Friday, 29 September 2017

चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे भाग -२

चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे            (Financial Ratios) भाग -२

आ .लिक्विडिटी रेशो :  नजीकच्या काळात अपेक्षित असलेली अल्प आणि दीर्घ मुदतीची देणी देण्याची क्षमता म्हणजे लिक्विडिटी यामुळे कंपनी आर्थिकदृष्टा किती सक्षम आहे ते समजते .
१.करंट रेशो :हे गुणोत्तर मालमत्तेला (current asset)देणीनी (current liyablities) भागून  मिळते .मालमत्तेमधे रोख रक्कम , रोख्यातिल गुंतवणूक , शिल्लक कच्चा माल , उत्पादित माल , विविध येणी आणि उचल इत्यादी . तर करंट लियाबलिटीमधे घेतलेली कर्जे , आगाऊ रकमा व्यावसायिक देणी आणि अपेक्षित खर्चाची तरतूद इत्यादी .थोडक्यात येणे भागिले देणे .जर जर अॅसेट हे लियबलिटीचे दुप्पट असणे ही एक आदर्श व्यवस्था मानली जाते .जर हा रेशो 2हून बराच अधिक असेल कंपनीचे अॅसेट पुरेशा प्रमाणात बापरले जात नाहित असा याचा अर्थ होतो तर जर हा रेशो 1हून कमी असेल तर भविष्यात कंपनी वर मोठे आर्थिक संकट  येवू शकते .
२.क्विक रेशो :हा ही एक करंट रेशोच असतो मात्र यात कच्चा माल धरला जात नाही जाचे तात्काळ रोखीकरण होवू शकते तेवढ्या मालमत्ता यात धरल्या जातात .या मुळे अल्प काळातील देणी देण्याची तयारी समजते .हा रेशो 1किंवा त्याहून अधिक असणे चांगले तर 1हून कमी असणे चिंताजनक असते .या रेशोस अॅसीड टेस्ट रेशो असेही दूसरे नाव आहे .
इ .सॉल्व्हन्सी रेशो :या रेशोमुळे कंपनीने घेतलेल्या विविध कर्जामुळे ती दिवाळखोरीच्या मार्गावर तर नाहीना हे समजते .
१.डेबिट ईक्विटी रेशो : हा रेशो काढताना कंपनीची सर्व कर्जाना भांडवलाने भागले जाते .हा तेशो कमीत कमी असणे हे चांगल्या कंपनीचे लक्षण आहे .
२.डेबट अॅसेट रेशो : -हा रेशो काढताना सर्व कर्जाला भांडवल आणि गंगाजळी या मालमत्तेने भागले जाते . कर्जाहुन मालमत्ता जास्त असेल तर कंपनी चांगली आहे म्हणू शकतो .
ई .कव्हरेज रेशो :कंपनीची आर्थिक स्थिति यावरून समजते .
१.इंटरेस्ट कव्हरेज रेशो :व्याज आणि विविध कर देण्यापूर्वीच्या उत्पन्नात घसारा मिळवून त्यांस व्याजाने भागून हे गुणोत्तर मिळते जर हा रेशो छोटा असेल तर व्याज भरण्यासाठी कंपनीला अडचण येवू शकते .ह्या रेशोची तुलना गेल्या वर्षीच्या रेशोशी केली जाते .त्यावरुन कंपनीची आर्थिक स्थिति कशी आहे ती मागच्या वर्षाच्या तुलनेने बिघडली की सुधारली ते समजते
२.डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो :निव्वळ नफ्यात घसारा , व्याज आणि कर यांची रक्कम मिळवून त्यांस  कर्जफेडिची मूद्दल आणि व्याज यांच्या बेरजेने रकमेने भागले हा रेशो मिळतो हा रेशो लक्षात घेताना मागील कामगिरीचा विचार करतात हा रेशो कमी असल्यास कंपनी डबघाईस जाण्याची शक्यता असते .
३.डिव्हीडंड कव्हरेज रेशो :कंपनीच्या प्रेफरन्स शेअरच्या डिव्हिडंड रकमेने करपश्चात नफ्यास भागले की हा रेशो मिळतो .हा रेशो जेवढा मोठा तेवढी कंपनी सुधृढ समजली जाते .
उ.प्रोफिटेबिलिटी रेशो :कंपनीला होणारा फायदा या रेशोमुळे अधिक चांगल्या रीतींने समजुन येतो .
१.ग्रॉस /नेट /ऑपरेटिंग प्रॉफिट मर्जीन रेशो :निव्वळ उत्पादन खर्चास  निव्वळ विक्रिने भागून ग्रॉस प्रॉफिट मर्जीन रेशो तर करपश्चात नफ्यास निव्वळ विक्रिने भागून नेट प्रॉफिट मर्जीन रेशो मिळतात .ऑपरेटिंग प्रॉफिट मर्जीनला निव्वळ नफ्याने भागून ओपेरेटिंग प्रॉफिट मार्जीन रेशो मिळतो त्यांस 100 ने गुणले असता %मिळते  .ऑपरेटिंग प्रॉफिट काढताना कर , घसारा व्याज ही रक्कम वजा करण्यापुर्वीची रक्कम धरण्यात येते .या सर्व रेशोंची तुलना मागील वर्षाशी करण्यात येते .
२.रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड आणि रिटर्न ऑन नेट्वर्थ : घसारा व्याज आणि कर वजा न करीता निव्वळ उलाढालीस स्थिर मालमत्ता आणि भांडवल यांच्या बेरजेने भागले असता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड हा रेशो मिळेल करोत्तर नफ्यास भांडवल गंगाजळीच्या बेरजेतून संचित तोटा वजा करून भागले असता रिटर्न ऑन नेटवर्थ हा रेशो मिळतो .येणाऱ्या रेशोस 100 ने गुणले की %मधे रेशो मिळतो .हे रेशो मागील वर्षाशी तुलना करून जेवढे अधिक असतील तेवढे चांगले .(अपूर्ण)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .
‌‌

Friday, 22 September 2017

चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे (Financial Ratios)भाग -१

 चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे (Financial Ratios) भाग -१
  चांगले समभाग (Share) म्हणजे गुंतवणूकीदाराच्या दृष्टीने अशा कंपनीचे समभाग जी कंपनी सातत्याने नफा मिळवत असून ठराविक अंतराने गुंतवणुकदाराना बोनस हक्कभाग देते , लाभांश देते .काळानूरूप आपल्या व्यवसायात बदल करून सातत्याने प्रगती करते .अश्या कंपनीचे समभाग आपल्या गुंतवणूक संचात (Portfolio) असावेत .ज्यांच्याकडे ते आहेत त्यांना ते शक्यतो विकु नयेत असे वाटते .या समभागाच्या मागणीपेक्षा पुरवठा नेहमीच कमी असल्याने त्यांच्या किंमती सातत्याने वाढत असतात .
   बाजारात गुंतवणूक करणारे वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार अंदाजाने तसेच विविध मूलभूत , तांत्रिक विश्लेषणाचे सहाय्याने याचा अभ्यास  करीत असतात .यासाठी कंपनीचा जमा खर्च , वार्षिक अहवाल , संचालकांच्या  मुलाखती , बाजारतील बातम्या उपलब्ध सर्व माहीती याचा एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे वापर करीत असतात .यातील काही गोष्टींचा दुसऱ्या गोष्टीचा असलेला संबध म्हणजे गुणोत्तर .यामुळे प्राथमिक अंदाज बांधता येतो .अनेक प्रकारची गुणोत्तरे तयार उपलब्ध आहेत त्यामुळे ती काढण्याचा त्रास नाही , परंतू त्यातून काय अर्थबोध घेता येतो ते महत्वाचे आहे .काही महत्वाची गुणोत्तरे यातून समजावून घेवूया .
अ .प्रत्यक्ष शेअरशी संबधित गुणोत्तरे (Ratios)
१.E P S : अर्निग पर शेअर रेशो , हे अतिशय प्राथमिक गुणोत्तर असून ते कंपनीला झालेला करपश्यात नफ्यास (Net Profits) शेअरहोल्डरचे ताब्यात असलेल्या (outstanding) संख्येने भागले असता मिळते .यावरून कंपनीने प्रति शेअर किती रुपये कमावले ते समजते .समजा एखाद्या कंपनीने त्यांच्या 10 ₹ मूल्य असलेल्या शेअरवर 15रूपये प्रतिशेअर कमाई केली तर प्रथम दर्शनी ती कंपनी चांगली असे कोणीही म्हणेल .परंतू या कंपनीचा नफा सातत्याने वाढतोय का? अशाच प्रकारच्या दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत (peer compering) तो किती आहे ते शोधता येते . अनेकदा कंपन्या त्यांचे सर्व समभाग विक्रीसाठी काढत नाहीत किंवा असलेल्या शेअरची पुनर्खरेदी करतात .शेअरहोल्डर ते ताब्यातील शेअर्सची संख्या विचारात घेताना हे पहाणे जरुरीचे आहे .अमुक एक इ पी एस असणारी कंपनी म्हणजे चांगली कंपनी असे सांगता येवू शकत नाही .कंपनीचा व्यवसाय , उलाढाल , भांडवल गुंतवणूक , समभाग संख्या यावर त्याचप्रमाणे सारख्याच आकाराच्या दुसऱ्या कंपनी बरोबर तुलना करून कंपनी चांगली की वाईट हे ठरवता येणे शक्य आहे .
२.डायल्यूटेड EPS :हा इ पी एस काढताना करपश्यात नफ्यास एकूण शेअर्सचे संख्येने भागताना भविष्यात विविध कारणांनी वाढ होवू घातलेल्या शेअर्सची संख्या विचारात घेतलेली असते . रूपांतरणीय रोखे , वॉरंट , कर्मचाऱ्याना दिलेले स्टॉक ऑप्शन किंवा काहींना कंपनी नावारूपास आणण्याचे ऋण म्हणून दिलेले मोफत शेअर्स यांमुळे नजीकच्या काळात शेअर्सची संख्या वाढण्याची शक्यता असते यामुळेच डायल्यूटेड इ पी  एस हा नेहमीच्या इ पी एस  पेक्षा कमी असतो .(अपूर्ण)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Tuesday, 19 September 2017

गूगलचे तेझ अॅप

गूगलचे ऑनलाइन पेमेंटसाठीचे 'तेझ 'अॅप

 ऑनलाईन जगात अग्रस्थान पटकावणाऱ्या गूगलने पेमेंटच्या दुनियेत मोबाईलवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तेज (हिंदीतील तेझ हा शब्द,  जो ' वेग' या अर्थाने वापरला जातो) या नावाचे अॅप भारतीय बाजारात आणले आहे .18 सप्टेंबर 2017 रोजी या अॅपचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेठली यांनी एक छोटा व्यवहार करून केले .हे वॉलेट  नाही , नॅशनल क्लिअरींग कॉरपोरेशने UPI (Unified Payment Interface) ही प्रणाली एक वर्षापुर्वी विकसित केली होती . याच प्रणालीवर हे अॅप काम करीत असून गूगलने NCCI शी करार केला आहे .या व्यवहारांच्या सुरक्षिततेची दोघांनीही हमी घेतली आहे .यासाठी कोणतेही शुक्ल द्यावे लागणार नाही .UPI प्रमाणेच हे अॅप वापरायचे असून याच पेजवर ' यू पी आई एक पाऊल नव्या अर्थक्रांतीकडे ' या लेखात  तीचा वापर कसा करावा ते लिहले आहे . या अॅपचे साहाय्याने 24*7 पैसे पाठवणे , खात्यात रक्कम भरणे , बीले भरणे त्याच क्षणी शक्य आहे .
  यासाठी गूगल प्ले स्टोरवरून हे अॅप डावुनलोड करावे .आपल्या बँक खात्याशी केवळ एकदाच जोडून (Link) घ्यावे .यासाठी आपला मोबाईल नं या खात्याशी संलग्न असणे जरुरीचे आहे .हे करण्यासाठी बँक खाते क्रमांक आई एफ सी कोड द्यावा लागत नाही .त्यानंतर  हे अॅप गूगल पिन किंवा स्क्रीनलॉक देवून सेट करावे लागेल .यानंतर कॅशमोडचे मदतीने पैशांचे हस्तांतरण बँक तपशील न देता केवळ आभासी पत्त्यावर (Vrchual Address) करता येईल .याशिवाय या अॅपचे सहायाने क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डच्या मदतीने पेमेंट करण्याचा पर्यायही  देण्यात आला आहे .हे अॅप अँड्रॉइड आणि आई ओ एस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून इंग्रजीशिवाय हिंदी , मराठी , गुजराती , कन्नड , तामीळ , तेलगू आणि बंगाली भाषेत कार्यरत आहे .यामुळे पेटिएम मोबिक्विक यासारख्या वॉलेट समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे .
संदर्भासाठी UPI वरील लेखाची लिंक :https://m.facebook.com/story.php?story_fbid=393361947675363&id=393354804342744
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 15 September 2017

प्रि मार्केट ओपनिंग आणि पोस्ट क्लोजींग ..........

प्रिमार्केट ओपनिंग आणि पोस्ट क्लोसिंग

        भागबाजारा (Stock Market) मधे व्यवहार करताना आपण सर्वसाधारणपणे बाजारांच्या वेळेत आपला व्यवहार होइल असे सौदे (Orders) टाकतो . ह्या ऑर्डर्स आपण प्रचलित बाजारभावाप्रमाणे (Market Orders) किंवा विशिष्ट भावाने (Limit Orders) टाकतो हे आपल्याला माहीत आहेच .BSE /NSE सकाळी 09:15 ते दुपारी 03:30 या वेळात सुरू असते .ही वेळ बदलून वाढण्याची नजीकच्या काळात शक्यता आहे .सध्या या वेळेपूर्वी 15 मिनिटाचे प्रि ओपनीग सेशन असते , यामधे आणि बाजार बंद झाल्यावर 10 /20 मिनिटाच्या विश्रांतीनंतर,  20 मिनिटाचे पोस्ट क्लोजिंगसेशन असते .या मध्येही व्यवहार होवू शकतात .ते कसे यासंबंधीची माहिती करून घेवू या .
    बाजारात विविध गट कार्यरत असल्याने किंमतीत सतत फरक पडत असतो .हे भाव एका मर्यादेत रहावे  म्हणून बाजारात सर्कीट फिल्टर आणि सर्किट ब्रेकर्सची यंत्रणा आहे .ती कशी चालते हे आपण मागील लेखात पाहिले .यात अकस्मात व खूप मोठा फरक पडला तरी बरीच पडझड होवू शकते .असे न होता समतोल किंमत मिळावी (equilibrium price) या प्रणालीचा खूपच उपयोग होतो . प्रिओपन सेशन मधे आपण व्यवहार करण्याचे ठरवलेल्या शेअरचा आजचा खुला भाव (Opening Price) काय असेल ते ठरवले जाते .या भावानेच पहिला व्यवहार केला जातो .हा भाव प्रि ओपनिंग सेशन मधे कसा ठरतो ते पाहूया .या सेशनची तीन भागात विभागणी केली आहे .
सकाळी  09:00 ते 09:08 या आठ मिनिटात यात भाग घेणाऱ्या सर्वाना आपल्या मार्केट किंवा लिमिट ऑर्डर टाकता येतात याच कालावधीत त्या दुरुस्त (Modify) करता येतात किंवा रद्द (Cancel) करता येतात .
यापुढील 4मिनिटात म्हणजे 09:08 ते 09:12 याकाळात कोणत्याही ऑर्डर टाकता येत नाहीत , बदलता येत नाहीत किंवा रद्दही करता येत नाहीत .या कालावधीत आजचा पहिला व्यवहार कोणत्या भावाने होइल ते ठरते .हा भाव ठरवण्याचे वेगवेगळे प्रमुख निकष आहेत .यामधे कालचा बंद भावाच्या (closing price) तुलनेत आज एका विशिष्ट किंमतीला असलेल्या समभागांच्या ऑर्डरची संख्या विक्रेते आणि खरेदीदार , या किंमतीला उपलब्ध समभागांची मागणी पुरवठा , या किंमतीला जुळणाऱ्या आणि न जुळणाऱ्या समभागांची संख्या यांचा विचार केला जातो .यामधे खालीलप्रमाणे कोणतीही एक प्रमुख शक्यता असू शकते .कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज कमी अथवा जास्त अश्या --
1. एका विशिष्ट भावाला बऱ्याच ऑर्डर पुऱ्या होत आहेत आणि फारच थोड्या ऑर्डर शिल्लक रहात आहेत .तर ती किंमत म्हणजे आजचा सुरुवातीचा भाव असे समजले जाते .
2.दोन विशिष्ट भावांना सारख्याच ऑर्डर्स पूर्ण होत असतील तर ज्या किंमतीच्या सर्वात कमी ऑर्डर शिल्लक राहतील तो भाव कमी /जास्त काहिही असेल तरी आजचा सुरुवातीचा भाव समजण्यात येईल .
3.दोन विशिष्ट भावाना सारख्याच ऑर्डर पूर्ण होतात आणि शिल्लक ऑर्डर्सही सारख्याच रहातात .अशा परिस्थितीत जो भाव बंद भावाचे जवळ आहे (कमी जास्त कोणताही) तो आजचा सुरुवातीचा भाव ठरेल .
4.दोन्ही विशिष्ट भावाना सारख्याच ऑर्डर पूर्ण होतात .शिल्लक ऑर्डर्स सारख्याच रहातात आणि दोन्ही भाव हे कालच्या बंद भावाचे वर खाली सारख्याच अंतरावरुन आहेत अशा परिस्थितीत कालचा बंद भाव हाच आजचा खुला भाव होतो .
5. या कालावधीत व्यवहार न झालेले समभाग जेव्हा पहिला व्यवहार जुळून येईल तेव्हा तो ज्या भावाने होइल तोच आजचा खुला भाव असेल .
  अशा तऱ्हेने मिळालेल्या समतोल किंमतीने (Equilibrium Price) ज्यानी ऑर्डर दिली आहे त्यांची व ज्यानी बाजारभावाप्रमाणे (Market Price) ऑर्डर टाकली आहे या सर्वांचे व्यवहार नोंदवले जावून मान्य केले जातात .
  यापुढील काळात म्हणजे 09:12 ते 09:15 हा काळात शिल्लक राहिलेला काळ हा प्रिमार्केट आणि नॉर्मल मार्केट यामधील संक्रमणाचा कालावधी (Buffer Period) असून याकाळात शिल्लक राहिलेल्या सर्व लिमिट ऑर्डर्स नियमित ट्रेडिंग सेशनकडे वर्ग होतात .तांत्रिकदृष्ट्या पहिल्या 8 मिनिटांतच या ऑर्डर्स स्वीकारल्या जात असल्याने हे व्यवहार फक्त 8 मिनिटेच होतात .
   बाजार दुपारी 03:30 ला बंद झाल्यावर नियमीत  हिशोब करण्यासाठी व्यवहार बंद होतात आणि 03:40 ला BSE आणि 03:50 ला NSE चे पोस्ट क्लोजींग सेशन चालू होते , ते 20 मिनीटे चालते यामधे खरेदीदार आणि विक्रेते यांना एक्सचेंजने  ठरवलेल्या दरानेच खरेदी /विक्री व्यवहार करता येतात .हा दर शेअर आणि डेरिव्हेटीवचे बाबतीत दुपारी 03:00 ते 03:30 या कालावधीतील सर्व व्यवहारांचा सरासरी भाव असतो .दर एक मिनिटांनी उलाढाल व सरासरी भाव नोंदवला जावून त्याची अंतिम सरासरी 30 मिनीटांनी काढली जाते . या वेळेत व्यवहार न झालेल्या शेअरचे बाबतीत शेवटचा व्यवहार ज्या भावास झाला तो भाव ही त्याचा बंद भाव असतो . रोजच्या रोज खरेदी करून विक्री करणारी किंवा विक्री करून नंतर खरेदी करणारे (Day Trader) यांना त्यांचे अपूर्ण व्यवहार पूर्ण करण्याची संधी मिळते .त्याचबरोबर जर गुंतवणूकदाराना शेअरचा बंद भाव मान्य असेल तर त्याच दिवशी शेअर खरेदी करण्याची अधिकची संधी प्राप्त होते .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 8 September 2017

बाजारातील गतिरोधक आणि थांबे

बाजारातील गतिरोधक आणि थांबे ...( Circuit filter/breaker)

  भागबाजारात , इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे समभागांचे भाव वर खाली होत असतात .एकाच वेळी अनेक हेतूने येथे गुंतवणूक केली जाते आणि कमीत कमी तोटा आणि अधिकाधिक फायदा , असा येथे भाग घेणाऱ्या प्रत्येकाचा हेतू असतो . सर्वसाधारणपणे मागणी आणि पुरवठा या तत्वाप्रमाणे -- म्हणजे मागणी अधिक आणि पुरवठा कमी असेल भावात वाढ व पुरवठा अधिक आणि मागणी कमी  असेल तर भावात घट होते . भागबाजारात वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार एकाच वेळी व्यवहार करीत असल्याने त्यांच्या सामूहिक मानसिकतेवर बाजार वरखाली होत असतो आणि तो कोणतीतरी एक दिशा पकडतो .
    समुहाची अशी मानसिकता होणे याची अनेक कारणे आहेत.यामध्ये एखाद्या व्यवसायात आलेली तेजी मंदी , सरकारी धोरण , कररचनेतील बदल , देशांतर्गत स्थिती , जगातीक स्थिती , नैसर्गिक आपत्ती , पावसाचा अंदाज , कंपनीच्या धोरणातील बदल ,कामगीरी , कंपनीविषयी पसरलेली अफवा इत्यादी अनेक कारणांमुळे लोकाना त्या कंपनीचे समभाग आपल्याकडे असावेत अथवा नसावेत असे अचानक वाटू शकते . तर बाजारातील काही घटक आपासातील संगनमताने कृत्रिमरीत्या खरेदी विक्री करून भावात मोठ्या प्रमाणात फरक पाडू शकतात .यामूळे छोट्या गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते असे होवू नये म्हणून सेबीने एका विशिष्ठ मर्यादेतच भाव रहावेत यासाठी गतीरोधक बसवले आहेत .यांना circuit filters असे  म्हणतात . सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बाजार व्यवस्थापन कमिटी ही मर्यादा किती असावी ते ठरवते . या गतीरोधकामुळे किमान त्यादिवशी तरी आधीच्या बंद बाजारभावापेक्षा विहित मर्यादेतच वर खाली होतील .सध्या ही मर्यादा 2,5,10,20%असून  डेरिव्हेटीव करीता कोणतीही मर्यादा नाही या पाच प्रकारांत विभागली असून अपवादात्मक परिस्थिथित ती मधे बदल होवू शकतो .या मर्यादेत ऑर्डर टाकता येते , ज्यावेळी आपणांस संगणक पडद्यावर फक्त खरेदीदार अथवा फक्त विक्रेते दिसतात.तेव्हा त्याचा  उल्लेख अप्पर /लोअर सर्किट लागले आहे असा करण्यात येतो .
   या गतीरोधकाप्रमाणे काही थांबेही आहेत समभाग किंवा निर्देशांकात  (Share or Index) त्यात मर्यादेपलीकडे वटघट झाली तर हे थांबे (Circuit breker) कार्यान्वित होवून व्यवहार काही काळ किंवा त्या दिवसापुरते त्यातील सर्व व्यवहार थांबवले जातात .सध्या sensex आणि nifty तसेच काही निवडक समभाग यांना  10,15आणि 20% वट घटीवर असे थांबे बसवले आहेत . या मर्यादेच्या जवळपास कोणत्याही एका बाजारात (BSE/NSE) जर दुपारी 1 पर्यंत वटघट झाली तर 45 मिनिटे दोन्ही बाजारतील व्यवहार थांबवले जातात आणि 15 मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी (ज्यामध्ये एक निश्चित भाव मिळतो) देवून एक तास थांबवले जातात .जर परिस्थिती 1नंतर परंतू दुपारी 2:30 पर्यंत उद्भवली तर 15 मिनिटे व्यवहार थांबवून 15 मिनीटे प्री कॉल ऑक्शन साठी देवून अर्ध्या तासाकरिता थांबवले जातात आणि 2:30 आल्यास त्या दिवसापूरते यातील व्यवहार थांबवले जात नाहीत .जर अशी परिस्थिती बाजार चालू झाल्याझाल्याच उद्भवली आणि एकदा व्यवहार थांबवून व्यवहार पुन्हा सुरू झाले त्यानंतर 10% वट घट झाली तर व्यवहार थांबवले जात नाहीत मग दुपारी एक पर्यत 15% वट घट झाली तर 1तास 45मिनिटे व्यवहार थांबवून 15मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी देवून दोन तास थांबवले जातात .दुपारी एक ते दोन मधे 15% वट घट झाली तर 45 मिनीटे थांबवून 15 मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी देवून एक तास थांबवले जातात .जर दोन नंतर 15%वट घट झाली उरलेल्या पूर्ण वेळेसाठी थांबवले जातात .दिवसभरात कधीही 20% वट घट झाली तर उरलेल्या पूर्ण वेळेसाठी व्यवहार थांबवले जातात .
  सर्किट फिल्टर आणि सर्किट ब्रेकर लागल्याने छोट्या गुंतवणूकदारांचे संभाव्य नुकसान कमी होते . त्याचप्रमाणे जे खरेखुरे गुंतवणूकदार आहेत ते अचानक झालेली घट अथवा वाढ यामुळे गोंधळून जावू शकतात .त्यांना आपल्या गुंतवणूकीचे संदर्भात पुनर्विचार करून योग्य निर्णय घेण्याची संधी मिळते .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 1 September 2017

गुंतवणुकदारांचे प्रकार

                                                 गुंतवणूकदारांचे प्रकार

    भांडवलबाजारात विविध प्रकारे  गुंतवणूक करता येते हे आपणास माहीत आहेच किंबहुना आपली  गुंतवणुकही समभाग , रोखे , वस्तुबाजारातील वस्तू , यूनिट्स , ई टी एफ , इनव्हिट यासारख्या वित्तीय साधनांमधे विभागून करायला हवी असे सर्व गुंतवणूक तज्ञांचे  मत  आहे .आपली गुंतवणूक ही कायम आपल्या ध्येय्याकडे  नेणारी असली पाहिजे .आपण निश्चित केलेले वाजवी ध्येय्य , उपलब्ध भांडवल , जोखिम घेण्याची त्वरित निर्णय घेण्याची क्षमता यासारख्या अनेक गोष्टींवर ती अवलंबून आहे .येथे भाग घेणारी प्रत्येक व्यक्ति वेगळी आहे त्याच्या गरजा , गुंतवणुक करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची मानसिकता वेगवेगळी आहे या सर्वांचा एकत्रित सामूहिक परिणाम हा बाजारातल्या किंमतीवर होत असतो .बाजारात आपणास आपणास किंमत दिसत असते परंतू त्याचे मूल्य शोधून नफा मिळवणे ही येथे येणाऱ्या व्यक्तीगत अथवा संस्थात्मक गुंतवणूकदाराची इच्छा असते . यातून शक्यता असलेल्या मोठ्या फायद्यामुळे यात असलेले धोके माहीत असूनही ते जाणीवपूर्वक स्वीकारले जातात . ज्याप्रमाणे आपणास व्यक्ति व्यक्ति मधे फरक जाणवतो जसे - एखादा धाडसी असतो तर दुसरा भित्रा , एखादा खूप उत्साही तर एखादा खूप सुस्त , एखादा बेधडक विश्वास ठेवणारा तर एखादा बारीक सारीक गोष्टींची अती चिकित्सा करणारा , एखादा खूप मेहनती तर एखादा पूर्णपणे दैववादी याशिवाय कोणी वेळ पाहून त्याप्रमाणे बदल करणारा अथवा न करणारा .
   भांडवलबाजारातही असे विविध  प्रकारचे गुंतवणूकदारांचे ढोबळ मानाने अनेक प्रकार आहेत त्यांतील काहींची ओळख करून घेवूयात --
 १.दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार (Long Term Investor)- मूलभूत संशोधन (Fundamental Analysis) करून अशी गुंतवणूक केली जाते . गुंतवणूक जेवढी दीर्घ तेवढे नफ्याचे प्रमाण जास्त हे सिद्ध झालेले सर्वमान्य तत्व आहे . त्यामुळे बहुतेक गुंतवणूक सल्लागार अशी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देतात .हे गुंतवणूकदार ज्या कंपनीमधे गुंतवणुक करायची आहे त्याचे संस्थापक कोण ? संचालक मंडळावर कोण आहेत ? त्यांचे उत्पादन कोणते ? बाजारात त्याला मागणी काय भविष्यात बाजारपेठ कशी असेल ? नफा तोटा पत्रक , वार्षिक अहवाल त्यावरील लेखा परीक्षकांचे मत यासारखे बारीक सारिक तपशील विचारात घेतात . गुंतवणूक केल्यावर त्याचा आढावा घेतात आणि त्यांच्या अपेक्षित परिणामावर लक्ष ठेवतात आणि त्यावरून गुंतवणुकीचे काय करायचे तो निर्णय घेतात .असे लोक वर्षानुवर्षे गुंतवणुक करीत असल्याने त्यांना जास्त उतारा मिळण्याची शक्यता जास्त असते जर काही निर्णय चुकून नुकसान झाले तर त्याची भरपाई अन्य मार्गे होवू शकते .वर्षानुवर्ष विशिष्ट कंपनीत गुंतवणुक केल्याने त्यांचे गुंतवणूक मूल्य वसूल होते आणि गुंतवणूकीवर करमुक्त उतारा अधिक चांगल्या दराने मिळत असल्याने सहसा हे समभाग विकण्याचा ते विचार करीत नाही . एक वर्षावरील गुंतवणूकीतून झालेला कितीही फायदा हा करमुक्त असल्याने जरूर लागल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती होवू शकते .
  २.अल्प मुदतीची गुंतवणुक करणारे गुंतवणूकदार (Short Term Investor) - आयकर कायद्याच्या दृष्टीने एक वर्षाच्या आतील गुंतवणूक ही अल्पमुदतीची समजली जावून विहित मर्यादा सोडून झालेल्या नफ्यावर 15% आयकर द्यावा लागतो . हे लोक विशिष्ट कालावधी साठी म्हणून गुंतवणूक करीत नाहीत ती कधी एक दिवसाची असू शकते तर कधी एक वर्षाची . भावात पडणाऱ्या फरकाचा ते फायदा करून घेतात. त्यामु़ळे त्याना तांत्रिकदृष्ट्या ट्रेडर म्हणता येणार नाही त्याना अपेक्षित भाव मिळाला कि ते गुंतवणुक मोकळी करतात . समभाग खरेदी केली , भाव वाढला  कि विकला पुन्हा नविन शोध घेवुन दुसरा समभाग घेतला , अशी चक्राकार खरेदी विक्री चालू असते हा शोध घेण्यासाठी सतत मेहनत करावी लागते .अनेक गुजराथी , मारवाडी आणि सिंधी कुटुंबातील व्यक्ति एक पूरक व्यवसाय म्हणून हा उद्योग करत असतात .
  ३.विक्रेते (Traders) - समभागाचा भाव आणि उलाढाल याचा आलेख मागील काळातील चढ उतार पाहून काही तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून काही  लोक गुंतवणूक करतात .ते या गोष्टी पाहून त्या आधारे केलेल्या गुंतवणूकीतून अल्प काळात अधिकाधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात .हे लोक आलेखाच्या (charts) आधारे अंदाज बांधत असल्याने त्याना
चार्टिस्ट किंवा टेक्निकल एनालिस्ट असेही म्हटले जाते .
 ४.भविष्यकालीन (Derivetives) व्यवहार करणारे गुंतवणूकदार - हे व्यवहार मोठ्या रकमेचे आणि कमी कालावधीत होणारे आहेत .सतत मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करून अल्प काळात मोठा नफा मिळवणे हे याचे उद्दिष्ट असते .भांडवल बाजारात होणारे 80% व्यवहार या सदरात मोडतात .काही धाडसी वैयक्तिक गुंतवणूकदार असे व्यवहार करीत असले तरी त्यांच्या गुंतवणूकीस आर्थिक मर्यादा येतात .संस्थात्मक गुंतवणुकदार मोठया प्रमाणावर असे व्यवहार करतात .याची दूसरी बाजू म्हणजे यातून होवू शकणारा प्रचंड तोटा .यामधे आपण गुंतवणूक केलेले भांडवल नष्ट होवून खिशातील अधिकचे पैसे देण्यास लागू शकतात .तेव्हा हे व्यवहार कसे होतात ते समजून न घेता करणे अत्यंत धोकादायक आहे .
  ५.डोळे मिटून (Blind Eyes) गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार - भांडवलबाजाराचा मोठ्या प्रमाणात विस्तार आणि विकास न होण्याचे असे गुंतवणूकदार हे महत्वाचे कारण आहे . हे गुंतवणूकदार कोणताही अभ्यास करीत नाहीत कोणी काही सांगावे आणि यांनी गुंतवणूक करावी .यातून फायदाही होवू शकतो परंतु कधीतरी ते सापळ्यात अडकतात आणि मग गुंतवणूक करून देण्याचे सोडून देतात आणि बाजाराच्या नावे खडे फोडतात . वास्तविक त्यांच्याकडे अधिक चांगल्या तऱ्हेने या गोष्टी समजण्याची पात्रता असते परंतू ते याकडे लक्ष देत नाहीत आणि आपली काय चूक झाली तेही सांगत नाहीत मांत्र लोकांच्या मनात भिती निर्माण होईल असे काहीतरी बरळत बसतात . असे लोक सोडून बाकी सर्व लोकांच्या डोळस गुंतवणूकीची भांडवल बाजारांच्या विकासासाठी आवश्यकता आहे .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .