणि 36 उपप्रकारात वर्गीकरण नुकतेच विविध फंडहाऊसनी केले ते कसे ते यापूर्वीच्या लेखात पाहिले आहे. त्यामुळे यापूर्वी अस्तीत्वात असलेल्या योजनांपैकी काही योजना एकमेकात विलीन (murged) झाल्या, काही बंद (closed) झाल्या तर काही योजनांची गुंतवणूक मुख्यत्वे कोणत्या प्रकारात आहे असे दर्शविणारे नवे बारसे (renaming) झाले. ज्या योजनेचे नाव बदलले आहे त्याच्या युनिट संख्येत कोणताच फरक पडला नाही. ज्या योजना बंद झाल्या त्यांचे एका विशिष्ट दिवसाचे (record date) मूल्य युनिट धारकांना दिले गेले तर विलीनीकरण झालेल्या योजनेचे एका विशिष्ट दिवशी निव्वळ मालमत्ता मूल्याने (nav) विमोचन (redeem)   होऊन त्या बदल्यात दुसऱ्या योजनेचे युनिट दिले गेले.  योजनेतून बाहेर पडण्याचा अजून एक पर्याय दिला होता यातील ज्या योजनेचे नाव बदलले तेथे युनिट संख्येत कोणताही बदल झालेला नाही परंतू जेथे योजनांचे विलिनीकरण झाले तेथे युनिट धारकाची संमती नसेल  तर किंवा योजना बंदच झाली तर धारकाची संमती असो अथवा नसो सदर युनिटचे एन ए वी प्रमाणे रिडीम करण्यात आले.
     अशा प्रकारच्या व्यवहारामुळे काही प्रश्न निर्माण होतात ---
1.या योजना बंद झाल्याने या व्यवहारात झालेल्या नफा / तोटा याचे काय करायचे?
2.विलीनीकरणास संमती दिली किंवा नाही दिली तर या व्यवहारापासून होणाऱ्या नफा / तोट्याचे काय करायचे.
3.जुन्या योजनेच्या बदल्यात मिळालेले नवीन युनिट नंतर विकून झालेल्या व्यवहाराची नफा तोटा मोजणी कशी करायची ?
4.अशा व्यवहारांची कर आकारणी कशी होईल ?
       यावर्षीपासून 1 लाखाहून अधिक दीर्घकालीन नफ्यावर (LTCG) 10% कर सुचवण्यात आला आहे यामुळे युनिट रिडीम होऊन त्याचे दुसऱ्या योजनेचे युनिट मिळाले असता यापासून होऊ शकणाऱ्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन नफा तोट्याचे (LTCG/STCG or LTCL/STCL) काय करायचे हा यासंदर्भात निर्माण होणारा मोठा प्रश्न आहे ?
  जेथे अशा प्रकारे एका योजनेच्या युनिटचे विमोचन होऊन नवीन योजनेचे युनिट मिळाले आणि अल्पकालीन किंवा दीर्घकालीन नफा तोटा होत आहे अशा सर्वच गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आनंददायक गोष्ट अशी की या व्यवहारातून होणाऱ्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन नफ्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही याचप्रमाणे अशा व्यवहारातून होत असलेल्या तोट्यास कोणतीही वजावट मिळणार नाही. याचप्रमाणे भविष्यात नफा किंवा तोटा मोजताना मूळ योजनेत गुंतवणूक केल्याची तारीख हीच नवीन योजनेत गुंतवणूक केल्याची तारीख समजण्यात येईल. आयकर अधिनियम 47 मध्ये याप्रमाणे बदल करण्यात आले असून सदर बदल 1 एप्रिल 2016 पासूनच अमलात आला आहे. फक्त नवीन युनिटची खरेदी किंमत ही जुन्या योजनेच्या प्रमाणात समायोजित (adjust) करावी लागेल. याशिवाय सदर युनिट 31 जानेवारी 2018 पूर्वी खरेदी केले असल्यास नफा/ तोटा मोजण्यासाठी ऍडजस्ट करून आलेली खरेदी किंमत अथवा 31 जानेवारी 18 ची ऍडजस्टमेंट करून येणारी किंमत यातील जी किंमत जास्त असेल ती खरेदी किंमत धरण्यात येईल.यामध्ये दोन प्रकारची परिस्थिती असू शकते. 1 फेब्रुवारीच्या पुर्वी विलीन झालेल्या योजना आणि 1 फेब्रुवारीच्या पासून  विलीन झालेल्या योजना.या सर्व परिस्थितीचा विचार करूनच खरेदीमूल्य आणि विक्रीमूल्य काढून नफा / तोटा याची मोजणी करावी लागेल. ही मोजणी करणे थोडे कौशल्याचे काम असून यासाठी खरेदी किंमत ,विक्री किंमत आणि मूळ योजनेची एन ए वी 31 जानेवारीपूर्वी किंवा नंतर विलीन झालेल्या योजनेची किंमत माहीत झाली की त्याच्या समप्रमाणात एन ए वी समायोजित करता येईल. यानंतर मोजणी करणे शक्य आहे.

