Friday, 29 December 2017

G D P सकल राष्ट्रीय उत्पन्न

#सकल_राष्ट्रीय_उत्पन्न_(G_D_P)

   एखाद्या देशाची विशिष्ट कालावधीतील आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी जी डी पी ही संज्ञा जगभरात  वापरली जाते .राज्यकर्ते ,अर्थतज्ञ ,  गुंतवणूकदार , व्यावसाईक , बँकर , राजकारणी याशिवाय माध्यमे यांनाही त्याच्या आकडेवारी , अंदाजात रस असतो . यात त्या देशातील तिमाही /वार्षिक कालावधीतील निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा यांचे बाजारमूल्य मोजले जाते .जगाच्या तुलनेत त्या देशाची प्रगती तसेच इतर देशाच्या तुलनेतील त्या देशाची प्रगती किती आहे हे मोजण्याचा तो एक मानदंड आहे .नुसत्या जी डी पी वरून देशातील लोकांचे रहाणीमान आणि क्रयशक्ती निश्चित अशी समजत नसल्यानेच खर्च करण्याच्या त्यांच्या क्षमतेवरुन काढलेला जी डी पी अधिक अचूक असतो .जी डी पी वरून त्या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा अंदाज बांधता येतो .
    जी डी  पी ची व्याख्या करणे सोपे तर मोजमाप करणे ही एक किचकट प्रक्रिया आहे .त्याचप्रमाणे प्रत्येक देशाची जी डी  पी मोजण्याची पद्धत वेगवेगळी आहे . साधारणपणे सर्व एकत्रित उत्पन्न किंवा सर्वांनी केलेला खर्च यांची बेरीज साधारण जवळपास सारखी असल्याने तो उत्पनावरून आणि खर्चावरून या दोन प्रकारे काढता येते . उत्पन्नावरून  काढलेल्या जी डी  पी चा काही लोक जी डी पी (आई) असा उल्लेख करतात .यात सर्वांना मिळणारे वेतन , सर्व नोंदीत आणि अनोंदित फर्मचा करपूर्व नफा याची बेरीज करुन त्याना मिळालेली सरकारी मदत वजा करुन काढतात .तर खर्चावरून जी डी पी काढणे अधिक शास्त्रशुद्ध असून त्यामध्ये सर्वानी केलेला खर्च , गुंतवणूक , सरकारचा खर्च आणि केलेली आयात व निर्यात यांतील फरक यांची बेरीज करुन काढली जातो .
 जी डी पी हा आर्थिक प्रगतीचा मापदंड असल्याने त्याच्या आकडेवारीचा अर्थव्यवस्थेतील सर्व गोष्टींवर परिणाम होतो .जर जी डी पी दर चांगला असेल तर त्याचाच दुसरा अर्थ असा होतो की देशात बेकरी कमी आहे .कामगारांचे वेतनमान उच्च आहे .औद्योगिक क्षेत्रात मजुरांना मागणी आहे .उत्पादीत मालाला उठाव आहे .जी डी पी तील बदलांचा मग तो कमी होवो अथवा जास्त स्टॉक मार्केटवर ताबडतोब परिणाम होतो .अर्थव्यवस्था खराब असणे म्हणजे कंपन्यांची नफाक्षमता कमी असणे ज्यामूळे शेअरचे भाव खाली येतील त्यामुळे गुंतवणूकदार चिंतित असतील तर अर्थतज्ञ  अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे भाकीत  करतील .
 भारतात जी डी पी मोजण्याचे कार्य केंद्रीय सांख्यकी विभाग (C S O) यांच्याकडून केले जाते .ते दोन्ही प्रकाराने (उत्पादन आणि खर्च) त्याची मोजणी करुन निव्वळ  व खरीखूरी (gross and inflection adjusted)  आकडेवारी प्रसारित करतात .या दोन्ही मध्ये आठ उपविभाग असून त्यामुळे कोणत्या गोष्टींवर अधिक लक्ष दिले पाहिजे ते चांगल्या प्रकारे अधोरेखित होते . यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे , तिचे विश्लेषण करणे आणि त्याची नोंद ठेवून जतन करणे हे या विभागाचे काम आहे .विविध प्रकारचे सर्व्हे करुन तसेच विविध केंद्र व राज्य सरकारी विभागात समन्वय साधून माहितीचे संकलक केले जाते ,  जसे शेतीचे उत्पन्न , घावूक बाजार निर्देशांक ,  औद्योगिक उत्पादन निर्देशांक , महागाई निर्देशांक इ .या सर्व माहितीचे पृथकरण करुन जी डी  पी  काढला जातो . याची आकडेवारी  तिमाही / वर्ष संपल्यावर दोन महिन्यांनी जाहीर केली जाते तसेच वेळोवेळी माहितीत जी भर पडते त्याप्रमाणे दुरुस्त केली जाते . पुढील तिमाही /वर्ष याबाबतीतील अंदाजही वर्तवला  जातो .त्याच्याशी संबंधित घटक त्यांच्या जरूरीप्रमाणे या माहितीचा उपयोग करुन घेतात .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 22 December 2017

शेअरबाजार आक्षेप गैरसमज

#शेअरबाजार_आक्षेप_गैरसमज

   शेअरबाजाराविषयी अनेक आक्षेप आणि गैरसमज आहेत .त्यातील महत्वाचे आक्षेप , गैरसमज असे -
१.शेअर बाजार हा जुगार आहे : अनेक लोकांचा  शेअर बाजार हा जुगार आहे असा समज आहे .हे लोक जेथे आपली बचत आणि गुंतवणूक करतात त्या संस्था मोठया प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करीत असतात .शेअरबाजारात तुम्ही कोणत्या शेअरची खरेदी/विक्री  कधी आणि कोणत्या भावाने करता यावर तुम्हाला होणारा फायदा / तोटा अवलंबून असतो .अनेक लोक आजही ज्या पद्धतीने अभ्यास न करता गुंतवणूक करतात त्यामुळे या गैरसमजाला पुष्टी मिळते .यांमधील अल्प अथवा दीर्घकालीन गुंतवणूक ही , लाभ मिळवावा या आणि याच हेतूने केली जावी .यातील लाभाचे लोभात रूपांतर झाले की व्यक्ती सारासार विचार गमावून बसते .लाभ आणि लोभ यातील सीमारेषा अत्यंत पुसट आहे .यात होणाऱ्या फायद्यामुळे अधिकाधिक फायदा मिळवावा असा मोह होवू शकतो .मांत्र,  केवळ आंधळेपणाने गुंतवणूक करुन क्वचित फायदा होत असेल , परंतू कायम फायदा होवू शकत नाही .अशा व्यक्तींना एक जोरदार फटका बसला की त्या बाजारपासून दूर होतात आणि भरकटल्यासारखी बाजाराबद्दल काही ठाम विधाने करत असतात .येथे अभ्यास करण्याची तयारी आणि थांबण्याची चिकाटी असेल तर निश्चित फायदाच होतो .तेव्हां गुंतवणूक करण्यासाठी पैसे आणि मनोबल असेल तर आकर्षक परतावा मिळू शकतो .
२.भांडवलदार आणि असामाजिक घटकांना यामुळे प्रोत्साहन मिळते : कोणतीही व्यवस्था असेल तर तिचा गैरफायदा घेणारे असतातच म्हणून व्यवस्थाच मोडीत काढायची नसते .आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि त्यात भांडवलनिर्मिती करण्याची परवानगी आहे . बाजारातील कोणाताही  घटक बाजाराला सातत्याने एक दिशा दाखवू शकत नाही .आर्थिक क्षेत्र आता बऱ्यापैकी नियमित झाल्यामुळे त्यावर बाजार नियंत्रकांचे (market regulator) नियंत्रण असते . त्यामुळे सर्व व्यवहारात पुरेशी पारदर्शकता आली आहे .एकाद्या शेअरचे गुणात्मक आणि संस्थात्मक मूल्य शोधून योग्य किमतीस गुंतवणूक करू शकतो आणि फायदा मिळवू शकतो .
३.शेअरच्या वाढलेल्या भावाचा कंपनीस काही फायदा नसतो : हा आक्षेप अर्धसत्य आहे .यातून सटोडीयांचा फायदा होत असला तरी शेअरचे भाव वाढले असतील तर कंपनीस अधिमूल्याने भांडवल किंवा कमी व्याजदराने कर्ज उभे करता येवू शकते .गुंतवणूकदारांना विक्री करुन किंवा नवी खरेदी /विक्री करुन गुंतवणूक काढून घेण्याचा लाभ मिळवण्याचा पर्याय मिळतो .सरकारला कर मिळतो यात कोणतेही लपवाछपवीचे व्यवहार होत नसल्याने काळया पैशांची निर्मिती होत नाही .
४. या व्यवहारात एकाचा फायदा हा दुसऱ्याचा तोटा असतो त्यामुळे त्याचा तळतळाट लागतो : शेअर बाजारातच नव्हे तर कोणाताही व्यवहार हा तारतम्याने करायचा असतो .प्रत्येकाने अतीलोभ आणि भय ह्यांवर ताबा ठेवून आणि दूरवरचा विचार करून तो करावा लागतो .यामधे जोखीम आहेच आणि जोपर्यंत विशिष्ट किंमतीत असा कोणताही व्यवहार करण्याची सक्ती होत नाही तोपर्यत ते आपल्या मर्जीने झाले आहेत आणि करणाऱ्याने ते जाणीवपूर्वक केले आहेत असे  समजावे लागेल .
५. हे श्रीमंतांचे काम आहे आपले काम नाही : खरं तर महागाईवर मात करणारा परतावा (return) मिळण्यासाठी प्रत्येकाने बाजारांत गुंतवणूक करायला हवी .गुंतवणूकदाराची गरज भागवणारे , जास्त उतारा देणारे त्याचप्रमाणे तरलता (liquidity) असलेले हे साधन आहे .ते जोखमीसह स्वीकारावे लागते . भविष्यातील वाढत्या गरजा कदाचीत ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते भागवू शकतील परंतू ज्याची खरीखुरी गरज आहे अशा व्यक्ती यापासुन वंचित राहतील .मुळात येथे गुंतवणुकीची सुरुवात ही अत्यल्प पैशाने करता येते .थेंबे थेंबे तळे साचे या प्रमाणे गुंतवणूक करुन त्यात वाढ करता येवू शकते .
६.या नादाला लागून कर्ज झाले ,घरदार विकावे लागले : गुंतवणूकदारांचे पाय खेचणारा हा एक फिल्मी विचार आहे .स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचे नाही .आपली जोखीम घेण्याची कुवत आणि उपलब्ध पैसे याचा योग्य वापर करुन यातून संपत्ती निर्माण करता येते .
७.ही हरामाची कमाई आहे : हा एक अनेकांचा आवडता भडक आक्षेप आहे .यात कष्ट करावे लागत नाहीत घाम गाळावा लागत नाही .असे असेल तर सर्व बौद्धिक  कामे करुन मिळवलेली कमाई ही हरामाची समजावी लागेल .बँकेत पैसे ठेवून व्याज मिळवणे , कमिशन घेवून विक्री व्यवहार करणे , अल्प भावात फ्लॅट घेवून तो भाड्याने देणे कालांतराने जास्त किंमतीस  विकणे ही जर हरामाची कमाई नसेल तर पुढे भाव वाढतील या हेतूने घेतलेले शेअर हरामाचे कसे?
   तेव्हां आपण आपल्या आणि इतरांच्या गुंतवणूकीकडे नैतिक अनैतिकतेच्या  कालबाह्य कल्पना झुगारून निर्मळतेने पाहू शकू तोच खरा सुदिन !

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .
              #कॉफी_कॅन_पोर्टफोलिओ
   भांडवलबाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे त्यांच्या गुंतवणूक करण्याच्या पध्दतीवरून पडणारे पाच प्रमुख प्रकार आपण या पूर्वीच्या पाहिले आहेत . यातील दीर्घ मुदतीने गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या प्रकाराच्या गुंतवणूकीशी मिळतेजुळते कॉफी कॅन पोर्टफोलिओ हे एक तंत्र आहे .
   1984 साली रॉबर्ट किर्बी  या पोर्टफोलिओ मॅनेजरने  गुंतवणूकीच्या या पध्दतीला हे नाव सूचवले .19 व्या शतकाच्या सुरुवातीला ओल्ड वेस्ट या भागातील लोक आपल्याकडील मौल्यवान गोष्टी जसे पैसे ,  सोन्याचे दागिने या सारख्या गोष्टी कॉफीचे टीन मधे ठेवून गादीत दडवून ठेवत असत .10/15 वर्षांनी अगदीच गरज पडली तरच त्याचा उपयोग करत . रॉबर्ट किर्बी याने याच तंत्राचा वापर करून असे सुचवले की काही चांगले शेअर्स शोधून ,एक डायव्हर्सीफाईड पोर्टफोलिओ तयार करावा . त्यातील भावामधे होणारी चढ उतार याकडे  लक्ष देवू नये .त्याचे पुनर्मुल्यांकन करु नये आणि ते किमान दहा वर्ष तरी विकले नाहीत तर त्यात खूप मोठी मूल्यवृद्धी होवू शकते . अनेक गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकीसाठी ही पद्धत सध्या वापरत आहेत .
   या तंत्राने गुंतवणूक करण्याचे प्रमुख फायदे असे -
१. ही एक दीर्घ काळासाठीची गुंतवणूक प्रक्रिया असल्याने एखाद्या तिमाहीत अपेक्षित नसलेली कामगिरी , सरकारी धोरणातील बदल या सर्वांचा गुंतवणूकदारावर परिणाम होत नाही .सी सी पी (coffee can portfolio) तंत्राने गुंतवणूक करणाऱ्यावर अशा अल्पकालीन बदलामुळे बाजारभावातील फरकामुळे आपल्या उद्देशापासून फारकत घेतली जात नाही .
२. या पद्धातीत इंडेक्सच्या परताव्याहून अधिक परतावा मिळण्याची जास्त शक्यता : इंडेक्सने दीर्घकाळात चांगला परतावा दिल्याने त्यामधे अथवा त्याच प्रमाणात शेअरमध्ये  गुंतवणूक करणे हा एक फायदेशिर सौदा ठरू शकतो .परंतू इंडेक्स एक अनेक शेअरचे मिश्रण असून त्यातील सर्वच शेअर एकाच वेळी वाढ दर्शवित नाहीत .त्यामूळे त्यात होणारी वाढ ही त्यातील सर्व शेअरची सरासरी असते . कॉफी कॅन पोर्टफोलिओ मध्ये भविष्यात फक्त वाढच अपेक्षित असलेल्याच शेअरचा सामावेश असलेले शेअर असल्याने यात इंडेक्सहून अधिक परतावा मिळू शकतो .
३.कमीत कमी आस्थापन खर्च : यामधे शेअरची सातत्याने खरेदी / विक्री होत नसल्याने एकंदर उलाढालीचे प्रमाण खूप कमी असते , त्यामुळे यावर होणारा ब्रोकरेज आणि इतर खर्च बऱ्याच प्रमाणात वाचतो .
  या पद्धतीने आपला गुंतवणूक संच (portfolio) बनवणाऱ्या व्यक्ति आणि संस्था शेअरची निवड करताना खालील गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतात .
१.गुंतवणूकीचे विविध निकष वापरून शोधलेली अशीच कंपनी असेल की जीने कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक यांच्या मालमत्तेत गेल्या दहा वर्षात कित्येक पटीने वाढ केली आहे .दरवर्षी उलाढाल किमान 10% वाढली आहे .
२.यात गुंतवलेल्या भागभांडवलावर मागील दहा वर्षी प्रत्येक वर्षी किमान 15 % चक्रवाढव्याजदराने उतारा मिळवला आहे .(Return on capital employed) ज्या कंपन्याचा 5हून अधिक आणि 10 वर्षाचा फायनांशियल डाटा उपलब्ध आहे तो विचारात घेतला जातो .5 किंवा त्यापेक्षा कमी वर्षांची माहिती असलेल्या कंपन्याचा अजिबात विचार केला जात नाही .
   बाजारात आपल्याला शेअरचा भाव (Price ) समजतो पण त्याचे आंतरिक मूल्य (हे शोधून काढायचे असते .वॉरेन बफे यांच्या ' चांगले शेअर घ्यावे आणि विसरुन जावे '  याच साध्या तंत्राची ही सुधारीत आवृत्ती असून अनेक गुंतवणूकदार , गुंतवणूक तज्ञ , ब्रोकर , गुंतवणूक संस्था या पद्धतीचा वापर करीत असून ते त्यांनी शोधलेले शेअर्स जाहीरही करीत आहेत .एक मार्गदर्शक दिशा म्हणून याचा अभ्यास करून आपलाही एक चांगला कॉफी कॅन पोर्टफोलिओ बनवून अधिक लाभ मिळवू शकतो .सी सी पी तंत्राचे प्रमुख निकष पूर्ण करणाऱ्या कंपन्याची नावे खालील चित्रात दिली आहेत ती अभ्यासासाठी असून त्यांची शिफारस केलेली नाही . आपल्या गुंतवणूक  सल्लागाराकडून सल्ला आणि जोखिम समजून घेवून गुंतवणूक निर्णय घ्यावा .अशाच प्रकारचे निकष वापरून चांगली कामगिरी अपेक्षित असलेले शेअर्स , इक्विटी म्यूचुअल फंडाच्या योजना ,इंडेक्स फंड शोधता येवू शकतील .

©उदय पिंगळे



Friday, 8 December 2017

आर्थिकबाबींतील या चूका टाळा ....

                            आर्थिकबाबींतील या चूका टाळा .....
    मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात     ' शेखचेल्ली ' चा धडा होता .तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता .पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही .तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत . आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो .
१ बचत आणि गुंतवणूक :अनेकजण या दोन्हीची गल्लत करून आपण केलेल्या बचतीलाच गुंतवणुक असे समजतात .या दोन्हीही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असून गुंतवणुकीत जाणीवपूर्वक धोका (Calculated Risk) स्वीकारावा लागतो .याच लेखात दिलेल्या पेज /ब्लॉग  चे लिंकवर जावून मी पोस्ट केलेला ' बचत आणि गुंतवणूक'  यावरील लेख वाचावा .
२ इन्शुरेन्स ही गुंतवणूक नाही :इन्शुरेन्स आणि गुंतवणूक ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत .इन्शुरेन्स मधून कठीण प्रसंगी सुरक्षिततेची तरतूद पर्याय म्हणून पैशांच्या स्वरूपात करायची असते तर गुंतवणुकीतून  महागाईवर मात करणारा आकर्षक परतावा मिळवायचा असतो .या दोन्हीही गोष्टी एकदम पूर्ण होवू शकत नाहीत .तेव्हा वेगळे असे सुरक्षा कवच घेवून अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा . दोन्हीही गोष्टी एकत्रित असणाऱ्या योजनातून आपली पूर्ण गरज भागू शकत नसल्याने अशा योजना घेवू नयेत .
३ बचत आणि गुंतवणूक करण्यात उशीर करणे : अनेकजण खर्च करायला एका पायावर तयार असतात मांत्र गुंतवणूक करण्यासाठी ते टाळाटाळ करतात .गुंतवणूकीची सुरूवात लवकरात लवकर करणे केव्हाही चांगलेच .त्यामुळे आपली गुंतवणूक चक्राकारगतीने वाढते .गुंतवणूकीचे विविध पर्याय आजमावून घेता येतात .उशीरा सुरूवात केलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करायला लागल्याने फारसे पर्याय आजमावता येत नाहीत .
४ कर्ज घेवून चैन करणे : सहज उपलब्ध होणारे व्यक्तिगत कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांमुळे अनावश्यक गोष्टी या आपल्या गरजा कधी बनतात ते समजत नाही .इतर कोणत्याही मार्गाने उपलब्ध असलेल्या कर्जापेक्षा यावरील व्याजदर सर्वाधिक असतो त्यामुळे आपण कर्जाच्या सापळ्यात कधी अडकतो  ते समजत नाही .
५ कर्ज फेडण्याऐवजी गुंतवणूक करणे : एकाचवेळी कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे ही मोठीच तारेवरची कसरत आहे .आपल्याकडे अतिरिक्त रक्कम आली तर कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे यातील पर्यायांचा बारकाईने विचार करावा लागतो . दीर्घ मुदतीच्या कर्जाची अंशतः परतफेड करणे भवितव्याच्या दृष्टीने अनेकदा खूप फायद्याचे ठरते .
६ महत्वपूर्ण माहितीकडे कानाडोळा करणे : अनेकदा  गुंतवणूक करताना आणि कर्ज घेतांना एक करार केला जातो .यात सर्व अटी आणि जोखिम याची माहिती असते .या अटी काय आहेत आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होवू शकतो याची जाणीव आपल्याला असणे जरूरी आहे .यामुळे स्वतंत्र  निर्णय घेता येणे सोपे जाते .केवळ एजंट सांगतो त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये .
७ गुंतवणूक व कर्ज यांचे कागदपत्र नीट न पहाणे आणि  ठेवणे : आपण केलेली गुंतवणूक आणि  घेतलेली कर्ज या संबंधी सर्व कागदपत्र तपासून घेणे महत्वाचे आहे .आपण मान्य केलेल्या अटीप्रमाणे ते आहे की नाही हे पहावे आणि त्याप्रमाणे नसल्यास लगेच निदर्शनास आणून द्यावे .ही सर्व कागदपत्र व्यवस्थित नोंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत . गुंतवणूकीवरील वारसनोंदी बरोबर आहेत का हे कटाक्षाने पहावे .
८ अंदाजपत्र बिघडणे : आपल्या कुवतीपेक्षा खर्च जास्त होवू नये याची काळजी घ्यावी . ' अंथरुण पाहून पाय पसरावे ' असे म्हटले जाते अगदी तसेच नाही तरी अंथरुण पुरत नसेल तर ते मोठे कसे करता येईल त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे .ज्यायोगे आपल्या अल्प आणि दीर्घकालीन गरजांची पूर्तता आपल्या उत्पन्नातून करता येणे गरजेचे आहे .
   या सर्व गोष्टी आपल्याला माहीत नाहीत असे नाही तरीही आपले पाऊल डगमगू शकते म्हणून परत  एकदा ही उजळणी .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 1 December 2017

संभाव्य आर्थिक संकटे

#संभाव्य_आर्थिक_संकटे

   अचानक येतात ती संकटे , त्यांच्याशी सामना करण्यास आपण कमी पडलो तर आपले नुकसान होते .संपूर्ण आर्थिक घडी विस्कळते. काहीजण या साठी सज्ज असतात पण बरेच लोक गाफिल असतात .व्यवसाय अथवा नोकरी करीत असताना टर्म इन्शुरेन्स , आक्सिडेंट इन्शुरेन्स आणि मेडिक्लेम असला पाहिजे या संबंधी बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार होत असला तरी यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे .काही सरकारी आणि खाजगी उपक्रमानी यांसंबंधी विचार करून त्यांच्या कर्मचाऱ्याना काही विशेष सोई उपलब्ध करूनf दिल्या आहेत .काही ठिकाणी या संबंधी सक्ती असून काही ठिकाणी या सोई घेणे न घेणे ऐच्छिक आहे . काही ठिकाणी अशा योजनांचा खर्च व्यवस्थापन करते तर काही ठिकाणी या सेवासाठी पूर्ण अथवा अल्प रक्कम कर्मचाऱ्यास खर्च करावी लागते .
    आपली आर्थिक घडी बिघडवून टाकणारी काही संभाव्य संकटे अशी --
१  नोकरी सुटणे / धंद्यातील नुकसान : सध्या सरकारी नोकऱ्या सोडल्यास शाश्वत अशा कोणत्याच नोकऱ्या नाहीत .काही कारणाने नोकरी सुटल्यास किंवा धंद्यामधे मंदी आल्यास अल्पकाळासाठी येणारे  पैसे बंद होतात .असे असले तरी काही किमान खर्च जसे लाईट बिल , शैक्षणिक खर्च , किराणा माल , कर्जाचे हप्ते यांची व्यवस्था करावी लागते .या संबधित आपल्या किमान गरजा यांचा अंदाज घेवून 3 ते 6 महिन्याच्या खर्चाएवढी रक्कम अतिरिक्त व्याजाचा मोह न बाळगता एफ डी किंवा मनी मार्केट फंडात असायला हवा जेणेकरून अल्पकाळात हे पैसे उपयोगी येतील .हे पैसे फक्त याच कारणासाठी वापरले जातील या साठी कायम वेगळे ठेवावेत .
२  नैसर्गिक आपत्ती /युद्ध , दंगल , जाळपोळ याने होवू शकणारे नुकसान :या मुळे अचानक मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते .या पासून काही प्रमाणात संरक्षण होण्यासाठी किमान प्रिमियममधे थर्ड पार्टी इन्शुरेन्स उपलब्ध आहे .
३ जोदीदाराचा मृत्यू : जोडीदाराचा त्यातही कमावत्या व्यक्तीचा मृत्यू हा त्या कुटुंबावर मोठा आघात असतो याची भरपाई कितीही पैशानी होवू शकत नाही आणि पैशावाचून प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात .हे कटू असेल तरी सत्य असल्याने आपली दीर्घकालीन गरज ओळखून उत्पन्नच्या 20 पट रकमेचा टर्म इन्शुरेन्स काढणे आणि तो वेळोवेळी वाढणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे .
४ आजारपण / गंभीर आजार : घरातील व्यक्तीचे आजारपण किंवा असाध्य आजार याच्या उपचारांसाठी आपली सर्व पूंजी संपू शकते .किमान 5 लाख रु आरोग्यविमा असावा आणि तो वेळोवेळी वाढावावा .असाध्य रोगांच्यासाठी उपलब्ध विशेष पॉलिसी ज्यांना शक्य असेल त्यांनी घ्यावी .
५ शैक्षणिक खर्च :शैक्षणिक खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे .एकेकाळी ज्या खर्चात उच्चशिक्षण पूर्ण होत होते त्याहून जास्त पैसे मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यास लागतात .वाढत्या शैक्षणिक खर्चासाठी लवलरात लवकरात लवलर ईक्विटी म्यूचुअल फंडाच्या योजनेत एस आई पी  चालू करावे .
६ निवृत्तीनंतरची तरतूद : वाढती आयुर्मर्यादा आणि महागाई यासाठी निवृत्तीनंतरची 25 वर्ष विचारात घेवून ईक्विटी म्यूचुअल योजनेत दीर्घकाळाचे एस आई पी  चालू करावे .
७ मित्र / नातेवाईकांना मदत : आपल्या अडीअडचणीस आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा आपण मित्र व नातेवाईक यांच्याकडून बाळगत असतो तशीच अपेक्षा तेही आपल्याकडून करीत असणारच .आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपण कोणाला फारशी मदत करु शकत नाही तसेच काहींना टाळूही शकत नाही .यासाठी वेळीच काहीतरी किमान तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे .
    ही यादी परिपूर्ण नाही तरीही सहज लक्षात आलेल्या या गोष्टी विचारात ठेवून त्या अनुषंगाने तरतूद करण्याचा प्रयत्न केल्यास अशी संकटे आलीच तर त्याची अंशतः आर्थिक भरपाई होवू शकते आणि आपला अर्थप्रवाह स्थिर राहण्यास मदत होते .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.