©उदय पिंगळे

मनाचेtalks येथे 17 ऑगस्ट 2018 रोजी पूर्वप्रकाशीत
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 10 August 2018

बोनस शेअर्स आणि करदेयता

#बोनसशेअर्स_आणि_करदेयता

  बोनस शेअर्स म्हणजे कंपनीने त्यांच्या भागधारकांना  दिलेली विनामूल्य भेट.यासाठी अट एवढीच की  बोनस शेअर देण्याच्या तारखेला तुम्ही त्या कंपनीचे भागधारक असणे जरुरीचे आहे. याकरिता कोणतेही मूल्य आकारले जात नाही. फायद्यातून लाभांशाचे ( dividend)  वितरण केल्यावरही काही रक्कम कंपनीच्या गंगाजळीत ( reserve ) शिल्लक राहते. मोठया प्रमाणात ही रक्कम साठून रहात असेल तर डिव्हिडंड वाढवणे किंवा बोनस शेअर देणे हे मार्ग उपलब्ध आहेत. चांगल्या कंपन्या आपल्या भागधारकांना वेळोवेळी वाढीव  डिव्हिडंड आणि बोनस शेअर देत असतात. बोनस शेअर देण्याचे काही संकेत आहेत. सेबीच्या नियमांच्या अधीन राहून संचालक मंडळाने बोनस द्यायचे ठरवणे त्याला भागधारकाची मंजुरी घेणे जरूर तर भागभांडवल वाढवणे यानंतर एखादी तारीख निश्चित करून त्यादिवशी शेअर वितरित करणे. बोनस शेअर दिल्याने कंपनीच्या मालमत्तेत कोणताच फरक पडत नाही. बोनस देणे म्हणजेच गंगाजळीचे रूपांतर भागात करणे यामुळे शेअर्सची संख्या वाढते तर रिजर्व थोडे कमी होतात.
      तांत्रिकदृष्ट्या बोनस दिल्याने कंपनीच्या बाजारभावात प्रमाणशीरपणे घट होते. परंतू शेअर्सची संख्या वाढल्याने उलाढालीत वाढ होते. भाव कमी झाल्याने अनेकांना ते शेअर आपल्या आवाक्यात आले असे वाटल्याने मागणीत वाढ होते. जर कंपनीची कामगिरी चांगली असेल तर भावात बोनस देण्यापूर्वी असलेल्या भावाएवढी किंवा त्याहून अधिक प्रमाणात भाववाढ होते .समभागधारकांचा कंपनीवरील विश्वास त्यातून प्रकट होत असतो. याऊलट चांगली कामगिरी नसलेल्या कंपनीच्या शेअरच्या भावात घट झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने बोनस शेअर ही एक संधी आहे. बाजारातील सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असल्याने बोनसचा लाभार्थी निश्चित करून वितरित करणे खूप सोपे झाले आहे.
      मध्यंतरी अनेक वर्षे अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर 15% कर आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कोणताहीवकर नव्हता त्यावेळी करदेयता निश्चित करणे व त्याचे कमी अधिक प्रमाणात होणारे परिणाम तपासून पाहणे तुलनेने सोपे होते . 1 एप्रिल 2018 पासून एक लाखावरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर चलनवाढीचा फायदा न देता 10% कर द्यावा लागणार आहे. या कराची निश्चिती करताना 31 जानेवारी 2018 होऊ शकणाऱ्या फायद्यास सूट देण्यात आली आहे, मात्र यातून होणाऱ्या तोट्यास कोठेही समायोजित करता येणार नाही. यामुळे आपण कोणत्या भावाने भावाने शेअर खरेदी केले. 31 जानेवारीस त्याचे जास्तीत जास्त मूल्य किती होते. बोनस रेशो काय आहे. बोनस नंतर त्याचा भाव किती आहे. यावर प्रत्येकाच्या करदेयतेत फरक पडणार आहे. आयकर कायद्यानुसार डी मॅट खात्यात प्रथम असलेले शेअर प्रथम विकले गेले (first in first out) या तत्वाने त्याचा हिशोब केला जातो तर बोनस शेअरची किंमत शून्य समजण्यात येते. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक व्यवहारात यामुळे फरक पडेल. त्याप्रमाणे कर आकारणी होईल. यामुळे खालील प्रमुख शक्यता निर्माण होतात.
1. शेअरभाव बोनसचे प्रमाणात कमी होईल यामुळे मूळ शेअरविक्रीत तोटा होईल तो कुठेही वजा करता येणार नाही.
2. बोनस शेअर एक वर्षाच्या विकल्यास पूर्ण किंमतीवर अल्पमुदतीचा भांडवली नफा समजून 15% कर द्यावा लागेल तर एक वर्षाने विकल्यास एक लाख रुपये दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर 10% कर द्यावा लागेल.
 3.याउलट हे शेअर बोनसपुर्वी विकल्यास एक लाख रुपयांवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10% कर द्यावा लागेल.
यासर्व शक्यता आजमावून ---
1.जर कराच्या दृष्टीने हा फायदेशीर व्यवहार ठरत असेल (कारण अशी शक्यता जास्त आहे) तर कम बोनस शेअर विकावेत म्हणजे कुठेही समायोजित न होणारा दीर्घकालीन तोटा सहन करावा लागणार नाही. निवासी करदात्यांना असलेले नियम अनिवासी गुंतवणूकदार, स्वदेशी परदेशी वित्तसंस्थाना  लागू असल्याने हा फायदा घेण्यासाठी त्यांच्याकडूनही कम बोनस विक्रीची शक्यता जास्त असल्याने बोनसनंतर हेच शेअर पुन्हा कमी भावात विकत घेता येतील.
2. जर बोनसनंतर काही दिवसांत पुन्हा मूळखरेदी अथवा 31 जानेवारी 2018 चा सर्वोच्च किंमत यातील जास्त किंमतीएवढा भाव होईल असा विश्वास आणि त्यासाठी कमी अधिक काळ थांबण्याची तयारी असेल तर सद्या काहीही करू नये.
3.जर अंशतः विक्री करायची असेल तर बोनस नंतर विक्री करावी यात तोटा समायोजित होणार नाही हे लक्षात ठेवावे.
4. कोणत्याही कारणाने वर्षभरात विक्री करायची असेल तर बोनसपूर्वीच विक्री करावी. हेच शेअर वरीलप्रमाणे पुन्हा खरेदी करता येण्याचा पर्याय खुला राहील.
    बदललेल्या करविषयक कायद्यामुळे हा हिशोब करणे थोडे किचकट झाले आहे. जरूर असल्यास याबाबतीत तज्ञाचे  मार्गदर्शन घ्यावे.

©उदय पिंगळे

मनाचेtalks येथे 10 ऑगस्ट 2018 रोजी पूर्वप्रकाशीत.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 3 August 2018

#गोल्ड_ईटीएफ_की_ईगोल्ड

    सोन्यातील गुंतवणूक यावर यापूर्वीच्या लेखात विविध पर्याय त्यातील फायदे तोटे यांचा विचार केला होता. 'खर तर गुंतवणुकीसाठी सोने' या दृष्टीने भारतीयांची मानसिकता आहे का?  हा मोठ्या संशोधनाचा विषय होऊ शकतो. सोन्यापासून मिळत असलेला उतारा (return) हा, फारच कमी काळ बाजारात उपलब्ध इतर पर्यायांच्या तुलनेत आकर्षक असतो.  अडीअडचणीला सोने उपयोगी येते म्हणून आम्ही नियमित सोने खरेदी करतो असे अनेकजण म्हणतात परंतू अत्यंत अडचणीच्या प्रसंगीही सोने विक्रीचा विचार प्राधान्याने केला जात नाही. याशिवाय धातू स्वरूपातील सोने खरेदी / विक्री किंमतीत  असलेला फरक हा यातील फायद्याचा बराच भाग खाऊन टाकतो यामुळे प्रत्यक्षात फायद्यातील दिसणारा फरक फक्त कागदोपत्रीच दिसतो. असे असले तरी सोन्याच्या पेढीवर किराणामालाच्या दुकानाप्रमाणे असलेली गर्दी पाहिली तर खरोखरच गुंतवणूक म्हणून विचार करणाऱ्या लोकांनी गोल्ड ई टी एफ ,ई गोल्ड यासारख्या आधुनिक पर्यायाचा विचार करून आपल्याला त्यातील अधिक योग्य अशा पर्यायाची निवड करावी.
1. गोल्ड ई टी एफ हे म्युचुअल फंडाप्रमाणे आहेत . यातील गुंतवणूक 99.5% शुद्ध सोन्यात केली जाते. यातील एक युनिट एक ग्राम सोन्याचे प्रतिनिधित्व करतो. एक युनिट याप्रमाणे त्याची खरेदी / विक्री केली जाते. काही फंड हाऊसने हे युनिट आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही रकमेचे खरेदी करता येण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ई गोल्ड हे सोने पेपर (electronic) प्रकारात उपलब्ध असून दिर्घकाळात ई गोल्ड अधिक किफायतशीर आहे.
2.गोल्ड ई टी एफ 500 ते युनिट1000 झाली की मग फंडहाऊसच्या धोरणानुसार धातूस्वरूपात बदलता येते. काही फंड हाऊसनी याहून कमी वजनाचे सोने घातूरूपात बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला असला तरी त्याचा प्रक्रियाखर्च  अधिक आहे. ई गोल्ड मांत्र 8 ग्रॅम्स किंवा त्यापटीत धातुरुपात बदलून घेता येते. यासाठी लागणारा प्रक्रियाखर्च कमी आहे.
3.गोल्ड ई टी एफ याची खरेदी विक्री शेअरबाजारात नियमीत वेळात 9:15 ते 15:30 या वेळात तर ई गोल्ड कमोडिटी मार्केट वेळात 10:00 ते 23:30 या वेळात होते.
4.गोल्ड ई टी एफ एक वर्षांनी विकल्यास काही अटींसह 10% कर द्यावा लागेल. चलनवाढीचा फायदा यास मिळणार नाही. ई गोल्ड तीन वर्षांनंतर विकल्यावर चलनवाढीचा फायदा घेऊन येणाऱ्या नफ्यावर 20% कर द्यावा लागेल. करविषयक दृष्टिकोनातून दिर्घकाळात गोल्ड ई टी एफ पेक्षा ई गोल्ड खरेदी करणे अधिक फायदेशीर आहे.

©उदय पिंगळे
मनाचेtalks येथे 3 ऑगस्ट 2018 रोजी पूर्वप्रकाशीत
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .